अष्टदिक्पाल
प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.
इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)
हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश. कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.अग्नी (आग्नेयेचा अधिपती)
वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते. कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्पवरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)
वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला. कायगाव टोके येथील वरुणाची मूर्तीवायू (वायव्येचा अधिपती)
वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही. कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्तीयम (दक्षिण दिशेचा अधिपती)
यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत. कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)
कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते. कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे. कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)
निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप. कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.ईशान (ईशान्येचा अधिपती)
ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते. कायगाव टोके येथील ईशान मूर्तीमातृका
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः || ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते. मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे ब्राह्मी - हंस माहेश्वरी - बैल कौमारी - मोर वैष्णवी - गरुड वाराही- वराह, घुबड, महिष इंद्राणी - हत्ती चामुंडा- प्रेत आता काही सप्तमातृकापट पाहू या. वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जैन आणि बौध्द शिल्पांमध्येही
शैव - वैष्णव संघर्षाने टोक
अद्भुत आहे हे सारं!!! उत्तम माहिती आणि फोटो.
अप्रतिम लेख
अप्रतिम लेख
धन्यवाद मित्रा, तुला इकडे
अभ्यासपूर्ण प्रतिसाद व ❤ या चिन्हासाठी मिपा अॅडमिन कडे शिफारस
((( काही प्रतिसाद पाहून
माहिती उत्तम आहे. तीन वेळा हा लेख वाचून काढला.
Pagination