जे न देखे रवी...
पांढरपेशी कविता
Primary tabs
पांढरपेशी कविता
क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या
फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या
मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास
खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास
गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या
मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या
गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली
दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली
चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी
फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी
शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा
कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा
जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही
आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही!
दर्प सांगती अभिमानाने उच्छ्वासांच्या जाती
श्वासांशी मेकडे जोडती स्वच्छ सुसंस्कृत नाती
करपट ढेकर येता - येतो चार शिव्यांचा खलिता
नको! नको ही त्यात आणखी पांढरपेशी कविता!
-नीलहंस
बा नीलहंसा,
फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी....
जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही
आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही!
या ओळी खास!
आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :)
तात्या.
कुठले रे हे सर्व?
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच.
एकंदरीत छान प्रकटन :)
(कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) !
कविता खूप आवडली, ओंकार !!!
- सर्किट