जनातलं, मनातलं

चक्कर कथा (अंतिम)

Primary tabs

या लेखाचा पूर्वार्ध वाचला आहे असे गृहित धरून पुढे….

ख्रिस डोक्याला हात लावून बसला होता. मी यायच्या आधी त्याने नवीन कमोडचा बॉक्स उघडला होता आणि कमोड बाहेर काढल्यावर लक्षात आले की कमोड फुटलेला होता. नेमका फुटका भाग, बॉक्स नुसते उघडल्यावर, दिसत नव्हता. मग काय … पुन्हा एकदा होम डेपोमधे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ख्रिसच्या व्हॅनमधे कमोड टाकून दोघंही निघालो. जाताना ख्रिसने गाडीतलं सिगारेट्सचं पाकीट संपलं म्हणून आधी gas station वरून सिगारेट घेतल्या. मला म्हणाला, “ काय दिवस आहे बघ आजचा. मी ठरवलं होतं की गाडीतलं सिगारेटचं पाकीट संपलं की आजपासून सिगारेट ओढणं सोडून द्यायचं ! पण सकाळपासून जे काही चाललं आहे ते पाहून आज तरी मी सिगारेट सोडू सकत नाही !” सहज विचारलं दिवसात किती सिगारेट्स ओढतो तर म्हणाला – एक पाकीट दिवसाला – म्हणजे २० सिगारेट्स !

गाडीत ख्रिसशी गप्पा करत होतो. तो मूळचा पोलंडचा. त्याला विचारलं की इथे न्यू जर्सीत चांगलं पोलिश रेस्टॉरंट कुठे आहे का, वगैरे असंच इकडचं – तिकडचं. आपल्याला अनोळखी प्रांतातल्या माणसाकडे त्याच्याकडच्या खास पदार्थांची वगैरे चौकशी केली की गंभीर माणूसही आनंदाने काय छान बोलता होतो ना? ख्रिस म्हणाला इथे रेस्टॉरंटस आहेत पण पोलंडसारखी मजा नाही. इथे पटापट जेऊन बाहेर निघावं लागतं… पोलंडमधे कसं…. मस्त निवांत दोन-दोन तास मित्रांबरोबर गप्पा छाटत निवांत जेवता येतं. अक्षरश: आपणही ह्याच तळमळीने म्हणतो ना, “आपल्या कॉलेजसमोरच्या इराण्याकडे १ सिगारेट, २ चहा, ४ मित्र एवढं जमवलं की मग २-३ तास तरी कुणी उठवायला येणार नाही !”, किंवा ‘आपल्याकडे काय मस्त भेळ आणि वडा-पाव मिळतो याsssर, इथे वडा-पाव मिळतो पण उगाच आपला नगाला नग !”

एवढ्यात होम डेपोमधे पोचलो. मला तर वाटतं आतापर्यंत होम डेपोतल्या कर्मचाऱ्यांनी बहुतेक एकमेकांत पैज लावली असावी – हा आज परत एकदा येतो की नाही बघ म्हणून ! वस्तू परत द्यायच्या / बदलून घ्यायच्या काऊंटरवर एक देसी काका होते. त्यांनी विचारून घेतलं काय प्रॉब्लेम आहे वगैरे… मग त्या बॉक्सला defective piece असा स्टिकर चिकटवून टाकला. अमेरिकेत हे एक बरं आहे… पैसे निदान पाण्यात तरी जात नाहीत. हे सगळं होईपर्यंत ख्रिस आत गेला आणि त्यानं कमोडचं दुसरं बॉक्स घेतलं. तिथून निघालो आणि ख्रिस म्हणाला, “चला आता पुन्हा या होम डेपोत मी निदान आजचा पूर्ण दिवस तरी येणार नाही.” लांब लांब कुठेतरी आकाशाच्या पलीकडे नियती मनात म्हणाली असेल, “आजचा दिवस काय लेका… अजून अर्ध्या तासाच्या आत पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही होम डेपोत आणते की नाही बघच !”

घरासमोर पार्किंग लॉटमधे आम्ही कमोडचं खोकं उचललं आणि येऊ लागलो. खोकं नीट धरण्यासाठी खोक्यांना, दोन बाजूंना एक एक खाच केलेली असते ना, ती वापरून एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने ख्रिसने खोकं उचललं !.. घराला दोन पायऱ्या आहेत….. दोन म्हणजे मोजून दोन पायऱ्या आहेत…. मी पुढे होतो आणि ख्रिस मागे…दोघांच्या मधे खोकं….खालच्या पायरीवरून मी वर चढत होतो… अचानक मी धरलं होतं त्या ठिकाणी खोकं टर्रकन फाटलं….. माझी पकड सैल झाली…. खोकं माझ्या बाजूला कलंडलं… ख्रिसच्या हाताचीही पकड सैल झाली.. काही कळायच्या आत खोक्याच्या खालच्या बाजूची पॅकिंग टेप निघाली…. त्याबाजूचे पॅकिंगचे पुठ्ठे उघडले गेले….. दरवाजात उभा असलेला आदित्य घाबरला… दीपाचा ‘अरे .. अरे’ असा आवाज ऐकू आला आणि त्या पाठोपाठ धाडकन आवाज करत…..खोकं जमिनीवर पडलं !

खोकं नीट करून, धडधडत्या छातीनं, आम्ही खोक्याची वरची बाजू उघडून पाहिली तर आतला कमोड………..फुटला होता !! हताश नजरेनं आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. मी आणि ख्रिस आल्यापावली होम डेपोत परत जायला निघालो ! दीपा पुन्हा एकदा आदित्यला सांभाळायचा किल्ला लढवायला लागली !

आतापर्यंत दुपार सुरू झाली होती. ख्रिसला म्हटलं आधी लंच करतोस का तर म्हणे नाही … मी जेवलो की आळसावतो; आणि असंही कधी एकदा हे काम संपवतो असं झालंय ! आता तोच असं म्हणाल्यावर मीही माझ्या पोटातल्या कावळ्यांना दामटून गप्प केलं !!

पुन्हा एकदा ख्रिसच्या व्हॅनमधून होम डेपोत जायला निघालो… आणि आमच्या गप्पा सुरू ! त्याला म्हटलं की आता हा फुटलेला कमोड त्यांनी परत घ्यायला पाहिजे. तर तो म्हणाला की अरे पण कमोड ऍक्सिडंटमुळे फुटलाय हे तुला माहितीय, मला माहितीय पण होम डेपोवाल्यांना माहिती नाहीये ना ! मनात म्हटलं बहाद्दर आहेस लेका …. मला तर एकदम असाच डायलॉग मारणाऱ्या ’डॉन’मधल्या बच्चनची आठवण आली !

आम्ही वाटेत असताना एका सिग्नलला आम्हाला डावीकडे वळायचं होतं. समोरून सरळ येणाऱ्या वाहनांतली पहिलीच गाडी पोलीसाची होती. म्हटलं आता एक speeding ticket मिळणंच बाकी राहिलं आहे ! माझ्या मनातले विचार बहुतेक ख्रिसने ओळखले. पोलीसाची गाडी गेल्यावर आम्ही वळलो आणि ख्रिस म्हणाला, “ इतर कुठलीही गाडी असती तर मी कट मारून गेलो असतो आधी; पोलीसाची गाडी होती म्हणून थांबलो.” त्याला म्हटलं, “काही युनिफॉर्म असे असतात की ते न बोलता आदर मागतात !” तर तो म्हणे, “हट्ट… मला पोलिसांबद्दल आदर-बिदर नाहीये पण तो जे ticket देऊ शकतो त्या तिकिटाबद्दल आदर आहे !!”

आता होम डेपोत पोचलो तर मला वाटायला लागलं की मगाशी आम्ही घरी जायला निघालो तेव्हा बहुतेक या कर्मचाऱ्यांनी पैज बदलली. “हा येईल की नाही?” याऐवजी “आता हा किती वेळात परत येईल ?” अशी पैज लावली असावी !

होम डेपोच्या return and exchange counter वर तेच देसी अंकल होते. त्यांनी विचारले, “काय झाले?” म्हटलं कमोड फुटलाय. त्यांनी अक्षरश ’आँ’ असा उदगार काढला !! मग त्यांना सगळं वर्णन केलं – काय झालं आणि ऍक्सिडंट कसा झाला ते ! त्यांनाही पटलं की जर बॉक्स तकलादू होता तर ती चूक आमची नव्हती. त्यामुळे त्यांनी खळखळ न करता कमोड परत घेतले. ख्रिसचा सल्ला मानला नाही ते उत्तम झालं हे वेगळं सांगणे न लगे !

आता नवीन कमोड घेताना वेगळ्या कंपनीचा घेतला. ख्रिसच्या अनुभवाप्रमाणे तो कमोड आधीच्या कमोडपेक्षा जास्त चांगला होता. मी आयुष्यात कमोड बदलणं तर सोडाच पण कमोडचं चित्रही काढलं नाहीये त्यामुळे ख्रिसचा हा सल्ला मात्र योग्य मानला. त्या दुसऱ्या कंपनीचा कमोड घेतला तर ख्रिस म्हणाला की बहुतेक आधीच्या कंपनीच्या कमोडना तुझ्या घरी यायचे नाहीये !!

पुन्हा एकदा सगळं सामान घेऊन घरी आलो. आता खऱ्या अर्थाने ख्रिसने कामाला सुरूवात केली ! बघता बघता दीड-दोन तासांत त्याने सगळं काम संपवलं ! सगळं झाल्यावर आता फक्त कमोडचं झाकण लावायचं बाकी राहिलं होतं आणि त्या झाकणाचे स्क्रू कुठेही सापडेनात ! सगळं पॅकिंग उलटंपालटं करून पाहिलं पण इल्ले ! आम्ही चक्रावून गेलो.. त्याहीपेक्षा हबकलो की आता परत एकदा होम डेपोमधे जावं लागतंय की काय ! मी अगदी ख्रिसला म्हणणार होतो की बाबा रे, पाहिजे तर आम्ही दोन दिवसांनी होम डेपोतून स्क्रू आणतो आणि आम्हीच लावतो. पण सापडले… स्क्रू सापडले !! पॅकिंगमधेच एका प्लॅस्टिकने गुंडाळून ठेवले होते पण कमोड आणि स्क्रूं दोन्हीचा रंग पांढरा असल्याने ते पॅकिंगमधे पटकन दिसले नव्हते. हुश्श ! तेवढे स्क्रू लावून झाल्यावर काम संपलं एकदाचं. जर सगळे काही ठीक ठाक झाले असते तर ख्रिसचं काम सकाळी अकराच्या सुमारास होऊन गेले असते !

सगळं आटोपून ख्रिस गेला. मी आणि दीपाने जुने बेसिन, जुने कमोड वगैरे सरळ गाडीच्या ट्रंकमधे भरले आणि आमच्या सोसायटीतील कचऱ्याचा डबा गाठला. मी घरी परतल्यावर गरम गरम पाण्याच्या शॉवरखाली बराच वेळ उभा होतो. त्यानंतर आधी पोटातल्या कावळ्यांना शांत केलं.

आमच्या एका मित्राचा ग्रुप त्याच दिवशी ’आर. डी. – गुलजार’ या बेफाट दुकलीवर आधारित कार्यक्रम सादर करणार होता. कार्यक्रमाला जायची खूप खूप इच्छा होती पण इथे माझी अवस्था ’शिंगरू मेलं हेलपाट्याने’ अशी झाली होती. शेवटी दीड-दोन तास झक्कपैकी ताणून दिली आणि एकदाची चक्कर कथा संपली.

प्राजु

बिचारे होम डेपोवाले.. त्यांना वाटलं असेल या ख्रिस आणि संदीप शिवाय आपल्याला दुसरं कोणी गिर्‍हाईकच नाहीये.
खरंच ... चकरा मारता मारता तुलाही चक्कर यायला लागली असेल.
आता मला वाटतं पुढचे ६ महिने तरी होमडेपो मध्ये जाऊ नकोस. उगाच तिथल्या लोकांना भलतीच शंका यायची. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय

नाव सुवर्णाक्षरात पत्त्यांचा वहीत लिहून ठेवा.

(चांगला मेकॅनिक, प्लंबर, मच्छीवाला,... एकदा मिळाले की सोडायचे नसतात!)

सहानुभूतीयुक्त मजा आली अनुभव वाचून.

अनिल हटेला

>>’शिंगरू मेलं हेलपाट्याने’
=))
>>>सहानुभूतीयुक्त मजा आली अनुभव वाचून.
मलाही !! :-D

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण

चला तर एकदाचा कमोड फिट झाला तर !!!

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

धमाल मुलगा

>>गंगेत घोडे न्हायले
गंगेत? घोडे?? न्हायले???
=)) =)) =))
अरे, कमोड बसवला ना त्यांनी?????

संदीपदा, धन्य आहेस रे बाबा!
बाकी, पु.लं. म्हणतात तसं आपल्याच आयुष्यात हे असले 'जलशृंखला योग' वगैरे येतात हे बरीक खरंच हां.

नशीबानं चांगला हँडीमन मिळाला तुला. हाच अनुभव इकडं आला असता तर????
"घेतानाच नीट बघुन घेता येत नाय काय? आमी काय साला ते कमोड घरी बनवते काय? घाटी साले!!"
असं नाहीतर काऊंटरवरच्या खडूस म्हातार्‍यानं हातातल्या छडीनं भिंतीवरच्या बोर्डावर एकदोनदा टक्टक केलं असतं (एकदम बादशाहीत आल्यासारखं वाटलं नै???)....
"एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर बदलुन दिला जाणार नाही, कृपया सहकार्य करावे.
- आज्ञेवरुन."

बाकी, बेसीन-कमोड बसवायला मुहुर्त पाहिला नव्हतास ना? आणि नविन घेतल्यावर त्यापुढे नारळही फोडला नव्हतास ना? मग असंच होणार. पुढच्या वेळी लिंबू-मिरच्या पण ओवाळून मगच ट्रंकमधून बॉक्स खाली उतरव बरं का! ;)

एक तो साधा प्लंबिंगचा अनुभव तो काय, पण काय फर्मास खुलवून लिहिलाय. हे असं कित्येकांना अनुभवायला येत असेल, पण इतकी साधी घटना अशी जबरा खुलवुन लिहिणं वगैरे आमच्या आवाक्यातच नाय बॉ :) मजा आली वाचायला!!!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

जयवी

बाप रे...... हे सगळं वाचूनच गरगरायला लागलं :)
आता मात्र तुम्हा लोकांना त्या कमोडवर बसून पूर्ण समाधान मिळत असणार .......हे मात्र नक्की ;)

कसं नशीब असतं..
कमोडच्या हेलपाट्यांच्या नादात ’आर. डी. – गुलजार’ या बेफाट दुकलीवर आधारित कार्यक्रम
गमवावा लागतो...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग

'होम डेपो' नाव सार्थ केलंस की दुकानाचं! ;) मस्तच खुलवलं आहेस! :)

प्लंबर खरंच नेकीचा मिळाला तुला, त्यानं हात झटकले असतेन तर काही खरं नव्हतं तुझं!
(पुढचे काही महिने त्याने कोणाकडेही कमोड बसवायचे काम केले नसेल! ;) )

चतुरंग

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

प्लंबर खरंच नेकीचा मिळाला तुला, त्यानं हात झटकले असतेन तर काही खरं नव्हतं आपल !!

हेच म्हणतो...

सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

शितल

हुश्श्य..
कमोड घरी बसला एकदाचा.. :)

आतापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांसाठी धन्स :)
आता पुन्हा कधी घरी काही काम निघालं तर ख्रिस माझा फोनच उचलणार नाही बहुतेक !

अबोल

स॑दिप, जर कमोड बसला नसता तर आलेल टे॑शन (....)कसे दुर करायचे याचा विचार त्या एवढ्या हेलपाट्यांच्या नादात केला होतात कि नव्हतात तेवढे लिहायचे विसरलास बघ.

शेवटी कमोड बसला तर!!!
(च्यायला, कधीपासून घाईची लागल्येय आणि याचा कमोडच बसेना!!:))

बाकी संदीपराव,
'वॅक्स रिंग' बरोबर नीट बसवली ना? नाहीतर काही दिवसांनी पिवळं पाणी लीक व्हायला लागायचं टॉयलेटमध्ये!!!:))
आपला (शुभ बोल रे नार्‍या पंथी),
पिडां

रेवती

वाचतानाही दमछाक झाली बाबा!
पुन्हा म्हणून असे अनुभव तुझ्या वाट्याला येऊ नयेत,
नाहीतर तू ते लिहिणार आणि आम्हाला वाचायला लावून दमवणार.;)
(हलके घेतलेच पाहिजेस, नाहीतर....)

रेवती