धर्म देव ह्या वैक्तीक बाबी आहेत त्या कोणीच कोणावर लादू नयेत
ह्या सर्व गोष्टी मानवनिर्मीत आहेत. देव ही संकल्पनासुद्धा मानवनिर्मीत आहे.
गालीबच्या भाषेत सांगायचे तर " दिल बहलाने के लिये गालीब खयाल अच्छा है"
धर्म हा प्रमाण मानायचा तर नक्की कोण धर्म प्रमाण मानायचा
"तस्मात युद्धस्च भारत" म्हणणारा कृष्ण प्रमाण मानायचा की शत्रुला सुद्धा क्षमा कर म्हणणारा येशु ?
दिवस भर प्रार्थना कर आणि रात्री जिवापुरते खा म्हणणारा महंमद की सूर्योदयानन्तर अन्नभक्षण हे पाप आहे म्हणणारा महावीर?
अन्याय करणाराला अन्याय करु देत. विठोबा तुझी काळजी घेईल म्हणणारा भागवत धर्म की मग अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा पापी म्हणणारा इस्लाम.
चातुर्वर्ण्य आणि त्याची तारीफ करणारा मनू श्रेष्ठ मानायचा की समानतेची जाण निर्माण करणारा इस्लाम मोठा मानायचा.
शूद्रांना शिक्षण नाकारणारा मनू चांगला की शिका संघटीत व्हा म्हणणारा धम्म?
अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद.
१००% सहमत.
अवलिया साहेब आणि बिपीनभौ आपण या आणि इतर बर्याच बाबतीतले जाणकार आहात.
मी बिनडोक आहेच त्या शिवाय का एवढे प्रश्न पडले असते ?
असो. वैयक्तीक चिखलफेक करण्याची सवय नाही तरिही माझ्या शंकांचे निरसन आपणासारख्या जाणकार त्रिकाल आणिसर्व ज्ञानी माणसाने करावे ही विनन्ती.
मी बिनडोक असलो तरिही उघडपणे जसा आहे तसा वावरतो. सर्वाना मूळच्याच नावानेच भेटतो. उगाचच अॅनानिमिटीचा वायफळ आग्रह ठेवत नाही
असो. आपण मी विचारलेल्या सर्व शंकांचे आपण बहुशृत असल्याकारणे नीट मुद्देसूद निरसन करालच. अन्यथा आपण केवळ गालीप्रदान करणे आणि भेटलाच आहे तर ठोकुन काढुया या अर्थाने उगाच निव्वळ वायफळ प्रतिसाद देणार्या लोकांपैकीच आहात असेच होईल
सूहास (verified= न पडताळणी केलेला)Tue, 06/30/2009 - 12:05नवीन
स॑स्कार,संस्कृती,श्रध्दा,कर्मका॑डे आणी विश्वास या॑ची सा॑गड घालणे खरोखरच अवधड गोष्ट आहे....
जरा कुठे कमी पडल तर नास्तीक,पराचा मॉडर्न..जास्त झाल की अ॑धश्रध्दाळु,जुनाट-बुरसट विचारी .
सुहास
कोणी काही म्हणो पण तुम्ही खरे संस्कारी आहात.
तुम्ही कोणाला दुखवत तर नाही ना.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
तात्याशी सहमत
फक्त हे सोडुन बरं मादक-आव्हानात्मक दिसणार्या स्त्रियांवर,;)
( देवभोळा ) घाशीराम **************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
हा तर माझा चर्चेचा आणि वादावादीचा आवडता प्रांत. पण काय करणार? डॉनरावांनी इतकं तंतोतंत माझ्याच मनातलं लिहिलंय की मला काही लिहायलाच नको.
(विश्वातल्या कुठल्या सुप्रीम पॉवरवर मात्र विश्वास नाही...तशी गरज वाटत नाही)
(श्लोक पाठ असण्यापेक्षा वागणूक चांगली असणे म्हणजे संस्कार असे मानणारा) खराटा
खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्याचदा वापरत असतात.
त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.
मला पुराणातल्या बर्याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.
पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?
म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?
आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.
असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.
आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.
आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.
विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.
परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.
म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.
हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.
पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.
मी पुढच्या माझ्या एखाद्या प्रतिसादात मेघनाचा, संवेदचा लेख आणि त्यावर सेन च्या प्रतिक्रिया ह्याची लिंक देणारच होतो.
आता मेघनाने आख्खा लेखच दिल्याने प्रश्न मिटला ...
