जे न देखे रवी...

वाच पुस्तके

Primary tabs

वाच पुस्तके

जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके!
जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके!

साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन
जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके

संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो
मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके

सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा
हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके

आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती
हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके

स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया
मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके

----अविनाश ओगले

इनोबा म्हणे

अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा....

स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया
मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके

या ओळी विशेष आवडल्या..

सुनील

अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली!

(वाचक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश

हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :)
एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे

-ऋषिकेश

प्राजु

खूप छान आहे ही गजल...

अशीच आणखी ही येऊदे.

- प्राजु.

विसोबा खेचर

आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती
हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके

वा! सुंदर गझल...

तात्या.

तळीराम

गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय?