Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फ्रॅन्केनस्टाइन

प
प्रचेतस
Sun, 01/04/2026 - 17:49
💬 27 प्रतिसाद
a मेरी शेलीची एकमेव कादंबरी असलेली 'फ्रॅन्केनस्टाईन ऑर द मॉडर्न प्रोमेथियस' ही कादंबरी खरं तर फार पूर्वीच वाचली होती. व्हिक्टोरियन गॉथिक काळात घडले गेलेले कथानक अतिशय जबरदस्त होते. खरे ब्रॅम स्ट्रोकरची ड्रॅक्युला आणि शेलीची फ्रॅन्केनस्टाईन आजही जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणल्या जातात. खरं तर भयकादंबर्‍यांना असा दर्जा मिळणे हे भाग्याचेच. दोन्ही कादंबर्‍यांवर असंख्य चित्रपट निघाले, बहुतेक सर्वच प्रमुख भाषांत अनुवादही झाले. ड्रॅक्युलाचा यथामूल अनुवाद स्नेहल जोशी आणि पंढरीनाथ सावंतांनी मराठीत आणलाही होता मात्र फ्रॅन्केनस्टाईनचा यथामूल अनुवाद मराठीत नाही. रमेश मुधोळकरांनी केलेला अनुवाद अतिशय संक्षिप्त आहे आणि धारपांनी केलेला अतिशय स्वैर आहे आणि त्यात स्वतःच केलेले बरेच बदल आहेत शिवाय त्यात मेरी शेलीला मूळ लेखक म्हणून ना धारपांनी श्रेय दिलेय, ना प्रकाशकांनी. फ्रॅन्केनस्टाईन म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर लगेचच एक राक्षसी जीव येतो. पण फ्रॅन्केनस्टाईन म्हणजे त्या दुर्दैवी राक्षसी जीवाचा कर्ता. व्हिक्टर फ्रॅन्केनस्टाईन. नवनिर्मितीच्या कल्पनेने पछाडलेला व्हिक्टर फ्रॅन्केनस्टाईन नावाचा तरुण शास्त्रज्ञ विविध मृत मानवांच्या विभिन्न शरीरांच्या अवयवांपासून एका राक्षसी जीवाची (creature) निर्मिती करतो. मात्र तो प्राणी जिवंत झाल्यावर त्याच्या भीषण रूपामुळे घाबरुन किंवा घृणा वाटून व्हिक्टर त्याला सोडून देतो. एकाकीपणा, नाकारलेपण आणि प्रेमाच्या अभावामुळे तो जीव दुःखी व रागीट बनतो आणि सूड घेण्याचा मार्ग स्वीकारतो. यामुळे व्हिक्टरच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी घटना घडतात. खरे तर कोण राक्षस (monster) हा प्रश्न ही कादंबरी निर्माण करते आणि ह्या भयकथेचे एका अद्भूत शोकांतिकेत रुपांतर करते. a ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले, ह्यातले सर्वात प्रसिद्ध म्हणजे १९३१ सालचा 'फ्रॅन्केनस्टाईन' आणि १९३५ सालचा 'ब्राईड ऑफ फ्रॅन्केनस्टाईन' मात्र हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत. खरं तर मध्यंतरी डॅनियल रॅडक्लिफ आणि जेम्स मॅकअव्होयचा व्हिक्टर फ्रॅन्केनस्टाईन हा सिनेमा पाहिला होता पण मूळ कथानकाशी तो बिलकुल प्रामाणिक नव्हता, शिवाय तो पिक्चर फारसा आवडलाही नव्हता. अशातच गियेलर्मो डेल टोरो (Guillermo del Toro) चा 'फ्रॅन्केनस्टाईन' नेटफ्लिक्स वर आला आणि आणि तो लगेच पाहून झालाही. डेल टोरोचे पॅन्स लॅब्रियान्थ आणि द शेप ऑफ वॉटर पाहिले होते, आवडलेही होते. फॅन्टसी, भय ह्यांचे विलक्षण मिश्रण करणारा हा दिग्दर्शक हेलबॉय, पॅसिफिक रिम सारखे तद्द्न मसाला चित्रपटही देतो. पण तो लक्षात राहतो तो कॅबिनेट ऑफ क्युरियोसिटीज ह्या सिरियलसाठी आणि पॅन्स लॅब्रियान्थ, द शेप ऑफ वॉटर आणि फ्रॅन्केनस्टाईन यांसारख्या चित्रपटांसाठीच. मेरी शेली यांची कादंबरी ही विज्ञानकथा म्हणून जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती एक शोकांतिका. जीवन निर्माण करण्याची हिंमत व्हिक्टर फ्रँकनस्टाईन करतो, पण त्या जीवनाची जबाबदारी घ्यायची वेळ आली की तो मागे सरतो. डेल टोरो यांच्या चित्रपटात हातात हा व्हिक्टर फ्रॅन्केनस्टाईन वेडसर न वाटता, आजूबाजूला दिसणाऱ्या जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या आधुनिक माणसाचा प्रतिनिधी ठरतो. गॉथिक दृश्यशैलीत हा सिनेमा भयावह न वाटता अस्वस्थ करणारा ठरतो. प्रतिभावान पण अहंकारी असलेला डॉक्टर बॅरोन व्हिक्टर फ्रॅकेनस्टाईन हेन्रिक हार्लेन्डर ह्या गर्भश्रीमंत शस्त्रविक्रेत्याची (ख्रिस्तोफ वॉल्ट्झने हे पात्र अविस्मरणीय बनवले आहे) आपल्या प्रयोगात मदत घेऊन विविध मृत शरीरांचे अवयव एकत्र शिवून आकाशातल्या विजेच्या साहाय्याने एका राक्षसी जीवाची (creature)निर्मिती करतो. परंतु त्याच्यात जीव आल्यावर त्याच्या भयानक रुपामुळे व्हिक्टर त्याला स्वीकारत नाही आणि आपली निर्मिती नष्ट करण्यासाठी तो त्याची प्रयोगशाळा असलेला हार्लेन्डरचा राजवाडा आग लावून उद्वस्त करतो. नुकताच जीव आलेला तो दुर्दैवी जीव ह्यातून बचावतो आणि आत्मशोधासाठी प्रयत्न करतो. समाजाकडून सतत नाकारला गेलेल्या ह्या भावनाशील, संवेदनशील आणि प्रेमाची गरज असणारा हा जीव स्वतःचे अस्तित्व, आपले स्थान आणि निर्मात्याने दिलेले दुःख यांचा अर्थ शोधू लागतो. आणि सुरु होतो निर्माता आणि निर्मिती ह्यांमधील जीवघेणा संघर्ष. खरा राक्षस कोण? मृत अवयव शिवून बनलेला हा जीव की जबाबदारी नाकारणारा, नैतिकता मिरवणारा व्हिक्टर ह्याचे अपेक्षित उत्तर चित्रपटातच मिळते. डेल टोरोने व्हिक्टोरियन वास्तुशैलीत साकारलेली ही गॉथिक भयकथा खरंतर एक ट्रॅजिडी आहे. निर्मात्याची कथा (Victor's Tale) आणि निर्मितीची कथा (The Creature's Tale) अशा दोन भागांत हा चित्रपट साकारला आहे ऑस्कर आयझॅकने व्हिक्टर फ्रॅकेनस्टाईन तर जेकब एलोर्डीने राक्षसी दुर्दैवी जीव अक्षरशः जिवंत केले आहेत. ख्रिस्तोफ वॉल्ट्झबद्द्ल तर काही बोलूच नये. लहानशा भूमिकेतही तो प्रचंड प्रभाव टाकतो. मिया गॉथने एलिझाबेथ साकारली आहे. 'फ्रॅकेनस्टाईन' कादंबरीचे फॅन्स असणार्‍यांनी हा चित्रपट सोडूच नये. अर्थात मूळ कादंबरीत असलेल्या ह्या कथानकात चित्रपटाच्या अनुषंगाने बरेच बदलही केलेले आहेत मात्र तरीही हा चित्रपट मूळ आशयाशी अत्यंत प्रामाणिक आहे. अवश्य बघावाच असा आहे.

प्रतिक्रिया द्या
2321 वाचन

💬 प्रतिसाद (27)
क
कंजूस Sun, 01/04/2026 - 20:44 नवीन
चांगली ओळख. (कादंबरी मिळाली तर वाचेन.)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 01/05/2026 - 06:04 नवीन
छान ओळख.मी हा सिनेमा पाहयला सुरुवात केली होती पण समजतच नव्हता.आता परत नव्याने पाहेन.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 01/06/2026 - 05:32 नवीन
चित्रपट परिचय आवडला 👍
ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले,
त्यातले काही पाहिले आहेत आणि एक अनुवादीत कादंबरी वाचली आहे. सध्या 'मनी हाईस्ट' चा दुसरा सिझन बघायला घेतलाय. नेटफ्लिक्स वरचा नवा 'फ्रॅन्केनस्टाइन' चांगला आहे म्हणताय तर आज मनी हाईस्टचे दोनेक एपिसोड कमी बघुन हा चित्रपट बघतो आणि मग अभिप्राय देतो.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 01/08/2026 - 06:25 नवीन
काल रात्री बघितला, आधी पाहिलेल्यांपेक्षा हा जास्ती चांगला वाटला. चित्रपटाच्या 'व्हिक्टर्स टेल' ह्या पहिल्या अध्यायापेक्षा 'द क्रिएचर्स टेल' हा दुसरा अध्याय मला जास्ती आवडला! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला कालखंड, त्याकाळची वेशभूषा, केशभूषा अशा गोष्टी योग्यप्रकारे दाखवण्यावर मेहनत घेतलेली दिसते. अवांतर: व्हिक्टरच्या प्रयोगशाळेची इमारत (टॉवर) बघून मागे चित्रगुप्त काकांनी 'मोकलाया दाहि दिश्या' ह्या मिपावरच्या अजरामर कवितेसाठी तयार केलेले 'रमलचित्र' आठवले 😀 Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
प
प्रचेतस गुरुवार, 01/08/2026 - 15:08 नवीन
क्रिचर्स टेल भारीच आहे. पण मला व्हिक्टर्स टेल मधला शेवटचा भाग जास्त आवडला जेव्हा व्हिक्टर कॅसलला आग लावतो आणि तो जीव जीवाच्या आकांताने व्हिक्टर व्हिक्टर ओरडतो आणि त्याने त्याचे क्षणिक परिवर्तन होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ट
टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 07:40 नवीन
सहमत आहे. एकंदरीत चित्रपटाचा इम्पॅक्ट चांगलाच आहे, पण दुसरा अध्याय जास्त भावला. आणि हो, तुम्ही लेखात लिहिलंय,
"ह्या कथेवर असंख्य वेगवेगळे चित्रपट निघाले, ह्यातले सर्वात प्रसिद्ध म्हणजे १९३१ सालचा 'फ्रॅन्केनस्टाईन' आणि १९३५ सालचा 'ब्राईड ऑफ फ्रॅन्केनस्टाईन' मात्र हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत."
हे दोन्ही चित्रपट मी पण पाहिले नाहीयेत आणि इतके जुने चित्रपट आता पाहू शकण्याची 'शून्य' शक्यता असल्याने ह्या नव्या आणि सर्वात जुन्यात काय फरक आहे हे समजून घेण्यासाठी विकिपीडियाला भेट दिली असता बरीच माहिती मिळाली, त्यातली खालील माहिती रोचक वाटली... 'The film was banned in China due to falling under the category of "superstitious films" as a result of its "strangeness" and unscientific elements.' आणि हे वाचल्यावर लहानपणी वाचलेल्या फास्टर फेणेच्या कुठल्यातरी एका पुस्तकातले हे गाणे आठवले एकदम. "लाल चीन की पिली चमडी मन का काला रंग... अजीब इनका ढंग रे भैया अजीब इनका ढंग..." (गाण्याचे हे आठवणारे बोल बरोबर आहेत का आणि हे कुठल्या पुस्तकात होते हे सांगेल का कोणी?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सिरुसेरि Tue, 01/13/2026 - 13:34 नवीन
हे गाणे "फास्टर फेणेचा रणरंग" या पुस्तकातले आहे . या प्रतिसादामुळे फाफे , भारा , चिनि माका या वाचन खुणा परत आठवल्या . "फ्रॅन्केस्टाईन" हा चित्रपट या आधी १९९५ साली वेगळ्या कलाकारांसह प्रदर्शित झाला होता . त्यामधे रॉबर्ट डी निरो या अभिनेत्याने मुख्य भुमिका केली होती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ग
गवि Tue, 01/13/2026 - 13:47 नवीन
+१ आणि त्याच्या पुढे : "इनके पीछे खंग" असे ती पोरे जोडतात. नेफा भागात खंग म्हणजे गेंडा असे असावे. - (फक्त) जुने(च) सर्व नीट आठवणारा गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ट
टर्मीनेटर Wed, 01/14/2026 - 03:44 नवीन
"इनके पीछे खंग"/ नेफा भागात खंग म्हणजे गेंडा असे असावे.
अच्छा 👍
(फक्त) जुने(च) सर्व नीट आठवणारा
मला पण हल्ली मिपावर आल्यावर खूप जुन्या जुन्या गोष्टी आठवतात आणि मन भूतकाळात रमते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टर्मीनेटर Tue, 01/13/2026 - 19:21 नवीन
क्या बात... धन्यवाद सिरुसेरी 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
B
Bhakti Tue, 01/06/2026 - 06:15 नवीन
एक प्रश्न आहे. व्हिक्टर वेगवेगळ्या मृत व्यक्तींचे वेगवेगळे अवयव घेऊन नवीन शरीर का बनवतो.एकच मृत शरीर का वापरत नाही?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 01/06/2026 - 09:04 नवीन
सतत प्रयोग करत राहून, चुकांपासून शिकत जाऊन वेगवेगळे सर्वोत्तम अवयव वापरुन एका जीवाची निर्मिती करण्याच्या वेडाने तो पछाडलेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
B
Bhakti Tue, 01/06/2026 - 10:08 नवीन
अच्छा +१
परंतु त्याच्यात जीव आल्यावर त्याच्या भयानक रुपामुळे व्हिक्टर त्याला स्वीकारत नाही आणि आपली निर्मिती नष्ट करण्यासाठी
आपल्याच निर्मितीला व्हिक्टर समजण्याआधी नाकारतो,इथेच शोकान्तिका सुरु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गवि Tue, 01/06/2026 - 07:06 नवीन
छान. वाचन ही उत्तम सवय. चित्रपट बरेच निघालेले दिसतात.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 01/07/2026 - 10:13 नवीन
मस्त परीचय!! चकटफु बघायला कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/08/2026 - 07:36 नवीन
बघतो आणि कळवतो. असे वेगवेगळ्या सिनेमांवर लिहिते राहा. पुलेशु. लिंक असल्यास लिंकवा. -दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/09/2026 - 07:55 नवीन
तर, चित्रपट आवडला. एका बापाकडून अपेक्षित प्रेम मिळालं नाही, असा व्हीक्टर आणि त्याच्याकडूनच आपल्या अहंकारासाठी एका 'अनाथ' अमानवी जीव तयार केला पण जेव्हा पालकत्वाची जवाबदारी येते तेव्हा पळ काढणारा व्हीक्टर आणि दोघांच्याही वाट्याला आलेली शोकांतिका अशा भावभावनांचा भन्नाट चित्रपट आहे. आवडला. जुने किल्ले, अंधार, वादळी हवामान, गूढ वातावरण आणि ती प्रेतं कराकरा कापणे. च्यायला, लै ताण झाला. पण पाहिला. सुंदर एलीझाबेथ सगळं भारी. नव्या तंत्रज्ञानाने माणूस एक नवा माणूस तयार करेल अगदी दुसरा माणूस पण आपण त्याला सांभाळू शकू का असाही एक विचार मनात आला. प्रेम, तिरस्कार, सूड या भावना त्या यंत्रात भरल्या नंतर तो माणूस म्हणून आपल्याशी कसा वागेल असा प्रश्नच हा चित्रपट आपल्यापुढे निर्माण करतो. डेल टारो भावभावनांची गुंतागुंत उभा करण्यात कमालीचा यशस्वी ठरला असे वाटले. वल्ली उर्फ प्रचेतस यांनी चांगला सिनेमा सुचवला समस्त मिपापरिवाराच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/09/2026 - 09:07 नवीन
पुष्पगुच्छ
स्पेलिंग चुकले काय ? पूस्प्गूच्च म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/09/2026 - 15:24 नवीन
मिपा भाषेत 'पूस्प्गूच्च' देण्यात येत आहे. बाकी स्वभावाचं उन्नीस बीस असू शकेल पण लेखन म्हणजे प्रचेतस यांचं नंबर एक असतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 08:03 नवीन
जुने किल्ले, अंधार, वादळी हवामान, गूढ वातावरण आणि ती प्रेतं कराकरा कापणे. च्यायला, लै ताण झाला.
खरं आहे 😀 'ती' दृष्ये बघण्याच्या आधी कत्तलखानाछाप परिसरातील व्हिक्टरचे घर, जनावरांच्या रक्ताने माखलेला रस्ता आणि आजुबाजुच्या दुकानांमध्ये कापुन टांगलेले जनावरांचे मांस अशा गोष्टी दाखवुन डेल टारो प्रेक्षकांच्या मनाची पुर्वतयारी करुन घेतो ह्यातुन त्याचे दिग्दर्शकीय कौशल्य देखील दिसुन येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/10/2026 - 08:38 नवीन
योग्य अमानवीय जीव तयार करायला योग्य माणसांची निवड करतांना भाजीपाल्यासारखं निरखून घेणे आणि खटाखट फासावर लटकावणे, तडफडायला लावणे लैच क्रूर. दिग्दर्शकीय कौशल्य खरंच कमाल आहे. आता संत तुकाराम वगैरे चित्रपट पाहणे आले त्याशिवाय या सिनेमाचे कोमल मनावर पडलेले ओरखडे जाणार नाहीत. वल्ली उर्फ प्रचेतस हळव्या मनाच्या माणसांचा विचार न करता सिनेमा बघायला लावतो. अशा सिनेमांची ओळख टाकताना, डिस्क्लेमवर वगैरे टाकायला पाहिजेत. दिवसेंदिवस लोक माणूसकी शुन्य होत चालले आहेत, संवेदना नावाची गोष्ट काही राहिलीच नाही. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ग
गवि Sat, 01/10/2026 - 09:09 नवीन
परखड प्रतिसाद आवडला. आपला मित्र असला म्हणून काय झाले? बीभत्स आणि अघोरी ते बीभत्स आणि अघोरीच. असते म्हणा एकेकाची आवड. बाकी स्वभाव बरा आहे याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस Sat, 01/10/2026 - 10:44 नवीन
तुम्ही दोघेही जीवश्चकंठश्च मित्र म्हणजे एकमेकांचे बहिश्चर प्राणच जणू. एक आला की दुसरा तिथे लगेच येतोच. त्यातही मिपावर इतकी वर्षे दोघेही मुरलेले असूनही दोघांच्याही मनात अजूनही कोमल भावना आहेत हे पाहून आनंद झाला. जय विरुनंतर तुम्ही दोघेच. तुम्हा दोघांचे हे अद्वैत मोठेविलक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 09:22 नवीन
आता संत तुकाराम वगैरे चित्रपट पाहणे आले त्याशिवाय या सिनेमाचे कोमल मनावर पडलेले ओरखडे जाणार नाहीत.
कोमल मनावर पडलेले ओरखडे घालवण्यासाठी मी "श्यामची आई" ११ वेळा बघायचा विचार करत होतो... त्यानेही हँगओव्हर नाही उतरला तर आता तुमच्या सुचवणीप्रमाणे 'सुधारित उतारा' म्हणुन 'संत तुकाराम' पण बघावा म्हणतो 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
B
Bhakti Sun, 01/11/2026 - 14:59 नवीन
द शेप ऑफ वॉटर पाहिले होते, आवडलेही होते.
या चित्रपटाविषयी खुप ऐकलं आहे.सापडत नाहीये. कोणत्या OTT वर आहे?
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 16:25 नवीन
कॉलेज जीवनात Frankenstein कादंबरी पहिल्यांदा वाचली होती, नंतर ही काही वेळा वाचण्यात आली. परीक्षा छान लिहिले आहे; सिनेमा पाहून पुन्हा इथे लिहीन. Frankenstein (2025)
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 01/22/2026 - 16:25 नवीन
Key Nominations for Frankenstein (2026 Oscars): Best Picture Best Adapted Screenplay: Guillermo del Toro Best Supporting Actor: Jacob Elordi (The Creature) Best Cinematography: Dan Laustsen Best Costume Design: Kate Hawley Best Makeup & Hairstyling Best Production Design: Tamara Deverell Best Sound Best Original Score: Alexandre Desplat
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा