Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एकदम सुंदर पुस्तक आहे. पलायनकथांमध्ये ही कदाचित सर्वोत्कृष्ट ठरावी मूळ लेखक गंथर बान्हमान एक जर्मन सैनिक आफ्रिकेतून का पळ काढतो आणि त्याला काय काय अनुभव येतात याची एक सत्यकथा या निमित्ताने वाचायला मिळते. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचे अगदी सुंदर व अनेकदा वाचले तरी आनंद मिळेल असे पुस्तक आहे

नावं विसरलेली पुस्तकं

[कधीतरी वाचलेली, पण आता विस्मृतीत जात चाललेली] (या धाग्यातच हात धुवून घेतो, जोग साहेबांची हरकत नसेल तर) १. कुर्ला स्टेशनवर बूटपॉलिश करणार्‍या एका मुलावर आधारित कादंबरी आहे. लेखक जयवंत दळवी किंवा रत्नाकर मतकरी असावेत. २. सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते. ३. वॉर अँड पीसचा एक मराठी अनुवाद आहे. लेखक आठवत नाही, पण प्रकाशक बहुदा गिरगावांतले लाखाणी बुक डेपो असावेत. ४. समांतर विश्व आणि टाईम ट्रॅवलच्या कल्पनेवर आधारित एक विज्ञान कादंबरी आहे. त्यात एक माणूस एका मुलीच्या प्रेमात पडतो. काही कारणाने तो समांतर विश्वात जातो, तिथे ती त्याची मुलगी असते असं काहीतरी कथानक आहे. कुणाला या पुस्तकांची नावं आठवत असतील तर प्लीज सांगा. :)

पहिली कादंबरी ' झिपर्या' , लेखक अरूण साधू.
येस्स! लोकलच्या लायनीवर वावरणार्‍या ८-९ वर्षाच्या मुलाचं भावविश्व फार सुरेख लिहलंय त्यांनी.

सुशिंची एक कादंबरी आहे त्यात एक अपंग मुलगी एका कॉलेज हीरो टाईप तरूणाला आपल्या प्रेमपाशात अडकवते आणि लग्न करायला भाग पाडते.
ही कुठली? "काटेरी"चा विषय ह्याच्या जवळपास जाणारा आहे, पण हाच असा नाही.. सुशिंची इतर : दास्तान (सुहासने आधीच सांगितलंय), कल्पांत, क्षितीज, दुनियादारी (डिपेंड्स ;-)), झूम.. मला सगळीच आवडतात.. :-) गोनिदा : दुर्गभ्रमणगाथा, पवनाकाठचा धोंडी, माचीवरचा बुधा आणि इतर अरुण साधु : झिपर्‍या, मुंबई दिनांक पुलं : सगळीच.. वपु : वन फॉर द रोड, सखी, कर्मचारी, कॅलेंडर बायको आणि मी.. जेफ्री आर्चर : केन अँड आबेल, देअरबाय हँग्स अ टेल, पाथ्स ऑफ ग्लोरी.. आत्ता-आत्ताची काही सोडल्यास बाकीची चांगली आहेत.. नॉन-फिक्शन आवडत असल्यास, "द लास्ट मुघल", "द व्हाईट मुघल्स", "इंडीया आफ्टर गांधी"..

व पुं ची सखी आनी पर्टनर .......या दोन्ही कथांनी मनावर वेगळच गारुड केल. तशी सखी आनी पार्टनर मिळण असे माझ्यासारख्या असंख्य वेड्यांच स्वप्न असत.

व पुं ची सखी आनी पर्टनर .......या दोन्ही कथांनी मनावर वेगळच गारुड केल. तशी सखी आनी पार्टनर मिळण असे माझ्यासारख्या असंख्य वेड्यांच स्वप्न असत. एकदम सहमत आहे. पार्टनर एकदम बेस्ट

गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा, यांचे एक अप्रतिम पुस्तक. नेमकं मुद्दे मांडणारे, नेमकं काय घडले व काय घडत आहे यावर प्रकाश टाकणारे एक उत्तम पुस्तक. ज्यांना या विषयात आवड आहे, त्यांनी आवर्जून वाचावेच असे पुस्तक. मेकर्स ऑफ मॉर्डन इंडिया ज्यांनी वाचले आहे, त्यांना नक्कीच आवडेल हे पुस्तक.

सत्तांतर-व्यंकटेश माडगूळकर यांचे वाचले आहे.

हो. आज दोन्ही पुस्तके मुद्दाम चाळून पाहिली. तुम्ही म्हणताय ते व्यंकटेश माडगुळकरांचे आहे. मी म्हणतो आहे ते "सत्तांतर - १९४७" खंड १ व २ - लेखक गोविंदराव तळवळकर.

मोदका छान विषय छेडलास तू. सत्तांतर ही गोविंद तळवलकरांची ३ खंडांची मालिका आहे. सत्तांतरः १९४७ हे पुस्तकाचे नाव. १९४७ च्या फाळणीच्या इतिहासावर अतिशय परखड भाष्य तळवलकरांनी केलेले आहे. माझ्याकडे हे तिन्ही खंड सुदैवाने आहेत. पुस्तकाचा दर्जा काय आहे हे बुकगंगावर झलक पाहून ठरवता यावा सत्तांतरः १९४७ - खंड १ सत्तांतरः १९४७ - खंड २ सत्तांतरः १९४७ - खंड ३

फिलाडेल्फिया एक्सपेरिमेन्ट एका सत्यघटनेवर वर आधारित एक पुस्तक वाचल होतं, लेखकाचं नाव आठवत नाही पण जबरदस्त होतं पुस्तक अमेरिकेत बहुतेक बंदी आहे त्यावर

बखर बिम्मची - जी.ए.कुलकर्णी जी.ए. म्हटलं की एक गूढ अर्थ दडलेलं लेखन हे वेगळं सांगायला नकोच. आणि त्यांनी हाच गाभा बालसाहित्यात कायम ठेवलाय तो या पुस्तकातून. बिम्म नावाच्या एका ४-५ वर्षांच्या मुलाची ही कथा. त्याची आई, बहिण बब्बी, आणि त्याच्या आजूबाजूचं निरागस जग खास जी.ए. शैलीत असल्यामुळे वाचायलाच हवं. आणि या पुस्तकाच मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या वयात वाचताना त्या त्या वयाला अनुसरून वेगवेगळा गर्भितार्थ कळत जातो

एक होती प्रभात नगरी - हे बापू वाटवे यांचे पुस्तक अफाट आहे. 'एका स्टुडीओचे आत्मवृत्त' हे प्रभाकर पेंढारकर यांचे पुस्तक त्यामानाने सपाट आहे. बापू वाटवे 'प्रभात नगरी'मधे एक वेगळेच विश्व उभे करतात. अलिकडे अशी चांगली संदर्भमूल्य असलेली पुस्तके बाजारात उपलब्ध नसतात. ती मुद्दाम मिळवून वाचावी लागतात.

दुर्गाबाई-व्यासपर्व, ऋतुचक्र लंपनची कुणी आठवण नाही का काढली? वीणा गवाणकरांचं आयडा स्कडर बाकी खूप नवीन नवीन नावं कळत आहेत.. :)

शाळा वाचले. स्वानुभव वाटतो. लेखकाने तो काळ उभा केलेला आहे. पण एवढ्या वर्षापूर्वीच्या घटना बारकाईने लिहिल्यात हे विशेष वाटते. अनेकांना हे आपले स्वतःचे अनुभव वाटू शकतील. यावर आलेला चित्रपटही छानच होता. तो आधी पाहीला असल्याने पुस्तक वाचताना चित्रपटातलीच पात्रे डोळ्यासमोर येत राहतात.

हिंदूस्थानच्या इतिहासात आर्य चाणक्य हा एक द्रष्टा महापुरुष होवून गेला. त्याचे आर्थिक आणि सामरीक (strategic) चिंतन आजही उपयुक्त आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चाणक्यावर काढलेली दूरदर्शन मालिका चाणक्य समजून घेण्यास उपयोगी आहे. चाणक्यावर मराठीमधे एखादे पुस्तक आहे का ? (बाळशास्त्री हरदास यांचे पुस्तक वाचले होते. पण काही समजले नाही.)

वसंत कानेटकर, वि ग कानिटकर दोन्हीही बघेन कौटिल्यासाठी.

सर्वप्रथम आशु जोग, तुमचे आभार इतका सुरेख धागा काढल्याबद्दल. खूप जणांनी बरीचशी पुस्तके सुचवली आहेत, त्यात हे माझे २ पैसे. जशी पुस्तके आठवत आहेत तशी यादी टंकते - त्यातल्या त्यात साधारण एका प्रकारची पुस्तके एकाच ग्रूपमध्ये ठेवायचा प्रयत्न करते. सुरुवात कवितांपासून करते. अनेक कवितासंग्रह अत्यंत आवडीचे आहेत, सद्ध्या हे - १. बोरकरांची समग्र कविता, खंड १ व २. - बोरकरांच्या कवितासंग्रहांतल्या बहुतांशी कविता ह्या २ खंडांमधून एकत्र केल्या आहेत. बोरकर म्हणजे केवळ निसर्गसौंदर्य, प्रेमभावना वा तत्सम कविता असे समेकरण मनात धरुन असलेल्यांनी ह्या खंडांमधील त्यांच्या अभंगरचना, सामाजिक विषय हाताळणार्‍या कविता, जीवनविषयक आणि मृत्यूविषयक चिंतन करणार्‍या कविता वाचण्यासारख्या आहेत.खंडांमध्ये जाणवणारी उणीव? - मेघदूताचा बोरकरांनी केलेला अनुवाद, कोकणी कवितांचा समावेश नाही. बहुधा ते तिसर्‍या खंडात यावे? अजून जमेच्या बाजू म्हणजे बोरकरांच्या हस्ताक्षरातली कविता आणि त्यांच्या प्रसन्न मुद्रांची प्रकाशचित्रे. अरुणा ढेरे ह्यांनी लिहिलेली शब्ददेखणी प्रस्तावना. २. उत्तररात्र - रॉय किणीकर. झपाटून टाकणार्‍या कविता. रॉय किणीकरांनी खूपच थोडे लिहिले पण भाराभर पुस्तके एका पारड्यात आणि उत्तर रात्र एका पारड्यात - तरीही उत्तर रात्रीचे पारडे जड राहील असे माझे मत आहे. आयुष्यभर अस्थिर आयुष्य वाट्याला आलेल्या ह्या कविच्या कविताही अशाच अतिशय उत्कट आणि अस्वस्थ करुन टाकणार्‍या आहेत. कोलाहलातला एकटेपणा व्यक्त करणार्‍या कविता. ३. दिवेलागण - आरती प्रभू - मनात खोलवर कुठेतरी लपवून ठेवलेली दु:खे जेह्वा तळापासून वर येतात आणि पुनर्प्रत्ययाचा विसकटून टाकणारा अनुभव देऊन जातात, पण कोणापाशी शब्दांमध्ये ते दु:ख व्यक्त करता येणे कठीण, तसे काहीसे ह्या कवितासंग्रहातल्या कविता वाचताना वाटते. साध्या शब्दांमध्ये गहन आशय पोचवणार्‍या कविता. ४. मर्ढेकरांची कविता - बा सी मर्ढेकर - शिशिरागम, किती तरी दिवसांत आणि मर्ढेकरांच्या बाकीच्या कविता. चपखल शब्दयोजना अणि लखलखीत आशय. काही काही कविता मह्णजे शब्दांचे आसूड. ५. किनारे मनाचे - शांता शेळके - शांताबाईंच्या निवडक कविता. सुरेख शब्दकळा ल्यायलेल्या आणि जाणींवाचा प्रवास संयतरीत्या मांडणार्‍या. **** ललित लेखन - १. डोह - श्रीनिवास कुलकर्णी - माझ्या काही अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. सत्यकथा आणि मौज मासिकांमधून ह्यातले लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या ११ लेखांचं हे पुस्तक. लेखकाच्या बालपणी लेख जिथे वावरला, ज्या परिसराशी, माणसांबरोबर त्याचे भावबंद जुळले, आठवणी गुंतल्या, त्या सर्वांचं अत्यंत साध्या पण सहज, ओघवत्या आणि मनाला स्पर्शून जाईल आणि मनात रेंगाळत राहील अशा प्रामाणिकपणे केलेलं शब्दचित्रण. फार फार लोभस. इतक्या समंजस मनोज्ञपणे उलगडलेल्या कोणाच्या अंतरंगातल्या आठवणी वाचायला मिळणं हेच एक भाग्य! .. ललित लेखनात्मक अजूनही पुस्तके आहेत, नंतर लिहिते... पुन्हा एकदा धन्यवाद.

'डोह' बद्दल बर्‍याच जणांनी लिहिले आहे. २०१२ च्या कुठल्याशा दिवाळी अंकामधेही त्यावर श्रीनिवास कुलकर्णी यांचा लेख वाचल्याचे आठवते.

काही पुस्तके वेड लावतात, त्यांना वाचणे म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. असेच एक पुस्तक म्हणजे "श्रावणसोहळा" दोन व्यक्ती, एक वयस्कर पुरुष, जो व्हिआरस घेऊन आहे व एक तरुणी, यांचा संवाद व त्यासाठी माध्यम महाजाल! श्रावणसोहळा वाचले की जाणवतं की काही नाती ही स्वभावावर निर्माण होतात, टिकतात व त्याचा सोहळा साजरा करण्याएवढे आपल्याला आनंद देऊन जातात.. नक्कीच वाचा! श्रावणसोहळा लेखक - संजय भास्कर जोशी

कुमार गंधर्व - मुक्काम वाशी. संकलन - मो वि भाटवडेकर - २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १९९० रोजी वाशी येथे 'कुमारजींच्या सान्निध्यात' नावाचे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. कुमारांचे संगीतविषयक विचार जाणून घेणे हा ह्या शिबिराचा उद्देश्य होता. ह्या शिबिराचे ध्वनीमुद्रण व चलचित्रण केले गेले, (कुठे मिळेल पहायला? ) व त्यावरुन शब्दांकन करुन संकलित रुपात हे पुस्तक तयार केले आहे. कुमार प्रेमींसाठी संग्राह्य. पुस्तकाआरंभीचे कथनही अतिशय वाचनीय. माझ्या काही आवडत्या पुस्तकांपैकी. पुन्हा मर्ढेकर - विजया राजाध्यक्ष - मर्ढेकरांच्या कविता, त्यांचे वैयक्तिक आयुष्य ह्याविषयीचे पुस्तक. सुरुवातीचाच तीन ऋणानुबंधी: बालकवी, मर्ढेकर आणि आरती प्रभू हा लेख खूप सुरेख जमलेला आहे. आठा उत्तरांची कहाणी - ग प प्रधान -लोकशाही व्यवस्थेमधील अनेकविध प्रश्नांना आपापल्या वकुबानुसार आणि विचाराच्या धारेनुसार उत्तरे शोधणारे अनेक कार्यकर्ते. आपल्याला योग्य वाटेल ते उत्तर स्वीकारायचे आणि इतरानांही सांगायचे, पटणारे घेताता अणि न पटणारे आपला शोध सुरुच ठेवतात. तर अशा ५ क्रियाशील आणि ३ विचारशील कार्यकर्त्यांच्या गटाची ही खरी कहाणी. १९८० ते २००७ परेंतची राजकीय बखर. अंतरीचे धावे - भानू काळे -अंतर्नाद मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही सुरेख लेखांचे संकलन. मासिकाच्या पहिल्याच अंकात प्रसिद्ध झालेला महात्मादेखील माणूस असतो हा अतिशय हृद्य लेख ह्या पुस्तकात आहे. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. संवादाचा सुवावो - महेश एलकुंचवार -राम शेवाळकरांसोबतच्या गप्पा. अतिशय उत्तम सर्जनशील संवाद ह्या पुस्तकात आहे. उत्तम प्रास्ताविक. जास्वंद - माधव आचवल. - गंघाधर गाडगीळ, इंदिरा संत, जीए, पु शि रेगे, अणि आरती प्रभू ह्यांच्या लिखाणावरचे जबरदस्त समीक्षात्मक पुस्तक. अतिशय आवडते! किमया - माधव आचवल - आचवलांचे पहिलेच पुस्तक. त्यांच्या १३ ललितांचा संग्रह. ह्या पुस्तकाचे वर्णन करणे कठीण आहे. आचवलांच्याच शब्दांत सांगायचे तर दैनंदिन आयुष्यातल्या अति परिचयात अवज्ञा ह्या न्यायाने नजरेआड झालेल्या संवेदनांविषयीचे हे पुस्तक. मस्ट रीड. माधव आचवलांची पुस्तके मला अतिशय आवडतात. काल मला त्यांनी अनुवादित केलेल अमेरिकन चित्रकला हे पुस्तकही मिळालेय. किती दिवस शोधत होते! कार्यरत - अनिल अवचट - समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करणार्‍या व्यक्तिमत्वांची ओळख करुन देणारे पुस्तक. चित्रकथी - व्यंकटेश माडगुळकर - अफाट पुस्तक! लेखकाचे स्वतःचे अनुभव. संग्राह्य पुस्तक. ... बाकीची नंतर..

सखा नागझिरा - किरण पुरंदरे -४०० दिवस नागझिर्‍याच्या जंगलात राहून गोळा केलेल्या क्षणांचे शब्दांकन. अफाट सुंदर पुस्तक. आसमंत - श्रीकांत इंगळहळीकर. - निसर्गनिरीक्षणांवर आधारीत लेखांचा संग्रह. अप्रतिम फोटो. सुरेख पुस्तक. हिमालय सर्वांगदर्शन - तिसरा ध्रुव - रमेश देसाई - एका गिर्यारोहकाने हिमालयाच्या प्रेमापोटी लिहिलेले पुस्तक अशी ह्या पुस्ताकची करुन दिलेली ओळख अगदी सत्य आहे. खूप माहिती, सुरेख फोटो, नकाशे. सुरेख पुस्तक. अगस्तीचे अंगण - प्रभाकर पाध्यांचे निवडक साहित्य. माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. सुरुवातीच्या संपादकांच्या मनोगतापासून पुस्तक सुरेख आहे! पत्र - माधव आचवल - पुन्हा एकदा माधव आचवल! वेगवेगळ्या लेखांचे एकत्र संकलन. विंचूर्णीचे धडे - गौरी देशपांडे - गौरीने लिहिलेलं माझ सगळ्यात आवडतं पुस्तक! प्रिय जीए - सुनिता देशपांडे - सुनीताबाई आणि जीए ह्यांच्यामधला पत्र व्यवहार.

चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर - अतिशय सुरेख पुस्तक. हृद्य व्यक्तीचित्रं, भटकंतीविषयक अनुभव. संग्राह्य. सरवा - व्यंकटेश माडगूळकर - ( कोरडवाहू जमिनीत भूईमूग, हरभरा वगैरे पिकं निघाल्यावर काही शेंगा, लोंब्या इत्यादि मातीत राहतात, ती वेचतात, त्याला सरवा वेचणं म्हणतात.) हा अशाच काही लेखांचा सरवा. मनातलं अवकाश - सुनीता देशपांडे - पहिलाच, पुलंना उद्देशून असलेला आण्यांतलं लग्न हा लेख फार सुरेख. बाकीचेही. संग्राह्य. मण्यांची माळ - सुनीता देशपांडे - सोयरे सकळ नंतरचे पुस्तक म्हणजे मण्यांची माळ. सोयरे सकळबद्दलवर लिहिलंच आहे कोणी ना कोणी. कसदार ललित लेखन. गीतयात्री - माधव मोहोळकर -जुन्या काळातील संगीतकार, गायक, गायिका, गीतकार आणि एकूणच त्या काळचा माहौल, ह्यावर अतिशय आत्मीयतेने लिहिलेलं पुस्तक. फार सुरेख पुस्तक आहे.

छानच निवड आहे यशो. बरीसशी यातली वाचली नाहीत आणि वाचायला आवडतील अशी आहेत. वर कुणीतरी म्ह्टल्याप्रमाणे मला ही सगळी माहीती एखाद्या एक्सेल फाईल मधे ही गोळा करायला आवडेल, आणि ती लेखक वा विषयाप्रमाणे फिल्टरपण करता येईल. स्वलेकर यांनी दिलेली लिंक चालत नाहीये त्यांनीच लिहल्याप्रमाणे.

अरूण साधूंची पुस्तकं मिळवून वाचलीच पाहिजेत. "झिपर्‍या" आणि "विप्लवा" तरी. जयंत नारळीकरांची "प्रेषित" ही सुद्धा सुंदर विज्ञान कादंबरी आहे.

काही वर्षापूर्वी देशातील एका उच्चपदस्थ व्यक्तीकरता पुण्यातील संरक्षण खात्याची जमीन ताब्यात घेण्यात आली. काही जण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून त्याविरुद्ध लढले. अखेर त्या उच्चपदस्थाला आपला हट्ट सोडावा लागली आणि सत्ता झुकली. सत्ता झुकली - या प्रकरणावरच हे आधारलेले आहे. याविशवियीची बातमी सर्वप्रथम जिथे प्रसिद्ध झाली त्या वेबसाइटची लिंकही देत आहे. सत्ता झुकली पुस्तक विनिता देशमुख यांनी लिहिलेले आहे.

पुस्तकाचे नाव आणि लेखकाचेही नाव ह्यात वेगळेपण आहे :) सध्या मी हे पुस्तक वाचतोय. भारतातली वेगवेगळी ठिकाणे आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणे अशा लांब-रूंद पटलावर घडत असलेली ही रहस्यमय कादंबरी आहे. लेखकाचा गिरिभ्रमणातला उदंड अनुभव पदोपदी जाणवतो. कादंबरीतल्या सगळ्या स्थळांना भेट देऊन यावं असं वाटतं :) ... अभिनेता सचिने खेडेकरने कादंबरीच्या प्रतिक्रियेत लिहिल्याप्रमाणे ह्या कादंबरीवर खरंच एक उत्त्म चित्र्पट तयार होऊ शकेल.

१) रारंग ढांग २) चक्रीवादळ ३) एका स्तुडिओचे आत्मवृत्त लेखक प्रभाकर पेंढारकर ४) तत्वमसी मूळ गुजराथी लेखक ब्रम्ह भट्ट अनुवाद अंजनी नरवणे ५) मी अल्बर्ट एलिस अनुवादकाचे नाव आठवत नाही ........... जोशी ६) तांडव लेखक महाबळेश्वर सैल (गोव्यातील पोर्तुगीज आक्रमणाचे वास्तव )

१) क्रुतुचक्र , दुर्गा भागवत मराठी महिन्या प्रमाणे बदलणाऱ्या प्रत्येक कृतुचे अत्यंत सुरेख वर्णन २) व्यासपर्व दुर्गा भागवत वाचाच मी काय लिहू? ३) निसर्गायण दिलीप कुलकर्णी "बोले तैसा चाले " अशा वृत्तीच्या एका अवलियाने लिहिलेले सुंदर पुस्तक ४) सम्यक विकास दिलीप कुलकर्णी ५) भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात पॉल ब्रन्टन अनुवाद पुरंदरे (इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया )

मेकिंग द कट लेखक महम्मद खादरा एका निष्णात शाल्याविशारदाचे जिवंत अनुभव , विशेषता Palestinian असून "मोसाद" च्या प्रमुखावर शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव तर वाचण्यासारखा

साता उत्तराची कहाणी ग प्र प्रधान भारतातील वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे पाठीराखे पण एकमेकांचे मित्र अशा ७ जणांची मतमतांतरे

यशो, साता उत्तराची कहाणी व आठा उत्तराची कहाणी ही दोन्ही वेगवेगळी पुस्तके आहेत. लेखक मात्र एकच आहे :)

स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांप्रमाणे स्त्रियांचाही महत्त्वाचा सहभाग होता. पण बहुतेक जणींचा उल्लेख कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाची आई असाच केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात लढणार्‍या स्त्रियांची माहिती देणारे पुस्तक आहे नाही चिरा नाही पणती लेखक आहेत य दि फडके.

मौनराग -महेश एलकुंचवार - ललित लेखांचा संग्रह. पश्चिमप्रभा - महेश एलकुंचवार - पाश्चात्य साहित्यातील लेखकाला आवडलेल्या पुस्तकांची ओळख. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे - मदुमलाईच्या जंगलात १ वर्ष राहून घेतलेल्या अनुभवांची मांडणी. आहे मनोहर तरी - वाचन आणि विवेचन - संपादक: विजया राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत. - आहे मनोहर तरी ह्या पुस्तकानंतरचा वाचकांनी सुनीताबाईंशी केलेला पत्रव्यवहार