मेघनाचा व संवेदचा लेखही फार सुंदर आहे. सेनच्या प्रतिक्रियाही मस्त.
मागच्या पुणे भेटीत झालेले मित्रांबरोबरचे वाद आणि उपरोक्त लेख हेच माझय ह्या लेखामागची प्रेरणा ठरले असे म्हणायला हरकत नसावी.
धन्यवाद मेघना ...!!!
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
डॉन, मेघना,
उत्तम! मनःपूर्वक वाचलं. मूळ लेख विचारप्रवर्तक, त्यावरची अत्यंत संयत, पण तितकीच विचारप्रवर्तक प्रतिक्रिया. अगदी उत्तम. तुमचे अभिनंदन करणार नाही. अभिमान वाटतो म्हणेन.
धर्म, त्याच्याशी निगडीत परमेश्वर, त्याच्याशी निगडीत नियती या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून स्वतःकडे पाहिल्यानंतर आपण माणूस आहोत, माणसाची विचार करण्याची शक्ती वापरतो, विवेकाचा अवलंब करतो असे वाटते का? वाटत असेलच... एखाद-दुसऱ्या प्रतिक्रियेत चुकलोही असू, कारण माणूसच आहोत. आणि तसे वाटत असेल ना, तर धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
अशाही स्थितीत, मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो. माझी आई पूजा करते. तिच्या पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी तिचा देव माझ्या जगण्याच्या आड येत असेल तर मी त्यापासून वेगळा होतो. कटाक्षाने वेगळा राहतो. अशावेळी "थांब रे, आमटी फोडणीला टाकायची आहे," असे ती म्हणाली तरी मी चटणी-पोळी, ताकभात खाऊन मोकळा होतो. हे वागणे मातृभक्तांच्या लेखी वावगे असेल... पण माझ्या दृष्टीने नाही. मी तिला त्रास देत नाही. मी आमटी-भात न खाता ताकभात खाल्ला याचा तिला त्रास होत असेल का? असेलच. पण तिच्या श्रद्धेची तिने मोजलेली ती किंमत आहे. आमटी-भाताऐवजी ताकभात ही माझ्या अश्रद्धतेची मी मोजलेली किंमत असेल. हे असे वागावे का? ज्याने-त्याने आपापल्या धारणेप्रमाणे ठरवावे. या वर्तणुकीचा आग्रह धरणे अयोग्य नाही, पण धरता येतोच असे नाही. अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
परवाचाच किस्सा आहे - एका मित्राच्या कार्यालयात नवे मॅकबुक आले. गणेशाची प्रतिमा ठेवून सहकाऱ्यांनी मी पूजा करावी असा आग्रह धरला. मी नकार दिला. म्हटलं, आधी इथं असलेल्या मुलींच्या हातून पूजा करा. मग मीही करतो. हा मान पुरूषाचाच हे मला खोडून काढायचं होतं. मुलींनी पूजा केली, मग मीही उदबत्ती ओवाळली (इथं अश्रद्धांच्या लेखी मी दांभीक ठरतोय).
मेघना, पितळी मूर्तीवर पाय असा प्रसंग अनेकांच्या जगण्यात घडतो का? बहुदा घडत असावा. असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं आहे. गणपतीचा फोटो फोडण्याचं कृत्य. अशाच वादातून. पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
मी पण असेच करतो. पुर्वीपेक्षा ताठरपणा कमी झालाय. पण शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली जाते त्याला माझा विरोध असतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशी शासकीय पुजा असु नये हे माझे मत. सत्यनाराणाची पुजा कोण करतो? ज्याला आपल्यातला खोटेपणा डाचत असतो तो. मग ती बोच कमी करण्यासाठी सत्यनारायण घालायचा. त्यापेक्षा सत्याची पुजा करा! (जी आजच्या जीवनात॑ अशक्य आहे) अशा कानपिचक्या ऑफिसमध्ये द्यायचो. सत्यनारायणाचा प्रसाद मला शिरा म्हणुन खायला आवडतो हे बहुतेकांना माहित होते. त्यांच्या घरी गेल्यावर तु शिरा म्हणुन खा बाबा! पण ये घरी असा प्रेमळ आग्रह असायचा. अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. मग असा विक्षिप्तपणा का करा असा विचार करतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
धर्म, परमेश्वर, धार्मिकता या पूर्णपणे वैयक्तिकच बाबी. त्या तशाच रहाव्यात. सरकारी कार्यालयच कशाला, माझा तर त्यांना खासगी कार्यालयातही विरोध असतो. त्याच भूमिकेतून त्या कार्यालयातील मुलींच्या हातून अग्रपूजा. किमान तेवढीच आपल्या सद् सद् विवेकाला टोचणी टाळण्याची कृती.
धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
+१, असेच म्हणतो.
उपरोक्त गोष्टी ह्या पौरुषेय आहेत आणि जेव्हा त्यांची निर्मीती झाली तेव्हा त्याला स्थळ, काळ, वेळ ह्यांचे परिमाण होते. अशा परिस्थीतीत त्या आजही आहे तशाच योग्य आहेत का ह्याचा उहापोह नको का करायला ?
समजा करायला गेलो तर आमच्या नशिबी "अधर्मी" ठरणे आले, भले ते भंपक का असेना. शिवाय भंपक म्हणणारे १० लोक नसतात तर हजारोंच्या संख्येने असतात.
इनफॅक्ट आपला हिंदु धर्म ह बराच चिकित्सेला आणि संशोधनाला वाव देतो म्हणुन आम्हाला त्याचे कौतुक आहे. आपण हिंदु धर्मात अवश्य संशोधन करुन कालबाह्य परंपरा आणि रुढी ह्या प्रवाहातुन काढु शकतो म्हणुन तसे करण्याला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.
उदा : सति प्रथा, विधवांचे हक्क , जातीभेद ह्यावर बरीच चिकित्सा झाली आणि आज आपण परिणाम आणि सुधारणा पाहतो आहोत.
मग हे आता इथेच थांबवायचे का ?
आपल्या धर्मातल्या कित्येक उदात्त आणि महान गोष्टी अजुन जनसामान्यांपर्यंत पोहचल्याच नाहीत, बहुतांशी तो वर्ग अजुन खेदाने कर्मकांडातच आणि अंधविश्वासातच अडकुन पडला आहे हे सत्य नाही का ?
म्हणुन विष्लेषण हे आवश्यक ठरते, त्याला होणार्या विरोधाची कल्पना आहेच आणि त्यासाठी मानसीक तयारीही आहेच की, इथे फक्त काय काय करता येईल ह्यासंबंधी जार चाचपणी चालु आहे ...
मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.
हो , हे सुद्धा मान्य.
मात्र हे मला प्रत्येकचवेळी जमेल असे नाही. मी कितपत अलिप्त राहु शकतो हे सांगणे कठिण आहे.
खरे सांगायचे तर "तुला करायचे ते कर, मी येणार नाही" हे मला जमत नाही, समोरचा एखादा चुकीचा अथवा अनावश्यक वागतो आहे हे जेव्हा दिसते तेव्हा मी अलिप्तपणे बाजुला होण्याऐवजी त्याला ४ गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न करतो.
बहुदा हेच अनावश्यक आणि अनवॉरंटेड ठरत असावे ...
शिवाय माझे सामिल न होणे किंवा होणे ह्यावर समजा माझे "सामाजिक स्थान" अथवा "रिलेशनशिप्स" ह्यावर परिणाम होत असेल तर काय करावे ? काही वेळा नुसते "त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव" असे सांगणे शक्यही नसते व बरोबरही नसते.
अशा वेळेस मी तुर्तास गुपचुप त्यात सामिल होण्याचा मार्ग स्विकारतो, ते मनाला पटत नाही हे माहित असुनही, तडजोडच म्हणावी लागेल ह्याला, पण करावी लागते.
अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.
+१, अगदी परफेक्ट ...
समतोल साधणे महत्वाचे आहे ...
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
ह्यावर एक वेगळा, विस्तॄत प्रतिसाद लिहीन ...
निमीत्त सत्यनारायणाचे मात्र ह्या अनुषंगाने गरिब वर्गाला आर्थिकदॄष्ट्या परवडत नसतानसुद्धा केवळ सामाजीक कर्तव्य म्हणुन पार पाडाव्या लागणार्या कर्मकांडावर भाष्य करेन ...
पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.
ह्यावर बहुदा मला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला स्टान्स पटतो आहे मात्र अफार अवघड आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पाहतो कसे जमते ते ...!!!
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?
:)
हा हा हा, ५० जाऊ देत पण अजुन काही जणांकडुन "कन्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची" अपेक्षा मात्र जरुर आहे ...
मोडकसाहेबांचा प्रतिसाद आवडला ..!!!
