Welcome to misalpav.com
लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग- "त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता" संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक (पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला. माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे. आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते. १)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis २)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure २)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria 3)दृष्टी जाणे : Glaucoma ४)पाय कापावा लागणे : Leg Amputation ५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे ६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage ७)कर्ण बधिरता येणे ८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे ९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे १०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे. हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!! रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात. ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी. याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कळावे, गोडवा असावा. आपला लाडका:आयुर्हीत
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नक्कीच. जसजसे प्रश्न येत जातील, तसतसे नवीन माहितीही मिळेल. स्वतः रुग्ण देखील छानप्रकारे आपले चांगले वाईट अनुभव लिहतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. काही succes stories मिळाल्यात तर फारच छान होईल. तज्ञ मान्यवरांचेही मोफत मार्गदर्शन अपेक्षित आहेच. धन्यवाद! आपला लाडका : आयुर्हीत

मला माहीत असलेली अत्यल्प माहीती : मधुमेह दोन प्रकारचे असतात. प्रकार अ: या प्रकारात मधुमेह रोग्याला फारच लवकर होतो. (सहसा तिशीतच. यात त्याच्या/तिच्या प्लीहा (पॅन्क्रीया) अकार्यक्षम होउन शरीरांतर्गत शर्कारा निर्माण करण्याची शक्ती नाहीशी होते. त्यामुळे इंसुलीन्ची इंजेक्शन्स घेऊन शरीरातली शर्करा नियंत्रीत करावी लागते. प्रकार बः इथे रोग्याला मधुमेह सहसा उशीरा होतो.यात शर्करा निर्माण जरी होत असली तरी ती पेशींमधे शोषली जात नाही. त्यामुळे रक्तातली शर्करा वाढत जाते. यामुळे पुढे मुत्रपिंडाचा त्रास होणे वगैरे सुरू होते. (महत्वाची टीपः मी डॉक्टर वगैरे नाही. त्यामुळे ही माहीती चुकीची असण्याची शक्यता नक्कीच आहे. खालील विडीयोमधे मधुमेहाविषयी फार छान माहीती अगदी सहज समजेल अश्या भाषेत दिली आहे.)

अरे व्वा ! फारच छान आणि खूप खूप महत्वाची माहिती आहे ही! वीडीओमध्ये खूप गंभीर माहिती पण अतिशय सुंदर प्रकारे, अगदी सहजपणे दिली आहे!!!! सर्व मधुमेही रुग्ण व त्यांचे नातेवाईक/पुढील पिढीलाही याचा फायदा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Truly it should proove an eye opener for Diabetic persons/heirs. लक्ष लक्ष धन्यवाद!!! आपला लाडका : आयुर्हीत

१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल असे कुठल्याश्या पाश्चात्य जर्नल चा हवाला देऊन आलेली बातमी वाचलेली आठवते... हे जेव्हा होईल तेव्हा 'कसे' होईल ... मिपाकर वैद्यकीय तज्ञांचे काय मत आहे?? कालच एका साप्ताहिक बुलेटीन मध्ये 'मधुमेह' मुळातून घालवण्याचे प्रयत्न करा असा एका रुग्णाला दिलेला 'आयुर्वेदिक' सल्ला वाचला...म्हणजे मधुमेह घालवणे आत्ता सुद्धा शक्य आहे ??? ..मधुमेह होता आणि आता नही असे उदाहरण कुणाच्या पाहण्यात आहे का? (पाहण्यात .... ऐकण्यात नव्हे)...

१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल असे कुठल्याश्या पाश्चात्य जर्नल चा हवाला देऊन आलेली बातमी वाचलेली आठवते...
१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल!!!! धन्यवाद, अशा शुभ सन्देशाने दिवसाचि सुरवात केल्याने. कसे होईल हे जाणण्यासाठी कृपया ते जर्नल शोधून काढूया का? काही अजून "क्लु" मिळेल का ?
हे जेव्हा होईल तेव्हा 'कसे' होईल ... मिपाकर वैद्यकीय तज्ञांचे काय मत आहे??
मिपाकर वैद्यकीय तज्ञांचा सहभाग नक्कीच आवश्यक आहे. 'मधुमेह' मुळातून घालवण्याचे प्रयत्न जर नाही झाले तर पुढच्या पिढीतील ७०% भारतीयांना मुळातून जावे लागेल(मूळच नष्ट होईल). हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. चला तर मग आपण समस्त मिपाकार हे शोधून काढू या. कृपया कालच्या साप्ताहिक बुलेटीन ची लिंक पोस्ट होऊ शकेल का? सर्वांना फायदाच होईल त्याने. धन्यवाद कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत

सकाळच्या हार्ड कॉपीमध्ये जे बालाजी तांब्यांची पुरवणी येते त्यात वाचकांच्या प्रश्नोत्तार्त हा उल्लेख आहे..

मधुमेह हा " रोग" नसल्याने तो जाईल.तो व्हायरसने होणारा बदल नव्हे.व्हायरस हे स्वतः च एक अजब प्रयोगशाळा असतात. ते त्वरित आपल्यात बदल करून सरव्हायव्हल ची सोय करू शकतात. स्टेमसेल थेरपी जशी सुलभ व परवडणारी होईल तशा स्वादुपिंडाच्या पेशी नव्याने तयार करता येऊ शकतील.आज तरी फूटपाथवर पेन ड्राईव्ह घेण्याइतके ते सोपे नाही.

ब्रिटीश मधुमेह संशोधनतज्ञानुसार पुढच्या २० वर्षात Type 1 मधुमेह(Auto immume Disease)साठी लस बनवणे शक्य आहे, जेणे करून हा रोग आटोक्यात येण्याची शक्यता आहे. भारतीयांत असणारा Type2 मधुमेह हा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारा आजार आहे, जो स्थुलतेशी(Obsesity)निगडीत आहे, ज्यासाठी व्यायाम व कमी कॅलरीचा आहार गरजेचा आहे, त्यावरही जोरात संशोधन सुरु आहे. अधिक माहितीसाठी वाचा : Diabetes experts confident they can wipe out killer disease in 20 years आता बोला!

भारतीयांत असणारा Type2 मधुमेह हा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारा आजार आहे, जो स्थुलतेशी(Obsesity)निगडीत आहे,
मला वाटते माझा मधुमेह Type 3 प्रकारचा आहे. म्हणजे आधी Type 2 मधुमेह होऊन, जीवनपद्धती आणि स्थुलतेत विक्रमी बदल घडत नसलाने, कायमस्वरुपी वास्तव्यास आलेला.

काका, आपल्याला असलेला प्रकार हा Type2 चाच आहे, कारण मधुमेहमध्ये Type3 प्रकार नसतोच मुळी! आधुनिक चिकित्सा विज्ञानानुसार मधुमेह फक्त २ प्रकारचेच असतात. नाहीतर हा प्रतिसाद वाचून चुकीचा संदेश जाईल. आयुर्वेदामध्ये याचे खूप बारकाईने विस्तृत प्रकार सांगितले आहेत, जेणे करून व्यवस्थितपणे अचूक निदान होऊ शकते. चिकित्सेत अचूकता असेल तरच तत्पर, इतर रोग/आजार वाढू न देता कायमस्वरूपी इलाज होणे शक्य/गरजेचे असते. आपली तयारी असेल तर आपली पूर्ण माहिती विचारात घेऊन case study प्रकाशित करता येऊ शकेल, जेणे करून सर्वांना याचा निश्चितच फायदा होईल. धन्यवाद.

अहो, माझा प्रतिसाद विनोदी अंगाने आहे. >>>>जीवनपद्धती आणि स्थुलतेत विक्रमी बदल घडत नसलाने, कायमस्वरुपी वास्तव्यास आलेला. हे विनोदी पद्धतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न होता. असो.

मधुमेह हा स्वत: रोग नाही ती एक शारिरीक अवस्था आहे. कावीळ ही अशीच एक अवस्था आहे. मधुमेह होण्याची शक्यता असलेली जीन्स व होणारच नाही अशी जीन्स असलेली माणसे असतात.त्यामुळे काहीना जास्त साखर खाल्ली तर काहीना मधुमेह होणारच नाही . मधुमेह हा आंतस्त्रावी ग्रंथी च्या कार्यात बिघाड झाल्यामुळे होणारी अवस्था असली तरी त्याचे मुख्य 'लक्ष्य' असते अभिसरण संस्था. सतत रक्तशर्करेची पातळी सामान्य ठेवणे हे यातील मुख्य ध्येय असते. साहजिकच रूग्णाचा रोल चिकित्सकापेक्षा महत्वाचा ठरतो. अशी पातळी सामान्य ठेवण्यासाठी स्वादुपिंडाचे उद्दीपन , वाढत्या रक्तशर्करेचा त्वरित वापर व शर्करेची पातळी अवास्तव वाढणार नाही वा कमी होणार नाही असा आहार व आहाराची वारंवारिता ठेवणे हे तीन मुख्य उपाय आहेत. आहारात फायबरचा वापर असेल तर अन्नाचे हळू हळू शोषण होऊन सामन्य पातळी ठेवता येते. अतः साबुदाणा, मैदा विशुद्ध साखर या सारखे पदार्थ घेताना त्या बरोबर काहीतरी "रफेज" खाल्ले पाहिजेत. उदा.भाताबरोबर पालेभाजी खाल्ली पाहिजे, आमटी नव्हे.

धन्यवाद आपल्या छान प्रतिसादाबद्दल.
सतत रक्तशर्करेची पातळी सामान्य ठेवणे हे यातील मुख्य ध्येय असते.
फारच छान आणि खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय आपण. रक्तशर्करेची आदर्श पातळी किती असावी या बद्दल आपले आणि मिपा वरील तज्ञांचे काय मत आहे? आपण त्यासाठी
अशी पातळी सामान्य ठेवण्यासाठी स्वादुपिंडाचे उद्दीपन , वाढत्या रक्तशर्करेचा त्वरित वापर व शर्करेची पातळी अवास्तव वाढणार नाही वा कमी होणार नाही असा आहार व आहाराची वारंवारिता ठेवणे हे तीन मुख्य उपाय आहेत.
हे उत्तर अतिशय समर्पक आहे. कृपया सर्वांनी याचा फायदा घ्यावा व कोणाची काही शंका असेल तर ती उपस्थित करावी हीच नम्र विनंती. कृपया सर्वांनी आपआपला खारीचा वाटा उचलावा. आपणा सर्वाकडून थोडीथोडी का होईना, पण मधुमेह १०० नाही तर अगदी १० वर्षात नाहीसा होण्यात नक्कीच मदत होईल. धन्यवाद कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत

"स्वादुपिंडाचे उद्दीपन" हा शब्द नक्क्कीच काहीतरी गूढ मतितार्थ दर्शवितो आहे.गुगलकाका पण गप्प आहेत. पण जबरदस्त परिणामकारी शब्द आहे हा. आपण व मिपा वरील तज्ञ मंडळींनी कुपया अधिक मार्गदर्शन करावे हि विंनती. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

स्वादुपिंडाचे उद्दीपन म्हणजे इन्सुलीन तयार करणाच्या बीटा सेल्स ला कामाला लावणे. अर्थात यात यश मर्यादित असते. पण काही औषधे हे काम करतात.

यात कोण कोणते औषधे येतात? आपला काय अनुभव आहे? साखरेचे प्रमाण किती कमी होते? कि होतच नाही? कि तात्पुरते कमी होते, कि जरुरी पेक्षा जास्त (अधिकच) कमी होते? कि काही वेगळे प्रतिसाद/side effect कडे लक्ष वेधायचे आहे आपल्याया ? सवडीने उत्तर दिले तरी चालेल, पण सखोल हवे आहे, हिच विनंती. अधिक खोलात जाऊन विचार करायची वेळ आली आहे, म्हणून हे बारीक तपशील महत्त्वाचे वाटतात मला. कळावे, लोभ असावा. आपला लाडका,आयुर्हीत

कुठेतरी लागलेले दिसते. तरीच म्हटले, एवढ्या जोरात का सटकलात !!!! तुमच्या त्या स्पा च्या फरशीवर पाणी बिनी सांडले होते का हो? धन्यवाद आपल्या स्वानुभवाबद्दल.

माहितीपूर्ण धागा. माझ्या आईकडून भावाला फार लहान वयात मधुमेह आला आहे. त्याच्या टेन्शनच्या नोकरीमुळे त्यात भर पडली असावी. मात्र मला अजूनतरी काही त्रास नाही. प्रतिक्रियांमधूनही आणखी माहिती मिळेल या अपेक्षेत आहे. असेच आणखी धागे येऊ द्या. तुमच्या आयडीवरून तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले दिसताहात.

धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. मुळात हा धागा आपल्यासारख्या मान्यवरांसाठीच आहे, ज्यांच्या घरात मधुमेहाची दाट शक्यता आहे परंतु अजून प्रवेश झालेला नाही आणि म्हणून सर्व प्रथम आभार त्या लाडक्या गणरायाचे. पुढेही होऊ नये म्हणून गणरायाच्या आशीर्वादाने या नवीन वर्षात सर्वांनी एक संकल्प सोडू या व मधुमेहाला हद्दपार करू या. मला एक श्लोक आठवला: ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय , मॄत्योर्माअमॄतं गमय । हे प्रभु! असत्य से सत्य, अन्धकार से प्रकाश और मृत्यु से अमरता की ओर मेरी गति हो । O Lord! Lead me from the untruth to truth, darkness to light and death to immortality. आणि वाचूया ह्याच विषयावरील "मटा" चा महत्वाचा लेख:http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/-/articleshow/28302943.cms अनुवंशिकता हा एक महत्त्वाचा दुवा आणि इशारा आहे पुढच्या पीढीला/समकालीन बंधू भगिनींना वेळीच सावध होण्याचा. आणि सर्वात महत्त्वाचे : मधुमेह टाळणे हे आपल्याच हातात आहे. कसे ते पुढे पाहूच. कळावे,लोभ असावा. आपला हितचिंतक(एक भुगत भोगी):आयुर्हीत ताजा कलम: मी कोणी वैद्यकीय क्षेत्रातला तज्ञ नाही परंतु डोळे उघडे ठेऊन वावरतो आहे. माझ्या घरात/आजोळी आजवर एकूण १६ मधुमेहि रुग्ण होऊन गेलेत, त्यांच्यावर बितलेल्या बऱ्या वाईट अनुभवाने मी स्वतः शहाणा व्हायचा ठरविले आहे. नाही तर माझ्यावरही मधुमेहाची टांगती तलवार लटकलेलीच आहे. म्हणूनच वेळीच सावध होण्याचा प्रयत्न करत आहे. मिपावरील तज्ञ मान्यवर यावर उत्तम मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा आहे.

मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था आहे. मधुमेही माणसाला नुसती साखरच नाही तर एकूणच आहार फार विचारपूर्वक घ्यावा लागतो. उष्मांकावरही लक्ष द्यावे लागते. तेल, चरबीयुक्त पदार्थ, मांसाहार, मद्यपान ह्याने यकृतावर ताण येतो. यकृत बिघाडाने कोलेस्ट्रॉल वाढीस लागते आणि कोलेस्टरॉलने हृदयविकार सुरु होऊ शकतो. अनेक मार्गाने साखर शरीरात प्रवेश करीत असते. साखरेत डायरेक्ट साखर आणि इनडायरेक्ट साखर असे दोन भाग येतात. डायरेक्ट साखरेत आपली पांढरीसाखर, गुळ, मिठाई वगैरे वगैरे पांढरीसाखर वापरलेले पदार्थ येतात तर इनडायरेक्ट साखरेत कर्बोदके (भात, बटाटा, मैदा, साबुदाणा इ.इ.) येतात. केळी, द्राक्षं, चिकू, आंबा आदी गोड फळे सुद्धा ह्यात मोडतात. साखरेचा प्रवेश शरीरात झाला की पचनाच्या प्रक्रियेमध्ये त्याचे ग्लुकोज मध्ये रुपांतर होते हे ग्लुकोज रक्ताच्या पेशींमध्ये शोषले जाऊन त्याचे रुपांतर उर्जेत होते. मधुमेही अवस्थेत हे ग्लुकोजचे पेशींमध्ये शोषले जाणे बंद किंवा मंद होते आणि रक्तात साखर साचू लागते. रक्तपेशीतील ग्लुकोजचे शोषण कमी झाल्याने उर्जा निर्मिती होत नाही. परिणामतः लवकर थकवा जाणवतो. झोप जास्त येते. काम करायचा उत्साह कमी होतो. मधुमेहाची अवस्था प्रमाणाबाहेर वाढलेल्या वजनाने येते. (हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे). त्यामुळे वजनावर नियंत्रण अत्यंत आवश्यक त्यामुळे तळलेले पदार्थ, मांसाहारातील ग्रेव्हीवादी पदार्थ, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ इ.इ.इ. टाळावे लागतात. त्याच बरोबर नियमित व्यायाम (चालणे, पोहणे इ.इ.) आवश्यक असतो. कारण नियमित व्यायामाने ग्लुकोजचे शोषण होऊन उर्जा निर्मिती होते, स्नायुंपर्यंत ग्लुकोज पोहोचून थकवा आणि इतर दु:ष्पपरिणाम दूर राखले जातात. इनडायरेक्ट साखरेत कर्बोदके अग्रक्रमाने येतात. ह्या कर्बोदकांमध्ये असलेली साखर रक्तात शोषली जाण्याचा क्षमता आणि क्रम वेगवेगळा असतो. त्या त्याच्या क्रमानुसार त्याला एक अंक देण्यात आला आहे त्याला Glycemic Index (GI) म्हणतात. त्यात ग्लुकोज हा १०० मानुन त्याच्या संदर्भात इतर पदार्थांचा GI ठरवला आहे. साखरेचा ६५ आहे. बहुतेक पदार्थांच्या GI चा तक्ता आंतरजालावर उपलब्ध आहे. ५५च्या खालील GI ला कमी GI मानतात, ५५ ते ६९ पर्यंतचे मध्यम GI तर ७०च्या वरील सर्व उच्च GI. मधुमेही माणसाला आपला आहार कमी आणि मध्यम अशा GI मध्ये ठेवणे गरजेचे असते. कर्बोदकातील GI त्यातील साखरेचे प्रमाण ठरवते. पण खाण्यात कर्बोदकाचे प्रमाणही महत्त्वाचे असते. कमी GI ची कर्बोदके जर प्रमाणाबाहेर खाल्ली तरी रक्त शर्करा वाढते. त्यांमुळे किती कबोदके खायची हे ठरवण्यासाठी Glycemic Load (GL) हे प्रमाण ठरवावे लागते. जो पदार्थ आपण खातो त्यातील तंतू वजा जाता उरते ते निव्वळ कर्बोदक. GL = (GI X निव्वळ कर्बोदके) भागीले १०० . येणारं उत्तर २० पेक्षा कमी असावं. विषय सोपा करण्याऐवजी मी जास्त क्लिष्ट केला आहे का? असेलही. कारण हा एक महासागरासारखा विषय आहे तो एका प्रतिसादात मांडण्याची तारेवरची कसरत मला कितपत जमली आहे कळत नाही. मला स्वतःला मधुमेह असल्याकारणाने ह्या विषयावरील जमेल तितके वाचन, डॉक्टर - डाएटिशियनशी चर्चा ह्यातून वरील माहिती मिळाली आहे. थोडक्यात डायरेक्ट साखर = पूर्ण टाळा. इन्डायरेक्ट साखर =एकदम कमी प्रमाणात घ्या. भरपूर भाज्या (कमी तेलावर शिजवलेल्या) = जास्त खा. पालेभाज्यांवर जास्त भर द्या. मैदा टाळा. गव्हाचे पीठ, कोंडा खा. नियमित व्यायाम करा. मानसिक ताण तणाव टाळा. बाकी मिपावरील डॉक्टर मंडळी जास्त प्रकाश टाकतीलच. ह्या विषयावरील माझे ज्ञान वाढवायला मला आवडेलच.

मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था आहे.
हो हे अगदी खरे आहे.ज्यावर पाळी येते त्यालाच ते कळते. यातून आपण सर्व मिपाकर मान्यवर बोध घेऊ. पुढच्यास ठेच लागली तर मागच्याने का शहाणा होऊ नये? आज अजून एक महत्त्वाची टीप हाती आली आहे ती म्हणजे
डायरेक्ट साखर = पूर्ण टाळा. इन्डायरेक्ट साखर =एकदम कमी प्रमाणात घ्या. भरपूर भाज्या (कमी तेलावर शिजवलेल्या) = जास्त खा. पालेभाज्यांवर जास्त भर द्या. मैदा टाळा. गव्हाचे पीठ, कोंडा खा. नियमित व्यायाम करा. मानसिक ताण तणाव टाळा.
किती चांगले होईल, सर्व मधुमेही रुग्ण व त्यांचे नातेवाईक हि बाब समजून घेतील. यात रुग्णासोबत त्यांच्या सहचारिणी/सहचारि व आचारी(COOK/शेफ)नेहि हे समजून घ्यायला हवे. सर्व अन्नपूर्णा माताभगिनी यात जाणीवपूर्वक लक्ष घालतीलच अशी आशा. एकंदरीत खूप छान व उपयुक्त असा हा प्रतिसाद आहे. मनापासून धन्यवाद. कळावे, लोभ असावा. आपला हितचिंतक : आयुर्हीत

पेठकरसाहेबांनी खूप चांगली माहिती थोडक्यात सांगितली आहे. मला त्यात फार काही भर घालता येण्यासारखे नाही. फक्त इतकेच लिहावेसे वाटते की एकाद्याला 'मधुमेह आहे' किंवा 'नाही' असे फक्त दोनच भाग नसतात. कोणत्याही टाइपच्या मधुमेहांमध्ये त्याच्या तीव्रतेनुसार ही अवस्था कितपत गंभीर आहे यात फरक असतात. त्यानुसार किती पथ्य करायला हवे हे ठरवता येते. सगळ्या आवडत्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करण्यामुळे मानसिक ताप होणे साहजिक आहे आणि नैराश्य आले तर ते मधुमेहाहून जास्त भयंकर वाटेल. सध्या तरी रक्तामधील साखरेचे प्रमाण हेच एक मोजमाप आहे. पण प्रत्येक व्यक्तीच्या रक्ततले हे प्रमाण क्षणोक्षणी बदलत असते. वर दिलेल्या व्हीडिओवरूनही ते स्पष्ट होते. यामुळे व्याधीचे निदान नीटपणे होण्याच्या दृष्टीने उपाशीपोटी रक्त तपासणी केली जाते. पथ्य किंवा आहारावरील नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही आवश्यकता असल्यास काही औषधे यांच्या सहाय्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवता येते असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आणि माझ्या सुदैवाने मला कोणतेच लक्षण कधीच दिसले नाहे. त्यामुळे माझा रिपोर्ट पाहून त्या पॅथॉलोजी लॅबमध्ये आलेल्या माझ्या एका मित्राने मला डायबेटिक म्हणायचे की नाही असा प्रश्न मला विचारला होता.

धन्यवाद. फार मोलाचा अनुभव आहे हा! सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदसरांचा मधुमेह पूर्ण नियंत्रणाखाली आहे, हि विशेष बाब सर्वांनी लक्षात घ्यावी हि विनंती. आपल्या गेल्या अनेक वर्षांचा अनुभव जर थोड्या शब्दात मांडायचा झाल्यास
व्याधीचे निदान नीटपणे होण्याच्या दृष्टीने उपाशीपोटी रक्त तपासणी
आणि
पथ्य किंवा आहारावरील नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही आवश्यकता असल्यास काही औषधे यांच्या सहाय्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवता येते असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे
चला पहिली success story मिळाली असे म्हणता येईल. तुमचा आदर्श घेऊन सर्व मधुमेहरुग्णांनी मधुमेहावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास हरकत नाही. आपण पथ्यावर भर दिला आहे हि फारच दुर्मिळ पण आनंदाची बाब आहे! पथ्य काय पाळत आहात हेही सविस्तर सांगितले तर बरे होईल. काय मिपाकारहो, होईल कि नाही सर्वांचा मधुमेह हद्दपार येत्या १० वर्षात! असाध्य ते साध्य करीता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।। प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली. दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें| बरें पाहतां गूज तेथेचि आहे| करीं घेउं जातां कदा आडळेना| जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ॥ श्लोकार्थ – या दृष्य सृष्टीत जे सहज दिसत नाही त्याचा सूक्ष्म विचाराने शोध घ्यावा. शुध्द विचाराने नीट पाहिले की त्याचे गूढरहस्य तेथेच दडलेले आढळेल. कळावे,लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत

>>>>सगळ्या आवडत्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करण्यामुळे मानसिक ताप होणे साहजिक आहे आणि नैराश्य आले तर ते मधुमेहाहून जास्त भयंकर वाटेल. नैराश्य येऊ न देण्यासाठी, ह्या विषयावरील, माझी वैचारिक बैठक विशद करतो. एक तर आपल्याला मधुमेह आहे, ही एक भयंकर अवस्था आहे आणि ह्यातून कांही गंभीर आजार होऊ शकतात हे मनाने मान्य करणं महत्त्वाचं. दुसरं आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टींची एक वेळ, एक स्थान असतं. जसे लहानपणी आपण विटी-दांडू, डबा ऐसपैस, सूर पारंब्या वगैरे खेळतो. पण जन्मभर तेच करतो का? तर नाही. वाढत्या वयाबरोबर आपल्या आवडीनिवडी, गरजा बदलत जातात. लहानपणी खेळलो ह्यावर आपण समाधान मानतो. हे समाधान मानणंच आपल्याला नैराश्यापासून वाचवतं. गोड, तेलकट, चमचमीत खाण्याचं आपलं वय सरलं हे मनाने मान्य करून समाधानी राहिलं तर नैराश्य येत नाही. आनंद कुठल्याही गोष्टीतून मिळवता येतो. आयुष्यभर साखरेचा गोड चहा प्यायची सवय सहजासहजी सुटत नाही. पण मनाचा निग्रह आणि वर म्हंटल्या प्रमाणे आपल्याला मधुमेह आहे हे मनाने मान्य केल्यावर बिनसाखरेचा चहा पिण्याची सवय होते. पुढे पुढे तर चुकून कुठे साखरेच्या गोड चहाचा घोट घेतला तर अगदी नकोसे वाटते. मैद्याचा पाव खाण्यापेक्षा गव्हाच्या पीठाचा पाव खाल्यावर तो जास्त चविष्ट वाटतो. बटाटा पूर्ण टाळता येतो. सुरुवातीला जेवणात भाताचा ढीग कमी कमी करत पूर्ण टाळता येतो. आंबा खूप आवडत असेल तर पूर्ण आंबा खाण्यापेक्षा आंब्याच्या मौसमात ३-४ दिवसांत एखादी फोड खाऊन नियंत्रण ही ठेवता येते आणि हौसही भागवता येते. मोसंबी आणि उसाचा रस वगैरे टाळून त्या ऐवजी अननसाचा रस (साखर न घालता), कलींगडाचा रस (साखर न घालता) वगैरे सेवन करून तुम्ही साखर आणि आपली हौस नियंत्रणात ठेवू शकता. नैराश्य वगैरे येत नाही. जवळ जवळ दररोज सकाळी रिकाम्यापोटी रक्तशर्करा तपासून (घरगुती यंत्राच्या साहाय्याने) ती १००-११० mg च्या वर जात नाहीए ह्यावर लक्ष ठेवावं. ११०च्या वर जात असेल तर खाण्यावर नियंत्रण (जेवणातील साखरेचा, कर्बोदकांचा समावेश) आणि व्यायामातील नियमितता तपासून, योग्य ते बदल करून, रक्तशर्करा ११०च्या खाली आणावी. साखरेचे प्रमाण १००च्या खाली ठेवायची तसेच त्यात फार हेलकावे ((fluctuations) ही असता कामा नये. साखरेच्या रक्तातील शोषणाबद्दल एक उदाहरण मला फार उपयुक्त वाटते. जसे दिवसभर रिमझीम पाऊस पडत असेल तर ते सर्व पाणी जमिनीत मुरते पण दोन तास मुसळधार पाऊस पडला तर ठिकठिकाणी तळी आणि डबकी साठतात. तसेच एकदम मोठ्या प्रमाणात साखरेचा मारा केला तर साखर रक्तात साठून राहते पण मागील प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे GI आणि GL ह्यावर लक्ष दिल्यास अल्पप्रमाणात पोटात गेलेली साखर रक्तात शोषली जाऊन रक्तातील त्याचे अतिरिक्त प्रमाण वाढत नाही आणि मधुमेहाचे दु:ष्परीणाम जाणवत नाहीत.

प्रभाकर सरांनी अचूक आणि अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे.मनापासून धन्यवाद.
मनाने मान्य करून समाधानी राहिलं तर नैराश्य येत नाही
आणि
जवळ जवळ दररोज सकाळी रिकाम्यापोटी रक्तशर्करा तपासून (घरगुती यंत्राच्या साहाय्याने) ती १००-११० mg च्या वर जात नाहीए ह्यावर लक्ष ठेवावं. ११०च्या वर जात असेल तर खाण्यावर नियंत्रण (जेवणातील साखरेचा, कर्बोदकांचा समावेश) आणि व्यायामातील नियमितता तपासून, योग्य ते बदल करून, रक्तशर्करा ११०च्या खाली आणावी. साखरेचे प्रमाण १००च्या खाली ठेवायची तसेच त्यात फार हेलकावे ((fluctuations) ही असता कामा नये
कोणाला काहीही शंका असतील तर अवश्य विचारा, मनात कुठलेही प्रश्न ठेऊ नये. सर्व मिपाकरांना याचा लाभ घेतील हि ईश्वर चरणी प्रार्थना. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

आपल्या छान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपलाही सहभाग हवा आहे आम्हा सर्वांना. कळावे, लोभ असावा. आपला लाडका :आयुर्हीत

साहेब कशाला कुंथुन धागा वर ठेवताय? 17 पॆकी 8 प्रतीसाद तुमचे, परत मुळ धाग्यातही काही स्वताचे इनपुट्स नाहीत.लोक करतील चर्चा नका घेऊ टेन्शन, बाकी लिखाण वाचा तोवर

धन्यवाद युक्ती व Statistics बद्दल. नक्कीच बदलवीन मी स्वतःला. आपण माझे इनपुट वाचलेले दिसत नाहीत, म्हणून परत एकदा पोस्ट करतो फक्त तुमच्यासाठी.
आणि वाचूया ह्याच विषयावरील "मटा" चा महत्वाचा लेख:http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/-/articleshow/2830294...
बाकी लिखाण खूप खूप छान आहे मिपा वर. माझी तर (वाचनाची)मेजवानी सुरु आहे.मराठीतील असे सुरेख लिखाण, सापडूनही सापडत नाही.धन्यवाद परत एकदा आपल्या सहभागाबद्दल. कळावे, त्रागा नसावा. आपला(हि होईन कधीतरी)लाडका: आयुर्हीत.

मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव नाही मात्र American Diabetes Association ची पुढील पुस्तके एकदा तरी जरूर वाचावीत - मधुमेहासंदर्भातील ज्ञानामध्ये भरपूर वाढ होईल. . . . . . साधारणपणे १०० ते १२५ पानी पुस्तके आहेत आणि पुस्तकाच्या नावानुसार त्या त्या विषयाची इत्यंभूत माहिती दिली आहे. उदा - फूटकेअर टिप्स देताना, पायांच्या त्वचेची काळजी काय घ्यावी व कशी..? नखांची काळजी.. पायाच्या नसांची काळजी.. सॉक्स आणि शूज कोणते वापरावेत..? कसे निवडावेत..? चप्पल वापराताना काय काळजी घ्यावी..? व्यायाम करताना, ट्रेक करताना, पोहोताना, जॉगींग व रनींग करताना घ्यावयाची काळजी.. कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यावे व एखाद्या लक्षणावर प्राथमिक पातळीवरच काय उपचार करावेत.. अशी उपयुक्त माहिती प्रश्नोत्तरातून रोचकपणे दिली आहे.

क्रॉसवर्ड किंवा लाईफस्टाईलमध्ये मिळू शकतील / ऑर्डर नोंदवावी लागेल अन्यथा अ‍ॅमेझॉन वर उपलब्ध आहेत.

मोदकजी, लक्ष लक्ष धन्यवाद. प्रत्यक्ष मधुमेहाचा अनुभव नसतांना देखील, माणुसकीच्या नात्याने केलेली हि मदत अनमोल आहे! सर्व मिपाकार याचा जरूर लाभ घेओत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कळावे, लोभ असावा आपला लाडका, आयुर्हीत.

पेठकरकाका मस्तं लिहिताहेत. डबक्याचं उदाहरण खूप आवडलं. माझ्या पेशंट एज्युकेशनमध्ये नक्की घालते. प्रत्येकवेळी ते देताना काका आठवतील. ;) स्पा, मला वाटतं आयुर्हित यांचा हेतू धाग्याचा टि आर पी वाढविणे नसून धाग्याचे सूत्रसंचालन करण्याचा आहे. आणि ते तो सध्यातरी व्यवस्थित पार पाडताहेत. डायबेटिस दहा वर्षात नष्टं नक्कीच होणार नाही (आम्हा डायबेटॉलॉजिस्टची पोटे कशी भरतील) डायबेटिस नष्ट होणे एक कविकल्पना आहे. मात्र १०० टक्के डायबेटिसच्या रुग्णांची पथ्य, आहार, व्यायाम आणि गरज पडल्यास(च) औषधे इंजेक्शने यावर रक्तशर्करा नियंत्रित राहू शकेल. आणि एंड ऑर्गन डॅमेज वाचविता येऊ शकेल.

पेठकरकाका मस्तं लिहिताहेत. डबक्याचं उदाहरण खूप आवडलं. माझ्या पेशंट एज्युकेशनमध्ये नक्की घालते. प्रत्येकवेळी ते देताना काका आठवतील.
धन्यवाद आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल. पेठकर काका,याचे पूर्ण श्रेय आपणासच आहे. आपण व आपल्यासारखे डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टरांचे(मधुमेह तज्ञांचे)मनापासून सहभाग व मार्गदर्शन मिळाले तर आम्हा मिपाकारांचा नक्कीच उध्दार होईल.
आम्हा डायबेटॉलॉजिस्टची पोटे कशी भरतील?
आपला हा प्रतिसाद मी आपला एकट्याचा नसून तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, असे समजून चालतो.(Pl.do not take personally) एक ऐकिवात असलेले वाक्य आहे : जो चोच देतो तो दाणेही देतो.(आपल्यापेक्षा त्या परमेश्वराला या सृष्टीची पुरेपूर काळजी आहे, त्या पुढे आपण कोण पामर?. आणि सर्वात महत्वाचे आपल्या जन्माचे आधी हि सर्व सोय तो करून ठेवतो मगच आपल्याला जन्म देतो. कितीही आभार मानले तरी आपण त्याचे पांग कधीच फेडू शकत नाही) असो. एकाच पेशंट कडून आपण किती दिवस फी घेऊ शकतो याला काही मर्यादा आहेत.पण त्या पेक्षा त्याच्या कुटूम्बातील लोकांना तो होऊ नये असे ठरवले तर नवीन ४ ते २० ग्राहक मिळू शकतात.व मधुमेहाचेही उच्चाटन होण्यास हातभार लागेलच कि नाही.जर आपली तयारी असेल तर जुन्या पेशंटबरोबर आपण ह्या नवीन ग्राहकांसाठी खूप काही करू शकता असे वाटते. मी पामर कुठे चुकत असेल तर नक्कीच आपण माझा कान पकडू शकता.
डायबेटिस नष्ट होणे एक कविकल्पना आहे.
मान्य. पण ह्याच कविकल्पना(तात्कालिक प्राप्त परीस्थिती अनुसार "बिनडोक कल्पना") नवीन संशोधनाला जन्म देतात व राईटबंधू एक दिवस पक्ष्याप्रमाणे हवेत उडू लागतात.
मात्र १०० टक्के डायबेटिसच्या रुग्णांची पथ्य, आहार, व्यायाम आणि गरज पडल्यास(च) औषधे इंजेक्शने यावर रक्तशर्करा नियंत्रित राहू शकेल. आणि एंड ऑर्गन डॅमेज वाचविता येऊ शकेल
१००% सहमत! हेच तर हवे आहे.ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे! परत एकदा मनापासून धन्यवाद. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत

मी ऐकले आहे की डायबेटीस होणे अतिभयंकर नाही जर रक्तातली शुगर आटोक्यात ठेवली असेल तर. आणी असेही ऐकले आहे की शुगर हि फक्त टेन्शनमुळे वाढते. माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच निधन पावली जिला शेवटच्या दिवसात अतीप्रचंड टेन्शन होते व त्या व्यक्तीची शुगर ४०० झाली होती. त्यातच त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. पण एवढ्या हाय शुगरमुळे सिव्हिअर हार्ट अ‍ॅटॅक आलेला त्यांना कळलाच नाही असे डॉक.नी सांगितले. नंतर इतर कुठल्यातरी त्रासासाठी आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉकनी त्यांना अ‍ॅटॅक आल्याचे सांगितले. :( तसेच लठ्ठ व्यक्तींना मधुमेहाचा धोका बारीक माणसांपेक्षा कित्येक पट जास्त असतो असे वारंवार कानावर पडते. यात किती तथ्य आहे ह्यावरही प्रकाश टाकावा. (अवांतरः मिपावर पाषाणभेद आहेत का? त्यांच्या इतरत्र असलेल्या स्वाक्षरीत "फाईट अगेन्स्ट डायबिटीस" वाचल्याचे आठवते).

धन्यवाद पियु परीजी आपल्या सहभागाबद्दल.
माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच निधन पावली
खूप दुःखद घटना आहे. त्यातून हे आपले नातेवाईक असल्याने आपल्यावरही दुःखाचे आभाळ कोसळले असणार. आशा आहे, कि या घटनेतून आपण व सर्व नातेवाईक सावरले असतील.
जिला शेवटच्या दिवसात अतीप्रचंड टेन्शन होते व त्या व्यक्तीची शुगर ४०० झाली होती. त्यातच त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला.
मिपाकारांसाठी खूप काही शिकण्यासाठी आहे यातून. असे खूप वाईट घडू शकते,जर आपण स्वत:कडे दुर्लक्ष केले तर. ह्या परीस्थितीत तज्ञही काही चमत्कार करू शकणार नाहीत, अनपेक्षितपणे जाताजाता रुग्ण मात्र मोट्ठे बिल करून जाणार! बिलापेक्षाही रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला होणारा त्रास काही कमी नसणार.
पण एवढ्या हाय शुगरमुळे सिव्हिअर हार्ट अ‍ॅटॅक आलेला त्यांना कळलाच नाही असे डॉक.नी सांगितले. नंतर इतर कुठल्यातरी त्रासासाठी आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉकनी त्यांना अ‍ॅटॅक आल्याचे सांगितले
हो हेही खरे आहे कि प्रमाणाबाहेर साखर असेल तर हार्ट अँटँक येऊन गेला तरी कळत नाही. काही बाबतीत काही लोकांना पायाला झालेली जखमही कळून येत नाही. नंतर त्याचे खतरनाक Gangrene मध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.
शुगर हि फक्त टेन्शनमुळे वाढते
नक्कीच महत्त्वाचा घातक घटक आहे. टेन्शन हा ही (इतर घटकांइतकाच)एक फार महत्त्वाचा घटक आहे, ज्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. फक्त हा परिणाम इतका हळूहळू होतो की तो कळायला काही ५ ते ७ वर्षे जाऊ शकतात. म्हणूनच ह्या आजाराला silent killer म्हटले जाते. आणि रुग्णाला/त्याच्या नातेवाईकांना/आपल्याला वाटते कि सर्व अगदी अचानक घडले.कालपर्यंत अगदी सर्व काही ओके होते आणि आज हे अचानक काय झाले? काही बाबतीत प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे, काहींच्या अपघातामुळे/इतर आजारामुळे/त्यावरील औषधउपचारामुळेही, साखरेचे प्रमाण वाढू शकते. पण ते काही दिवसापुरतेच मर्यादित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बऱ्याच बाबतीत हा एक महत्त्वाचा Trigger होऊ शकतो व तेथून महुमेहाचा त्रास सुरु व्हायची शक्यता नाकारता येत नाही.
लठ्ठ व्यक्तींना मधुमेहाचा धोका बारीक माणसांपेक्षा कित्येक पट जास्त असतो
हो हेही खरे आहे. हा ही (इतर घटकांइतकाच)एक फार महत्त्वाचा घटक आहे,ज्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. एकंदरीत हि एक दर्द्नाक कहाणी आहे,जर वेळीच आपण सावध झालो नाही तर! पण हीच Fact (सत्य परिस्थिती) सर्व मिपाकरांनी Seriously लक्षात घ्यावी हि विनंती. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत असे १६ वेगवेगळे किस्से (end result)घडले आहेत, ज्या मुळे मी खुपदा व्यथित होत असतो.

आयुर्हित साहेब तुम्ही सातत्याने आणि अनावश्यक प्रतिक्रिया देऊन चांगल्या धाग्याचा गुंता करी आहात , सहसा मिपाकर हे स्वयंभू असून त्यांना कुठल्याही प्रोत्साहंनाची गरज नाही म्हणून कृपया सध्या फक्त वाचन मात्र राहा ही नम्र विनंती !!! प्रतिक्रिया न आवडल्यास कृपया दुर्लक्ष करा आणि प्रतिक्रिया नियमात न बसल्यास स.म. ने उडवून टाकावी !