Skip to main content

वांग्यची भजी/तळलेले काप

लेखक जागु यांनी शनिवार, 03/12/2011 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी. तांदळाचे पिठ २ ते ३ चमचे चवीपुरते मिठ हळद पाव चमचा मसाला १ चमचा तळण्यासाठी तेल १) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या. २) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे. ३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे. ४) एका डिश मध्ये तांदळाचे सुके पिठ घेऊन त्यात हे काप घोळवायचे. ५) तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळायचे. ६) हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे. झाले तय्यार तळलेल्या वांग्याच्या तुकड्या :हाहा: म्हणजे वांग्याची भजी हो. अधिक टिपा: तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसनही वापरतात. तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पिठ तेल लगेच शोषून घेते. भाकरी व चपाती बरोबर एकदम छान. लहान मुलांना आवडतात

वाचने 9866
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी. हिरव्या सालीची लाब वांगी मिळाली तर ती सगळ्यात चांगली २) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे. ३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे. जरूरी नाही पाणी शिंपडायची. वांगी ताजी असतील तर पाणी सुटते. भाकरी व चपाती बरोबर एकदम छान. हा हा हा. अजून काही गोष्टींबरोबरसुद्धा फारच छान लागते. (किंवा असे म्हणू शकता "ह्या बरोबर इतर काही गोष्टीसुद्धा छान लागतात.;) ;-) :wink:) आता माझी भर घालतो. बेसन वापरु नये. त्या पेक्षा थालिपीठाची भाजणी वापरावी. जास्त खूसखूशीत आणि चवीष्ट होतात

हो त्या पेक्षा थालिपीठाची भाजणी वापरावी. जास्त खूसखूशीत आणि चवीष्ट होतात>>> आणि रव्यामध्ये घोळवली तर कुरकुरीतहि होतात.

In reply to by प्राजु

आणी ज्वारीच्या पीठात घोळवली तर चुरचुरीत होतात :) बाकी काप एकदम सही दिसत आहे जागुतै :)

आमच्या घरी आई थोडं हिरवं वाटण आणि मीठ मसाला लावते. वरुन तांदळाचं पीठ ते नसल्यास रव्यात घोळवून तळते. मी मात्र शक्यतो कसलही आवरण लावायचं टाळतो. मसाल्यात मुरवलेली वांगी सरळ थोड्या तेलावर शॅलो फ्राय करतो. भात + दह्याची कढी + सोबतीला वांग्याचे काप (लिंबू मारके) + दुपारची डुलकी = स्वर्ग. :)

In reply to by गणपा

अरे हो. माझ्या प्रतिसादात हे लिहायचे विसरलो होतो. लिंबु पिळल्याने पाण्याची गरज पडत नाही असे लिहायचे होते. आठवण केल्याबद्दल धन्यु.

मस्त !!! माझी आई वांग्याला हलका मसाला लावून तव्यावर असंच शिजवते... कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची/लाल तिखट, आलं-लसणाची पेस्ट आणि बेसन असा मसाला असतो. पोळीसोबत खाताना जबरा लागतात :) :)

अत्यंत आवडते काप.... माझ्या व्यक्तिगत आवडीनुसार हळद, तिखट, मीठ आणि चिंचेचा कोळ एवढेच जिन्नस वापरून काप अर्धा तास मुरवायचे. नंतर तांदूळाचे पिठ लावून कमी तेलावर परतायचे. गरम गरमच खायचे.

माझा अतिशय आवडता पदार्थ. जरा शिळी भाकरी आणि वांग्याचे तळलेले काप म्हणजे स्वर्गीय खादाडी... - पिंगू

जागुताई मस्त चविष्ट. हे करून पाहावे लागेल. पण मला मात्र बेसनात घोळवून तळलेली वांगी भजीच आवडते.

पहिला वांग्याचा फोटो पाहुनच मन काय प्रसन्न झाले...आणी पुढे तर..नहेले पे देहेला. वाह लाजवाब :-)

सगळ्यांचा आवडता पदार्थ. सुरणाचे किंवा लाल भोपळ्याचेही काप करतात असे ऐकून आहे. सगळा स्वयंपाक झाल्यावर, पोळ्या झाल्यावर तव्यावर आई हे काप भाजते. बाकीची आवराआवर होईपर्यंत ते चांगले भाजले जातात. हे दृष्य डोक्यात पक्के बसले आहे.

माझा सगळ्यात आवडता "काप" प्रकार म्हणजे वांग्याचे काप ..... :) आमच्या घरी रोज काप प्रकरण चालू असते .... मी बर्याच भाज्या खात नाही म्हणून आई भाज्यांचे काप बनवते .... बटाट्याचे, वांग्याचे, सुरणाचे, कारल्याचे, दुधीचे आणि केळयाचे.... :) मस्त चविष्ठ लागते !!!