पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे. शेवट आणि त्याकडे होणारा प्रवास जरी अलिप्तपणे रेखाटला असला तरीही - किंवा त्यामुळेच - अंगावर येतो. तेंडुलकरांनी एका लेखात माणसात, अगदी अजाण मुलांत असणार्या सुप्त हिंसेबद्दल लिहिले आहे ते या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर सतत आठवत राहतं.
होय, मलाही वाचताना तेंडुलकरांच्या या प्रतिपादनाची अनेकदा आठवण झाली.
पुस्तक आवर्जून वाचावे असे आहेच. पण मला मूळ पुस्तकाइतकेच जी. ए. कुलकर्णींनी केलेले त्याचे भाषांतरही खूप आवडले. खास जी.ए. शैलीमधले हे भाषांतर. आता बहुतेक मिळत नाही बाजारात. पण कुठे मिळाले तर आवर्जून वाचावे असे. त्यातली प्रसिद्ध 'प्रमाणे'चा वापर असलेली जी.एं.ची प्रतिमा विणत जाणारी भाषा अलिप्त आणि तितकीच धारदार आहे. वाचता वाचता अंगावर काटा येतो. आपल्यामधल्या सुसंस्कृत इत्यादी व्यक्तिमत्त्वातही हे असले क्रूर श्वापद दडलेले आहे आणि त्याला मागे सारत राहण्याशिवाय दुसरा कुठला उपाय नाही हे सत्य अगदी दडपून टाकते.
त्या अर्थाने ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून मला तरी एन्जॉय करता आले नाही. उलट त्याच्याकडे नजर टाकून शहारल्यासारखे व्हायचे. एखाद्या भीषण पण अतीव आकर्षक गोष्टीसारखे ते पुस्तक वाटते मला.
मी बर्याच अगोदर हे पुस्तक वाचलंय.. नाव आठवत नव्हतं.
त्यातली अगोदर वाटणारी उत्कंठा, नंतर वाटणारी काळजी, त्यानंतर वाटणारी भिती, त्यानंतर "अरे , हे काय चाललंय काय? ही मुलं आता मारणार का काय एकमेकांना???" असा हादरवून टाकणारा सवाल अन् मग शेवट!
बैठक मोडून वाचू शकत नाही इतकं भारी पुस्तक आहे.
पुन्हा वाचावे लागणार आता. बरेच दिवस झालेत.. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :)
राघव
हे पुस्तक 'नोबेल प्राईझ विनर ' आहे. जी. ए. कुलकर्णी नी ह्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. त्याचे नांव आहे "माश्यांचा धनी". अनुवाद अतिशय उत्तम आहे. स्वतः विल्यम गोल्डींग पुणे विद्यापीठात येऊन गेलेले आहेत.
पुस्तकातला विषय वेगळ्या पध्दतीने मांडला आहे.
आपण साधारणतः असा विचार करतो कि, निर्जन बेटावर अडकलेली आपदग्रस्त मुले एकमेकांना आधार देऊन, मदत करुन एकाकी जीवन सुसह्य करतील. असे आपल्याकडच्या हिंदी सिनेमामधुनसुध्दा मांडले गेलेले आहे. उदा. जुना " हम पंछी एक डाल के" हा सिनेमा. पण ह्या कादंबरीत मात्र अगदी उलटे चित्र दिसते. कायम हिंसाचाराची, शिकारीची चित्रे / माहिती , टि.व्ही. किंवा इतर कुठल्याही माध्यमाद्वारे बघणार्या मुलांना केवळ त्याचेच आकर्षण असल्यामुळे, तसेच प्रयोग आपल्या बरोबरच्या मित्रावर करुन बघण्याची मानसिकता बेटावर तयार होते. त्यातून घडतो हिंसाचार. त्यामुळे पुस्तक वाचताना मन सुन्न व बधिर होऊन जाते.
नाही हो. पुस्तकाचे नाव 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' असेच आहे. 'माश्यांचा धनी' असे नाही नाव. अर्थात हे मी जी आवृत्ती वाचली त्यात. कदाचित आधीच्या किंवा नंतरच्या आवृत्तीत असे असेलही. जरा खात्री करून आवृत्तीचे तपशील सांगाल का?
आणि अजून एक.
माझ्या मते - या मुलांवर कोणत्याही माध्यमाचा प्रभाव पडल्यामुळे ती असे करतात असे लेखकाला अजिबातच म्हणायचे नाही आहे. किंबहुना या कथानकात मुलांना घेण्याचे कारणच मुळी त्यांचा काहीसा मातीच्या गोळ्यासारखा अनघड आकार, कसलाही प्रभाव नसलेले निखळ स्वत्वासकटचे अस्तित्व हे आहे. असे असतानाही, जेव्हा आपल्या आतल्या वृत्तींना निरंकुश अवकाश आणि अमर्याद आव्हान मिळते, तेव्हा आपल्यातल्या पाशवी प्रवृत्ती नि:संशय सत्ता गाजवतात. यालाही अपवाद असतातच. पण मुले म्हणजे देवाघरची फुले असा सरसकट नियम मात्र सांगता येत नाही. तीही माणसे - किंबहुना सर्व वैशिष्ट्ये सांगणारे मनुष्यप्राणीच - असतात; असे लेखकाचे प्रतिपादन आहे.
हो.
जी.ए. नी काही खुप चांगली पुस्तक अनुवादीत केली आहेत. Conrad Richter च. रान, शीवार, गाव ही त्रयी. Conrad Richter च स्वातंत्र्य आले घरा आणि रानातील प्रकाश. James Stephens च सोन्याचे मडके. मस्त आहेत ही पुस्तकं.
अजुनही काही पुस्तक पण आहेत, पण ही मी वाचलेली आहेत. नाझी छ्ळ-छावणीतुन वाचलेल्या कुणचतरी पण एक पुस्तक आहे, नाव माहीत नाही
लॉर्ड ऑफ द फ्लायज कादंबरी आवडते, तीचा मराठी अनुवाद खुद्द जी एंनी केलाय हे कळाल्यावर आनंद झाला.
तुम्ही म्हणताय ते पुस्तक ओल्गा ल्योगेलचं ‘रात्र वै-याची आहे’ असावं.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी