✪ वन्य परिसरातून सायकल प्रवास
✪ कर्नाटकमधील शांत रस्ते आणि छोटी गावं!
✪ “अरे ओ सांबा" जिथे घडलं असेल असे डोंगर
✪ ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू
✪ स्वीडनमधील सायकल मित्रासोबत भेट
✪ सूर्य नमस्काराची सप्त नमस्कार आवृत्ती
✪ Well began is half done!
नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १२ जानेवारी! विवेकानंद जयंती! बंगलोर जवळच्या एस-व्यासामधला शांत परिसर! काल आकाश ढगाळ होतं, पण पहाटे तारे दिसत आहेत. काल रात्री बर्यापैकी झोप झाली आणि सकाळी फ्रेश वाटतंय. एस- व्यासामधले वरिष्ठ अधिकारी श्री. अमित सिंह आणि निरामयचे श्री धनंजय इंचेकर ह्यांची भेट घेऊन निघालो. जाताना कँपसमधल्या गणेश मंदिरात दर्शन घेतलं. अगदी दाक्षिणात्य शैलीचं मंदिर! शिवाय कृष्ण- अर्जुनाची सुंदर मूर्ती.
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल आणि सायकल प्रवासातले फोटो इथे बघता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)
.
.
.
आजचा पहिला टप्पा ९३ किलोमीटर्सचा आहे. जुन्या बंगलोर- मैसूर महामार्गाने काही अंतर जाईन. महामार्गाला जाण्याआधी इथून काही छोट्या गावांमधले रस्ते लागतील. एस-व्यासामधून निघेपर्यंत सव्वा सात झाले. निघताना हेलसकर मॅडमनी दिलेला सुका मेवा खाल्ला. लाईव्ह लोकेशन ग्रूपवर शेअर केलं आणि निघालो हवामान स्वच्छ आहे! आणि आता पेडलिंग सुरू केल्यावर खूप हलकं वाटतंय. सायकल मोहीमेतले पहिले तीन दिवस तसे कठिण असतात. एक लय यायला आणि दिनक्रम शरीराने व मनाने स्वीकारायला थोडा वेळ लागतो. मनातल्या शंकाकुशंका हळु हळु निघून जातात.
सायकलिंग सुरू केल्यावर मन हलकं झालं आणि छोट्या छोट्या टप्प्यांचा विचार करत पुढे जात राहिलो. सुरूवातीला वळणं खूप असल्यामुळे थोडा वेळ लागला. शहराच्या खुणा मागे पडल्या आणि मोकळं आकाश मिळालं! बंगलोरच्या ट्रॅफिकमधून सुटका झाली! पुढचं काही अंतर रस्ता राखीव वन क्षेत्रातून जातोय! हत्ती रस्ता ओलांडू शकतात, असे फलक आहेत. व्वा! हा रस्ता तमिळ नाडूच्या अगदी जवळून जातोय. आणि इथले छोटे डोंगर थेट शोलेमधल्या डोंगरांसारखे वाटतात! जणू शोलेतले ते सगळे प्रसंग इथेच झाले असावेत!
छोट्या छोट्या गावांमधले विलक्षण शांत रस्ते! ग्रामीण कर्नाटक बघता आला. पुढे जुना बंगलोर- मैसूर मार्ग आला. उत्तम आहे हा महामार्ग. फक्त काही ठिकाणी काम सुरू असल्यामुळे थोड्या डायवर्जन्स आहेत. सुरूवातीला थोडे चढ होते, पण नंतर रस्ता उताराचा वाटला. इडली चटणीचा आणि चहा- बिस्कीटांचा नाश्ता दोनदा घेतला. कनकपुरामध्ये थोडा वेळ लागला. गूगल मॅपची मदत घेत जात राहिलो.
वाटेत मला अजून एक सायकलिस्ट भेटला! चढावर तो हातात धरून सायकल नेताना दिसला. थोडा वेळ त्याच्याशी बोललो. तो नूप नावाचा स्वीडनचा सायकलिस्ट आहे! पण तो अगदी पहिल्यांदाच सायकल चालवतोय म्हणाला. बंगलोर ते मैसूर जातो आहे. त्याने स्वीडनमध्ये सायकल विशेष चालवली नव्हती म्हणाला. भारत फिरायला तो आला आहे आणि सायकल घेऊन त्याला जावसं वाटलं! त्याची तयारी तशी नाहीय पण तरीही मस्त सायकलवर निघाला आहे! थोड्या वेळ सोबत पायी पायी चाललो. चढ पूर्ण झाल्यावर फोटो घेऊन निरोप घेतला.
.
.
आज जिथे थांबायचं आहे, त्या मलावलीमध्ये कोणत्या संस्थेशी संपर्क होऊ शकला नाही. पण तिथल्या संघ परिवारातल्या श्री. कृष्णाजींशी बोलणं झालं आहे. ते व्यवस्था करणार आहेत. अपेक्षेच्या बरंच आधी म्हणजे साडेबारालाच तिथे पोहचलो. ४.३० तासांच्या आतच ९४ किमी झाले आहेत. कृष्णाजी लगेचच भेटले आणि त्यांच्या ओळखीच्या एका रेसिडन्सीमध्ये त्यांनी मला थांबायला सांगितलं. पोहचल्यावर आंघोळ करून जेवण केलं. दक्षिण भारतीय जेवण (मील)! भात, भाज्या आणि सांबार! एकदम पौष्टिक!
दुपारी आराम झाल्यावर लॅपटॉपवर थोडा वेळ काम केलं. माझं प्रोफेशनल काम ऑनलाईन आहे, त्यामुळे लॅपटॉप सोबत ठेवून ते कामही रोज दुपारनंतर करणार आहे. संध्याकाळी कृष्णाजींनी त्यांच्या माहितीतल्या एका योग साधकांसोबत भेट करून दिली. ते श्री पतंजली योग समितीचं काम करतात. त्यांनी सूर्य नमस्काराच्या एका वेगळ्या पद्धतीची माहिती दिली. त्यामध्ये रोज वेगळ्या प्रकारचा सूर्य नमस्कार केला जातो. त्याला ते सप्त नमस्कार म्हणतात. त्यांना निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेच्या कामाबद्दल सांगितलं. सायकल प्रवासाची योजना सांगितली. थोडं इंग्लिश, थोडं हिंदी असं हे बोलणं झालं. आणि मला कन्नड किंचित येतं हे मी सांगत होतोच! ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू! भाषेची अडचण कुठेच आली नाही.
मोहीमेचा पहिला दिवस खूप व्यवस्थित गेला. विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. आणि वाटेतला रस्ताही हायवे होता. त्यामुळे रस्त्यावरही लोकांशी बोलणं झालं नाही. पण कर्नाटकचा अगदी आतला भाग बघायला मिळाला. २० पैकी पहिला दिवस पूर्ण झाला! रोज असे वेगवेगळे अनुभव येणार आहेत! सायकल दिनक्रमानुसार रात्री लवकर झोपलो. सलग सायकलिंग करताना त्या त्या दिवशीचा थकवा त्याच दिवशी भरून काढावा लागतो. मन बरंच शांत झालंय. पण अजून नीट रुळायला दोन- तीन दिवस लागतील! पुढच्या लेखात दुसर्या दिवसाचे अनुभव शेअर करेन. धन्यवाद!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 13 मार्च 2026.
Comments
छान
छान प्रवासवर्णन