अकरावीचं वर्ष. शाळेच्या युनिफॉर्मचा त्याग करून कॉलेजच्या कट्ट्यावर फॅशनेबल कपड्यांत रॅम्पवॉक करायला उत्सुक असलेल्या शेकडो मुलींची चाल; आणि आपल्या सात-आठ जणांच्या घोळक्याला कॉलेज सुरु होऊन तीन-चार महिने उलटले तरी अजुनही एकाही संघभेदिकेचा लाभ का झाला नाही या व्यथेत पडलेल्या माझी नजर यांची सतत पकडापकडी चालायची. पकडापकडी का, झटापटीच म्हणा ना. या सुंदर मुली स्वत:बरोबर त्यांच्यावर जळणा-या, राहणीमानाच्या पद्धतीत त्यांची नक्कल करणा-या किमान एक-दोन मुलींना सोबत घेऊन फिरत असायच्या. आम्ही बघतोय हे कळल्यावर सुंदर मुलींपेक्षा त्यांच्या या दत्तक मैत्रीणीच जास्त नाक मुरडायच्या. पण हे सगळं सगळं पचवेबल होतं. डोकं हटायचं, ते आपल्याहून कैकपटींनी लुख्ख्या दिसणा-या एखाद्या मुलाला, आपल्याहून दुपटीनं चांगल्या दिसणा-या मित्रालाही मिळणार नाही, अशी फटाकडा पोरगी गवसल्यावर. दोघं कॉलेजबाहेर फिरत असताना त्या लुख्ख्यापेक्षा ती ललनाच जास्त लोचटगिरी करताना दिसली, की आम्ही मित्र एकमेकांकडे 'आपल्यात काय वाईट होतं?' असे भाव चेह-यावर ठेऊन पाहायचो. दोघांनाही आपले भाव समोरच्याच्या चेह-यावर प्रतिबिंबित होताना दिसायचे आणि एकत्रच हसू फुटायचं. मग आपसुकच त्या लुख्ख्या बायल्याच्या वॉईसला आणि त्या सुंदर ललनेच्या भंगार चॉईसला आम्ही शिव्या देत असू. घोळक्यात प्रत्येकाचं एक वेगळं, आवडतं प्रेक्षणीय स्थळ ठरलेलं असायचं. तसंच घोळक्यातल्या सगळ्यांना एकाच वेळी आवडणारी एखादी 'अल्टिमेट' मुलगीसुद्धा ठरलेली असायची.
पण या सगळ्या मुली आपल्या कुवतीबाहेरच्या आहेत, हे सगळेच मनोमन जाणून असायचे. मर्सिडीज-ऑडीच्या शोरूमबाहेरून आतल्या गाड्या बघत उभ्या राहिलेल्या भिका-यासारखे आम्ही कट्ट्यावरून एकेका मॉडेलला भुकेल्या नजरेने न्याहाळत असू. एखादा दिडशहाणा मित्र इथून-तिथून त्याला आवडणा-या मुलीचा नंबर मिळवायचा, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. तिस-या ट्रायमध्ये, वाढते मुतुअल फ्रेंड्स बघून कुतुहूल म्हणून मुलगी त्याला अॅड करायची. पोरगं बेभान होऊन जायचं. तिच्या प्रत्येक फोटुला लाईक ठोकायचं(बहुधा नंबर ऑफ लाईक्स वाढतील या आशेनेच ती अशांना अॅड करायची/करते). पण त्याने चॅटवर प्रेमाने घातलेली साद त्या मुलीची रसिकतेनं दिलेली दाद कधीच मिळवू शकायची नाही. शेवटी उतावीळ होऊन बिचारा काहीतरी कुठंतरी प्रेमा-बिमाचं बरळून घोळ घालून ठेवायचा, आणि मग प्रकरण चिघळून त्या मुलीच्या चार वर्षांनी सिनिअर असलेल्या पंटर लोकांचा मार खाऊन यायचा(चेह-यावरची सूज कमी झाल्यावर).
बघता बघता शेवटी आम्ही थकलो आणि डिसेंबरच्या फेस्टिव्हलच्या काळात आमच्या ग्रुपला येऊन मिळालेल्या आमच्या पातळीच्या चार संघभेदिकांवर आम्ही समाधान मानलं. वर्ष संपायच्या आतच त्या संघभेदिकांनी आपल्या अदाकारी आणि करामतींनी आमच्या अभेद्य संघाची यशस्वी फाळणी केली. त्यातल्या एका तुकड्याचा सभासद झालेला मी बारावीच्या सुरुवातीच्या दिवसांत कट्ट्यावर एका संघभेदिकेबरोबर (सॉरी चुकलो... आता ती जीवाभावाची, सेंटींग लाऊन देण्याची नुसती तयारी दाखवणारी मैत्रीण झाली होती) बसलो होतो. दोन दिवस झाले पाऊसच पडला नव्हता. त्यामुळे कट्टा सुका होता. बारावीत आमच्या तुकड्यातले बाकी दोस्त दुस-या वर्गांत गेले होते. शेवटचं लेक्चर असलं तरी इकोनॉमिक्स असल्यामुळे ते अटेंड करायचे. त्यांचा तास संपायची वाट बघत बसलो होतो. हे रोजचंच झालं होतं. पण अशी वाट बघण्यातसुद्धा गंमत असायची. आमच्या कॉलेजला चिकटून दुसरं कॉलेज होतं. तिथल्या मुलींसमोर आमच्या कॉलेजच्या पोरी नेहमीच फिक्या वाटायच्या. मी मुद्दामून कट्ट्याच्या त्यांच्या कॉलेजगेट समोरच्या भागावर जाऊन बसायचो. येणा-या जाणा-या सगळ्या मुली नजरेची भूक एकाच वेळी वाढवत आणि शमवत जायच्या.
दुपारचे चार - साडे चार झाले असतील. फारशी वर्दळ नव्हती. ना मुलामुलींची, ना गाड्यांची. सगळं वातावरण शांत होतं. तरी कट्टा ब-यापैकी भरलेला होता. मीही त्या जीवलग मैत्रिणीबरोबर कट्ट्यावर बसलो होतो. आज ब-याच दिवसांनी आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. एवढ्यात माझी नजर शेजारच्या कॉलेजच्या गेटमधून बाहेर आलेल्या एका मुलीने वेधली. माझ्याच वयाची होती (म्हणजे मला सिनिअर नसावी). दोन्ही हातांत कुबड्या घेऊन चालत होती. तिच्या डाव्या पायात काहीतरी खोट होती. तो थोडा वाकलेला होता. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. आकाशी रंगाचा. केस लांब होते, वेणी होती. त्यामुळे तसं म्हटलं तर टाईट जीन्स, थ्री-फोर्थ, पाव चड्डी किंवा मिनी स्कर्ट घालून फिरणा-या, केस मोकळे सोडून त्यांना रंगवणा-या मुलींना पाहणा-या आमच्यासारख्यांसाठी 'काकुबाईछाप' मुली करतात तसा पोशाख तिनं परिधान केला होता. पण तरीही ती छान दिसत होती. चेहरा खूप सुंदर होता असं नाही. पण पोशाखाप्रमाणे सोज्वळ होता, शांत होता. तिला तो पोशाख शोभत होता. ती लंगडत असली तरी सुरेख दिसत होती. तिच्या त्या तशा चालण्यातही एक डौल होता, एक ऐट होती. नकळत मी गालातल्या गालात हसलो. ब-याच दिवसांनी आपादमस्तक न्याहाळून घेतल्यावरही आपण हिला 'चेकआऊट' केलंय असं म्हणता येणार नाही, ही जाणीव या मुलीनं दिली होती. ती थोडी पुढे आली. कुबड्या आणि स्वतःचा तोल सहजपणे सावरत तिनं उजव्या हातानं एक टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला. टॅक्सी पुढे निघून गेली. ती भरलेली होती. दुसरी टॅक्सी आली, ती तर रिकामी होती. पण टॅक्सीवाला माजुरडा होता. तो न थांबता निघून गेला. आपण हात करूनही रिकामी टॅक्सी थांबली नाही, यामुळे स्वतःचा इगो हर्ट झाल्यागत हावभाव करणा-या फाल्तुमधल्या फालतु मुली मी पाहिल्या होत्या, आहेत. पण या मुलीच्या चेह-यावर असे कोणतेच भाव नव्हते. चटकन टॅक्सी मिळत नाही म्हणून आपणही वैतागतो, टॅक्सीवाल्यांना कधी मनातल्या मनात तर कधी उघडपणे शिव्या घालतो, तिथे या लंगड्या माणसांचं काय होत असेल? पण नाही. या मुलीच्या चेह-यावर निराशा, वैताग यांचा लवलेशही दिसून येत नव्हता. तिच्याकडे जितका वेळ बघत होतो तितकी ती जास्त नजरेत भरत चालली होती. बघतच बसावंसं वाटत होतं. असं वाटलं, की या मुलीला टॅक्सी मिळूच नये, आणि आपण उरलेला दिवसभर असंच तिच्याकडे पाहात बसावं. तेवढ्यात डोक्यात वीज चमकली. या मुलीने आत्तापर्यंत चार-पाच टॅक्स्यांना थांबवण्याचे निष्फळ प्रयत्न केले होते. आणि इतका वेळ मी नुसताच ठोंब्यासारखा बसून होतो. मला स्वतःची लाज वाटली. तिला टॅक्सी पकडून देण्यासाठी मी उठलो, पण संकोचून पुन्हा बसलो. आपण तिला मदत केलेली तिला आवडली नाही तर?? काही अपंग मंडळी खूप स्वाभिमानी असतात. त्यांना सहानुभूती दाखवलेली आवडत नाही. ही त्यातलीच एक निघाली तर?? त्यातलीच असावी. इतक्या वेळात आपली अवस्था बघून टॅक्सी पकडून द्यायला आपल्याला कोणी मदत करेल का, या आशेनं तिनं जराही इकडं तिकडं पाहिलं नव्हतं. काय करावं?? काही का असेना, आपल्या मनाला योग्य वाटतं ते करावं, दिली टॅक्सी पकडून तर ती काय फाडून खाणार आहे का आपल्याला?? मग?? जाऊया... मी बुड उचललं आणि तिकडे तिला टॅक्सी मिळाली. त्यात बसून ती गेली. तिला टॅक्सीत चढायला वेळ लागला. मला स्वतःची, स्वतःच्या अशा 'नको-तिथे-संकोची' वृत्तीची शरम वाटली. ती मुलगी अगदीच असहाय होती असं नाही, पण तरी... मी पहिल्या फटक्यातच तिला मदत केली असती, तर तिचा थोडा वेळ तरी वाचला असता. माझं मघाशीच तिला पाहिल्यावर गप्पांतून लक्ष उडालं होतं... आता ती अशी गेल्यावर रसही उडाला. डोक्यात पूर्णवेळ तिच होती. आपण एखाद्याला मदत करायला हवी होती, पण निव्वळ संकोचापोटी मदत केली नाही, ही गोष्ट सतत बोचत राहिली. हां, अगदीच, जेवण-खाण न जाण्याइतपत, किंवा झोप न लागण्याइतपत मी व्यथित झालो नव्हतो, पण तिचा विचार मनातून जात नव्हता. बिछान्यात आडवा झाल्यावर दिवसभरातल्या सगळ्या विशेष घडामोडी, किंवा उद्यावर येऊन ठेपलेल्या संभाव्य संकटांचा/मौजमजेचा विचार डोक्यात घोळत राहतो. आज डोक्यातल्या घमेल्यातली सगळी द्रव्यं, ती मुलगी आपल्या कुबड्यांनी ढवळून काढत होती. तो असमाधानी दिवस आपल्या मागे टाकून मी एकदाचा झोपून गेलो.
दुस-या दिवशी योगायोगाने पुन्हा त्याच वेळी मी कट्ट्यावर त्याच मैत्रीणीबरोबर त्याच जागी बसायला गेलो. तोवर आदल्या दिवशीचा प्रकार मी विसरलो होतो. पण बुड टेकलं आणि समोर बाजुच्या कॉलेजच्या गेटवर नजर जाताच सगळं आठवलं आणि चेहरा आपोआप पडला. मैत्रीणीला ते जाणवलं असावं.
'काय रे असा अचानक गप्प का झालास?'
'काही नाही गं.'
'अरे काही नाही कसं? काय झालं?'
'काहीतरी आठवलं.' मी मान खाली घातली.
'काय?'
'काही विशेष नाही गं. सोड.' मी तसाच थोडा वेळ बसून राहिलो. एवढ्यात -
'ए ती बघ कालची मुलगी' मी झटकन मान वर केली. बघतो तर खरंच, तीच मुलगी माझ्यासमोर, तसाच शांत चेहरा, तसाच पोशाख, फक्त आज आकाशी ऐवजी केशरी रंग होता, आजही तितकीच सुरेख दिसत होती. मी चमकून माझ्या मैत्रीणीकडे पाहिलं. ती माझ्याकडेच हसून बघत होती.
'काय?? आजही नुसता बघत बसणारेस का??'
मी हसलो, पण माझा अजुनही धीर होत नव्हता.
'तिला मी मदत केलेली आवडली नाही तर?'
'शी असा काय तू?? का नाही आवडणार?? वेडा आहेस का जरा?? आता जा नाहीतर दुसरा कोणीतरी मदत करेल तिला तुझ्या आधी'
संभाव्य स्पर्धकाचा उल्लेख झाल्याबरोब्बर मी ताडकन उभा झालो. मैत्रीण पुन्हा म्हणाली,
'अरे जा ना...'
एखाद्या कुत्र्याला 'टॉमी छू' म्हटल्यावर तो पळत सुटतो, तसा मी 'अरे जा ना' म्हटल्या म्हटल्या उतावीळपणे पुढे झालो. आता मी कट्ट्यावरून फुटपाथवर आणि फुटपाथवरून रस्त्यावर येऊन अगदी तिच्या समोर रस्त्याच्या दुस-या बाजुला उभा झालो. एव्हाना दोन टॅक्स्या गेल्या होत्या. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी किंचीत हसलो, हातानेच, 'मी थांबवतो तुझ्यासाठी टॅक्सी' अशी खूण केली, आणि रस्ता ओलांडून तिच्या जवळ गेलो.
'अं... कुठे जायचंय असं सांगू??'
'सायन'
'ओके'
मी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना आलटून-पालटून जाऊन येणा-या जाणा-या प्रत्येक टॅक्सीला थांबवायचा प्रयत्न करत होतो. एक-दोन थांबल्या, पण सायन म्हटल्यावर गेल्या. शेवटी एकदाचा एकजण थांबला, सायन म्हटल्यावर तयार झाला. मी त्याला टॅक्सी वळवून तिच्यासमोर घ्यायला सांगितली. त्याने तशी वळवली. मी क्रॉस करून तिच्याजवळ गेलो. ती हसली, थँक्यू म्हणाली, आणि टॅक्सीत चढली. चढताना मात्र तिने माझा आधार घ्यायला, किंवा माझ्या हातात एकही कुबडी द्यायला हसूनच नकार दिला.
'यू वाँट मी टू ड्रॉप यू ऑफ समव्हेअर??'
(आयला इंग्लिश) 'ओह... नो नो... नो!!'
'ओके... थँक्स अगेन... बाय'
'बाय'
ती गेली. मला स्वतःबद्दल वाटणारी शरम आता ब-याच अंशी कमी झाली होती. पण आता मी एका वेगळ्याच विचारानं अस्वस्थ झालो होतो. तिच्या बोलण्यात साधेपणा होता. जरी तिने इंग्लिश फाडलं तरीही ती साधी होती. लंगडत असुनही तिचा वावर सहज होता. आमच्या या छोट्याश्या मुलाखतीत कुबड्या ती वापरत होती, पण अवघडलो मी होतो. मी तिला आता अपंग मानायला तयारच नव्हतो. तिच्यासमोर मीच खरं तर लुळा-पांगळा झालो होतो. आता यापुढे पुन्हा कधी आपल्याला टॅक्सी पकडून देण्याची संधी मिळाली, तर आपण कसे वागू, ओळख कशी वाढवू, वगैरे वगैरे कल्पना रंगवत मी पुन्हा कट्ट्यावर जाऊन माझ्या मनापासून जीवलग झालेल्या अशा मैत्रीणीशेजारी जाऊन बसलो.
(क्रमशः)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
(No subject)
क्रमशः का? बरं...!
जुने दिवस आठवले.
लवकर येवुद्या पुढ्चा भाग
छान लिहिलंय.
कथा आवडली
छान लिहिलयं. पुभाप्र.
छान
संभ्रम आवडला.
वडापाव - मिपाचे मिल्स अँड
मस्त लिहीले आहे...
कौतुक
आवडली
यो !......
(No subject)