Skip to main content

कणकेचे लाडू

लेखक Pearl यांनी मंगळवार, 06/11/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा. बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूप खूष होते. साहित्यः १ कप गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल) कृती: १) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता. २) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या. ३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या. ४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा. असे सोपे आणि पौष्टीक लाडू तयार :-) abc

वाचने 12767
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

यात पिठिसाखरेऐवजी गूळ घालून पण करतात. ते जास्त खमंग लागतात. अर्थात हे पण छानच आहेत.

माझी एक शंका गव्हाच पिठ किती चिकट असते हे लाडुपण चिकट बणतात का ?की बेसनलाडुसारखे खमंग बनतात?

In reply to by पियुशा

पिवशे, गव्हाचं पीठ मंद आचेवर पण बराच वेळ खमंग भाजलं तर त्याचा चिकटपणा बराच कमी होतो.

In reply to by पियुशा

गव्हाचा तयार आटा वापरायचा. तो भरभरीत असतो, चिकट्पणा बिल्कुल नसतो.

सुंदर आहेत. गहू आधी खमंग भाजून रवाळ द्ळ्ले तर हे लाडू अजिबात चिकट होत नाहीत. पौष्टीक होण्यासाठी त्यात थोडा डींक तळून आणि खारीक पावडर घालावी.

लाडुचा फोटो पाहुन क्षणभर मला ते बेसनाचे वाटले... ;) पण खरचं हे चांगले लागत असतील का ? (लाडु प्रेमी);)

कणीक भाजण्यापूर्वी तुपावर थोडा(दोनास एक या आकारमानात)बारीक रवा साधारण भाजून घेऊन मग त्यात कणीक घालून चांगले भाजल्यास लाडू अजिबात चिकट होत नाहीत.

छान. बेसन लाडूसारखेच दिसताहेत. पण बेसन सारखे जड नाहीत पोटाला. लहानपणी शेजारी खाल्ले होते एकदा.

@पर्ल, परवाच हे लाडू करुन पाहिले...फार मस्तं झाले. कणिक वापरुन केले आहेत यावर कोणाचा विश्वास बसला नाही. तुमचे खुप खुप आभार :)

कणकेचे असल्यामुळे पचायला बेसनाइतके जड नाहीत. अशाच पण गूळ घालून केलेल्यांना गूळपापडीचे लाडू म्हणतात का?

हो. पैसाताई, गूळ घालून केलेल्या याच लाडवांना गूळपापडीचे लाडू असं म्हणतात. आणि पा.कृ. मध्ये प्रमाण देताना गडबडीत कप आणि वाटी दोन्ही दिले आहे. ते खरं तर असे हवे, १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर किंवा १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर जमलं तर प्रमाण दूरूस्त करशील का, हे असं १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल)