Skip to main content

संत्र्याची खीर / कमलालेबु खीर (बंगाली पा़कृ)

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ लिटर दूध ४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी - जास्त) २ छोटी संत्री १ टीस्पून वेलचीपूड १/२ टीस्पून केशर सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप . पाकृ: प्रथम दूध एका नॉन-स्टीक भांड्यात तापवायला ठेवावे. दूधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटु द्यावे. मधे-मधे डावाने ढवळत रहावे. . दूध निम्मे झाले, जरा घट्ट झाले की त्यात वेलचीपूड, केशर व साखर घालावे व ढवळावे. . . साखर विरघळली की त्यात थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालावे व गॅस बंद करावा. . संत्र्याची साले काढून ठेवावी. फोडींमधील बिया व वरचा पातळ पांढरा भाग काढून गर वेगळा करावा. . दूध पूर्ण गार झाले की त्यात संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. (दूध गरम असताना संत्र्याचा गर घालून नये दूध नासेल.) . आदल्या रात्री करुन ठेवली तर संत्र्याचा स्वाद आणखीन खीरीत उतरेल. ही मस्त, चविष्ट खीर थंड सर्व्ह करावी :) .

वाचने 9393
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by कॉमन मॅन

सॉल्लीड , नविन प्रकार कळ्ला खीरीचा ,धन्स ग आजच करुन खीरीचा लुफ्त उठ्वन्यात येइल :)

सध्या मिपावरच्या सुगरणी व बल्लवांनी आपापले झारे , पळ्या कुठं लपवून ठेवलेत का? पाकृ कशी नाही आली इतके दिवसात?? असा विचार काल आला, अन आत्ता तुमची ही पाकृ! क्या बात है!

गेल्या ३-४ दिवसांपासुन पाकृ विभागात नविन काहि भर नव्हतीच... आणि भर पडली ते एकदम सानिका-ताईंच्या पाकृतिनेच .. व्वा ..क्या बात!!! नेहमी प्रमाणे "झकास" !!! ... उन्हाळा सुरु झालाच आहे... तेव्हा अश्याच 'थंडगार' पाकृ येउ द्या! :)

ही संत्र्याची खीर की बासुंदी गं? फोटो तर छान दिसताय... गणपाभाऊ म्हणतात तसे झँटॅमॅटीक :) पण चव आवडेल की नाही साशंक आहे.

In reply to by स्मिता.

ही संत्र्याची खीर आहे बंगाल मध्ये ही खीर बनवली जाते :) आपण दूधपाक जसा साधारण घट्ट बनवतो तसचं ह्या खीरीला दाटपणा असतो...बासुंदी इतका नाही :) चवीचं तर तू बनवून , खाऊन बघीतल्याशिवाय नाही समजणार पण स्वादीष्ट बनते इतके नक्की :) धन्यवाद

अगं बाई तुझे (पाय नव्हे) हात कुठं आहेत. जरा फोटू पाठवून दे. मला शंका होतीच की दूध नासणार नाही का? पण गार दुधात संत्रं मिसळल्याने आल इज वेल रहात आहे असे दिसते.

जे ब्बात.. बर्‍याच दिवसांनी सानिकातायने जबरा एन्ट्री मारली आहे. मी अशी खीर एकदा माझ्या ओळखीच्या बंगाली काकांकडे खाल्लेली आहे, तिची आठवण झाली. - पिंगू

दिसला दिसला .. सानिकातैंचा गुबाली ( !) चमचा दिसला. आता ५०फक्त यांना हायसं होईल अगदी.... :) पाकृ अतिशय देखणी आहे, स्वादिष्ट ही असणारच. नेहमी प्रमाणेच करून बघणार. ( हेच काय दरवेळी लिहायचं .. पण वेगळं लिहिणार तरी काय? :) ) वर जामोप्या ह्यांनी लिहिल्याप्रमाणेच म्हणते... संत्र्याच्या सालीची फुले कशी केलीत ते सांगावे...

In reply to by इन्दुसुता

अरे हायसे म्हणजे काय, केवढं टेन्शन होतं मला, असो, पाकृ बद्दल जास्त काही लिहिणे नाही, पण मला आश्चर्य वाटतं ते स्वप्निलच्या संयमाचं, हे एवढं समोर दिसत असताना गप्प उभे राहुन एवढे छान फोटो काढ्णे ही साधी गोष्ट नाही, माझा घरी तर हल्ली बायको शेंगा सुद्धा मी झोपल्यावर भाजते.

मला वाटलं तू संत्रही शिजवून किंवा वाफवून घेशिल. पण ते तसंच घातलेलं दिसतंय. दूध एकदम थंड झाल्यावर घातलंस का? पण नासलं नाही.. जरा आश्चर्यंच वाटलं. :) मस्त आहे रेसिपी.

In reply to by प्राजु

ती संत्री म्हणजे क्लॅमेंटाईन्स आहेत का? कारण इथे ऑरेंजिस म्हंटले कि सणसणीत मोठी संत्री मिळतात.

In reply to by प्राजु

अगं मी पाकृत तसे लिहिले आहे दूध पूर्ण गार झाले की त्यात संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. (दूध गरम असताना संत्र्याचा गर घालू नये दूध नासेल.) आणी ही खीर थंडचं सर्व्ह करावी , संत्र्याचा गर घातल्यामुळे त्याला जो स्वाद येतो तो एकदम भन्नाट लागतो :) हो ती संत्री म्हणजे क्लॅमेंटाईन्स आहेत पण भारतात कुठे क्लॅमेंटाईन्स मिळणार म्हणून मी संत्री लिहिले आहे आणी तशी पण क्लॅमेंटाईन्स हे आपल्या भारतात मिळणार्‍या संत्र्याच्या चवीसारखीच लागतात :)

In reply to by सानिकास्वप्निल

चला संत्राला अजुन एक समानअर्थी शब्द मिळाला. बाकी आमच्या ईथे त्याला टँजरीन म्हणतात. ऑरेंज म्हटलं की ही भली मोठ्ठी मोसंबी सदर्‍यात* टाकतात. *आम्हाला पदर कुठला? (अभ्यासु) - गणा

In reply to by गणपा

टँजेरीन आणि क्लेमेंटाईन ही दोन्ही फळं दिसायला सारखी असली आणि मँडॅरिन ऑरेंजेस या प्रकारात मोडत असली तरी त्यांत थोडा फरक आहे; आधिक लालसर असलेलं टँजेरिन हे पिवळसर क्लेमेंटाईन पेक्षा थोडंसं आंबट पण संत्र्यापेक्षा गोड असं, बिया असलेलं फळ आहे, तर टँजेरिन मध्ये बहुतेक वेळा बिया नसतात. (खालील चित्रे विकीवरून साभार) क्लेमेंटाईन टँजेरिन संत्रे 'सास्वं'च्या पाककृतीविषयी काय लिहावं! उच्च कोटीची मांडणी, आणि नवीनच पदार्थाची ओळख झाली, मस्त!

दिसतंय झकास पण बरं लागतं का हो हे ? मी काय म्हणतो धाग्यावर रिप्लाय दिलेल्यांसाठी तरी निदान बनवून पाठवाच. ;)

अरेवा.. ही डिश आधी कधी पाहिली नाहिये.. पण एका नागपुरी मित्राने आणलेली संत्र्याची बर्फी चाखली होती - एकदम सुपर्ब होती.. :) फोटु अ‍ॅज युजवल झकास!!

In reply to by मराठमोळा

नागपुरची संत्रा बर्फी नुकतीच खालेल्ली आहे त्यामुळे त्याची चव जीभेवर तरळते आहे :) धन्यवाद :)

सुद्धा आवडली. . .अर्थातच खीरीवर आणखी वेगळी प्रतिक्रिया काय देणार? वरिल सर्व प्रतिक्रियांना अनुमोदन. (नागपुरी) अमृत

धन्य आहात ताई.. नागपुर(जवळ)चा असून कधी कुणी हे कठीण कार्य सिद्धीस नेल्याचं पाहीलेलं नाही.. च्यायला, येवढी संत्री रिचवली तरी "संत्र्याने दुध फाटेल" म्हणून कुणाला ही खीर करायला सुचलंच नसेल.. पाकृ आवडलेली आहे.. करण्यात येईल. धन्यवाद..

क्या बात है......... !! नागपूरकरांनी आवर्जून करायलाच हवी ही पाककृती :) अतिशय देखणी आहे ही पाकृ. संत्र्याच्या सालीची फुलं पण सही आहेत !!

छान पाकृ....धन्यवाद. आमच्या version मध्ये आम्ही mashed केळं देखील वापरलं थोडसं, दुध जाड करायला आणि flavour साठी .

गोड पदार्थ वर्ज्य आहेत. पण करून पाहायला हरकत नाही. इतरांना खाऊ घालेन. फ्रूट सलाडचाच प्रकार वाटतो आहे.