चांगला धागा सुटला होता. फुरसत मध्ये सगळे प्रतिसाद वाचावे लागतील. वि. स. खांडेकर ययाति आणि अमृतवेल मधून भावून गेले. स्वतःसाठी म्हणून खांडेकरांचे कोटस मी माझे मलाच मेल करून ठेवले होते. या धाग्याच्या निमित्ताने तो मेल इथे चिटकवतो.
"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी, त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नांमागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळे!" - (अमृतवेल - मेहता पब्लिशिंग हाऊस)
" ... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. सा-या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वतःचाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात..."- (अमृतवेल - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी" - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"मृत्यू हा अष्टौप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे; त्याला ह्या जगात कोणीही विरोध करू शकत नाही." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"मृत्यू हा जीवनाला जितका अप्रिय, तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टिचक्राचा जन्माइतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे. वसंत ऋतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस, कोमल पालवी जशी आदिशक्तीची लीला आहे तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्णं ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे. या दृष्टीनंच आपण मृत्यूकडे पाहिले पाहिजे. उदयास्त, ग्रीष्म-वर्षा, प्रकाश-छाया, दिवस-रात्र, स्त्री-पुरुष, सुख-दु:ख, शरीर व आत्मा, जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत. जीवनाच हे द्वंदात्मक व्यक्त स्वरूप आहे. या सर्व आडव्या-उभ्या धाग्यांनीच आदिशक्ती विश्वाच्या विलासाची आणि विकासाची वस्त्र विणीत असते." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"जीवन हे नेहमीच अपूर्ण असतं, तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये. खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं. निरपेक्ष असतं; मग ते फुलावर असो, प्राण्यावरलं असो, सृष्टीसौंदर्यावरलं असो, आईबापांवरलं असो, प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यावरलं असो, कूल, ज्ञाती, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो; नि:स्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते, असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे! कर्तव्याला कठोर व्हावं लागतं. पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
शब्दक्रम
मोरूने आधी एक ओळ लिहिली...
मोरूने आधी एक ओळ लिहिली:
'गुंडांच्या तावडीमध्ये लोकशाही'.
मग मोरू गंभीरपाने म्हणाला:
"गुंडांच्या तावडीतून लोकशाही सोडवायला,
शब्दांचा क्रमच आता बदलून टाकतो!"
शब्दांचा क्रम, मोरू बदलू लागला...
तावडीमध्ये गुंडांच्या लोकशाही!
लोकशाही, गुंडांच्या तावडीमध्ये!
गुंडांच्या, लोकशाही तावडीमध्ये!
लोकशाही तावडीमध्ये गुंडांच्या!
शब्दांचा क्रम जरी बदलला, तरीसुद्धा,,,
गुंडांच्याच तावडीमध्ये लोकशाही?
थक्क होऊन मोरूने आरशात पाहिले...
थक्क होऊन, मोरूने आरशात पाहिले.
आपला मोरू झालेला त्याला दिसला.
- मंगेश पाडगावकर
फारुख शेख वर चित्रित झालेलं हे गाणं...
सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है
दिल है तो, धड़कने का बहाना कोई ढूंढें
पत्थर की तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है
तनहाई की ये कौन सी, मंजिल है रफीकों
ता-हद-ये-नज़र एक बयाबान सा क्यों है
क्या कोई नयी बात नज़र आती है हममें
आईना हमें देख के हैरान सा क्यों है
चित्रपटः गमन
आमचे मित्र, तत्ववेत्ते नि मार्गदर्शक मा. श्री. मोदकराव (हो आपले धागाकर्तेच) ह्यांनी वादकौमुदिनी ह्या दीर्घांकात आंतरजालासंदर्भात मांडलेले काही विचार ;)
______________________________________________________
आपल्याला साधारणपणे ६ व्या ७ व्या वर्षी कळायला लागते व हळूहळू अक्कल येवू लागते. स्वभावाची जडणघडण तर गर्भामध्येच सुरू होते. आपली पुढच्या आयुष्यातली सर्व मते व विचार हे त्या त्या वेळी आलेल्या अनुभव + आपला स्वभाव यांवर अवलंबून असतात.
एखाद्याचा स्वभाव हेकट असेल व त्याला एका व्यक्तीककडून (त्याच्या दृष्टीने!) वाईट अनुभव आला तर ती व्यक्ती टुकार आहे हे मत लगेचच तयार होते व त्या व्यक्तीबाबतचे ते मत पसरवण्यामध्ये / समविचारी लोक शोधण्यामध्ये मेंदू गुंततो - हे सर्वसाधारण उदाहरण आहे.
अंतर्जालावर आपली मते रेटताना कुठे थांबावे हे कळणे फेस टू फेस वादापेक्षा वेगळे अस्ते कारण इथे समोर कोणी नसतो. फक्त मी आणि माझी स्क्रीन त्यामुळे विचार मांडताना ते साहजीकच टोकदार होतात. (मॅनेजरला किंवा अगदी हाऊसकीपींगला आपण आपल्या जागेवर जरी मनातल्या मनात शिव्या घालत असलो किंवा हार्ष बोलायचे ठरवत असलो तरी प्रत्यक्षात वयाचा आदर आणि समोरच्या माणसाला माणसाप्रमाणे वागवण्याचे संस्कार आडवे येतात व "मेसेज" पोहोचविला जात असला तरी तो थोडा आपुलकीने व गोडव्याने पोहोचविला जातो)
आणखी एक मुद्दा अहंकाराचा. मला अहंकार नाही - टॅबू नाही वगैरे म्हणणार्या मंडळींना "मला अहंकार नाही" या गोष्टीचा जास्त अहंकार असतो. आपण सर्वजण मर्त्य मानव आहोत. आहार निद्रा भय मैथून या चारही गोष्टींच्या आहारी जातो ही वस्तुस्थिती आहे, ही व अशा प्रकारची वस्तुस्थिती नाकारायचे काहीच कारण नसते मात्र निव्वळ अहंकारापायी एखादा मुखवटा चढवला जातो. या अहंकाराच्या जोडीला आपली भलावण करणारे चार लोक असतील तर क्या बात है!!
अशा परिस्थीतीमध्ये आपण लोकांची मते बदलण्यासाठी वेळ देणे कितपत शहाणपणाचे आहे? बरं वेळ देत असलीस तरी तू किती वेळ देणार? तो पुरेसा आहे का..? आणि असला तरी त्यातून साध्य काय..? वेळ घेणारी व्यक्ती खरोखरीच तुझी मते वाचून, नीट समजून स्वीकारेल हे शक्य आहे का..? विशेषतः वरती जे विचार निर्मीती चे सांगीतले आहे त्यावरून..
आणखी एक गोष्ट असते.. "मला तुझा आत्ता मुद्दा पटला आहे, परंतु मी सुरूवातीला विरूद्ध मत दर्शवले होते मग मी आत्ता तुझे म्हणणे मान्य करणे हा माझा पराभव ठरेल" हा माईंडसेट.
मी माझ्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीशी / बायकोशी वाद घालताना हा माईंडसेट पकडून चालणार नाही कारण मला जन्म त्यांच्या / तिच्या सोबत घालवायचा आहे. पण अंतर्जालावर काय.. अमुकशी मी बोललो काय आणि नाही काय.. मला फरक पडणार आहे का..?? (किंवा मोदकला डिलीट करून तुला फरक पडणार आहे का..??)
याचे उत्तर बहुदा नाही असेच असते कारण आपण येथे नाती जोडायला येत नाही. त्यामुळे वाद घालताना शब्दाचे कीस पाडत वाद वाढत जातात आणि अकारण आपली शक्ती वाया जाते. माणसे तुटतात ती वेगळीच! बरं.. ही शक्ती विधायक कामात लागत असेल तर ठीक आहे.. पण तू माझी मते बदलून किंवा मी तुझी मते बदलून मिळणार काय..?
आजच्या वादामध्ये मी तुला गप्प केले आणि माझा प्रतिसाद शेवटचा ठरला याचे तथाकथीत समाधान!!
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं
शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
- कुसुमाग्रज
धर्मानुशासन आजच्या मानवास पेलणेच शक्य नाही. त्याला पेलू शकतील एवढी धर्मबंधने शिथील केली, तर त्या अवस्थेत धर्मालाच रूप उरत नाही असे दिसेल. आजचा मानव म्हणूनच धर्माचे विडंबन करतो. धर्म नको म्हणणारा, धर्माचा द्वेष करणारा किंवा त्या उलट धर्माचे अवडंबर माजवणारा माणूस आज म्हणूनच पहावयास मिळतो. असे होण्यात विशेषेकरून त्याचा सत्यासमीप जाण्याचा स्वभावच उचंबळून आलेला असतो. आपण पौरूषहीन आहोत, हे ही त्याला मान्य नसते. अशा वेळी तो स्व-अस्मितेचा उदघोष करून, खोटेपणाने आपली न्यूनता झाकणारी विचारप्रणाली स्वीकारत असतो. 'धर्म नको' असे म्हणणे हे याच विचारप्रणालीचे रूप आहे.
आज सर्वत्र याच विचारप्रणालीचा हैदोस सुरू आहे. तथापि अशाही अवस्थेत, मानवाला सत्यासमीप नेणारी अशी काही सहजगम्य व्यवस्था संभवते का, हे शोधणे अत्यावश्यक झाले आहे. आजच्य शुष्कपौरूष मानवसमाजात निग्रह, संयम, दमन, पराक्रम इ. थोर धर्मांचा जरी क्षय दिसत असला, तरी आजच्या मानवामध्ये सत्यप्रीती (त्याला वाटते तशी!), प्रत्यक्ष निष्ठा, जीवनावरील प्रेम, ऐहिक भोगातील समता अर्थात् सुखदु:खातील आणि न्यायव्यवस्थेतील समता या गोष्टींची विशेष आवड आहे. ही दृष्यस्थिती दिव्य आचारांपेक्षा वास्तव विचारांकडे विशेष झुकलेली आहे, असे म्हणावे लागते.
हाच धागा धरून, शास्त्रीय जीवननिष्ठा म्हणजेच धर्म असा पर्याय स्थिर करून, जीवनवादाचा सिद्धांत आजच्या समाजास दिला पाहिजे. जीवनातील शास्त्रीय व्यवस्था जर आपल्या आचरणातून प्रकट करता आली तर 'शास्त्रनिष्ठेद्वारे धर्मानुशासन' या ऐवजी 'धर्मस्वरूप शास्त्रानुशासन' हे मानवसमूहाच्या उत्थानासाठी आज हिताचे आहे असे स्पष्ट दिसेल.
- 'संतधर्म जीवनदर्शन' - श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर
भारतीय तत्वचिंतन हे केवळ चिंतनासाठी चिंतन नसून त्याचा वापर प्रत्यक्ष जीवनात घडावा अशी अपेक्षा असते. या जीवनाच्या आचारालाच धर्म म्हणतात. तत्वज्ञानाची धर्माशी सांगड असणे हे भारतीय तत्वज्ञानाचे - दर्शंनांचे वैशिष्ट्य आहे. पाश्चात्य तत्वचिंतन हे धर्माशी संबंधित नाही, ते स्वतंत्र आहे. म्हणून त्या चिंतनातून जीवनप्रणाली निर्माण झालेली नाही. निष्प्राण, कोरड्या चिंतनापेक्षा, ज्यामुळे जीवन प्रगल्भ होईल असे व्यवहार्य, आचारप्रेरक चिंतन याचेच महत्व भारतीयांना वाटते. कारण सत्याधिष्ठित जीवनाचीच प्रतिष्ठा मानण्यात येते. तत्य हे जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. 'सत्ये सर्वं प्रतिष्ठितम्' हा भारतीय जीवनाचा मूलमंत्र आहे. म्हणून भारतीय तत्वचिंतनात विज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म यांच्यामधे सुसंवाद प्रस्थापीत करण्याचे सामर्थ्य आहे.
भारतीय दर्शने विविध असली तरी त्यांच्याकडे पाहण्याचा समन्वयात्मक दृष्टीकोन भारतीय तत्वज्ञानामध्ये मुळातच आहे. जे काही सत्य तत्व आहे, त्याकडे निरनिराळ्या पायर्यांवरून किंवा दृष्टीकोनांतून पाहता येते, त्याचे दर्शन घेता येते. त्यामुळे दर्शनांमधे वैविध्य असले तरी, त्या त्या भूमिकांवरून घडते ते सत्यदर्शनच होय. म्हणून सर्व दर्शंनांमध्ये सत्याचा ग्राह्य भाग असतोच. त्यामुळे आपल्याकडे 'षड्दर्शन्-समुच्चय-संग्रह' यासारखे ग्रंथ निर्माण झाले. भारतीय सर्व दर्शने मिळून समन्वयात्मक एक चित्र दिसते ही भारतीय चिंतनाची विशेषता आहे. 'एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति', म्हणजे सत्य एकच आहे, पण त्याची दर्शने विविध घडल्याने त्याची वर्णने बहुप्रकारांनी केली जातात. हा मुळातला ॠग्वेदाचा विचार भारतीय प्रगल्भ जीवनदृष्टीचा दर्शक आहे. संपूर्ण जीवनाचा साकल्याने विचार करणारी 'पुरूषार्थ कल्पना' ही एक फार महत्वाची अशी भारतीय जीवनदृष्टी आहे. दार्शनिक विविधतेतही ही एकता आहे. हे चार पुरूषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे होत.
'धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा:' (महाभारत) - ज्यामुळे सर्व प्रजेची, सृष्टीची धारणा होते त्या व्यवस्थेला धर्म असे म्हणतात. 'धर्मोSस्य विश्वस्य जगतः प्रतिष्ठा' - म्हणजे स्थावरजंगम अशा सर्व विश्वाची प्रतिष्ठा म्हणजे धर्म होय. धर्म हा कोणा प्रेषिताने, श्रेष्ठ पुरूषाने निर्माण केलेला नाही. ती नैसर्गिक व्यवस्था आहे. या अर्थाने धर्म अपौरूषेय आहे. सर्व मौलिक सत्य अपौरूषेयच असते. त्याचा द्रष्टा कोणी असामान्य असू शकतो. जसे वैदिक ऋषी होते. सर्व चराचर सृष्टीशी तादात्म्य पावणारा हा धर्म व त्यातून उदित झालेली 'वसुधैव कुटुंबकम्' ही विश्वकुटुंबवादी जीवनदृष्टी ही भारताची उत्तुंग महानता आहे.
- 'संतधर्म जीवनदर्शन' - श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर
चुकली दिशा तरीही - विंदा करंदीकर
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?
केवळ अप्रतिम; अविश्वसनीय प्रवास सुरू आहे या धाग्याचा!!!!!
या क्षणी प्रतिसादकांचे आभार मानण्याऐवजी सर्वांच्याच ऋणात राहणे आवडेल!
मला धन्यवाद देणारेही अनेक प्रतिसाद आहेत, गविंच्याच "संपादकीय" भाषेमध्ये बोलायचे तर...
या धाग्यात मी नेमकं काय केलं..?
समुद्रात मोती बनताना शिंपल्याच्या आत वाळूचा एक कण शिरतो. तो शिंपल्यातल्या ऑयस्टरला बोचत राहतो. मग एरवी शांत असलेला ऑयस्टर त्या वाळूच्या कणाभोवती थरावर थर देऊन सुंदर मोती बनवतो.
मोती किती सुंदर बनला आहे ते तुम्ही ठरवा. पण तो मी बनवला नाही. मी त्यातला वाळूचा बोचरा कण फक्त.
माझ्या काही अटी होत्या...
ऑपरेशन सुरु असतांना
माझा कवी मित्र
ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित हवा...
मला अॅनेस्थेशियात टाकलं जाऊ नये...
माझ्या आवडत्या कवींच्या कविता
ऑपरेशन सुरु असतांना मित्राला म्हणू द्याव्यात...
माझ्या छातीवरचे केस काढले गेले...
मी उताणा...
वर मोठ्ठा लाईट....
बाजूला ऑक्सिजन सिलिंडर्स...
चकचकीत शस्त्रास्त्रं....
पांढरे अॅप्रन्स.....
पांढरे रबरी हॅण्डग्लोज घातलेले डॉक्टर्स.. नर्सेस...
उशाला कॉम्प्युटराईज्ड टी. व्ही.
त्यावर आडव्या-तिडव्या रेषेत धावणारा बिंदू....
हा माझा श्वासोच्छवास म्हणे...
टी. व्ही. वर बघूनच त्यांची फ्रिक्वेन्सी कळ्ते....
(साले... ऑपरेशन करणार आहेत
की टी. व्ही. बघत बसणार आहेत...)
'ऐलतटावर-पैलतटावर हिरवळी घेऊनी
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी'
मित्राने कविता सुरु केली...
डॉक्टरांनी छातीत सुरी खुपसली...
वरचं मांस कापून बाजूला केलं....
फासळ्या ड्रिल करुन मोकळ्या केल्या....
धडक....धडक....धडक....धडक....धडक....
त्यांना दिसला लाल रंगाचा मुठीएवढा गोळा...
माझ्या डोळ्यात कॄतज्ञता उतरली....
हो सालं...
नाहीतर... आजकाल कोण इथपर्यंत पोहोचतो....
'सीझर' डॉक्टर म्हणाले....
अगदी अलगद हृदयात खुपसून....
ते हृदय कापू लागले....
चुळ्ळ्कन रक्तांचं कारंजं उडालं.....
जमिनीवर लाल थारोळ....
'झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
जळात बसला पाय टाकुनी असला औदुंबर'
मित्र आता डोळे मिटुन कविता म्हणत होता.
मोडकळीस आलेल्या घराची झडप डॉक्टरांनी उघडली...
आणि अचानक काही प्रेतं बाहेर पडली....
पैकी...
फक्त दोघांची ओळख पटली
एक माझ्या जुन्या मित्राचं होतं...
आणि दुसरं होत माझ्या प्रेयसीचे.....
ही प्रेतं माझ्या नकळत मी का वाहत होतो?
इतक्यात....
एक, दोन, पाच, वीस, पंचवीस.. अरे?
जिवंत माणसांचे कळपच्या कळप
माझ्या हृदयातुन बाहेर पडुन सैरावैरा पळू लागले...
जणू इतकी वर्षं बळजबरीनं
मीच त्यांना कोंडून ठेवलं होतं....
हळूहळू....
माझ्या रक्तात माखलेल्यांनी...
सारं ऑपरेशन थिएटर भरुन गेलं...
रोगी दगावेल म्हणून
त्यांच्यातून वाट काढत
डॉक्टर बिघाड शोधत होते....
'ही अफाट गर्दी कोलाहल कल्लोळ
आश्चर्य! अरे बघ गेला याचा तोल...'
तशातही...
मित्र कविता म्हणतच होता....
'दे विश्ड दे कुड फ्लाय अवे
अँड नॉट सिंग बाय माय हाऊस ऑल डे...
अँड अफकोर्स देअर मस्ट बी समथिंग राँग
इन वाँटींग टू सायलेन्स माय साँग...'
शेवटी सारे निघून गेलेत....
