तात्या, नीलकांत आणि समस्त मिपा परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन! ही बातमी वाचून खूप आनंद झाला!
असेच म्हणतो.....
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
तात्या अभिनंदन रे! दिल्ली दरबारात जाफरभाईकडे पार्टी पायजे आता ;)
शिर्षकात थोडा बदल करता येईल का.. म्हणजे 'सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार...' बरं पण कशासाठी ते तिथेच कळू द्या.. म्हणजे "सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार.. 'मिसळपावची चव चाखू' बद्दल!"
आणि हो पत्रकारबाईंना धन्यवाद!
मिपाकर असल्याचा खूप आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय. समस्त मिपाकरांचे, संपादक मंडळाचे, तात्या, नीलकांत यांचे हार्दिक अभिनंदन! आणि मिपाच्या पुढील प्रवासाला अनेकानेक शुभेच्छा.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
मिसळपावची चव चाखू
मेधा कुळकर्णी
या सदरात मागे आपण मराठी वेबसाइटसचा आणि ब्लॉगविश्वाचा एक फेरफटका मारला होता. Druple नावाचं तंत्रज्ञान आणि युनिकोड हा फॉन्ट यांनी जादू केली आणि भारतीय भाषा संगणकावर, वेबसाइटस्वर उपलब्ध झाल्या. मायबोली, मनोगत, उपक्रम, लोकायत, मिसळपाव या गेल्या पाच-सात वर्षांत सुरू झालेल्या वेबसाइट्स नेटवरचं मराठी विश्व समृद्ध करत आहेत आशय आणि भाषा या दोन्ही अंगांनी. पैकी मराठीतली पहिली वेबसाइट ठरण्याचा मान "मायबोली'चा. त्यानंतर मनोगत, उपक्रम, लोकायत आणि मिसळपाव अशा क्रमाक्रमाने मराठी वेबसाइटस् आंतरजालात अस्तित्वात आल्या.
परवा निळू फुले गेले तेव्हा या मराठी वेबदुनियेचा कानोसा घेतला. एका थोर मराठी कलावंताच्या निधनाची नोंद इथे कशी घेतली आहे ते बघण्यासाठी; तर "मिसळपाव'ने लक्ष वेधून घेतलं. मिसळपावच्या स्वगृहावर म्हणजे होमपेजवर निळू फुले यांचा छानसा फोटो आणि "मिसळपाव' परिवाराच्या वतीने त्यांना वाहिलेली आदरांजली. त्यानंतर पन्नासहून जास्त प्रतिक्रिया प्रकाशित केलेल्या दिसल्या. निळूभाऊंच्या अभिनयाबद्दल, चित्रपटांबद्दल, कुणी निळूभाऊंना भेटल्याची आठवण लिहिलेली. अशी अद्ययावत वेबसाइट पाहून बरं वाटलं.
"मिसळपाव'च्या जन्मदात्याचं नाव तात्या अभ्यंकर. तात्या या नावावरून हे कोणी साठीच्या आसपासचे गृहस्थ आहेत, असा समज होतो; पण या तात्यांना साठीपर्यंत पोचायला अजून 20 वर्षं बाकी आहेत. अभ्यंकरांचं नाव चंद्रशेखर. पण तात्या हीच त्यांची खरी ओळख. तर तात्या अभ्यंकरांनी "मिसळपाव' का सुरू केली? ते सांगतात - "मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी आणि आंतरजालात मराठीचा अधिकाधिक वापर आणि प्रसार व्हावा, यासाठी मी ही वेबसाइट सुरू केली. लोकांचं लक्ष वेधून घेणारं आकर्षक नाव हवं होतं आणि मिसळपाव हा खास मराठी पदार्थ. म्हणून मिसळपाव हे नाव दिलं.' मिपा हे मिसळपावचं लघुरूप. मिपा उघडल्या उघडल्या मिसळपावची, तोंडाला पाणी सुटेल अशी डिश दिसतेच. मिपाची उद्दिष्टं होमपेजवर स्पष्ट केली आहेत - "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी सहज-सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. इथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं स्वागत आहे.'
2007 च्या गणेश चतुर्थीच्या दिवशी मिपा सुरू झाली. आज साडेपाच हजार मराठीजन मिपाचे सदस्य आहेत आणि हजार जण सदस्यत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रतीक्षा करणाऱ्यांना लवकरच मिपाचं सदस्यत्व मिळेल.
अभ्यंकर ठाण्याचे. त्यांच्या लिहाय-वाचायच्या, संगीताच्या आवडीतून ते या उपक्रमाकडे वळले. आधी ते "मनोगत' या संकेतस्थळावर नियमितपणे लिहीत असत. नंतर त्यांना आपलं स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करावं, असं वाटू लागलं. त्यांचा मित्र निलकांत धुमारे हा तंत्रज्ञानातला जाणकार. त्याने मदत देऊ केली आणि मिपा सुरू झाली.
संकेतस्थळ चालवणं म्हणजे नेमकं काय? अभ्यंकर सांगतात - "पैसे भरून डोमेन नाव (मिसळपाव) विकत घेतलं. सर्व्हर, मेन्टेनन्स या तांत्रिक बाबींपोटी दर महिन्याला पाच हजार खर्च येतो.' हा खर्च कोण करतं? अर्थात अभ्यंकर स्वतःच. ते सांगतात - "संकेतस्थळ चालवण्याची हौस ज्याची त्याला पदरमोड करावीच लागते; पण मी आनंदाने ती करतो. मिपामधून पुढच्या काळात उत्पन्न मिळू शकतं; पण या संकेतस्थळातून कमाई करण्याची माझी इच्छा नाही. माझ्या उदरनिर्वाहाचं साधन माझा व्यवसाय आहे. मिपातून उत्पन्न मिळू लागलं, तर ते मी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, इंडियन कॅन्सर सोसायटी, आनंदवन अशा सामाजिक कामांना देईन.'
वेबसाइट चालवायला कन्टेन्ट - मजकूर तयार करणारे लागतात. तसंच लोकांनी पोस्ट केलेला मजकूर आपल्या धोरणाशी सुसंगत आहे की नाही, हे तपासणारे संपादक लागतात. उदा. मिपा धर्म-पंथ-जातपात हे काहीही मानत नाही. माणूस ही एकच जात. विविध विषयांवर लिहिणारे लेखकही हवेतच. मिपाची अशी सगळी टीम आहे. त्यातले कोणी भारतात आहेत, कोणी अमेरिकेत, कोणी जर्मनीत; तर कोणी ब्रिटनमध्ये. हे सर्व जण एकही पैसा न घेता काम करतात. त्यांना आपापल्या नोकऱ्या वगैरे असतातच. ही एक प्रकारची पत्रकारिताच आहे.
पदरमोड करून मिसळपाव चालवण्याची हौस करावीशी का वाटते? अभ्यंकरांचं उत्तर - "मराठीजनांचं सोशल नेटवर्किंग व्हावं म्हणून. समाजात अनेक घटना घडत असतात. या घटनांबद्दल चर्चा व्हाव्यात, लोकांनी प्रतिक्रिया द्याव्यात, माहितीचं आदान-प्रदान व्हावं, मराठीजनांत कोल्हापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत संवाद घडावा म्हणून.' मग दोन वर्षांत मिपावर काय काय घडलं? भरपूर काही घडलं. मुख्य म्हणजे जगभरच्या मिपा सभासदांनी अनेकानेक विषयांवर नुसती चर्चाच नाही तर अगदी काथ्याकूट केला. या सभासदांचं सरासरी वय तीस. मिपावर कविता आणि अन्य लेखन करणारे खूप जण आहेत. काहींच्या प्रतिभेला बहर आलेला दिसतो. नवे लेखन, पाककृती, खरडण्याचा फळा, कलादालन, कौल असे दुवे मिपावर आहेत. वाविप्र असाही एक दुवा आहेच. वाविप्र म्हणजे FAQ - Frequently Asked Questions - वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
मिपाचे संपादकीय लेखही आहेत. वानगीदाखल ही शीर्षकं पाहा - समाजाची प्रातिनिधिक प्रतिमा - बहुजनांची की अभिजनांची? आधुनिक वैद्यकातील नीतिमत्ता, पूल, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण. प्रत्येक लेखावर भरपूर चर्चाही झाली आहे. सेवा देणारे आणि घेणारे यांच्या ओळखी होणं आणि त्यातून दोघांनाही फायदा होणं हेही घडलं आहे. मिपावर भेटणाऱ्यांनी परस्परांशी ओळखीही करून घेतल्या आहेत आणि अमेरिकेतल्या काही शहरात, लंडनमध्ये, जर्मनीत आणि भारतातही महाराष्ट्राबाहेर या मिपावासीयांनी प्रत्यक्ष भेटून "मिपा कट्टे' भरवायलाही सुरुवात केली आहे. अभ्यंकरांचं म्हणणं अशा वेबसाइटद्वारे आणखी कोणत्या गोष्टी घडू शकतात, त्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही.
