Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आमचं ईजुभाऊना कुणी मोंबासा - ठोंबासानं काळी जादू करून परत लायनीवर आणलं वाटतं! आणि लेखाचा शेवट फारच आवडला - 'क्रमशः' :-)

प्रचंड आवडलं! शेवटचं क्रमशः वाचून तर लै गारेगार वाटलं!!

गुलाबी थंडीत, उबदार रजईत वाफाळता चहा घेताना ज्या भावना असतात नेमक्या त्याच भावना हा लेख वाचून झाल्या. धन्यवाद हो विजूभौ! -(नॉस्टॅल्जिक झालेला) सोकाजी

छान लिहिलंय.. @
आज्जी कधी गुळ घालुन मस्त गोडसर बाजरीच्या भाकर्‍या अन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करायची. हिरव्या मिरचीचा सणसणीत तिखटजाळ कमी व्हावा म्हणुन सोबतीला ताटात लोण्याचा गोळा असायचा.
आज सक्काळ्-सक्काळी घरी फोन झाला.. आज चंपाषष्ठी. बाजरीची भाकरी, वांग्याच्या भाजी + भरीत, मसालेभात + वरण-भाताचा मेन्यु आहे. तुम्ही जखमेवर मीठ चोळ्ळत.. :P

बाजरीची भाकरी, वांग्याच्या भाजी + भरीत, मसालेभात + वरण-भाताचा मेन्यु आहे. तुम्ही जखमेवर मीठ चोळ्ळत..
आणि तुम्ही आमच्या जखमेवर.

एन. आर. आय. म्हणून विजूभाऊ जोहान्सबर्गात आता स्थिरावलेले दिसत आहेत. 'माहेर'च्या आठवणींनी व्याकूळ होणं हे, 'ते' वातावरण आता तुटल्याची जाणीव जशी 'सासुरवाशीणी'ला सुरुवातीच्या काळात मनाला टोचत असते तशी 'नवएनआराआय'ला नविन देशात/वातावरणात स्थिरावताना होते. एकदा स्थिरावल्यावरही 'मेरा कुछ साSSमान तुम्हाSरेSS पाSSस पडा है। ही भावना मनाला छ्ळत राहतेच. एकूण वर्णन आणि भावनोल्ल्हास अगदी मनाला भिडणारा आहे. लिहीत राहा, विजूभाऊ. तुमच्यामुळे माझ्यासारख्या 'मुरलेल्या' सासुरवाशीणीलाही 'घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात...'च्या आठवणी मनाला गुदगुल्या करतात आणि मनाची मरगळ खाली बसून उल्हासित हवेचा सुगंध 'सासुरवास' सुसह्य करतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

विजुभौचा काही लेख विचार आमच्या जालीय मित्रांच्या जीवाभावाच्या गोष्टी असतात त्यांच्या लेखनावर, प्रतिसादावर आमचं लक्ष असतं आणि त्यांच्या अशा हळव्या लेखावर आमची हजेरी जवळ जवळ असतेच. :) -दिलीप बिरुटे

सुंदर लिहिलेय... खरेच डिसेंबर असतो असा.. किंवा असायचा.. हल्ली मुंबईतून थंडी पळाली आहे, कॉलेज संपल्याने तेथील मजाही .. असो, पण हे वाचताना बरे वाटले !

ओ विजुभौ आपलं काय ठरलं होतं...! असे हळवे करणारे विषय नै घ्यायचे म्हणून. :) लेख आवडला. महाविद्यालयाच्या काळातला म्हणजे शिकत असतांनाचा डिसेंबर भन्नाट असायचा. आम्ही पोरं सकाळच्या आठच्या पिरेडला घरुन निघायचो आणि कॉलेजला जावून भिंतीला टेकून उन खात बसायचो. जाता येता जिथं पोरी दिसतील त्याच बाजूला उन्हात उभं राह्यचो. हाय हॅलो व्हायचे. भित्तीपत्रकं, कवी संमेलने, स्नेहसंमेलने, नृत्य, नाटक याच्या गप्पा करायचो. नुसत्या मजेमजेचा काळ. 'ओ मेरे सामने बैठी है मगर उससे कुछ बात ना हो पाती है' हे ग्यादरिंगमधलं मित्रांनी म्हटलेलं गाणं आम्ही कितीतरी दिवस इंजॉय करायचो. आता आम्ही मास्तराच्या भूमिकेत आणि तोच डिसेंबर पोरं नव्याने आमच्या आजूबाजूला थोड्याफार फरकाने तसाच जगत असतात. बाकी, बाजरीची चुलीवरची कडक भाकर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कधीकधी चरचरीत माशांचा रस्सा. अगं माय गं...! असो. विजुभौ, शेवटचा पॅरेग्राफ लंबर एक. वरीजनल डिसेंबर....! येऊ द्या पटापट पुढील भाग. -दिलीप बिरुटे

@शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं.>>> __/\__

आहाहा!!! गोधडीत गुरफटून मस्तपैकी उबदारपणे टीव्हीवरील म्याच बघत बसावी, वाफाळत्या कांदाभजीची प्लेट समोर असावी, त्या वासाला आणि गोधडीच्या उबेला भुलून घरच्या पाळीव मांजराने तिथेच ठाण मांडावे तसं वाटलं बघा हा लेख वाचून एकदम. आपण झोपलो असताना त्याची ती गुर्रगुर्र एकदम जाणवावी आणि आपल्याला जाग यावी, आंघोळ परम जुलुमाने करावी पण केल्यावर थंडी पळून जावी अन गलासभर दूध पोटात भरून उंडारण्यासाठी सैकल काढावी इ.इ.इ. अनेकोत्तम आठवणी या थंडीशी निगडित आहेत. बाकी लेख आवडलाच, पण त्यातही "डिसेंबर महिना असतो आकाशाचा. स्वच्छ निरभ्र आभाळ पहाण्याचा. शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं. डिसेंबरात संध्याकाळी मावळतीचं सूर्यबिंब दिसतं. ते जाणवतं ते त्याच्या पार्श्व भूमीवर उडणार्‍या पतंगाच्या हालचालीने. ईग्रजी व्ही च्या आकारात आकाशात उडणार्‍या बगळ्यांच्या माळे मुळे. डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते." हा प्यारेग्राफ फारच भावला. डिसेंबरातल्या अनेक संध्याकाळी मिरजेच्या आसपास आणि खुद्द मिरजेच्या गल्ल्यांत केलेल्या एकांती फेरफटक्यात दिसणारं आभाळ जाणवत राहिलं.

कार्तिक-मार्गशीर्षातले निरभ्र आकाश ज्यांना अजूनही पहायला मिळते त्यांचा हेवा वाटतो. मुंबईत कुठूनही, कितव्याही मजल्यावरून पहा, तारे तारका दिसतच नाहीत. एक तर इमारती आड येतात आणि दुसरे म्हणजे जमिनीवरचा प्रदूषित पिवळा प्रकाश आकाशातल्या त्या शुद्ध निरभ्र अंधाराला धुरकटून, काळवंडून टाकतो. गडद-गंभीर खोल अंधार कधी अन्य्भवायला मिळतच नाही. नितळ नीरव अंधारात आपले श्वासोच्छवास आपल्याला स्पष्टपणे ऐकू यावे, त्या अंधारात 'पहावे आपणासी आपण' अशी अवस्था होऊन आपण स्वतः आपल्याला लक्ख दिसू लागावे आणि अचानक 'प्रकाशू' उजळावा, काळोखाच्या त्या प्रकाशाने आपले डोळे दिपून जावे असे क्षण फार कमी वेळा वाट्याला येतात. 'मध्यरात्रि नभघुमटाखाली, शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी..' बोरकर आठवतातच.. आपल्या लेखाने हे सर्व विचार जागे झाले, धन्यवाद. जाता जाता : डिसेंबरच्या शेवटी शेवटी घनदाट थंडीत उघड्यावर कधी उल्कावर्षाव अनुभवला आहे का?

मस्त लेख विजुभाउ. डिसेंबर मधल्या आठवणी जाग्या झाल्या. संगमनेरला असताना थंडी मध्ये सायकली वर मफलर बांधून शाळेत जाणे. मुद्दामून कोपर्यावर मित्रांबरोबर रेंगाळणे. रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जाणे आणि पाववडा खाणे. आणि पुण्यात असताना कॅम्प मध्ये डिसेंबर निमित्त सजावट पाहण्यासाठी जायचे (पण खरे कारण म्हणजे एम जी रोड आणि इस्ट स्ट्रीट वरील सृष्टीसौंदर्य पाहायचे असायचे)

एखादा दिवस आणि तीही डिसेंबरातली सायंकाळ. मंदिराच्या परिसरात तू आणि मी आपल्याच नादात. मंदिरात किती ती शांतता. भजनाचे हलके सूर तेव्हाच तुझ्या माझ्या गप्पांना पूर. पु.शि.रेगे म्हणतात 'तशी झाडं पानात यायला लागतात. आकाशाच्या खिडक्या मिटायला सुरुवात होते' तु चाफ्याची फुलं ठेवतेस माझ्या हातात. थंडीतला उबदार स्पर्श. दूर झाडीतून एक थंड हवेची झुळुक हलकेच तुझ्या माझ्यातून वाहात जाते, 'किती थंड असतो रे तुझा तळहात' अंगावर सांडलेली ऊब मला काहीच सूचू देत नाही. तु हलकेच अंगावरुन मोरपिस फिरवावा तशी हलके हलके बोलत असतेस. मी निरखत असतो तुला.. 'वा-याच्या बोटांनी तुझ्या चेह-याची तळाशी गेलेली पाने भराभरा उलगडून पाहतो, ही नाधोंची ओळ मला आठवून जाते. तु मला मी तूला वाचत असतो. सर्वांगातून लहरत जातो आपण. मंदिरात आता शांतता 'आता निघलं पाहिजे' थंडीत तुला काहीही सुचतं जातं. किती वर्ष जगु रे आपण. मी हसतो तुला. चल, आता निघलं पाहिजे. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातातून सुटत नाही. तीच ओढ, तीच हुरहुर, निरोप घेतांना डोळ्यात दाटलेलं आभाळ आपण दिसू देत नाही, दूरपर्यंत जातांना पाहात राहतो मी तुला आणि माझं एकेक पाऊल तुझ्याभोवतीच रेंगाळत चालते डिसेंबरातल्या एका सायंकाळी. -दिलीप बिरुटे