धन्यवाद.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
डॉन तुझा लेख उत्तमच. पण मेघना तुझा प्रतिक्रियात्मक लेख म्हणजे माझ्या मनीचेच सारे काही मांडलेस. १०००००००० टक्के सहमत....
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली.
अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला
ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक."
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मी ज्या घरात वाढलो तिथे कट्टर म्हणावं असं धार्मिक वातावरण नव्हतं. आई-वडिल कट्टर धार्मिक होते असं नाही, पण त्यांनी कधी काही सक्ती केली नाही. लहानपणी कधी तरी आठवलेकाकांकडे परवचा म्हणायला आई-बाबा पाठवायचे. पण तो परंपरागत धार्मिक संस्कारांचा भाग असावा. त्यावेळी हे का? असे प्रश्न पडले तरी विचारायचे कुणाला? हा प्रश्न होता. पुस्तकाचं दुकान असल्याने धार्मिक पुस्तकं भरपूर होती. त्यातली बरीचशी वाचली होती. त्यातली शंकरासंदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर हा किती पांचट नि स्त्रीलोलुप देव होता, अशी प्रतिमा मात्र मनात तयार झाली होती. ती आजही कायम आहे. ती त्यावेळी कुणाकडे व्यक्त झाली मात्र नाही.
पुढे नाशिकला आल्यानंतर वाचन वाढलं. त्याचाही प्रवास फार रंजक झाला. माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला. ओशो वाचनात आले नि त्यांनी पार आधीचं 'संस्कारीत' प्रतिमाविश्व उध्वस्त करून टाकलं. इतरही काही मंडळींनी हेच केलं. मग भरपूर प्रश्न पडायला लागले. मतं तयार व्हायला लागली. (खरं तर कुणाची तरी घेतली गेली.आपील मतं खरोखरंच आपली असतात की...?) मनात तोपर्यंत तयार झालेल्या महिमामंडित प्रतिमांचा शेंदूर पार सुटायला लागला. मग या वाचनातून एक बंडखोरी सुरू झाली. कुठल्याही धार्मिक कार्यातील चुका काढून दाखविण्याची नि त्यावर तावातावाने चर्चा करण्याची सवय लागली. नातेवाईकांत आपण वाचलेल्या 'चार बुकातलं' काही सांगितलं, की तेही 'आ' वासून निरूत्तर होऊन बघायचे. 'अतिशहाणा' हे बिरूदही त्यामुळे मिळालं. पण त्याचवेळी याला आपल्यापेक्षा जास्त कळतं असा त्यांच्या नजरेतला भावही उगाचच स्वतःचा अहं वाढवून जायचा.
मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही. कारण लग्न करताना त्यातल्या विधीत वायफळ खर्च करावा असं वाटत नव्हतं. पण लग्न 'संस्कारीत' व्हावं असं मात्र वाटत होतं, म्हणून प्रबोधिनीच्या पद्दतीने का होईना, पण चार मित्रांच्या उपस्थितीत असं 'संस्कारीत' लग्न नक्की केलं. हे संस्कार केले नसते तर काय झालं असतं? नक्कीच काही नाही. पण किमान तेवढे संस्कार हवेच, हा आतापर्यंतच्या पारंपरिक संस्कारांचा पगडा त्यावेळीही सुटू शकला नाही. त्याचवेळी नवं घर घेतलं, तेव्हा वास्तुपूजा मात्र केली नाही. पूजा केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात.
खरं तर माझा आस्तिक्य-नास्तिक्यमध्ये झुलणारा 'मोरू' झाला होता. पण मग वरकरणी दिसणार्या माझ्या नास्तिक्यवादी भूमिकेला मी थोडं बंडखोरीचं परिणाम देऊ लागलो. जे धार्मिक संस्कार करायचे त्याला काही वेगळा एंगल द्यायचा असं करायला लागलो. मुलगी झाल्यानंतर पाचपावलीला मंत्रपठणाला मी महिला पुरोहितांना बोलावलं ते त्यातूनच. मग माझ्या या दृष्टिकोनाचे कट्टर विरोधक असेलले माझे काका त्या निर्णयावरही नाराज झाले. पण त्यांच्या नाराजीपेक्षा त्यांच्या नाकावर टिच्चून मी मला हवं ते केलं, याचा आनंद (?) वाटला.
त्याला पार्श्वभूमीही वेगळी होती. आई गेली तेव्हा याच काकांशी एकदा सामना झाला. आईचा दहावा करताना विधी करा पण त्यातला भोजनाचा भाग गाळा नि ते पैसे आधाराश्रमाला द्या अशी सूचना अस्मादिकांनी केली नि काका प्रचंड संतापले. ढेरपोट्या नि बाहेरून केवळ जेवायला बोलवलेल्या ब्राह्मणांना (माझ्या आईशी ज्यांची काहीही 'गाठ' नसलेल्याना) जेवायला घालणं मला कसंसंच वाटत होतं. काकांच्या आक्रमकपणाला मीही तितकाच आक्रमक होऊन प्रतिवाद केला. पण वडिल नि भावाने नमते घेऊन काकाशरण मार्ग अवलंबला. मग या सगळ्या विधींत मी आपला कृत्रिमरित्या वावरलो. पुढे चुलत भाऊ गेला, तेव्हाही याचाच रिपीट परफॉर्मन्स झाला.
पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. वटसावित्रीपासून कुठली पूजा करण्याची कधीही सक्ती, इच्छा व्यक्त करत नाही. घरी कधीही पुजा सहसा करत नाही. बायकोने खूप आग्रह केला तरच. तीही धार्मिक आहे असंही नाही. पाळीच्या काळात मंदिरात जाणं तिलाही वावगं वाटत नाही. नि मलाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय.
त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.)
बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
मुख्य लेख आणि प्रतिसाद विचारपुर्ण, मोठा प्रतिसाद टंकायला जरा वेळ लागेल.तुर्तास प्रतिसाद राखुन ठेवते.
(सगळ्या विचारांच्या कल्लोळाला शब्दांमध्ये बांधयला स्वःतासाठी घेतलेला वेळ)
--मयुरा.
उच्च चर्चा.
मेघना, भोचक, श्रावण सार्यांचेच प्रतिसाद अतिशय उत्तम.
डॉनरावांच्या मूळ लेखातला एक मुद्दा घेऊन पुढे जातोय.
ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ?
नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात. डॉनराव हे अशा स्वरूपाचे आस्तिक (पण लौकिकार्थाने अधार्मिक) असावेत असे वरील वाक्यावरून वाटते.
काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे.
काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात. मेघना ही अशा पैलूतील अधार्मिक आणि 'ठार' नास्तिक असावी असे वाटते.
मी पण बराचसा मेघना टाईपचा नास्तिक आहे. अर्थात मी मूर्तीला लाथ मारेन की नाही हे सांगता येत नाही.
मी अनेकदा वडिलधार्यांच्या इच्छेसाठी काही धार्मिक गोष्टी करतो. त्यामागे बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो. देवळात जाऊ असे अशी व्यक्ती म्हणाली तर मी जातोही किंवा नाहीही जात. कधी बरोबर जातो पण देवळाच्या बाहेरच थांबतो. थोडक्यात माझे प्रत्यक्ष वागणे माझ्या दृष्टीकोनाशी नेहमीच सुसंगत असतेच असे नाही. पण सत्यनारायण घाल किंवा मुद्दाम जाऊन कुलदैवताचे दर्शन घेऊन ये असे त्या व्यक्तीने सांगितले तर नक्कीच करणार नाही.
माझी नास्तिकतेची पूर्वपीठिका अशी. देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
घाटे यांना स्यूडो म्हणणे चुकीचेच आहे. कारण जो खरा विज्ञानवादी असतो. तोच दैववादी असतो, अशी माझी धारणा आहे. अशी धारणा होण्यामागेही एक घटना आहे.
माझ्या एका मित्राचे जवळचे नातेवाईक रुग्णालयात होते. ते कोमात होते. वय अधिक असले, तरी त्यांना वाचविण्यासाठी त्या कुटुंबाचे खूप प्रयत्न सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते जगणे शक्य नव्हते. विशेष म्हणजे तो मित्र निरीश्वरवादी होता. आम्ही डॉक्टरांना भेटलो. ते म्हणाले. तुम्ही त्यांना घरी नेले, तर बरे होईल. तो मित्र मात्र तयार नव्हता. डॉ. आजोबा वाचलेच पाहिजे, असं तो वारंवार विनवत होता. त्यावेळी डॉक्टर फटकन म्हणाले, माझे प्रयत्न सुरूच आहेत. बाकी सर्व ईश्वराच्या हाती. हे ऐकल्यानंतर तो मित्र सटकलाच. म्हटला, डॉक्टर असून ईश्वराचा हवाला देता.
डॉक्टरांनी त्याचे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, डॉक्टर आहे म्हणूनच ईश्वराचे नाव घेतले आहे. कारण मला माहिती आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यावर जगातला कोणताच डॉक्टर नियंत्रण ठेवू शकत नाही. ही शक्ती एकाच गोष्टीत आहे. तिला आपण ईश्वर म्हणतो.
मित्र गपगार झाला. बोलण्यासारखे काही त्याच्याकडे राहिलेच नव्हते.
तो शांतपणे उठला आणि आजोबांजवळ जाऊन त्याने त्यांचा हात हातात घेतला. त्याचवेळी आजोबांच्या ओठाची थोडी हलचाल झाली. पुढे काही दिवस मी त्याच्याबरोबर रुग्णालयात जात होतो. चार दिवसांनंतर आजोबा शुद्धीवर आले.
आता बोला.
डॉक्टर आहे म्हणूनच ईश्वराचे नाव घेतले आहे.
क्या बात है..!
बोला गणपतीबाप्पा मोरया..!
आपला,
(गणेशप्रेमी) तात्या.
स्वगत : हम्म! भाग्यश्रीच्या शब्दात सांगायचं तर आता हा धागा हायजॅक करू की काय?! ;)
थोर थोर विचारवंतांची रेवडी उडवायला जरा मज्जा येईल! :)
जाऊ द्या झालं! देवदेवतांच्या मूर्त्यांवर पाय देऊन तुडवणं सुरू आहे. आपण कशाला उगा मध्येच पडा! साला कुणाचा तरी पाय आपल्याही टाळक्यावर पडायचा!:)
तात्या.
खरंच ना तात्या.
उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते.
त्यातलीच ही चर्चा आहे. चालू द्यात. प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!
उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते.
विरोधी मते असली तरी आपण वापरलेल्या अधोरेखित शब्दांसारखे दुसर्या प्रतिसादकर्त्यांना मानहानीकारक शब्द वापरणे योग्य नव्हे! जरा जपून लिहा. विचारपूर्वक लिहा.
(सूचक)चतुरंग
त्याचं काय आहे अन्वयराव, इथे षड्ज ऋषभापासून वेगळा न काढता येणारे, विद्वत्ता पाजळणारे बरेच लोक आहेत. आता सगळ्यांची लेव्हल तुमच्याइतकी तर नसणार ना... पण बाकी काही म्हणा, कानाखाली वाजवून लगेच हात जोडून समोर उभं राहाण्याची तुमची ष्टाईल आवडली बॉ आपल्याला.
प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.
हो बुवा! एकंदर प्रकार गंमतीशीर आहे खरा! :)
आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!
येस्स! :)
तात्या.
कोणी काय मानावे आणि काय नाही यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही.
परंतु मी तर म्हणेन मी धार्मिक आहे (म्हणजे डान्या ज्या पद्धतीचा धार्मिक नाही त्या पद्धतीचा मी आहे) कारण मी त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामागची भूमिका काय आहे हे शोधायचा प्रयत्न करतो आणि शेवटी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचल्यावर माझा अंदाज बरोबर आहे असेही वाटले. जसे पूर्वी लैंगिकसंबंध माणसाचे देखील पशुवत होत. आई आणि मुले देखील शरीरसंबंध करीत असत परंतु जसा जसा समाज विकसित होत गेला तसे तसे बंधने वाढत गेली. व आताच्या काळात एक सुजाण भारतीय पुरुष तरी आपल्या आईबद्दल शारीरीक संबंधाची वासना ठेवणार नाही असे वाटते. जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे.
ज्या गोष्टी आज मला घरी सांगितल्या जातात त्या सर्वच टाकावू असतात असे नाही किंवा सर्वच सरसकट योग्य असतात असंही नाही. किंवा परिस्थितीनुसार उपकारक किंवा अपकारक असू शकतात. उदा. माझी आई पाळीच्या वेळेस बाजूला बसत असे, त्यामुळे घरातली कामे उदा. स्वैपाक, भांडी, केर-वारे इ. मी, माझा दादा, माझे बाबा वाटून घेऊन करत असू. त्याचा सर्वात मोठा फायदा मला अमेरिकेत आल्यावर झाला तो असा की माझा स्वैपाक मला व्यवस्थित बनविता येत असे. खाण्यासाठी बाहेर पैसे खर्च करायची किंवा पा.कृ. ची पुस्तके धुंडाळण्याची वेळ आली नाही.
तसेच आपल्या पापपुण्याच्या संकल्पना यादेखील माणसाने वाईट वागू नये यासाठी त्याला घालण्यात आलेली भिती आहे असे मला वाटते, आणि म्हणून ते योग्य वाटते.
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते. त्यामुळे एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही.
तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे.
बाकी सुचेल तसे पुढे लिहीत राहतो.
(१७६१मधला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते.
=D> =D> =D> =D> =D> =D>
आवडले. असेच म्हणतो.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
काय बोल्लात मालक !!! एकच नंबर !!
जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे.
ते व्यक्तिस्वातंत्र्य वैगेरे वाल्यांनी तुमचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाहीये ..
डॉन.. लेख फार आवडला! माझ्या मनात अगदी असंच येत असतं सारखं! मी जरा श्रद्धाळू आहे! पण त्यासाठी रोज देवळात गेलेच पाहीजे, देवाचे नाव घेतलेच पाहीजे, पन्नासदा येताजाता नमस्कार केला पाहीजे असं मला मुळीच वाटत नाही..
माझी आज्जी अगदी टोकाची सोवळं ओवळं पाळणारी! लहानपणापासून तिचे कर्मठ वागणे डोळ्यासमोर होते, विचार करू लागल्यावर ते कधी पटले सुद्धा नाहीत.. सुरवातीला मी तिला फार त्रास दिला.. हे असंच का? तसं का नाही! जेवणाच्या आधी शिवायचे नाही हा तर मला अस्पृश्य करून टाकणार प्रकार वाटायचा.. पण हळूहळू माझेच विचार बदलले.. म्हणजे जे जे आपल्याला पटत नाही, तिथे तिथे विरोध हा केलाच पाहीजे असं वाटणं कमी झाले.. त्यामुळे आजुबाजुची लोकं कमी दुखावली जातात.. आणि मला तेच हवंय.. त्यांना न दुखवता स्वतःला जे हवंय ते करणे..
मी श्रद्धाळू कशी आहे मग? मी नास्तिक नाही आहे, आणि टोकाची आस्तिकही नाहीये.. मी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. खरं तर आता विचार येतोय देव म्हणजे कुठला? एक कुठलीतरी अनाम शक्ती, की वेगवेगळ्या मूर्ती ? मी मूर्तीपूजक नाही आहे, परंतू त्याचवेळेस मला खूपदा मूर्तीकडे पाहून शांत वाटते..
आमच्या पुण्याच्या घराच्या शेजारी आम्ही कॉलनीतल्या सर्व लोकांनी खपून विठ्ठल मंदीर बांधले.. त्याच्या निर्मितीपासून इन्वॉल्व्ह झाल्याने खूप जिव्हाळा वाटतो त्या मंदिराचा.. त्या गाभार्यात मिळणारी शांतता कुठेही मिळत नाही.. गणपतीच्या कुठल्याही मूर्तीसमोर गेल्यास मला केवळ शांत शांत वाटते! पण म्हणुन मी दिवसातून हजारवेळा नाही जात..
देवपूजा करताना, संस्कृत श्लोक, आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला मला फार आवडते. पण एखाद दिवस नाही झाले यातले काही तरी बिघडत नाही..
मला असं वाटतं, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी आपण कसे वागू तसं काहीसं माझं देवाबरोबर होते.. रोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी काही बिघडत नाही.. पण कधीतरी तिथे जाऊन मन मोकळे केले, शांत केले की बरे वाटते.. त्याचबरोबर, माझ्या आयुष्यात जे जे काही होत आहे ते ते केवळ माझ्याच प्रयत्नांनी होत आहे असंही मला म्हणता येत नाही! पण मी ती 'पांडुरंगाची कृपा' , गणपतीचा आशिर्वाद आहे इत्यादी म्हणु नाही शकत.. थोडक्यात मी त्या प्रांतात गोंधळलेली आहे.. जसं जसं अजुन जास्त वाचन होईल तशा काही गोष्टी उलगडतील असं समजून मी सद्ध्या शांत आहे..
