Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:
एक होती सगुणा. तिच्या नवर्‍याचे नाव ईश्वर. तिच्या नवर्‍याला आणखी एक बायको होती. तिचे नाव निगुणा. दोघींचंही आपल्या नवर्‍यावर खुप प्रेम होते. पण दोघींच्या प्रेमाची तर्‍हा मात्र पुर्णपणे वेगळी. सगुणेचा सारा भर असण्यावर आणि दिसण्यावर. ती आपले नवर्‍यावरील प्रेम आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून व्यक्त करायची. त्याला चांगलं चुंगलं करुन खाऊ घालायची. त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायची. तो समोर दिसला नाही की बैचैन व्हायची. निगुणेचं सारंच उलट. तिचं प्रेम करणं कुणाला दिसायचं नाही. कारण ती ते शब्दांमधून व्यक्त करायची नाही. नवरा सतत आपल्या समोर असायला हवा असा तिचा मुळीच अट्टाहास नसायचा. किंबहूना "तो आपला नवरा आहे" या भावनेनंच ती आनंदी असायची. नवर्‍यावरील प्रेम व्यक्त करायला तिला कृती करण्याची किंवा शब्दांचा आधार घ्यायची गरजच भासायची नाही. सगुणा आणि निगुणा या एकमेकींच्या सवती असून कधी त्यांच्यात भांडण झालेलं कुणी पाहिलेल नव्हतं. मात्र त्या दोघी एकमेकींच्या अध्यात मध्यात नसायच्या हे मात्र खरं. ईश्वर तसा गावातील मोठा माणूस होता. सारा गाव त्याला ईश्वरशेठ म्हणून ओळखायचा. गावाला लागून असलेल्या उंच टेकडीवर त्याचं घर होतं. म्हणजे प्रत्यक्षात त्याला कुणी पाहिलेलं नव्हतं. परंतू वरुन सार्‍या गावावर त्याचं लक्ष असतं असं सारेच म्हणायचे. अडल्या नडल्याने त्याच्यापर्यंत निरोप पाठवून त्याच्याकडे मदत मागितली की तो काही ना काही मदत पाठवून देतो असं लोक ठामपणाने म्हणायचे. अर्थात हा निरोप सगुणा किंवा निगुणेच्या मार्फतच त्याच्यापर्यंत पोहचायचा. बहुतांश सारे लोक आपलं गार्‍हाणे सगुणेच्याच कानावर जाईल याची व्यवस्था करायचे. कारण बघावं तेव्हा सगुणाच नवर्‍याचे गुणगाण गात असायची. निगुणा नवर्‍याबद्दल क्वचितच बोलायची. त्यामुळे निगुणेमार्फत आपलं गार्‍हाणं ईश्वरपर्यंत पोहचवलं तर ते त्याच्यापर्यंत पोहचू शकेल याची गावकर्‍यांना खात्री नसायची. खुपच कमी लोक असं मानायचे की ईश्वरशेठ आपल्या दोन्ही बायकांवर सारखंच प्रेम करतात. गावात एक हिशोबनीस राहत होता. तो मात्र या सार्‍यांपासून वेगळा होता. म्हणजे तो स्वतःला वेगळं समजायचा. त्याचा टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वर नावाची श्रीमंत व्यक्ती राहते याच गोष्टीवर विश्वास नव्हता. सगुणा आणि निगुणा या लोकांनीच आश्रय दिलेल्या स्त्रीया आहेत असं तो मानायचा. लोक ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते असं मानतात म्हणून त्यांना मूर्खात काढायचा. त्यानं म्हणे एक "असा मी, कसा मी, जसा मी, तसा मी" नावाचं महाकाव्य लिहिलं होतं. त्याला कुठेतरी नाचणीच्या सत्वाची पुरचूंडी सापडली होती. त्या पुरचूंडीचा त्याला खुप अभिमान होता. गावच्या चावडीवर लोक जमले की तो गावकर्‍यांना त्या नाचणीच्या सत्वाच्या पुरचूंडीबद्दल आवर्जून सांगायचा. गावकर्‍यांनी ते सत्व आम्हालाही दाखवा असे म्हटले की तो हजार बहाणे शोधायचा. या हिशोबनीसाचे अनेक गावकर्‍यांशी खटके उडायचे. चावडी अगदी दणाणून जायची. गावकरी हतबलतेने डोक्याला हात मारून घ्यायचे. गावच्या पंचांकडे हिशोबनीसाला वाळीत टाकावे अशी मागणी करायचे. गावचे पंच मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करायचे. ज्या गावकर्‍यांशी हिशोबनीसाशी वारंवार खटके उडायचे त्यातल्याच एका गावकर्‍याने शेजारच्या गावातील मठात जाऊन हरदासाची संथा घेतली. हा नव्याने हरदास झालेला गावकरी टेकडीवरच्या ईश्वरशेठच्या कथा गावकर्‍यांना रंगवून सांगू लागला. उठता बसता जून्या पीढीतील लोकांचे दाखले देऊन ईश्वरशेठच्या गोष्टी सांगू लागला. ईश्वरशेठची पत्नी सगुणा आपल्याच नात्यातील आहे असं दाखवत लोकांकडून वाहवा मिळवू लागला. जूना हिशोब चुकता करायचा म्हणून म्हणा किंवा टेकडीवरच्या ईश्वरशेठची पत्नी सगुणा ही आपल्या नात्यातील आहे असं गावकर्‍यांना सांगून ईश्वरशेठच्या खोटयानाट्या गोष्टी सांगून गावकर्‍यांची वाहवा मिळवतो हे सहन होईना म्हणा, हिशोबनीस गावातल्या बोळा-बोळात, चावडीवर हरदासाशी भांडू लागला. हरदासही तसा मुळचा सामान्य गावकरीच होता. परंतू हरदासाचं उपरणं खांद्यावर घेतल्यानंतर त्याला हजार हत्तींचं बळ आलं. आधी हरदासधर्माला जागून शांतपणे वागण्याचा त्याने आव आणून पाहीला. परंतू हिशोबनीस शांत वागून शांत राहणार्‍यातला नाही हे लक्षात येताच हरदासबुवांनी आपलं उपरणं खुंटीला लटकवलं आणि हिशोबनीसाशी टक्कर दयायला तयार झाले. चावडीवर गावकी जमली. खडाजंगी झाली. कुणीच हार घ्यायला तयार नाही. हिशोबनीस एका बाजूला, हरदास आणि काही गावकरी दुसर्‍या बाजूला. गावात अजूनही काही लोक होते ज्यांना टेकडीवरच्या घरात ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती राहते की नाही याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना टेकडीवरच्या घरातून कसलीच मदत नको असायची. त्यामुळे त्यांनी सगुणा किंवा निगुणा यापैकी कुणाशीच कधी काही बोलणं केलं नव्हतं. हे तिसर्‍या गटातील लोकही चावडीवर हजर होते. ईतर गावकरी जरी अधून मधून आपले मत मांडत होते तरी मुख्य वाद हिशोबनीस आणि हरदास यांच्यातच होता. कुणीच माघार घ्यायला तयार होत नाही हे लक्षात येताच पंचांनी गावकीत बोल टाकण्यास बंदी करुन विषय तिथेच थांबवला. सारे गावकरी आपापल्या घरी गेले. एक नुकतंच मिसरुड फुटलेला तरुण मात्र तिथेच होता. तो पुरता गोंधळला होता. त्याने या गुंत्याची उकल करण्याचे ठरवले. तो गेला गावातल्या एका ऐंशी वर्षाच्या वृद्धाकडे. जाऊन प्रश्न केला, "आजोबा, ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते यावर तुमचा विश्वास आहे का?" आजोबा म्हणाले, "त्या टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वरशेठ राहतात की नाही याचा विचार करायची मला कधी गरजच भासली नाही. जेव्हा जेव्हा मी संकटात सापडलो तेव्हा तेव्हा माझा मार्ग मीच शोधला. ईश्वरशेठच्या मदतीवर अवलंबून राहीलो नाही." "तुम्ही सगुणा आणि निगुणा यांना तरी पाहीले आहे का?" तरुणाचा पुन्हा प्रश्न. "सगुणेला खुप वेळा भेटलो आहे. निगुणा मात्र क्वचितच नजरेला पडते." आजोबांनी उत्तर दिले. "सारेच लोक तुमच्याप्रमाणे आपला मार्ग आपणच का शोधत नाहीत?" संभ्रमीत तरुणाने पुढचा प्रश्न केला. "व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. कुठल्याही व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीचा पिंड, त्या व्यक्तीवर झालेले संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून असते. काहींच्या मनावर लहानपणापासून बिंबवले आहे की आपण संकटात सापडलो तर ईश्वरशेठ आपल्यासाठी नक्की काहीतरी मदत पाठवतात. या श्रद्धेपोटी माणसे धडपड करतात. आणि मार्गही सापडतो. मग त्यांना वाटते की ईश्वरशेठनीच आपल्याला मदत केली. लोक काहीही समजोत, मार्ग सापडणे महत्वाचे." "हरदास आणि हिशोबनीस यांच्या मतांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?" "जगामध्ये मतमतांचा गलबला असणारच. कुठलीही गोष्ट पुर्णतः टाकावू कधीच नसते.समोरच्याने एखादी गोष्ट देऊ केली तर ते गोष्ट आपल्याला मानवेल की नाही याची चाचपणी करुन ती गोष्ट घ्यायची की टाकून दयायची हे आपण ठरवायचं असतं. हरदास आणि हिशोबनीस ही दोन्ही माणसं आहेत. माणसांमध्ये असणारे गुणावगुण त्यांच्यात असणारच. ते चार गोष्टी योग्य सांगतील चार गोष्टी चुकीच्या. आपण योग्य गोष्टी घ्यायच्या आणि चूकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या." वृद्धाच्या या उत्तरांनी तरुणाचे समाधान झाले आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

स्वतःच्या हातात सर्व सूत्रे घेण्याच्या धाडसाने गावकर्‍यांमधे प्रयत्नवाद आणि प्रयत्नप्रतिष्ठा हा अत्यंत "उपयोगी" आणि "मदत करणारा" गुण वाढतो.
आणि
अर्थात ईश्वरशेठचं अस्तित्व मानून प्रयत्न करता करता ईश्वरशेठला नाहीसं करणं हीच दिशा असली पाहिजे
या दोन वाक्यात सर्व गावाकर्‍यांच्या सर्व प्रश्नांना एकसाथ उत्तर आणि विचारांना दिशा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार

अर्थात ईश्वरशेठचं अस्तित्व मानून प्रयत्न करता करता ईश्वरशेठला नाहीसं करणं हीच दिशा असली पाहिजे. ईश्वरशेठ हा गणितातला "हातचा" आहे. त्याला गणिताच्या शेवटी एक आकडा म्हणून अस्तित्व राहात नाही.. आणि त्यामुळेच हातचा हा एक खरोखरचा जास्तीचा लाभदायक आकडा आहे असं मनापासून न समजता हातच्याशिवाय गणित करण्याकडे सर्वांनी वाटचाल करावी.
क्लास !!!
बाकी लिहितोस एकदम पॉलिटिकली करेक्ट रे धन्या तू.. !!
आखाडयात कुस्ती खेळण्याची मजा घ्यायची असेल आणि तरीही प्रतिस्पर्ध्याच्या हाती लागायचं नसेल तर मग अंगाला तेल लावूनच आखाडयात उतरावं लागतं. ;)

@आखाडयात कुस्ती खेळण्याची मजा घ्यायची असेल आणि तरीही प्रतिस्पर्ध्याच्या हाती लागायचं नसेल तर मग अंगाला तेल लावूनच आखाडयात उतरावं लागतं. Wink>>> व्वा..व्वा..! =)) हा महा-भारताचा परिणाम मानावा काय? =))

पैलवान पडला तरी उगीच रिंगणात फिरतोयं असाये. मुद्दा समजायला अंगाला तैलमर्दनापेक्षा बुद्धी तैल हवी.
अर्थात ईश्वरशेठचं अस्तित्व मानून प्रयत्न करता करता ईश्वरशेठला नाहीसं करणं हीच दिशा असली पाहिजे. ईश्वरशेठ हा गणितातला "हातचा" आहे. त्याला गणिताच्या शेवटी एक आकडा म्हणून अस्तित्व राहात नाही.. आणि त्यामुळेच हातचा हा एक खरोखरचा जास्तीचा लाभदायक आकडा आहे असं मनापासून न समजता हातच्याशिवाय गणित करण्याकडे सर्वांनी वाटचाल करावी.

चालायचंच! एखाद्याची इश्वरशेठवर (किंवा अस्तित्वाच नसलेल्या गोष्टीवर) इतकी श्रद्धा असते की तो हरप्रकारे ती आहे असं सिद्ध करायचा केविलवाणा प्रयत्न करत राहातो. कधी संतांचा आधार घेऊन, कधी रुपकात्मक कथा लिहून तर कधी विरोधकाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन. त्याला तशाच अंधश्रद्धेचे लोक साथ देतात आणि मग त्याची निराधार धारणा पुन्हा उसळी मारते. आपण किती वेळा आपटलोयं याचं भानच राहात नाही. गविनं इतकं उघड म्हटलंय :
अर्थात ईश्वरशेठचं अस्तित्व मानून प्रयत्न करता करता ईश्वरशेठला नाहीसं करणं हीच दिशा असली पाहिजे
आणि एक स्टेप पुढे जाऊन मी म्हणतो : जो नाहीच त्याला नाहीसं कशाला करायचं? फक्त एक बालिश धारणा सोडली की झालं! अस्तित्वातच नसलेल्या इश्वरशेठचा कुणाला मार्ग म्हणून उपयोग नाही की अडथळा म्हणून धसका घेण्याचं कारण नाही. पण इतकी साधी गोष्ट विद्वजनांना कळेल तर शपथ!

चेंडुफळीधारक मानवाशी सहमत. वटवाघरुमनुष्य-वटवाघ्रुमानवाशी-वटव्याघ्रमानवाशी सहमत.

इश्वर शेठच दुर्गुणा नावाच एक अंगवस्त्रही होत म्हणे! त्याचा पत्ता त्या सुगुणा व निर्गुणा या दोघींनाही नव्हता. म्हणजे ईश्वरशेठ नेच ती करामत केली होती. या गुणाच त्या गुणाला कळू द्यायच नाही.

चालु घडामोडींवर प्रकाश टाकणारा लेख... चालु द्या.

इथे तुम्ही निगुणेला इश्वरशेठची बायको बनवून रूपकातच घोळ घातलाय .. एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे धागाकर्त्याचा कल ईश्वरशेठच्या अस्तित्वाकडे आहे हे स्पष्ट जाणवतयं. जरी आजोबांच्या तोंडुन
जगामध्ये मतमतांचा गलबला असणारच. कुठलीही गोष्ट पुर्णतः टाकावू कधीच नसते
असा संदेश दिला तरी
गावकर्‍यांनी ते सत्व आम्हालाही दाखवा असे म्हटले की तो हजार बहाणे शोधायचा.
अशा वाक्यातून हिशेबनीसाची खिल्ली उडवण्याचाच प्रयत्न दिसला..

इथे तुम्ही निगुणेला इश्वरशेठची बायको बनवून रूपकातच घोळ घातलाय ..
खुपच टेन्शन घेता राव तुम्ही. :)
एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे धागाकर्त्याचा कल ईश्वरशेठच्या अस्तित्वाकडे आहे हे स्पष्ट जाणवतयं.
मी स्वतः निरीश्वरवादी असलो तरी ज्या कुणाला "देवाचा" आधार घ्यावासा वाटतो त्यांना तो घेऊ दयावा या मताचा मी आहे.
अशा वाक्यातून हिशेबनीसाची खिल्ली उडवण्याचाच प्रयत्न दिसला..
नाही. जरी माझा स्वतःचा अनुभव असला तरी त्यांची खिल्ली उडवण्याचा मुळीच उद्देश नव्हता. तत्वतः त्यांची आणि माझी बरीचशी मते जुळतात. फरक आहे तो मत मांडण्याचा.

तत्वतः त्यांची आणि माझी बरीचशी मते जुळतात.
माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण तुमच्या निराधार आणि बालिश धारणा सर्वस्वी तुमच्या आहेत! आणि मी त्यांच्या पूर्ण विरोधात आहे.
फरक आहे तो मत मांडण्याचा.
कशाला उगीच मखलाशी? मला न तुमच्या सहमतीची गरज न तुमच्या शैलीची. आणि भंपक धारणा कितीही निटसपणे मांडल्या तरी इमारत कोसळतेच हे तुम्हाला अनेक वेळा दाखवून दिलंय आणि तुम्ही ते मान्य ही केलंय. विस्मरणाच्या व्याधीमुळे असं होत असावं.

बरेच दिवस चाललेल्या सगुणोपासनेवरील गरमागरम चर्चेवर हा नरम-गरम उतारा होता. कुणाची मापं काढणं किंवा खिल्ली उडवणं असा मुळीच उद्देश नव्हता. तसे कुणास वाटल्यास ती माझ्या लेखनाची मर्यादा समजावी.