Welcome to misalpav.com
लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
bachchan सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं. किशोरने नवीन निश्चलसाठी गायिलेला भाग आनंदी मूडमध्ये होता तर रफीचा आक्रोश अमिताभसाठी होता. जिच्यावर आयुष्यभर प्रेमे केलं ती प्रेयसी दुसर्‍याच्याच प्रेमात आहे हे कळल्यावर उध्वस्त झालेल्या अमिताभच्या हातून गाण्याच्या शेवटी संतापाने दारुचा ग्लास हातातच फुटतो. या नैराश्याला जोड आहे ती रफीच्या धारदार परंतु आर्त स्वराची, मदनमोहनच्या विस्मयकारक संगीताची आणि अमिताभ नावाच्या येऊ घातलेल्या वादळाच्या पोटातील आगीची. ही आग अधुन मधुन “आनंद” चित्रपटात देखिल दिसते. “जंजीर” पासून अमिताभच्या “अँग्री यंग मॅन” चं साम्राज्य हिन्दी चित्रपटसृष्टीत सुरु झालं. या नायकाने दाखवलेला संताप हा त्याच्या पुर्वासूरींपेक्षा फारच वेगळा होता. अन्याय सहन करत असताना व्यवस्थेविरोधी सतत साठत असलेला राग, द्वेष ज्याचा भडका कुठल्याही क्षणी होऊ शकेल अशा प्रकारे हा अंगार पडद्यावर साकार केला गेला.अमिताभला अमाप लोकप्रियता लाभल्यावर या विशिष्ठ तर्‍हेच्या सिच्युएशनचा वापर जवळपास प्रत्येक चित्रपटात झाला. मात्र ज्या तर्‍हेने “दिवार” चित्रपटात हा अंगार वापरला गेला त्याला तोड नाही. म्हणुन या लेखाद्वारे मला असं म्हणायचं आहे की अमिताभच्या कारकिर्दीतला सर्वोच्च पातळीवरचा “अँग्री यंग मॅन” हा “दिवार” (१९७५)चित्रपटातच साकारला गेला.या आधी आणि नंतरही त्याने “अँग्री यंग मॅन” साकारले पण या सम हाच. पुढे जाण्याआधी एक गोष्ट येथेच स्पष्ट केलेली बरी. हा लेख “दिवार” चित्रपटाबद्द्ल नाही. त्या चित्रपटातील एका कालखंडाबद्दल आहे. निळा गणवेश घातलेला, खुरटी दाढी वढवलेला, संपूर्ण व्यक्तीमत्वातच राख वर पडलेल्या निखार्‍यांप्रमाणे धग दाबुन ठेवलेला, ओझी उचलणारा डॉक मधला हमाल अमिताभ या लेखाचा नायक आहे. त्यानंतरचा सुटाबुटातला, स्मगलर झालेला अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिला आहे. त्याचा विचार येथे केलेला नाही. चित्रपटाच्या सुरुवातीलाच युनियन लिडर असलेल्या अमिताभच्या वडीलांना कामगारांशी गद्दारी केल्याच्या आरोपावरुन कामगारांकडुन मारहाण होते. कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी ते मालकांशी तडजोड करतात.मात्र हा अपमान सहन न होऊन ते परागंदा होतात. येथुन त्या कुटंबाच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतात. समाजाकडून होणार्‍या कुचेष्टा, हेटाळणी, अपमानांना मर्यादा राहात नाही. लहानग्या अमिताभच्या हातावर “मेरा बाप चोर है” हे गोंदलं जातं. एका झंझावाताची ही नांदी असते.वय वाढतं तसा हा द्वेष सघन होत जातो. अमिताभची “एंट्री” च मुळात देवळाच्या बाहेर बसलेला दाखवुन झाली आहे. हमालाचा निळा गणवेश घातलेला, देवावर विश्वास नसलेला, गप्प बसलेला हा तरूण पोटात ज्वालामुखी दडवुन आहे याची सुजाण प्रेक्षकांना तत्काळ कल्पना येते.पुढे गूंड हप्ता मागायला येतात. तो न दिल्याने एका साथिदाराचा अपघातात मृत्यु ओढावतो. ही उंटाच्या पाठीवरली शेवटची काडी ठरते. अमिताभ हप्ता न देण्याचं ठरवतो. आणि त्यानंतर ती गोदामातली प्रसिद्ध हाणामारी होते. आपल्याकडे हाणामारीच्या दृश्याकडे पाहण्याची प्रेक्षकांची दृष्टी चमत्कारीक आहे. काही फक्त देमार चित्रपटाचे प्रेक्षक असतात. काहींना वास्तवाशी कसलाही संबध नसलेली हिंसक दृश्ये आवडतात. बर्‍याचशा दक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणारी नारळाच्या बागेत अर्ध्या लुंग्या लावुन चाललेली हाणामारी देखिल चवीने पाहणारे प्रेक्षक असणारच. (यात नायकाच्या एकेका फटक्यात माणसे उंच आकाशात उडतात आणि गरगर गिरक्या घेत खाली कशावर तरी आदळतात.)तर काहिंना हे सारेच खोटे वाटते. मात्र “फाइट” सीन चांगला होण्यासाठी उत्तम अभिनयाची आवश्यकता असते, तो सीन जर चांगला झाला असेल तर त्यात काम केलेल्या अभिनेत्यांनी चांगला अभिनय केलेला असतो हे बहुधा प्रेक्षक मंडळी विसरलेलीच असतात. मारामारीचा अभिनयाशी संबंध काय??? पण “दिवार” मधील हे गोदामातील हाणामारीचं दॄश्य बारकाईने पाहिलं तर जाणवेल कि अमिताभच्या प्रत्येक हालचालित अभिनय भरला आहे. त्या त्वेषाचं “बेअरिंग” त्याने शेवटपर्यंत टिकवलं आहे. गुंड अमिताभला शोधत गोदामात येतात आणि तो बर्फाळ थंड पण अंगावर काटा उमटवणारा आवाज त्यांच्या कानावर पडतो. “पिटर…. तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूं”. पुढचं वर्णन करण्यात अर्थ नाही. ते पाहायलाच हवं. हातात फावड्यासारखं काहीतरी गावल्यावर अमिताभ प्रत्येकाला तो खाली पडेस्तोवर हाणत राहतो.सत्तरच्या दशकाच्या मानाने हे दृश्य अतिशय हिंसक आहे. मात्र त्याने कथा पुढे जाते. ते ठिगळ जोडल्यासारखं किंवा काही प्रेक्षकांची सोय करण्यासाठी टाकलेलं नाही हे जाणवतं. गळ्यात दोरखंडाने जेरबंद केलेला अमिताभ त्वेषाने दोन्ही बाजूंना खेचुन एकमेकांवर आपटतो हे अतिरंजित वाटत नाही केवळ अमिताभच्या अभिनयामुळे. हा सीन कमालिचा नैसर्गिक वाटण्यात अमिताभच्या अभिनया बरोबरच दिग्दर्शक यश चोप्रा , पटकथाकार सलिम जावेद, संगीतकार आर. डी. बर्मन आणि फाइट कंपोजर शेट्टीचाही हात आहेच. युनुस परवेझचा (हा एक अतिशय कसलेला अभिनेता) रहीम चाचा, मास्टर अलंकार (लहानगा अमिताभ)निरुपा रॉय, शशी कपूर या सार्‍या सहकलाकारांच्या अभिनयानेच अमिताभमधील द्वेष जास्त गडद वाटु लागतो. त्यांच्या अगतिकतेच्या, आदर्शवादाच्या आणि मध्यमवर्गिय विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर हा संताप आणखि अधोरेखित होतो. अमिताभला “दिवार” मध्ये सुरुवातीपासून पाहताना ह्या ज्वालामुखीचा केव्हा आणि कसा स्फोट होणार हे पाहण्याच्या उत्सुकतेने प्रेक्षक बसलेला असतो. तो जवळपास अमिताभमयच झालेला असतो. त्याच्या सार्‍या निराशा, व्यवस्थेविषयीची चीड त्याने अमिताभला दिलेली असते. अमिताभच्या गुंडांवर हाणल्या जाणार्‍या प्रत्येक जोरकस फटक्यागणिक प्रेक्षकाच्या संतापाचा निचरा होत असतो. शेवटी लढाई जिंकुन अमिताभबाहेर येतो. त्याचे सहकारी हमाल त्याचा जयजयकार करतात्.आणि हा त्यांच्या काँडाळ्यातुन बाहेर पडुन नळाकडे जातो. नळ चालु करुन पाण्याच्या धारेखाली डोकं धरतो. त्याच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला तात्पुरतं का होईना शांत करण्यासाठी, काबुत ठेवण्यासाठी. आणि अशा तर्‍हेने एका परिपूर्ण दृश्याची सांगता होते. अतुल ठाकुर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सुपरलाईक. हे सगळं आवडण्यासाठी आवश्यक आदर्श परिस्थिती... जवळपास समाजवादी नि कम्युनिस्ट भारत, गोदी, गिरणी कामगार नि त्यांच्या जोडीला अनेक बेरोजगार स्मगलिंगचं आकर्षण होतंच्च. फुल्ल राडा. आवडलंय.

मला आतापर्यंत केवळ एकमात्र, अतिशय आवडलेला अभिनेता ! अजुन एक प्रसंग मुक्कद्दर का सिकंदर मधील .. ओ साथी रे ..तेरे बिना बी क्या जीना...हे गातो तेव्हा तो केवळ माइक समोर पुर्ण गाण्याच्या प्रसंगात फक्त उभाच आहे. त्याचे डोळे च फक्त अभिनय करत असतात.

हा त्यांच्या काँडाळ्यातुन बाहेर पडुन नळाकडे जातो. नळ चालु करुन पाण्याच्या धारेखाली डोकं धरतो. त्याच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला तात्पुरतं का होईना शांत करण्यासाठी, काबुत ठेवण्यासाठी. आणि अशा तर्‍हेने एका परिपूर्ण दृश्याची सांगता होते.
हा, तुम्ही म्हणताय तो सीन मार्लन ब्रान्डो च्या on the waterfront मध्ये हुबेहूब आहे. म्हणजे,, त्यात 'अस्सल' काही नाही.. :)

सर्जीयो लिऑनच्या अनेक चित्रपटांमधील काही दृश्ये "शोले" मध्ये आहेत. तरीही त्या चित्रपटाच्या आस्वादात बाधा आलेली नाही. या लेखात अस्सल, नक्कल हा भाग चर्चिलेला नाही. अमिताभने हा सीन अत्यंत परिणामकारकरित्या वठवलेला आहे इतकेच आमचे म्हणणे.

अमिताभ ज्या पद्धतीने तोंडात बिडी धरतो तिथुनच हि धग जाणवायला सुरुवात होते. खत्तरनाक.

लेख आवडला . मला अमिताभचा शराबी जाम आवडतो . त्याच्या एवढा अभिनय आधी किवां नंतर कुणालाच जमला नाही .

मारमारीचा सीनच्या आधीचे सीन पण दमदार आहेत... त्या हमालाचा मृत्यू... करीमचाचाचा हताश डायलॉग "लोग केहेते है जमाना बदल गया. शायद बदल गया होगा. मैने तो सिर्फ हफ्ता लेनेवाले बदलते देखे है.." आणि मारामारीनंतरचा निरुपा रॉय बरोबरचा सीन... त्यातले डायलॉग पण कमाल... "अगर तुम्हे पता था कि वो लोग तुम्हे ढूंड रहे है तो वहाँ जाने कि जरूरत क्या थी?" "तो तुम क्या चाहती हो कि मैभी मूह छुपाके भाग जाता?" सगळेच डायलोग एकसे एक

युनुस परवेझचा करीमचाचा खासच. आपल्याकडे असे छोट्याशा रोलमध्ये भाव खाउन जाणारे कित्येक कलाकार आहेत नाही? शोलेत हंगल साहेबांचा सीन :)

अभिनेता आणि कुशल दिग्दर्शक.. याबाब्त अमितभच्या रुपेरी कारकीर्दीवर आढावा घेणारा लेख "चंदेरी" पाक्षीका आला होता. अमिताभच्या पन्नाशी निमित्त. त्यात अमिताभच्या वक्तशीर पणाबद्दल यश चोप्रांचा अभिप्राय वाचनीय आहे. दिवारचे वेळीसच "शोले" करिता अमिताभ बेंगलूरू येथे चित्रीकरणास येऊन/जाऊन करीत असे, परंतू दोन्ही चित्रपटाच्या कामावर्/कामाच्या दर्ज्यावर या धावपळीचा परिणाम होऊ दिला नाही. (हा अंक माझ्या संग्रही आहे)

एकेकाळी हा चित्रपट एवढा आवडायचा की अमिताभ सोबत मीपण डायलॉग म्हणायचो, जवळजवळ पुर्ण पिक्चरभर.. ;-) नंतरच्या चित्रपटांत "अँग्री यंग मॅन" चित्रपटांत थोडा भडकपणा आला, तरी दिवारमध्ये अमिताभने वठवलेला स्मगलर त्याच्या थंडपणामुळे, अंडरस्टेटमेंट मुळे जास्त भावतो. तो डावरसेठसोबतचा "मैने बचपनमें एक कहानी सुनी थी" वाला सीन आठवा.. चित्रपटात त्याच्या हातात जेव्हापण रिव्हॉल्वर आलंय, तेव्हा त्याने ते एखाद्या खेळण्यासारखंच हाताळलंय. भोगलेल्या दु:खाचा, संतापाचा गोठलेला थंडपणा अत्यंत ताकदीने दाखवलाय अमिताभने.. लेख आवडला, ठाकुरसाहेब..

दीवारनंतर अमिताभचे अँग्री यंग मॅन वाले सिनेमे एका टाईपचे व्हायला लागले हळूहळू. पण जंजीर, दीवार शोले हे तीन खासच!

अतुलदा छोटा वाटला हो लेख.. अजून चार पॅराग्राफ तर बनत होते हो दिवारमधल्या अमिताभसाठी.. :) बाकी शतप्रतिशत सहमत, अमिताभची (किंवा कोणाचीही म्हणा, एकच) अँग्री यंग मॅन म्हणून यापेक्षा भारी भुमिका नाही.. अँग्री यंग मॅनपेक्षाही तुम्ही वापरली ती राख बसलेला धगधगता निखार्‍याची उपमा अगदी चपलख बसते.. आजही मला क्या डायलॉग मारा बोले तो दिवारच आठवतो... जो पिछले बीस साल मे नही हुवा वो कल होगा, कल और एक कुली हप्ता देने से इन्कार करेगा.. तुम लोग मुझे वहा ढूंध रहे थे और मै तुम्हारा यहा इंतजार कर रहा था.. आज खुश तो बहोत होगे तुम.... जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ.. मेरे पास गाडी है बंगला है.... तुम्हारे पास क्या है...??? ( यानंतरच मेरे पास मा है ऐकण्यातली मजा ! ) मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता.. मेरे साथ सिर्फ मेरी तकदीर होगी.. सुना है लिफ्ट के दिवारोंके कान नही होते.. मै किसीसे दुश्मनी करता हू तो सस्ते मेहंगे की पर्वाह नही करता.. अगर इसे मजाक समझा तो तुम बहोत पछताओगे....... काही छोटे मोठे कोणलातरी दिलेल्या प्रत्युत्तरात मारलेले डायलॉग तर सिनेमातच ऐकण्यात मजा.. क्लास बेअरींग खर्रेच ! त्या निळ्या शर्टाबद्दल काय बोलावे.. मी डिप्लोमाला असताना माझ्याकडे एक त्याच शेडचे निळे शर्ट होते, जे त्याची खालची दोन बटणे सोडून पुढे गाठ मारून मी फिरायचो.. अमिताभ वाटायचो कधीच नाही ती गोष्ट वेगळी.. अमिताभने तर स्वताबरोबर शशी कपूरला सुद्धा त्या सिनेमात एका उंचीवर नेऊन ठेवला.. किंबहुना आजची पिढी शशीकपूरला त्यासाठीच ओळखत असली तरी नवल नाही.. अश्याच सिमिलर भुमिकांमध्ये दिवार नंतर मला तो त्रिशूलमध्ये देखील आवडलेला... भले दिवारची उंची गाठणे अशक्य होते.. पण उल्लेख करावासा वाटला सो केला :) एक दिवारचा अमिताभ आणि एक शराबीचा शराबी अमिताभ, हे दोन त्या त्या भुमिकेचे बेंच मार्क आहेत..