डुबरगेंडा सर अशी सुरुवात मी इथे करत आहे ती केवळ तुम्हाला ते शिक्षक होते हे कळण्यासाठी. तोंडारमधे आम्ही कोणत्याही शिक्षकाला सर म्हणत नसू. गुर्जी आणि बाई अशा संज्ञा आम्ही तिथे वापरत असू. डुबरगेंडा सर मात्र गुर्जी या सन्मानाला देखिल कोणाला पात्र वाटत नसत. त्यांचा उल्लेख इतर शिक्षकांत आणि मुलांत एकेरीने होई. इथे 'त्यांच्या' हा शब्द देखिल ओव्हरएक्सप्रेशन आहे. तेव्हा तरी आम्ही त्याला एकेरीच संबोधत असू. तो कोणालाच आवडत नसे. त्यालाही कोणी आवडत नाही असे वाटायचे. त्याच्या नावाची मला फार गंमत वाटत असे. असले नाव कोण बरे आपल्या मुलाला ठेवले असेल? आमचे गुरुजी उशिरा आले किंवा आलेच नाहीत तर आम्ही वर्गात धिंगाणा घालत असू. तेव्हा तो आमच्या वर्गात येई आणि सर्वांना हडकत असे. त्यामुळे तो सर्वांना अप्रिय होता. तो आम्हाला शिकवायाला कधीच नव्हता. त्याच्या वर्गातील मुलांत देखिल त्याच्या एकलकोंड्या स्वभावामुळे आणि कडक सजांमुळे घाणेरडा अशीच होता. हळूहळू कळले कि त्याचे मूळ नाव डुबरगेंडा नाही, वेगळेच काहीतरी आहे. पण तो ४ फुटी असल्याने आणि वाकून चालत असल्याने त्याला डुबर हे विशेषण तंतोतंत बसत असे. तो तसा बराच वाळका होता तेव्हा कशाचाच काहीच परिणाम न होण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याला गेंडा ही उपाधी मिळाली असावी. शिवाय त्याची चेहरेपट्टीही कुरुपच होती. शिवाय त्याच्या चेहर्यावर गेंड्याप्रमाणे छोटछोट्या वळकट्या होत्या. त्याला पाहिले कि मुले दोन हात फटकूनच असत. तो फारच चेंगूट होता असे सगळे म्हणायचे. त्याची चेंगटपणाची उदाहरणे गावप्रसिद्ध होती. त्याचे मळकट फाटके कपडे लगेच त्याची साक्ष म्हणून पाहता येत.
तोंडारचे शासकीय प्राथमिक विद्यालय गावापासून एक किमी वर असावे. त्याच्या बाजूने एका ओढ्याचे पात्र होते. पावसाळ्यात त्यात खेळणे म्हणजे मुलांसाठी कोण मजा असायची. त्या पात्रातून आणि त्याच्या कडेने एक वाट जाई. तिकडे फारसे शेतकरी जाताना कधी पाहिले नाहीत. मेंढपाळ मात्र तिकडेच जात. संध्याकाळी पाच वाजता अंधार पडायला चालू झाले कि डुबरगेंडा तिकडच्या अंधारात गायब होई. गावात आम्ही कधी त्याला पाहिले नाही. त्या शाळेत मी २-३ वर्षे होतो, दुसरी ते चौथी. पैकी डुबरगेंडा वजा जाता मला गणेश, राजेश, संगीता, रमेश, त्याची बहिण राणी, महेश, गजेंद्र, असे काही मित्र आणि चार-सहा शिक्षक इतकेच तिथले लोक आठवतात. सर्वजणांसाठी एकमताने डुबरगेंडा एक उपहासाचे पात्र होते आणि त्याला स्वतःला त्याची ना खंत ना खेद! तो कधी प्रार्थनेसाठी सर्वांसोबत थांबलेला देखिल आठवत नाही. अगदी स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी सुद्धा. कधी कुणाची काळजीने, हून विचारपूस केली नाही. कधी कुणाला काही देण्याघेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
इयत्ता दुसरीचे निकाल असावेत. परीक्षा अशी नव्हतीच. एका प्रार्थनासभेनंतर दुसरीच्या वर्गाचे पहिला, दुसरा असे ठरवण्यात आले. कसे तर शिक्षक मुलांकडे पाहायचे आणि पैकी एका मुलाला 'उठ' म्हणायचे. तो पहिला. मग दुसर्याला म्हणायचे. तो दुसरा. पहिला महेश होता. त्याचे वडिल, तालुक्याच्या गावी प्राध्यापक होते. त्यांचा गावात चांगलाच दबदबा होता. शिवाय ते लिंगायत होते. दुसरा मी होतो. आमचे वडील ग्रामसेवक. सर्व जातींत मिसळणारे. शिक्षित पण खेडवळ. प्रत्येक लिंगायताप्रमाणे महेशचे वडिल काँग्रेस/शिवराज पाटील/इंदीरा गांधी काँबोचे समर्थक आणि प्रत्येक ब्राह्मणाप्रमाणे आमचे वडिल अटलजींचे पूजक! एकदा महेशच्या आईने मला जेवायला बोलावले होते. कोणता सणसमारंभ असावा. माझ्या खाण्याच्या पद्धतीत काहीच ब्राह्मणी नाही, ब्राह्मणी तर जाऊच द्या अगदी लिंगायती पण नाही म्हणून ती कुचेष्टेने हसली होती. तसे तिने बोलूनही दाखवले होते. तो एक सल मनात होता. शिवाय महेश वर्गात गप्प असायचा, मीच प्रश्न विचारायचो आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचो. इतकेच नव्हे तर शिक्षक नसत त्यावेळी मी शिक्षकाप्रमाणे शिकवायचो देखिल! आपल्यापेक्षा कुणी हुशार आहे ही कल्पना देखिल मला तेव्हा सहन व्हायची नाही. (उदगीरला आलो तेव्हा तिथली कितीतरी मुले आपल्यापेक्षा कितीतरी हुशार आहेत हे मला सलले होते, पण हळूहळू त्याची सवय झाली. शिवाय त्यात काही अन्यायात्मक नव्हते.) म्हणून मी हेडमास्तरांना म्हणालो कि तुम्ही महेशला पहिला बनवले आहे ते चुकीचे आहे. माझ्या उद्दामपणाचा त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी मला गपचूप खाली बसायला सांगीतले. मी रागाने खाली बसलो आणि खुनशीपणे त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांचा राग अजूनच वाढला. त्यांनी वडिलांना पत्र लिहिले आणि बोलावून घेतले. त्या निमित्ताने मी पूर्ण शाळेत प्रसिद्ध झालो.
त्यानंतर १-२ महिने गेले आणि डुबरगेंड्याने मला एकदा एका मुलाकरवी निरोप धाडून बाजूला बोलावून घेतले. मला बरेच नवल. 'व्हाय मी ऑउट ऑफ ऑल?' ची भावना तरळून गेली.
"तुझं नाव काय?"
"अरुण."
"पूर्ण नाव?"
"अरुण भास्करराव जोशी."
"तू ब्राह्मण आहेस का?"
"मी देव, धर्म, जातपात मानत नाही."
"तुला बाकीचे लोक ब्राह्मण मानतात का?"
"हो."
"येळवसीला आमच्या घरी येशील का?"
"कुठे?"
"कुमठ्याला"
"तुम्हाला शेत आहे?"
"चांगलं ५० यक्कर आहे."
त्यावेळी प्रत्येकाचं शेत ५० प्लस यक्कर असायचं. ज्याची १० यक्करपेक्षा कमी जमिन असायची ते दळिद्री. आमचे शेतच काय घरही नव्हते म्हणून आम्हाला कंगालच मानायचे. पण एकदा 'ब्राह्मणाचे धन त्याचे शिक्षण असते' असे आमचे गायकवाड सर म्हणाले तेव्हापासून तो न्यूनगंड गुरगावचे शेतकरी पाहिपर्यंत तरी माझ्या मनातून गेला होता.
"पण मी नेहमी माझ्या मित्रांसोबत येळवसीला शेतावर जातो. तुमच्या घरी गेल्यावर त्यांच्यासोबत मजा करता येणार नाही."
माझे खरे दुखडे वेगळेच होते. भातुकलीच्या खेळात राणी माझी राणी बनत असे. ती गावात, आमच्या पिढित, सर्वात गोरी आणि सुंदर मुलगी होती. रेल्वे ट्रॅकपलिकडचे त्यांचे शेत अप्रतिम सुंदर होते आणि आम्ही सगळे तिकडेच पडिक असत असू. येळवसीला गुरांना न्हाऊ घालणे, अंबिल खाणे, कडब्याची खोपटी बनवणे, पतंग उडवणे, झाडावर खेळणे, साळीच्या पिकात लपालपी खेळणे, भातुकलीचा कोणतासा प्रकार खेळणे यांमधे तिचा जो सहवास मिळणार होता त्याला मी मुकणार होता.
"असं काही नाही. माझ्या दोन मुली आहेत. त्यांच्यासोबत खेळ."
"पण त्यांच्याशी मैत्री करायलाच मला वेळ लागेल."
"काही वेळ लागणार नाही."
माझे हिशेबी मन विचार करू लागले. डुबरगेंड्याच्या मुली त्या काय राणीइतक्या सुंदर असणार?
"मी येणार नाही." मी ठामपणे म्हणालो.
"अरे ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण लोकांसोबत राहावे. त्याच्याने बुद्धिमत्ता वाढते."
"काय सांगता? तुम्ही ब्राह्मण आहात?"
"हो."
मला प्रचंड धक्का बसला.
"पण गुर्जी, तुम्ही तर आमचे पाव्हणे नाहीत."
"म्हणजे?"
"म्हणजे आमचे पाव्हणे नसलेले ब्राह्मण मी पाहिलेलेच नाहीत. जितके पाहिले ते सगळे पाव्हणेच."
"ते कसं?"
"आम्ही ज्या ज्या गावात जायचो, तिथे आमचं एकमात्र कुटुंब ब्राह्मण असायचं. तेव्हा नातेवाईक सोडून ब्राह्मण मी पाहिलेलेच नाहीत."
"आमच्या गावातही आमचं एकच घर आहे."
"किती दिवस जायचं?"
"दोन."
नातेवाईक सोडून जे लोक ब्राह्मण कसे असतील याबद्दल मला प्रचंड कुतुहल वाटले. हा कंसेप्टच मला नविन होता. 'दुसरे' ब्राह्मण कुटुंब कसे असते हे पाहायला मिळणार! शिवाय डुबरगेंड्याला दोन मुली आहेत. गावात मी अत्यंत कुरुप लोकांच्या अत्यंत आकर्षक मुली पाहिल्या होत्या. मुली पाहताना त्यांच्या बापांचे वैगेरे चेहरे आठवले तर रसभंग होतो. शिवाय 'बामन भट, कडी आंबट. कडीत पडली माशी, बामन राहिला उपाशी.' असे इतर जातीची मुले मला नेहमी चिडवत. दुसर्यांदा अन्न बनवेल इतकेही धन ब्राह्मणांकडे नसते असा त्याचा अर्थ होई. इथे ५० यक्कर शेताची मालकी! मनाची चांगलीच द्विधा झाली. शेवटी राणीबल नाविन्यबलासमोर टिकले नाही. डुबरगेंड्याने मला इतका आग्रह केला कि विचारता सोय नाही. शेवटी मी हो म्हटले. आईवडिलांची परवानगी घ्यायचा प्रश्नच नव्हता, गावकर्यांना सर्व जग पूर्णतः विश्वसनीय असायचे. मुलगा कितीही वेळ दिसला नाही तरी पुन्हा कधीना कधी दिसायचाच, म्हणून १-२ दिवस बिनघोर कुठेही जा.
शाळेशेजारचा ओढा पश्चिमेकडे जायचा. मावळत्या सूर्याच्या जणू साथीलाच आम्ही दोघे त्याच्याकडे सरकत होतो. मेंढपाळ परतत होते. ते मला ओळखत. आज डुबरगेंड्यासोबत मी ही आहे हे पाहून त्यांना नवल वाटले. मला बाजूला घेऊन त्यांच्यापैकी एकाने कुठे चालला म्हणून विचारले. येळवसीला गुर्जीकडे चाललोय म्हटल्यावर 'सांभाळून बाबा' इतकंच ते म्हणाले. हळूहळू अंधार झाला. डुबरगेंडा माझ्यापासून ३०-४० फूट पुढे चालला होता. मधे मधे मागे वळून मी आहे का हे पाही. वाढत्या अंधारासोबत निसर्गाने पृथ्वीवर पाडलेल्या वळकट्या दिसेनास्या झाल्या. आकाशात चंद्राचा पत्ता नाही. मी कोणासोबत कोठे चाललोय ते मला एकट्यालाच माहित. मेंढपाळाच्या शब्दाचे जास्त अर्थ निघत आहेत वाटू लागले. तो दोन गावांमधला भाग असल्याने कोणी रस्ता ओलांडताना पण दिसेना. 'याने मला मारले तर?' अचानक अंगावर काटा आला. 'पण तो कशाला मारेल?' दुसरे मन म्हणे. 'कशालाही मारू शकतो.' तिसरे मन म्हणे. रस्त्यात कुमठ्याच्या गुफा लागल्या. त्या म्हणे राक्षसांनी नखाने कोरल्या होत्या. ते लांबलचक व्रण मी स्वतः पाहिले होते. त्यांच्या शेजारच्या तळ्याभोवती दरवर्षी जत्रा भरे. त्यांत एक मोठी घनाकृती पाण्याने भरलेली आणि नाणे जाईल इतकीच फट असलेली गुफा होती. तीत मी नाणे टाकले नाही. असे करणारांस राक्षस आपल्या लोकांमार्फत उचलत असे मला सांगूनही उद्दामपणे टाकले नाही. अश्रद्धा! 'हा त्या राक्षसांचा एजंट असला तर?' अनेक भयप्रद विचार येत होते, तितक्यात कुमठ्याचे दिवे दिसू लागले. आपण या माणसाला निष्कारण अपराधी ठरवत होते हे जाणवून मलाच अपराधी वाटले.
डुबरगेंड्याचे घर म्हणजे प्रशस्त वाडा होता. त्यात ते चौघेच राहत. त्याच्या दोन्ही मुली माझ्यापेक्षा ४-७ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांच्या चेहरेपट्टीला, वागण्याला, आवाजाला, शब्दांना कोणताही ब्राह्मणी टच नव्हता. नॉट ब्यूटीफूल अनटील मेड्-अप प्रकारच्या होत्या. राणीला मी नक्कीच मिस करत होतो हे मला तत्काळ जाणवले. व्यक्ति सुंदर आणि स्वीकार्य दिसायला चालू व्हायला वेळ लागतो हे मला कालामानाप्रमाणे जाणवले आहे. त्यांच्या घरात धान्याची रेलचेल होती. कुठे काय ठेवावे आणि त्याचे जतन कसे करावे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता आणि तो नीट न सुटलेला दिसत होता. डुबरगेंडा कंजूष मात्र नक्कीच होता. त्यात मात्र त्याने सीमा ओलांडली होती. तो आपल्याच शेतात परसाकडे जाई. उंदीर त्याची पोती फाडत आणि दिवसभर तो दाणे उचलत असे. पाणी वाचवणे, सुतळीचा तुकडा वाचवणे यांतच त्याचा वेळ जाई. मला मात्र तो जेवताना चांगलाच आग्रह करी. पण मी काही बाजारू वस्तू मागीतली कि घरगुती पर्याय सुचवी. माझ्यासाठी पतंग आणि मांजा पण त्याने घरीच बनवला. तो बहुतेक काहीच विकत आणत नसावा असेच मला वाटायला लागले. (आता वाटते कि असा वाणिज्य मंत्री देशाला लाभला तर वाणिज्यिक तूट नावाचा प्रकारच नसता.)
दुसर्या दिवशी सगळे शेतावर गेलो. येळवस म्हणजे येळवर. मला तर दिवाळीपेक्षाही प्रिय! अगदी शहरी लोक ऑफिस सोडून गावात शेतात सण साजरा करत. कोण्या देवाची पूजा करतात. स्थानिक भाषेतल्या मंत्रघोषणा देतात. डुबरगेंड्याला शेतातल्या पात्यानपात्याची इत्यंभूत माहिती होती. प्रत्येक झाडाचे सगळे गुणावगुण, निसर्गधर्म मुखपाठ. ते ऐकत मी थोडा 'आपण कोणती निरीक्षणे करत नाहीत' हे पाहून स्तंभित झालो होतो. मग नंतर जेवणं झाली. वेगवेगळ्या भाज्या, फळे खाऊन झाली. मी पहिल्यांदाच गाजरे उपडून पाटात धूवून खात होतो. थोड्यावेळाने ते ही नाविन्य संपले. मी माझ्या सगळ्या चमूपासून दूर होतो. माझे मन तिथे लागेना.
"मला घरी जायचंय."
"अरे आपण दोन दिवस राहणार होतो."
"नाही पण मला बोर झालंय."
"थोडा वेळ झोका खेळ."
"मला एकट्याने आवडत नाही."
"माझ्या धाकल्या मुली सोबत खेळ."
झोका चढविणे हा प्रकार अतिशय रोचक असतो. खासकरून एक पुरुष आणि एक स्त्री झोका चढवत असतील तेव्हा. बसून उठताना जोडीदाराशी अंगांग अक्षरशः घासते. झोका जमिनीला समांतर होतो तेव्हा तर पडायची भिती आणि जोडीदारीणीचा स्पर्श हे एकत्र उच्चबिंदूवर असतात. डुबरगेंडाची मुलगी माझ्यापेक्षा मोठी! तिही चांगली ४ वर्षांनी!! त्या काळात आमच्या मनात मोठ्या मुलींबद्दल ताईवाद चांगलाच दृढ होता, तेव्हा मला काही झोक्याचा नीट आनंद घेता येईना. दु:खापेक्षा नैतिक द्विधा वाईट.
दोन दिवस गेले. माझ्याकरिता नवेनवे पदार्थ केले गेले. मला काय हवं नको ते विचारलं जायचं. मला काहीच काम करावं लागायचं नाही. मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय म्हटलं कि ती बंद. जणू माझी सेवा हाच त्यांचा धर्म होता. मला त्याची सवय नव्हती. मागीतले तरी मिळत नाही या पिंडात वाढलेला मी! माझ्या मनात दरवेळी काहीतरी काळंबेरं यायला लागलं. अगदी खाऊन पिऊन मग कापलेल्या प्राण्यांपासून ते कोणत्या वाममार्गात गुंतवायचे सगळे प्रकार माझ्या डोक्यात घोळ घालू लागले. एव्हढी सेवा का? एव्हढी विचारपूस का? असे करणारे लोक चांगल्या मनाने असे करतात हे माझ्या आयुष्यात अजून सिद्ध व्हायचं होतं. लोक चांगलेच वागतात असं मी सहसा पाहयचो पण इतके डेडीकेटेडली चांगले वागणारे लोक पाहिल्यावर मात्र मनात शंकाकुशंका घोळायला लागल्या. त्याच्या जोडीला एकटेपणाची भावना होती. घराची एक सुप्त ओढ मनात निर्माण झाली आणि क्षणोक्षण ती जोर धरायला लागली.
"मला घरी जायचंय. आज तिसरा दिवस आहे."
"पण आज शाळा बंद आहे. उद्याही बंद आहे."
"पण मला आजच घरी जायचंय."
"शाळा सुरु झाल्यादिवशी आपण जाऊ."
"त्याला अजून २-३ दिवस आहेत. मी तितका वेळ कळ काढू शकत नाही."
"तुला काय पाहिजे ते सांग."
"मला काही नको. मला घरी जायचंय."
संध्याकाळी गावात फिरून आलो. हे गाव तोंडारपासून वेगळं होतं. इथल्या भिंतींवर शिवराज पाटील आणि पदमसिंग पाटील दोघांच्याही प्रचाराच्या जाहिराती होत्या. रात्री तुफानीची अस्वस्थता वाढली. वाटलं उठावं आणि सरळ चालू लागावं. पण पैसे नको आणि रस्ता माहित नाही. येताना अंधारातून आलेलो! दुसर्या दिवशी पुन्हा तेच पालुपद.
"तुम्ही मला का थांबवताय?"
"अरे इथे तुला काही कमी आहे का?"
"तुम्ही मला इथे कोंडून ठेवणार का?"
"मी तुला इथे कोंडून ठेवलंय का?"
"आज शाळा चालू झाली असेल. तुम्ही उगाच म्हणतात आज बंद आहे म्हणून."
"समजा चालू आहे. एक दिवस सुट्टी."
"मला सुट्टी नको. माझं इथे काय काम आहे?"
"आमची सुनिता तुला आवडते का?"
"मला तुमच्या घरचे सगळेच लोक आवडतात. पण मला तोंडारला जायचंय."
"तिला बायको करून घेशील का?"
आता मात्र मला काय बोलावे ते सुचेना. जास्त विचार न करता मी म्हणालो,
"नाही."
ती राणीसारखी गोरी आणि सुंदर असती तर माझी काहीच हरकत नसती हे सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं.
"मी लहान आहे."
"तिच्यापेक्षा?"
"एकंदरीतच आणि तिच्यापेक्षाही. आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या मुलींना ताई म्हणतो."
"पण तू तिला म्हणाला नाहीस. आणि चार वर्षांनी काही फरक पडत नाही."
"मला आत्ता लग्न करण्यात रस नाही."
"मग मोठेपणी कर."
"मला जायचंय."
"तू जाऊ शकत नाहीस."
"का?"
"तुझी चप्पल मी लपवून ठेवलीय. अरे, मला मुलगा नाही. लग्नानंतर सगळी प्रॉपर्टी तुझीच होणार आहे."
मी जाऊ नये वा जाऊन हरवून जाऊ नये, त्याची नक्की काकलूत काय होती मला कळली नाही. मी चपलेशिवाय ही जाऊ शकत होतो पण ती माझी पहिलीच चप्पल होती आणि घरी मला तिचा हिशेब द्यायला लागला असता. या बाबाने नंतर कधीच चप्पल आणलीच नाही तर?
"मला नको प्रॉपर्टी. मला घरी जायचंय."
मनात विचार आला, मी घराबाहेर कुणाकडेही कितीही दिवस राहू शकतो असे मी जे काही म्हणतो ते तितकंसं खरं नाही. आपण तिथे नसताना आपल्या जगात काय चालू असेल? राणीसोबत कोणी भातुकली खेळली असेल? ती हातची गेली तर? मला कल्पना करवेना. या कुमठ्याच्या नॉन्-ग्लॅमरस, दूर राहणार्या, आपल्यापेक्षा मोठ्या आणि सर्वात घाण म्हणजे इतक्या कुप्रसिद्ध डुबरगेंड्याची मुलगी कुठे आणि राणी कुठे. रात्रीचा वेळ होता. मी डेस्परेटली माझी चप्पल शोधू लागलो. ती काही मिळेना. शेवटी मी डुबरगेंड्याची चप्पल शोधली आणि लपवली. रात्री बारा वाजता मी त्याला उठवले.
"जोपर्यंत तुम्ही मला तोंडारला नेत नाही तोपर्यंत मी तुमच्या गोष्टी अशाच लपवणार."
"?"
"तुम्ही माझी चप्पल लपवली. मी तुमची लपवली."
"आता निवांत झोप. सकाळी आपण जाऊ."
माझे हताशपण त्याला कळले असावे. दुसर्या दिवशी सकाळी स़काळी ते ४-५ किमी अंतर आम्ही सूर्य वर यायच्या आत कापले. शाळेच्या वेळात आम्ही शाळेत आलो. राणीचा भाऊ सोडून प्रत्येकाकडे मी इर्ष्येने पाहत होतो. यांच्यापैकी भातुकलीत राजा कोण झाला असेल. मला कुमठ्यात इतका तामझाम स्वीकारल्याचे फारच वाईट लागले. वाहवत जाऊन आपण आपल्या नात्याचा अव्हेर केला असे वाटू लागले. शेवटी मधल्या सुट्टीत आम्ही सगळे ओढ्याच्या प्रशस्त वाळूत बसलो. सगळे जण येळवस कशी कशी खेळली ते सांगू लागले. शेवटी सगळे पांगले. मी आणि राणीच उरलो.
"भातुकली कोणकोण खेळले? तुझा राजा कोण झालं?"
न राहवून मी विचारले. काय उत्तर येईल? कोणाचेही नाव येते त्याने काय फरक पडतो? शेवटी माझ्या नशिबचे गेले ते गेलेच.
"या वर्षी मी भातुकली खेळलेच नाही. तू नव्हतासच ना!"
"मला वाटलं..."
"काय?"
"कि तू ..."
"मी काय?"
"काहीच नाही."
अपराधीपणाचा भाव माझ्या अंगाअंगातून ओसंडून वाहू लागला. तिने मला जवळ घेतलं आणि म्हणाली," तू तर नाही ना त्या डुबरगेंड्याच्या मूलीसोबत..?"
"नाही नाही. मुळीच नाही. त्यांच्याकडे भातुकली खेळतच नाहीत आणि असते तरी मी कोणाचा राजा बनलो नसतो."
अर्थातच मी खोटं बोलत होतो. डुबरगेंड्याची मुलगी फार सुंदर निघाली असती तर कदाचित मी राणीला विसरलो असतो. पण आता ते खोटं आहे हे स्वत:शीही कबूल करत नव्हतो. अपराधीपणाची भावना पराकोटीला पोहोचली कि भूतकाळातली सत्येही मनातून मिटवण्याचा प्रयत्न करते.
डुबरगेंड्याने मला माझ्या खर्या भावनांची प्रचिती आणून दिली होती.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
आवडल .
मी उस्मानाबाद/लातूर जिल्ह्यात
झकास...
सुंदर!
सध्याला दिल्लीकर आहे. पण
धन्यवाद!
दर्शवेळा अमावास्ये चा अपभ्रंश
///अपराधीपणाची भावना
प्रचंड आवडला तुमचं लिखाण.
हल्लीच्या इतर भिकार
नाहीतर आहेच बाकी आस्तिक
मस्त लिहीले आहे.....
सुंदर लेखन. फार दिवसांनी
खुपच सुरेख
मस्त लेख. आवडला.
मस्त लिहीलंय!
सुन्दर कथालेख
ताकदीचं लिखाण.
असेच लिहित रहा.
सुरेख लिहिलं आहे.
असेच लिहित रहा
झक्कास!
वेगवान प्रकटन.
1 जानेवारी ला वेळा अमावस्या
पावणं तुमी प्रॉपर लातुरचे का?
काय लिहिलंय, काय लिहिलंय! वा!
ती ही इथे चेपेन. वेळ आहे.
लंपन नाही हा .
मस्त! तुमच्या पुढल्या
ती पुन्हा भेटली तर आणि आमच्या
आवल्डं !
अनुभवकथन
काळजी करू नका . मला वेळ भरपूर
मस्तच एकदम. जबरदस्त.
सोप्या भाषेत मुद्दा ठासून
ऊत्तम ओघवत्या भाषेत लिहिले आहे ..
???
लेखन आवडले. असं सोप्या
खुपच सुंदर. आवडेश.
मस्तं.
तुम्ही फक्त वाण्याची बायको
फक्तं बायको.
अहो, व्हलग्या व्हलग्याची
आजकाल पापुलारिटीचे निकष बदल्लेत.