Welcome to misalpav.com
लेखक: विश्वनाथ मेहेंदळे | प्रसिद्ध:
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा. इस्पिकचा एक्का हे मिपाकर काही तासांसाठी मुंबईत येत आहेत अशी वार्ता मिळाली म्हणून शनिवारी दुपारी विमानतळाजवळ कट्टा आयोजित केल्याची खबर लागली. धागा वाचल्यावर उरात धडकी भरली, कारण कट्ट्याचे ठिकाण विमानतळाजवळ हवे होते आणि आता काहीजण तो विमानतळ हलवून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी(?) आणा असे म्हणतात की काय अशी धास्ती लागून राहिली. पण मध्यवर्ती मुंबईकरांनी तशी मागणी केली नसावी, कारण विमानतळ अजून तिथेच आहे :-) असो, तर शनिवारी भल्या पहाटे ९:३० फोन वाजला. जड डोळ्यांना ताण देत पाहिले तर विलासराव. कट्ट्याचे कुठे ठरले असे विचारण्यासाठी त्यांचा फोन आला होता. आता अजूनपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर फार प्रतिक्रिया दिसत नव्हत्या आणि शिवाय तिथे तपशील पण नव्हते. आयोजक डॉक्टर खरे आणि मुवि काका. दोघांचेही नंबर माझ्याकडे नव्हते. मग २-३ ठिकाणी संदेश पाठवून शेवटी संपर्क झाला आणि कळले की कट्ट्याची जागा बदलण्यात आली आहे. मुलुंड पूर्व येथे बावर्ची हॉटेलला १:३० वाजता या असे सांगण्यात आले. १२:३० च्या सुमारास घरून कूच केली. विलासरावांना दादर स्टेशन वर भेटलो तर त्यांनी मेकोव्हर केला होता. २० महिन्यांची परीक्रमाफेम दाढी गायब. बरेच दिवसांनी भेटत असल्याने एकमेकांना उप्दते देत मुलुंडला आलो.विलासरावांना ठिकाण माहित असल्याने अल्प कष्टात तिथे पोहोचलो. कोपऱ्यातल्या टेबलावर ४ जण बसले होते. मुवि आणि नूलकर काका सोडता तिथे अजून दोन नवे चेहरे. एक शहाणा सभ्य सरळ दिसणारा युवक आणि एक भारदस्त व्यक्तिमत्व. शहाणा मुलगा म्हणजे भाते हे कळले पण भारदस्त काकांची कुणी ओळख करून देइना. शेवटी आपण होऊन विचारले तर, अरे हे इस्पिकचा एक्का, फोटो नाही हा पाहिलेस असे उत्तर आले. आता आली पंचाईत. कारण मी त्यांची प्रवासवर्णने वाचली नव्हती. वाचली होती ती सर्वात महान प्रवासाची लेखमाला. हे स्पष्टीकरण दिल्यावर १-२ जणांच्या डोळ्यात, काय खुळचट माणूस आहे, इतक्या चांगल्या लेखमाला नाही वाचल्या याने, असे भाव तरळलेले दिसले. एक्का काकांना बघून त्यांनी कधी सिनेमात रोल केला तर जरब असलेला पोलिस अधिकारी किंवा ग्रामीण चित्रपटातील पाटील, सरपंच असा रोल त्यांना स्क्रीन टेस्ट न घेता देतील असे वाटून गेले. भातेचा आवाज फक्त नाव सांगतानाच ऐकला. नंतर त्याला बिचाऱ्याला कुणी बोलू दिले नसावे. ऑर्डर काय द्यायची हे आधीच ठरवून ठेवले गेले होते, त्यात थोडे फेरफार करून वेटरला ऑर्डर दिली गेली आणि गप्पा सुरु झाल्या. विषय अर्थात मिसळपाव. मग मिसळपाव आणि इतर संस्थळे यांची तुलना हा नेहमीचा यशस्वी विषय आला. मुविंनी आमच्या बंड्याची आवर्जून चौकशी केली. विलासरावांची ब्राझील लेखमाला, परीक्रमेचे अनुभव हे विषय झाले. ४ वर्षे होत आली तरी विलारावांची लेखमाला अजूनही चर्चेत असते. त्यानंतर त्यांनी परत कधीही काही लिहिले नाही यावरून त्यांचे एक छोटेसे बौद्धिक घेण्यात आले. एक्का काकांसारख्या लेखकाकडून त्यात लीड घेण्यात आल्याने विलासराव आता मनावर घेतील अशी आशा. हे सगळे चालू असताना एक्का काकांच्या लेखांवर चर्चा न होणे शक्यच नव्हते. त्यांची महान प्रवासाची लेखमाला मी आजवर वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखामालान्पैकी होती, हे मी आवर्जून नमूद केले. हे होईतो अजून एक काका दाखल झाले. ज्ञानव अशी ओळख करून दिल्यावर कट्टेकरांना आनंद झाला. नुकतेच शेअर मार्केट वर लिहिलेले त्यांचे लेख आले असल्याने उत्सुकता होतीच. इतक्या लगेच त्यांची ओळख झाली याच आम्हाला आनंद झाला. मग पेठकर काकांची चौकशी झाली आणि ते फेब्रुवारीत येतील तेव्हा कट्टा करण्याचा संकल्प सोडण्यात आला. नूलकर काकांना मी आधी दोनदा भेटलो होतो. एकदा ओरिगामी कट्ट्याला आणि एकदा आम्ही फ्लेमिंगो बघायला गेलो होतो तेव्हा. फ्लेमिंगोंचा शिजन जवळ आल्याने परत एकदा फ्लेमिंगो बघायला जाण्याचा संकल्प सोडण्यात आला. नूलकर काकांनी अजून एक इंटरेस्टिंग कल्पना मांडली. त्यावर अंमल करण्याची संधी लवकर मिळो अशी इच्छा. ही कल्पना काय होती असे विचारू नये. नाही, घाबरु नका, आम्ही मुंबईकर असल्याने अपमान करण्याची धमकी देणार नाही, पण सध्या ही मूठ झाकलीच राहू दे. नूलकर काका आमंत्रण देतील तेव्हा कळेलच. अपमानावरून आठवले… पुण्याचा विषय पण निघाला. पण एक्का काका समोर असल्याने पुणेकरांची फार निंदानालस्ती केली नाही. पुढील कट्ट्याला कसर भरून काढली जाईल असे वाटते. तितक्यात डोंबिवलीचा ज्याक स्प्यारो आला. कट्ट्याचे ठिकाण बदललेले त्याच्या पथ्यावर पडले, कारण अन्यथा त्याला जमले नसते. मधील काळात वेटर येउन ऑर्डर केलेले पदार्थ देऊन गेला होता. त्यांचा आस्वाद घेणे चालूच होते. थोड्याच वेळात डॉक्टर खरे यांचे आगमन झाले. माणूस लय भारी. दिसायचे म्हणाल तर 'त्वचासे मेरी उम्र का पता नाही चलता' या प्रकारात मोडणारा. ते आल्यावर गाडी परत कुठूनतरी पुण्यावर आली. खरेकाकांनी आपले चार अनुभव सांगून मते मांडली. त्यांचा क्यामेरा भारी होता. त्याच्या optical झूम चे प्रात्यक्षिक त्यांनी कुणाच्यातरी नाकाचा क्लोज फोटो ४ फुटांवरून घेऊन केले. तो फोटो टाकून "ओळखा पाहू कुणाचे नाक आहे" हा खेळ खेळण्याची त्यांची मनीषा आहे हे आम्हाला माहित नव्हते. इतका वेळ आम्हाला मस्त कडेचे मोठे टेबल मिळाले होते. पण आत तिथे उन यायला लागले होते. म्हणून आम्ही जागा बदलली. त्यात माझ्या एका बाजूला ज्ञानव काका आणि दुसरया बाजूला खरे काका अशी अरेंजमेंट झाल्याने माझी चंगळ झाली. इथे दोन टेबले जोडून घेतली होती तरी आपसूक दोन सबग्रुप पडले. माझ्या टेबलावर ज्ञानव काका, खरे, मी, स्पा आणि नुकतेच आलेले मिपाचे तरुण आणि तडफडणारे…आपलं…. तडफदार नेत्रुत्त्व किसनचन्द्र साहेब शिंदे सरकार. आणि उरलेले म्हणजे एक्का, विलासराव, मुवि, नूलकर, भाते हे दुसऱ्या टेबलावर. आमच्या टेबलावर मग ज्ञानव काका आणि डॉक्टर यांचे वैचारिक आदानप्रदान सुरु झाले. फुकटचा सल्ला मागणाऱ्यांना कसे कटवावे याच्या टिप्स दिल्या गेल्या. त्यामुळे ज्ञानाव काकांकडून माझा portfolio फुकटात revamp करून घेण्याच्या माझ्या बेताला सुरुंग लागला. पलीकडून विपश्यना, साधना, अनुभव असे शब्द ऐकू येत होते. माझा या विषयावरच अन्भव दांडगा असल्याने, तिथे काय चालू असेल याची पूर्ण कल्पना मला आली. हा विषय म्हणजे विपश्यना नाही, तर त्यावर चर्चा. चहा कॉफी चे १-२ राउंड होऊन गेले होतेच. पण आता घड्याळाचा काटा चार ओलांडून गेला होता, त्यामुळे निघणे क्रमप्राप्त होते. निघण्याआधी खरे काकांच्या हस्ते एक्का काकांना फूल न फुलाची पाकळी म्हणून एक फ़ुल्ल फूल त्यांना देण्यात आले. अरेंजर मुवि काकांची कल्पना. मग नूलकरांनी पण त्यांना एक ओरिगामी फूल दिले. नूलकर काका ओरिगामी मध्ये तरबेज. इतके कि त्यांचे पैशाचे wallet हे चक्क कागदी होते. मी दर महिन्याला नवीन पाकीट वापरतो असे ते विनोदाने म्हणाले. आधी बरेच फोटो झाले होते पण तरीही प्रथेप्रमाणे परत फोटोसेशन झाले आणि पुढील कट्ट्याचे बेत करत एक्का काकांना टाटा करून मंडळी पांगली. खाणे पिणे काय झाले ते नीटसे आठवत पण नाही. कारण तो मूळ मुद्दा नव्हताच. शेवटी कट्टे होतात ते खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी नाही तर भेटण्यासाठी. अन्यथा आपला उपास असताना दहिसर वरून पार मुलुंड ला ज्ञानव काका का म्हणून आले असते? माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी कट्ट्यांना जातो ते इंटरेस्टिंग माणसे भेटावीत, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळावी म्हणून. चाकोरीतले आयुष्य असणारा मी. बहुतेक मित्र संगणक क्षेत्रातले. मिपामुळे मित्रमंडळ आणि अनुभवक्षेत्र विस्तारले. अन्यथा एक ओरिगामी जाणणारा निसर्गप्रेमी, विपश्यनेत गती असणारा आन्त्रप्रिन्यर, लष्करातला डॉक्टर, Anthropology मध्ये अभ्यास असलेला जातिवंत भटक्या असे एक एक इंटरेस्टिंग नमुने कुठे भेटणार होते मला? केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार असे म्हटलेले आहे. त्या दिवशी माझी अनेक पंडितांशी मैत्री झाली. तेव्हापासून मी आपसूकच थोडा जास्त चतुरपणे वागतो आहे असे मला वाटते.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

लई झ्याक वृत्तान्त लिवलाय हो विमेकाका! कट्टा आज पुन्हा एकदा झाला, असं वाटलं... जणू ‘अॅक्शन रीप्ले.’ असे वृत्तान्त वारंवार वाचायला मिळावेत, यासाठीतरी कट्टे वारंवार व्हावेत. (संपादक किसनद्येवा, प्लीज नोट!) तसंच, यानंतरच्या प्रत्येक कट्ट्याला विमेंनी उपस्थित राहून कट्ट्याचा वृत्तान्त त्यांनीच लिहिला पाहिजे, ही आग्रहाची विनंती. खूप दिवसांनी मिपाकरांची भेट झाली. आता पुढच्या कट्ट्याची वाट बघणारा, सर्वांचाच, सुधांशुनूलकर

यानंतरच्या प्रत्येक कट्ट्याला विमेंनी उपस्थित राहून कट्ट्याचा वृत्तान्त त्यांनीच लिहिला पाहिजे, ही आग्रहाची विनंती.
अरे व्वा! विश्वनाथ मेहेंदळे साहेब, मिसळपावच ब्यूरोचे अधिकृत प्रेस रिपोर्टर.

नुलकरांच्या आग्रहाच्या विनंतीला माझ्याकडून अनुमोदन @सुधांशू जी फ्लेमिंगो बघायला जेव्हा केव्हा जाल तेव्हा कळवा मी सह-कुटुंब (२+२) येईन.

विमे काका लिहाल्याला लागले अजुन काय पाहिजे ..!!! अचानक आलेल्या काही जबबदारी मुळे कट्याला यायल्या जमल नाही !!! बघुया पुढे :)

खरे तर कट्टा , साकीनाकाच्या आसपास भरवायचे असे शुक्रवार पर्यंत नक्की झाले होते.मी आणि भाते त्यासाठी शुक्रवारी भेटलो. शनिवारी पहाटे (म्हणजे, भा.प्र.वे. नुसार, स.१०) वाजता उठलो.दात घासता-घासता, मोबाईल बघीतला तर इ.ए. ह्यांचा मिस कॉल आलेला.(त्यांचा कॉल मी मिस केला, हेवेसांनल).चहा पिवून त्यांना फोन केला तर ते अर्ध्या वाटेवर आलेले होते.लगेच डॉ. खरे ह्यांना फोन केला, तर त्यांनी सांगीतले, की त्यांच्या मुलीची तब्येत बरी नसल्याने, ते साकीनाक्याला यायची शक्यता कमी आहे. लगोलग इ.ए. ह्यांना विचारले , की ते मुंबईला कुठे येणार आहेत.तर त्यांनी सांगीतले, मुलुंड. इधर हमारे दिमागकी बत्ती जल गई. आणि मग ऐनवेळी कट्टा मुलुंडला करायचे ठरले. ही सगळी यातायत का? तर एकाचवेळी दोन-दोन डॉ.ना एकाच व्यासपीठावर भेटायची आम्हा सगळ्या मिपाकरांना ओढ होती म्हणून. मागच्या वेळेप्रमाणे हे बिल पण डॉ. खरे ह्यांनी दिले.आता त्याची फिट्टंफाट म्हणून अजून एक कट्टा ५/६ जानेवारी सुमारास करायचे घाटत आहे. सौजन्य, प्रमोद देर्देकर.

धाग्याची वाट पहातोय. यावेळी तरी आयत्या वेळी गडबड न होता आधी ठरलेल्या ठिकाणी/वेळी कट्टा होईल (?) ही माफक अपेक्षा. वृत्तांत देण्यासाठी अर्थातच विमेकाकांची उपस्थिती आवश्यक.

एखाद आठवडा पुढे ढकलता येतंय तर बघा जरा. एक तारखेला मुंबैला आल्यानंतर पुन्हा पाच-सहा तारखेला फेरी मारायची म्हणजे....!! जमलं तर हो, नायतर काय शुभेच्छा देईन बापडा नेहमीसारख्याच. ;)

धागा टाकणार आहेत. त्यावेळी ता. पुढे-मागे करता येईल. शक्यतो ता. पुढेच ढकलू या. कारण आपण सगळेच ३१ आणि १ बिझी असतो आणि पुढचा आठवडा परत नॉर्मलला येण्यात जातो.

असंभव... आणि शिवाय सूड पण आहेच...अज्जून काय हवे... ठीक आहे.. कट्टा ११/१२ जाने. च्या सुमारास करूया. (मिपाचे भोगी संमेलन असे नांव ठेवायला पण हरकत नसावी.)

मागच्या वेळेप्रमाणे हे बिल पण डॉ. खरे ह्यांनी दिले.
पुढचे किमान ५/६ कट्टे डाॅक नी खिशात हात घालू नये असा प्रस्ताव मांडतो.

चकलीला मोहन परफेक्ट पडलं की चकली जितकी खुसखुशीत होते तेवढा खुसखुशीतपणा वृत्तांतात आला आहे. बाकी नूलकर काका कसलं आमंत्रण देतायेत त्याकडे लक्ष ठेवून आहेच. काही अपरिहार्य कारणास्तव पुणे आणि मुंबई दोन्ही कट्टे हुकल्याची हळहळ वाटत आहे.

मस्तं वृत्तांत. नूलकर काकांच्या पाकिटाचा फोटो काढला असल्यास टाका? आमच्यासाठी फोटोतल्या लोकांची ओळख करून द्या.

आमच्या मुलुंड ला कट्टा झाल्याचे वाचून आनंद झाला,मी तिथे नसल्याने येउ शकलो नाही. वृत्तांत मस्त जमला आहे..पुढच्या कट्ट्यासाठी शुभेछ्छा!

वाचलात. पाटीलसाहेब म्हणले असते या कि करूया हिथ...लंडनला स्वखर्चाने..

वृत्तांताचे कौतुक केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दर वेळेला वृत्तांत मी लिहायची सुचना वाचून पैसाताईंच्या चेहर्यावर काय भाव उमटले असतील याची कल्पना करतोय :-) माझा लिहायाचा वेग जाम कमी आहे. लोकं एकटाकी कसे काय लिहीतात देव जाणे. कट्ट्याच्या वृत्तांतात उशिर करता येत नाही. असो, पुढचे पुढील वेळेस बघू. सद्ध्या तरी कट्टे परत सुरू झाले याचा आनंद साजरा करतो आहे.

पुतणे पुतणे पुताण्यांचे दुखणे (संदर्भ : दुनियादारी) एक काम करू वृतांत भरायला घ्या. जरा चूर चुरीत झाला आणि संपत आला की कट्टा कुठे करायचा ते ठरवू. काय? (काहीच्या काय)

पुढच्या वेळी कट्टा होणार म्हणून बातमी आली की, "विमे, वृत्तांत लिहिलास का?" म्हणून विचारायला सुरुवात करीन! हाकानाका!

माझ्या राहत्या एरीयात कट्टा झाला, पण भेटता नाही आलं. संधी गमावली. :(

"मी मुंबैमधे असताना कधीच कट्टा नसतो" तुम्ही येण्यापुर्वी धागा काढा, आपण करू या कट्टा...

आयला...मी मुंबैमधे असताना कधीच कट्टा नसतो
चुक. मुंबईत कट्टे असताना आवतान देवूनही तुम्ही कधीच येत नाही, असं म्हणायला हवं खरं तर. :D