Skip to main content

झटपट ढोकळा.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 26/11/2012 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-एक वाटी चण्याचे पीठ्.(बेसन) पाऊण वाटी पाणी. ५-६ लसूण पकळ्या. ४-५ हिरव्या मिरच्या(तिखट असल्यास कमी घेतल्या तरी चालतील) एक बोटाचे पेर आलं. अर्धा चमचा सायट्रीक अ‍ॅसिड. एक सॅशे इनो फ्रुटसॉल्ट. मीठ. एक चमचा साखर. चार चमचे तेल. मोहरी व तेल फोडणीसाठी. ओल्या खोबर्याचा चव व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी. कृती :-प्रथम लसूण,आलं व हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेणे.एका मोठ्या भांड्यात बेसन घेऊन त्यात वाटलेली पेस्ट चवीपुरते मीठ्,साखर,तेल व सायट्रीक अ‍ॅसिड घालून मिक्स करावे.थोडे-थोडे पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कुकरच्या भांड्याला तेल लावून ठेवावे.आता मिश्रणात इनो घालून जोरात एकाच दीशेने चांगले ढवळावे.तयार मिश्रण कुकरच्या भांड्यात ओतावे.झाकण न ठेवता डबा कुकरमध्ये ठेवावा.शिटी काढून ढोकळा १५-२० मिनीटे शिजवून घ्यावा.तयार ढोकळ्याचा डबा बाहेर काढून थंड करत ठेवावा.थंड झाल्यावर त्यावर मोहरीची फोडणी करून घालावे.ढोकळ्याच्या वड्या कापाव्या.खोबरे व कोथिंबीर घालून सजवावे.

वाचने 12431
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

फोटू छान आलाय. यावरून आठवले की मला ढोकळा करता येत नसल्याने रेडी मिक्सचे पाकीट आणून ठेवले आहे. फार जुने होण्याच्या आधी संपवायचे आहे. कोणी कितीही सोपी पद्धत सांगितली तरी ढोकळा व गुळाच्या पोळ्या हे पदार्थ मला चांगले जमत नाहीत. पैसाताई, सोडा घातला तरी चालतो पण मिपाकरांकडे नेहमी ईनो असतो म्हणून तसा उल्लेख केला असेल. ;)

अय्यो ! बर झाल रेवती आठवण केलीस. आज पाऊसपण पडतोय अन घरातल रेडीमिक्स ढोकळ्याचक पाकिट संपवायच आहे. ठ्ञंक्यु! तुमचा ढोकळापण आवडला . फोटोपण मस्तच.

ज्योतिताई, सायट्रिक अ‍ॅसिडएवजी लिंबू वापरला असता, तर आणखी उत्तम. बाकी ढोकळा म्हणजे ऑलटाईम फेवरेट. - पिंगू

In reply to by भाग्यश्री अमित

अर्धा चमचा सायट्साठीअ‍ॅसिडएवजी दोन चहाचे चमचे लिंबाचा रस पुरेल.

ढोकळा छान दिसतो आहे, ह्या प्रकारानेही करुन पाहिन. @ रेवती, चकलीच्या ढोकळा रेसिपीने केलेला ढोकळा मस्त होते, अजिबात बिघडत नाही, आणि त्यातून बिघडलाच तर अमिरी खमण करायचा ग, हाकानाका, ;) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

माझा तर रेडी मिक्सचाही बिघडतो. ;)परवा केला तर त्याचे आमिरी खमणच करावे लागले. मुलाने विचारले की हे स्क्वेअर्स असतात ते असे काय झाले? म्हटलं ही नवी रेसिपी आहे. ;)

छानच होतो हा ढोकळा. परत पीठ भिजवून आंबवण्याची गरजही नाही. कधीही करता येतो. झकास.

येकसक्युजमी ज्योतिजि !!! मी कालच ढॉकळा केला अन तो पुर्णपणे गंड्ला, स्पाँजी झाला पण आतुन कच्चा राहिला १५ -१७ मिनिट वाफवुनदेखील :( मग ( घरच्यांची बोलणी खावी लागु नये म्हणुण मी गुपचुप तो कुस्ककरुन कांदा मिरची तिखटाची फोड्नी देउन जे काही उपम्यासद्रुश झाल होत ते दह्याच्या चटनीबरोबर सगळ्यांना खाउ घातल :( अन वेळ मारुन नेली हुश्श.........

In reply to by पियुशा

शिजवताना झाकण ठेऊ नका. नाहितर झाकणाचं पाणी पडून कच्चा राहण्याची शक्यता असते.