प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल?
पूर्ण सहमत. सुंदर वाक्य. एका वाक्यात या निवेदनाचं सार येऊन जातंय.
अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा ...
हा का होतो आहे याचा आपणही विचार केला पाहिजे, प्रसन्न. मुळात असं आहे की. तुम्ही किंवा मी प्रिंटमधले आहोत. हा ओरडा होण्यामागचं एक कारण आहे तो आत्ता फोफावलेल्या वाहिन्या. एक उदाहरण - एका प्रतिष्ठीत इंग्रजी वाहिनीचे मुख्य संपादक. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमधील फरक त्यांच्याच मराठी वाहिनीवर सांगत होते, "अशोक चव्हाण एम.बी.ए. आहेत म्हणजे ते शंकररावांपेक्षा उच्च शिक्षीत आहेत." हसावे की रडावे? हे संपादक अनेकांचे आदर्श आहेत. त्यांच्या या अशा चुकांची यादी देऊ शकतो, त्यांनी केलेल्या पत्रकारितेविषयी आदर ठेवूनही. कारण त्यांचे सोर्सेस आदर्शच आहेत. पण म्हणून, त्यांच्या या चुका माफ कशा करता येतील? कोणी म्हणेल ही तपशिलाची चूक आहे. पण तुला पटेल अशी तपशिलाची चूक पुढे काय घडवू शकते ते...
अशी मंडळी जेव्हा पत्रकारितेच्या स्वतंत्र्याचा अधिकार घेत काही गोष्टी करतात तेव्हा हा ओरडा होतो. २६/११ च्या संदर्भात हे प्रश्न उभे ठाकले आहेत. अरूषी प्रकरणात उभे ठाकले आहेत. नटवरिसंह यांच्या सुनेच्या आत्महत्येसंदर्भात उभे ठाकले आहेत. इतकेच कशाला, तहलकासंदर्भातही आहेत. बारकाईने लक्ष दिले तर तेही समजून येतील. 'चमत्कारां'च्या हेच रिपोर्टिंग असे करणाऱ्या वाहिन्या असतात तेव्हाही हे प्रश्न येतात. हा सुमारपणा मारक आहेच.
असा ओरडा पूर्वी प्रिंटविषयीही व्हायचा. इंडियन पोस्ट आठवतो, यशवंतरावांविषयी झालेलं कव्हरेज? कुणी केलं होतं ते सांगायचं? नकोच.
पण त्याचे प्रमाण कमी असायचे. कारण वीण कमी. मला आठवते, केवळ ब्लॅकमेलींगसाठी निघणाऱ्या पत्रांच्या अनुषंगाने असे व्हायचेच.
त्या ओरड्यात थोडासा अर्थ आहेच. तो आपणही समजून घेतला तर... तर आपल्यात सुधारणा होईलच, आणि ओरडा करण्यासही वाव राहणार नाही. समजून घेतो का? २६/११ नंतर काहींनी घेतलेले पवित्रे पाहिले तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. हे काही म्हणजे कुणी कनिष्ठ नाहीत. सगळे असे आहेत की ज्यांनी नेतृत्त्व द्यायचे आहे...
तुमची भावना पूर्ण मान्य. पण सारेच तुमच्यासारखे नाहीत. म्हणूनच अळी - सुरवंट - फुलपाखरू न्याय इथे पक्का लागू होतो.
तुमच्या सर्व विधानांशी पुर्णपणे सहमत आहे. मला एकच म्हणायचेय, या प्रकारच्या गोष्टी का चालतात तर त्या कुणाला तरी हव्या असतात म्हणुन. मुळात मी प्रिंट किंवा ऑडिओ-व्हिज्युअल, कुठल्याच मीडीयाची कैफियत मांडत नाहीये. मला या आरोपांना विरोध करायचाच नाही. माझे म्हणणे एकच आहे, की ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही.
-----
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही.
सहमत. शंभर टक्के सहमत. हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.
वाचक-दर्शक चांगल्या अर्थाने ग्राहकाच्या भूमिकेत आला ना की मग या गोष्टी सुरळीतपणे पुढे सरकण्याचा वाव निर्माण होईल. मी नेहमी म्हणतो, वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरील बुलेटीन हे एक प्रॉडक्ट आहे हे आधी स्वीकारूया. पण एकदा ते स्वीकारले तर प्रश्न येतो. हे प्रॉडक्ट काय आहे - 'टूथपेस्ट' की 'शेविंग क्रीम'. 'ट्यूब' सारखीच दिसते, आत काय आहे? 'पेस्ट' म्हणून 'शेविंग क्रीम' तर विकले जात नाही ना? किंवा 'शेविंग क्रीम' म्हणून 'टूथपेस्ट' तर विकले जात नाही ना? हा निकाल एकदा वाचक-ग्राहकाने घेतला की कलींग सुरू होईल. जे फसवे प्रॉडक्ट देतात ते 'खपतील'. न फसवणारे खपतीलच.
असेच म्हणतो. पुन्हा एकदा स्पष्टीकरणः ओरड्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट पुर्ण पाठिंबा आहे. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो!
----
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
मला वाटते मी कोणत्याच भागाला आधी प्रतिसाद दिला नाहीये. पण मी तुमच्या सर्व भागांचे वाचन केले. भाग ओघवते आणि ऑथेंटिक वाटतात.
तुमचे ह्या भागातले विवेचनही अतिशय पटणारे आहे.
अभिनंदन!!
(संपादक)चतुरंग
सध्या अकरावीच्या प्रवेशाबद्दलचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. बहुधा सोमवारी त्याचा निकाल लागेल. जेव्हा तो लागेल तेव्हा त्याच्या बर्या-वाईट परिणामांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईलच पण मला इथे जो मुद्दा मांडायचा आहे तो टाईम्स ऑफ इंडिया ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल.
एक वृत्तपत्र म्हणून एखादी भूमिका घेणे (ICSE विध्यार्थ्यांच्या बाजूने) एकवेळ समजू शकते परंतु त्या वृत्तपत्राने ह्या संपूर्ण प्रकरणाला जो एक मराठी-अमराठी रंग देण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार मला अश्लाघ्य वाटतो. गरजूंनी गेल्या ३ आठवड्यातील अंक चाळून पहावेत, मी काय म्हणतो ते कळेल.
एक विचार मनात येतो, अशी एकांगी भूमिका मांडण्याची सक्ती संबंघित पत्रकारांवर व्यवस्थापनाकडून होत असेल का? व्यवस्थापनाचे न ऐकता सत्य मांडणार्या पत्रकारांची फरफट होत असेल का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखमाला तर छान होतीच पण हा संवाद जो साधला आहे तो आधीकच आवडला. धन्यवाद.
एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो!
ह्याबद्दल देखील तुम्ही, मोडककाका अजुन सांगावे. वर्तमानपत्र, वाहीनी हे सगळेच जाहीरातींवर चालते. (ग्राहकराजा महत्वाचा आहे पण तितकाही नाही.)जाहीरती देणारा वर्ग आपल्याला आपल्याकामाशी मतलब म्हणुन मोकळा होतो. थोडक्यात ही माध्यमं मालकांच्या मर्जीवरच चालतात. हा धंदा आहे. माध्यमचालकांचे आर्थीक व राजकीय हितसंबध गुंतलेले आहेत.
नक्की सामान्यवाचकाने काय करावे. परत दबावगट? परत अजुन एक सत्ताकेंद्र बनवायचे? मेधा पाटकर, अण्णा हजारे अश्या लोकांना जर सरकार दबत नाही तर आरडाओरडाशिवाय काय करायचे ते पण जरा सांगा. जे लोक सनदशीर मार्गाने अन्यायनिवारणासाठी लढा देत आहेत त्यांना सहानुभूती, आर्थीक मदत शिवाय अजुन काय आहे तरी काय आमच्या हातात?
सगळ्यांनी केबल टिव्ही, माध्यमांवर बहिष्कार टाकणे शक्य आहे का?
पत्रकाराचे निवेदन आवडले.
माझे तरी, biased (कोणी या बाजुने तर कोणी त्या), T.R.P. लोलुप (अनेक वाहीन्यांनी अत्यंत अशास्त्रीय, खोट्या बातम्या फक्त सनसनाटी स्वरुप देउन दाखवलेल्या मी स्वत: पाहीलेल्या आहेत) मीडीया बाबतीत अजीबात चांगले मत नाही. अर्थात ही परीस्थीती फक्त भारतात आहे असेही नाही.
त्यातल्या त्यात जी निरपेक्ष, to the business प्रसारमाध्यमं आहेत ती मी follow करतोच.
असो, ओरडा फारच कमी लोक करतात असं मला वाटत, बर्याच लोकांना प्रसारमाध्यमांचा झालेला "reality-show" प्रकार आवडतो आणि त्यामुळे ती माध्यमं बाजारात विकली पण जातच आहेत. असो चालायचंच!
प्रसन्नकुमारजी ,
फारच छान लेखमाला. त्याहीपेक्षा तुमचे निवेदन आवडले. मी माझ्याकडून २४ तास बातम्या वाहिन्या पाहणे बंद केले आहे. म.टा. सकाळ , टाईम्स, बंद करून. लोकसत्ता , डि.एन.ए लावला.( दगडापेक्षा विट मऊ!)
"तुम्हाला ग्राहकराजा जागा हो" म्हणजे नक्की काय कर हे मार्गदर्शन केले तर उपयुक्त होईल.
मोहन
पुनेरी (शुद्ध शब्द) पुणेरी,
आपले निवेदन वाचले, आपल्या पत्रकारांविषयीच्या भावना समजल्या, तरीही पत्रकारांविषयी काही त्रोटक माहिती / अपेक्षा वरील निवेदनात वाटतात. पहिली गोष्ट पत्रकारांना सामाजिक भान किती असते, एखादी बातमी वाचतांना ही बातमी खरी असेल का ? अशी शहनिशा वाचकांना करावी लागते. अन्य दैनिकातल्या बातमीशी तुलना करुन मग त्या बातमीचा अंदाज यायला लागतो. पत्रकारांबद्दलची आपण म्हणता तशी विश्वासार्हता केव्हाच संपली आहे असे वाटते. बातमी कोणत्या दैनिकात आहे, दैनिकं कोणत्या विचाराचे आहे, राग येऊ देऊ नका, पण काही पत्रकारांना तर'एखाद्या बातमीचा' पाठपुरावा केल्यानंतर एखाद्या पार्टीकडून किती मलिदा मिळेल असा हव्यास आजच्या काही पत्रकारांना असतो. लोकप्रिय दैनिकात काही पत्रकार माझेही मित्र आहेत. एखाद्या घटनेची बातमी कशी सोयीने लावली जाते, हे मी जवळून पाहिले आहे.
बरं नंबर एकचा बाताड्या कोण असेल तर पत्रकार, असे माझे स्वत:चे मत आहे. सर्व विषयातील स्वतःला तज्ञ समजण्याची धडपड पाहिली की,मला त्यांची कीव येते. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत नाही, त्याला काही अपवाद असतीलही.
>>मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत.
वाचायला चांगले वाटते. पण यातले काहीच खरे नाही, नसावे असे पत्रकारांकडे पाहून वाटते. दैनिकं व्यायवसायिक झाल्यामुळे 'अर्थ' याच उद्देशाभोवती पत्रकारिता फिरतांना दिसते. 'कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. असे म्हणतात ते उगाच नाही, असो...थांबतो.
वरील प्रतिसाद पुणेरी किंवा मिसळपावरील कोणा पत्रकारांना उद्देशून लिहिले आहे, असे कृपया समजू नका. एकूण पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे, याकडे मला अंगुलीनिर्देश करायचा होता.
अवांतर : आपल्या डायरीतल्या एक दोन भागावर फक्त क्लीक केले होते, वाचून प्रतिक्रिया लिहीन !
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया