Welcome to misalpav.com
लेखक: गवि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

+१ नविन धागा काढलात हे उत्तम केलंत. पुढचे अपडेटस पहायला आवडतील.

आता कस नाव झकास वाटत. मला पहिल्या धाग्याच नाव वाचु हाच प्रश्न पडायचा की ती तुमच्या घरात नाही तर तुम्ही यायच्या आधी येउन राहिल्याने तुम्ही त्यांच्या घरात आहात. बाकी बडादादा, शेंडेफ़ळ ही नावे ऐकुन मजा वाटली. :) एकूण झकास चाललय. जर तुमच्या सोसायटीत घरट आहे अस सांगुन जरा फटाक्यंचा आवाज कमी कराय्ची विनम्ती केली तर चालेल का?

आता कसं नाव झकास वाटतं.
हेच म्हणणार होतो.

काल आणि आजच्या दिवसातल्या काही प्रतिमा: आज सकाळी (१ नोव्हें.).. तेजायला किती पिल्लं आहेत तेच कळत नाहीये. मॅगी नूडल्सप्रमाणे पसरलीत एकमेकांवर. कोणीतरी मोजून पहा हो. चौथं आलंय का ते.. A २. कालच्या काही प्रतिमा (३१ ऑक्टो) B C D E अर्थात कॅमेर्‍याची कपॅसिटी मर्यादित आहे आणि अ‍ॅक्सेसही अडचणीचा. त्यामुळे फोटोग्राफिक मूल्य येणारच नाही. फक्त काय चाललंय ते पाहता येईल धूसरपणे.

झक्कास असल फुटेज डिस्कवरीकड पन नसल .

३ नोव्हेंबरचा अपडेट: घुबडाईने घरट्याजवळ आलेल्या कावळ्याला दिलेला खतरनाक थ्रेट डिस्प्ले. पंख फुलवून भयंकर उग्र रूप दाखवून घुबडं शत्रूला पळवतात असं ऐकलं होतं. पण आज थेट पहायला मिळालं. आकार कमी करण्यासाठी क्रॉप केलेला व्हिडिओ इथे देतोय. पिल्लं आणि अंडी यांबाबत गोंधळ होतो आहे. अजूनही चार अंडी दिसताहेत. आणि तीन पिल्लं. पण .. त्यातलं एक पिल्लू एकदमच लहान दिसतंय .. आधीचे व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा की आधी दिसणारं लहान पिल्लू नक्कीच आणखी बरंच मोठं दिसायला हवं होतं एव्हाना .. पण आज दिसलेलं लहान पिल्लू हे एकदम नवजात दिसतंय. आणखी एक. कालच पाच मजले खाली जमिनीवर फुटक्या अंड्याचे अवशेष मिळाले. म्हणजे एक तरी अंडं कमी व्हायला हवं होतं. . दुसरी गोष्ट : दोन दिवसांआड एक पिल्लू अशा क्रमाने बाहेर येण्याचा क्रम असताना सहा दिवस उलटले तरी नवीन पिल्लू आलं नसेल हे पटत नाही. म्हणजे निम्ननिर्दिष्टांपैकी काही शक्यता वाटतातः अ. घुबडाई पहिलं पिल्लू बाहेर आल्यानंतरही अ‍ॅडिशनल अंडी देत राहते आहे की काय? ब. परवापर्यंत सर्वात शेवटचं आणि किंचित आकार वाढलेलं पिल्लू गायब झालं आहे आणि आज किंवा काल रात्री अतिशय छोटं असं पिल्लू नुकतंच जन्माला आलं आहे. आणि नंतर घातलेल्या अंड्यांमुळे अक्षत अंड्यांची संख्या चारच राहिली आहे. असं असेल तर आधी एक पिल्लू मेल्याची मला जी जवळजवळ खात्री झाली होती आणि नंतर दोन दिवसांच्या गॅपने पुन्हा तीन पिल्लं आणि चार अंडी असा हिशेब लागला तेव्हाही एक पिल्लू खरंच मेलं / कावळ्यांनी पळवलं असण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळीही ते पिल्लू जरासं मोठं झालेलं होतं आणि नंतर पाहता पुन्हा नवजात आकाराचं दिसलं होतं. पण तेव्हा मी दुर्लक्ष केलं. एकूण जन्मू शकणार्‍या (जगू शकणार्‍या नव्हे) पिल्लांची संख्या अबाधित ठेवण्यासाठी घुबडीण प्रसंगोपात्त अधिकची अंडी घालतेय की काय? यात कितपत शास्त्रीय आधार आहे माहीत नाही, पण दिसतंय त्यावरुन मला असा निष्कर्ष काढण्याखेरीज पर्याय नाही. बाकी.. घुबडाई जबरदस्त ताकदीने आणि जोरदार हालचालीने वरचेवर अंड्यांजवळ काहीतरी खणत राहते. हा प्रकार खूप वेळ चालतो. ती अंड्यातल्या पिल्लाला स्टिम्युलेट करते की पिल्लांसाठी भुसभुशीत मऊ जागा व्हावी म्हणून तिथे असलेल्या गोष्टींचा भुगा करते की तिथे किडे होऊ नयेत म्हणून काही करते ते कळत नाही. घुबडाईची सक्काळी सक्काळी आणि नंतरही अनेकदा चालणारी सेल्फसफाई.. पीसनपीस लख्ख..

दिवाळीच्या ४ दिवसात फटाक्यांमुळे बराच गोंधळ उडाला असणार.

@पैसाताई .. अन्या.. अपडेट्स दिलेत की.. अगदी फटाक्यांसहित. कोणीही पहात अथवा प्रतिसादत नसल्याने दोन दिवसाआड फ्रीक्वेंसी केली आहे. आता उद्या परत अपडेटवतो बघून.

आज सकाळी कॅमेरा ऑन करताच असं दिसलंय की सर्वात मोठं पिल्लू (छोट्या पिल्लाचा बडा दादा) नाहीसं झालेलं आहे. अर्थातच कोणीतरी खाल्लेलं आहे. उर्वरित सर्व अंडी पळवलेली आहेत. फक्त दोन पिल्लं(मधलं आणि लहान)शिल्लक आहेत. पण सर्वात दुर्दैवाची आणि काळजीची गोष्ट अशी की त्यांना एक मिनिटही एकटं न सोडणारी त्यांची आई स्वतःच सकाळपासून तरी घरट्यात आलेली नाही किंवा आसपासही दिसलेली नाही. घुबडाईला कोणी पकडलं किंवा मारलं असेल किंवा अन्य शत्रूंनी दूर हुसकावून लावताना झटापटीत जखमी झाली असेल तरच ती परत न येणं शक्य आहे. त्यामुळे या दोन पिल्लांचं भवितव्य अंधारात. इथे प्रचंड फटाके, माळा, बॉम्ब वाजत होते. अग्निबाणही उंच उडून फुटत होते. त्या भीतीने पिल्लं सतत ओरडत होती. आवाजाच्या दहशतीने तर घुबडाई दूर गेली नसेल? सोसायटीत फटाके उडवू नका कारण इथे घुबड आहे असं सांगितलं असतं तर बहुधा ते ताबडतोब हटवण्यासाठी बरेचजण प्रयत्नशील झाले असते. ते षटकर्णी करणं जास्त धोक्याचं होतं. A B वाईट वाटतंय. कॅमेर्‍याने सर्व भाग स्कॅन केला आणि खात्री झाल्यावर मात्र दु:ख झालं. कोणी मारली पिल्लं आणि अंडी ते कळायला मार्ग नाही. घुबडाई तरी यावी परत. आता उद्यापर्यंत प्रतीक्षा.

अंधुक आशंका होती की फटाक्यांच्या आवाजाने असे काही होईल म्हणून आणी ती खरी निघाली याचे फार वाईट वाटले. पैसाताई म्हणते तसं पिलांची काळजी करुणा संस्थेकडून घेता आली तर खूपच बरं होईल निदान दोन पिल्लं तरी वाचतील. :(

वाईट वाटलं. समजा आई परत आली नाही तर पिलांना वाचवणे कठीण आहे. "करुणा" http://www.karunaforanimals.org/aboutkaruna.html या प्राण्यांसाठी काम करणार्‍या मुंबईतील संस्थेला कळवून बघा काही उपयोग झाला तर.

दिवाळीच्या उत्तरार्धात अत्यंत 'अशुभ' बातमी. घुबीज मनाला चटका लावून गेले. उरलेल्या घुबीजच्या रक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावेत.

खूप वाईट, पण गवी तुमचे विशेष कौतुक कि हा आगळा वेगळा प्रयत्न करून तुम्ही सर्वांसमोर एक वेगळेच उदाहरण ठेवले आहे. बाकी तुमचे सर्व updates नेमाने बघितले जात होते पण प्रतिसाद जरा दमाने द्यावा असे ठरवले होते. पुन्हा एकदा आभार्स

काल दुपारी संध्याकाळी , आज मध्यरात्री, पहाटे आणि सकाळी अगदी निघताना ९ वाजेपर्यंत पुन्हा पुन्हा नीट पाहिलं. पण घुबड मातापिता यांपैकी कोणीही एकदाही दिसले नाहीत. आजुबाजूला घुबडिणीची बसण्याची ठराविक जागा म्हणजे एकच मोठे झाड आहे. तेही नीट पाहिलं, तिथेही काही नाही. मात्र त्यातल्यात्यात आशादायक म्हणायचं तर असं की काल रात्री त्यातलं मोठं पिल्लू एक खूप छोटा मांसाचा छोटा तुकडा खाताना दिसलं. तो आधीच्यातला उरलेला होता की घुबड पालकांपैकी कोणी नवीन आणून दिला होता ते कळणं शक्य नाही, पण याचा अर्थ काल रात्रीपर्यंत तरी त्याच्याकडे थोडं अन्न शिल्लक होतं. लहान पिल्लाला त्याने दिलं असेल का माहीत नाही. पण दोघे एकमेकांना चिकटून / कुशीत राहात आहेत. पहाटे काहीकाळ ते दोघे घरट्याच्या जागेच्या दोन टोकांना झोपले होते. पुन्हा एकत्र आले. आज सकाळीही एक उंदराचा अवशेष म्हणावा असा भाग दिसला. मुळात तो खरंच उंदीर होता का आणि असला तर तो कालचाच होता की नवीन ते सांगणं कठीण आहे. पण अंधुकशी शक्यता अशी की तो काल रात्रीमधे त्यांच्या आईने / बापाने आणून दिलेला असावा. एखादा पूर्ण आकाराचा मोठा उंदीर नव्याने आलेला दिसला तरच याविषयी १०० टक्के खात्री होईल. मादीही पिल्लांना सोडून कधीनाकधी बाहेर पडते याची कल्पना आहे. पण माझ्या मनात असं होतं की सुरुवातीला थोडाथोडा वेळ ती दूर जात असेल आणि बराच वेळ पिल्लांपाशी बसत असेल. नंतर हळूहळू बाहेरचा कालावधी वाढवत असेल. पण दोन दिवसाआधीपर्यंत एक मिनिटही बाहेर न पडणारी घुबड मादी आता सतत बाहेरच कशी राहात असेल असा प्रश्न अजून मनात आहेच. आजच्या या फोटोत पिल्लांच्या बाजूला जे काळं दिसतंय तो जर उरलेला उंदीर असेल तर अन्नपुरवठा चालू / शिल्लक असल्याची धूसर शक्यता आहे. A

गवि, अपडेट द्या आता तासातासाला... वाईट वाटतेय आईविना पिल्ली बघुन.. :(.. आशा आहे ती सुखरुप असावी..

धन्यवाद. त्या दृष्टीनेही तयारी ठेवली आहे. डॉ. सतीश पांडे हे घुबडांचे आणि पक्ष्यांचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांची पक्षीविषयक संस्थाही आहे आणि अनेक दशकांचा अभ्यासही आहे. त्यांच्याशी या धाग्यानिमित्त संपर्कात आहे. त्यांनी असा दिलासा दिला आहे की ठराविक काळाने मादीही घरट्याबाहेर जाऊ शकते. ती बराच काळ न दिसल्याने मनात धाकधूक आहेच पण तज्ञ व्यक्तीने ही शक्यता दर्शवल्यावर आशा वाटते आहे. वर म्हटल्याप्रमाणे उंदरांचा सप्लाय चालू असलेला दिसला तर पिल्लांचे आईबाप मधूनमधून येऊन जात असल्याचं सिद्ध होईल. अशा वेळी त्यांना उगीचच रिहॅब करणं म्हणजे ढवळाढवळ होईल. त्यामुळे त्यांना बाह्य अन्न देणे किंवा कोणा संस्थेकडे देणे यासाठी अजून थोडा धीर धरावा असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं.

अंडी कशी काय पळवली गेली? घुबडांचे इतर पक्षी शत्रू (कावळे) अंडी फोडून टाकतात. आमच्या इथले बुलबुलचे घरटे पण त्यांनी असेच उद्ध्वस्त केले होते. एखाद्या सापाने येऊन खाऊन तर नाही टाकली? रात्रीचा कॅमेरा ऑन करता येईल का? म्हणजे कोण तिथे येऊन विद्ध्वंस करतोय ते तरी कळेल?

कावळे हाच सर्वात जास्त संशयित शत्रू आहे इथे. पाचव्या मजल्यावर असल्याने आणि जागेच्या विशिष्ट रचनेमुळे साप येणे शक्य नाही. एक पिल्लूही मारलं गेलं. म्हणजे कोणीतरी भक्षक पक्षी अर्थात कावळा किंवा इतर जातीचे पक्षी म्हणजे कोतवाल, टकाचोर हे पक्षी मुख्य सस्पेक्ट आहेत. इतर एका जातीचं(शृंगी) घुबड ही शक्यता असली तरी फार कमी आहे. आणखी एक कमी शक्यता म्हणजे पिल्लू नैसर्गिक कारणांनी मेलं. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याची वेळ टळून गेली (ती एक्सपायर झाली (?) म्हणून घुबड आईबापांनीच स्वच्छतेच्या दृष्टीने ती दूर टाकली. अर्थात ही शेवटची शक्यता पक्षीतज्ञच सांगू शकतील. आवाजाबाबत ही बार्न आउल्स प्रचंड सेन्सिटिव्ह असतात. ती अंधारात केवळ आवाजाने उंदीर पकडतात, त्यांना उंदराचे हार्टबीट तीस फूट दूरवर ऐकू येतात असं त्यांच्याविषयी वाचलं आहे. त्यांना विशेषतः पिल्लांना फटाक्याच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाने त्रास झाला असू शकतो. एखादा अग्निबाण हवेत जवळ फुटला असेल तर धसक्याने पिल्ले मरु शकतात. त्या जिवावरच्या भीतीने घुबड मादीही घरटं सोडून जाऊ शकते असं वाटतं. (प्रचंड आवाज आणि धसका यांमुळे सशाची पिल्लं मेल्याचं पाहिलं आहे. घुबडांचं माहीत नाही.) रात्रीच्या कॅमेर्‍याविषयी: मजकडे इन्फ्रारेड कॅमेरा नाही. हँडिकॅम तिथे बसवता येत नाही. अन्य कॅमेर्‍यासाठी रात्री तिथे लाईट मारला तर घुबडांना प्रचंड डिस्टर्बन्स होतो. त्यामुळे सतत लाईट चालू ठेवणं शक्य नाही. रात्री कॅमेरा ठेवायचा तर तो सततच ठेवला पाहिजे. त्यामुळे लाईटही सतत मारला पाहिजे. खरं तर हे निशाचर पक्षी आहेत आणि रात्रीच त्यांच्या बर्‍याच घडामोडी घडतात हे खरंच. भल्या पहाटे मला त्यातली थोडी झलक बघायला मिळते. सकाळी आठ-नऊच्या सुमारास हे सर्व बच्चे गाढ झोपतात आणि घुबड मादी मात्र प्रचंड झोप आलेली दिसत असूनही ती परतवत एकदम अटेन्शनमधे सावध असते. अर्थात दोन दिवस ती आलेली नसल्याने हा सर्व भूतकाळ. :(

गुड न्यूज.. सर्व वाट पाहणार्यांसाठी.. खात्रीपूर्वक एक नवी छोटी चिचुंद्री पिल्लाखाली दाबून ठेवलेली दिसली. पिल्लांवर आईबापांचे छत्र अद्याप आहे याचा स्पष्ट पुरावा. हुशश. मधल्या दोन दिवसांत माझे बोनलेस चिकन खाल्लनीत ... जाऊंदे.

पण त्या भक्ष्याचे तुकडे कोण करतं आहे? त्यांना चालत असेल तर चिकनचा खिमा टाका ना थोडा थोडा.

तुकडे करण्याविषयी मलाही तसं वाटलं, पण निरीक्षण केल्यावर कळलं की तो छोटूसुद्धा उत्साहाने हे काम करु शकतो. मोठ्याला चिरफाड करायला काहीच प्रॉब्लेम नाही पण छोट्याला जरा ओढाताण करावी लागते. मग तो मोठ्याच्या मागे लागून सुरुवातीची थोडी चिरफाड करुन घेतो. आता लक्षात आलं की "खा रे.. खा रे.. हा घास काऊचा.. हा घास चिऊचा.." असं करत मागे पळत पळत मिनतवारीने भरवण्यासाठी ही काय आपणा मनुष्यांची कारटी थोडीच आहेत? इथे तर लवकर लवकर खाऊन वाढ होऊन शक्तिमान न झाल्यास "हा घास काऊचा" याचा भलताच भयंकर विपरीत अर्थ होऊ शकत असल्याने पिल्ले गपगुमान आपलेआपले तुकडे करुन खातात..

पाणी आणि पक्षी खरंच फार स्वयंपूर्ण असतात! सस्तन प्राण्यांची पिल्ले तरी दुधासाठी काही काळ आईवर अवलंबून असतात पण पक्ष्यांची पिले मात्र अगदी जन्माला आल्यापासून जगण्यासाठी स्वतः झगडताना दिसत आहेत. परवा वाचलं की खाणं पुरेसं असेल तर घुबडाची मोठी पिले छोट्या पिलाना अन्नाचे तुकडे करून भरवतात सुद्धा! आता मात्र जर त्यांचे आईबाप येत नाहीत हे नक्की झालं असेल तर त्यांना कोणा संस्थेच्या ताब्यात दिलंत तर तुमचीही सुटका होईल, आणि कावळे/मांजरं येऊन त्याना मारतील का काय हे टेन्शन पण राहणार नाही. आणि ते लोक त्या पिलांचे नीट रिहॅबिलिटेशन करू शकतील.

आता मात्र जर त्यांचे आईबाप येत नाहीत हे नक्की झालं असेल तर त्यांना कोणा संस्थेच्या ताब्यात दिलंत तर तुमचीही सुटका होईल, आणि कावळे/मांजरं येऊन त्याना मारतील का काय हे टेन्शन पण राहणार नाही. आणि ते लोक त्या पिलांचे नीट रिहॅबिलिटेशन करू शकतील.
नाही... आईबाप येत आहेत याचाच तर पुरावा आहे ना वर दिलेला.. आता कशाला रिहॅब? आऊलीमाऊली आता घरट्यात बसत नाहीये इतकंच.. पण खाणं आणून देताहेत आईबाप असं दिसतंय ना..(प्रत्यक्ष दिसत नसले तरी पुराव्याने शाबीत).. भले एखादा उंदीर का असेना.. दिवसातून एकदा दिसतो. काल चवीत बदल म्हणून एक पक्षीच आणून टाकला होता. (मधे दोन दिवस उंदीर न दिसल्याने मी पिल्लांना जी कोंबडी दिली त्यामुळे तर या बदलाची मागणी झाली नसेल ना ? ;) ;) )पण मी पाहीपर्यंत त्या पक्ष्याचा फक्त एक पंख आणि थोडा अन्य भाग शिल्लक राहिला होता. तो कै. पक्षी म्हणजे मैना असावी असं पंखाच्या रंगावरुन वाटलं. बाकीचे पक्षी यांच्यावर खवटून असतात ते यामुळेही असेल..

मला वाटलं की तुम्ही त्यांना २ दिवस खाऊ घातलंत म्हणजे आता त्यांचे आईबाप अजिबात येत नाहीत की काय! एक शंका मात्र आहे. घुबडीण इतके दिवस पिलांना सोडून बाहेर कशी रहाते? की ती तिथे असल्याने इतरांचे लक्ष जाते म्हणून तिथे बसत नाहीये? किंवा घुबडोबा सुरुवातीपासून पिलाना खाऊ आणायचं काम इमाने इतबारे करत आहेत आणि घुबडीणीचं दिवाळीत काही बरंवाईट झालं असावं??

खरच हुशश वाटलं! हे सारं, मांजरींसारखं जागा बदलल्याप्रमाणे आहे की काय?

हुश्श!! मांजरं पण अशी करतात. पिल्लांचे डोळे उघडले की मांजरं बराच वेळ गायब होतात. दोन दुध पाजण्यामधला कालावधी वाढवत नेतात. पिल्लांची सरव्हायवल इन्स्टींक्ट्स वाढावीत म्हणुन असं करत असावीत असं मला वाटतं.

सध्या तरी सर्व ठीकठाक चाललेलं दिसतंय. दिवसाला एखादा तरी उंदीर घुबड आईबापांकडून येतो आहे. ते स्वतः मात्र समोर दिसत नाहीत. एक पिल्लू बर्‍यापैकी मोठं दिसायला लागलेलं आहे. त्याच्या शुभ्र पंखांमधे काही करडी पिसं तयार व्हायला लागली आहेत. ते बराच वेळ आळसुटल्याप्रमाणे झोपूनच असतं. लहान पिल्लू मात्र उत्साही आहे आणि ते मोठ्याला वरचेवर ढुसण्या देत आणि चळवळ करत असतं. मोठ्या पिल्लाच्या चक्क खांद्यावर / पाठीवर चढून घोडाघोडा केल्यागत बसण्याचा प्रकारही लहान पिल्लू बर्‍याचदा करतं. दादाही त्याला जरावेळ उचलून मग पाडून टाकतो. व्हिडीओ बरेच मोठे झाल्याने एडिट करायला हवेत. ते करायला वेळ नसल्याने आज व्हिडीओ नाही.