पाककृती

तिखटामिठाचे आप्पे आणि चटणी

Primary tabs

साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभर्‍याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी कच्चे जाड पोहे, हिरव्या मिरच्या,
आल्याचा छोटा तुकडा, पाव वाटी धूवून चिरलेली कोथिंबीर, दीड टेबलस्पून कच्च्या तेलाचे मोहन.

कृती : आदल्या दिवशी तांदूळ व दोन्ही डाळी स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घालव्यात.
रात्री परत एकदा धूवून सरसरीत वाटून एकत्र करून उबेच्या जागी झाकून ठेवावे.
दुसरे दिवशी आप्पे करायच्या वेळी जाड पोहे पाण्यात धूवून कुस्करून मिश्रणात घालावेत.
मीठ, मिरची व आल्याचे वाटण घालावे. आवडत असल्यास कोथिंबीरीबरोबर थोडा कांदा व टोमॅटो बारीक चिरून पिठात मिसळावा.
पिठात तेलाचे मोहन घालून ढवळून ठेवावे. गरम आप्पेपात्रात थोडे तेल घालून त्यावर डावाने पीठ ओतावे.
आप्पेपात्राचा खळगा ७५% भरावा. झाकण ठेवून ५ मिनिटे खरपूस होऊ द्या.
आता आप्पे उलटून पुन्हा थोडे तेल सोडावे. गरमागरम आप्पे नारळाच्या चटणीबरोबर वाढावेत.
चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, एक छोटी पाकळी लसूण, किंचित आलं, मीठ, साखर व चार काजू घालून बारीक वाटावे.
वरून गार झालेली बिन हळदीची फोडणी द्यावी.

रेवती.

मदनबाण

आयला आत्ताच उपास सोडला,,आणि समोर हे आप्पे !!! :)

(खादाड)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

रेवती

सॉरी बाणा!
हाच फोटू तू उद्या बघ.

रेवती

मृण्मयी

काय दिस्ताहेत आप्पे आणि चटणी!! आप्पे तर इतके खरपूस आणि टेंम्प्टिंग की उचलून खाता आले असते तर ट्रेमधे एक पण उरू दिला नसता. :)
करून बघणार!!

चित्रा

असेच म्हणते. मस्त दिसतायत आप्पे.

अवलिया

फारच छान... जेवण झाल्यावर फोटो पाहिले... तरी भुक परत लागलीच..

(हा प्रतिसाद जर मिपाच्या धोरणात बसत नसेल तर सभ्य आणि सज्जन संपादकांनी सोवळेपण नष्ट झाले या कारणाखाली उडवला तरी चालेल)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

रेवती

माझा विश्वास बसत नाहीये नाना!
आपण माझ्या पाकृला प्रतिसाद दिलात?
असो, फार आनंद झाला.

रेवती

अवलिया

मी पाकृ वाचत असतो.. पण काय लिहायचे हे कळत नाही.
त्यामुळे आजवर कधी प्रतिसाद दिला नव्हता. राग मानु नये.
अशाच पाकृ देत जा (फोटोसह) :)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

श्रावण मोडक

आप्पे छानच. मला आप्प्यांसोबतची चटणी मात्र पातळच हवी असते. वाडग्यात चटणी घ्यायची आणि त्यात आप्पा अर्धवट मुरू द्यायचा.
तिखटामीठाचे म्हणण्याचे कारण कळले नाही. साधारणपणे नुसतेच आप्पे म्हणतात हे ऐकले आहे.

रेवती

आपले म्हणणे बरोबर आहे. पातळ चटणीबरोबर छानच लागतात.
रेवती

स्वातीदेव

आप्पे हे दोन प्रकारचे करतात. तिखटामीठाचे आणि गोडाचे. म्हणून वर तसे स्पेसीफाय केले आहे.

श्रावण मोडक

गोड आप्पे हे मी प्रथमच ऐकले. धन्यवाद.
अवांतर: आप्पे आणि गोड? काही खरं नाही...

रेवा

गोड आप्पे कसे करतात?
इडलीचा रवा वापरता येईल का?

रेवती

इडलीचा रवा वापरायला हरकत नसावी. मी कधी वापरला नाहीये.

रेवती

शितल

अरे वा ..
रेवती.. आप्पे खुपच छान दिसत आहेत.
आप्पे खाऊन आता एक वर्ष झाले असेल. करायला पाहिजेतच आता लवकर.:)

मनस्वी

मी पण करीन लवकरच.
पाकृ आणि फोटो एकदम टेम्टींग.

मस्तच. गरम गरम आप्पे खायला मजा येते. मोजायचेच नाहीत.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

सहज

मोजायचे नाहीत
+१

:-)

हरभरा डाळीला [फुड ऍलर्जी :-( ] पर्याय काय का हरभरा डाळ न वापरताच??

रेवती

मुगाची डाळ हा हरभरा डाळीला पर्याय होऊ शकेल असे वाटते.
ज्यांना हरभरा डाळ सोसत नाही त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करतात.
त्यावरून हा अंदाज केला आहे.

रेवती

स्वातीदेव

केळ्याचे गोड आप्पे

साहित्य :
केळी - ३
ओले खोबरे (खवलेले) - १ वाटी
जाड तांदूळ (भिजवलेले) - १ वाटी
दलिया - १ वाटी
गूळ - अर्धी वाटी
Eno - अर्धा चमचा

कृती :
सर्वप्रथम तांदूळ व दलिया दळून घ्यावे.
नंतर या मिश्रणात केळी, गूळ, खोबरे एकत्र करून शेवटी eno घालावे.
आप्पेपात्रात हे मिश्रण झाकण ठेवून ६-७ मिनिटे मोठ्या आचेवर गॅसवर ठेवावे.
काढताना बाजूने तूप घालून काढावेत.

ही recipe internet वरुन घेतली. आई वेगळ्या पधतीने करते. खोबर्याच्या चकत्या घालून. recipe तीला विचारुन सांगेन.

@ रेवा. sorry मला माहीत नाही इडलीचा रवा वापरतात की नाही ते

रेवती

आपल्या पाकृ बद्दल धन्यवाद!

रेवती

विसोबा खेचर

रेवतीकाकू,

अरिशय सुरेख फोटोबद्दल आणि पाकृबद्दल मनापासून आभारी आहे! :)

ही आमचीही अत्यंत आवडती पाकृ आहे! :)

तात्या.

शाल्मली

रेवती ताई,
एकदम सह्हीच पाककृती! आणि फोटोही मस्तच!
माझी आई बरेचदा हे आप्पे करते त्याची आठवण झाली.
संध्याकाळी शाळेतून आल्यावर गरम गरम आप्पे खायला खूप छान वाटायचे.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
इथे माझ्याकडे आप्पेपात्र नसल्याने फक्त तू दिलेल्या फोटोवरच समाधान मानावे लागणार आहे.. :(
--शाल्मली.

आप्पे आणि चटणी मस्त दिसताहेत!!
अभिनंदन!

(खुद के साथ बातां: आता लवकर लंचला जाणं आलं!!! हे समोरचं काम आता कोण करील? च्यामारी, बैलाला घो त्या रेवतीकाकूच्या!!!)
:)

रेवती

आमच्याकडे याल तेंव्हा करीन. एक दिवस आधी सांगा फक्त!

रेवती

चकली

"दुसरे दिवशी आप्पे करायच्या वेळी जाड पोहे पाण्यात धूवून कुस्करून मिश्रणात घालावेत."
हे मस्त!

तू सुगरण आहेस एकदम. छान पाककृती! आणि फोटोही मस्तच!

चकली
http://chakali.blogspot.com

रेवती,
आप्पे मस्त दिसताहेत.. आवडले.फोटू तर खल्लासच!
स्वाती

रामदास

डोंबीवलीला एक अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात खाल्ल्याचे आठवते.फार चविष्ट प्रकार.आता अन्नपूर्णात जाण्याचा बहाणा शोधतो.

मुक्तसुनीत

- डोंबिवलीत सासर असलेला :-)

रेवतीताई , आप्पे फारच भारी. येत्या वीकेंडला बनवायचा ट्राय करणार.(आणि बायकोचे आधी टोमणे आणि नंतर कॉम्प्लिमेन्ट्स खाणार.)

रेवती

सर्व खवय्यांचे मनापासून आभार!

रेवती

फोटो आणि रेसिपी दोन्ही मस्त!
आप्पे मधे पोह्याची आयडीया मस्त! मी इतकेदिवस फक्त इडलीमधे वापरत होते, आता आप्पे करताना सुद्धा घालेन.:)
चटणीचा रंग छान आला आहे...:)

रेवती,,,
तुला आप्पे येतात? आमची बॉस्टन ट्रीप नक्की :) :)
बरं झालं आठवण केलीस....
असेही बायको भारतात होती त्यामुळे खूप दिवसांत आप्पे झाले नव्हते;
आता तिला पटवतो विकांतचा ब्रेकफास्ट आप्पे म्हणून.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

रेवती

सहकुटुंब जरूर ये घरी बॉस्टनला. आप्पे करीनच.
रेवती

सुनील

छान पाकृ आणि फोटो. तसेच स्वातीदेव यांनी दिलेली गोड आप्प्यांची पाकृही छानच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धाकली

व्वा, शनिवारचा बेत ठरला. छानच दिसताएत अप्पे. जाम भुक लागलि बाघुन!!!

पक्या

वा छान रेसिपी .
आप्पेपात्राशिवाय आप्पे करता येतील का? उदा. इडलीपात्र

रामची आई

रेवती, मी हे आप्पे आज केले सकाळी नास्त्यासाठी...मस्तच झाले.
छान पाककृतीबद्दल धन्यवाद!!

मेथांबा

आप्प्यात ओल्या खोबर्‍याचे तूकडे पण घालतात की हो. आप्पे खाता खाता चावले गेले कि मजा वाटते

गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा

विंजिनेर

पुन्हा भुक लागली राव...

ह्यालाच तमिळनाडुमध्ये पनियरम असे म्हणतात ना? का त्याची पा.कृ. वेगळी असते?

(भुकेला तमिळ) विंजिनेर

उमा

अमेरिकेत इथे आप्पे पात्र नसेल तर दुसरा काय पर्याय चालू शकेल?

रेवती

मध्यंतरी 'बेड, बाथ ऍंड बियाँड' ह्या दुकानात अप्पेपात्रासारखीच वस्तू बघितली होती. पुन्हा नक्की बघून कळवीन.

रेवती

स्रुजा

मिनि पॅनकेक मेकर म्हणते आहेस ना? आप्पे छान होतात त्यात. मी केले आहेत.

स्रुजा

आणि हो रेसिपी छान ते सांगायचं राहिलंच :) वाखु साठवली आहे.

सुचेल तसं

सुंदर पाकृ...
अवांतरः आमच्याकडे आप्पेपात्र नसल्याने आम्ही आप्पे वाडेश्वरला खातो.

Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon

pramanik

कधीतरी ह्यात ताक वापरुन बघा.छान चव येते.

रुस्तम

मागच्या आठवड्यात आप्पे पात्र घेतले आणि आज आप्पे केले. माझ्या लेकीला खूपच आवडले.

आदूबाळ

माझाही आवडता पदार्थ आहे, पण इंडस्ट्रियल स्केलवर बनवण्याची सोय नसल्याने घरी बनवत नाहीत. कधी दक्षिण भारतात जाणं झालं की मनमुराद हाणतो.

माहितगार

पण इंडस्ट्रियल स्केलवर बनवण्याची सोय नसल्याने घरी बनवत नाहीत.

कुकींगरेंजवर एकाच वेळी चार आप्पेपात्र लावा हा.का.ना.का.

पद्मावति

फारच टेंप्टिंग दिसताहेत हे आप्पे. साइडला हिरवी चटणी पण क्लास दिसतेय.

रेवती

सर्व नव्या प्रतिसादकांचे आभार.
स्रुजा, पॅनकेक पॉपर या नावाने ही वस्तू आमच्यायेथे मिळते.

palambar

हा पदार्थ का कोण जाणे करून बघायचा राहिलाच, आता
करणार.

रेवती

एबलस्किव्हर पॅन नावानेही आप्पेपात्र मिळते.