कच्चे टाके घातलेलं हृदय घेऊन मी पडलोय...
संपूर्ण रिकामा झालोय...
हा रितेपणा मला वेडही लावील....
म्हणूनच.....
मी उद्या राजस्थानच्या रेताड प्रदेशात जाणार आहे....
कच्चे टाके उसवून...
हृदयात खचाखच रेती भरुन घेणार आहे...
उरलेल्या सर्व वर्षांपूरती
आता, माणसांची वाट पाहण्यात अर्थे नाही....
आता, या क्षणी मला काहीच जाणवत नाही आहे....
पण,
कुठुन तरी, कुणीतरी डेस्परेटली गातोय....
'वुड्ज आर लव्हली डार्क अॅण्ड डीप
अॅण्ड आय हॅव प्रॉमिसेस टू कीप
अॅण्ड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप
अॅण्ड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप...'
-सौमित्र
नदी सागरा मिळ्ता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर
काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो, जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेपायी, रुप वाफ़ेचे घेउन
नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून
पुन्हा होउन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा.
-गदिमा
To Be or not to be That is the Question
जगावं की मरावं हा एकच सवाल
या दुनियेच्या उकिरडयावर
खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून ध्य़ावं देहाचं लक्तर
त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या कळ्याशार डोहामध्ये ?
आणि करावा सर्वोचा शेवट एकाच प्रहारानं माझा तूझा आणि त्याचाही.
मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही
पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ,
तर - तर इथंच मेख आहे .
नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने जागेपण
प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्वाची विटंबना
आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .
विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला,
आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला जन्मं दिला तो तु ही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !
- वि वा शिरवाडकर (नटसम्राट)
जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच !
कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही."
"म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?"
"ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं ! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, न्हेरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची !"
"मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला ?"
"खुळे की काय तुम्ही ! विश्वेश्वर घट्ट आहे राजिवड्यावर ! अहो, एक खेळ करून दाखवला त्यानं."
"दीडशे वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ ?"
"'अहो दीडशे वर्षं तुमची ! ब्रह्नदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय !"
कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."
अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते.
आताशा बुडणार्या सूर्याला
"बरंय, उद्या भेटू" असं म्हणालो
की तो मला म्हणतो
"कशावरून? मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे?"
सूर्य आताशा म्हातारा झालाय
--
पु ल दे
ही कविता ऐकता, वाचताना दर वेळी मन भरुन आल्याशिवाय रहात नाही!
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात ॥धृ.॥
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.
सन १८१८ नंतर मराठी साम्राज्याची जी वाताहत झाली त्याची वर्णनं तत्कालीन शाहिरांनी केली आहेत. राजाश्रय संपल्यामुळे त्यांचा बिचार्यांचा तर बाजारच उठला. अशाच एका तंतकवीने केलेलं वर्णनः
सकळ रायांत म्हणविती श्रेष्ठ जे राय ।
दिवस सोन्याचा दर्शने जयाच्या जाय ॥
असले गेले टाकून हवेल्या पागा ।
खराटे झाले उदकाविण सुकल्या पागा ॥
प्रतिक्रिया
मस्त धागा
शब्दक्रम
आमच्या आवडीचं येक...
आमचे मित्र, तत्ववेत्ते नि
क्या बात है !!!!!!!!
+१
अध्ये मध्ये मोदकाने ही हे
अजून नाही..
पुरे झाले चंद्रसूर्य
.
.
विचार करायला लावणारे.
चुकली दिशा तरीही - विंदा
केवळ अप्रतिम; अविश्वसनीय
माझ्या काही अटी होत्या...
नदी सागरा मिळ्ता, पुन्हा
To Be or not to be That is
अंतुबर्वा
आताशा बुडणार्या सूर्याला
स्पॅमासुरांच्या हल्ल्यातही
ही कविता ऐकता, वाचताना दर
सन १८१८ नंतर मराठी
Pagination