हुकूमानुसार मी क्लासला बुट्टी मारून ऑन हर मॅजेस्टी'च्या सिक्रेट मोहीमेवर निघालो होतो(म्हणजे तिच्या घरी निघालो होतो). याआधी इतक्या मोहीमा झाल्या होत्या, पण तरीही 'कधीना कधी तरी आपण पकडले जाणारच' या भितीपोटी नेहमी गडाच्या पायथ्याशी (म्हणजे तिच्या सोसायटीच्या मेनगेटजवळ) आल्यावर छातीत धडधड सुरू व्हायची. तशी ती आजही सुरू झाली. पण 'डर के आगे जीत है, घर के अंदर अकेली मेरी प्रीत है' असं मनातल्या मनात म्हणत मी निधड्या छातीनं जीन्स सच्चिन-स्टाईलमध्ये अॅड्जस्ट करत सोसायटीत शिरायचो. सोसायटीचा विस्तार तसा ब-यापैकी मोठा होता. त्यात मुलांना खेळायला बाग बगिचे, नाना-नानी पार्क, स्विमींग पूल, जिम्नॅशिअम, अशा ब-याच सोयी होत्या तिथे. एरवी या सगळ्याचं खूप खूप आकर्षण वाटलं असतं मला, पण आज त्या सगळ्यांना पुरून उरणारी अशी एक आकर्षक ललना माझ्या येण्याची आतुरतेनं वाट पाहात होती. मी अतिशय उतावीळ झालो होतो पण तरी शांतपणे हळूहळू पावलं टाकत चाललो होतो. कोण्णालाही डाऊट येता कामा नये!! तिच्या शेजारच्या बिल्डींगीतून एक म्हातारे गृहस्थ उतरले. चालत चालत माझ्या दिशेने आले. मी आधी लक्ष दिलं नाही. पण ते माझ्याकडेच रोखून बघतायत असं वाटायला लागलं म्हणून मी तिरक्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. त्याबरोबर ते झपझप पावलं टाकत माझ्याजवळ आले आणि मला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मी गांगरलो. हे काय?? मी त्यांच्याकडे बघत तसाच उभा राहिलो. तेही माझ्याकडे बघत दोन्ही हात जोडून उभे होते. मी त्यांना तथास्तू म्हणावं अशी त्यांची अपेक्षा होती का??? मी बळे बळे चेहरा हसरा केला आणि त्यांनाही दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्याबरोबर त्यांनी त्यांचा मोर्चा पुढे वळवला आणि ते निघून गेले. मी हुश्श... केलं. आता चालत चालत मी तिच्या बिल्डींगच्या अगदी जवळ पोचलो. आत शिरणार तेवढ्यात खिसा वायब्रेट झाला. तीच होती.
'हो अगं येतोय मी बिल्डींगखालीच आहे तुझ्या जरा धीर धरशील की नाही???'
'नाही नक्को येऊस... नशीब मी वेळेत फोन केला...'
'ऑ...?? का काय झालं??'
'अरे दादा आलाय.'
'अरेच्चा?? एवढ्यात कसा काय आला?? रात्री येतो ना एरवी??'
'हो अरे पण त्याची तब्येत बिघडली म्हणून हाफ डे काढून आलाय आज.'
'काय तुझा दादा नेमका आजचाच दिवस मिळाला त्याला आजारी पडायला?'
'बघ ना... सॉरी हं. चल बाय!'
'ए बाय काय मी एवढा क्लास बुडवून आलोय तुझ्यासाठी'
'मग आता मी काय करु दादा आला ना!!'
'अगं मग मी तरी काय करू? तू बोलावलंस म्हणून आलो. आता करू काय चार तास?'
'मग तू परत जा ना क्लासला!!'
'व्वा!! छान!! हे बरंय!! अगं असं कसं लेक्चरच्या मध्येच जाता येईल?? तो प्रोफेसर घेत नाही उशीरा आलं तर!!'
'मग दुसरं काय करणार तू?'
'तू ये खाली!!'
'आत्ता?? एवढ्या उन्हात?'
'काही ऊन वगैरे नाहीये हा... ये गपचूप!! साडेचार झाल्येत आता ऊन ओसरत जाईल.'
'अरे पण एवढ्या लवकर मी खाली उतरले तर डाऊट येईल ना दादाला.'
'दादाला कशाला डाऊट येतोय तो दिवसभर ऑफिसात पडलेला असतो. तू रोज किती वाजता बाहेर जातेस आणि कधी येतेस ते त्याला माहितीये तरी का?? उतर!!'
'उतर काय?? थांब जरा!!'
'आता का थांबू?'
'अरे मला तयार तरी होऊ दे.'
'तयारी कसली करतेस?? ये ना अश्शीच!!'
'चल ए... अश्शीच काय??
'अगं मला भेटायला येताना तू वेळेवर येणं महत्त्वाचं आहे, नट्टापट्टा करून येणं नाही. तू आंघोळ न करता भेटायला आलीस मला तरी मला काही फरक नाही पडणार!! लूक्स डोंट मॅटर टू मी!!'
'ए मी आंघोळ केलीये.. आणि तू तरी येशील का आंघोळ न करता??'
'इतक्यांदा आलोय. कधी कळलं तुला?'
'श्शी... आणि लूक्स तुला मॅटर करत नसतील पण बाकीच्यांना करतात ना'
'कोण बाकीचे?'
'अरे म्हणजे रस्त्यात एवढे लोक असतात ते बघतील ना'
'मग त्यांना मी सुद्धा दिसतोच की!! तरी मी येतो ना असाच??'
'तुझं सोड रे तुला कोण बघतंय? मला बघतात! तू थांब! बिल्डींगजवळ घुटमळू नकोस. पार्कमध्ये जाऊन बस. मी आलेच पंधरा-वीस मिंटात!!'
छान!! म्हणजे अजून हमखास अर्धा पाऊण जाणार माझा. आजच नेमके हेडसेट्स घरी विसरून आलो होतो. आता टाईमपास व्हायचा कसा?? या मुली एवढा वेळ का लावतात तयार व्हायला?? (जाऊदे... तो विषय इथे नको... त्यावर भाष्य करण्याचं धाडस केल्याबद्दल आधीच खूप मार खाऊन झालाय माझा!)
मी वैतागलो. पण उपाय नव्हता! गपचूप तिने सांगितल्याप्रमाणे त्या नाना नानी पार्कात जाऊन एका बाकावर बसलो. पार्क तसा छान होता. एक जॉगिंग ट्रॅक सुद्धा होता. त्या ट्रॅकवर मगाचचे आजोबा हळूहळू फे-या मारत होते. फेरी मारत मारत ते माझ्या बाकाजवळ आले. नमस्कार ठोकला!! मी सुद्धा नमस्कार केला. आजोबांचा चेहरा हसरा होता. पण मला भिती वाटत होती. म्हातारी मंडळी खूप चौकस असतात. अपेक्षेनुसार त्यांनी मी बसलेल्या बाकावर माझ्याच बाजुला बसकण मारली. मी मनातल्या मनात, खोटं नाव, खोटं काम, या कॉलनीत राहणारे खोटे नातेवाईक ठरवू लागलो. पण आजोबा काहीच विचारत नव्हते. चेहरा अजुनही हसरा होता. थोडा वेळ दोघेही स्वस्थ बसून राहिलो. फे-या मारताना मध्येच थकवा आल्याने इथे बसले असतील, थोड्या वेळाने उठून पुन्हा फिरायला सुरुवात करतील असा अंदाज करून मी सुद्धा जरा निर्धास्त झालो. तेवढ्यात,
'क्लासला गेला होतास??'
'अं... हो हो...'
'कुठल्या क्लासला गेला होतास??'
'अं... सीएच्या!!'
'छान!! कुठल्या बिल्डींगीत राहतोस??' मी घाबरलो. ते ज्या बिल्डींगमधून बाहेर आले त्यापासून लांब, दुस-या टोकावर असलेल्या एका उंचशा बिल्डींगकडे बोट दाखवलं.
'व्वा!!'
मग गप्प बसले. इकडे तिकडे बघायला लागले. कुठलं तरी भजन गुणगुणत मांड्यांवर बोटं तबल्यासारखी वाजवायला लागले. शेवटी त्यांनी पुन्हा माझ्याकडे बघितलं.
'किती वाजले??'
'चार चाळीस'
'ह्म्म!! तुमची चहा प्यायची वेळ झाली असेल ना??'
'अं? नाही मी चहा पीत नाही.'
'नाही?? मग कॉफी? तुम्ही हल्लीची मुलं कॉफी पिता ना...'
'नाही मी कॉफीसुद्धा पीत नाही.'
'नाही?? दोन्ही नाही?? मग काय दूध??'
'अं हो... पण मी ते सकाळी आणि रात्री घेतो. संध्याकाळी दूध नाही घेत मी.'
'अच्छा!! चांगलंय!! आम्हाला चहाशिवाय करमत नाही.'
'ओह...'
'अरे... ते बघ... ती कबुतरं बघ कशी मारामारी करतायत!!' त्यांनी शेजारच्या बिल्डींगच्या एका खिडकीच्या छपराकडे बोट दाखवलं. खरं तर तिथे द्वंद्व चालू नव्हतं. पण ते न कळण्याइतपत मी लहान वाटलो असेन कदाचित या आजोबांना. मी आपलं उगाच खोटं खोटं हसून दाखवलं. आजोबा बराच वेळ त्या युगुलाचं
द्वंद्वबघत बसले होते. शेवटी, एवढ्या रोमँटिक प्रणयप्रसंगी आपल्याकडे कोणीतरी टक लावून बघतंय हे कळल्यावर त्यातली कबूतरीण ओशाळली आणि उडून गेली(ती कबूतरीण आहे, हे मी कसं ओळखलं ते विचारू नका). पाठोपाठ नर सुद्धा आजोबांना एक खुन्नस देऊन उडून गेला. आजोबा क्षीण आवाजात हसले. मला गम्मत वाटली. आजोबांनी खरोखर या छोट्याशा दृश्यात स्वतःचं मन रमवलं होतं. त्यांनी त्यातनं आपलं मन बाहेर काढलं, आणि त्यांना मी दिसलो - तुमची चहा प्यायची वेळ झाली असेल ना??' '(अरेच्चा!! पुन्हा तेच) नाही मी चहा पीत नाही.' 'नाही?? मग कॉफी पिता का तुम्ही??' 'नाही मी कॉफीसुद्धा पीत नाही.' 'नाही?? चहा कॉफी दोन्ही नाही?? मग काय दूध??' 'अं हो... पण मी संध्याकाळी दूध नाही घेत मी.' 'अच्छा!! चांगलंय!! आम्हाला तर चहाशिवाय करमत नाही.' 'ओह...' 'किती वाजले?' 'पावणे पाच होऊन गेले.' 'ह्म्म.. म्हणजे वेळ आहे.' - हे स्वतःशीच असावं. थोडा वेळ शांततेत गेला. मग पुन्हा त्यांनी चहाचा प्रश्न विचारला. ते झाल्यावर पुन्हा कॉफी. पुन्हा किती वाजले. मला काही कळेचना!! थोड्या वेळाने 'तुम्ही कुठे राहता??' असंही विचारलं. मी पुन्हा त्याच बिल्डींगकडे बोट दाखवलं. मग जरा वेळाने 'कॉलेजवरून आलास का??' 'नाही क्लासवरून.' 'हो का?? कुठला क्लास??' 'सी ए चा!!' 'सीए करतोयस?? छान छान!! मोठा हो!' मी पुरता गोंधळलो. या आजोबांना अल्झायमर असावा अशी शंका मला आली. मी हर मॅजेस्टीला मेसेज केला. तिचा दहा मिंटांनी रिप्लाय आला - ''अरे थांब इस्त्री करत्येय टॉपला. आणि ते गुप्ते आजोबा असतील. त्यांना अल्झायमर आहे. त्यांचं टेन्शन नको घेऊस त्यांचा काही त्रास नाही, ते चांगले आहेत. थोडं पकवतील, पण तेवढंच! बिनधास्त राहा. आणि ऐक ना जानू -'' पुढचं इथे लिहिण्यासारखं नाही. ;) 'काय आजोबा?? कसं काय? बरे आहात ना??' - एक पंजाबी ड्रेसमधल्या गलेलठ्ठ काकू आजोबांना बघून पार्कात आल्या होत्या. आजोबांनी त्या काकूंना ओळखल्यासारखं करून त्यांच्या चौकशीला जमतील तशी उत्तरं द्यायला सुरुवात केली. काकू सुद्धा आजोबांना तब्येतीशिवाय उगाच जास्त काही विचारत नव्हत्या. पण त्यांचं आजोबांच्या उत्तरांकडे अजिबात लक्ष नव्हतं. आजोबांनी उत्तर दिलं की त्या लगेच दुसरा प्रश्न विचारत होत्या. त्या सारखं माझ्याकडे बघत होत्या. शेवटी त्यांना राहावलं नाही - 'हा कोण तुमचा नातू का??' 'कोण हा?? छे छे!! हा आमच्या बाजुच्या बिल्डींगमधल्या वाळिंबेंचा मुलगा!!' मी चमकलोच पण त्या काकूबाई माझ्याहून जास्त चमकलेल्या दिसल्या. मग त्या जरा अवघडून हसायल्या लागल्या. 'अहो... अहो काहीही काय बोलताय आजोबा... अहो मीच वाळिंबे तुम्ही ओळखलं नाही का??' 'हां?' 'मी-मी वाळिंबें...' 'नमस्कार!! मी गुप्ते!!' 'अहो ते माहितीये मला... हा तुमच्या बरोबर बसलाय तो कोण हे विचारत्येय मी!!' 'हा ना... हा... (आजोबांनी जरा विचार केला) हा नातू माझा!!' मी पुन्हा चमकलो. पण काकूंसमोर मी तसं दाखवलं नाही. त्या आधीपासूनच माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या. मी त्या आजोबांचा नातू आहे, असं ते आजोबा म्हणाल्यावर मी आपली कोणी कोणाशी ओळख करून देताना हसतो तसं त्या काकूंना हसून दाखवलं. त्यांची खात्री पटलेली दिसत नव्हती पण त्याही हसल्या. 'आणि बरं का रे उद्युम्न(कोण हा उद्युम्न आता??), या आमच्या शेजारच्या दिवेकर वहिनी...' आजोबा भलतेच फॉर्मात आले होते. वाळिंबे काकू भलत्याच डिस्टर्ब झाल्या. मला हसायला येत होतं. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. 'आजोबा आज फे-या नाही मारणार वाटतं??' 'अरेच्चा!! त्यासाठीच खाली उतरलो होतो आणि ते राहूनच गेलं की... बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत ती...' असं म्हणून आजोबा फे-या मारायला निघून गेले. ते गेल्यावर वाळिंबे काकू माझ्याकडे बघायला लागल्या. मी हसलो. काहीतरी बोलायला हवं, आपण खरंच त्यांचे नातू वाटायला हवं म्हणून मी म्हटलं, 'हेहेहे... त्यांचं एवढं मनावर घेऊ नका. आजोबांना अल्झायमर आहे ना.. त्यांच्या लक्षात राहात नाहीत गोष्टी.' 'ते माहितीये मला. मी मुलगी आहे त्यांची.' 'ऑ???' मला आता दरदरून घाम फुटायचा बाकी राहिला होता. हे काहीतरी भलतंच. 'मग ते वाळिंबे??' 'कधी कधी त्यांचा आजार सिरिअसली घेण्यापेक्षा त्यांची गम्मत करून बघावी असं वाटतं.' काकूं हसल्या. पण त्या हसण्यात त्यांनी केलेल्या गमतीचा आनंद दिसत नव्हता. 'कसं आहे ना, मी आशु आहे, मी तुमची मुलगी आहे, असं हज्जारदा सांगूनही ते मला वाळिंबेंची सून समजतात... हे वाळिंबे कोण हेसुद्धा मला माहिती नाही. आज विचार केला, की उलटं ट्राय करून बघावं, कदाचित मला ओळखतील!! एवढ्या वर्षांत एकदाही... (इथे त्यांनी एक उसासा सोडला...) जाऊदे... (पुन्हा हसल्या.)' मला खूप वाईट वाटलं. 'म्हणजे ते आपल्या नातवाला सुद्धा ओळखू शकत नाहीत??' काकूंनी एक लाँग पॉज घेतला... 'त्यांचा जावई आणि नातू गेल्याच वर्षी एका अपघातात वारले हे त्यांच्या लक्षात नाहीये. अल्झायमर झाल्याने ते सुखी आहेत...' बापरे!! काकूंचा चेहरा गंभीर झाला. आता कडेलोट होतो की काय अशी मला भिती वाटायला लागली. आजोबांची एक फेरी पूर्ण होत आली. त्यांना जवळ येताना पाहून काकूंनी स्वतःला सावरलं. आजोबा जवळ आले, आणि त्यांनी आम्हा दोघांना नमस्कार केला. मी आणि काकूंनी सुद्धा केला. आजोबा पुढे गेले. 'असो... त्यांनी तुला पकडलेलं पाहिलं मी खिडकीतून.. म्हणून तुझी सुटका करायला आले... जास्त काही वेडंवाकडं बोलले नाहीत ना??' 'छे हो काकू असं का बोलताय?? मला उलट मजा आली...' मी हसत हसत म्हटलं. 'ह्म्म!! लोकांना गम्मत वाटते. गमतीशीरच प्रकार आहे हा खरं तर..' मी ओशाळलो. काय बोलावं कळेना. थोडा वेळ आम्ही तसेच बसलो होतो. आजोबांची अजून एक फेरी पूर्ण होत आली. ते जवळ आले आणि नुसतेच आमच्याकडे बघून हसले. 'काय गं आशु हा कोण?? उदुचा मित्र का??'' 'अरे हो... ते विचारायचं राहिलंच... तू कोण??' काकूंनी मला विचारलं. माझी पाचावर धारण बसली. काय करावं मला सुचेना!! मी एकवार आजोबांकडे बघितलं, मग काकूंकडे बघितलं. माझी पेटली - 'त्यांनी ओळखलं की तुम्हाला!!' काकू डोळे मोठे करून माझ्याकडे बघायला लागल्या. त्यांचीसुद्धा आत्ताच मी सांगितल्यावर पेटली होती. आपल्या वडीलांकडे बघून त्या हसायला लागल्या. त्यांचे डोळे पुन्हा भरून आले होते. पण आता त्यांच्या हसण्यात आणि रडण्यात आनंद होता... निखळ आनंद!! त्या आपल्या वडीलांना बिलगल्या. आजोबा समजावणीच्या सुरात म्हणाले, 'सॉरी सॉरी आशु... तुला त्रास होईल हे लक्षातच आलं नाही बघ. अगं, काय करू येते आठवण अधून मधून नातवाची. तो आपल्यात आता नाही यावर विश्वासच बसत नाही बघ!!' काकू स्तिमित झाल्या. त्या पुन्हा कडकडून आपल्या बापाला बिलगल्या आणि हुंदके देऊन रडायला लागल्या. मला तर सगळं फिल्मीच वाटत होतं. थोड्या वेळाने काकूंनी स्वतःला सावरलं आणि मोर्चा माझ्याकडे वळवला. 'तुझ्यामुळे माझे बाबा इतक्या वर्षांनंतर मला ओळखू शकलेत!! मी तुझे आभार कसे मानू??' 'माझ्यामुळे???????' मला काही कळेच ना!! माझा काय संबंध?? आले त्या आजोबांच्या मना आणि ओळखलं त्यांनी आपल्या मुलीला. मी काय केलं त्यात?? असो. फुकटचं श्रेय मिळालं तर ते नाकारण्यात काहीच अर्थ नसतो. इथे माझी चौकशी थांबली होती. ते महत्त्वाचं होतं. पण आभार प्रदर्शनाच्या निमित्तानं पुन्हा गाडी चौकशीच्या रुळावर येता उपयोगाची नव्हती. काकूबाई प्रेमाने माझे गाल ओढायला लागल्या, माझी दृष्ट काढायल्या लागल्या... आता मला या यांच्या घरी चहाला बोलावतात की काय असं वाटायला लागलं मला. इतक्यात खिसा वायब्रेट झाला. आमच्या बाईसाहेब येत असल्याची ती वर्दी होती. मी मनातल्या मनात हुश्श केलं. फोन उचलला, मेन गेट जवळ थांबण्याची सूचना मिळाली. मी 'ओक्के' म्हणून फोन ठेवला, आणि या बापलेकीचा निरोप घेतला - 'चला काकू, मी निघतो आता...' 'हो हो.. तुला पुन्हा एकदा थँक्यु रे... तुझं नाव काय?' मी काहीतरी नाव ठोकलं. त्यांनी अजुन काही विचारायच्या आत मी आजोबांकडे बघून म्हटलं - 'चला आजोबा, निघतो.' 'हो तू निघ तुझी चहा प्यायची वेळ झाली असेल ना??' मी मनापासून हसलो, 'हो' म्हणालो, आणि पार्कातून बाहेर पडलो. मी हा प्रसंग कधीच विसरणार नव्हतो. ******
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
वडापाव काका गाडी सुस्साट
छान
जबरदस्त!
Mastach
मस्त...
हसता हसता तुम्ही शेवटी गंभीर
मस्त
मस्त लिहीलेय रे!
वडापाव, लिहिण्याची हातोटी फार
त्या पुन्हा कडकडून आपल्या
मस्तच
कथा (की अनुभव?) आवडली.
छान!
मस्तच.
बायदवे..
अरे मला तयार तरी होऊ दे.' 'तयारी कसली करतेस?? ये ना अश्शीच!!' 'चल ए... अश्शीच काय??या वाक्यात आणी आमच्या समजण्यात घो होतोय. खालील प्रश्णाची उत्तरे द्या ... :- १) नायकाने खाली बोलावल्यानंतच नायिकेला चांगले कपडे करावे हे का सुचते ? याचा अर्थ नायकासाठी सुद्धा नटावे असे तिला वाटत नाही का ? नायकाची नायिकेच्या घराच्या आत किंमतच नाहिये का ? का नायक घरीच येणार म्हणून कपडेच फाट्यावर मारण्यात आले होते ? नायक सारखा जीन्स का एडजेस्ट करत होता ? :) (गाव सोडुन पळालेला)बज-या....
ह्म्म
१) नायकाने खाली बोलावल्यानंतच
जबरा.....
सुरेख!
आवडेश !!
सेंटी हो गया
आवडल्या गेले आहे
अनुभव खरा असो वा खोटा, छान
भन्नाट!
आवडली कथा.