Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद भागवत | प्रसिद्ध:
एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.- आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो. एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो. सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे. असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या, बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा विक्रीची तीव्रता कमी अधिक असते. कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात. (१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce' असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो या अर्थी.) या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या खेळाचे प्रयोग अनेकदा होतात. असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे. ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात. आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो. कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो ? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो द्यावी.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुमच्याशी सहमत आणि एकमत हि आहे. कारण गुंतवणूक हि मुळातच वय आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन केली जाते. पण जर संततीचे शिक्षण, लग्न आणि आपली निवृत्ती हि आपल्या आयुष्याची उद्दिष्टे जर असतील तर. माझ्या सर्व लेखात मी गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे असे म्हंटले आहे आणि टीप पासून हि लांब राहा सांगत आलोय तरी हि......??? उलाढाल करणे गैरच आहे का ? आणि सामान्य माणूस कोण ? एखादा शेतकरी जेव्हा शेतात काही पिकवतो तेव्हा तो जुगार खेळतो का? तो सामान्य माणूस नसतो ?त्याला भीती नसते का की पिक नाही आले तर हि ? तो नसती उलाढाल करत असतो का ? तो हि अनेक घटकांवर अवलंबुनच असतो, प्रयोगशील असतो तेव्हा तो सामान्य माणूस नसतो ? रेकॉर्डतोड उत्पन्न घेणारे अशिक्षित शेतकरी वाचले पहिले आहेत आणि आत्महत्या केलेले हि वाचनात आहेत म्हणून ते "सामान्य शेतकरी " जगणे सोडत नाहीत कि स्वतःच्या जमिनीला, ना येणाऱ्या पावसाला किंवा कुठल्याच घटकांना दोष देत बसत नाहीत ते संघर्ष करतात उमेदीने कारण ते सामान्यच असतात ना. ज्या दगडावर काही पिकवणे शक्य नाही तिथे टायर्समध्ये माती भरून शेती केलेली माणसे आहेत. ती सगळी "नशिबाने" यशस्वी झाली असे म्हणणे माझ्याच्याने कधीच होणार नाही कारण त्यांची मेहनत आणि अडचणीवर मात करण्याची जिद्द ह्याला सलाम आहे माझा. जो अशिक्षित (आणि सुशिक्षित हि ) शेतकरी आहे तो माझा कायम आदर्श राहिला आहे. ते शेतकरी जे करतात तेही सामान्यच आहेत. सोन्याचा ट्रेड जो मी सांगितला त्यावर तो कसा फक्त चालणार्या मार्केट मध्येच योग्य आहे हे सांगण्यात आले ते मला पसंत नाही. आणि सोने गहाण ठेऊन पैसे देणारी बँक नियमबाह्य काम करतेय किंवा एकूणच मी जे सांगतो ते काहीतरी जुगारी तत्वाने भरलेले आहे खूप कठीण आहे असे दाखवले गेले. ते वेदनादायी होते. सोने हा विषय होता मी माझी पद्धत मांडली बस इतकेच होते ते. कुठलाहि डॉक्टर जेव्हा अत्यंत क्रिटीकल केस वाचवतो (सामन्यतः भाजलेल्या पेशंटला एक उदाहरण म्हणून तशा बाळंतपणाच्या सुद्धा )तेव्हा तो त्या पेशंटच्या जीवावर satta खेळतो कि त्या डॉक्टरचे कौशल्यहि असते? आणि तो डॉक्टर सामान्य म्हणायचा कि असामान्य ? थोडक्यात ज्या क्षेत्रात जो माणूस असतो त्याबद्दल तो लिहितो बोलतो त्या क्षेत्राची भलामण तो करतो आणि त्या क्षेत्राबद्दल अनंभिज्ञ असणारे "सामान्य माणूस" ह्या टर्म मध्ये येत असतील तर त्यांनी "आपलेच खरे" असे सांगण्याचा असामान्य प्रयत्न करावा का ? मी कधी ज्या प्रांताची माहिती नाही तिथे इतके छाती ठोक कुणाला आज तागयात बोललेलो नाही आणि पुढे हि ते घडणार नाही. आणि म्हणूनच मी वेगळे दालन काढा असे म्हणतोय जेणे करून चार जाणकारच तिथे फिरकतील.

>> माझ्या सर्व लेखात मी गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे असे म्हंटले आहे. तुमचे लेख वाचले. बहुतेक ठिकाणी ट्रेडबद्दल आणि ट्रेडिंग कसे करावे याचीच माहिती दिसतेय. गुंतवणूकीबद्दल कधी लिहिणार आहात? >>सोन्याचा ट्रेड जो मी सांगितला त्यावर तो कसा फक्त चालणार्या मार्केट मध्येच योग्य आहे हे सांगण्यात आले ते मला पसंत नाही. >>सोने हा विषय होता मी माझी पद्धत मांडली बस इतकेच होते ते. leverage किती घातक ठरू शकतो, हे मी वर उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे आणि ते तुम्हालाही मान्य आहे. सोने गहाण ठेऊन अजून सोन्यावर पैसे लावायची तुमची सिस्टीम तुमच्या स्वतःच्या अनुभवात, आत्तापर्यंत यशस्वी झाली, ती चढत्या मार्केटमध्ये सफल झाली म्हणून कायमच होईल असे नाही आणि विशेषतः नवख्या आणि अननुभवी लोकांसाठी तर अतिशय घातक आहे इतकेच सांगायचे आहे. (नाण्याची दुसरी बाजू समजा). >>कुठलाहि डॉक्टर जेव्हा अत्यंत क्रिटीकल केस वाचवतो... डॉक्टर (किंवा दुसरा कोणी प्रोफेशनल म्हणा) यांनी शिक्षण घेऊन, परीक्षा देऊन त्यांचे ज्ञान सिद्ध केलेले असते. केवळ इंटरनेटवर अभ्यास करून किंवा अनुभव आहे म्हणून कोणी स्वतःला डॉक्टर किंवा सी.ए. म्हणवून घेत नाही. (मी डॉक्टर किंवा सी.ए. नाही, गैरसमज नसावा, पण त्यांच्या ज्ञानाबद्दल मला आदर जरूर आहे.) तसेच तुम्ही आर्थिक सल्लागार म्हणून सल्ला देता, तेव्हा तुम्ही CFP वगैरे क्वालिफिकेशन मिळवली असतील, असा अंदाज आहे. एखादा प्रोफेशनल सल्ला देतो, तेव्हा "मी त्या जागी असतो तर मी स्वतः काय केले असते" असा विचार करून त्याने सल्ला देणे, इतपत अपेक्षा असते. आणि तो सल्ला मला पटतो की नाही, हा विचार मला करता आला पाहिजे. बाकी काही नाही. त्याच्यासाठी इतरांवर घसरण्याची गरज नाही.

आणि मी कुणावर घसरत नाहीये. मी कुठल्याच प्रश्नाचे उत्तर लपवले नाही अगदी मी ब्रोकर आहे हि हि . शिक्षण जेमतेम बी कॉमच आहे. कुठलेही सी एफ पी वगैरे प्रोफेशनल सर्टिफिकेट नाही. गुंतवणूक विषयक पुरेपूर १० लेखांची सिरीज लिहितो आहे ती प्रकाशित करायला १० १५ दिवस लागतील सोन्याचे ट्रेडबद्दलची माहिती मी माहिती म्हणूनच दिली होती मी कुणालाही माझे सल्ले ग्राह्य माना असे सांगत नाहीह्ये किंवा मी कुणालाही मी किती हुशार आहे हे सांगत नाहीये. बाकी लीवार्जेचे म्हणाल तर ती दुधारी तलवार आहे हे मी पुरेपूर जाणतो आणि त्याचा उपयोग हि जाणतो.पण ते करणारा मी ह्या जगात एकमेव यशस्वी ट्रेडर असा दावाहि केला नाही तसेच जे मी करतो ते कुणालाच जमणार नाही हा भ्रमही बाळगला नाही. मी ह्या गैर समजात नक्कीच होतो कि मिसळपाववर जे लेखन येते ते माहिती म्हणून आहे हे समजण्याची कुवत सगळ्यांमध्ये आहे. आणि त्या माहितीचे विश्लेषण करून किंवा त्या माहितीबद्दल अधिका अधिक जाणून घेऊन ती माहिती योग्य कि अयोग्य हे ठरवल्या नन्तर निष्कर्ष काढण्या इतकी प्रगल्भता इथे असेल पण तसे न होता मी दिशाभूल केली हे सांगितले गेले मी विचारलेल्या प्रश्नानापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. तुमचे प्रतिसादच फक्त विषयाची माहिती घेण्याच्या उद्देशाने होते किंवा तुम्ही त्यात थोडे तरी जाणकार आहात असे माझे मत झाले. कुणाला दुखावणे हा हेतूच नव्हता तो माझा पिंड नाहीच. पण सोने ह्या विषयावर कुणीतरी धागा काढला आहे आणि मी त्यातल्या ट्रेड ह्या विषयाचे एक लेखन केले जे मूळ धाग्याला लागुनच होते. पण त्यावर पी पी एफ,आयकर आणि हाइट म्हणजे पैसे ट्रान्स्फर करायला किमान दोन खाती लागतात हे मला शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.' जगात दोनच माणसे असतात एक चांगला आणि एक वाईट. मी सतत आपण कुठल्या प्रकारात बसतो ते जाणून त्याचे भान ठेऊन वागत असतो. आणि माझ्या त्याच तत्वाने मी सी ए..ज्यांच्यात माझी रोजची उठबस आहे त्यात हि चांगले आणि वाईट दोन्ही सी ए आहेत. त्यांचे लोकांना दिलेले गेलेले सल्ले आणि त्यांचे frauds पाहत आलोय (ह्या सर्तीफिकेट धारकांनी स्वतःच्या सख्या भावालाही कधी सोडले नाही)जर मी ह्या सरटीफिकेट धारक लोकांचे भारतात संगणक येण्यापूर्वीचे frauds आणि नंतरचे frauds ह्याबद्दल लिहिले तर ते फारच रंजक होईल पण गुन्हा पाहणे लिहिणे,वाचणे रंगवून सांगणे म्हणजे गुन्ह्याला प्रोत्साहन देणेच आहे असे मला ठामपणे वाटते. माझ्या भावना आपल्या पर्यत पोहोचल्या असतील असे वाटते. कदाचित misalpav वर पूर्वी काही घटना घडून गेली आहे जी मला माहित नाही त्याचा परिणाम म्हणून माझ्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन कदाचित नकारात्मक असावा. असो.

मिपावर आल्यापासुन किमान 10 धाग्यावर मी शतकी प्रतिसाद दिलाय . बाकी लगे रहो .

फार कन्फ्युजन आहे.. मला एक साधी गोष्ट कोणी सांगेल का? १. मी दर वर्षी माझ्या व बायकोच्या नावे १-१ लाख पीपीएफ मधे भरतो. माझे ८०सी आधीच ओव्हर्फ्लो असल्याने (पॉलिसी, एम्प्लोयी पिएफ वगैरे) मला त्याच्या टॅक्स बेनेफिट काहीच नाही. आता ज्यावेळी मला माझे पैसे परत मिळतील (१५+५+५ वर्षांनी) त्यावेळी टीडीएस कापला जाईल का? की मला ते पैसे इन्कम म्हणून दाखवावे लागतील? की मला ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील? २. मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?

तुम्हाला जेंव्हा कधी पैसे परत मिळतील (१५+५+५ वर्षांनी) त्यावेळी (जर आजचेच नियम लागु असतील तर) टीडीएस कापला जाणार नाही, ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील. पीपीएफ मध्ये शिल्लक रकमेवर प्रतिवर्षी व्याज मिळते, आणि व्याज म्ह्टले की ते सहाजिकच उत्त्पन्न म्हणुन धरले जाते. आपण असे दरवर्षी मिळालेले व्याज खरे तर त्या त्या वर्षीच्या रिटर्न मध्ये दाखवावयास हवे परंतु हे व्याज करमुक्त असल्याने आणि ते उन्पन्नत मिळविल्याने कोणताही करभार वाढत नसल्याने आयकर अधिकारी सुद्धा त्या बाबत आग्रह धरीत नाहीत. मात्र असे व्याज दाखविण्याचा कोणाताही तोटा नसलेने आपले रिटर्न अधिक बाळसेदार होण्याच्या द्रुष्टीने ( कर्जे वगैरे मिळण्यासाठी) असल्यास ते पैसे इन्कम म्हणून जरुर दाखवावे. ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील? मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे. अधिक माहिती हवी असल्यास व्य.नि करावा.

मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे.
जरी हे बरोबर वाटत असले तरी १)म्युच्युअल फंड्स हे शेअर मार्केटशी संबधित असल्याने रिस्कसुद्धा शेअर्सबरोबरच निगडीत असते... २)म्युच्युअल फंड्सचे परतावे आणि पी पी एफ चे परतावे आणि मुख्य म्हणजे दोन्ही गुंतवणुकीची उद्दिष्टे... ३)आणि गुंतवणूक किंवा पी पी एफ चे उद्दिष्ट फक्त आणि फक्त कर वाचवणे आहे का ? ह्या वरील ३ गोष्टींचा विचार आपण करावा तसेच जर पी पी एफ ८% वार्षिक परतावा देतय पण करसवलत मिळत नाहीये अथवा मिळते आहे तर त्याची तुलना तशीच एखादी गुंतवणूक योजना बाजारात आहे का असल्यास त्या गुंतवणुकीबरोबर करावी.
मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?
तुम्हाला स्वतःला गुंतवणुकीबाबत शंका असेल अथवा अजीबातच माहिती नसेल तर पी पी एफलाच टाकावे. माहिती नसेल तर ती तुम्ही ब्रोकर वर अवलंबून राहाल जे घातकी ठरू शकते.

SECTIONS 80C TO 80U SPECIFIES THE DEDUCTIONS TO BE MADE FROM THE GROSS TOTAL INCOME. GROSS TOTAL INCOME MEANS THE TOTAL INCOME, UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED IN ACCORDANCE WITH THE PROVISION OF THE ACT [SECTION 80B(5)]. इथे वर मांडलेल्या सेक्शन नुसार जे उत्पन्न UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED म्हणून डिफाईन केले आहे ते कोणत्या वर्षाचे? GROSS TOTAL INCOME कोणत्या वर्षाचे असते त्याच वर्षाचे असते ना? अह्सी शंका उपस्थित करन्यात आली होती. त्यावर माझा खुलासा असा- शब्दाचा अथवा कायद्याचा कीसच काढावयाचा झाला तर " --- total income computed in accordance with the provisions of this Act, before making any deduction under this Chapter ---" ही वाक्य रचना फक्त याच वर्षासाठी आहे असे कशावरुन ?? व्याकरण वा काळांचा अभ्यास केलेली कोणीही व्यक्ती हे वाक्य वर्तमानाईतकेच भुतकाळालाही लागु पडते हे सहज सांगु शकेल. याचाच अर्थ स्पष्ट आहे, गेल्या वर्षी विवरण पत्रकांत दाखविलेल्या उत्पन्नातुनही ( जे आता या वर्षी करीता त्या करदात्याची संपत्ती, wealth म्हणुन गणली जाईल) करदाता अशी गुंतवणुक करु शकतो. खरे तर खरे म्हणजे अशा प्रकारची तरतुद करण्याचा उद्देश हा करदात्यांस सक्तीची बचत करावयास लावणे आणि त्याच वेळी बेनामी व्यवहार टाळणे एवढाच आहे. आणि सदरची गुंतवणुक ही करदात्याच्याच खात्यातुन व्हावी एवढीच अपेक्षा आहे, खात्याकडुन केल्या vividh गेलेल्या निर्धारणांत( assessment) वा दिल्या गेलेल्या निर्णयांतुन ही बाब पुरेशी स्पेष्ट आहे.. समजा एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 आहे, त्याचे पुस्तकांत दिसणारे वार्षिक खर्च रु. ,2,80,000, आहेत आणि त्याने बॅकेकडुन र. 1,50,000 एवढी उचल वा कर्ज घेतले आहे, अशा परिस्थित्तीत तो या कलमाखाली रु.1,00,000 ची गुंतवणुक केल्यास, वर व्यक्त अर्थाप्रमाणे ती रु 70,000 पर्यंतच ग्राह्य मानुन उर्वरित रु 30,000 करदात्याच्या उन्पनातुन आलेली नाही या अर्थी नाकारली जाईल काय ?? --- याचे उत्तर नाही असे आहे. गुंतवणुक ग्राह्य मानली हाईल. एका करदात्याने तर मार्च महिन्यात आपल्या केडिट कार्डाने इन्शुरन्स चा हप्ता भरला आणि कार्ड कंपनीने तो पुढील आर्थिक वर्षांत (म्हणजे अप्रिल मधे) करदात्याकदुन वसुल केला. अशी गुंतवणुक ही खात्याने नव्हे तर ट्रिब्युनलने मान्य केली आहे. बाकी येथे काथ्याकुट करताना काही विद्वानांना अशा विमा वा पीपीफ गुंतवणुकी, पुन्हा एकदा, त्या करदात्याच्याच खात्यातुन केल्या आहेत हे सिद्ध करण्याची जबाब्दारी करदात्यावर असलेने) रोखीने भरु नयेत याचे भान दिसत नाही हा भाग अलहिदा. असो. माझे अनेक अशील अनेक वर्षे अनेकदा या प्रकारचे व्यवहार करीत असलेने मला त्याच्या वैधतेविषयी थोडीही शंका नाही मात्र माझ्याकडे या व्यतिरिक्त अधिक काही सांगण्यासारखे नसल्याने, मी स्वतःला कोणत्याच विषयातला 'माहिर' समजत नसल्याने आणि मुद्द्यांची सरमिसळ, तथ्थ्यांचे गौडबंगाल, वा शब्द्बबंबाळ अतार्किक पोस्ट्स करणे अथवा 'चुकीचे अर्धवट सल्ले' देणारे लिखाण करणे अशी कोणतीही आयुधे मला वापरता येत नसल्याने या, आयकर ककम 80C बाबतची,चर्चा माझ्ह्यापुरती थांबवतो.

मुळ मुद्दा सोने खरेदी हा होता पण नंतर तो पी पी एफ मधून पैसे काढून परत पी पी एफ ला भरले तर आयकर खात्याला चालते का ? इथे कुणीतरी नेला आणि तिथून तो आयकर ह्या क्षेत्रात गेला....... मी मागे मागे मुर्खासारखा फिरत राहिलो आणि मीच हि चर्चा शब्दबंबाळ अतार्किक आणि शब्दांचे डोंगर उभी करून दिशाहीन केली हे आरोप हि पहिले "आता आपणच बँकेकडून कर्ज हा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे" जो वरील प्रतिसादात आणि मुळ धाग्यात कुठेही आलेला नाही. ८० सी च्या अनुषंगाने तसेच कर्ज काढून भरलेल्या विम्याच्या हप्त्याआड आपण जे काही खुलासा म्हणून वर मांडले आहे. त्यावर मी पुन्हा "मुद्द्याची सरमिसळ" "शद्बबंबाळ" "अतार्किक" आणि "तथ्याचे गौडबंगाल" ह्याच्या आधारे बराच मोठा खुलासा लिहू शकतो जे मी न करणे हेच आता "शहाणपणाचे" होईल. बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते. बाकी माहीर तर मी आहेच.
*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.
हे वाक्य माझे नाही. दिनांक २६/१२/२०१३ रोजी 17.३६ चे पोस्ट मधील आपलेच वाक्य आहे. असो....समाप्त.

बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते. तुम्ही उगीचच फार काथ्याकूट करताय, असं माझं मत झालंय. तुमच्या या अट्टाहासाखातर मी माझ्या सी.ए. मित्राशी बोललो. तो म्हणाला, पीपीएफ गुंतवणुकीवर टॅक्स वाचतो, withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात. जर किमान १ लाख वार्षिक उत्पन्न असेल, तर तुम्ही किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये भरू शकता (तुम्ही withdrawal घेतले किंवा नाही घेतले तरी). आता तुमचे समाधान झाले का? नसेल झाले, तर "तुमच्या" सी.ए.बरोबर बोला. बाकी माहीर तर मी आहेच. या बाबतीत मी सहमत नाही, असं खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही स्वतः सी.ए. नाही, CFP पण नाही, तरी आर्थिक सल्लागाराचे काम करताय, म्हणजे आश्चर्यच आहे. तुमचे क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण मी ठेवणार नाही, हे मात्र नक्की. कोणावरही आंधळा विश्वास ठेऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.

माझ्या अशीलाना माझा हाच सल्ला असतो. "कुणावरही" आंधळा विश्वास ठेऊ नये. (ह्यात कुणावरही हा शब्द फार महत्वाचा वाटतो मला ) सल्लागाराचे काम आम्ही गेली (१९९६-२०१३ )इतकी वर्षे करतो आहे. सरकार तर्फे केसेस दिल्या जातात (कुठलीही गैरव्यवस्था, लाच लुचपत काहीही न करता)आम्ही त्याला आमच्या "शब्दबंबाळ" प्रतिसादाने प्लीड करतो. नवख्या सीएचे सुद्धा प्रसंगी आभार आणि कौतुक चार चौघात मी केलेलं आहे आणि काही दिग्गज सी ए चुकत असताना त्यांनासुद्धा त्यांच्या वयाचा, अनुभवाचा शिक्षणाचा मान देऊन चूक दाखवली आहे. वाईट इतकेच वाटते कि कायदा हा कीस काढून समजून घ्यावाच लागतो नुसते व्याकरण चेक करून चालत नाही. पी पी एफ गुंतवणुकीवर कर वाचतो.......बरोबर withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात.....पूर्ण बरोबर किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये.....हे हि बरोबर. पण तुम्ही जर सगळा पोस्ट आणि प्रतिसाद वाचलेत तर मुद्दा वेगळा आहे साहेब. असो शब्द बंबाळ होतंय हळूहळू ...तेव्हा समाप्त. अवांतर : इथे कुणी माझ्यावर विश्वास (आंधळा का होईना )ठेवू नये आणि योग्य मार्गदर्शनपर माहितीपूर्ण लेख इथे अन्य सर्वांकडूनहि यावेत, त्यावर चर्चा व्हाव्यात आणि माझ्याच ज्ञानात भर पडावी ह्यासाठीच वेगळ्या दालनाचा माझा प्रयत्न चालू होता पण आता तो हि मी सोडून देतोय.

ज्ञानवजी सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे? सेक्शन ८०सी(१) the whole of the amount paid or deposited in the previous year असं म्हणतो. पेड ऑर डिपॉझिटेड ची रक्कम शेतीचं (किंवा अन्य सेक्शन १०) उत्पन्नही असू शकतं, जे एरवी "ग्रॉस टोटल इन्कम" मध्ये धरलं नाही, तरी "इन्कम" असतंच.

आपण सी ए चा अभ्यास करताय असे माझ्याच लाभांश ह्या धाग्यावर "dividnd striping" असा जो प्रतिसाद आपण दिला होतात त्या प्रतिसादाखाली वाचनात आले. वर आपण जे म्हणताय त्याबाबत आपण प्रत्यक्ष भेटून बोलू या का? कारण आयकर कायदा हा एक धर्मग्रंथ आहे. तुम्ही जे वर म्हणताय त्याचे खुलासे मी देत बसलो तर पुन्हा माझ्यावरच "शब्दबंबाळ" लेखन हा आरोप होईल. तरीही एव्हढेच लिहितो कि... १)
कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे.
Thu, 26/12/2013 - 14:38 हे माझे वाक्य आहे. २)
सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे?
हे वाक्य माझे नाही. ३)इन्कम आणि taxable इन्कम ह्यामधील फरक आपणही जाणताच. बाकी मी ह्यावर जास्त काही लिहू इच्छित नाही. पण जर प्रत्यक्ष भेटलात तर तुमचे उदाहरणासहीत शंका निरसन करीन. ज्यांना पी पी एफ मधील withdrawal पुन्हा पी पी एफ मध्येच केले आता मला tax बेनिफिट द्या असे विवरण पत्रात दाखवायचे आहे त्यांनी तसेच करावे (पण मिन्ग्लीग ऑफ फंड्स न करता छातीठोकपणे....) हा सल्ला मी आयुष्यात देणार नाही कारण ते disallow होऊन माझ्या अशिलाचे नुकसान होईल.

.

सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते
हे माझे वाक्य नाही.

सोने की कीमत में होगी 30 साल की सबसे बड़ी गिरावट Source :http://www.patrika.com/news/gold-to-witness-biggest-fall-in-over-30-years/977800 कळावे, लोभ असावा, आपला लाडका : आयुर्हीत

१) सामान्य माणसाने , वा सामान्य मराठी माणसाने , चढ उतार होणार्‍या , बेभरवशाच्या , सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा , पी पी एफ मध्येच पैसे टाकीत रहावे २) सध्याच्या नियमानुसार पी पी एफ मध्ये दर वर्षी रुपये १,५०,०००/- पर्यंत गुंतवता येतात. ३) बघता बघता १५ वर्षे कशी बचत होते हे कळत नाही. लोक २५/ २५ वा ३० /३० वर्षांची विमा पॉलिसी सहज काढतात, त्यावेळी एव्हढ्या दीर्घ मुदतीचा विचार कोणी करतात काय ? ( म्हणजे मुदत पुर्ण झाल्यावर किती पैसे मिळतील ? त्यावेळी रुपयाची किंमत किती घसरली असेल ? इ इ ) ४) १५ वर्षानंतर , तुमचे पी पी एफ चे खाते पुढे दर पाच पाच वर्षे दोन प्रकारे वाढवू शकता. एक म्हणजे दरवर्षी गुंतवणुकीसह किंवा गुंतवणूक विरहीत. पाच पाच वर्षे, गरज नसेल तर वाढवीत रहाणे अधिक चांगले. ५) पी पी एफ खात्यात दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या आत पैसे भरले तर त्या त्या महिन्याचे सुद्धा व्याज , खात्यावर जमा होते. ५ तारखेनंतर मात्र पैसे भरल्यास, त्या महिन्याचे व्याज मिळत नाही.१ ते ५ तारखेपर्यंत रोख पैसे भरावयाचे नसल्यास, चेकने पैसे भरता येतात. त्यासाठी चेक ५ तारखेपर्यंत क्लिअर व्हावयास हवा. मी त्यासाठी महिन्याच्या शेवटच्या किंवा दोन दिवस अगोदरचा चेक देतो. पैसे आरामात ५ तारखेच्या आत जमा होतात. कारण पाच तारखेनंतर , अन्य बचत खात्यातून पैसे काढलयास , बचत खात्यामधील , काढलेल्या पैशांचे व्याज तर मिळत नाही, शिवाय , पी पी एफ मध्ये सुद्धा व्याज मिळत नाही. दोन्हीकडून व्याजाचे नुकसान कां करून घ्यावे ? ६) पी पी एफ खात्यातुन , उचल मिळणे फारसे अवघड नाही. एक तारखेस अर्ज केला, तर जास्तीत जास्त दुसर्‍या दिवशी पैसे हातात मिळतात. तेच रोख पैसे , पाच तारखेच्या आत ,पी पी एफ मध्ये भरल्यास, गुंतवणुक सुद्धा दाखविता येते. यात गैर काहीच नाही. जगात , किमान भारतात , असा कोणीही नाही, जो प्रत्येक कायदा पाळतो. साधे रहदारीचे नियम घ्या. सिग्नलला पोलिस असला , तर आम्ही नियम पाळतो. आणि पोलिस नसला तर , सिग्नल हिरवा होण्याची वाट थोडीच बघत बसतो ! ! हाण तिच्यायला ! ! ६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.

६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.
मग १.५ लाख लिमिट का ठेवली? जर ती नसती ठेवली तर लोकांनी गुंतवले असते व सरकारला विकासासाठी अधिक निधी उपलब्ध झाला असता.

सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेल तर सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के व्याज आणि ३०% कर वजावट) दराने पैसे कशाला घेईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारने सामान्य माणसांसाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा आहे त्यामुळे त्याच्यावर बंधन( लिमिट) आहे.

साहेब जेंव्हा तुम्ही १०,०००/- भविष्य निर्वाह निधीत ठेवता तेंव्हा त्याच्या वर आपल्याला ३०००/- आय कर ( ३०% दर वाल्यांना म्हणून कंसात "पर्यंत"आहे) वजावट ताबडतोब मिळते. म्हणजेच सरकारला मिळणारे ३००० रुपये कमी होतात (आणि वर ९ % व्याज आपल्याला द्यायला लागते.) म्हणजे पहिल्या वर्षात सरकारला सात हजार मिळतात आणि वर्ष अखेरीस ९०० रुपये व्याज द्यायला लागते. म्हणजे सरकारच्या खात्यात ६१००/- रुपये वर्षा अखेरीस जमा होतात वापरासाठी. परंतु त्याचे नक्त मुल्य( सरकारला आपल्याला देणे) मात्र १०,०००/- आहे.

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात. या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात. या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे असहमत-- तसे असेल तर ६ आणि ७ टक्क्याने भांडवली नफ्याचे कर्जरोखे किंवा ८% चे सरकारी कर्ज रोखे सरकार कशाला काढेल? या वरील व्याज करमुक्त नसताना हि त्यात भरपूर गुंतणूक होते. मी परत हेच म्हणेन कि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हि भारत सरकारने सर्व सामान्य लोकांना दिलेली सुविधा आहे आणि तिचा लाभ लोकांनी जरूर घ्यावा.

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात. या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

ओह.. पोस्ट्च्या पुनुरुक्ती बद्दल क्षमस्व. या शिवाय..... 'पहिल्या वर्षात सरकारला सात हजार मिळतात आणि वर्ष अखेरीस ९०० रुपये व्याज द्यायला लागते. म्हणजे सरकारच्या खात्यात ६१००/- रुपये वर्षा अखेरीस जमा होतात वापरासाठी...... अशा प्रकारची पैशाची Time Value विचारात न घेता केलेली विधाने आकडेवारी ओढुन ताणुन केल्याची साक्ष आहेत.

प्रसाद साहेब आपण लिहिले इतके सोपे हि ते नाही. कर्जाचा दर सरकारला पहिल्या वर्षात ३९ %च पडतो. तुम्ही तुमचे गृह कर्ज १० लाखाचे ९ टक्क्याने घ्यायचे असेल आणि त्यातील आपल्याला सातच लाख हातात पडणार असतील तर ते घ्याल का? कारण आपल्याला मिळणारी वजावट पहिल्या वर्षातच मिळते. पुढच्या वर्षात हे कर्ज आपल्याला ९% व्याज ( अधीक त्याच्या व्याजावर मिळणारा आयकर २. ७ % हाही बुडतो म्हणजे ११. २७ %). आपण जेवढे अधिक पैसे पुढच्या वर्षात भरता तेवढे परत साकारला ३९ % ने कर्ज दिल्यासारखे आहे. १०००० रुपये १० टक्के व्याजाने घेता तेंव्हा तुमच्या हातात १०००० रुपये येतात. पण १०००० रुपये घेतले म्हणून ३०% कापून मुळातच ७००० रुपयेच हातात पडतात. त्यावर १५ वर्षाचे व्याज( (९ %) १३५०० होते यावरिल पण आय कर सरकारला मिळत नाही. हा कर पण ३०% म्हणजे ४००० होतो. म्हणजे सरकारला एकूण सात हजार मिळतात आणि त्यावर व्याजासकट आणि या न मिळालेल्या करासकट एकूण रक्कम २७५०० होते. म्हणजेच सरकारने ७००० रुपये तुमच्याकडून घेतले तर ते कर्ज एकंदर २७५०० रुपयाला पडते. यात सरळ व्याज धरलेले आहे. चक्रवाढ व्याजाच्या दराने ते अजून जास्त होतील. म्हणजे हे कर्ज किती दराने पडले हे कोणी गणितज्ञ सांगू शकेल काय?

डॉ.साहेब, एखाद्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा त्या गुंतवणुकीचा एकुण कालावधी व त्यात मिळणारा एकुण परतावा याचा एकत्रित आढावा घेवुन मग ठरतो. वेगगेवळ्या वर्षी परताव्याचा दर वेगवेगळा असल्यास वास्तववादी परतावा काढण्यासाठी IRR ( Internal Rate of Return) हे तंत्र वापरावे लागते. येथे आपण गुंतवणुक एकापेक्षा जास्त वर्षे करणार आहोत असे असताना फक्त पहिल्या वर्षी किती फायदा मिळेल याचा विचार करुन निर्णय घेणे तर्क्संगत नाही. शिवाय जो 30% करसवलतीचा भाग आहे...अन्य ठिकाणीही तो उपलब्ध आहेच ही. तेंव्हा 39% ही ( जरी चुकीची असली तरीही) काही असामान्य गोष्ट नव्हे.

डॉक्टरसाहेब, हे जरी खरे असले तरी परत फेड परकी चलनातच करावी लागते. आणि भारतात महागाई जास्त असल्या मुळे दर वर्षी रुपयाचे अवमुल्यन होतच असते. त्यामुळे एकुणात परतफेड करायची रक्कम रुपयात जवळपास तेव्हडीच येते. पीपीएफ ला मर्यादा आहे कारण तितके पैसे सरकारला नको आहेत. मर्यादा वाढवली आणि गरज नसली तरी सरकारला पैसे घ्यावे लागतील आणी त्यावर व्याज द्यावे लागेल.

आणी सोन्याचा भाव उतरला तर ? गेली चार ते पाच वर्षे २००७ ते २०१२ सोन्याचा भाव चढतच गेला म्हणून ज्ञानव साहब त्या काळात यशस्वी झाले.(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.) याच काळात जर सोने पडले असते तर दुहेरी नुकसान झाले असते. हा सट्टा आहे सर्व समान्य माणसाने खेळू नये असे मला वाटते. हा माझा २६ /१२/२०१३ तारखेचा प्रतिसाद होता. वर पहा आज जवळ जवळ २ वर्षांनी सोने वाढले तर नाहीच परंतु १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. दोन वर्षात झालेल्या महागाईचा ( चलनवाढीचा) दर जरी ६% धरला तरी २०१३ साली सोने आर्थिक गुंतवणूक म्हणून ज्यांनी केली त्याचे २७ % नक्त तोटा झाला असे स्पष्ट दिसून येत आहे. जाणकारांनी स्पष्टीकरण द्यावे. भावनिक गुंतवणूक ( मुलीचे लग्न इ. साठी सोने घेतले तर त्याला आर्थिक गुंतवणूक म्हणता येणार नाही आणि ती हौस म्हणून धरली जाईल. हौसेला मोल नसते

सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेल
परकीय चलनातले कमी व्याजाचे कर्ज जागतीक चलनाच्या अस्थीर विनिमय दरामुळे महागही ठरू शकते. जागतीक मंदीच्या काळात देशाची निर्यात घटल्यास हे कर्ज फेडणे अजुनच कठीण होउन बसते.

सोने हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. खरेंनी म्हटल्याप्रमाणे २००७ ते २०१२ याकाळात सोन्यात अनैसर्गिक वाढ झाली. तीच आज अनेकांच्या बोकांडी बसली आहे. चांदीने २०११ मधे बहुधा ७५हजार पर्यंत दर घेतला होता. आज काय परिस्थिती आहे? माझ्या माहितीतल्या अनेकांनी त्याकाळात सोने विकून चांदी घेतली आता पस्तावत आहेत. अशा प्रकारच्या खेळात जे चढलेला रंग पाहून शेवटी भाग घेतात ते वाईट हरतात. हेच रीअल इस्टेट मधेही झालं. सोनं दागिन्यांच्या स्वरुपात तर कधीच घेऊ नये. आज मंगळसूत्र करायला किमान ३ तोळं शुद्ध सोनं लागतं. त्यात मजुरी किमान ३०० रुपये प्रतिग्राम. म्हणजे ९००० रुपये + ७५००० रुपये सोनं = ८४००० रुपये. हेच मंगळसुत्र विकत घेऊन लगेच दुसर्‍या दुकानात त्याच दिवशी विकायला गेलं की ते होतं पुढीलप्रमाणे: घट २५% म्हणजे २२.५ ग्रॅम गुणीले घेण्याचा भाव (नेहमी २०० ते ४०० असा कितीही कमी असू शकतो.) म्हणजे सुमारे ५५ हजार रुपये हातात मिळतात. तर ८४-५५ = २९ हजार रुपये घेतल्यासरशी घालवणारी वस्तू अ‍ॅसेट कशी काय असू शकते? बरेच लोक तर घेतलेले सोने कधीच विकत नाहीत. काहीही झाले तरी. अगदी भिकेला लागायची वेळ आली तरी. माझ्या माहितीतल्या एक गृहीणी दर तीन-चार वर्षांनी जुने सोने मोडून नवीन दागिने करतात. म्हणजे नवीन दागिन्यांवर सरळ सरळ सराफाला सोन्याच्या किमतीच्या ५०% पर्यंत फुकट किंमत अदा करतात. काही वर्षांनी त्यांच्या जेव्हा लक्षात येईल की आपल्याकडे उपलब्ध सोन्याचे मूल्य आपण खर्च केलेल्या पैशांशी जुळत नाही तेव्हा काय होईल देवजाणे. परत ज्या सोनाराकडून सोने घेता तोच सोनार ते परत विकत घेतो. दुसरा घेत नाही. मला तर अशी शंका आहे की खर्‍या सोन्याचे दागिने बाजारात मिळतच नसावे. किंवा २४ क्यारेटच्या नावाखाली १८क्यारेटचे दिले जातात. लाखाचे बारा हजार करायचे असतील तर नाजूक, भयंकर कलाकुसर असणारे दागिने घ्यावे. हौसेला मोल नसते म्हणून ठिक पण सोन्यात 'गुंतवणूक' करणे शुद्ध मूर्खपणा आहे. ३५ हजाराने विकत घेतलेलं सोन्याचे आज २५ हजार भाव आहेत. तेही २ वर्षात. पुढे दहा वर्षांत तरी ते ३५ पार करेल अशी अजिबात आशा दिसत नाही.

नुकतीच सरकारने लाँच केलेल्या gold bond scheme ला अल्प प्रतिसाद का मिळाला? धातू स्वरूपातील सोन्यातील गुंतवणूकीपेक्षा नक्कीच उजवी होती ही स्किम. माझ्यामते फक्त अडाणीच लोकं सोने (धातू)खरेदी करतात.

सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहे. ही हौस मौज अन प्रतिष्ठा मिरवायला प्रत्यक्ष सोने अंगावर असणे आवश्यक ठरते, नुसतं कागद मिरवायला काय कामाचा ? म्हणून लोकांचा कल प्रत्यक्ष सोने घेण्याकडे असतो, गोल्ड बाँड घेण्याकडे नाही. कारण गुंतवणुकीची भावना कमी अन हौस मौज अन प्रतिष्ठा मिरवायची भावना जास्त असते. सणासुदीला आजही मी एखादी नखशिकांत दागीन्यांने मढलेली मुलगी/सुवासीनी बघतो तेंव्हा मन प्रसन्न होते. म्हणून हो हौस मौज अन प्रतिष्ठेपायी सोने अवश्य थोडे थोदे खरेदी करत चला पण त्याला आर्थीक गुंतवणूक अजिबात मानु नका.

सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहे
पहीले प्रतिष्ठा कमवा, नंतर अंगावर खोटे सोने घातले तरी समोरचा ते सोने खरे समजतो. लग्नकार्यात माझी आई कर्णफूल व कडे बेंटेक्सचे वापरते अजुनही कोणाला शंका आली नाही. हौसही होते, मिरवताही येते, बचतही होते व मुळात असलेल्या प्रतिष्ठतेला त्यामुळे कोणतीही बाधा येत नाही.

सोन्यासोबत फार भावना असतात हो लोकांच्या चिकटलेल्या. तुम्ही लिहले तेच लिहायला मघाशी आलो होतो. पण सोडून दिले. ते बोलतायत तसा विचार समाजातला बहुसंख्य वर्ग करतो. तुमच्या-माझ्यासारखा विचार करणारे फार थोडे. त्यामुळे सोडाच. माझ्या ओळखीतल्या एक गृहीणींचे खायचे-खर्चाचे वांदे आहेत पण लग्नकार्यात दिड किलोचे दागिने घालून फिरतात.

जर पी पी एफ ला मर्यादा ठेवली नसती तर , कर्मचार्‍यांनी , अमर्याद ( वेतनापेक्क्षा जास्त ) पैसा गोळा केला असता , तोही भ्रष्टाचाराने , आणि असा हा वरचा काळा पैसा ( ब्लॅक मनी ) , ' पांढरा ' ( व्हाईट मनी ) झाला असता, शिवाय सरकारचे आयकराचे उत्पन्न , तेही बुडाले असते.