छान सुरुवात! अशीच समर्थ रामदासांची करुणाष्टके आठवतात. माझी आजी रोज संध्याकाळी आरती करायची. तेव्हा आरती संपताना ही करुणाष्टके म्हणायची. आपोआप पाठ झाली होती.
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया |
परम दीन दयाळा नीरसी मोह माया ||
अचपळ मन माझे नावरे अवरीतां |
तुजविण शीण होतो धाव रे धाव आता ||१||
भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला |
स्वजनजन धनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ||
रघुपति मति माझी आपुलीशी करावी |
सकळ त्यजुनि भावे कास तुझी धरावी ||२||
विषय जनित सुखे सौख्य होणार नाही |
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही ||
रवि कुळ टिळका रे हीत माझे करावे |
दुरीत दुरी हरावे स्वस्वरुपी भरावे ||३||
तनु मनु धनु माझे राघवा रुप तूझे |
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे ||
प्रचलित न करावी सर्वथा बुध्दि माझी |
अचल भजन लीला लागली आस तूझी ||४||
चपळ पण मनाचे मोडितां मोडवेना |
सकळ स्वजन माया तोडविता तोडवेना ||
घडि -घडि विघडे निश्चय अंतरीचा |
म्हणुनि करुणा हे बोलतो दीन वाचा ||५||
जळत ह्रदय माझे जन्म कोट्यानुकोटि |
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी ||
तळ मळ निववी रे राम कारुण्य सिंधू |
षडरिपू कुळ माझे तोडि याचा समंधु || ६||
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी |
सिणत -सिणत पोटी पाहिली वाट तुझी ||
झडकरी झड घाली धांव पंचानना रे |
तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ||७||
सबळ जनक माझा लावण्य पेटी |
म्हणौनि मज पोटी लागली आस मोठी ||
दिवस गणित बोटी प्राण ठेवुनि कंठी |
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ||८||
जननि जनक माया लेकरु काय जाणे |
पय न लगत मूखे हाणतां वत्स नेणे ||
जळधर कण आशा लागली चातकासी |
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ||९||
तूजविण मज तैसे जाहले देवराया |
विलग विषम काळी तूटली सर्व माया |
सकळ जन सखा तू स्वामि आणीक नाही |
वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही ||१०||
स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे |
रघुपति आतां चित्त कोठे न राहे |
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती |
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ||११||
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे |
जिवलग मग कैचे चालते हेचि साचे ||
विलग विषम काळी सांडिती सर्व माळी |
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ||१२||
सुख-सुख म्हणता दु:ख ठाकुनि आले |
भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ||
भ्रमित मन वळेना हीत ते आकळेना |
परम कठिण देही देह बुध्दि गळेना ||१३||
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी |
सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी ||
घडि-घडि मन आतां राम रुपी भरावे |
रविकुळटिळका रे आपुलेसे करावे ||१४||
जळचर जळ वासी नेणती त्या जळासी |
निसिदिन तुजपासी चूकलो गूणरासी ||
भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी |
सकल भुवनवासी भेटि दे रामदासी ||१५||
पु.लं.
पुलंचे एक पत्र
पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.
त्यास पु लं. नी दिलेलं उत्तर -
१० जुलै १९५७,
प्रिय चंदू
तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?
पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.
तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.
पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?
तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.
तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!
तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.
तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.
तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.
My dear boy, whose deaths are justifiable?
माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.
भाई.
लखलखता हिरा हातात आणून दिलात! अनेक धन्यवाद. पुलंच इतक लेखन वाचलं असं वाटतं आणि कधीतरी असा लेख वाचल्यावर खजिना सापडल्याचे सुख मिळते. अनेक धन्यवाद मन्द्या.आणि परत एकदा मोदक यांचेही आभार.
प्यीयेल यांच्या लेखन संसारावर , त्यांच्या काही स्वभाव विशेषांवर टीका करणारे लोकही आहेत. पण मी तरी त्याना माझ्या निवडक अध्यात्मिक गुरूंपैकी मानतो. ( त्यांचाच व्यक्तिपूजेला विरोध असल्याने नमस्कार , स्वाक्षरी यासाठी मी त्याना पुर्या जिंदगीत कधीही भेटलो नाही. हे पत्र वाचून आपली निवड चुकली नाही याची खात्री पटली.
आयुष्य म्हणजे एक सांजवेळ, नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र.
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता.
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी.
आयुष्य म्हणजे जीवधनचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वत:च्या हातावर पेललेला तुमचा भार.
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर.
आयुष्य म्हणजे पावनखिंड, हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा.
आयुष्य म्हणजे एक रात्र, चार मित्र , नाणेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी.
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ, कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास.
आयुष्य म्हणजे नळीची वाट, कोकणकडा आणि तारामती मंदिर.
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली " क्षत्रियकुलावतंस....." आरोळी.
आयुष्य म्हणजे वासोटा, चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य.
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज.
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड.
आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री....
(जालावरच्या माझ्या आवडत्या फोटोसह आवडत्या ओळी..)
तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा
रानफुलें लेऊन सजल्या, या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी, मला जाऊ दे रे
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झर्यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारें
तुझे प्रेम घेऊन येती गंध धूंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या, तुला वाहू दे रे!
---मंगेश पाडगांवकर.
दासबोध वाचताना रोजचा/चे १/२ समास वाचून संपल्यावर
>>>>जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ
ह्या ओवीपासून शेवटपर्यंतच्या १३ ओव्या म्हणण्याची प्रथा आहे. आक्खा ७७५९ ओव्यांचा ग्रंथ लिहून झाल्यावर
>>>>सकळ करणें जगदीशाचें | आणी कवित्वचि काय मानुशाचें | ऐशा अप्रमाण बोलण्याचें | काये घ्यावें
म्हणणारे समर्थ रामदास आमच्यासाठी एक आदर्श ठेवतात.
(आम्ही एक लेखमाला लिहीली की 'फुगतो')
इयत्ता सहावी किंवा सातवी मध्ये असताना एका काव्यगायन स्पर्धेसाठी हे संपूर्ण गीत तोंडपाठ केले होते..
_________________________________________________________
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला
या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला
वेडात मराठे वीर दौडले सात.. ऐकले की न चुकता हे ही आठवले जाते..
********************************************************
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती
आईच्या गर्भात उमगली झूंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घे़ईल अशी पहाडी छाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती
झुंजाव वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी इसरू माया, ममता नाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती...
--- शांता शेळके
प्रातःस्मरण म्हणूनच म्हटले जाते एकात्मता स्तोत्र..
पहिली ओळ अशीच म्हटली जायची. पण संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने ते जरा चुकीचे वाटत असल्याने ती ओळ बदलली होती काही वर्षांपूर्वी.
" आपल्या आयुष्यात इसेन्शिअल्स असतात, तशीच नॉन - इसेन्शिअल्स असतात. पैकी, आयुष्यातल्या उच्च बाबींबर तडजोड करु नये. मामुली बाबींबर तडजोड केल्यामुळं काही बिघडत नाही. शुद्ध अभिजात कविता हे माझ्या आयुष्यातलं प्रधान अंग आहे. तिथं मी कालत्रयी तडजोड करणार नाही; कधी केलेलीही नाही. अभिजात कविता साहित्यात मोडते.
माणसाने प्रथम इसेन्शिअल्स कुठली, ती ठरवून त्यांचा अग्रक्रम निश्चित केला पाहिजे. मग गोंधळ होत नाही. ज्यामुळे तुमचा विकास होईल, तिथे तडजोड नसावी. तसा मी फार सोवळा नाही. नीतीग्रस्त व्यक्तिमत्वाने पछाडलेला नाही. भीतीच्या पोटी जन्मलेली नीतीमत्ता मला नामंजूर आहे. माणसाकडे स्वतःची म्हणून चिंतनसिद्ध, अनुभवसिद्ध अशी नैतिक मूल्यं असावीत आणि ती त्याने स्वतःला आणि इतरांना समदृष्टीने लावावीत. जे स्वातंत्र्य मी भोगलं, ते मी इतरांनाही लुटू देईन. पर्सनल गॉडवर माझी श्रद्धा नाही, पण देव आहे. दैव आहे. पावलोपावली मला त्याचा प्रत्यय येतो."
- कवी बोरकर (रवींद्र पिंगे ह्यांच्याशी गप्पा मारताना.)
......यातला गमतीचा भाग सोडा, पण या सगळ्याला कुठे तरी वेदनेचीही किनार आहे. आपण सगळंच सुधारू शकत नाही. आर्थिक गणित सोडवू शकत नाही. समजुतींचा गुंता सोडवू शकत नाही. या माझ्या कोकणातल्या बायकांचे कष्ट कमी करू शकत नाही. उलट त्यांच्या वेदनेवरच आपला आर्थिक स्रोत आधारित आहे या भावनेने मी खूपदा वैफल्यग्रस्त झालो आहे.
असो, पण तरीही आमच्या कोकणातल्या बाईच्या डोक्यावर एक तरी फूल माळलेले असते, तोंडात पान असते आणि हातात तिचे फळ म्हणजे मूल असते. अशी पान, फूल, फळवाली माझी कोकणी आऊस, बहीण, वयनी माझ्याच कुटुंबाचा भाग झाली आहे. ही स्त्री खरोखरच कर्तृत्ववान आहे. परिस्थितीने तिला चाणाक्ष केले आहे. भाजावळीपासून ते झोडणी-मळणीपर्यंत ती भातशेतीत राबते, अंगण स्वच्छ सारवते. संध्याकाळी तुळशी वृंदावनावरचा दिवा चुकवत नाही. कुळथाची पिढी, भात, पेज, डाळ रांधते. मच्छीकढी बनवते. कधी तरी थोडय़ाशाच चिकनमध्ये मस्त सागुती बनवते. पोरांचा अभ्यास घेत नाही, पण त्यांना अभ्यासाला बसवते. या स्त्रीविषयी मला फार फार आदर आहे. कवी वसंत सावंतांची एक कविता आहे-
अशा लाल मातीत जन्मास यावे
जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते भारतीय संस्कृती
घरातुनी, दारात वृंदावना!!
अपर्णा ताईने रंगवलेली कोल्हापुरची नवरात्र !! आजच आणि कालच चित्र !! ....http://www.misalpav.in/node/14920
या माळेच्या साथीन आणखी एक माळ सुरु असायची 'हादग्याची'. तुम्ही ज्याला भोंडला म्हणता त्याला आम्ही रानची माणस 'हादगा' म्हणतो.आमच नात 'हस्त' नक्षत्राशी म्हणून हादगा. तर पहिल्या दिवशी फक्त एक गाण, मग दुसऱ्या दिवशी दोन असं करत नवव्या दिवशी नऊ गाणी म्हंटली जायची. छोटी मोठी खिरापत वाटली जायची.
नवमीला शस्त्र पूजा. घराच्या भिंतीत एक माणूस चालत आत जाईल अश्या कपाटातून , तलवारी, भाले, जंबिया , दांडपट्टा, अन दोघं दोघं मिळून उचलाव्या लागणाऱ्या ढाली! अशी शस्त्र बाहेर काढून, स्वच्छ केली जायची. ढाली भरपूर तेल घालून अन वरचे पितळी छाप उजळवून घ्यायच्या. तलवारी पण अश्याच स्वच्छ करून हे सार सतरंजीवर मांडायचं. त्यात मग आमची पुस्तक पण ठेवली जायची. गुलाल उधळून मग या शस्त्रांना कोंबडा कापला जायचा.
दसऱ्या दिवशी मात्र सकाळी पोळ्या अन दुपारी बळी पडून संध्याकाळी ते मटण असायचं.
संध्याकाळी एकच गडबड उडायची. सारेजण शिलंगण करून मग थोड्या अंतरावरच्या निर्जन माळावर असलेल्या भैरीच्या देवळाला जायला निघत. गावातून दोन चार बैल गाड्या जुंपून ही मंडळी तुफान उधळत रात्री मंदिर गाठत. वाटेवर अजूनही असलेला चिख्खल, बाजूच्या शिवारातून उचललेल्या कोवळ्या भुईमुगाचे वेल, अन तशीच दुध कोवळी कणस, हे सार 'सोन' म्हणून वाटलं जायचं. घरात येणारा प्रत्येक जण चिखलाचे पाय घेऊनच घरात शिरत असे. लहाण थोर सारे एकमेकांना थोडीफार शमीची पान नाहीतर, हे बाकीचच कौतूकान देत घेत असत. शेवटी भावनेला महत्व नाही का?
उनक ( उपेक्षित नवरे कमीटी) चे संस्थापक अध्यक्ष व लेखणीतुन हळुच गुदगुल्या करणारा लेखक आदिजोशी ने दिलेल्या निर्लज्जपणा च्या टिपा ... ;)
http://www.misalpav.in/node/14656
घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन
स्थळ - अर्थातच ऑफिस
वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.
पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt + Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.
बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी. फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत. बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात... मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून ८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८ जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?
तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो तुमच्या किबोर्डवर कोसळतो.
तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.
लिखाळ गुर्जींनी कमीत कमी शब्दात मुक्तपिठीय लेखनाला मारलेला टोमणा ( लिंक नको कारण लेख च ईतकाच आहे. )
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात.
झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला. अपमान गिळून मी कसाबसा चेहरा लपवत जागेवरून उठलो तरी त्या बाईंचे शिव्याशाप चालूच होते. लग्गेच बसमधून उतरावे असे मनात येत होते पण काय करणार.. इलाजच नव्हता.
पुढल्या एका बाकावर एक आज्जी बसल्या होत्या. त्या सर्व प्रकार पाहत होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून एक हलकेसे स्मितहास्य केले आणि म्हणाल्या 'जाऊदे ! मनाला नको लाऊन घेऊ.' त्यांच्या त्या दिलासा देणार्या हास्याने मला फार फार बरे वाटले. फार गोड आज्जी होत्या. पुढचा प्रवास माझा एकदम हलक्या मनाने झाला. स्मितहास्याची जादू होती. उतरताना मी त्या रागावणार्या काकूंकडे हसून बघितले. त्यांना माझे वागणे एकदम आश्चर्याचेच वाटले. त्या खजिल झाल्या. बाकावरल्या आज्जी हे पाहत होत्या. उतरताना नुसती आमची नजरानजर झाली. आणि त्यांच्या चेहर्यावरचे ते स्मित मी पुन्हा एकदा जपून ठेवले माझ्या मनाच्या कुपीत.
कुणीतरी हवं असतं
स्मितहास्य करणारं
हलकेच हसून आपले
आसू पुसणारं.
हा धागा म्हणजे साहित्य प्रेमींसाठी पर्वणीच ठरावी. सबब 'पर्वणी' नावाचीच एक कविता सादर आहे.
कवि- वि वा तथा तात्यासाहेब शिरवाडकर - कुसुमाग्रज- पुस्तक- छंदोमयी
पर्वणी ...
व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर |
संताचे पुकार वांझ झाले ||
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग |
दंभ शिगोशीग तुडुंबला ||
बँड वाजविती सैंया पिया धून |
गजाचे आसन महंतासि ||
भाले खडग हाती नाचती गोसावी |
वाट या पुसावी अध्यात्माची ||
कोणी एक उभा एका पायावरी |
कोणास पथारी कंटकाची ||
असे जपीतपी प्रेक्षकांची आस |
रुपयांची रास पडे पुढे ||
जटा कौपिनाची क्रीडा साहे जळ |
त्यात होत तुंबळ भाविकांची ||
क्रमांकात होता गफलत काही |
जुंपली लढाई गोसाव्यांची ||
साधु नाहतात साधु जेवतात |
साधु विष्ठतात रस्त्यावरी ||
येथे येती ट्रक तूपसाखरेचे |
टॅकर दुधाचे रिक्त होती ||
यांच्या लंगोटीला झालर मोत्याची |
चिलिम सोन्याची ज्यांच्यापाशी ||
येथे शंभराला लाभतो प्रवेश |
तेथे लक्षाधीश फक्त जातो ||
अशी झाली सारी कौतुकाची मात |
गांजाची आयात टनावारी ||
तुका म्हणे ऐसे मायेचे मईंद |
त्यापाशी गोविंद नाही नाही ||
वरील कवितेत कवि कल्पना वगैरे काही नाही. हात चांदण्याचे वगैरे काही नाही. आयुष्याचा उतरार्धात कुसुमाग्राजांच्या मनाने काव्यरूपात समाजातील उदेकांचा, विसंगतिचा, दैन्याचा, ढोंगाचा ठाव घेण्याच्या प्रयत्न केलेला दिसतो. कुंभमेळ्यात हवशे नवशे गवशे सगळेच गर्दी करतात .गोविंदाच्या दशेनाची खरोखरची आस घेऊन किती येत असतील ?
याचा शोध त्यांच्या या विदारक वर्णनात आढळतो. तात्यासाहेंबांना कोणत्याही शब्दाचे काव्यासाठी वावडे नाही.याचा प्रत्यय या कवितेतील काही शब्दाकडे लक्ष दिल्यास येईल.
ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही... आणि हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन.. झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...आभाळातून गळणार्या बर्फाच्या चुर्यासारखं सैरभैर पांगतं मन...बर्फाच्या त्या चुर्यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन... आपलीच पाऊलनक्षी बघत गिरकी घेतं मन..पनगळ बघताना सुन्नाट झालेलं मन हरवतंच मग नकळत..
त्या पाऊलनक्षीचं एवढं वेड लागतं की तिथे एक पायवाटच बनते..मग पावलं उमटत नाहीत त्या घट्ट झालेल्या बर्फावर..आणि मग एक दिवस तिथूनही मन निसटतं !
अचानक त्याच्या लक्षात येतं, सूर्य हरवलाय ! म्हणून सावलीही ! हळुहळू काळोखाची चादर सवयीची होते. मऊ भासते. ओळखीच्या गंधात आपल्यातच घुटमळत रहातं मन...
रोजच्या वाटेवरचं झाड तपश्चर्या करताना बघणं हा एक आपला खेळ...तेवढंच त्या झाडाला गोंजारणं, कधीतरी त्याला हात लावून धीर देणं..
आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात..झाडही कसल्याशा लाजर्या आनंदात हात अजून उंचावलेले दिसते ! पाखरं परतलेली दिसतात एक दिवस.. मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... ! पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..बदललेल्या ऋतूचं गाणं....
ओह्ह..अंधाराचं पांघरूण विरतंय नि नवनवे गंध पसरतायत अवतीभवती..सावली परतली..म्हणजे सूर्यही...
मन स्वार होतं पाखरांच्या निळ्या पंखांवर..आणि सज्ज होतं हळुच फुलणार्या हजारो कळ्यांच्या स्वागतासाठी..
ह्म्म... ऋतू बदलतात..हरवतातही....सापडतातही !
:-)
लेखिका - मितान
http://www.misalpav.com/node/16561
रोजच्या वाटेवरचं झाड तपश्चर्या करताना बघणं हा एक आपला खेळ...तेवढंच त्या झाडाला गोंजारणं, कधीतरी त्याला हात लावून धीर देणं..
आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात..झाडही कसल्याशा लाजर्या आनंदात हात अजून उंचावलेले दिसते ! पाखरं परतलेली दिसतात एक दिवस.. मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... ! पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..बदललेल्या ऋतूचं गाणं....
क्या बात है ! मितानची लेखणी...व्वा !! लिंकबद्दल धन्स ...
मराठी समाजाचा भविष्यकाळ कसा असेल, याबद्दलचे बहुसंख्य अंदाज आशादायक नाहीत. वर्तमानकाळही निराशाजनक, काहीसा दळभद्री असाच आहे. राहता राहिला भूतकाळ. तर मराठी समाजाचा भूतकाळ उज्ज्वल, देदिप्यमान, 'गर्व से कहो' म्हणण्यासारखा होता, असं मानणं ही आपली भावनिक गरज आहे! (नाहीतर आहे काय अर्थ, या अस्तित्वाला?)
"अंताजीची बखर" या कादंबरीची प्रस्तावना. लेखकः नंदा खरे
अंताजीची बखर एक सर्वार्थाने वेगळी कादंबरी म्हणून नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पण मराठी समाजाचा भूतकाळ काही वर्षांसाठी तरी नक्कीच देदीप्यमान होता-गर्व से कहो म्हणण्यासारखा होता हे तर ढळढळीत सत्यच आहे. वर्तमानकाळ गंडला आहे सबब कैकदा स्मरणरंजन ही भावनिक गरज होते हे मान्य असलं तरी वरच्या परिच्छेदातून "खरं तर तसं काही नव्हतं पण गरज आहे म्हणून, बाकी काय...." असा सूर जाणवतोय आणि तो चुकीचा आहे. असो.
तुम्ही म्हणता ते १००% बरोबर आहे. खरंच आभाळाएवढी माणसं आपल्याकडे होऊन गेली. पण काही गटारतुल्य माणसंही झाली. एक परिपक्व समाज म्हणून थोरांची स्तोत्रं गाण्याबरोबरच चोरांची कृष्णकृत्यंही आहे त्या पद्धतीने मांडली गेली पाहिजेत. आपल्याकडे दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. "इतिहास न जाणणार्यांच्या नशिबी त्याची पुनरावृत्ती करणं लिहिलेलं असतं."* असं एक बुवा म्हणून गेलेले आहेत. मराठी समाज त्याच दिशेने चाललाय. अशा वेळेला "अंताजीची बखर" सारखी डायरेक मुद्याला हात घालणारी कादंबरी मोलाची वाटली.
अवांतरः अंताजी पार्ट २ "बखर अंतकाळाची" कशी आहे? हे संपल्यावर ते वाचीन म्हंटो...
*"Those who don't know history are destined to repeat it." - Edmund Burke
इंग्रज आजचे नाडलेल्यांस झुकतें माप देईल,
की त्यास आजचे राजासरजांस मोडणे आहे.
तो कलागती लावेल, की एका एकजूट शंभरांस
सांभाळणेपेक्षा शंभर अलगविलगांस राखणें सोपें.
तर तो हरावा कसा? सोपें!
तो हरेल, इथले काळे एकमेकांस धरून
बाहेरच्यांस परास्त करतील, तेव्हा!
परंतु तो हरावा तरी कशासाठी?
जर इंग्रज रुपयांत बारा, चौदा आण्यांस नीट राखेल,
तर बाकी दोचार आण्यांस कोण आईकणार?
तर इंग्रजास पुणें शहर, पेशवाई, मराठशाई,
कोणी नाकारणार नाहीत! बलावून घेतील!
मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी आहे ही. बखर अंतकाळाची.
चित्रपट प्रपंच - दिग्दर्शक- मधुकर पाठक. गीतकार - ग दि माडगूळकर , संगीत -व गायक - सुधीर फडके
चित्रपटात - एक याचक रस्त्याने याचना करीत काही मागत चालला आहे. लोक यशाशक्ती त्याला काही देत आहेत.अशी
सिच्वेशन आहे. अण्णा माडगूळकरानी मात्र ही संधी साधून सामान्य माणूस ईशवराकडे काय मागतो ते मागंणे अध्यात्मिक रित्या किती सहज व योग्य आहे ते पहा-
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
हवाच तितुका पाडी पाउस देवा वेळो वेळी
चोची पुरता देवो दाणा माय माउली काळी
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी १
महाला माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजे पुरती देई वसने जतन कराया काया
एकवितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी २
सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दु:ख ईश्वरा रंक करी वा राजा
अपुरे पण हे नलगे मजला पस्तावाची पाळी
देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ३
आजच्या सेकंड होम, थर्ड होम , पंचवीस पन्नास साड्या, अंग झाकून टाकतील ( अन चोरांच्या नजरेत आपसुक भरतील) एवढे दागदागिने, गाड्यांचा ताफा, दहा दहा स्वेटर. पाच पाच बेल्ट, वाढदिवसांची, पार्ट्यांची रेलचेल या जमान्यात बेसिक जीवन जगणे किती सोपे होते व असते . याचा पाठ इथे मिळावा या काव्यात. शबदकळा ही पहा- चोच आली की दाणा आला घास नाही. देवा, नाथा, ईशवरा ई सवेशाची नामाभिधाने किती चपखल पणे येतात !
प्रतिक्रिया
सुरुवात पसायदानाने करुयात.
वा!
mast aaThavaN!maazyaa
मिपावरील अध्यात्मपटूंसाठी
पु.लं.
वा! वा!
पु. लं. चं पत्र
खरचं
पु.ल. आवडतात ते अशाच
प्यीएल , काय बोलू ?
ज्या दिवशी जन्माला येणं
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू.हे वाक्य म्हणजे केवळ पुल, बस !आयुष्य म्हणजे एक सांजवेळ,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती
तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ
दासबोधातील मूर्खांची लक्षणे
दशक २० समास १०
दासबोध वाचताना रोजचा/चे १/२
इयत्ता सहावी किंवा सातवी
आत्मबल
विचित्र वीणा
हा धागा बहुदा "कविता स्पेशल"
वेडात मराठे वीर दौडले सात..
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट
अगदी गोड!
एकात्मता स्तोत्र...
सकाळी सकाळी काळी टोपी, पांढरा
शर्ट
याची पहिली ओळ बदलून 'ओम्
याची पहिली ओळ बदलून 'ओम्
प्रातःस्मरण म्हणूनच म्हटले
माफ करा
नमस्ते
" आपल्या आयुष्यात इसेन्शिअल्स
आऊस, बहीण अन् वयनी
रात्र-उत्तररात्र मधल्या रॉय
हे उतारे काही मिपाच्या समृध्द लिखाणातुन .....
पर्वणी...
वा! नेमकी आणि सुरेख.
ऋतू बदलतात...
रोजच्या वाटेवरचं झाड
स्वयंवर झालें सीतेचे
भुई भेगाळली खोल, वल्लं र्
मराठी समाजाचा भविष्यकाळ कसा
अंताजीची बखर एक सर्वार्थाने
तुम्ही म्हणता ते १००% बरोबर
अर्थातच-पूर्ण सहमत!
इंग्रज आजचे नाडलेल्यांस
सुरेश भट
श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय १८
पोटापुरता पसा पाहिजे ...
Pagination