Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:
याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे. सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात. हा अशा प्रकारचा मांजा बाजारात यायच्या आधीपासूनच पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांना होणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे (निष्फळ?) प्रयत्न होत आल्येत. निष्फळ अशासाठी की माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागल्येत. यासंबंधी हवी तितकी जनजागृती होत नसावी असं वाटतं. होळीला जागोजागी एवढी जाळपोळ होते. वाळवी लागलेली, सुकलेली, आधीच मेलेली झाडं असतील तर एकवेळ ठीक आहे पण प्रसंगी जाळायला लाकडंच नाहीत म्हणून सरळ जिवंत झाडांना तोडून जाळून टाकतात. काही वर्षांपूर्वी एक लेख वाचला होता, होळीनिमित्तच आला होता. त्यात असं म्हटलं होतं, की कचरा ओला असो किंवा सुका, तो जाळू नये. कारण तो अर्धवट जळला की त्याने निसर्गाला हानीच होते. (हेच कदाचित माणसांवर अंत्यसंस्कार करतानाही लागू होत असावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे इलेक्ट्रिक चितेवर मोठ्या तापमानावर शरीर पूर्णपणे जळून जात असल्याने निसर्गाला हानीकारक घटक हवेत शिरत नसावेत?) होळी आग न लावता साजरी करता येत नाही का? होळीच्या दिवशी आगीचा अतिरेक, तर रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा!! एवढ्या प्रमाणावर पाणी वाया जातं, की महानगरपालिकेला फतवे काढावे लागतात, अमूक अमूक प्रमाणाबाहेर एखाद्या सोसायटीने पाणी वापरलं तर दंड बसेल वगैरे. त्याचा कितपत परिणाम होतो? तरी नाही म्हटलं तरी गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे ब-याच ठिकाणी 'सुकी होळी' साजरी करण्यात आली. (सदाशिव आमरापूरकरांच्या शेजारच्या कॉलनीतले 'रेन डान्स' सारखे अपवाद सोडून) पण या सुक्या होळीने काय साध्य केलं? सहजासहजी न निघणा-या पक्क्या रंगांना ऊत आला आणि मग ते काढण्यासाठी आंघोळ करताना जेवढं पाणी एरव्हीच्या आंघोळीपेक्षा जास्त वाया गेलं असेल त्याचा काय हिशेब? जम्प टू दहिहंडी आणि गणेशोत्सव. गोंगाट, गर्दी, वाहतूकीची तारांबळ, होर्डिंग्जचा कचरा, इ. हे दरवर्षी ठरलेलं. गणपती उत्सवांत एवढा गोंगाट असतो, आणि त्यात पीओपीचे गणपती. म्हणजे ध्वनी आणि जल प्रदूषण. तरी बरेच जण हल्ली शाडूच्या मूर्तींकडे आणि विसर्जनासाठी खास तयार केलेल्या कृत्रिम तलावांकडे वळू लागल्येत हे त्यातल्या त्यात बरं. सगळ्यात शेवटी दिवाळी. निसर्गाला त्रास देण्याचा उच्चांक गाठणारा हा सण. याला तोड नाही. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, फटाक्यांचा, दारूचा, फटाक्यांच्या बॉक्सेसचा कचरा जिकडे तिकडे पडलेला असतो. नीट पाहिलं तर हवेत स्मॉगचा एक काळसर जाड पट्टा असतो या काळात, त्याच्या वरती मग आकाश दिसतं. रात्रीच्या वेळी रॉकेट्सची रोषणाई पाहायला म्हणून गच्चीत गेलो तर लक्ष फटाक्यांऐवजी फटाका फुटण्याच्या प्रत्येक आवाजानिशी त्या आवाजाजवळच्या पक्ष्यांच्या होणा-या धावपळीने वेधून घेतलं. वर्षभरात कधीही साधं लग्नाच्या किंवा क्रिकेटच्या निमित्ताने कुणी एखादा जरी फटाका फोडला तरी या पक्ष्यांची तारांबळ उडते. सैरावैरा धावत सुटतात. फटाक्यांच्या आवाजाने आपल्या सारख्या ५-६फूटी माणसांना सुद्धा त्रास होतो, त्या चिमुकल्या जीवांचं काय होत असेल? आणि हे सगळं फक्त पक्ष्यांच्या बाबतीतच नाही, तर इतर छोट्या-मोठ्या प्राण्यांच्या बाबतीतही होतच असणार. या सगळ्या सणांच्या साजरकरणाविषयीच्या आक्षेपांवर ब-याच प्रकारची उडवाउडवीची उत्तरं मिळतात - १. एवढे जण सेलिब्रेट करतात. आम्ही केलं तर काय मोठा फरक पडणार आहे? (असाच विचार प्रत्येक जण करत बसला, तर परिस्थितीत बदल कसा होईल?) २. होळी/रंगपंचमी/दिवाळी/संक्रातीच्या वेळी आमच्या चिमुकल्या मुलांचा आनंद पाहून धन्यता वाटते. (तुमच्या चिमुकल्यांच्या हौशीपायी तुम्ही इतर कित्येक निरपराध चिमुकल्या जीवांना विनाकारण त्रास देता त्याचं काय?) ३. संपूर्ण वर्षभर आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. निसर्गाला आमच्या परीने काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतो, मग एखाद्या सणाच्या दिवशी जरा केली मज्जा, तर काय हरकत आहे? (म्हणजे वर्षभर तुम्ही निसर्गाला इजा न पोचवण्यासाठी घेतलेली काळजी एका दिवसात धुळीला मिळते) ४. फक्त आमच्या सणांनाच का बोल लावता? इतर धर्माचे लोक सण साजरा करताना जणू निसर्गाला त्रास होतच नाही. ईदेच्या दिवशी केवढे बोकड कापले जातात, ३१स्ट च्या रात्री एकाच वेळी जगभरात होणा-या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचं काय? (सगळं कबूल. पण "दुसरा गू खातो मग मी खाल्ली तर काय बिघडलं?" या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? आणि आपण आपल्या स्वतःमध्ये काही सुधारणा करता येते का हे आधी बघावं. आपल्या सणांमध्येच नको त्या गोष्टी होत असताना इतरांच्या सणांविषयी आक्षेप घेतले, तर 'आधी स्वतःच्या नाकाचा शेंबूड पूसा' असंच आपल्याला लोक म्हणणार ना) ५. जगभर होणारी युद्धं, गाड्या, कारखाने यांच्यातून निघणारे दूषित वायू, सांडपाणी, ऐरोप्लेनच्या आवाजाने जवळपासच्या लोकांना होणारा त्रास, फिल्म्समध्ये दाखवल्या जाणा-या खोट्या पावसात होणारा पाण्याचा अपव्यय यांच्या मानाने आम्ही खेळलेल्या रंगपंचमीने, उडवलेल्या फटाक्यांनी होणा-या प्रदूषणाचं प्रमाण अत्यल्प म्हणावं लागेल. (अच्छा, म्हणजे सगळी दुनिया येन केन प्रकारेण निसर्गाची वाट लावतंच आहे, त्यात आपणही खारीचा वाटा उचलावा असा उद्दात्त हेतू दिसतो मंडळींचा) ६. तू एवढा बोलतोयस, निसर्गाला हानी, निसर्गाला हानी... स्वतः काय करतोस रे भाड्या? (निसर्गाला होणारी हानी दिसून आल्यावर, पतंग उडवणं, होळी/रंगपंचमी खेळणं [सुकी असो वा ओली], घरी गणपती आणणं, दहीहंडीत भाग घेणं [मला तसंही कोण घेणार म्हणा], दिवाळीला किंवा अगदी ३१स्ट ला सुद्धा फटाके उडवणं,

बंद केलं आहे

. तरी माझ्या परीने हे सगळे सण निसर्गाला त्रास न देता एंजॉय करायला शिकलो आहे.) सुधारणेला सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात. मी तर केली, इतर अनेकांनी करण्याची वाट पाहतोय. [काय रे नेहमीचं तेच तेच रटाळ विषय किती किस पाडणार?? - (कळत/नकळत निसर्गाला हानी पोचवून सण साजरा करणा-या दहा लोकांनी समजा लेख वाचला, तर निदान एकाच्या तरी डोक्यात प्रकाश पडून आचरणात बदल होईल अशी लेख लिहीण्यामागची आशा... पुढेही वेळीवेळी याच आशयाचा किस [जमल्यास अधिक सशक्तपणे] पाडत राहीन...)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

थोड्याच वेळापूर्वी मी स्वतः बाईक चालवत असताना डावीकडे काही मुलं रस्त्यावर उभे राहून पतंग उडवायचा प्रयत्न करत होती. त्यांचा मांजा मला डोक्याच्या रेषेत आडवा आला आणि मी वेड्यासारखी (पण वेळेत) माझी बाईक उजवीकडे वळवली आणि तोल जाता जाता वाचलो. पुढे दोन ढांगांवर चौक होता. नशीबाने कुठलीही गाडी त्यावेळी मध्ये आली नाही नाहीतर अपघात नक्कीच झाला असता.

सार्वजनिक झालो कि आपण लोकं बेपर्वाई, अस्वच्छता, बेशिस्त, असुन्दरता हे आपले व्यवच्छेदक लक्षण आहे हे सिद्ध करतो ...भले त्यात कुणाचा जीव गेला तरी 'असं थोडसं होणारच' अशी आपली निगारगट्ट भूमिका घेतोच.. असो...फार काही बदलेल असे वाटत नह....

कोणाला सांगायला गेलं की राग आणि मनस्ताप याशिवाय काही हातात येत नाही. एका माणसानी बदलून ह्या महाकाय देशात काही शष्प फरक पडणार नाही असं वाटत राहतं.

ही चर्चा अशीच सणावारी पुनःपुनः होत राहायला हवी... जिलब्या पाडणे हा हेतू नसून विषय महत्त्वाचा आहे आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिथे कुठे जेव्हा केव्हा अशी चर्चा होताना दिसते तिथे हिरीरीने आपण आपले मुद्दे (मग भले ते सणाच्या सद्य परिस्थितीतील साजरीकरणाच्या पद्धतीच्या बाजूने का असेनात) मांडायला हवेत असं प्रामाणिक मत आहे...

खरं आहे. पण दुबईतली ३१ डिसेंबरची फटाक्यांची रोषणाई फार मस्त होती नै. गिनिज बुक मधे लिव्हलं नाव महाराजा. नाय तर आमी बसतो टिकल्या फोडत.

फटक्यांनी प्रदूषणच पसरते. पण आतिषबाजी पाहण्यासाठी विदेशातून भटके येतात. पैसा मिळतो. मग प्रदूषण झालं तरी काही बिघडत नाही. जगात सर्वत्र हाच विचार आहे.

लेखाशी पूर्णपणॅ असहमत फक्त आमच्या सणांनाच का बोल लावता? इतर धर्माचे लोक सण साजरा करताना जणू निसर्गाला त्रास होतच नाही. ईदेच्या दिवशी केवढे बोकड कापले जातात, ३१स्ट च्या रात्री एकाच वेळी जगभरात होणा-या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचं काय? यावर
"दुसरा क्ष खातो मग मी खाल्ली तर काय बिघडलं?"
अशी मखलाशी केलेली असली तरीही श्रीयुत वडापाव यानी हिम्मत असेल तर बकरी इद च्या दिवशी मुस्लिम मोहल्ल्यात जावून शाकाहारी असण्याचे फायदे ,अहिन्सा व प्रदूशण इत्यादी विशयाव्र प्रवचन देवुन दाखवाल का? उगाच आपल्या फुशारक्या झाले .... ;(

अशी मखलाशी केलेली असली तरीही श्रीयुत वडापाव यानी हिम्मत असेल तर बकरी इद च्या दिवशी मुस्लिम मोहल्ल्यात जावून शाकाहारी असण्याचे फायदे ,अहिन्सा व प्रदूशण इत्यादी विशयाव्र प्रवचन देवुन दाखवाल का? उगाच आपल्या फुशारक्या झाले ....
आधी (आपल्यासारख्या) 'आपल्या' माणसांना दिलेल्या 'प्रवचना'तून इच्छित यश मिळालं तर(च) बकरी इदच्या दिवशी 'हिम्मत' करण्यासाठी मन धजावेल ना ब्वा!! इथे एवढी आरडाओरड करूनही आपलीच माणसं दाद देत नाहीत तिथे दुस-यांकडून कशा काय अपेक्षा ठेवायच्या??

मुद्दा कमी वेळात पटवून देताना सोयीचं जावं म्हणून आपले आणि दुसरे असे शब्दप्रयोग केले. त्यामुळे तुमच्यासारखाच इतरांचाही कदाचित गैरसमज झाला असेल (किंवा तुम्ही उगाच काडी लावत असाल... काहीही असो.) पण तो होणं अपरिहार्य होतं म्हणून कोणी तुमच्यासारखा आक्षेप घेतल्यावर, वेळ मिळाल्यावर लगेच त्याबाबतीत स्पष्टीकरण देऊ असा प्रतिसाद देताना विचार केला. आता दिलं स्पष्टीकरण. :)

>>>मुद्दा कमी वेळात पटवून देताना सोयीचं जावं म्हणून आपले आणि दुसरे असे शब्दप्रयोग केले ही पळवाट झाली. मी पाहिलेले सर्वच विचारवंत असं सोयीस्कर मांडणी करुन मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात.

आधी (आपल्यासारख्या) 'आपल्या' माणसांना दिलेल्या 'प्रवचना'तून इच्छित यश मिळालं तर(च) बकरी इदच्या दिवशी 'हिम्मत' करण्यासाठी मन धजावेल ना ब्वा!! इथे एवढी आरडाओरड करूनही आपलीच माणसं दाद देत नाहीत तिथे दुस-यांकडून कशा काय अपेक्षा ठेवायच्या?? मग कमीत कमी ईद च्या मुहूर्तावर बकर्यांच्या कत्तलीवर असला काथ्या तरी कुटा इथे ! रंगपंचमी , फटाके व पतंग न उडवणारा तसेच पुरोगामीपणाचा आव न आणणारा --- बालक

पतंग उडवणं, होळी/रंगपंचमी खेळणं [सुकी असो वा ओली], घरी गणपती आणणं, दहीहंडीत भाग घेणं [मला तसंही कोण घेणार म्हणा], दिवाळीला किंवा अगदी ३१स्ट ला सुद्धा फटाके उडवणं, बंद केलं आहे
मग या सर्व दिवषी तुम्ही नेमक करता तरी काय? .

धाग्यातील मूळ भावनेशी सहमत. पण तुम्ही म्हणता तितकेच सण चर्चेपुरते गृहीत धरले तर पाच किंवा सहा सण आहेत म्हणजे अगदी मागे पुढे काही दिवस धरले तरी वर्षातले दोन आठवडे धरूयात. ते देखील मी केवळ हिंदू सणच धरत आहे कारण हिंदू बहुसंख्य आहेत आणि आता तुमच्या मुद्याकडे वळूयात: संक्रांतीमुळळे पक्षी किती मरतात आणि अपघात किती होतात? याची काही आकडेवारी? तुम्हाला माहीत असेलच की उंच इमारती आणि त्यातही काचेच्या बाहेरील शोभेच्या भिंती अथवा खिडक्याच खिडक्या असलेल्या उंच भिंतींमुळे दरोज पक्षी मरतात ते? कारण त्यांना बिचार्‍यांना काचेत आकाशाचे प्रतिबिंब दिसत असते. आता अशा इमारती बांधू नयेत म्हणून तुम्ही आवाज करण्यात सामिल होता का? ही परीस्थिती कशी बदलणार हे सांगू शकाल का? म्हणजे संक्रात अथवा एकूण पतंग उडवण्याचे घाऊक असे अगदी सरासरी १५ दिवस धरले तरी त्या विरुद्ध ३६५ दिवस अहोरात्र पक्षांना डेंजर! काय जास्त गंभीर काय वाटते? होळीबाबत मुद्दामून झाडे कापून ती जाळणे अमान्यच आहे. पण हे गेल्या दशकापेक्षा (त्याच्या आधीपण बोलत नाही) किती आहे याची काही आकडेवारी? का आपले नेमेची येतो मग शिमगा म्हणत सगळ्यांनीच बोंबलायचे? त्याव्यतिरीक्त ३६५ दिवस चालणार्‍या वृक्षतोडीसंदर्भात आपले काय मत? बाकी गणेशोत्सव ते दिवाळी बर्‍याच अंशी मुद्दा हा गोंगाटापासून कचर्‍यापर्यंत दिसतो... एरवी काय सारं कसं शांत शांत आणि एकदम स्वच्छ असते असे म्हणायचे आहे का? नुसताच घरचा (भारतातला) कचराच नाही तर जगातला घातक कचरा आपण घेत आहोत आणि कसलेही योग्य कायदे नसल्याने अथवा असले तरी ते न वापरल्याने त्याचा स्वतःवर आणि इतरांवर देखील परीणाम करून घेत आहोत. तेंव्हा आता तुम्हाला प्रश्न असा आहे: की सणावारी होणारे कुठल्याही प्रकाराचे प्रदुषण थांबवण्यासाठी आपण सण साजरे करणे थांबवूयात. पण इतर गोष्टींमुळे होणारे ३६५ दिवसांचे प्रदुषण थांबवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? लाकडी गोष्टी घेणे, हॅजार्ड्स रसायनांचा वापर असलेले न वापरणे, कारखान्यांना नदीचे पाणि प्रदुषित करू नये म्हणून मागे लागणे आणि असल्या कारखान्यात तयार झालेल्या मालावर बहीष्कार करणे, घरादाराच्या समोरील कुठलेही झाड कापण्यास पालीका आल्यास त्याला विरोध करून ते झाड पाडून न देणे, पाण्याचा योग्य वापर करणे, वाहने कमी चालवणे, एकटे कुठे जायचे असल्यास गाडी-मोटरबाईक वगैरे न वापरता सायकल अथवा पब्लीक ट्रान्स्पोर्ट वापरणे... अजून बरेच काही. यावर देखील चर्चा केलीत तर बरे होईल कारण त्यातून जास्त भरीव कार्य करता येईल.

आता या विषयावर चर्चा करण्यासारखे काही राहीले नाही असे दिसतयं कारण उत्तरे मिळतच नाहीत :(

पण तुम्ही म्हणता तितकेच सण चर्चेपुरते गृहीत धरले तर पाच किंवा सहा सण आहेत म्हणजे अगदी मागे पुढे काही दिवस धरले तरी वर्षातले दोन आठवडे धरूयात.
- तेच तर... एवढ्या कमी वेळात आपण पर्यावरणाची खूप जास्त वाट लाऊन ठेवतो.
संक्रांतीमुळळे पक्षी किती मरतात आणि अपघात किती होतात? याची काही आकडेवारी?
माझ्याकडे आकडेवारी नाही. पण मरतच नाहीत असं ठामपणे सांगू शकाल की बरेच मरतात असं जास्त आत्मविश्वासाने सांगू शकाल?
तुम्हाला माहीत असेलच की उंच इमारती आणि त्यातही काचेच्या बाहेरील शोभेच्या भिंती अथवा खिडक्याच खिडक्या असलेल्या उंच भिंतींमुळे दरोज पक्षी मरतात ते? कारण त्यांना बिचार्‍यांना काचेत आकाशाचे प्रतिबिंब दिसत असते.
माहितीये. घरात घुसलेल्या एक चिमण्याची घराबाहेर पडण्याची धडपड आणि वारंवार काचेच्या पारदर्शक खिडकीवर आपटूनही न पेटणारी ट्यूब पाहून एकाच वेळी गंमत आणि कीव वाटत होती आणि शेवटी त्याला मी पंखा बंद करून उघड्या खिडकीच्या दिशेने पिटाळलं तेव्हा तो बाहेर पडला. असो. हा झाला एक अवांतर किस्सा. माणसाच्या अशा कित्येक अचाट उद्योगांमुळे कितीतरी प्राणी-पक्षी मरत असतातच की. काचेच्या इमारतींवर आपटून मरणा-या पक्ष्यांची संख्या जास्त असली म्हणून कमी 'इ-स्ट्राँग' दर्जाचे मांजे वापरल्याने जे काही चार-दोन पक्ष्यांचे जीव (तात्पुरते) वाचतील ते काय थोडं आहे??
आता अशा इमारती बांधू नयेत म्हणून तुम्ही आवाज करण्यात सामिल होता का? ही परीस्थिती कशी बदलणार हे सांगू शकाल का?
समजा काचेच्या इमारती बांधल्याने होणा-या पक्ष्यांच्या मृत्यूशी संबंधित हा धागा काढला असता तर तुम्ही किंवा इतर कोणी 'अहो ते काचेच्या इमारतींचं जाऊद्या. नुसतं संक्रांतीला चायनीज मांज्याने कितीतरी पक्षी एकदोन दिवसांत मरतात त्यावर तुम्ही काय करू शकणार आहात का ते सांगा' असं म्हणालं असतं. या सर्वच बाबतीत सकारात्मक विचार आणि क्रिया व्हायला हव्या आहेत पण एका वेळी एका समस्येबाबत चर्चा करू. एक समस्या दाखवणा-यावर त्या समस्येची शिकार ठरणा-यांच्या (इथल्या उदाहरणात पक्षी) इतर सगळ्याच (मानवनिर्मित) समस्या एकाच वेळी त्याच्यावर प्रतिवाद करायचा म्हणून उलट्या मारल्यात तर समस्या दाखवणारा प्रसंगी गप्पच बसेल आणि मग त्याला पुरोगामीत्वाचा अजून एक सोंगाड्या समजून लोक त्याच्या योग्य त्या मुद्यांकडेही दुर्लक्ष करतील. अशाने एक तरी समस्या सुटेल का??
होळीबाबत मुद्दामून झाडे कापून ती जाळणे अमान्यच आहे. पण हे गेल्या दशकापेक्षा (त्याच्या आधीपण बोलत नाही) किती आहे याची काही आकडेवारी?
आकडेवारी कमी झालीही असेल. पण पूर्णतः बंद होईपर्यंत नेमेचि शिमगा करतच राहायला हवा.
त्याव्यतिरीक्त ३६५ दिवस चालणार्‍या वृक्षतोडीसंदर्भात आपले काय मत?
यासाठी वर दिलेलं स्पष्टीकरण लागू आहे, फक्त पक्ष्यांच्या जागी झाडं येतात इतकंच.
एरवी काय सारं कसं शांत शांत आणि एकदम स्वच्छ असते असे म्हणायचे आहे का? नुसताच घरचा (भारतातला) कचराच नाही तर जगातला घातक कचरा आपण घेत आहोत आणि कसलेही योग्य कायदे नसल्याने अथवा असले तरी ते न वापरल्याने त्याचा स्वतःवर आणि इतरांवर देखील परीणाम करून घेत आहोत.
एरवीच्या मानाने कचरा आणि गोंगाट जास्तच होतो (लेखात नवरात्रीचा उल्लेख करायचं राहूनच गेलं ते आत्ता आठवतंय). याबाबतीत विदा हाच की माझ्या डोळ्यांना आणि कानांना तरी तो जास्त होताना आढळतो. बाहेरचा कचरा आपण आपल्या देशात आणू देतो ही पूर्णतः वेगळी गोष्ट झाली. त्यासाठी कायदे करणा-या आणि ते बजावणा-यांना जाब विचारला पाहिजे. त्यासाठी पूर्णतः वेगळ्या स्वरूपाची चळवळ नाहीतर राजकीय/मिडीयाचे पाठबळ इ. गोष्टी लागत असाव्यात. या लेखातले मुद्दे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपले आणि आपल्यासारख्या जास्तीत जास्त लोकांचं तोंड, कळफलक आणि आचरण या गोष्टींचा जितका जास्त योग्य दिशेने वापर होईल, तितकंच जास्त प्रबोधन होईल... मग त्यासाठी कायद्यांचीही गरज लागणार नाही. किंवा प्रबोधनामुळेच याविषयासंबंधीच्या कडक कायद्याची मागणीही होऊ शकेल.
की सणावारी होणारे कुठल्याही प्रकाराचे प्रदुषण थांबवण्यासाठी आपण सण साजरे करणे थांबवूयात.
माझं तसं अजिबात म्हणणं नाहीये. मला वाटतं की मी लेखात आधीच हे स्पष्ट केलंय, की आक्षेप हा सणाच्या साजरीकरणाला नसून त्या साजरीकरणाच्या पद्धतीला आहे. आपल्या परिसरातल्या इतर जीवांना (त्यात इतर माणसं सुद्धा आली) त्रास होणार नाही याची काळजी घेऊन मग सण साजरा केला तर काय हरकत असेल कोणाचीही?
पण इतर गोष्टींमुळे होणारे ३६५ दिवसांचे प्रदुषण थांबवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? लाकडी गोष्टी घेणे, हॅजार्ड्स रसायनांचा वापर असलेले न वापरणे, कारखान्यांना नदीचे पाणि प्रदुषित करू नये म्हणून मागे लागणे आणि असल्या कारखान्यात तयार झालेल्या मालावर बहीष्कार करणे, घरादाराच्या समोरील कुठलेही झाड कापण्यास पालीका आल्यास त्याला विरोध करून ते झाड पाडून न देणे, पाण्याचा योग्य वापर करणे, वाहने कमी चालवणे, एकटे कुठे जायचे असल्यास गाडी-मोटरबाईक वगैरे न वापरता सायकल अथवा पब्लीक ट्रान्स्पोर्ट वापरणे... अजून बरेच काही. यावर देखील चर्चा केलीत तर बरे होईल कारण त्यातून जास्त भरीव कार्य करता येईल.
नक्कीच या सर्वांवरदेखील एकावेळी एक समस्या घेऊन, योग्य मुद्यांना धरून चर्चा करण्याचा प्रयत्न करत राहीन. प्रतिसादाला विलंब झालाय असं वाटत असेल तर क्षमस्व.

मग अदरवाईज सणांचा उद्देश काय? लवकरात लवकर निसर्गाची वाट लाऊन (किती ह अभिमान) आपण विड्या ओढायला मोकळं व्हायला म्हणुनच हि सगळी थेरं आहेत ना? बाकी सणासुदीला निसर्गाला त्रास देणं बंद करुन स्वच्छ वातावरणाची अपेक्षा करणे म्हणजे त्याच सणासुदीला गोडधोड खाणं टाळुन डायबीटीज बरा करण्यासारखं आहे.

काय सत्य? कोण सत्य? कसलं सत्य? सत्याचा काय बाजार मांडला आहे? हे पहा मी तुम्हाला त्या २४५७८ व्या धाग्यावर काही प्रश्न विचारलेले होते. ते सोडून इकडे सत्य सत्य काय करत आला आहात? माझा नेमका प्रश्न तुम्हाला न कळल्यानं तुम्ही त्याचं उत्तर न देता इकडे तिकडे भिरभिर चालवलेली आहे ती थांबवून नेमका मी सांगतो तसा विचार करा. वर तिसर्‍या लाईनमध्ये म्हणताय की सणांचा उपयोग सत्यानाशासाठी नि खाली सत्यसाधक नि विचार. अत्यंत गोंधळाची परिस्थिती आहे. बाकी ते पिंक बरोबरच आहे. बघा जमलं तर!

हि गोंधळलेली मन:स्थिती यायचं एक कारण म्हणजे तुमची मोदीसमर्थकांबरोबरची कंपूबाजी. तुम्ही सत्याची कास धरल्याशिवाय निसर्गातलं प्रदुषण कसं कमी होणार? तुम्हाला त्यातलं संगीत कसं कळणार?

भले! म्हणजे तुमचा गोंधळ होतोय ते तुम्हाला लक्षातच येत नाहीये तर. शांतपणे माझे मुद्दे नि मी सांगितलेलं परत परत वाचा. बाकी कंपू करण्याची काहीही गरज... ( आय्ला नेमका विसरला राव तो ड्वायकॉल. शोधावा लागेल. टैमप्लीज)

बाकी सणासुदीला निसर्गाला त्रास देणं बंद करुन स्वच्छ वातावरणाची अपेक्षा करणे म्हणजे त्याच सणासुदीला गोडधोड खाणं टाळुन डायबीटीज बरा करण्यासारखं आहे.
डायबिटीज झालेले लोक सणासुदीच्या दिवशी गोडधोड (किंवा त्यांना वर्ज्य असलेल्या) खाण्याचा फडशा पाडत सुटतात का?? तसं असेल तर मग अशा लोकांकडून निसर्गाला त्रास देणं बंद करण्याची अपेक्षा कशी काय ठेवणार? ज्यांना मजेपोटी स्वतःची काळजी नाही ते निसर्गाची का करतील? आणि जर बहुतांशी लोक सणासुदीच्या दिवसांत सुद्धा स्वतःच्या लोभावर नियंत्रण ठेवून त्यांना दिलेलं पथ्य पाळत असतील, तर त्यांनी तसंच सणाच्या साजरीकरणाच्या बाबतीत परिस्थितीनुसार 'पथ्य' पाळलं, तर काय हरकत आहे?

असल्यास तुम्ही संक्रांतीला पतंग उडवु शकता. नसल्यास केवळ मांजा घोटा, नक्की होईल मधुमेह. मग कदाचीत तुम्हाला कळेल मी काय म्हणतो आहे ते.

मग पुढे काय? अवांतरः ("तुझी लायकी काय तू बोलतोयस काय" च्या चालीवर) पॄथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे प्रमाण काय... त्यातील मानववस्तीचं क्षेत्रफळ किती... त्यातील विशिष्ट सण साजरे करणारे किती... आणि त्याने निसर्गाला फरक पडणार किती... आणि माझ्यामुळे'च' निसर्गाला त्रास होतो हा माज किती... सगळंच मजेशीर. चालू द्या. अतिअवांतरः आता गुढीपाडवा येईल तेव्हां "बांबू तोडू नका" असा धागा काढावा ही विनंती.

तेच अक्षय तृतीयेला सोने घेऊ नका, वड पूजू नका, मंगळागौरीसाठी पत्री तोडू नका, गणपतीला दूर्वा वाहू नका, दिवाळीला डोंगर उपसून माती आणून किल्ले बांधू नका, होम हवन करू नका, चिता जाळू नका, नदीत आंघोळ करू नका, लग्नात अक्षता टाकू नका असे किती न केवढे उपाय करता येतील. :)