पाककृती

फणसाचे सांदण

Primary tabs

जून जुलै महिन्यात घरी फणस पिकून दरवळू लागतात.बाहेरुन काटेरी पण आतून गोड, बरका गरा असा बचक्यात मावत नाही. तो अलगद ओठाशी धरायचा आणि आत ओढून घ्यायचा. शेजारीच ठेवलेल्या खोबरेल तेलाच्या वाटीत हाताला लागलेला चीक पुसत पुसत , एका मागोमाग एक किती गरे फस्त झाले त्याचा हिशेबच उरत नाही. गरे खाउन मंडळी कंटाळली की घरी सांदणांचा घाट घातला जातोच. तांदूळ भिजवून कोरडे केले जातात. जात्यावर त्याच्या कण्या निघतात. बरक्या गर्‍यांचा रस काढण्यासाठी बाल गोपाळ चाळण्या घेउन बसतात. बाहेर पावसाच्या सरी कोसळताना गरमागरम सांदणे खाण्याची मजा औरच !! कोकणात केली जाणारी ही पाककृती.तशी अनवट. आणि म्हणूनच खास मिपाकरांसाठी. आत्ताच गेल्या रविवारी घरी केली होती. साहित्य भिजवून वाळवलेले तांदूळ २ वाट्या बरक्या फणासाचे गरे १५-२० ( हे गरे रसाळ असतात) गूळ १ वाटी थोडीशी हळद तांदूळ परतून घ्यावेत. थंड झाल्यावर कण्या करुन घ्याव्यात. म्हणजे सांदण हलके होइल. Image removed. बरक्या गर्‍यांचा रस काढून घ्यावा. Image removed. Image removed. आता मिक्सरमध्ये गूळ बारीक करुन, तो गर्‍यांच्या रसात मिसळावा. Image removed. तांदूळाच्या कण्या आणि गर्‍यांचा रस एकत्र करावा. थोडे पाणी घातले तरी चालेल. रंग येण्यासाठी थोडी हळद घालावी. मिश्रण तासभर तरी मुरु द्यावे. Image removed. हे मिश्रण इडली पात्रात्/मोदकपात्रात घालून अर्धा तास उकडून काढावे. सांदण तयार आहे. Image removed. अगदीच गोड वाटत असेल तर, नुकत्याच दादरा सोडलेल्या बरणीतले लोणचे तोंडी लावयला घेण्यास हरकत नाही. Image removed. पाकृ सौजन्यः सौ. काळे. आमचा सहभाग फोटु काढण्यापुरताच. ( 8| लहानपणी आईला चाळणीवर रस तरी काढून द्यायचास की!!)
लिखाळ

वा !
पाकृची प्रस्तावना एकदम छान आहे.
सांदण छान दिसत आहे. सचित्र कृती एकदम आवडली :)

गर्‍यांचा रस काढायचा म्हणजे गरे मिक्सरमधून वाटुन घ्यायचे का?
-- लिखाळ.

कपिल काळे

हो, गरे मिक्सरला वाटून रस काढायचा.
ह्यावेळी फणस पूर्ण पिकला नाही, त्यामुळे फोटुतले गरे तितके रसाळ दिसत नाहीत.

कपिल काळे

हो, गरे मिक्सरला वाटून रस काढायचा.
ह्यावेळी फणस पूर्ण पिकला नाही, त्यामुळे फोटुतले गरे तितके रसाळ दिसत नाहीत.

तर्री

कपिल जी , ही पाक्रु प्रसिध्द केल्याबद्द्ल आपले आभार.

ह्या पाक्रु विषयी ची माझी टिपण्णी :
१.ही एक नाजुक पाक्रु आहे.
२.सांदणे करण्याचा घाट , "पोक्त" ग्रुहीणी नेच घालावा. तरूण हाताचे हे काम नाही. थोडी साधना लागते त्यासाठी .
३. रस गाळण्याचे काम मुलांनी केल्यास ऊत्तम.
३.सांदणे ऊकडवतांना जो दरवळ सुटतो , तो मोहक !!!
४. ही चीज़ "नारळाच्या" दूधाबरोबर खाल्ली तर काय खुलते सांगू !
५.सांद्णे करणारी आजी असेल तर , खाऊन झाल्यावर तिला मिठी मारा , आजीचा स्पर्श अल्वार की सांदणे ? असे वाटेल ...
६. त्यानंतर थोडी "झोप" घ्यावी , न मरता स्वरगात जाण्याचा हा सोपा मार्ग !!

चित्रादेव

आई ग! काय आठवण काढून दिलीत. ह्यात थोडेसे केसर आणि काजू मस्त लागतात. नारळाचे दूध व सांदणं म्हणजे स्वर्ग सुख. इथे मिळतील का हो? :)

कायरे कपिल्या,
एक फटका लावून देऊ का?:)
कसल्या नाही त्या आठवणी चाळवून देतोस रे!!!!
च्यायला, आता दिवसभरात काहीही खाल्लं तरी ते गोड लागणार नाही ना!!!
-पिडांकाका

धनंजय

अमेरिकेत मला अजून बरका फणस मिळालेला नाही. काप्या फणसाचे गरे डब्यातून मिळतात. सांदण करण्यासाठी एकदम निरुपयोगी.

म्हणून छान चित्रे दिल्याबद्दल निषेध.

पण पुढच्या वेळी आंब्याचे सांदण इडलीपात्रात करतो. ही कल्पना आवडली.

तुम्ही सांगितलंत नाहीतर मी विचार केलाच होता टिन्ड फणस आणायचा , ही पाकृ बघुन तोंडाला अक्षरश: पाणी सुटले...धनंजय आंब्याच्या सांदणाची पाकृ द्या की... :D

दिपाली :)

धनंजय

मी बनवले आहे सांदण डब्यातले गरे किसून - अगदीच टाकाऊ नाही. ताकावर भागवता येते तहान. पण जो बुळबुळीतपणा हवा रवा धरून ठेवण्यासाठी, तो नाही. कदाचित अति-पिकलेले केळे+किसलेले गरे असे वापरता येते का बघता येईल.

("बुळबुळीतपणा" या बेढब शब्दाऐवजी खाण्यायोग्य वाटेल असा काय शब्द आहे?)

करुन बघितलं पाहिजे तसं इकडे फणस मिळतं पण कधी ट्राय केलं नाहीये.

दिपाली :)

प्राजु

आम्ही खाल्ले आहे त्यांच्या हातचे सांदण..
त्यांची सांदणाची पाकृ.. इथे .. पहा.

कपिल, हे फोटो इतके जीवघेणे आहेत ना!! मस्त पाकृ.
इथे मी एकदा पिकलेल्या केळ्याचे, रवा आणि नारळाचे दूध घालून सांदण केले होते.
ईडली पात्रात सांदणाची आयडीया मस्त आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती२

प्राजू, लिंक साठी धन्यवाद.
धनंजय, छान आहे तुमची पाकृ. मी कधी केळं घालून केले नव्हते.
>>अर्धी वाटी खोबरे (अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस अर्ध्या वाटीभर नारळाच्या दुधात भिजवून 'बनवलेले' ओले खोबरे.) ही आयडीया छान आहे.

चतुरंग

सचित्र टाकून जळवल्याबद्दल आभारी आहे, त्यामुळे काय खाल्लंत ते तरी दिसलं! ;)
(मागच्या ईस्टकोस्ट कट्ट्याला धनंजयने केलेलं अप्रतिम सांदण चापलं. तेव्हा मी ते प्रथमच खाल्लं होतं!.)

(सांदणप्रेमी)चतुरंग

शाहरुख

मला पाककृतीवरचे "बादलीभर लाळ गळाली, तासाभरात करून खाणार, किती हा आमच्यावर अन्याय, जाहीर निषेध" असले प्रतिसाद साधारणतः खूप नाटकी वाटतात..पण फणसाच्या सांदणांचे नाव ऐकले आणि फोटो बघितले तेंव्हा त्या सगळ्या प्रतिसादांना खुल्या दिलाने माफ करावे असा उच्च विचार मनात आला :D

खरोखरीच, सांदणं आणि दूध / नारळाचे दूध / आंब्याचं लोणचं म्हणजे स्वर्गच....