पण तू एक अतिशय उत्तम मुद्दा, उत्तम प्रकारे मांडलास त्याबद्दल अभिनंदन..अतिशय संयत लेखन करणे, कधीही तोल जाऊ न देणे हे संस्कारीपणाचेच लक्षण आहे डॉनराव!
http://www.bhagyashree.co.cc/
भाग्यश्रीच्या मताशी अगदी सहमत. मीही जरा श्रद्धाळू आहे, पण त्यासाठी देवळातच गेलं पाहीजे किंवा वडीलधारी म्हणताहेत तसे कर्मकांडं केलेच पाहीजे असे कधीच वाटत नाही. असे असले तरी कुणाला तसे करण्यापासून परावृत्तही करत नाही. कारण, प्रत्येकाची आपली श्रद्धा असते.... कुणाची दगडातल्या देवात तर कुणाची कोण्या दुसर्या ठिकाणी. याठिकाणी मला मेघनाच्या आईचं मेघनाने मुर्तीवर पाय दिल्यावरचं उत्तर पटते.... कुणाच्या विश्वासाची, श्रद्धेची पायमल्ली करणे चुकच. तुमचा विश्वास नाही तर नसू देत, पण ज्यांचा आहे त्यांच्यात अडथळा न बनणेच योग्य!
माझ्या घरीही (भाग्यश्रीप्रमाणेच) आजीमुळे कडक सोवळे (अजूनही) पाळले जाते. पुजा/जेवणाच्या आधी न शिवण्याच्य नियमाने तर खूप चिड यायची! मी आईला म्हणायचोही की आजीच्या नकळत पारोश्या अंगाने मी किंवा ति कशाला शिवलो अर आजीला थोडीच कळणार आहे... तरी तू अगदी काटेकोरपणे का पाळतेस हे सगळं? ... त्यावर ती म्हणाली, सहज शक्य आहे असे करणे... पण असे करून काय साध्य होणार? आजीचा असलेला विश्वास तो फक्त तोडल्या जाणार... एक छोटासा नियम तो, ज्याने तुला किंवा कोणालाच काही त्रास होत नसेल तर सोवळ्याचे ते आहे म्हणून उगाच अवडंबर माजवण्यापेक्षा, निमुटपणे पाळलेले काय वाईट?
सांगायचा मुद्दा हाच की कुणाची श्रद्धा तुमच्या आड येत नाही ना? मग त्याला विरोध केलाच पाहिजे का? तुमचा कर्मकांडावर विश्वास नाही तर नसू देत... लोक त्यामुळे आपल्याला नास्तिक म्हणून मोकळे होत असतिल तर होऊ देत बापडे.... आपण, आपला देव (किंवा अजून काही), आणि आपल्या भावना स्पष्टं आहेत ना... मग झालं तर! मग कुणी देवाला स्वेटर घातलं काय किंवा सोन्याचा मुकूट अर्पण केला काय, मला त्याचा काही फरक पडत नाही.
डॉन... खूप सुंदर लिहिला आहेस लेख. कुठेही तोल गेलेला नाही!
-(श्रद्धाळू) अनामिक
एकदम आठवलं. हल्ली सुशिक्षित लोकांच्यात डोळस श्रद्धा असा एक गंमतीदार शब्द प्रचारात आला आहे. माझ्यामते एकदा श्रद्धा म्हटली की त्यात डोळस आणि अंध असं काही नसतं
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
डॉनरावांचा लेख आणि मेघना, श्रावण, भोचक यांचे प्रतिसाद आवडले. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे मान्य करण्यास खर्या विज्ञानवाद्याला अडचण नसावी. पण या अज्ञाताच्या नावाखाली धर्माच्या नावावर खपवल्या जाणार्या अनेक गोष्टींमुळे प्रतिक्रियात्मक म्हणून एक जवळजवळ तितकीच कट्टर मनोवृत्ती तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर श्रावण यांनी स्पष्ट केलेली भूमिका ("एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.") संतुलित वाटते.
आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे
अरे सांगतोस काय मेल्या नंदन सायबा?!
मला तर काही काही लोकान्ची बुद्धी घोड्यापुढे धावतांना दिसते तिच्यायला! :)
तात्या.
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.
ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? ..... पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, ....
अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा :) असे नमस्कार घ्यायला फार सावधानता लागते. ती नसेल तर आपण समोरच्याचा नमस्कार देवाकडे वळवावा आणि लगेच समोरच्याच्या पाया पडून टाकावे. हे उत्तम ! (असे माझे मत)
बाकी देव, श्रद्धा याबाबत बरेच काही चांगले लिहिले आहे. काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा. सर्वांचे प्रतिसाद सुद्धा भारी आहेत.
सध्या माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. रामाच्या ईच्छेने तसे काही असेल तर लिहिनच !
-- लिखाळ.
जुने ठेवणे मीपणे आकळेना - समर्थ.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी