या खिडकीशी मी असा एकटाच बसलेला असतो.खिडकीचा कट्टा चांगला रूंद आहे. त्यामुळे अंगाचं मुटकुळं करून मला तिथे छान बसता येतं. ही खोली तशी घरातल्या एका बाजूला आणि खिडकी तर आणखीनच एका कोपऱ्यात. त्यामुळे घरात वावरणाऱ्यांना मी दिसत नाही नी मला ते! करायचंय काय म्हणा दिसून तरी! मी बोलतो ते त्यांना पटत नाही अन् ते बोलतात ते मला पटत नाही. घरातले काय न् बाहेरचे काय, माझं बोलणं पटेल असं भोवताली कोणीच दिसत नाही मला. मग बोलायचं तरी कुणाशी?
कधीतरी वाटतं एकटा आहे मी, अगदी एकटा! या संपूर्ण जगात माझं असं कुणीच नाही. मी ज्याच्याशी अगदी मन उघडं करून बोलेन, ज्याला ते सगळं कळेल, पटेल, असं कुणी कुणी नाही. इतकं इतकं दाटून येत मनात, पण सांगणार कुणाला? ऐकणार कोण? समजून घेणार कोण आणि माझ्या वेदनेवर फुंकर घालणार कोण? मग काय, शेवटी मी अन् माझी डायरी अन् ते पेन! कुरकुरत का होईना, पण बिचारं म्हणेन तसं चालत राहातं. खूप दाटून आलं की घेतो डायरी आणि खरडतो काहीतरी! पण मग लपवून ठेवतो ती. कपाटाच्या पार खालच्या कप्प्यात. जुन्या कपडयांच्या बोळयांच्या अगदी तळाशी!
मधूनच केव्हातरी आई येते अन् कपाटातले कपडे काढून घेते, धुवायला म्हणे! धुतले काय अन् न धुतले काय? काय फरक पडतो? मला कुठे जायचंय बाहेर, झकपक पोषाख करून? बारा महिने तेरा काळ मी हा असा घरातच असतो हल्ली. नाही म्हणायला महिना दीड महिन्याने त्या डॉक्टरांच्या क्लिनिकमधे जावं लागतं. तसं आपुलकीने बोलतात ते न् ऐकतात खरे, पण माझ्या बरोबर लक्षात आलंय, ही आपुलकी म्हणजे नं सगळी नाटकं आहेत नाटकं! माझ्याशी समजुतीनं बोलतात न् मग काहीतरी निमित्त काढून मला बाहेर पाठवतात. मग आई-बाबांशी बराच वेळ चालतं त्यांचं गुफ्तगू! काय कट शिजत असतो त्यांनाच ठाऊक. निश्चित कळायला मार्ग नाही, पण ही लक्षणं बरोबर नाहीत!
तुम्हाला सांगतो, पहिल्यापासून यांचं हे असंच आहे लक्षण! एवढासा असल्यापासून पाहतोय ना यांना! मी पहिला अन् शिरीष दुसरी. म्हणे शिरीषाच्या फुलासारखी नाजूक म्हणून नाव शिरीष! मीही होतो एवढासाच, जेमतेम तीन-चार वर्षांचा! पण ही बया आली मागून आणि मी एकदमच मोठा झालो. मी काहीही मागितलं, काही नाकारलं, जरा गंमत केली तरी यांचं सुरू, तू मोठा ना? तू दादा ना? तू शहाणा ना? राग आला की मात्र हे मोठे, मी लहान! काही चालायचं नाही त्यांच्यापुढे. मग यायचं रडू! पण पुन्हा मी मुलगा, पुरुष ना? तेव्हा मी रडलो की हे म्हणणार, 'रडतोस काय मुलीसारखा?' हे असं! मग करणार काय? बसायचो त्या कोपऱ्यात फुरंगटून, तासन्तास!
तरी बरं, आजी असायची मधुनमधून. ती असली की मी तिच्या मागे मागे असायचा. पूजा करायला बसली की छान छान स्तोत्रं आणि भजनं म्हणायची, सुरेल गळयानं आणि नेमक्या लयीनं. मधूनच माझ्याकडे पाहून गोड हसायची. मी एक एक फुल द्यायचो तिला निवडून, मग मी सांगेन त्या त्या देवाला ती ते ते फूल वाहायची. पूजा झाली की नैवेद्याची वाटी द्यायची माझ्याकडे, मग तो प्रसाद सर्वांना वाटायचं काम माझं असायचं. मजा!
मला कुशीत घेऊन ती गोष्टी सांगायची तेव्हा तर मोठीच गंमत व्हायची. एकापाठोपाठ एक खूप गोष्टी सांगायला लावायचो मी. ऐकता ऐकता एक्साईट व्हायचो; झोपच उडायची माझी अन् बिचारी आजी मात्र दमून जायची. तिलाच झोप यायला लागायची. डोळे जड होऊन मिटायला लागायचे अन् जीभ अडखळू लागायची. मग ते बोललेलं काहीच्या काहीच ऐकू यायचं. शेवटी मी तिला तसंच झोपू द्यायचो न् मग पुढची अर्धी राहिलेली गोष्ट माझा मीच मनातल्या मनात पुरी करायला लागायचो. त्या नादात कधी मला झोप लागायची ते कळायचंच नाही!
बिचारी आजी! अजून येते मला भेटायला, पण लपूनछपून, चोरून! कधी कधी रात्री केव्हातरी जाग येते तेव्हा असतेच जवळ ती. तिच्या डोळयातल्या चांदण्या मंद मंद लुकलुकतात. जर्दाळूसारखे सुरकुतलेले, विसविशीत हात तसेच माझ्या अंगावरून टाकलेले असतात. तिच्या अंगाला तो विशिष्ट असा लहान बाळासारखा दुधाचा वास येतो; कायम दूध लावून आंघोळ करते ना ती? वाससुध्दा जाणवतो मला. अजूनही लहर आली की मी म्हणतो तिला,
'आजी, गोष्ट सांग न एक.'
तर मग हसते न् म्हणते, 'चल, वेडा कुठला! बी. कॉम्. झालेला मुलगा तू, पंचविशीचा. अन् गोष्ट कसली सांग म्हणतोस रे?'
मी वाद घालतो तिच्याशी, 'मोठे मोठे लोक जात नाहीत का कथाकथन ऐकायला? मग मीच काय केलंय पाप?'
असं आमचं बोलणं सुरू झालं की आई येते उगीचच विचारते, घाबरीशी 'बोलतोयस कुणाशी?', म्हटलं आजीशी, तर पटत नाही. म्हणते,
'अरे आजी कशी येईल? तिला जाऊन झाली न किती वर्षं?'
म्हणजे पहा आता कसं आहे ते! अरे, यांच्या डोळयांना दिसतं तेवढंच खरं असतं का? अन् यांच्या डोळयात मावेल तेवढंच जग असतं का? पण नाही, यांचं एकच, 'तुला भास होतायत.'
दोन-चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. मावशी आली होती दोन दिवस रहायला. पाणी प्यायला जातो स्वयंपाकघरात तर दोघींची खुसफुस चालू. आई सांगत होती, 'काहीच्या काही भास होतात त्याला अन् तसं सांगितलं समजावून तर माझ्यावरच चिडतो बघ. काही समजत नाही.' हं, हे बरोबर आहे. यांना समजत नाही, हेच खरं. पण म्हणणार मात्र, 'याला काही समजतच नाही.'
मात्र एक अगदी खरं खरं कबूल करायचं तर - तिचं रियाचं - वागणं काही मला समजलं नाही. रिया, मी चौदा-पंधराचा असताना शेजारी राहायला आलेली, माझी सखी! वास्तविक ही आमच्या शिरीषच्या बरोबरीची, म्हणजे त्या मैत्रिणी व्हायच्या खऱ्या! पण पाहावं तेव्हा यांची भांडणं. मैत्री नावाला, भांडणासाठी निमित्त देण्यापुरती, अन् त्यांची भांडणं सोडवायला मी! त्यातून शिरीषचं रागावणं-रुसणं वाढायचं. रियाशी मात्र माझे सूर जुळत गेले.
वय वाढत होतं. तसं शरीर उमलून येत होतं. हिरवंकंच झाल्यासारखं वाटत होतं. त्यातून काही नवीनच जाणिवा जाग्या होऊ लागल्या होत्या. रंगीबेरंगी फुलं फुलल्यासारख्या! रिया भोवती असली की भर दुपारीसुध्दा कोजागिरीसारखं प्रसन्न वाटायचं. तिच्या हसण्या-बोलण्याने अंगावर मोरपीस फिरायचं. तिच्या डौलदार हालचाली पाहाताना पापणीसुध्दा मिटू नयेसं वाटायचं. कमरेवरून खाली रूळणारा तिच्या वेणीचा शेपटा मला झुलवत राहायचा. तिचे गोबरे गाल नजर खिळवून ठेवायचे. त्या गालांचे गालगुच्चे घ्यायला हात शिवशिवायचे. एकत्र वावरताना सहजपणे तिचा स्पर्श घडला की तेव्हा तर ताठरल्यासारखं व्हायचं. मी चोरून तिच्याकड पाहायचो. तिच्या अंगोपांगांवरून दृष्टी फिरत राहायची. मग मलाच अवघडल्यासारखं वाटायचं. ती मात्र फुलपाखरासारखी भिरभिरत असायची. चिमण्यांसारखी चिवचिवत असायची. ती डोळयांसमोरून गेली तरी तिच्या हालचालींची भूल मनाला पडलेली असायची. मनात तिची ती मागे मुरडून पाहणारी पाठमोरी आकृती तरळत राहायची.
तिला याची जाणीव होती का, ते मात्र कळत नव्हतं. पण असली पाहिजे. ती पण वयात आलेली होती. इतर मुलांशी फटकून वागत होती. पण माझ्यावर मात्र एवढा विश्वास, एवढा हक्क! नक्कीच! हेच तर 'ते' असतं! तिच्या बोलण्याने, हसण्याने, नजरेने प्रत्येक प्रतिक्रियेने मनाची खात्री पटत चालली. पण पुन्हा वाटायचं, मनाची खात्री म्हणजे काय, ते मनाचे खेळ, आपलंच wishful thinking सुध्दा असू शकतं. तेव्हा या वाटण्याचा उपयोग नाही. खरोखर, शहानिशा व्हायला हवी होती एकदा तरी! ती कशी करून घ्यावी? मोठाच प्रश्न होता. अभ्यासातले प्रश्न राहिले बाजूला, याच प्रश्नाचा ध्यास लागला. सतत तिचे शब्द ऐकायला कान टवकारलेले, तिला पाहायला डोळे आसुसलेले आणि स्पर्शासाठी अंगअंग!
जीव वेडा झाला होता, पण कुणालाही काही सांगता येत नव्हतं. काय करावं? कसं करावं? योग्य संधी मिळायला हवी होती. खरं तर तशी संधी कितींदा मिळालीसुध्दा, पण धीर होत नव्हता माझा. एकदा तर -
एकटाच होतो त्यादिवशी घरी. रिया आली शिरीषकडे काम होतं म्हणून. पण ती नव्हती, मग आम्हीच दोघं बोलत बसलो. मी काही गमतीचं बोलत होतो आणि ती हसत होती. खूप हसत होती, खळखळून, मान मागे झोकून, ओठांवर तळवा ठेवून. तिचे ते विभ्रम मी पाहात होतो. हसताना गदगदणारं तिचं अंग पाहात होतो आणि ते पाहता पाहता माझी कानशिलं तापली. अंग ताठरलं. छाती धडधडायला लागली. असं वाटलं, तिच्यासकट ते सगळं हसणंच घट्ट कवळून घ्यावं. मला वाटलं, मला आता राहावणारच नाही. घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. मी एकदम उठलो आणि घराबाहेर आलो. रियाही पाठोपाठ आली. आश्चर्याने तिने विचारलं, 'काय रे, झालं काय एकदम तुला?'
'काही नाही, आत उकडत होतं ना, म्हणून तिची नजर टाळत मी कसाबसा बोललो. खांदे उडवत तिने मान वेळावली आणि तिच्या घरी निघून गेली, नेहमीसारखी मागे मुरडून पाहात.
एकीकडून हुश्श वाटलं मला. बरं झालं बाहेर निघून आलो ते. नाहीतर थप्पड खावी लागली असती. असंही वाटत होतं, तर दुसरीकडून तिला आठवत होतो. तिच्या सहवासाची स्वप्नं कल्पनेनेच रंगवत होतो. मग एकदा शिरीषकडून कळलं, तिच्याच वर्गातला एक मुलगा आणि रिया...!
मला ऐकवेना. विश्वास ठेवू नयेसं वाटू लागलं, पण शिरीषची खबर पक्की होती. मन इतकं सैरभैर झालं! मीच वेळेवर बोलायला हवं होतं. माझ्या भावना व्यक्त करायला हव्या होत्या. आता काय? आता बसा कुढत! स्वत:लाच दोष देत राहिलो. मग चिडून आपल्याच थोबाडीत मारून घेतल्या. खोलीतल्या वस्तूंची फेकाफेक केली. रडलो, रडलो आणि शेवटी थकून गेलो. वाटलं, सगळं जग हसतंय मला, माझ्या बावळटपणाला, भेकडपणाला, नामर्दपणाला! किती दिवस हे असं चाललं होतं कोण जाणे. अगदीच असहय झालं तेव्हा डायरी घेतली अन् डोक्यावरचं ओझं उतरवलं उरातला बाण उपसून जणू रक्ताने लिहिलं -
ती एक काळरात्र
त्यात ते दु:स्वप्न!
ते चेहरे घोंगावणारे
ते हात सरसावलेले
जिभा विखार ओकणाऱ्या
आणि ते डोळे आरपार भेदून जाणारे
कळलंच नाही कधी मी भक्ष्य झालो
लक्ष्य झालो, माझ्या स्वप्नांसह
मी जीर्णशीर्ण माझे तुकडे इतस्तत:
किती वेचू, कसे वेचू?
भिरकावले जाताहेत या हातातून त्या हातात
हुर्रेर्रेच्या गदारोळात...
मी आता कुठेच बाहेर जात नव्हतो की घरातही कुणाशीच काही बोलत नव्हतो. जेवणा-खाण्याचाही धड पत्ता नव्हता. अकरावीचं वर्ष असंच वाया गेलं. डॉक्टर, औषधं, तपासण्या हे असलं सगळं सुरू झालं अन् म्हणे समुपदेश! अरे, मला जे हवं होतं, जे माझं होतं, जे हरवलं होतं, जे हिरावून घेतलंय कोणीतरी ते देताय का? देऊ शकणार आहात का? औषधं कसली देताय अन् ते समुपदेश कसले करताय? खूप राग यायचा सगळयांचा. आदळआपट, तोडफोड करायचो, पण माझ्या आतली आग शमत नव्हती. कुणालाच ती कळत नव्हती. पण, पण मलाही नीट सांगता येत नव्हतं म्हणा! दोष तरी कुणाला द्यावा?
एकटाच बसून असायचो. कधी कुढत, जळत, तळमळत. तर कधी रियाच्या स्वप्नांत गुंग. मी असा सतत एकटेपणात गुरफटलेला. म्हणून आई-बाबा काळजी करायचे. हळहळायचे. सर्वांबरोबर मी बसावं, असावं म्हणून प्रयत्न करायचे. टीव्हीवरचे काही कार्यक्रम पाहायला हाका मारायचे. पण मी जाम दाद देत नव्हतो. दार बंद करून बसायचो. कधी खरडायचो काहीतरी -
हळहळते कोणी, चुकचुकते कोणी
एकाकीपण...
ही काय मोठीं नवलाई?
भरल्या घरात, गजबजल्या रस्त्यातही सारेच एकाकी
एखादा क्षण सोबतीचा
सुळकन सुटतो हातचा चपळ मासोळीसारखा
आणि पुन्हा सोबत करते
एकाकीपणच ना ते?
सुखात सगळे, वेदना एकटी
हीच ना जगरहाटी?
तरी हे एकाकीपण, किती गरजू
किती प्रामाणिक!
अशी या एकटेपणाचीच सोबत होती मला कित्येक दिवस. मात्र या एकटेपणाचा आणखी एक लाभ झाला. मी एकटा उदास बसलोय हे पाहून रिया मला भेटू लागली, अधुनमधून.
मी नेहमीसारखा खिडकीत बसलेला, तर रिया खाली, रस्त्यावरून चाललेली असे. माझ्याकडे वर पाहून हसायची. मी हात हालवून प्रतिसाद दिला की तीपण हात उभारायची हसून. क्षणातच त्या हातांचे परीसारखे पंख होऊन जायचे. मग त्या पंखांसह झुलत ती वरती झेप घ्यायची. या खिडकीच्या नक्षीदार जाळीतून सहज आत शिरायची अन् पंख अलगद मिटून माझ्यासमोर बसायची, माझ्यासारखंच मुटकुळं करून! मला हसू फुटायचं आणि तीही हसायची डोळे मिचकावून. माझा हात हातात घेऊन त्यावरून आपली गोरीपान, तांबूस, मुलायम बोटं फिरवीत राहायची. आपली ती खट्टयाळ नजर माझ्यावर रोखून काहीतरी मधाळ बोलायची.
घरात कुणालाच सांगितलं नाही मी हे, पण आजीला मात्र हे ठाऊक आहे. खाली रस्त्याच्या कडेला उभी राहून ती आमचं कौतुक पाहात असते. ती मात्र अशी परीसारखी इथे येऊन बसत नाही. ती आपली मला थोपटून झोपवते. कधी मी खूपच अस्वस्थ असलो की अगदी हाक न मारतासुध्दा धाऊन येते.
तसं म्हटलं तर एकटेपणा आणि अस्वस्थता हे जोडीनेच सोबत करीत असतात मला. त्यातच आता तो कंटाळाही सामील झालाय. हे सगळेजण असे डोक्यावर बसले की बोलतो आपल्या माझ्या डायरीशी-
रोज तोच सूर्य
तेच चटके भगभगीत
तोच अंधार बुळबुळीत
तेच तेच कावळे तीच बेसूर कावकाव
त्याच कळकट छपराखाली
रोज तोच खेळ
वाटतं एकदा तरी सूर्याने व्हावं अंगार
जाळून टाकावा हा संसार भंगार
मग अंधाराने व्हावं शीतल आल्हादक
नाहीतर यावेत अंगावर
अक्राळ विक्राळ भयंकर प्राणी
थिजवून, संपवून टाकणारे
कि त्यापेक्षा...
आपणच उडवून द्यावं हे छप्पर जुनाट
अन् झेप घ्यावी स्वर्गात... रियासह!
हे लिहिलं, वाचलं, पुन्हा वाचलं. वाटलं, आपल्याला आत्महत्या करण्याची इच्छा तर होत नाहीय? कंटाळा येतो खरा जगण्याचा, एकटेपणाचा, पण आत्महत्या? नाही बुवा, मी नाही करणार असं. नाहीय आवडत असं मरण ओढवून घेणं. खरं म्हणजे मला जगायचंय, खूप जगायचंय, खूप आनंद घ्यायचाय, जगण्याचा, जगाचा, प्रत्येक क्षणोक्षणी! रिया तर हवी आहेच अन् आजीपण! खरं म्हणजे आई-बाबा अन् शिरीषपण वाईट नाहीयत. त्यांनापण हवा असतो मी आणि मलाही ते. पण मला काय हवंय, काय नकोय, काय होतंय, का होतंय हे काहीही समजतच नाही त्यांना. त्यांच्या जगण्याच्या कल्पनाच वेगळया आहेत. चांगल्या-वाईटाचे छापच वेगळे आहेत आणि त्यांनी त्याचाच आग्रह धरला की मग मला येतो राग. खूप राग येतो. आवरतच नाही. मग मी तरी काय करणार?
त्यात ही रिया! लहरी आहे नुसती. ती आली, तीच मुळी वादळासारखी! खरं म्हणजे ती मला आवडतेय हे लक्षात आलं, तेव्हा मीच दचकलो केवढा तरी! ही भानगड नको म्हणून टाळतच होतो तिला. अन् अभ्यासात लक्ष घालू लागलो, जास्तच. पण या शिरीषच्या न् तिच्या भांडणांनीच मला गोवलं त्यांच्यात. मागचं, मागचं सगळं आठवत गेलो तसं आठवलं मला. चांगलंच आठवलं.
किती प्रयत्न केले होते मी; पण ते वादळ थोपवताच आलं नव्हतं मला.
सोसाटयाचा वारा धो धो धारा
त्यातच पुन्हा सट्सट् गारा
उठलो भराभरा
बंद केली दारं धाड्धाड् आपटणारी
अन् थोपवलं वादळाला
वाटलं कसं लावलं वाटेला
कटवलं बाहेरच्या बाहेर!
तरी फटीफटीतून
घुसू पाहतोय वारा
त्याचा धरून हात सुळकन् येताहेत धारा
काचांवर बडवताहेत कपाळ
त्या आक्रस्ताळी गारा
मीच वेडा!
मीच वेडा, दार लावून
वादळाकडे पाठ फिरवून
समजलो जाईल निघून
बंद दार बघून
वादळ!!...
या वादळात मी पुरता हेलपाटून गेलोय. याच काय पण मला आता कुठल्याही वादळाची भीतीच वाटते. ढग भरून आले, विजा कडाडू लागल्या की माझीच छाती धडधडायला लागते. मग मी आपला खिडकीतून उठतो पटकन. खिडकी नीट बंद करून घेतो आणि डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपतो; अगदी पाय पोटाशी घेऊन! पण तरी छाती धडधडतच राहाते.
गेल्याच महिन्यातली गोष्ट. खूप अंधारून आलं होतं. पाखरंसुध्दा घाबरल्यासारखी घरटयाकडे धाव घेत होती अन् विजा तर काय अंगात आल्यासारख्याच! पांघरूण घेऊन झोपलो तरी भीती जाईचना. बहुतेक मी किंचाळलो असेन मोठयांदा. तेव्हा आई आली धावत. कसली तरी गोळी माझ्या तोंडात टाकली आणि पाणी प्यायला लावलं वर. जवळ बसली थोपटत. तेवढयात आजीपण आली. तेव्हा आईला म्हटलं, 'तू जा आता. आजी बसेल माझ्याजवळ.' ती बोलणार होती काहीतरी नेहमीसारखंच; पण मी आपला तिच्याकडे पाठ फिरवून न् आजीकडे तोंड करून झोपून गेलो. तेव्हा मग गेली निघून. त्यांना काळजी वाटते ते माहीत आहे मला. पण उपयोग काही नाही त्याचा. वांझोटी काळजी आहे नुसती!
वास्तविक हे असलं घाबरणं मलाही आवडत नाही. माझ्या मनाला तर फुलपाखरासारखं स्वच्छंदीपणाने भिरभिरावंसं वाटतं. कितीतरी वेळा ते फुलपाखरू होतंसुध्दा. रंगीबेरंगी, हलकं-फुलकं. पण मग शिरीषसारखी वात्रट मुलं त्याच्यामागे लागतात. पकडतात त्याला बंद मुठीत अन् निष्ठूरपणे खेळ करतात त्याचा! माझंही काहीसं तसंच झालंय.
ती धावत आली तीरासारखी
उत्साहाने, विजयानंदाने
अन् मूठ उलगडली माझ्या तळव्यावर
'काय आहे पाहू?'
ओ:! फुलपाखरू!... पण
पंख तुटलेलं, ओरबाडलेलं,
हळवे रंग विखुरलेले न
थरथरणारी दुबळी काया!
मी विचारलं,
मी विचारलं माझ्याच नकळत
'कुठे सापडलो तुला मी?'
?
अन् ती हसतेय दुष्ट!
ही शिरीष म्हणजे एक कोडंच आहे. आई-बाबांपाशी लाडेलाडे करते, लाडकोड पुरवून घेते सगळे. माझ्याशी स्पर्धा करते, अन् लबाडीपण; पाहुण्यांसमोर शहाण्यासारखी वागते, शाबासकी वसूल करते आणि रियाशी भांडण! कधी वाटतं, माझ्यावरही माया आहे तिची, पण मग मला काही कळतच नाही, हिला खरोखर काय वाटतं माझ्याबद्दल? का नाटक करते उगीच? नक्कीच ती माझ्या चहाडया करीत असणार आईपाशी, खोटयानाटयाच अर्थात! चहाटळ कुठली! अन् पुन्हा शहाणपणाने म्हणणार, नकटं नाक उडवत, 'संशयाचं भूत बसलंय तुझ्या मानगुटी, म्हणून असलं काहीतरी वाटतं तुला आणि पुन्हा तेच धरून बसतोस मनात.' आई तिला दटावते अशावेळी; पण तिचं ते बोलणं चुकीचं आहे असं मात्र सांगत नाही ठासून. मला वेडंवाकडं बोलू नये एवढंच बजावते तिला. समजावते जरा. म्हणजे याचा अर्थ तिलापण, बाबांनापण तसंच वाटतं की काय? ते डॉक्टरही अशाच अर्थाचं, पण जरा वेगळया शब्दात काहीतरी सांगत होते. त्यांचाही राग येतो, पण थोडंसं कधी पटतंसुध्दा. त्यांच्यामुळे आणि त्या गोळयांमुळे सुरुवातीला त्या वादळातून थोडा सावरलो होतो मी आणि अभ्यासही सुरू केला होता.
मन लावलं खरं अभ्यासात, पण स्वत:लाच टाळत! मी स्वत:ला टाळतोय हे लक्षात आलं त्या दिवशी मी डायरीत लिहिलं होतं-
शॉवरखाली उभा मी, शहारलेला, गारठलेला
यांत्रिकपणे अंग पुसतो, कपडे करतो
केसातून कंगवा फिरवतो आणि
आरशावर एक नजर
हं!
नाकडोळे जागेवर आहेत
न्याहाळणं मात्र सफाईने टाळतो
घाईचं नाटक करत, स्वत:शीच
स्वत:लाच फसवत!
हल्ली हे असंच होतं
डोळयात डोकवायची धास्ती वाटते
पडक्या खोल विहिरीची
त्यातल्या सडक्या पाण्याची
वाटतेच ना धास्ती!
का कोण जाणे, पण
हल्ली हे असंच होतं
माझंच प्रतिबिंब मलाच टाळतं!
असंच स्वत:लाच टाळत अभ्यास केला कसातरी आणि नुसता पासक्लासमध्ये का होईना, पण बी. कॉम. झालो एकदाचा!
रियाच्या आठवणी तर होत्याच मानगुटीवर बसलेल्या, पण त्याचा विशेष त्रास नव्हता. शेवटी शेवटी जगदाळेसरांचा क्लास लावला अन् तिथे पुन्हा एकदा जरा घोटाळा झाला. तिथे ती केतकी भेटली. छे:! भेटली कसली, दिसली नुसती! रियासारखंच हसणारी, खळखळून! आणि पुन्हा मन सैरभैर झालं. पण ती माझ्याकडे पाहाताना असं चमत्कारिक नजरेनं का पाहायची? ती अन् बाकीची मुलं-मुलीपण! खरं म्हणजे, मी तिच्याकडे ती हसताना पाहायचो, तेव्हा मला ती दिसायचीच नाही, मला फक्त हसणं दिसायचं. ते हसणंच ऐकू यायचं. मीपण त्या हसण्यात सामील व्हायचो. आता मी फारसा बोलत नाही कुणाशी हे खरं, पण त्यात एवढं काय? असतो अबोल एखादा! पण म्हणून काय असं तुच्छतेनं पाहायचं? कुचकेपणानं हसायचं आणि कॉमेंटस् करायच्या काय? येडचाप म्हणे! म्हणे भोट! म्हणे मोरू न् काय काय! खूप राग यायचा, संताप यायचा. वाटायचं, एकेकाला फराफरा ओढत न्यावं न् कडयावरून ढकलून द्यावं. पण मन शांत ठेवलं, अटोकाट प्रयत्न करून आणि दिली एकदाची परीक्षा!
आईने खूपच सांभाळलं त्या काळात. परीक्षेला जातानापण बरोबर असायची. खरं म्हणजे मला त्यामुळे खूप धीर यायचा; पण तिला माझ्यासोबत पाहून मुलं मात्र हसायची फिदीफिदी, बडबडायचीसुध्दा काहीबाही. आई धीर द्यायची. म्हणायची,
'तू नको लक्ष देऊस तिकडे. तुझा अभ्यास चांगला झालाय् ना? मग व्यवस्थित, शांतपणे पेपर लिही आणि त्या टारगट पोरांना तुझ्या कृतीनेच उत्तर दे... छान पास होणार आहेस तू. मला खात्रीय.'
तिला माझ्याविषयी एवढी खात्री आहे हे पाहून मला बरं वाटायचं. ती पुन्हा पुन्हा सांगत असायची,
'तू काळजी करू नको. अगदी शांतपणे पेपर लिही. राग आला, भीती वाटली, अगदी काही झालं तरी तू आपला 'श्रीराम जय राम जय जय राम'चा जप करीत रहा आणि ऐक, मी थांबणार आहे इथंच, तुझा पेपर होईपर्यंत. मी आहे इथं. कळलं ना?'
हे तिने इतक्यांदा सांगितलं की कंटाळलो मी. पण बरंही वाटत होतं. विचित्र वाटतं हे, पण तसं आहे खरं!
परीक्षेनंतर मात्र हे ओढून-ताणून आणलेलं उसनं अवसान गळून गेलं. अभ्यासही संपला एकदाचा. पण या सगळया काळात मित्रही एकएक करीत पांगले. मित्रांचं राहू दे, पण एक मैत्रिण असायला पाहिजे होती. दुसरी कोण? रियाच! पण ती मात्र माझ्या प्रेमाचा, मैत्रीचा अपमान करून बेपर्वा होती. तसं म्हटलं तर हे प्रेम काही मी बोलून दाखवलं नव्हतं म्हणा! पण मैत्रीची तरी कदर करायला हवी होती तिने! पण नाही. एकटा आहे मी आता. आई-बाबा असतात हे खरं, पण एकमेकांसाठी ते जेवढे, जसे आहेत तेवढे, तसे माझ्यासाठी नाहीत हेपण खरंच आहे. विचित्र वाटतंय ना? पण ते तसं आहे खरं! या असल्या विचित्र गोष्टी पचवता पचवता मीपण विचित्रच होत चाललोय.
असंच असतं का जग सगळं? निष्प्रेम, बेपर्वा, कठोर न् वरून निर्लज्जपणे टिंगलही करणारं? अन् असल्या स्वार्थी न लबाड जगात हे इतक्या मजेत राहातात? कसं जमतं यांना हे? खरोखर आश्चर्य आहे. आणि ते विद्वान डॉक्टर सांगत होते,
'ही कल्पना आहे तुझी, अरे, जग सुंदरही असतं. चांगलंही असतं. जगात प्रेमही असतं आणि आस्थापण!'
यांना कुठे असलं जग दिसलं कोण जाणे! म्हणे, तुझ्या मनातल्या कल्पना, चिंता, संशय, दुबळेपणा यांचा तूच शोध घे. काढून टाक ते. विचार कर. हं! थोडं थोडं पटलं मला. प्रयत्नही केला मी तसा थोडा, अगदी प्रामाणिकपणे,
दोनच शब्द आंतरिक जिव्हाळयाचे
आरपार गेले मनात
आणि अवचित उलगडले गाठोडे
करकचून बांधलेले
आवळूनही तट्ट फुगलेले.
सैरावैरा पसरले तुकडे-ताकडे बोळे
चलाखीने लपवलेली पोतेरी न् लक्तरे
भूतकाळाच्या कुरूप चिंध्या
सुन्न डोळयांनी पाहातो आहे मीच मला!
एक रेशीमकाठ जुनेराचा
अजून रेंगाळतो गंध दुधाचा
तोच तो जोजवणारा
अजून कसा झाला नाही जुना
नवेपणा याचा?
इकडे याच्या कडेला तो
डोळे वटारतोय लालभडक डाग
ठुसठुसणाऱ्या वेदनेचा
तोही तेवढाच ताजा कसा?
या चिंध्या विरविरीत
वेडया तलम स्वप्नांच्या
ही लक्तरे शापित अश्राप कोमलतेची!
हा गुंता रंगीत गोफांचा
दूर गेलेला आवाज
त्यातल्या गीतांचा!
त्यातच ते पोतेरं अस्मितेचं
अपमानाचे डाग जिरवून जिरवून
अखेर फेकून दिलेलं!
ते बोळे अबोल नात्यांचे
अर्ध्यात सोडलेल्या कवितांचे
येवढयानं काय झालंय?
हा तर केवळ वरचा थर
केवढा ढीग साचलाय खाली
अस्फुट, अनामिक, कळत्या, नकळत्या
अनाघ्रात अस्पर्शित भाव-भावनांचा
चिवडलेल्या कल्पनांचा, वेदनांचा
आणि त्यातच कुठे फुटताहेत
क्षणिक आनंदाचे बुडबुडे!
आणि अजूनही कितीतरी
न उमजलेलं, माझं मलाच!
तेही वाट पाहातंय
दात विचकून दाखवायला
तेही मला पाहायलाच हवं ना?
आज? उद्या?... मरण्यापूर्वी तरी नक्कीच!
बरंच काही सापडलं मला माझ्या मनाच्या खोलखोल तळघरात दडवून ठेवलेलं. पण ते काढून टाकायचं म्हणजे काय? त्या काय अडगळीतल्या वस्तू आहेत थोडयाच? उचलल्या आणि दिल्या भंगारवाल्याला! त्या काढायच्या म्हणजे मलाच आणि माझ्याच मनाच्या चिंध्या चिंध्या करून टाकाव्या लागतील. तेव्हा मग, मग मागे उरेल ते काय असेल? कोण जाणे!
त्या दिवशी मी हे लिहिलं डायरीत आणि ती कपाटात, खोल, कोपऱ्यात ठेवून द्यायचंच विसरलो. नादावलेला असाच या खिडकीत बसून राहिलो. जरा वेळाने बाथरूममधे जाऊन येतो तर आई उभी माझ्या पलंगापाशी, माझी डायरी वाचत. माझी चाहूल लागली, तशी पटकन डायरी ठेवली आणि डोळे टिपले तिने. माझ्याकडे मग वळून हसली बळेबळेच, खोटं खोटंच. खूप राग आला होता मला.
म्हटलं,
'का वाचलीस माझी डायरी?'
तेव्हा हात धरून बसवलं मला. खांद्यांवर थोपटत म्हणाली,
'रागावू नको. शांत हो. अरे, मी आले चादर धुवायला न्यावी म्हणून. डायरी दिसली म्हणून सहज पाहिली. जरासंच वाचलं, पण खरंच छान लिहिलंयस. असंच मन मोकळं करीत रहा. अगदी निर्धास्तपणे. मी नाही वाचणार पुन्हा, तुला आवडत नसेल तर. मग तर झालं? पण लिहीत जा मनातलं. आणि....'
'आणि काय आता?' मी अजूनही घुश्श्यातच होतो.
'आणि बोललास हे सारं कुणाजवळ, समज माझ्याजवळ तर आणखीन बरं होईल.'
'बोलतोच मी मग!'
'कुणाजवळ?'
'आजीजवळ.' यावर बोलायला तोंड उघडता उघडताच मिटलं तिनं. मला माहीत आहे, आजी आहे, ती येते, माझ्याशी बोलते यावर विश्वास नाही यांचा. नसू दे. मी काय करू त्याला? नसत्या कल्पना उराशी कवटाळून बसतात आणि पुन्हा शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. तर्काचा तोरा मिरवतात. मिरवू दे खुशाल! मी बोलणार आजीशी!
काळजी वाटते आईला हे कबूल. पण म्हणून काय मी आजीशी बोलायचंच नाही? ही माणसं खरंच विचित्र आहेत...
की, की मीच वेगळा आहे? कोण जाणे, पण कधी कधी वाटतं,
ही माणसं, हे घर, हे आयुष्य
जसं कुणी लादलंय, माझ्यावर
हे शब्द, हे रंग, हे गंध
कसे अगदी येताहेत अंगावर
कुठल्याशा बेटावर राहणारा तो मी
कधी आलो इथे? कसा?
कल्पनेच्या पाऊल वाटेवरून
स्वप्नांच्या हाती हात देऊन
धावत ना होतो अनिर्बंध?
कधी वाट चुकलो समजलंच नाही
हरवलीच ती परतीची वाट
पुसून गेल्या आहेत खुणा.
आणि हे काय आणखी?
या नवीन वाटेवर रूळताना
माझा चेहराही हरवला आहे!
जगतोय हरवलेल्या चेहऱ्याने
तुडवतोय निबिड अरण्य माणसांचं
नसलेल्या वाटेने!
कुठे नेतेय हे आयुष्य मला? कुठे?
प्रश्न पडतात, पण उत्तरं सापडत नाहीत. बाहेर कुठे जायला जागा नाही, बोलायला माणूस नाही, म्हणून बसतो इथे खिडकीत, नुसताच शून्यात बघत. रस्त्यावरची रहदारीपण यांत्रिकपणे पुढे पुढे सरकतेय, असं वाटतं. मग वाटतं नको हे घर, नको हे शहर, नको हे थिजलेलं वातावरण! जीव व्याकुळ होतो. मनात येतं, जावं कुठे तरी दूर, दूर, दूर! कालच मी लिहिलं डायरीत,
किती दिवस झाले
या तोकडया खिडकीतून बघतो आहे
त्या प्रचंड घुमटाचा
केविलवाणा, भग्न, निश्चेष्ट अवशेष!
हे काटेकोर चौकोनी आकाश
हरवून जात नाही चांदण्यांनी
की खेळत नाही रंगपंचमी
येवढंच काय?
काळया ढगांनी गुरफटून घेऊन
रूसूनही बसत नाही कधी!
कित्ती कित्ती दिवस झाले,
डोळे मिचकावणाऱ्या त्या लबाड चांदण्यांशी
गंमत गोष्टी केल्या नाहीत.
घोंगावणाऱ्या वाऱ्यापावसात
काया चिंब झाली नाही
आपल्याच मस्तीत गुणगुणणारा
झुळझुळ झरा चाखला नाही.
फार झालं आता
एकदा असाच निघणार आहे तिरीमिरीत
चिरगुटदेखील बरोबर न घेता
आकाशाची निळाई पांघरून
हिरवळीवर विसावणार आहे
त्या म्हाताऱ्या वडाच्या झिंज्या धरून
खूप भांडणार आहे त्याच्याशी
... उगीचच...!
मग त्याच्याच मांडीवर मस्तक ठेवून
ऊर भरून रडणार आहे
सारा आक्रोश ओतून
न् मग त्याच्याच शीतल छायेत
शांतपणे मरणार आहे
पुन्हा मरण! पुन्हा पुन्हा हा विचार का बरं डोकावतो माझ्या मनात? अशी आत्महत्या करणं मला आवडत नाही. पण जगण्याचंही प्रचंड ओझं झालंय. आयुष्य ढकलणं तर भागच आहे. जगत असतील लोक आनंदानं न् भीतही असतील मरणाला. पण मला नाही भीती वाटत मरणाची. मात्र या जगण्यात आनंदही गवसत नाहीय. मरणाची वेदना कुणी पाहिलीय, पण उरात सल वागवत जगायचं, ते कसं? आईबाबा माझ्या शरीराची चिंता वाहतात, काळजी घेतात, पण माझ्या मनात जे वेदनांचे कढ उतू जातायत त्याच्यावर फुंकर कोण घालणार? हं:! ती गोष्ट त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. ते तरी काय करतील?
मला माहितीय, माझा भार होतोय आई-बाबांना. पण करू काय? अगदीच कुचकामाचा निघालो. निव्वळ निरर्थक आयुष्य! माझं आयुष्य म्हणजे फक्त मृत्यूकडे वाटचाल! तो किती दूर आहे, कसा आहे काही काही ठाऊक नाही. सगळं नुसतं धुसर, अंधुक आहे. आयुष्याचं ओझं खांद्यावर वागवत, फरपटत चाललोय खरा! पण
आता मात्र अति झालंय
भार माझा मला
भार आसवांचा डोळयांना
भार श्वासाचा उराला
दाबलेल्या इच्छांचा न् लादलेल्या अनिच्छांचा
लडबडलेल्या कामनांचा अन्
भार माथ्यावर ॠणांचा, क्षणोक्षणी वाढणारा,
कसा उपसू हा डोंगर
बांधलेल्या हातांनी?
उभा तरी राहू कसा जखडलेल्या पायांनी?
एखाद्या खविसासारखं हे आयुष्य, मानगुटीला बसलेलं! भार वाहातोय, चालतोय चालतोय. पण आता वाट अशी नाहीच, फक्त खाचखळगे, फक्त काटेकुटे, फक्त निबिड अरण्य, फक्त अंधार! घनदाट!
===========================================================================
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
सुन्न झालो!!! मस्त लिहीलंय!!
मस्त लिहीलय...
मनस्वी आणि तरल. आवडलं.
!!
चांगलंय !!!
तीव्रपणं अंगावर येतंय.
+१
+1
भिडलं...
(No subject)
.
शब्द खूप परिणामकारक आहेत, पण
हे वास्तव आहे. अशी अनेक
नेमके हेच बोलणार होतो की ही कथा नाही वाटत
मनाला भिडलं !
वाचली पूर्ण ...
(No subject)
Baap Re!!!!
मी हे आधी कुठेतरी वाचले आहे .
माझ्या आठवणीप्रमाणे ही कथा मी