पाककृती

गुळाच्या पोळ्या

Primary tabs

साहित्यः
१/२ किलो गुळ (चिक्कीचा गुळ नाही ना याची खात्री करून घ्या.)
१/२ वाटी डाळीचे पीठ
१/२ वाटी साजुक तूप
१/४ वाटी तीळ
१ टे.स्पून प्रत्येकी भाजलेली खसखस व खोबर्‍याचा कीस
१ टी.स्पून वेलदोडा पूड
१ टी.स्पून जायफळ पूड

२ वाट्या कणिक, १ वाटी मैदा,पाव वाटीपेक्षा थोडे कमी डाळीचे पीठ, १ टे.स्पून तेल,१/२टी.स्पून मीठ, चिमूटभर हळद, लाटायला तांदळाची पीठी.

कृती:
एका कढईत गुळ चिरून घ्यावा. त्यात २ टे.स्पून पाणी घालून गॅसवर ठेवून विरघळून घ्यावा. मंद गॅसवर सतत हलवत राहावे व गुळ विरघळल्याबरोबर गॅस बंद करावा.
तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्यावे, तेही गुळात ओतावे.
तीळ, खसखस व खोबरे वेगवेगळे भाजून बारीक करून घ्यावे.( मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात मोठ्या स्पीड वर तेल सुटेपर्यंत बारीक करावे.)व ही पेस्ट गुळात घालावी.
आता वेलची, जायफळ घालून गुळ ढवळावा. एकजीव करावा व थंड होऊ द्यावा.

आता कणिक,मैदा,डाळीचं पीठ, मीठ, हळद एकत्र करावे व त्यात गरम तेलाचे मोहन घालून नेहमीसारखी कणिक भिजवावी व चांगली मळावी.

कणकेचे लिंबाएवढे गोळे करावे व त्याच्या हाताने पार्‍या कराव्या. गुळाची गोळीही तेवढीच दाबून चपटी करावी व दोन पार्‍यात ठेवून पार्‍या बंद करून पीठीवर पोळी शक्य तेवढी पातळ लाटावी.

गुळाच्या पोळीला शक्यतो नॉनस्टीक तवा घ्यावा, म्हणजे गुळ बाहेर आला तरी चिकटत नाही.
पोळी कमी मध्यम आचेवरच भाजावी. एकदाच उलटावी. कारण पटकन करपू शकते.
भाजलेल्या पोळ्या कागदावर पसरून पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भराव्यात.
१/२ किलोच्या प्रमाणात २० पोळ्या होतात.

संक्रांतीच्या मुहुर्तावर गुळपोळी......सही आहे!

या संक्रांतीला घरची फारच आठवण येणार आहे असं दिसतयं :(

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

प्राजु

वेलकम बॅक...
मिपाच्या अन्नपूर्णा मिपावर परत आलेल्या पाहून खूप बरं वाटलं.
आणखी जोरदार रेसिपिंची अपेक्षा आहे स्वातीताई तुझ्याकडून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजुशी पूर्ण सहमत!!! (स्वगतः प्राजुशी सहमत? अरे देवा, काय दिवस आणलास!!!:))

पण खरं सांगू स्वातीताई! आम्ही तुम्हाला इथं मिपावर मिस केलं हो!
आमच्या एग्झेक्युटिव्ह शेफ इथून गायब झाल्या आणि मग काय काय वाचावं लागलं या 'पाककृती' सदरात!!! काळ्या पाण्याची जन्मठेपच की हो ती!!!!:)

आता पुन्हा अशा गायब होत जाऊ नका बुवा!!

-पिडांकाका

सहज

वेलकम बॅक!!

असेच म्हणतो. :-)

मिना भास्कर

धन्यवाद,
स्वाती ताई ब-याच वर्षात गुळ पोळी न केल्याने विसरून गेले होते. आता नक्की करून बघते. (गूळ चिक्कीचा नसेल तर. ) पण चिक्कीचा गूळ नाही हे कसे बरे ओळखावे????

विसोबा खेचर

मिपाची अन्नापूर्णा गुळपोळीच्या पाकृसह मिपावर परतल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! :)

स्वाती राजेशचा विजय असो..! :)

पोळीचा फोटू का नाही दिला बरं?

तात्या.

ज्योति

गुळ गरम न करता फक्त किसुन त्यात बाकीचे साहित्य मिसळुन देखिल करता येतो ना?

तुझे बरोबर आहे. काहीजण गुळ गरम न करताच नुसता किसून बाकीचे साहित्य त्यात मिसळतात.
पण अशा वेळी किसताना, किसणीवरचा गुळ त्यात जाऊ देऊ नये. त्यातील बारीक खडे तसेच राहिले तर पोळी लाटता येत नाही.:)

वरील सर्वांचे आभार!!!!
मला माहीत नव्हते कि इतकी मि.पा.कर मला मिस करत होते...
मस्त वाटले वरील प्रतिक्रीया वाचून....:)
मी माझ्याकडून जेवढ्या रेसिपी ची माहिती देता येइल तेवढी देइनच....
मि.पा.चे सुद्धा आभार की हा प्लॅट्फॉर्म उपलब्ध करून दिला...

स्नेहश्री

माझी आई डाळ-भाता बरोबर हा गुळ घट्ट झाकण्यच्या ड्ब्यात उकडुन घेते जेणेकरुन गुळ छान मऊ होतो आणि त्यात गुठळी रहात नाही.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

सोनम

गुळाच्या पोळ्या.
साहित्य : २ वाटी किसलेला गुळ, पाव वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी तीळाचे कुट, १ चमचा खसखस, अर्धी वाटी बेसन, १ मोठा चमचा तेल, कणिक हवी तेवढी, चिमुट भर मीठ, १ टीस्पुन वेल दोडे पुड.

कृती : बेसन तेलात फेस येईपर्यंत खमंग भाजावे, म्हणजे बेसनाच्या लाडुला भाजतो तसे. फार तपकिरी वा लाल करु नये. मग ते gas वरुन उतरवुन कढईत बेसन गरम असतानाच किसलेला गुळ घालावा अन सारखे करावे. बेसनाच्या आधीच सुके खोबर्‍याचा किस अन खसखस वेग वेगळी कोरडीच भाजुन घ्यावी. अन त्यांची पुड करावी. तीळ पण कोरडे भाजुन त्यांची पुड करावी. वेलदोड्याची खसखशी बरोबरच मिक्सरमध्ये पुड करावी.

हे सर्व पुड मिश्रण बेसन अन गुळात एकत्र करावे. अन चांगले मळावे, पाहिजे तर पुसटसर तेलाच्या हाताने मळावे. अन डब्यात भरावे. पाहिजे तर एकदा मिक्सरमध्ये फिरवुन घ्यावे.

करायच्या वेळी कणिक कडकडीत तापलेल्या तेलाचे चमचाभर मोहन अन चिमुट मीठ घालुन घट्ट भिजवावी. नंतर करताना तिच्या २ लाट्या घेऊन छोटीसी पुरी लाटावी. एका पुरीवर मिश्रणाचा थोडा गोळा घेऊन तो त्यावर ठेवुन मग दुसरी पुरी ठेवावी. मग कडेने आधी लाटुन मग मध्ये लाटावी. म्हणजे मिश्रण सगळीकडे पसरेल. अन पातळ लाटावी. मग तव्यावर खमंग भाजावी. ह्या पोळ्या बर्याच दिवस टिकतात. अन तयार मिश्रण पण फ्रिझमध्ये रहाते.

नूतन

प्रतिक्रिया जर उशिराच!
गूळ सू़क्ष्म्लहरी भट्टीत १ मि ठेवल्यासही छान मऊ होतो