Welcome to misalpav.com
लेखक: जागु | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खुप छान वाट्ले वाचुन. मी आज्जी बरोबर तिच्या माहेरी जात असे तेव्हा रोज चुलीवरचे जेवण खुप आवडायचे. आज्जीपण मी लहान होते तेव्हा कधी कधी चुलीवर करायची स्वयंपाक.

लेख आवडला. पण एक प्रश्न पडला - चुलीसाठी तुम्ही लाकडं कुठून आणता? कोणती लाकडं वापरता?

मला माझे बालपणच आठवले. अगदी तंतोतंत सर्व नसले तरी अर्ध्यांहून जास्त अनुभव मलाही लाभले. आमच्या घराच्या ओट्यावर, चांगला ७-८ फुट रुंद आणि २५ फूट लांब, ताई आणि तिच्या मैत्रीणी भातुकली खेळायच्या. त्यात गुळ, शेंगदाणे, पोहे वगैरे पदार्थ (खरे) असायचे मला त्याचा मोह असायचा. त्यांमुळे मीही त्यांच्या खेळात सामील व्हायचा प्रयत्न करायचो. ताईच्या मैत्रीणी ह्याला आक्षेप घ्यायच्या. ताईलाही कानकोंडं व्हायचं. मग ती आईकडे तक्रार करायची. आई तिला समजावयाची,' अग! घे त्याला खेळायला. तो काही त्रास द्यायचा नाही. लहान भाऊ आहे नं तुझा?' ताई वैतागायची, 'अग पण तो मुलगा आहे. मुलींमध्ये का खेळतो? मला माझ्या मैत्रीणी हसतात.' मग आई तिला कांही तरी 'कानमंत्र' द्यायची. आईने काय सांगितलं हे मला कळायचं नाही. पण गुळ, शेंगदाणे आणि पोहे मला खुणावत असायचे. मला खेळात सामावून घेताना ताई मला बाजारहाट करायला पाठवायची (खोटा-खोटा) . सामानाची यादी देऊन 'जा हे घेऊन ये' असा हुकुम सोडायची. मी कुरकुर केली तर 'तू पुरुष आहेस नं! बाजारहाट पुरुषांनीच करायचा असतो. आम्ही (बायका) स्वयंपाक करतो तो पर्यंत.' मी एक चक्कर टाकून लगेच परतलो तर ताई ओरडयची, 'एवढ्यात कसा झाला बाजारहाट? जा. दूरच्या दुकानात जा.' ह्या मुली गुळ, शेंगदाणे आणि पोहे संपवतील आणि आपल्याला काही मिळायचे नाही ही मला काळजी असायची. कधी बाजारहाट कधी 'नोकरीवर जा' असे करून नेहमी मला बाहेर हाकलायच्या. कधी कधी दोन-चार शेंगदाणे, गुळाचा खडा, चमचा भर कच्चे पोहे (खरे), खोटी खोटी आमटी, खोटे चटणी-लोणचे वगैरे भरगच्च जेवण मिळायचे. मी खुश. एकदा जेवण झाले की मी पळून जायचो. आणि त्या सर्वजणी सुखात भातुकली खेळायच्या. अगदी मुंबईत राहूनही आमच्या घरी चुल होती. एक मोठी आणि बाजुलाच छोटी अशा दोन चुली लाकूडफाट्याच्या आणि एक छोटी बादलीची पोर्टेबल चुल होती त्यात बदामी कोळसे वापरले जात. ह्या चुलीवर आई मस्तं दणगेलं बनवायची. खालीवर निखार्‍यांवर खरपूस भाजलेले दणगेलं, कच्चे तेल घालून खायचो. अजूनही आठवणीने पाणी सुटते तोंडाला. आंघोळीचे पाणी तापवायला तांब्याचा बंब होता. डोक्याला लावायचे तेल थंडीच्या दिवसात गोठले की ह्या बंबात तापलेल्या पाण्यात तेलाची बाटली धरायची की थोडे (डोक्याला लावण्यापुरते) वितळले की ते तेल वापरायचे. पावसाळ्यात शाळेचा गणवेष (बहुधा चड्डीच) ओली असेल तर तापलेल्या बंबाला बाहेरून लावून ठेवली की १० मिनिटात वाळायची. आई साईबाबांची भक्त होती. दर गुरुवारी धुपदाणीत रसरशीत निखारे ठेवून त्यावर धुपाचे खडे टाकले जायचे. खडे टाकल्यावर येणारा सुगंधी धूर मला आवडायचा. आरती नंतर ती धुपदाणी घरभर फिरवायची जबाबदारी माझ्याकडे असायची. मी अत्यंत आवडीने पार पाडायचो. आजारपणात दृष्ट काढण्याचे प्रकार आमच्या घरातही क्वचित घडले आहेत. ही 'उतरवलेली' दृष्ट शेगडीत टाकली आणि 'तडतड' असा आवाज आला म्हणजे 'दृष्ट लागली होती' असे समजले जायचे. चुलीची राख घरची भांडी घासायला वापरली जायची. त्या काळात अजून राख विकायला कोणी दारावर येत नव्हते. तो प्रकार पुढे सुरु झाला. मला वाटते शेगड्या मागे पडून रॉकेलचे स्टोव्ह आले त्यामुळे भांडी घासायला घरची राख मिळेनाशी झाली, त्यामुळे असेल. पण आमच्याकडे कधी राख विकत घ्यावी लागली नाही. हे विक्रेते स्मशानातली राख सुद्धा विकतात असा एक विचार जनमानसात होता. शेण्या कधी वापरल्याचे आठवत नाही. पण अंगणात सडा टाकायला, सारवायला शेण लागायचे. ते आणायचे कामही माझ्याकडे होते. एक जुनी बादली होती ती घेऊन मी 'मिशन'वर निघायचो. शेजारीच गोठा होता तिथे गाईचे शेण मिळायचे. तसेच, रात्रीच्या वेळी, गल्लीत कुठल्या झाडाखाली गाई बसतात/झोपतात हे निरिक्षणातून मला माहित असायचे तिथे जाउन गाईंनी टाकलेले शेण मी आणायचो. अनुभवातून कुठल्या शेणाची 'प्रत' चांगली आहे आणि कुठले शेण 'ब्येक्कार' आहे हे मला कळायचे. चांगल्या, ताज्या शेणाचा वास मला आवडायचा. सारवणे आणि शेणसडा ही कामेही मी केले आहे. तुमच्या ह्या लेखाने, बालपणीच्या त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. आज, गेली ३२ वर्षे इथे रखरखित वाळवंटात राहतो आहे. बालपण नुसते आठवणीतच राहीले होते. ते पुन्हा एकदा जगण्यास मिळाले असे वाटले. आता मुंबईतलं ते आमचं, आमच्या बालपणीचं जुनं घर मोडून तिथे नविन इमारत उभी राहणार आहे. समृद्ध बालपणाच्या हृद्य आठवणींचे साक्षीदार, ते घर, उद्या काळाच्या पडद्या आड जाईल. ती ओट्यावरची भातुकली, दिवाळीत कठड्यावर, पायर्‍यांवर, मागच्या दारी आणि न्हाणीघराच्या खिडकीवर लावलेल्या, बाहेरच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर उजळलेल्या, पणत्या, शेणसडा, हौशीने केलेले मातीचे किल्ले, दसर्‍याला दारावर लावलेली तोरणे, हळदीकुंकवाला आईने, दोर्‍यांनी विणलेले, पानाफुलांचे तोरण सर्व सर्व आता एक 'आठवण' म्हणूनच उरणार आहे. मला खात्री आहे ह्या विचारांनी जेवढे दु:ख आम्हाला होते आहे तेवढेच, कदाचित त्याहून जास्त, ते घर आता व्यथित असेल. साथ, संगत, सोबत संपली, आपले कर्तव्य पूर्ण झाले अशीच भावना त्या घराचीही असेल. छायाचित्र रुपात ते घर आमच्या नजारेसमोर आणि त्याच्या स्मृती आमच्या मनांत मरेपर्यंत राहतील.

पेठकर साहेब आपला प्रतिसाद आणी मुळ लेख मला बालपणी घेऊन गेला. जन्म मुंबईत गेला तरी दोन्ही आजोळच्या घरी चुली असत पण आईच्या माहेरी नागाव ( अलिबाग) ची आठवण विशेष आहे. माझी आई आणी तिच्या दोन बहिणी आणी त्यांची मुले असे आम्ही माझ्या नववी पर्यंत दर उन्हाळ्यात जात होतो ( व्हेकेशन क्लास) हा प्रकार तेंव्हा ऐकलेला नव्हता. दुर्दैवाने त्यावर्षी आजी गेली आणी नंतर ते प्रचंड दुमजली घर शेणाने सारवलेली जमीन,मागचे आणी पुढचे अंगण मागे असलेली वाडी त्यातील रायवळ आंब्याची, नारळाची झाडे, आतली (स्वयंपाक घरातील) आणी बाहेरची(पाणी तापवण्याची) चूल त्यात नारळाच्या साली(चूड) टाकून पेटवलेली चूल त्यावर कला झालेला पाण्याचा हंडा या आठवणी तशाच राहिल्या. आता मामानी घर मुंबई फाशनचे (सेल्फ कंटेण्ड ब्लॉक, टाईल्स वगैरे ) केले आहे. पण आता तेथे जावेसे वाटत नाही. कालाय तस्मै नमः

आता उरण मधे आलो कि एक दिवस तुझ्याकडे चुलीवरच्या जेवणाचा बेत फिक्स...जास्त काहि नको....त्या मौ लुशलुशीत तांदुळाच्या भाकर्‍या, अंड्याचं किंवा कोलंबीच कालवण आणि फिश फ्राय......बास!

आठवणींचा पट.... थोडंसं असच काहिसं मीही इथे लिहिलय :- http://www.misalpav.com/node/22647

दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यंग स्नान आणि चुल याच्या छान आठवणी आहेत .. पहाटे पहाटे थंडी मध्ये कुड कुडत चुलीसमोर बहीण भाउ गर्दी करून बसायचो ..त्याची आठवण झाली .. जागु तै , तुमच्या सुगरणपणाची चिन्हे लहानपणापासूनच दिसू लागली होती :)

तुझं खरच कौतुक वाटतं जागु! आम्ही काकांकडे कोकणात गेल्यावर चुलीचा अनुभव अनेक वर्षे घेतलाय त्याची आठवण आली. परसदारच्या चुलीवर अंघोळीचे पाणी तापवणे, नंतर नाष्त्याची पेज असे त्यावर होत असे. बाकी स्वयंपाकही त्यावर होत असे पण नंतर कुकींग गॅसमुळे चुलीचा वापर पाणी तापवण्यापुरताच राहिला.

पेठकरकाकांचा प्रतिसाद अतिशय आवडला. मुंबईच्या उपनगरात राहिल्यामुळे आमच्याकडेही घर, अंगण, माड,आंबे होते. मागीलदारी चूल आणि बंब ढणढणत असायचा. तो बंब म्हणजे एक वेगळेच प्रकरण होते. भला उंच पण अरुंद तांब्याचा सिलिंडर. त्यात तापलेले पाणी उंचीमुळे वरच्या थरात येई. तिथे आउट्लेट म्हणून हत्तीच्या सोंडेसारखा लांब पितळी पाइप असे. गरम पाणी बाहेर येण्यासाठी आत थंड पाणी ओतावे लागे. त्यासाठी सिलिंडरच्या वरच्या गोलाकृती पृष्ठभागात एका मोठ्या छिद्रातून एक लांब नळी आत सोडलेली असे. थंड पाणी थेट खाली जाई आणि वरचे गरम पाणी बाहेर ढकलले जाई. ही म्हणजे बंबाची आदिम आवृत्ती असावी. शाळासोबती घरी आले तर या बंबावरून आम्हाला चिडवत. बाकी आंब्याचे बाठे भाजून तुरट कोय खाणे, चवळीच्या शेंगा, आठळ्या, करांदे भाजणे हा आमचाही सुट्टीच्या दिवशी रिकामपणचा उद्योग होता. इतर दिवशी शाळेतून घरी येईपर्यंत चूल थंड झालेली असे. सुरुवातीला स्वयंपाक स्टव्ह आणि शेगडीवर होई. एक पोर्टेबल चूल असे. पण तिला कुंभारीण म्हणत, चूल म्हणत नसत. म्हणजे ती 'कुंभारीण उचलून आण जरा' असे म्हणत. नंतर गॅसचे स्टव्ह आले. दिवे,पणत्या, रांगोळ्या,आकाशकंदिल, गोठलेले खोबरेल, सगळे तसेच. आता आठवणी गोठून राहिल्या आहेत. अशा कधीतरी वितळतात. जागू, मायबोलीवर लेख आवडल्याची प्रतिक्रिया दिली होतीच. इथेही तसेच. लेख खूप आवडला. तुझ्या उत्साहाची कमाल आहे.

खरच कौतुक वाटतं तुमचं एकविसाव्या शतकातही ह्या गोष्टी टिकवून आहात, जमलं तर हा वारसा चालवायला आवडेल... तसेही लोक कॅम्पफायर करत असतातच मग हे का नसावे. थोडसे अवातंर: २००३-०४ मध्ये इथे अमेरीकेत मोठा ब्लॅकआउट झाला होता, आमच्याकडे २-३ दिवस वीज नव्हती, त्यामुळे पाणीही येत नव्हते. बाहेर काही गोष्टी विकत मिळायची मुश्किल, दुकानांपर्यंत जाणेही अजुन अवघड कारण बहुतेक कारमधले पेट्रोल संपलेले. ब्रेड वगैरे तत्सम गोष्टी संपल्यावर मी बाहेर ३ विटांची चुल मांडून पिठलं+भात आणि पोळ्या केल्या, शेवटची पोळी केल्यावर जोरात पाऊस आला, आणि आम्हाला प्यायचे पाणी साठवता आले.
लेखक: jaypal वेळ: गुरुवार, 07/18/2013 - 18:28 Permalink

लेख एकदम फ्क्कड जमलाय. अवांतर = आमच्या गावी चुली शक्यतो घरातच असत त्या मुळे संपुर्ण घरात किंवा घरातील कपड्यांना देखिल त्या धुराचा विषीष्ठ वास यायचा. हा लेख वाचताना तो परत एकदा दरवळला.

जागु तै. एकदम फक्कड लेख. पेठकर काका. आमच्या पार्ल्याच्या वाडीत मस्त चूल आहे.बंब देखील आहे. लोकमान्य सेवासंघाच्या ग्राउंड समोर गायी बसतात.पार्ले स्टेशनावरून घरी येताना तेथून मी मस्त पैकी एक टोपली शेणी गोळा करून आणतो. पार्ल्याच्या थंडीत सकाळी पाण्यासाठी बंब पेटवलेला असतो. त्यात कधी कधी शेंगा /रताळे वगैरे भाजून खातो. पार्ल्याच्या थंडीत बंबातील निखार्‍या समोर भाजलेले रताळे खात खात शेकायची मजा काही औरच आहे. कधी कधी माडावरचे थोडेसे जूनवट शहाळे देखील भाजतो, आतले शेकलेले गरम गरम खोबरे गुळ किंवा लसणाच्या चटणीबरोबर खाउन बघा. फास्टरफेणेप्रमाणे टॉक्क्क्क्क्क्क्क कराल पार्ल्याच्या वाडीत कौलारु घरात मातीच्या दोन चुली आहेत. त्यावर केलेले फोडणी दिलेले घट्ट वरण अन उन उन ज्वारीची भाकरी अन त्या सोबत कोल्हापूरहून आणलेली तिळकुटाची चटणी अन कांदा म्हणजे आहाहाहा स्वर्ग. जेवण झाले की मी दुभाषी मैदानात खेळायला जातो.लेझीम खेळतो, विटीदांडू किंवा खो खो, कबड्डी खेळतो. संध्याकाळी हातपाय धुवून कांबळी वाडीतल्या इतर मुलांसोबत परवचा म्हणतो. घुर्र्.........घुर्र्....घुर्र... ऑ.काय! काय!! काय!!!.... विजुभाऊ जागे व्हा जागे व्हा.स्वप्नं बघणं पुरे. लॅपटॉपवर कळफलक बडवा. क्लायंटच्या एस्केलेशन मेल ला तडक उत्तर द्या

आहा! चुल! माझ्या माहेरी अजुनही आहे. निखार्‍यावर भाजलेली,टम्म फुगलेली भाकरी पाहिली की पहिला तुपाची बरणी शोधायची अजुनही खोड आहे. घर गरम रहाण्यासाठी म्हणुन आम्ही अजुनही चुल पेटवतो. मस्त हो जागू. फार छान आठवणी जागवल्यास. पेठकर काका अन विजुभाऊही सुरेख प्रतिसाद देउन गेले.

सुंदर लेख आणि तेवढाच मस्त पेठकर काकांचा प्रतिसाद. जुन्या आठवणी जाग्या केल्यात. आता हे जागं झालेलं मोहोळ बसायला किती दिवस लागतील कुणास ठाऊक. :(

खुप सुंदर लेख. पेठकर काका न चे मनोगत ते माजे हि. मामाचे गाव अठवला. गोबर गस, LPG पण आले आहेत आता. आणि अजून हि तिथे चुलीवरच स्वयपाक करतत जेव्हा आम्ही जातो …खुप चं छा न आणि रुचकर जेवण लागते ते. गेली बरीच वर्षे ह्या सुखाला मुकले आहे . पण आता इथे हि चूल मांडतेच एरवी BBQ चालतो न. मग थोडा हा वेगळा प्रकार पण chiense लोकांना आवडेल . जागु धन्यावाद

चुलीवरच्या स्वयंपाकाची चवच निराळी ! पण चुलीसाठी सरपण लागते त्यासाठी खुप झाडं तोडली जातात अन हे मी स्वत: पाहीलंय. गवर्‍या फारतर आग पेटवण्यासाठी वापरता येतात पण सरपणाशिवाय चुल पेटत नाही...वरच्या फोटोत दाखवलं आहेच. या लेखाने आजीची आठवण अजुनच तीव्र झाली. असो. बाकी जागुतै इथे फक्त लेख टाकण्यापुरतीच येते याची नोंद घेतली आहे.

लेख हेरून ठेवला होता. आता निवांत वाचला. चुलीवरचा स्वयंपाक वेगळ्याच चवीचा असतो आणि त्याची एकदा चटक लागली की सुटता सुटत नाही. घराला मोकळेढाकळे टेरेस मिळाल्याने लगेचच एक कोळशाची शेगडी, कोळसे, लाकडाच्या ढलप्या वगैरे गोष्टी जमा केल्या व चुलीचा आनंद पुन्हा शोधण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला शेगडी पेटवता येत नव्हती.. आता बर्‍यापैकी जमते ;-) शेगडीवर वांगी भाजून भरीतासाठी पाठवल्यावर कांदे, बटाटे, लसूण, बीट, कणीस, गाजर, रताळी वगैरे निखार्‍यांवर भाजून खाणे म्हणजे ऐश आहे ऐश!!!! चुलीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत (त्यातला कांदाही चुलीतच भाजलेला!) भाकरी, शेंगदाण्याची चटणी, खरडा, तेल आणि नंतर डेर्‍यातले वाळा घातलेले गार पाणी - वाह्ह! धन्यवाद जागुतै!

प्रतिक्रियाही मस्त आहेत. माझ्या सासरच्या घरात अजून चुली आहेत. बरेच लोक असले की स्वयंपाक त्यावर होतो. एरवी पाणी तापवायला उपयोग होतो. गरम राखेत मांजर बसते. हिवाळ्यात निखार्‍यांचा पुरसा करता येतो. सरपणासाठी लाकडे मुद्दाम तोडायची गरज नसते. बरीच वाळकी पाने फांद्या असतातच. फक्त जेव्हा कधी धूर होतो तेव्हा मात्र सगळ्यांना पळ काढायची वेळ येते. सगळा स्वयंपाक ज्या माउल्यांना चुलीवर करावा लागतो त्यांच्याबद्दल मला प्रचंड सहानुभूती आहे.

मस्तच लेख... आमच्या घरी चूल आहे जिचे मुख्य उपतोग सेम पैसाताईंनी सांगितल्यासारखे. एखादे नवीन मांजर राखेत बसत नसेल तर त्याला आम्ही 'आधुनिक मांजर' म्हणतो.. ;) घराजवळच्या झाडांची पाने, फांद्या, माडाच्या झावळ्या, करवंट्या इ. गोष्टी सरपण म्हणून पुरतात. चुलीतली राख झाडांच्या मुळात घालता येते. काजूबिया, आठळ्या भाजणे वगैरे उद्योग चुलीत होतात. भरीत करण्यासाठी वांगी, काजूचे कच्चे फळ वगैरे पण आई भाजते. थंडीत तर चुलीजवळ बसण्याचे सुख अवर्णनीय... :) बाकी आमच्या बर्‍याच नातेवाईकांच्या घरी चूल आहे.. गरे तळणे, आंब्याचा साठवणीचा रस आटवणे वगैरे कामं चुलीवरच.. खूप मजा येते एकूण... शहरात रहावं लागलं तर चूल खूप मिस करेन मी... :(

स्वाती, गावडे, अर्धवटराव, मोदक, पैसा, प्राजक्ता, अबोली धन्यवाद तुमचे अनुभवही छान आहेत. आम्हालाही लाकडे तोडावी लागत नाहीत. झाडावरून पडलेल्या वाळक्या फांद्या, करवंट्या, नारळ सोलून निघालेली साले, नारळाच्या झावळ्यांची लाकडेच पुरेशी होतात. कारण रोज लावतच नाही. कधीतरीच लावतो.

चूलपुराण मस्त आवडले. घरी चूल कैकदा वापरल्या जाते, पण पाणी तापवायला :) अर्थात त्याचाही ताव काही वेगळाच असतो. नारळाच्या सरपणाचा वापर होतो तेवढाच. बाकी चुलीवरचा स्वयंपाक फारसा कधी खाल्ला नाही, पण प्रतीक्षेत आहे. जरूर खाल्ल्या जाईल.

मस्त आठवण. पेठकर काकांचा प्रतिसाद पण सुरेख. मला लहानपणी फक्त चुलीत काड्या सारत जाळ बघत बसायची आवड होती आणि त्यासाठी मोठ्या लोकांकडून एक टीपीकल धमकी पण मिळत असे. ;)