दादा, सांदणं खायची लय इच्छा झालीय !!

रेवती

वेगळी आणि मस्त पाकृ!
तयार सांदण इकडे पाठवून द्या जरा!
आपल्या सौ. सुगरण आहेत की!
छान फोटूबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावेत की वाढदिवसाच्या शुभेच्छा?
(एकदम पांथस्थ स्टाइल फोटोंची मालिका.)
रेवती

पक्या

मस्त रेसिपी . शेवटचे २ फोटोज जीवघेणे वाटत आहेत.

स्वाती२

स्सस्स्!
एकदम आजोळची आठवण करून दिलित. आता या विकांताला निदान आंब्याची सांदण तरी करायलाच हवीत. त्या शिवाय चैन पडणार नाही.
बरक्या फणसाच्या रसाचे डबे मिळाले असते तर..

सुनील

व्वा कपिलशेठ.मस्त पाकृ.

कापा फणस हा राजेशाही, अगदी टेबलावर बसून कुरकुरीतपणे खाण्यासारखा!

पण "बुळबुळीत" बरक्याची गोडसर चव त्याला नाही!

फणस कापणे हाही एक सोहळाच असायचा गावी.

छान पाकृबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज

अग्ग्ग्ग्गग आहेत!!!!

कपिलशेठ जबरदस्त. पाथंस्थांच्या पाकृची आठवण आली. जबरदस्त.

मदनबाण

आत्ता पर्यंत एकदाच हा पदार्थ खाल्ला आहे,पण खरचं जबरदस्तच चव.
कपिलराव लय भारी...शेवटचे दोन फोटो पाहुन ज्याम म्हणजे ज्याम त्रास झाला!!!
बघुया आमच्या नशिबात पुन्हा कधी हाय हा गोड्ड पदार्थ खाणे आहे ते !!!
काय पण बोला पण आज आपला दिल फणस-फणस झाला. :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

जागु

पाकृ, फोटो एकदम मस्तच. खुप आवडली रेसिपि. काप्या फणस चालेल का ? आमच्या इथे बरक्या नाही मिळत.

शाल्मली

एकदम मस्त कृती! आवडली.
हे सांदण इडली पात्रातून काढण्याची कल्पना तर फारच आवडली.

--शाल्मली.

चित्रादेव

मला ह्या सांदणाचा पुन्हा फोटो पाहून एक उचलावासा वाटला. उद्याच पावसचे तिकीट काढते.....

वेताळ

हे कधी खाल्ले नाही ,पण फोटो बघुन खायची इच्छा झाली. बघु आता कधी खायला मिळते ते. मस्त पाकृ आहे.
वेताळ

>>हे कधी खाल्ले नाही ,पण फोटो बघुन खायची इच्छा झाली. बघु आता कधी खायला मिळते ते. मस्त पाकृ आहे.

-दिलीप बिरुटे

क्रान्ति

जबरदस्त! पाकृ सुद्धा! इकडे पिकला फणस नवसानेच मिळतो! तरी मिळाल्यावर करून बघायलाच हवी.
मिपावर कोकणमेवा महोत्सव सुरू आहे का? :?

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

कपिल काळे

सगळ्यांना धन्यवाद!!
पुण्यात येताना अगोदर कळवून या, म्हणजे सांदणे करुन खिलवतो!!

धनंजय भाउंची पाकृ सुद्धा वेगळीच आणि छान आहे. आत तशी एकदा करुन बघू.
जागुताई- काप्या फणस नाही चालणार. बुळबुळीत बरका पाहिजे, रवा/कण्या धरुन ठेवण्यासाठी.

आता दसरा/ नवरात्रात पातोळ्यांची खास कोकणी स्टाईल पाकृ टाकेन म्हणतो.

रामदास

म्हंजे...तोपर्यंत मिपावरच्या निष्पाप जिवांनी काय करावं बरं ?