मिसळपाव हे संकेतस्थळ पाहून आणि तात्या अभ्यंकर यांच्याशी बोलल्यावर जाणवलं की सुरुवात तर खूप चांगली आहे. इथे समान विषयात रस असणाऱ्यांचे गट सुरू होऊ शकतात, हे एखाद्या विषयावर परिपूर्ण माहिती मिळण्याचं ठिकाण होऊ शकतं. तंत्रज्ञानाची झेप आणखी मोठीच असणार आहे आणि त्याचा लाभ आपल्या मराठी भाषेला होणारच आहे. काही आव्हानंही आहेत. कन्टेन्ट- मजकूर तयार करणं हे सर्वात मोठं काम आहे. मराठी विकिपेडिया चांगल्या मजकुराच्या प्रतीक्षेत आहे. दुसरी अडचण अशी दिसते की मराठी संकेतस्थळं आता हिरिरीने वापरणाऱ्या सरासरी तीस वयोगटातल्या मराठी तरुणांच्या पुढच्या पिढीला यात कितपत रस वाटेल; मुळात मराठी भाषेशी ही पिढी कितपत जोडलेली राहील वगैरे...
असो आपण सध्या तरी मिसळपावची चव चाखू.
तात्या अभ्यंकर आणि मिसळपाव चे हार्दिक अभिनंदन!
इवलेसे रोप लावियले दारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी
खूप खूप आनंद झाला!
आपला,
डॉ. शैलेश कुळकर्णी
(इथे पिवळा डांबिस सही करणं योग्य नाही वाटत!!)
तात्यांचं अभिनंदन करायला ह्यावेळी मला माझ्या त्या कवितेची आठवण आली.
लाविले तात्यानी एक रोपटे
वटवृक्ष कधी झाला न कळे
किलबिल करती अनेक पक्षी
संख्या सभासदांची आहे साक्षी
गिधाडे,घुबडे अन कावळे
कोकिळा, साळूंकी अन बगळे
विश्राम करीती मिळून सगळे
बोलले तात्या त्या वडाला
पाहूनी तुला झालास मोठाला
करू का मज्जाव यापुढे गिधाडाला
दूर्गंधाने कष्ट होई तुझ्या देहाला
स्थितप्रज्ञ तो वटवृक्ष म्हणे तात्याला
मज्जाव आणिशी तू कुणाला कशाला
गिधाडे,घुबडे अन तत्सम ते पक्षी
येतात ते क्षणभर ईथे बसायला
जाणार ते उडूनी पकडण्या भक्षाला
शोधतील मग ते दुसर्या वटवृक्षाला
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
मिपा स्थापक तात्या अभ्यंकरांचे आणि ते चालवण्यात हातभार लावणार्या संपादक/प्रशासक/तंत्रज्ञ मंडळींचे!!
हे संस्थळ उत्तरोत्तर अधिक बहरो, अधिक सुजाण होवो ही सदिच्छा :)
(मिपा प्रतिष्ठानाची उत्सुकतेने वाट पाहणारा मिपाकर) विंजिनेर
तात्या,निलकांत आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन.
तात्या तुमचे आभार - स्वतःची पदरमोड करून आम्हाला मिपा उपलब्ध करुन दिल्या बद्दल.
फादर्स डे, मदर्स डे सारखा तात्याज डे सुरु करायला हवा मिपावर :)
मोहन
जाता जाता- आण्णा चिंबोर्याच्या सुचनांचा जरा विचार करा. अशा शिव्या आल्या की मिसळीत खडा आल्यासारख वाटत. #:S
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी