Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बर्ट्रांड रसेलच्या In Praise of Idleness (१९३२) या निबंधाचे स्वैररुपांतर

य
युयुत्सु
Wed, 08/19/2009 - 06:22
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6856 वाचन

💬 प्रतिसाद (23)
J
JAGOMOHANPYARE Wed, 08/19/2009 - 07:07 नवीन
<<<<<<<<<माझे निवांतपणाचे समर्थन पुढे नेण्याअगोदर जो युक्तिवाद मला स्वीकारता येत नाही, तो अगोदरच टाकून द्यायला हवा. उदा. जेव्हा स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी कमवण्याची गरज नसलेला एखादा मनुष्य जेव्हा काम मागतो, तेव्हा लोक असे म्हणतात की त्याच्या या मागणीमुळे इतर गरजुंच्या रोजीरोटीवर टाच येऊ शकते आणि त्यामुळे त्याची ही कृती अन्याय्य ठरते. हा युक्तिवाद स्वीकारला तर आपण सर्वांनी आपले पोट भरण्यासाठी निवांत राहणे आवश्यक ठरते. या युक्तिवादात एक गोष्ट विसरली गेलेली आहे. ती अशी की, मनुष्य कमावलेले धन जेव्हा खर्च करतो तेव्हा तो रोजगार निर्माण करत असतो. त्याने धन कमावताना ज्या न्यायाने भाकरी त्याने हिरावून घेतली त्याच न्यायाने खर्च करताना त्याने अनेकांना भाकरी मिळवून दिली. यामध्ये खरा खलनायक असतो तो पैशाची बचत करणारा. त्याने बचत केलेल्या पैशातून इतरांची भाकरी निर्माण होत नाही. कमावलेला पैसा गुंतवला गेला तर गोष्ट वेगळी. त्यातून इतर शक्यता निर्म<<<<<<<<<>>>>>>>>>> आनन्दाची गोष्ट आहे..... आता कुन्डल्या बघताना पैसे घेण्याऐवजी लोकानाच पैसे द्यायला हवेत तुम्ही.. बोला कधी सुरु करताय ? :) <<<<<<<<<<यामध्ये खरा खलनायक असतो तो पैशाची बचत करणारा.... <<<<<<<<<<>>>.. तुमचे पास बुक मिळेल का हो बघायला ? तुम्ही खलनायक आहात की सत्पुरुष हे बघायचे होते.. :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: आम्ही २५० रुपये घेतल्यानन्तरच आमची कुन्डली ज्योतिषाना दाखवतो..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/19/2009 - 07:19 नवीन
ही चर्चा युयुत्सु यांच्या आचार विचारांबद्दल आहे का रसलच्या निबंधाबद्दल? असो. युयुत्सु यांनी इथे भाषांतर चिकटवलं नसलं तरीही मी चिकटवत आहे: (टीप - या निबंधाला असलेल्या तत्कालीन सामाजिक संदर्भांकडे दूर्लक्ष करू नये. मूळ लेखकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याच्या तुलनेत आपली बौद्धिक कुवत ओळखून मग खुशाल टीका करावी. सम्यक् विचार करण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही त्यांनी हा निबंध वाचण्याच्या फंदात पडू नये. पुण्यात आय.टी क्षेत्रामध्ये नुकत्याच आत्महत्या केलेल्या दोन तरूणांच्या आत्म्याला (आणि वैफल्याला) हा अनुवाद समर्पित केला आहे. मला क्लिष्ट आणि अनावश्यक वाटलेली काही वाक्ये मी यातून गाळली आहेत. भाषांतराऐवजी मथितार्थाकडे माझा रुपांतर करताना कल होता. त्याविषयी सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे. - राजीव उपाध्ये) माझ्या पिढीतील बरेचजण एक म्हण ऐकत लहानाचे मोठे झाले. ती अशी की 'सैतान आळशी हातांकरता काही ना काही उद्योग शोधत असतो'. मी एक अत्यंत गुणी मुलगा असल्यामुळे मी अशा ऐकलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत असे. यामुळे मला जी विवेकबुद्धी प्राप्त झाली तीमुळॆ मी आतापर्यंत सतत परिश्रम करत आलॊ आहे. माझ्या विवेकाने माझी कृती जरी नियंत्रित केली असली तरी माझी मते मात्र आता पूर्णपणे बदलून गेली आहेत. मला असे वाटते की, जगात अनावश्यक श्रम खूपच केले जातात. श्रमांना प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेमुळे मनुष्य स्वत:चे खूप नुकसान करून घेत आहे. मला असे ही वाटते की, आधुनिक उद्योगप्रधान राष्ट्रांमध्ये दिली जाणारी श्रमप्रतिष्ठेवरील शिकवण आता बदलायला हवी. तुम्हाला नेपल्समधिल प्रवाशाची गोष्ट कदाचित ठाऊक असेल. या प्रवाशाला १२ भिकारी सकाळच्या उन्हात निवांतपणे पडलेले दिसले. त्यांना देण्यासाठी त्याने एक नाणे काढले तेव्हा बारापैकी अकरा भिकारी पुढे आले. तेव्हा त्याने ते नाणे पुढे न आलेल्या आळशी भिकाऱ्याला दिले. असो. ज्यादेशांमध्ये भूमध्यसमुद्रीय सूर्यप्रकाशाची चैन उपलब्ध नाही तेथे असा निवांतपणा लाभणे कठिण आहे. निवांतपणाचे महत्त्व कळण्याकरता तेथे विशेष प्रचाराची गरज आहे. माझे निवांतपणाचे समर्थन पुढे नेण्याअगोदर जो युक्तिवाद मला स्वीकारता येत नाही, तो अगोदरच टाकून द्यायला हवा. उदा. जेव्हा स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी कमवण्याची गरज नसलेला एखादा मनुष्य जेव्हा काम मागतो, तेव्हा लोक असे म्हणतात की त्याच्या या मागणीमुळे इतर गरजुंच्या रोजीरोटीवर टाच येऊ शकते आणि त्यामुळे त्याची ही कृती अन्याय्य ठरते. हा युक्तिवाद स्वीकारला तर आपण सर्वांनी आपले पोट भरण्यासाठी निवांत राहणे आवश्यक ठरते. या युक्तिवादात एक गोष्ट विसरली गेलेली आहे. ती अशी की, मनुष्य कमावलेले धन जेव्हा खर्च करतो तेव्हा तो रोजगार निर्माण करत असतो. त्याने धन कमावताना ज्या न्यायाने भाकरी त्याने हिरावून घेतली त्याच न्यायाने खर्च करताना त्याने अनेकांना भाकरी मिळवून दिली. यामध्ये खरा खलनायक असतो तो पैशाची बचत करणारा. त्याने बचत केलेल्या पैशातून इतरांची भाकरी निर्माण होत नाही. कमावलेला पैसा गुंतवला गेला तर गोष्ट वेगळी. त्यातून इतर शक्यता निर्माण होतात. सामान्य माणूस बचत केलेला पैसा सहसा सरकारकडे ठेव म्हणून ठेवणे पसंत करतो. बरीच सरकारे सार्वजनिक पैशाचा मोठा हिस्सा झालेल्या युद्धांचा हिशेब चुकता करण्यात किंवा भावी युद्धांच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी वापरतात. त्यामुळे सरकारकडे आपले धन सोपावणारा सामान्य मनुष्य भाडोत्री खुनी पोसण्याच्या कामाला अप्रत्यक्ष हातभार लावत असतो. सामान्य माणसाच्या या सवयीमुळे लष्कराच्या भरभराटीला मदत होत असते. साहजिकच हा पैसा माणसाने आपल्या हौशी-मौजीकरता वापरला तर ते अधिक योग्य ठरेल. पण माणसे आपला पैसा जेव्हा एखाद्या उद्योगामध्ये वळवतात तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी असते. सध्याच्या काळात बरेच उद्योग धंदे बुडतांना दिसतात. याचाच अर्थ असा की, बरेचसे मानवी श्रम आणि पैसा समाधान निर्माण करण्याऐवजी बंद पडलेली यंत्रे निर्माण करण्यासाठी खर्च होत आहे. दिवाळखोर उद्योगांना मदत करणारी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. हाच पैसा मित्रमंडळीना मेजवानी देण्यासाठी खर्च झाला तर आपण अशी आशा करू शकतो, की या मेजवानी मध्ये योगदान करणारे बेकरीवाले, खाटीक, मद्यविक्रेते हे सर्व समाधान पावतील. एखाद्याची गुंतवणूक जेव्हा फसते तेव्हा अशा व्यक्तीची लोक कीव करतात. पण मित्रमंडळीवर खर्च करणा-याच्या औदार्याचे मात्र समाजात कौतुक होत असते. हे सर्व प्राथमिक आहे. पण मला गंभीरपणे असे म्हणावेसे वाटते की, श्रमप्रतिष्ठेची संकल्पना आधुनिक जगाचे बरेच नुकसान करत आहे, तसेच आनंद आणि समृद्धीचा मार्ग योजनाबद्ध श्रमनिवृत्तीमधून जातो. आता आपण काम (श्रम) म्हणजे काय ते पाहू या. काम हे दोन प्रकारचे असते. यातील पहिला प्रकार म्हणजे कोणत्याही जड वस्तूचे तद्दृष इतर वस्तूसापेक्ष स्थान बदलणे आणि कामाचा दूसरा प्रकार म्हणजे दूसऱ्या लोकांकडून असे काम आज्ञा देउन करवून घेणे. यातील पहिला प्रकार कमी सुखद आणि कमी मोबदला देणारा आहे. हा जास्त सुखद आणि अधिक मोबदला देणारा आहे. दूस-या प्रकाराचा बराच विस्तार होऊ शकतो. आज्ञा कोणत्या व कशा द्यायच्या याचे सल्ले दूस-या प्रकाराच्या विस्तारात मोडतात. संपूर्ण युरपमध्ये आणखी एक कामाचा प्रकार आढळून येतो. हे कामगार वर उल्लेख केलेल्या दोन प्रकारांपेक्षा जास्त प्रतिष्ठा मिळवून आहेत. यांच्या कडे स्वत:च्या मालकीच्या जमिनी असल्यामुळे इतरांना काम करायची संधी मिळते. हे जमिनमालक निवांत असतात आणि कदाचित काहीजण अशी अपेक्षा करतील की मी त्यांची भलावण करीन. पण दूर्दैवाची गोष्ट अशी यांचा निवांतपणा इतरांच्या उद्योगामधून निर्माण होत असतो. जमिनदारांच्या या सुखासीन वृत्तीमध्ये श्रमाच्या मह्त्त्वाची पाळेमुळे सापडतात. या मंडळीना इतरांनी आपले अनुकरण करावे असे कधिही वाटत नाही. मानवी संस्कृतीच्या उदयापासून ते औद्योगिक क्रांतीपर्यंत माणसे आपल्या कुटुम्बाला पुरून थोडेफार उरेल एवढे अन्न अथवा धन कमवत आली आहेत. कुटुंबातील बायकापोरानी त्याला बरोबरीने हातभार लावला आहे. पण हे गरजेपेक्षा अधिक कमावलेले अन्न किंवा धन, ते कमावणा-यांना उपभोगायला न मिळता ते धर्मगुरु आणि सैनिकांच्या गरजा भागवण्यासाठी लाटले गेले आहे. दूष्काळात जेव्हा पुरेसे अन्न उपलब्ध होत नसे तेव्हा धर्मगुरु आणि सैनिकांच्या गरजा मात्र प्राधान्याने भागवल्या जात असत. याचा परिणाम म्हणजे अनेक मजूरांचा भूकेने बळी गेला. शंभर वर्षापूर्वी नेपोलियनच्या युद्धकालात, १९१७ पर्यंत रशियात, पूर्वेकडे अजूनही, तर इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांती होऊन सुद्धा, नवीन उत्पादकांची पिढी निर्माण होईपर्यंत हाच प्रकार चालू असलेला दिसून येतो. अमेरीकेत स्वातंत्र्ययुद्धाबरोबर तर दक्षिण अमेरिकेत अंतर्गत यादवी पर्यंत हे शोषण चालू राहिलेले दिसून येते. दीर्घकाळ टिकलेला प्रघात माणसाच्या विचारांवर आणि मतांवर खोल परिणाम घडवून आणतो. आज आपण गृहीत धरलेली श्रमांची प्रतिष्ठा या पुरातन प्रथेतून जन्माला आली आहे. आजच्या औद्योगिक जगात ही पुरातन प्रथा सोयीची नाही. मर्यादित निवांतपणा हा कुणा विशिष्ट वर्गाचा मक्ता नाही, तो समाजातील सर्व घटकांचा समान अधिकार आहे. श्रमांची नीति ही श्रमजीवी वर्गाची नीति असते आणि आधुनिक जगात गुलामगिरीला स्थान नाही. आदिम जमातीतील कष्टकरी त्यांनी निर्माण केलेले अन्न आपणहून सैनिकांची आणि धर्मगुरूंची पोटे भरण्या करता देणार नाहीत, हे उघड आहे. प्रथम दडपशाहीमुळे त्यांना गरजेपेक्षा जास्त अन्न निर्माण करावे लागले. नंतर कठोर परिश्रमांची नैतिकता त्यांच्या गळी उतरवण्यात आली. म्हणजेच मजूरांच्या काबाडकष्टांनी इतरांना निवांतपणा मिळण्यास मदत केली. परिश्रमांना नैतिकतेचा आधार दिला गेल्याने सक्तीची गरज कमी झाली आणि सरकारी खर्च पण कमी झाला. आजमितीला ९९% ब्रिटनमधल्या कष्ट्क-याना, राजाला मजुरा एवढाच पगार मिळावा असा प्रस्ताव आल्यास धक्का बसेल. कर्तव्याची संकल्पना ही ऐतिहासिकदृष्ट्या बोलायचे झाले तर, कष्टकर-यांच्या हितापेक्षा मालकाच्या हिताचे साधन म्हणून वापरली गेली. अर्थातच सत्ताधारी हे सोयिस्करपणे ही गोष्ट लपवताना दिसतात. शिवाय ते असा समज निर्माण करतात की, ते स्वत:पुरता विचार न करता सर्व मानव जातीच्या कल्याणाचा विचार करतात. काही वेळा हे खरे असते, अथेन्स मधल्या गुलामांच्या मालकानी त्यांचा निवांतपणा मानवी संस्कृतीच्या उद्धारासाठी उपयोगात आणला. कोणत्याही न्याय्य अर्थव्यवस्थेत हे शक्य झाले नसते. निवांतपणा हा मानवी संस्कृतीसाठी अत्यंत आवश्यक आहे, जो पूर्वी फार थोड्याना इतर अनेकांच्या काबाडकष्टामुळे मिळत होता. हे कष्ट अमोल होते, पण ते श्रम प्रतिष्ठेमुळे नव्हे, तर त्यातून निर्माण होणा-या निवांतपणामुळे. नवीन तंत्रांमुळे, जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारे श्रम मोठ्याप्रमाणात कमी झाले आहेत. युद्धकाळात हे अधिक स्पष्ट होते. सैन्यात भरती झालेली माणसे, दारूगोळा आणि शस्त्रांच्या निर्मितिमध्ये तसेच हेरगिरी आणि इतर सरकारी कचे-यांशी निगडीत स्त्री-पुरूष हे सर्व अनुत्पादक उद्योगांमध्ये गुंतलेले होते. असे असून सुद्धा, मित्रराष्ट्रांकडचे अकुशल श्रमजीवी पूर्वीपेक्षा जास्त स्वास्थ्य अनुभवत आहेत. ही गोष्ट आर्थिक व्यवहारांनी लपवून ठेवली - कर्ज घेतल्यामुळे असा समज निर्माण झाला की जणु भविष्य वर्तमानाचे पोषण करत आहे. पण हे अशक्य आहे, माणूस अस्तित्वात नसलेली भाकरी खाऊन जगू शकत नाही. युद्धामुळे हे सिद्ध झाले की उत्पादन प्रक्रियेच्या शास्त्रीय व्यवस्थापनाने बहूसंख्य लोकांची स्वास्थ्यप्राप्ती काही थोड्या लोकांच्या उत्पादनक्षमतेमुळे शक्य आहे. युद्धोत्तर काळात कामाचे तास चारावर आणले असते तर उत्तमच झाले असते. परंतु पूर्वीचाच गोधळ परत निर्माण करण्यात आला. ज्यांच्या कामाला मागणी आहे त्यांना अधिक काळ कष्ट उपसावे लागत आहेत. उरलेल्याना बेरोजगारीमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. का? तर श्रम करणे, जे करतात त्यांचे कर्तव्य आहे. आणि माणसाला मिळणारे वेतन हे त्याने केलेल्या उत्पादनाच्या प्रमाणात न मिळता ते तो करत असलेल्या कामाच्या मानल्या गेलेल्या दर्जानुसार दिले गेले पाहिजे या आग्रहामुळे. ही गुलामगिरीच्या राज्याची नैतिकता अत्यंत चूकीच्या परिस्थितीत वापरली गेल्यामुळे झालेला परिणाम भयानक होता. एक उदाहरण घेऊया. समजा काही लोक टाचण्यांचे उत्पादन करण्यात गुंतले आहेत. रोज आठ तास काम करून जगाला असलेली टाचण्याची गरज ते भागवतात. कुणीतरी असा शोध लावतो की हे लोक आता तेवढ्याच वेळात दुप्पट टाचण्यांचे उत्पादन करू शकतात. टाचण्या अगोदरच इतक्या स्वस्त आहेत की स्वस्त आहेत म्हणून आणखी विकल्या जाणे शक्य नाही. शहाण्यांच्या जगात टाचण्याचे उत्पादन करणारा कॊणीही कामाचे तास अशा परिस्थितीत आठावरून चारावर आणेल. पण प्रत्यक्षात असे करणे नाउमेद केल्यासारखे होईल म्हणून लोक टाचण्या आठ तास बनवत राहतील. टाचण्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात झाल्याने काही उत्पादकांचे दिवाळे निघेल. आणि पूर्वी टाचण्या बनवणा-यांपेक्षा निम्मे लोक नोकरी गमावून भिकेला लागतील. या दोन्ही शक्यतांमध्ये निवांतपणा तेवढाच निर्माण होतो. पण श्रमप्रतिष्ठेच्या अनाठायी आग्रहामुळे हा निवांतपणा आनंददायी होण्या ऐवजी उपद्रवकारक होईल याचीच जणु काळजी घेतली जाते. यापेक्षा अधिक मूर्खपणाची कॊणी कल्पना करू शकेल काय? गरीबाना निवांतपणा आवश्यक असतो हे अमीरांना नेहमीच धक्कादायक असते. इंग्लंड्मध्ये १९व्या शतकाच्या सुरूवातीला दिवसाचे १५ तास काम हे सामान्यपणे गृहीत धरले गेले होते. लहान मुले सुद्धा १२ तास काम सहज करत असत. यात हस्तक्षेप करून काही जणानी जेव्हा हे कामाचे तास जास्त असल्याचे मत व्यक्त केले तेव्हा यामुळे मोठी माणसे मद्यपान आणि लहान मुले दांडगाई पासून दूर ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे असे समर्थन दिले गेले. मी लहान असताना, जेव्हा शहरात राहणा-या श्रमजीवीना जेव्हा मताचा अधिकार प्राप्त झाला तेव्हा काही सार्वजनिक सुट्ट्या जाहिर झाल्या. अनेक उच्चवर्णीयांनी यावर तीव्र नापंसती व्यक्त केली. एका सरदारीण बाईने गरीबांना सुट्ट्या कशासाठी हव्यात? त्यानी कामच करायला हवे असे म्ह्टल्याचे मला अजूनही स्मरते. आज हे लोक इतके स्पष्ट बोलत नसले तरी मूळ भावना अजूनही टिकून आहे. आपण कोणताही पूर्वग्रह न ठेवता श्रमांच्या नीतीचा प्रामाणिक विचार करूया. प्रत्येक गरजवंत मनुष्य त्याच्या आयुष्यात इतरांच्या श्रमांची फळे उपभोगतो. मूलत: श्रम ही कल्पना पटण्यासारखी नाही हे गृहीत धरूनही, माणसाने तो कमावतॊ त्यापेक्षा जास्त उपभोग घेणे हे न्याय्य नाही. अन्न, वस्त्र, आणि निवा-याच्या बदल्यात त्याने वस्तू नाहीतर सेवा तरी द्यायलाच हवी. श्रम करणे हे कर्तव्य मानायला हरकत नाही पण ते या मर्यादेतच. सोव्हिएत युनियन व्यतिरीक्त इतर अनेक समाजात श्रमांच्या या किमान अटीतून अनेकजण सुटतील. मला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही. ही मंडळी वडिलोपार्जित संपत्तीचे वाटेकरी तरी असतात किंवा त्यांनी संपत्तीशी लग्न केलेले असते. यांच्या निवांतपणामूळे कष्टक-यांच्या पोटावर पाय येत नाही किंवा कुणाला अतिश्रम पण करावे लागत नाहीत. सामान्य कष्टकरी जर फक्त चारच तास काम करू लागला तर बेकारीची समस्या सुटेलच, पण सर्वांच्या अन्नवस्त्रादि गरजा पण पुरेशा प्रमाणात भागतील. या कल्पना श्रीमंताना धक्कादायक आहेत कारण त्यांना असे वाटते की गरीबांना निवांतपणाचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही. अमेरीकेत पुरेसे कमावलेले पुरुष तासन् तास कामाच्या रगाड्याला वाहून घेतात. साहजिकच रोजंदारीवर काम करणा-याना निवांतपणा ही कल्पना त्यांना पचत नाही. एक बेकारीची शिक्षा सोडली तर त्यांच्या मुलांनी निवांतपणा उपभोगलेला त्यांना आवडत नाही. यातला विचित्र भाग असा की, आपल्या मुलाकडून ढोर मेहनतीची अपेक्षा करणारा अमेरीकन पुरुष आपल्या बायका व मुलीनी मात्र काम न करण्याचे काही वाटून घेत नाही. निवांतपणाचा सदुपयोग हा संस्कृती आणि शिक्षण यांच्या एकत्रित परिणामाने साध्य होतो. आयुष्यभर ज्याने कामाचे रगाडे उपसले आहेत त्याला अचानक निवांतपणा लाभल्यास कंटाळवाणे होईल. पण पुरेशा निवांतपणा अभावी माणसे अनेक चांगल्या गोष्टीना पारखी होतील. बहूसंख्य लोकांनी निवांतपणाला पारखे का व्हावे याचे कारण कळत नाही, श्रमतपश्चर्येचे मूर्ख समर्थक मात्र गरज नसताना आपल्याला अनावश्यक कष्ट करण्यास पुन: पुन: प्रवृत्त करत असतात. रशियातील नव्या श्रद्धांच्या प्रभावाखालिल सत्ताधा-यांच्या राज्यात पारंपरिक पाश्चात्य शिकवणीपेक्षा बरेच वेगळे असले तरी काही गोष्टी अजूनही बदलेल्या नाहीत. सत्ताधारी वर्गाची, विशेषत: शिक्षणक्षेत्रात प्रचारकार्यक्रम राबवणा-यांची श्रमप्रतिष्ठेबाबत मनोवृत्ती जगातील अन्य सत्ताधा-याहून फार वेगळी नाही. उद्योग, सौजन्य, दूरस्थ फायद्यासाठी ढोर मेहनतीची तयारी, वरिष्ठांच्याकरता समर्पणाची भावना इत्यादि कल्पना परत अवतार घेताना दिसतात. इतकेच नव्हे तर अधिकारी हे विश्वनियंत्याच्या इच्छेचे प्रतिनिधी आहेत यालाच डायलेक्टीकल मटेरीयालीझम असे नाव प्राप्त झाले आहे. रशियातील श्रमजीवींचा विजय आणि अन्य देशातील स्त्रीवादी चळवळीचा विजय यात काही समान दूवे आहेत. वर्षानुवर्षे पुरूष स्त्रियांमधिल संतप्रवृत्तीचे अस्तित्व मान्य करत आले आहेत. याच वेळी ते स्त्रियांचे त्यांच्या कनिष्ठपणाबद्दल सांत्वन करताना संतप्रवृत्ती ही ताकदीपेक्षा अधिक चांगली हे पुन: पुन: सांगत आले आहेत. पण शेवटी स्त्रीवाद्यांनी ठरवले की, ताकद आणि संतप्रवृत्ती या दोन्ही आपल्याकडे असायला हव्यात. स्त्रीवादाच्या धुरीणांनी, पुरूषांनी प्रतिपादन केलेल्या संतप्रवृत्तीच्या आवश्यकतेवर विश्वास ठेवला पण राजकीय ताकदीचा हव्यास निरर्थक आहे हे मानायला ही मंडळी तयार नाहीत. अशीच काहीशी गोष्ट मानवी श्रमांच्या बाबतीत रशियात घडली आहे. वर्षानुवर्षे अमीरउमराव आणि त्यांचे भाट "प्रामाणिक परिश्रम" या कल्पनेचा पुरस्कार करताना साधी राहणी, गरीबांना मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती देणारा धर्म इत्यादि कल्पना मजुरांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चालवला. रशियात मानवी श्रमांच्या श्रेष्ठत्वाविषयीची शिकवण गंभीरपणे स्वीकारली गेली. मानवी श्रम हा तरूणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला गेला आणि तो नव्या नैतिक शिकवणीचा आधार मानला गेला. कदाचित आता हे सगळे छान वाटते आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा एक मोठा देश कमीत कमी ऋणाच्या भाराखाली विकसित व्हायला हवा. या परिस्थितीत कठोर परिश्रम हे आवश्यकच आहेत कारण त्यामुळे मिळणारी फळे निश्चित आकर्षक आहेत. पण जेव्हा अशी वेळ येईल की सर्वजण अतिश्रमांशिवाय स्वस्थ आयुष्य जगु शकतात, तेव्हा काय? पश्चिमेत हा प्रश्न अनेक मार्गांनी हाताळता येतो. आपण आर्थिक न्यायासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत आणि म्हणून उत्पादनातील मोठा वाटा संख्येने थोड्या पण काम न करणा-या व्यक्तींच्याकडे जातो. उत्पादनावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे आपण अनेक अनावश्यक वस्तूंचे उत्पादन करतो. इतरांच्या अतिश्रमामुळे फार मोठ्या संख्येने कष्ट करण्यास सक्षम असा वर्ग कामापासून वंचित आहे. हे सर्व अपूरे पडते तेव्हा आपण युद्ध करतो. त्यासाठी काही माणसे दारुगोळा बनविण्याच्या कामात गोवली जातात तर काही माणसे त्याच दारुगोळ्याने विध्वंस घडवून आणण्यासाठी नेमली जातात, जणु काही आपण आतषबाजीची नुकतीच ओळख झालेली लहान मुले आहोत. या सर्व खटाटोपाने एक संकल्पना कायम तग धरून राहते, कठोर परिश्रम हे फक्त सामान्य माणसाचीच जबाबदारी आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी श्रम हे मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही. तसे असते तर प्रत्येक मजूर शेक्सपियरपेक्षा श्रेष्ठ मानावा लागेल. दोन कारणांनी आपली यात दिशाभूल होत आली आहे. एक म्हणजे गरीबांना समाधानाच्या भ्रमात ठेवण्याच्या आवश्यकतेमुळे दीर्घकाल श्रीमंत श्रमप्रतिष्ठेची महती गात बसले आहेत. दूसरे कारण म्हणजे नवीन तंत्रामुळे मिळणारे सुख ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निरनिराळे आश्चर्यकारक बदल घडवून आणता येतात. या दोन्ही प्रेरणांशी प्रत्यक्ष कामगाराचे काही घेणे देणे नसते. तो असे कधिही म्हणत नाही की, "मी श्रम एक सर्वश्रेष्ठ कर्तव्य म्हणून करतो आणि पृथ्वीचा कायापालट घडवून आणताना मला खुप आनंद होतो." मजूर कामाकडे फक्त अन्न्वस्त्रादि गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून बघतात आणि त्यांना त्यांचा आनंद फक्त निवांतपणातून मिळतो इतर कशातूनही नाही. काही जण असे म्हणतील की कामाचे तास चार झाले तर लोकांना आपला उरलेला वेळ कसा घालवायचा ते कळणार नाही. हे जर खरे असेल तर ते आधुनिक मानवी संस्कृतीला धिक्कारास्पद आहे. कारण यापूर्वीच्या काळाकरता हे खरे मानता येत नाही. पूर्वी आयुष्यात खेळकरपणा आणि मोकळेपणाला जे स्थान होते ते आता कार्यक्षमतेच्या पंथाने घेतले आहे. आधुनिक मनुष्य प्रत्येक कामाचे काही उद्देश्याने केले जाते असे मानतो पण तो काम हे कामाकरता केले पाहिजे असे मानत नाही. उदा. गंभीरप्रवृत्तीचे लोक चित्रपटाला जाण्याच्या सवयीवर सतत टीका करत असतात. तरूणाना हिंसक बनवण्याचे ते एक कारण म्हणून पुढे करतात. पण चित्रपट बनवण्याच्या श्रमांचे मात्र भरपूर कोडकौतूक होत असते. नफा देणारी प्रत्येक कृती ही श्रेयस्कर हा आग्रहाने मोठी उलथापालथ करतो. तुम्हाला मांस पुरवणारा खाटिक आणि पाव देणारा पाववाला हे स्तुतीला पात्र ठरतात. का तर ते पैसे कमावतात. पण तुम्ही जेव्हा त्यानी निर्माण केलेल्या अन्नाचा आनंद घेता तेव्हा मात्र ती चंगळ ठरते. ढोबळपणे बोलायचे झाले तर पैसे कमावणे हे 'चांगले' आणि खर्च करणे हे 'वाईट'. वस्तूत: या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून असा विचार करणे विक्षिप्तपणाचे आहे. एखादि व्यक्ती श्रम करते ते नफा कमावण्याकरता करते, पण त्या श्रमांचा सामाजिक उद्देश हा फक्त उपभोगच असतो. व्यक्तीगत व सामाजिक उद्देषांच्या या फारकतीमुळे माणसाला सुसंगत असा विचार करता येत नाही आणि नफा हे उद्योग करण्यासाठी एक आमिष बनते. आपण उत्पादनाचा खूप विचार करतो आणि उपभोगाचा फार कमी... पूर्वी निवांतपणाचा उपभोग घेणारा वर्ग हा श्रमजीवीवर्गापेक्षा संख्येने लहान होता. या सुखजीवी वर्गाने असे असंख्य फायदे उपभोगले की ज्यांना आर्थिक न्यायाच्या संकल्पनेत काहीही आधार सापडणार नाही. यामुळे शोषण तर वाढलेच पण या सगळ्यांच्या समर्थनार्थ नवेनवे सिद्धांत या सुखजीवी वर्गाने शोधले. हे सगळे दोष स्वीकारून या वर्गाचे मानवी संस्कृतीसाठी केलेले योगदान मान्य करायला हवे. कला आणि शास्त्रांचा विकास आणि संवर्धन, ग्रंथनिर्मिती, तत्त्वज्ञानाचा विकास, सामाजिक सुधारणा इत्यादि उदाहरणे इथे देता येतील. सुखजीवीवर्गाशिवाय मानवजातीला पाशवीपणातून मुक्ती मिळाली नसती. जगात जेव्हा चार तासांपेक्षा जास्त काम करावे लागणार नाही तेव्हा जिज्ञासूना त्यांची जिज्ञासा भागवण्यासाठी, चित्रकाराना त्यांच्या कलेची साधना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, नवोदित लेखकांना गुजराणीसाठी सवंग लेखनाची गरज पडणार नाही. वैद्यकीय व्यावसायिकाना ज्ञानोपासना करण्यासाठी तर शिक्षकांना नवी शैक्षणिक तंत्रे विकसित करण्यास पुरेसा अवधी मिळेल. कामाचा दर्जा सुधारून दमछाक होणार नाही. ब-याच जणांना नि:सत्त्व करमणूकीची गरज उरणार नाही. एक टक्का तरी लोक सार्वजनिक हिताच्या उपक्रमात भाग घेऊन आपल्या अभिनव कल्पना राबवू शकतील. निवांतपणाचे फायदे एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. सामान्य माणसांना सुखी जीवनाच्या संधी निर्माण झाल्याने इतरांना उपद्रव देण्याची व संशयी वृत्ती कमी व्हायला मदत होईल. सर्वांना पुरेसे काम मिळाल्याने मुख्य म्हणजे युद्धाची चटक कमी होईल. चांगल्या वर्तनाची जगाला सर्व नैतिक गुणामध्ये सर्वात जास्त गरज आहे. चांगले वर्तन स्वास्थ्य आणि सुरक्षेच्या भावनेशी निगडीत असते, ते संघर्षातून निर्माण होत नाही. उत्पादनाच्या नवीन तंत्रानी आपल्याला स्वास्थ्य आणि सुरक्षेच्या संधी दिलेल्या असताना आपण काहीजण अतिश्रमाचा विनाकारण स्वीकार करून इतरांकरता उपासमार निर्माण केली आहे. यंत्रे येण्या अगोदर आपण जसे उत्साही होतो तसेच आताही आहोत आणि मला असे वाट्त यात आपण मूर्खपणा करत आहोत, ज्याची काहीही आवश्यकता नाही. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
ऋ
ऋषिकेश Wed, 08/19/2009 - 07:46 नवीन
लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद अदिती लेख शांतपणे वाचून प्रतिक्रीया देतो -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/19/2009 - 08:21 नवीन
मी सुद्धा अजून हा निबंध वाचला नाही आहे, सवडीने वाचून प्रतिक्रीया टाकेन. युयुत्सु, तुम्हाला शक्य असल्यास रसल यांच्या इतर निबंध/लेखांचे भाषांतर करावे ही विनंती. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
युयुत्सु Wed, 08/19/2009 - 08:27 नवीन
तो माझा एक संकल्पित प्रकल्प आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
J
JAGOMOHANPYARE Wed, 08/19/2009 - 07:16 नवीन
ब्लॉगची जाहीरात करण्यापेक्शा डायरेक्ट लेख इथे कॉपी पेस्ट केला असता तर लोकांचे अतिरिक्त श्रम वाचले असते की ! <<<<<<<<<'सैतान आळशी हातांकरता काही ना काही उद्योग शोधत असतो' >>>>>>>>>>> आळशी नाही, रिकाम टेकड्या हातांकरिता ! आणि त्याचे उदाहरण स्वतंत्रपणे द्यायची गरजही नाही ! :)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 08/19/2009 - 08:35 नवीन
दिलेल्या लिंकवर टिचकी मारायला कष्ट पडतात का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/19/2009 - 08:38 नवीन
युयुत्सु, सगळ्यांकडेच सुपरफास्ट ब्रॉडबँड असेलच असं नाही. युएसबी मोडेम वापरणार्‍यांना कधीमधी, खरंतर बर्‍याचदा अपेक्षित नेटस्पीड मिळत नाही. काही नवशिक्या इंटरनेट वापणार्‍या लोकांसाठीही लिंका देणं गैरसोयीचं ठरू शकेल. तेव्हा अशा काही लोकांचा विचार करून तुम्ही स्वतः लिहीलेल्या लिंकवरचा मजकूर मिपाच्या धाग्यातच टाकलात तर बरं होईल. (असो. फार अवांतर झालं. इतरांना चांदण्या मिळण्याच्या आत पळते.) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
J
JAGOMOHANPYARE Wed, 08/19/2009 - 08:55 नवीन
कष्ट नाही, 'अतिरिक्त कष्ट' पडतात, असे म्हटले मी..... 'अतिरिक्त कष्ट' वाचवण्यासाठी जर हा सारा अट्टाहास आहे, तर ते तुम्ही टाळायला नको का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
क
कालिन्दि मुधोळ्कर Wed, 08/19/2009 - 07:59 नवीन
रसेल यांच्या सुप्रसिद्ध लेखाचा अनुवाद दिल्याबद्दल धन्यवाद. फुरसतीचा वेळ असणं ही सुद्धा एक महत्वाची गरज आहे पण आज हे कितपत शक्य आहे?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 08/19/2009 - 08:29 नवीन
फुरसतीचा वेळ निर्माण केल्यामुळेच मला हा अनुवाद करता आला. मनुष्य हा फक्त काम करण्यासाठी जन्माला येत नाही.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Wed, 08/19/2009 - 08:41 नवीन
अनुवाद करणे, हे काम करणे यात मोडत नाही का ? हा अनुवाद आपण नसता केलात तर व एखाद्या गरजू भाषान्तरकाराने मोबदल्यासाठी केला असता तर त्याला पाव व मान्स विकत घेता आले असते की नाही ? म्हणजे ज्याला आपण फुरसतीचे काम म्हणत असता, तेही कुणाच्या तरी पोटावर पाय देणार असतेच की ! अतिरिक्त श्रमाचे सामाजिक परिणामावरील हा एक इम्पोर्टेड लेख आहे, एवढेच ... गृहस्थाश्रमा नन्तर वान प्रस्थाश्रम आपली सन्स्कृती पाळत होतीच की ! ती देखील त्या काळात, ज्या काळात श्रम हा रोजच्या कामाचा भाग होता, नुसते पैसे मिळवण्याचे साधन नव्हे!
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 08/19/2009 - 13:14 नवीन
काय करणार, १९३२ पासून ह्या निबंधाचा अनुवाद झाला नाही याचे मोठ्ठे आश्चर्य वाटले. त्यात कर्मसंन्यासाचा धिक्कार करणा-या या भारतात या निबंधाचे योग्य मूल्यमापन, परिशिलन व्हायची शक्यता कमीच. तेव्हा अधिक वाट बघण्यात अर्थ नाही असा विचार करुन मीच हा उद्योग केला. तसा हा विषय थोडा unfashionable आहे (माझ्या सप्तपदीवरील लिखाणा सारखा), त्यामुळे त्याचे भाषांतर करून एखाद्याला पाव आणि मांस मिळ्ण्याची शक्यता जवळपास शून्यच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/19/2009 - 13:32 नवीन
आधीच ईग्रंजीत वाचुन झाल्याने नाविन्य नाही वाटले सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/19/2009 - 08:46 नवीन
मनुष्य हा फक्त काम करण्यासाठी जन्माला येत नाही. काय सांगता ? काहितरी गल्लत होत आहे, माझे तर मत असे आहे की.... पुर्ण प्रतिक्रीया वाचण्यासाठी इथे टिचकी मारा :- http://papillonprasad.blogspot.com/ ©º°¨¨°º© वात्स्यायन परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 08/19/2009 - 09:04 नवीन
आपण दिलेल्या लिंक नक्की काय वाचायचे हे सांगीतलेत तर बरे होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वेताळ Wed, 08/19/2009 - 08:54 नवीन
A WRONG MAN IN WORKERS PARADISE आठवली. आम्हाला ती ८ क ९ च्या पुस्तकात होती. त्याची आठवण झाली. निबंध वाचला नाही, येळ मिळाल्यावर वाचुन प्रतिक्रिया देईन. खुप आळस आला आहे,त्यामुळे जरा झोपुन येतो. वेताळ
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/19/2009 - 13:07 नवीन
आपण निवडलेला लेख आणि त्याचा अनुवाद छान आहे. यापूर्वी मिपावरती अदितीने बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक या धाग्यामध्ये रसेलच्या लेखनाची ओळख करुन दिली होती. त्याच लेखात सर्वात शेवटच्या परिच्छेदात तिने आपल्याच अनुदिनीवरच्या याच लेखाचा दुवा दिला होता. (तो मी तेव्हाच वाचला होता आणि आता पुन्हा वाचताना 'पूर्वी आपण असेच सगळे कसे वाचले' असे आश्चर्य करत असतानाच अदितीच्या लेखाची आठवण झाली आणि उलगडा झाला :) ) रसेल साहेबांच्या विचारांवर विद्वानलोक जो उहापोह करतील तो वाचण्यासाठी उत्सुक आहे. -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 08/19/2009 - 15:59 नवीन
>रसेल साहेबांच्या विचारांवर विद्वानलोक जो उहापोह करतील तो वाचण्यासाठी उत्सुक आहे. आपण सगळेच विद्वान लोकच आहोत असा मनाशी ठाम विश्वास बाळगून आमच्यासारखे लोक कुठच्याही चर्चेत नाके खुपसून लिहीतच असतात. त्यामुळे तुम्हालाही काय वाटते ते बिनघोर लिहा. ;) बाकी, लेख विचार करायला लावणारा आहे. या स्वरूपाचे विधान एका जवळच्या व्यक्तीने (रसेल न वाचलेल्या) केले होते. त्यांचे म्हणणे असे की कमी वर्षांमध्ये खूप अधिक काम करून आटून जाण्यापेक्षा जास्त वर्षे, पण दिवसाकाठी कमी काम करता येईल (कामाचे दिवसाकाठीचे आउटपुट कमी करता येईल). वरकरणी पाहायला हे सोपे वाटते, आणि एक विचार म्हणून काही व्यक्ती याचा वापरही करू शकतील. पण हे तेवढेच नाही. जर समाजातील एक घटक अधिकाधिक संपत्ती कमी वेळात निर्माण करून नंतर अधिक वर्षे या संपत्तीचा उपभोग घेत असला, तर त्यांचेही चूक आहे असे नाही. लहान वयात अधिक श्रम करण्याची ताकद असते, वयापरत्वे ती कमी होत जाते. म्हणून तरूण वयात अधिक काम केले आणि म्हातारपणी कमी काम केले तर कामाची अशीही वाटणी होऊ शकते. किंवा म्हातारपणी करण्याची कामे वेगळी असली, वयाला अनुसरून योग्य असली असेही करता येऊ शकते. चार तास काम केले पण अधिक क्षमतेने आणि अधिक पैसा मिळवून देणारे तर संपत्तीही अधिक मिळू शकते, असाही प्रतिवाद होऊ शकतो. पण असे किती व्यवसायांबाबतीत शक्य आहे? श्रमजीवी जनता ही अधिक वेळ काम करून अधिक पैसे मिळवते. ह्या सेवा घेणे अनेकांना परवडते कारण त्यांना द्यावा लागणारा मोबदला त्यामानाने कमी असतो. पण ह्या चार तासांत वाढीव मोबदला देण्याची वेळ आल्यास त्या सेवा विकत घेण्यावर ग्राहकांच्या पतीप्रमाणे मर्यादा येतील आणि त्याचा विपरीत परिणाम विक्रेत्यांच्या जीवनावर होईल. चार तासच काम करून सुखकर जगण्यासाठी आवश्यक वस्तू मिळतील याची काय गॅरंटी? शेवटी व्यक्तीने स्वतःच्या गरजा मर्यादित करणे आणि क्षमता, आवड ओळखून हवा तो व्यवसाय करणे हे महत्त्वाचे. त्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचे आहे हे ठरवायला हवे. असे हे निर्णय करताना रसेल यांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
वेताळ Wed, 08/19/2009 - 13:40 नवीन
आताच संपुर्ण निबंध वाचला. एकदमच सगळा डोक्यात बसेल अशी आशा करणे चुकीचे आहे. खुपशे विचार रसेलसाहेबांचे पटले. परंतु आपली सर्वाची मानसिक घडणच अशी बनली आहे कि आपण फक्त श्रमाला प्रतिष्ठा देत आलो आहे. त्यामुळे पोटापाण्यापुरते काम करणे व इतर वेळ निवांत वाया घालवणे पटत नाही. लेख वाचताना ते पटत होते पण वाचुन झाल्यावर खरोखर असे असु शकेल का? हा विचार मनात येतो.समजा आपण अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पन्न केले नाही तर दुष्काळात खुप लोक उपाशी मरतील.त्यामुळे अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पन्न गरजेचे आहे.असो अजुन तुमचे भाषातंरीत उत्तमोत्तम लेख यावेत हिच इच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 08/19/2009 - 16:14 नवीन
फुरसदीच्या वेळात खुप प्रयत्न केला पण काहीच कळले नाही. असो. माझाच आय. क्यु कमी असेल.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 08/19/2009 - 16:16 नवीन
:) हा हा हा! आमचा पण आय.क्यु.कमी आहे.... शक्यतो नाहीच आहे आय्.क्यु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ध
धनंजय Wed, 08/19/2009 - 17:18 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा