जनातलं, मनातलं

इंदूर - छप्पन दुकान आणि सराफ्याची खाद्य भ्रमंती

Primary tabs

अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत. इथले सर्वाधिक खास म्हणजे विजय चाट हाऊस, जॉनी हॉट डॉग आणि बाबू नारियल क्रश.

a

वेगवेगळ्या स्टॉल्सवरुन खादाडीचे पदार्थ घेऊन निवांतपणे खाता यावेत म्हणून इकडे जागोजागी सीट आउट्स आहेत.

a

विजय चाट हाऊसचे सर्वच पदार्थ एकदम जबरदस्त. खोबरा पॅटिस इथला युएसपी. एकदम मऊसूत पॅटिसमध्ये खोबर्‍याचे सारण आणि आंबटगोड चटणी. एकदम सुख.

a

खोबरा पॅटिस

a

इथला साबुदाणावडा सुद्धा अशक्य भारी आहे. दही, फराळी चिवडा आणि चटणीसोबत तो देतात. आपल्याकडच्या साबुदाण्या वड्यापेक्षा सर्व्ह करण्याची वेगळी पद्धत पण चव जबरदस्त.

a

असेच सलग एका रांगेत छप्पन गाळे आहेत.

a

इथला फेमस बाबू नायियल क्रश. शहाळ्याचे पाणी आणि त्यातलीच मलई एकत्र करुन मिक्सरवर फिरवून ग्लासमध्ये देतात. एकदम मस्त.

a

दुपारचं खाणं असं छप्पनमधील विविध प्रकार खात खातच केलं. साबुदाणा वडा, खिचडी, भुट्टे का किस, गराडू ढोकळा, खोबरा पॅटिस, बास्केट चाट, पनीर टिक्का, मसाला सोडा, नारियक क्रश अर्थात सर्व डिश शेअर करतच खाव्या लागतात कारण सर्वच हवेहवेसे वाटते.

बाकी छप्पन तर फक्त ट्रेलर आहे. खरी मजा तर सराफ्यालाच येते. दिवसा सराफ बाजारात सगळी दुकाने आहेत ते सराफांची, मात्र जशीजशी ते रात्री साडेआठ नवाला बंद होऊ लागतात तसातसा सराफा विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सने फुलायला लागतो. रात्री दहाच्या आसपास जवळपास संपूर्ण सराफा हा पूर्णपणे सुरु होतो ते पार उत्तररात्री दोन तीन वाजेपर्यंत. रविवारच्या दिवशी मात्र दागिन्यांची दुकाने बंद असल्याने संध्याकाळी सहापासूनच सराफा फुलायला लागतो. आणि गेलो तो रविवारच होता आणि राती साडेनऊला पोचलो असल्याने सर्व स्टॉल्स उघडले होते आणि प्रचंड गर्दी होती. येथे एक मात्र सांगणे आवश्यक. सराफा हा जुन्या इंदूरात ऐन बाजारात असल्याने येथे स्वतःची गाडी घेऊन येऊ नये. इंदूरातल्या कुठल्याही कोपर्‍यातून येथे येण्यासाठी व रात्री कितीही उशिरा जाण्यासाठी येथे रिक्षा उपलब्ध असतात. आम्ही देखील कार जिंजरवर ठेवूनच रिक्षाने सराफ्यात आलो. सराफ्यातल्या दुकानदारांप्रमाणेच येथले रिक्षावालेही अगदी हसतमुख आहेत.

रिक्षाने आम्हाला होळकर राजवाड्यापाशी सोडलं. राजवाडा असा झगमगत होता.

a

राजवाड्याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडे पुढे जाताच सराफ्याच्या गल्लीची सुरुवात होते.

a

a

आतमध्ये प्रवेश करताच की एकदम स्वर्गच, दोन्ही बाजूंना विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स

a

a

इथले प्रमुख आकर्षण म्हणजे जोशी दही बडा हाऊस. प्लेटमधला दहीवडा हवेत उंच उडवून परत प्लेट्मध्ये झेलणारे आणि एकाच चिमटीतून सैंधव, काळी मिरी, चाट मसाला आणि जीरावम दहिवड्यावर खुबीने पेरणारे जोशीबुवा इथली खासियत. आम्ही गेलो तेव्हा जोशी नेमके तिथे नव्हते, सराफा मनसोक्त खादाडून परत येतांना त्यांचे दर्शन झाले. , त्यांचा मुलगा तेव्हा दुकानावर होता.

a

अफलातून चवीचा दहीबडा

a

थोडं पुढं गेल्यावर कुल्फीच्या दोन स्टॉल्सवर सोन्याचे प्रचंड दागिने घालून हसतमुखाने स्वागत करणारे दोन भाऊ आपल्या दिसतात. येथे आपल्याला सोन्याचा वर्ख लावलेली कुल्फी देखील ३०० रुपयात मिळते. इतर कुल्फ्या अगदी २०/३० रुपयांपासून मिळतात.

a

a

गराडू हे येथले अजून एक आकर्षण. एक प्रकारचे कंदमूळ आहे. आधी ते वाफवून घेतात आणि तेलात तळून त्यावर लिंबू आणि एक प्रकारचा विशिष्ट मसाला पेरुन एकदम गरमागरम खायला देतात. छप्पनमधल्या गराडूपेक्षा इथला गराडू शतपटीने भारी.

a

a

a

सराफ्यात खाद्यपदार्थांची प्रचंड विविधता आहे. अगदी चायनीज पासून मोमोज पर्यंत, पावभाजी पासून पिझ्झ्यापर्यंत विविध स्टॉल्स आहेत. इतके सर्वच खाणे शक्य नाही पण नुसते पाहण्यास तरी काय हरकत आहे. आणि तुम्ही येथे खात नसलात तरी दुकानदार खडूसपणाने बघत नाहीत, उलट खाऊ नका पण आमचे फोटो बिंधास्त काढा म्हणत असतात.

हा मोमोजचा स्टॉल

a

चाट

a

दहिवडा

a

डेझर्ट्स

a

ही १२ चवींची पाणीपुरी एकदम भन्नाट. त्यातही हिंग लसूण, हाजमा हजम आणि पायनापल स्वाद तर एकदम भारी. १२ चवींची पाणीपुरी खाताना मात्र शेयर करुन खाऊ नये कारण वेगवेगळे स्वाद मिस होऊ शकतात आणि त्यातही सराफ्यातले प्रमुख पदार्थ खाल्यावरच पाणीपुरीस हात घालावा कारण ह्या बारा पुर्‍या गप्पकन पोटात बसतात.

a

गराडूप्रमाणेच भुट्टे का किस येथले अजून एक आकर्षण. मक्याचे दाणे किसून आणि वाफवून मसाला टाकून देतात.

a

अग्रवालची मिठाई म्हणजे एकदम भारी. राजभोग, गुलाबजाम, कलाकंद, रसमलई, रबडी, मालपुवा, काय नाही ते विचारा.

a

a

a

रबडी तर अशी घट्ट, सायीचा प्रचंड दाट थर असलेली.

a

a

येथली जिलेबी पण लै भारी. जवळपास ७०० ग्रॅम असलेली एकच भलीमोठी जिलबी मागणीनुसार तळून देतात. सोबत असतात ते मालपुवे.

a

a

आता इतकं खाल्ल्यावर नवीनचं कोकोनट क्रश हवंच, छप्पनमधल्या बाबूपे़क्षाही नवीनचा नारियल क्रश जगात भारी. येथे एक अ‍ॅडिशन म्हणजे नारियल क्रशमध्ये नवीन वरतून पुन्हा शहाळ्याची कोवळी मलई टाकतो, त्याने तर अजूनच भारी चव येते.

a

सगळं खाऊन पचवायला इथे पानांचे देखील विविध प्रकार आहे. साध्या पानापासून चॉकलेट पानापर्यंत, बनारस पासून कलकत्त्यापर्यंत, स्मोक पानापासून फायर पानापर्यंत.

a

शेवटी काय, खायची कितीही इच्छा असली तरी पोट तर भरतं पण मन मात्र भरत नाही. सराफ्याला किमान दोन रात्री तरी हव्यात. शिवाय सगळे पदार्थ शेयर करुनच खावेत त्यामुळे येथली चव तर कळतेच आणि वैविध्यही अनुभवास येते.

खरंच पृथ्वीवरील स्वर्ग आहे हा सराफा म्हणजे आणि तेथील खाद्य म्हणजे स्वर्गसुखाची परमावधी.

सध्या तरी इतकाच प्रतिसाद...

जाता जाता,

पुणे आता परिघा बाहेर गेलेले खेडेगाव आहे, हे परत एकदा जाणवले...

तोंपासु!!
प्रचेतस शैली पेक्षा वेगळाच लेख. फोटो पाहुन जळजळ झाली :)

ईंदुर च्या या सराफ्याची महती बरीच ऐकुन आहे. एकदा जायलाच हवे. बकेट लिस्ट मध्ये अ‍ॅडवतो.

मज्जा मज्जा नी नूसती मज्जा. छप्पन दुकानांना एकदा जाऊन आलोय परत एकदा जायचंय. सराफाही गाठायचाय.

गवि

या ठिकाणी गेलो होतो. इतके काही खास वेगळे वाटले नाही. वर उल्लेख केलेल्यातले अनेक पदार्थ टेस्ट केले होते. अर्थात व्यक्तीसापेक्ष आवड निवड बदलते हे खरे. शिवाय कोणत्या वेळी तिथे जातो, सिझन, तापमान, कितपत भूक लागली आहे , कितपत हाईप ऐकून आलो आहे, यावर देखील मते बनतात.

पदार्थ वाईट नव्हते पण सामान्य वाटले होते. एक अत्यंत इरीटेटिंग प्रकार म्हणजे बहुतांश पदार्थ, मग ते कोणत्याही टेक्सचरचे का असेनात, ते खायला आईस्क्रीमचा लहान लाकडी चपटा चमचा असतो तो देतात. अगदी साबुदाणा खिचडीसाठी पण.

इंदूरची स्वच्छता मात्र खूप आवडली. लेख फोटो छान रे प्रचु.

बाजरीची भाकरी आणी हि मि चा ठेचा व ताक खाल्ल्या,पिल्या नंतर लेख वाचतो आहे.

कायप्पावर स्टेटस बघितल्यावर कल्पना आली होती.

सर्व वाचकांना नम्र सुचना, भुकेल्या पोटी हा लेख वाचून नये. वाचल्यास होणाऱ्या जळजळी करता लेखक जबाबदार नाही.

Trump

धन्यवाद श्री प्रचतेस. नवीन माहिती मिळाली.
सदर पदार्थ जीभेसाठी चांगले असते तरी शरीरासाठी चांगले असतील असे वाटत नाही.

कंजूस

हे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात ही गम्मत.

अरे वाह! मस्त ठिकाणे आहेत खादाडीसाठी.
इंदूर ला जाणं झालं तर छप्पन ची भेट आता नक्की, ते जरा सुटसुटीत दिसतंय.

मस्त वर्णन आणि फोटो पण. बकेट लिस्ट मध्ये आहेच आता अंडकरलाईन करून ठेवलं.

कंजूस

विशेष म्हणजे छप्पन दुकान दिवसभर सुरू झाले. सराफा रात्री नऊनंतर फक्त.
१)खोबरा पॅटीस - खोबरे, किशमिश भरलेली बटाट्याची कचोरी. आम्ही करतो. नेरळ स्टेशन टॅक्सी स्टँडजवळ देसाई हाटेलमध्ये संकष्टीला मिळते.
२)गराडु - रताळ्यासारखे दिसणारे मूळ. गोड नसते. यात पांढरा आणि जांभळा गर असे दोन प्रकार असतात. शिवाय चिकट आणि कणीदार यापैकी कणीदार चांगले लागते. उकडून तुकडे करून चाट मसाला टाकून खाता येते. कोकणात यास कोनफळ म्हणतात. मार्चमध्ये जमिनीत लावतात. ओक्टोबर नोव्हेंबर मध्ये वेल उपटल्यावर खाली मोठी कोनफळं दिसतात. दिवाळीनंतर बाजारात विकायला येतात. गुजराती उंधियोतील मुख्य पदार्थ. मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे भाजी मार्केटमध्ये आता ढिगाने मिळतील. नवरात्रीच्यानंतर एकूण आठ प्रकारची कंदमुळे मिळू लागतात त्यात कोनफळ सर्वात उत्तम. बाल्कनीत कुंडीत ही वाढवता येतात.
३) पाणीपुरी- याबद्दल मुंबईत भरपूर प्रकार मिळतात.
४) दुधाचे पदार्थ मावा,रबडी,पेढे वगैरे - गुजरात, राजस्थान आणि ओडिशा प्रसिद्ध.
५) नारळ आणि शहाळी- ओडिशात भुवनेश्वर आणि पुरी येथे दहा पंधरा रुपयांत चौकाचौकांत सायकलवर विकत मिळतात.
६)भुट्टे का कीस - म्हणजे मक्याच्या कणसातील मक्याच्या सांजा. पण पांढरा मका जाऊन गोड मका ( स्वीट कॉर्न) फार येऊ लागला आणि गंमत संपली.
७) जोशी बडेवाले - याचा मालक कधीकधी बसतो तेव्हा तो बडा प्लेट कशी सजवतो हे पाहण्यासारखे आहे. ( यूट्यूब विडिओ आहेत).
८) फायर स्मोक पान - ही एक तरुणांसाठी गंमत आहे. (यूट्यूब विडिओ). चॅलेंज
९) सोडा - एका दमात ग्लासभर सोडा पिणे.(यूट्यूब विडिओ).चॅलेंज

Bhakti

मस्तच प्रतिसाद!

थोडक्यात काय, तुझं आहे तुझपाशी मग तू इंदूर ला कशास जाशी.

इंदूर ला जाणार्‍यांसाठी हा लेख म्हणजे, चला, आटपा, निघा लौकर असा पाठीमागे लकडा लावणारा ठरेल. तोंपासु!
एक बार देखा (चखा) है, एक और बार देखने (चखने) की तमन्ना है असंच झालं मला लेख वाचून. :)

सं - दी - प

Bhakti

तोंपासू लेख, भटकंती!
दुपारीच प्रतिसाद दिला असता तर नक्कीच संध्याकाळी पाणीपुरी खाल्ली असती ;)

खल्लास!! कधी छप्पन आणि सराफाला जातोय असं झालंय. किमती साधारण आहेत का महाग वाटल्या नेहमीच्या स्टॉल्सपेक्षा?

प्रचेतस

नेहमीच्या स्टॉल्सइतकेच दर आहेत. ५/१० रु मागेपुढे. आम्हा तिघा मित्रांचे मिळून ७३५ रू झाले.

गोरगावलेकर

फोटो आणि लेख दोन्हीही आवडले. आता जायलाच हवे एकदा चव चाखायला

विजुभाऊ

इंदूर म्हणजे शाकाहारी खवय्यांसाठी झकास जागा.
छप्पन दुकान हा भाग आता बराच बदलला आहे. तेथे पूर्वी छोटी छोटी दुकाने होती. त्यांच्या संख्येवरून छप्पन दुकान हे नाव पडले.
इंदुरात तुम्ही शिकंजी खाउन पहा. ( रबडीची बहीण असते ही)
इंदुरात सर्राफ्यातले पोहे लाजवाब असतात.
समोसा , खस्ता कचोरी तर विचारूच नका.
सकाळी सकाळी लोकाना पोहे खाऊन झाल्यावर दूध आणि जलेबी हे पदार्थ तर हवेतच

प्रचेतस

जास्त गोड नको म्हणून शिकंजी पिणे टाळले. बाकी पोहे तर जागोजागी आहेत. अगदी १० रुपयांपासून मिळतात.

कंजूस

इंदोर, उज्जैन भाग मुंबई -पुणे कडून रेल्वेने जायचे झाल्यास प्रथम खांडवा येथे उतरून ओंकारेश्वरला जाणे. (खांडवा इंदोर मीटर गेज सध्या नाही. पण पूर्वी पंजाब मेलला जोडून एक गाडी थांबलेली असे.) ओंकारेश्वरला दर्शन करून माहेश्वरला (४०)जाऊन मुक्काम करणे. तिथून मांडू (४०)एक मुक्काम. तिथून इंदोर (८०) एक मुक्काम. तिथून उज्जैन(५०) एक मुक्काम. तिथून रेल्वेने परत. असा प्लान सोपा पडतो. सावकाश शहरे पाहून होतात.
इंदोरला राहून १)ओंकारेश्वर माहेश्वर, २)मांडू धार, ३)उज्जैन अशा मात्र वाहनाने करतात ते फार उडत उडत आणि वेळखाऊ असते. टॅक्सी, बोटवाले आणि पुजारी लुटायला बघतात. सगळं फिक्सिंग असतं.
(एक सुचवली. सर्वांनी असंच करावं असा आग्रह नाही.)

प्रचेतस

आम्ही कारने गेल्यामुळे पुढिलप्रमाणे प्लान केला होता.

दिवस ०- पुण्यातून संध्याकाळी पाचला निघून रात्री 2 च्या आसपास मध्य प्रदेशात प्रवेश करून एका ढाब्यापाशी कार पार्क करून गाडीतच थोडी विश्रांती घेतली.

दिवस १- पहाटे पाचला निघून सात वाजेपर्यंत मांडवला पोहोचलो. भल्या सकाळी सोनगड किल्ला पाहून हॉटेल जहाजमहालला रूम ताब्यात घेऊन दोन तास आराम केला. हॉटेल अगदी तळ्याच्या काठाशी आणि निसर्गरम्य आहे, मोठ्या खोल्या. साडेदहाला बाहेर पडून स्थानिक गाईड घेऊन रूपमती महाल, बाजबहादूर पॅलेस, जामी मशीद, अश्रफी महाल, श्रीराम मंदिर, होशंगशाह मकबरा, जहाज महाल, हिंदोळा महाल, जल महाल, लोहानी गुंफा इत्यादी आकर्षणे बघून हॉटेलवर परत, रात्री जेवायला दादाजी मध्ये अप्रतिम दाल बाफले आणि दाल पानिये

दिवस २ - सकाळी ९ वाजता निघून साडेदहाच्या आसपास इंदूरास हॉटेल जिंजर येथे आगमन. बिझनेस क्लास हॉटेल असल्याने रूम लहान आहेत. दुपारी छप्पन दुकानला खादाडी आणि तिथून जवळच अपना स्वीट्समधून खरेदी. संध्याकाळी एबी रोडवर जरा भटकून रात्री ९ च्या आसपास सराफ्याला गेलो. येथे रिक्षानेच जावे. स्वतःची गाडी असल्यास येथे आणू नये, पार्किंग नाही. रात्री बाराच्या पुढे परत हॉटेलवर.

दिवस ३ - सकाळी निवांत उठून दुपारी बाराच्या आसपास उज्जैन गाठले. वाहनतळावर गाडी लावून २५० रु चा व्हिआयपी पास काढून पंधरा वीस मिनिटात महाकालाचे दर्शन झाले. जेवण करून इ बाईक रिक्षाने कालभैरव, गंडकालिका, संदीपनी आश्रम, मंगळग्रहमंदिर आणि सिद्धवट पाच ठिकाणे फिरवतात. जुनी बांधकामे लोप पावल्याने सगळीकडे आधुनिक सिमेंटचे बांधकामच दिसते. येथे न गेल्यासही फारसा फरक पडत नाही किंवा बघायचे राहिले याची चुटपुट लागत नाही. माणशी १०० ते १५० रु घेतात ठिकाणे दाखवायचे. वाहनतळावर संध्याकाळी परत येऊन मात्र महाकाल मंदिरानजीकचा महाकाल लोक कॉरिडॉर बघणे अवश्य. दिवसापेक्षा रात्री त्याचे सौंदर्य अधिक. ८ वाजता निघून नऊच्या आसपास परत इंदूरला पोहोचलो. सराफ्यात न जाता बापू की कुटिया मध्ये जेवण केले. जेवण एकदम रुचकर आहे.

दिवस ४ - सकाळी आठ वाजता ओंकारेश्वरसाठी निघालो. रस्ता बराच खराब आहे, शिवाय चार लेनचे बांधकाम सुरू असल्याने डायव्हर्जन्स आहेत. दोन तास लागतात. एकदम बाजारू तीर्थक्षेत्र आहे. १२:१५ ला मंदिर तासभर आरतीसाठी बंद राहते त्यामुळे खूप गर्दी होते, ३०० रु चा व्हिआयपी पास काढूनही पाऊण तास लाईनीत उभे राहावे लागले. मात्र मंदिर बंद व्हायच्या दर्शन झाले. उज्जैनला महाकालासाठी दर्शनाचे नियोजन उत्तम तर ओंकारेश्वरला नुसता केओस आहे. ओंकारेश्वर करून तीनच्या आसपास महेश्वरला पोहोचलो. अतिशय उत्तम. निवांत शहर. नर्मदेचे सुरेख पात्र आणि काठावरील मंदिरे. अहिल्याबाईंचा राजवाडा, तसेच इतर मंदिरे पाहिली, थोडं गावात भटकून परत संध्याकाळी नर्मदेच्या घाटावर आलो. अंधार झाल्यावर लोक नर्मदेत दिवे सोडतात, सुंदर दृश्य आहे ते. साडेसातच्या आसपास महेश्वर सोडून साडेदहाला धुळ्यात पोहोचलो. हायवेवर टॉपलाईन रिसॉर्टवर रात्रीचा मुक्काम.

दिवस ५ - सकाळी साडेसातला धुळे सोडले. साधारण ३० किमी अंतरावर हायवेवरच झोडगे गावी माणकेश्वर महादेवाचे भूमिज शैलीतले शिल्पसमृद्ध देवालय आहे. ते पाहून लासलगाव,विंचूर फाटा, नांदूरमध्यमेश्वर मार्गे सिन्नरला गोंदेश्वर मंदिर पाहिले. आणि वाटेत जेवण करून संध्याकाळी साडेपाच वाजेतो पुण्यात परत.

सगळा प्लान व्यवस्थित आखल्यामुळे कुठेही उलटसुलट जावे लागले नाही. कमी वेळात सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहून झाली.

कंजूस

तुमचं स्वतःचं वाहन असल्याने शक्य झाले. मात्र भाड्याचे वाहन महागात पडते.

इतकं फिरून, इतकं पाहून पाचव्या दिवशी पुण्यात परत, म्हणजे अगदी काटेकोर नियोजन झाले.

सहमत आहे. इंदोरातून सुरू करनार असाल तर पुढील प्रमाणे करावे. पहाटे पहाटे कारने इंदोरहून निघून सरळ ओंकारेश्वर गाठावं. ओंकारेश्वर मोठं आहे नी बेट पुर्ण पाहनार असाल तर दिवस जाईल, दोनेक तासात ओंकारेश्वर आटोपून बाजूलाच बाजिराव पेशवे समाधी (३०किमी) पहावी. मस्त दुपारी कडक ऊन्हात नर्मदा नदी नी समाधी पाहण्यात मजा येते. तिकडून तडक निघून तास दिड तासात महेश्वर पोहोचावे. दुपारी तीन नंतर सुंदर दिसतो घाट. महेश्वरात पायपीट बरीच होते. मूक्काम करून सकाळी मांडू, धारचा किल्ला नी मग इंदोर परत. ऊज्जैन मध्ये महाकाल मंदीर नी कालभैरव करावे. वाटल्यास जवळच देवासच्या च्या टेकडीवरील देवीही करावी.
ह्या सर्व प्रवासात गर्दी वीरहीत बाजीराव पेशवे समाधी खुप लक्षात राहील. मी ह्यावर्षी जानेवारीत गेलो होतो. समाधी पासून समांतर अंतरावर नदीत एक चौथरा आहे त्यावर महादेवाची पिंड आहे. तो चौथरा कसला हे कळाले नाही नावीक बोलला का घोड्याची समाधी आहे.

Nitin Palkar

सुंदर लेख.. आणि त्याहीपेक्षा सुंदर प्र. चि.
_/\_

कंजूस

सराफा बाजार हे केवळ खादाडी नसून गंमत करण्याची जागा.

विडिओतील मैथिली, रिषभ ,अयाचि ठाकूर ही प्रसिद्ध गाणारी मंडळी आहेत.
https://youtu.be/Xj4OnvQMNyE?si=p8lASSPro2ohO31s

टर्मीनेटर

लेख वाचल्यावर सराफावरुन "तेरा सराफा ऐसा हैं..." हे गाणं आठवले 😍

काय ते एक एक पदार्थ... वाह!
इंदोरला दोन वेळा गेलो आहे (एकदा कामासाठी तर एकदा आमच्या सारख्या 'भोगी' लोकांची झटपट नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 😉) पण हा सराफा आणि अब तक 'छप्पन' वगैरे बघितले नाहिये. आता सराफ्यातल्या खादाडीसाठी एकदा खास तिथे जावे लागणार!

गवि

आज सराफ्यात आहे. लेखातील सर्व पापे एकामागून एक करण्याचा बेत आहे. तूर्त जोशीबुवाच तेवढे उघडे दिसत आहेत. (म्हणजे त्यांचे दुकान). त्यातून आतापर्यंत खालील टेस्टिंग पूर्ण:

दही वडा: चांगला. गोड लस्सीत वडा घालतात तसे नसल्याने आणि वरती मसाले असल्याने चांगला वाटला. हवेत उडवून दिला नाही. तरुण मुलगा होता. फक्त कॅश घेतात. UPI किंवा अन्य काही नाही.

तिथेच खोबरे पॅटीस: ठीक. एक कसातरी संपवला.

त्यांच्याकडेच मक्याचा कीस. उत्तम होता. आणखी पुन्हा एकदा नंतर घेतल्या जाईल. जोशींचा बुट्टे का खीस तसा फेमस नाहीये पण तरी तो आवडला. इतर ठिकाणी अधिक चांगलाही असू शकेल.

गराडूचे दर्शन अद्याप झाले नाही. गल्ल्या आत्ता रिकाम्याच दिसत आहेत. त्या इतक्या लहान आहेत की यात रात्री दुकाने नेमकी कुठे आणि कशी लावणार आणि चालायला जागा कशी उरणार हा विचार मनात येतो आहे.

इतर काही फारसे दुपारी चालू नाही.

प्रचेतस

दागिन्यांची दुकाने बंद झाली की रात्री सराफा खुलतो, आज रविवार, ती दुकाने बंद त्यामुळे आज सराफा ६ वाजल्यापासून सुरु होईल. जोशी दहीबडा, नागौरी शिकंजी, राजहंस, विजय चाट, स्वादिष्ट समोसा वगैरे पक्की दुकाने आहेत त्यामुळे ती दिवसादेखील चालू असतात. १२ फ्लेवर पाणीपुरी खाऊ नका, पटकन पोट भरुन इतर काही खायला जागा राहणार नाही. खोबरा पॅटिस विजयकडेच खावा.
टिपः एकटेच फुल डिश खात बसू नका, प्रत्येक डिश मैत्रिणीसोबत शेयर करुन खावा. खुमारी वाढेल.

गवि

धन्यवाद.

टिप बद्दल थॅन्क्स बट नो थॅन्क्स.. तुमच्यासारखे आमचे नसते. तुमचे म्हणजे जिकडे तिकडे मैत्रिणी आणि बाईक, घाट, पाऊस... इत्यादि. तर ते असो.

गविजी,
तुमचे मग असते कसे?
म्हणजे गर्द धुके, सुरुची झाडे, गवतावरून इकडून तिकडे पळणे, बंद गळ्याचा स्वेटर आणि हातात डफ, हॅमोकवर डोळ्यावर पुस्तक ठेवून झोपणे आणि ते मैत्रिणीने उडवणे, अचानक चारी बाजूंनी एकाच रंगाचे परकर पोलके घालून डोक्यावर फुलमाळेत गुंडाळून तिरका बुचडा बांधलेल्या ललना कंबर हलवत घोळक्याने नाचायला येणे, मैत्रिणीच्या पायलयुक्त गोऱ्या पाय पिंडऱ्यावर गवतफूल फिरवणे, किंवा एखाद्या गवत रचून ठेवलेल्या बार्न वरती एका रात्री अडकून पडल्यावर अंगातले जैकेट काढून मैत्रिणीला देणे ??? की आपले थेट स्विट्झरलॅण्ड?

कसे असते तुमचे गविजी मग?

गवि

हे राम. नाही हो. यश राज किंवा धर्मा समजलात की काय आमचे आयुष्य ?
आम्ही आपले फॅमिलीसकट गर्दीतून वाट काढत जिथे उभे राहायला जागा मिळेल तिथे, एकत्र येण्यास गर्दीने परवानगी दिल्यास ज्याला जे जमेल ते आणि जमेल तेवढा तुकडा त्या कॉमन प्लेटमधून टेस्ट करणे आणि ते पटापट संपवून पुढील भोज्यास शिवणे असे असते. (किमान सराफा येथील रूटीन). वल्ली मात्र थेट सेक्रेटरीसोबत जणू कॅन्डल लाईट डिनर सेट करून ठेवले आहे अशा थाटात बोलतो.

>>> लेखातील सर्व पापे एकामागून एक करण्याचा बेत आहे.

धर्मशास्त्रानुसार पापे केली की नरक नावाच्या व्यवस्थेत धाडले जाते आणि तिकडे यथेच्छ पाहुनचार होतो अशी प्राचीन समजूत आहे. पण कबूली दिल्यामुळेही पापांपासून सुटका होते असे म्हणतात. आपल्या वरील खाद्य आवडी पाहता देव सुद्धा म्हणेल जा गवि जा, जी ले अपनी जींदगी.

बाय द वे सराफ्यात गेलो की आणि हे की ते खावे अशा भानगडीत पोट लवकर भरतं. फक्त थोडं थोडं test करावा तर संयम ठेवता येत नाही. सराफ्यात दोन-चार दिवस निवांत हवेत. पहिल्या दिवशी अवलोकन आणि किंचित चव तपासणी दूसरे आणि तिस-यादिवशी निवड करुन हादडणे. निवासाची व्यवस्था तिथे जवळच हवी. तासाभरात येता-जाता आलं पाहिजे तेव्हा खाऊगल्लीला न्याय देता येईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

गवि

बाय द वे सराफ्यात गेलो की आणि हे की ते खावे अशा भानगडीत पोट लवकर भरतं. फक्त थोडं थोडं test करावा तर संयम ठेवता येत नाही.

हीच समस्या आली.

रात्री आणखी एक राऊंड मारून तीन तासात खादाडी आणि राजवाडा असे पार पडले.

गराडू उत्तम
जोशी दही वडा यांच्याच थोडे पुढे गोल्ड मॅन नेमा कुल्फी. सामान्य. काही वेगळे खास नाही. ठीकठाक.

विजय बाटला कचोरी ठीक

विजय समोसा हाही बरा. पण श्री प्रचेतस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यात मटार सारण नव्हते. बटाटाच होता.

पोलिस स्टेशन नजीकच्या मिष्टान्न भंडारात मालपुवा रबडी. सामान्य. अगोदर याहून कुरकुरीत गरम माल्पोवा खाल्ला आहे.

सकाळी राजवाड्याच्या जवळ प्रशांत पोहा येथे मात्र सर्वच चविष्ट. साधे पोहे, उसळ पोहे, साबुदाणा खिचडी, कचोरी दोन प्रकार. अगदी चहा सुद्धा. तिथे मराठी लोकांनी एकमेकांशी मराठीत बोलावे अशी पाटी होती.

आता आज रात्री काय काय उरले आहे ते पाहणार. (खाणार). तीन लोक एकत्र असल्याने सँपल बेसिसवर बरेच पदार्थ थोडे थोडे चाखता येत आहेत. एकटा मनुष्य असला तर जमणे अवघड.

युयुत्सु

इंदूरी साबुदाणा खिचडी ही त्या 'पवित्र आणि मंगल" पदार्थाची चेष्टा आहे.

प्रचेतस

समोसा, कचोरी विजयची नव्हे तर स्वादिष्टची खावा म्हणालो होतो भो :)
पोहे इंदूरात सर्वत्र मिळतात, मात्र त्यावर रतलामी शेव वगैरे जामानिमा आवडत नाही. साबुदाणा खिचडीत सुद्धा फराळी शेव असते आणि खिचडी तेलकट/तूपकट असते.

गणामास्तर

साबुदाणा खिचडी फक्त द्रुतगती मार्गावरचे वरचे श्री दत्त स्नॅक्स आणि चिंचवडातले गुपचूप काका हेच लोक चांगली देतात.
बाकी सराफा आणि छप्पन वगैरे ठीक ठाक जागा आहेत.
मिठाया चाखायची विशेषतः दुग्धजन्य पदार्थ कुठेही खायची हिम्मत आता उरली नाही.

प्रचेतस

दत्तची परवाच खाल्ली, आणि नेहमीच खातो, मस्तच आहे. गुपचूप काकांनी मात्र लाल तिखटाची खिचडी बनवणे आता बंद केलेय त्यामुळे आधीचा चार्म गेलाय. करमरकर पण चांगली खिचडी देतो.

मस्त लेख. हा लेख कसा बघितला नव्हता काय माहीत. मूळ लेख लिहिला होता डिसेंबर २०२३ मध्ये. त्याच्या दोन महिने आधी- म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये आम्ही सराफा आणि छप्पन ही दोन्ही ठिकाणे बघितली होती. खाण्यासाठी खूप काही आहे पण आपली भूक मर्यादितच असते. असे जाणविले की तिथे तरूण असतानाच जायला पाहिजे होते म्हणजे भरपूर खाता आले असते.

प्रचेतस

सराफ्याला दोन तीन दिवस तरी हवेतच. शक्यतो तिथले खास स्थानिक पदार्थच चाखले पाहिजेत. हल्ली तिकडे पिझ्झा, कुलचा पराठे ह्यांचेही विचित्र फ्युजन मिळतात ते टाळले पाहिजेत.

कंजूस

काय कुठे खावे यांचे युट्यूब चानेल सुरू करा. गाडी तिकडेच लावा हेलमेटसह.. शिवाय मोटो वीलॉगसुद्धा त्यातच.

छप्पन भोग मला तितके आवडले नाही, पण सराफ्याला मागील ६ महिन्यात दोनदा जाऊन आलो, सराफ्याला सरळ जाऊ नये, दुपारी ४ वाजता इंदौरचा राजवाडा पहावा ६ ला पोहोचले तर राजवाड्या समोर फोटो घेऊन राजवाड्याकडे पाठ करून डावी बाजू पकडून शॉपिंग करत सुटावे ते सरळ जाऊन उजवीकडे वळून पुनः उजवीकडे येऊन u टर्न पूर्ण करावा, ८ वाजेपर्यंत राजवाड्याच्या आजूबाजूला कपड्यांची शॉपिंग करावी, ८ वाजल्यावर राजवाड्याच्या डाव्या बाजूने सराफ्याकडे जायला निघावे, ५०-७० मीटरवर डाव्या हाताला एक मंदिर आहे- गोपाळ मंदिर तिथे जाऊन दर्शन घ्यावे नि ते सुंदर मंदिर निरखून थोड्यावेळ तिथे बसावे. अतिशय प्रसन्न वाटते! तोपर्यंत ८:३० झालेले असतील मग सराफ्यात घुसावे, वर सांगितलेले सगळे पदार्थ ट्राय मारावेत. मालपुवा विद रबडी आवर्जून ट्राइ करावा (मी खूप आधी ट्राय केला होता) , कोकोनट क्रश, भुत्ते का किस, गराडू हे अनेकांना आवडणार नाहीत पण ट्राय मारावेच! सोने घातलेल्या कुल्फी वाल्यांकडे जास्त गप्पा मारू नयेत कुल्फी खायची असेल तरच जावेत नाहीतर बळजबरी कुल्फी गळ्यात मारतात. :)

मदनबाण

इतक्या वेळी इंदुरात जाऊन देखील सराफ्याला जाणे झालेले नाही, याचे किती दु:ख असावे मला!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack

Bhakti

असे धागे वर काढू नये ,आपलं आपलं गुपचूप खादाडी करून यावी.
एक मुलगी डाएटवर आहे....

दुपारी गेलो होतो. त्यावेळी उघड्या असलेल्या कचोरी /दहीवड्याच्या दुकानातील (नाव आठवत नाही) अस्वच्छता पाहून इतकी किळस वाटली होती की काही खावेसे वाटले तर नाहीच पण रात्री पुन्हा तिथे जावेसेही वाटले नाही. असो..पसंद अपनी अपनी

इंदूर कमालीचे स्वच्छ शहर आहे आणि भारतात अशी स्वच्छता असू शकते यावर सुरुवातीला विश्वास बसत नाही. तरीही एवढे सर्व लोक सांगताहेत म्हणजे कुछ तो होगा तिथे.

गवि

रस्त्यात केर कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या यांचे ढीग पडलेले असणे या बाबतीत इंदूर अवश्य स्वच्छ आहे. व्यवस्था उत्तम आहे. पण हॉटेलच्या आत आणि समोर मात्र अत्यंत कळकट आहे सर्वत्र. डोळे मिटून खायचे.

गवि

खरकटे, सांडपाणी, रस्त्यावरचे उष्ट्याचे ओघळ इत्यादि गोष्टी बहुधा कचरा किंवा अस्वच्छ या सदरात मोडत नसावेत. ते तर बायो डिग्रेडेबल, कंपोस्ट.

:-)

पण घन कचरा व्यवस्थापन, विशेषतः प्लास्टिक कचरा .. याबाबत इंदूरची प्रगती निर्विवाद आहे आणि कौतुकास्पद. वेळोवेळी कचरा उचलणे, रिसायकल, जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या उपलब्ध. सर्व चोख आहे. कुठेही ढीग साठलेले सापडत नाहीत. हे सराफा सोडून बाकीच्या आधुनिक इंदूर शहरात अधिक लागू.

प्रचेतस

सराफा रात्री दोनच्या पुढे बंद झाला की हे सगळे उष्टे खरकटे उचलले जाऊन ओघळ साफ केल्या जाऊन दागिन्यांची दुकाने उघडायला तयार होतात.

कंजूस

इंदुर सरवटे बस स्टँड किंवा उज्जैनमधलेही स्टँड हे कचरा डेपो आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस ऊर्फ एसटी केव्हाच बंद केली आणि तो धंदा { योग्य} व्यक्तिंना आंदण दिला. परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.

परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.

सहमत. २००१ च्या सुमारा बंगळुरात होतो तेव्हा तेथील एस.टी सेवा अगदीच मोडकळीस आलेली होती. बस स्टँड वगैरे अगदी गलिच्छ प्रकारात मोडत असत. तेव्हा हटकुन महाराष्ट्रातील एस.टी सेवेशी तुलना होत असे. पण पुढे दहा वर्षांनंतर पूर्ण कायापालट झाला.आज महाराष्ट्र बस सेवा जवळपास नसल्यात जमा आहे. मध्यप्रदेशात देखील हीच बोंब आहे. एस.टी सेवा पूर्णपणे नाहीशी झालेली आहे.

ठिकाणे नोंद करून ठेवली आहेत आणि सर्व सूचना देखील.

कधीतरी चान्स येईल तेव्हा गोंधळ व्हायला नको.

मध्यप्रदेश एकूणच खूप इंट्रेस्टिंग प्रकरण आहे..

इंदूरात मराठी किती बोलतात याची उत्सुकता होती.

कंजूस

हे सर्व पदार्थ राजस्थानी लोक अधिक चांगले बनवतात यावर मी ठाम आहे.
माहेश्वरात राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या चौकावरच्या हॉटेलात थंडीमध्ये पौष्टिक ( खुराक) लाडू सात प्रकारचे मिळतात. मोठ्या थाळ्यांत मांडलेले असतात ते खूपच चांगले असतात. शिवाय ते तिथेच लगेच खाल्ले पाहिजेत असं नाही. तुपातच केलेले असल्याने सात दिवस सहज टिकतात.

गवि

मांडू येथे दाल बाफले आणि दाल पनिए थाळी खाल्ली. ते मोठाले दगड फोडून थकवा आला. दातही बास म्हणाले. या पदार्थावर कायमची फुली. आतून कच्चा राहील याची हमखास हमी अशा आकाराचा अजस्त्र कणकेचा किंवा पिठाचा गोळा भाजला किंवा तुपात तळला तरी त्याचे ते दगडपण आणि आतून पिठाळ गच्च टेक्स्चर किती बदलणार.

डाळ रोटी बरी त्यापेक्षा. उगीच नसते दावे नसतात.

प्रचेतस

तुम्ही भलतीकडेच खाता, तुम्हाला दादाजी सुचवले होते पण तुम्ही रस्त्याच्या कडेला खाल्लेत :)

गवि

दादाजी बंद होते आणि हे रस्त्याच्या कडेला नव्हते. प्रॉपर सर्वात जास्त गर्दी बघून गेल्तो. गर्दी = लोकप्रिय.

दादाजीच्या जागेवर आता देशी दारू अड्डा आला आहे, दादाजी थोडे पुढे शिफ्ट झाले.

कंजूस

दाल बाफले नका खाऊ.
राजस्थानात बऱ्याच ठिकाणी दालबाटी चुरमा मिळतो तो खा. फक्त हीच प्लेट मागवल्यास सहा दालबाटी देतात, त्यापेक्षा जेवण थाळी घ्यावी त्यात दोन दालबाटी येतात .अतिरेक होत नाही.

गविजी,

अगदी माझ्या मनातले बोललात.

मी पहिल्यांदा हा दाल बाटी प्रकार खाल्ला तेव्हा वाटलं कुणाच्या टाळक्यातून इतका बेचव बेसिकमधे लोचा असलेला टाईमपास निघाला असेल?

एकवेळ थंड झालेल्या चकुल्या गिळवतील पण हा प्रकार माझ्या गळ्याच्या खाली उतरणे अशक्य. आणि मी उगीच म्हंटलं हा हॉटेलचाच दोष असावा म्हणून मित्रांनी जी स्थळे सुचवली त्या त्या ठिकाणी तोच अनुभव आला.

आमचे एक गुजराती काका म्हणत असत त्या स्टाईलने : चोटली मारुन टाकली.

कंजूस

दालबाटी / बाफले हे गरिबांची थंडीतलं खाणं होतं. ( बिहारमध्ये लिट्टि चोखा. बाटी अधिक वांगे बटाटा रस्सा).

या चविष्ट धाग्याला गालबोट लावू वाटत नाही पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का? (जीभ चावतो)

(कित्येक दुकानांचे सिलींडर वगैरे पेटलेले असणार आहेत या चिंचोळ्या गल्लीत तेही गॅस इत्यादी बाबतीत, कमीतकमी सेफ्टी आणि जास्तीत जास्त 'चलता है' 'जुगाड' अशा पवित्र्यातली ही दुकाने असतात)

समजा भगदड झाली तर वाचण्याची शक्यता किती?

गवि

पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का?

अवश्य भरली. अनेकदा. काही वेळा आणि काही जागी ती गर्दी अक्षरशः तुडवतुडवीच्या एक पायरी मागे इतकी होती.

हो. पेटत्या शेगड्यांची आग, तापलेले तवे आणि उकळणारे तेल यांना चिकटण्याचे योग अनेकदा येत होते. एकूण हे प्रकरण निवांतपणा आवडणाऱ्या लोकांना झेपणारे नाही. पदार्थ मिळवणे, तो हातात पकडणे आणि त्या आईसक्रीमच्या लाकडी सपाट चमच्याने खाणे (हा चमचा इथे सर्वव्यापी आणि सर्वात गैरसोयीचा) - या सर्व क्रिया चारी बाजूंनी धक्के खात आणि कशीबशी एक चौरस फूट क्षेत्र पकडून तोल सांभाळत गपागप खाऊन टाकणे आणि पुढे सरकत राहणे...

खाण्याची नजाकत निवांत खाण्यात असते. भुकेला कुत्रा, इतर कुत्र्यांच्या टोळीच्या स्पर्धेत, मिळालेले अन्न जसा जागच्या जागीच पटकन वचावचा खाऊन टाकतो तसे हे खाणे मला तरी भासले. पार्सल आणले तर त्यात काही अर्थ नाही. बहुतांश पदार्थ तिथल्या तिथे खाल्ले तरच बरे लागतील असे.

असो.

इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ महानगर आहे तरीही नुकतीच दूषित पाणी पिऊन तिथे अनेक गरीब ज्यात लहान मुलं पण होती ती दगावली. कुठेतरी हे जुगाड असे मुळावर उठतात.

मला भारतीय दुकानदार गाड्यांवले केटरिंग वाले सिंलिंडर ज्या पद्धतीने हाताळतात ते पाहून खूप भीती वाटते. अनेकदा त्या पाइप आपले शेवटचे आचके देत असतात, त्यांची सिलिंडर वर बसवायची मुंडकी कशीही ट्वीक केलेली असतात वा वापरलीच जात नाहीत, एकाच सिलिंडरला अनेक शेगड्या जोडल्या असतात.

कुठेही कसले ऑडिट नाही की सूचनांचे पालन नाही. चलता है.
माझ्या लहानपाणी मांढर देवीच्या जत्रेत स्फोट होऊन अनेक जण गेले चेंगराचेंगरी झाली (साउथ कोरिया सारख्या ठिकाणी अत्यंत प्रगत शिस्तबद्ध देशात देखील एके ठिकाणी अगदी अशक्य अशी चेंगरा चेंगरी झाली ) त्यानंतर सरकारने जत्रांचे वर्गीकरण करून एक नियमावली जाहीर केली.

त्या वर्गीकरणाचा फायदा घेऊन देवस्थानांनी आणि राजकारण्यांनी पैसे लाटण्याच्या प्रकाराशिवाय काही विशेष केले नाही, जत्रा तशाच निष्काळजी पद्धतीने चालू असतात.

अशा ठिकाणी तेलकट पदार्थांना चटावलेल्या लोकांनी एक दोन घासांसाठी आपला जीव धोक्यात घालण्याला काहीही अर्थ नाही. विशेषत: लहान मुलं घेऊन जी मंडळी इथे हौसेने जात आहेत त्यांनी निदान त्यांचा तरी विचार करावा.

हा टीकिंग बॉम्बच आहे. महाकाल करो असे ना घडो.

पण मी काही वीडियो पाहिले आणि मी तरी रात्री इकडे अजिबात जाऊ शकत नाही.

दिवसा कदाचीत एकदोन ठिकाणी जाऊन खाऊन घेईन.