Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
सध्या प्रसारमाध्यमांत एक विषय चर्चेला असतो – तो म्हणजे ‘अफगाणिस्तानमध्ये काय होणार पुढच्या वर्षी?” यात अनेक उपविषय आहेत. अमेरिकन सैन्य माघारी जाणार का? तालिबानशी शांतता बोलणी होणार का? सत्तेवर कोण येणार? अमेरिका माघारी गेल्यावर जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार? भारत काय करणार? भारत अफगाणिस्तानला मदत करत राहणार का? अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा भारताची कुरापत काढणार का? अफगाणिस्तानमध्ये जे काही घडतं आहे किंवा घडणार आहे, त्याला भारताच्या दृष्टीने खरंच काही महत्त्व आहे का? मी अर्थातच अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालिबान, भारताचं परराष्ट्रीय धोरण या विषयांची अभ्यासक नाही. पण योगायोगाने गेले साडेतीन महिने काबूलमध्ये राहण्याची, इतर चार प्रांतांना भेटी देण्याची आणि अनेक स्थानिक स्त्री-पुरुषांशी, शासकीय अधिका-यांशी बोलण्याची संधी मला मिळाली. अफगाणिस्तानविषयक चर्चेत वास्तवाधारित भर घालण्याचा हा एक प्रयत्न. ***** “इंदी?” माझी कुणाशीही ओळख करून दिली की पहिला प्रश्न हा असणार याची मला अफगाणिस्तानमधल्या साडेतीन महिन्यांच्या वास्तव्यात सवय होऊन गेली होती. काबूल, मोहम्मद राकी (कापिसा), चरिकार (परवान), समंगन (आयबॅक), जोझजान, मझार ए शरीफ (बाल्ख) – शहर कोणतंही असो, प्रांत कोणताही असो, समोरची व्यक्ती शासकीय अधिकारी असो की सामान्य व्यक्ती असो हा प्रश्न येणारच. इंदी म्हणजे हिंदी – म्हणजे हिंदुस्तानी. मी होकार दिला की मग भारत-अफगाणिस्तान मैत्रीवर समोरची व्यक्ती हमखास बोलायचीच. आणि संवादाची अखेर “२०१४ मध्ये सगळे परत गेले तरी भारत मात्र आमच्या मदतीस राहील याची आम्हाला खात्री आहे,” असा आशावादही व्यक्त व्हायचा. या देशात मी जितक्या स्त्री-पुरुषांशी बोलले, त्यातले पन्नास साठ टक्के लोक उर्दू बोलू शकतात. यातले अनेकजण भारतात किमान एकदा तरी येऊन गेले आहेत आणि बाकीच्यांचं ‘एकदा तरी भारतात जायचं’ हे स्वप्न आहे. इथले लोक प्रामुख्याने व्यापार, औषधोपचार आणि शिक्षण या तीन गोष्टींसाठी भारतात येतात. एका स्त्रीने मला “आम्ही हनिमूनसाठी दिल्लीत गेलो होतो” असं अगदी आनंदाने सांगितलं. भारतात यायचं म्हणजे दिल्लीत असं नाही. पुणे शहरात दोन हजार अफगाण विद्यार्थी शिकतात – असं मला पुण्यात शिकून आलेल्या आणि सध्या चरिकार इथं एका एनजीओत काम करणा-या ‘सईद अब्दुल वहाब हशिमी’ असं लांबलचक नाव असणा-या तरुणाने सांगितलं. काहीजण पंजाब, असम अशा राज्यांतही शिकत आहेत. अनेक सरकारी अधिकारी विविध परिषदा, बैठका, प्रशिक्षण यासाठी भारतात जात असतात. दिल्लीतल्या प्रगती मैदानात आणि मुंबईत गोरेगाव परिसरात भरणा-या प्रदर्शनात इथल्या अनेक स्त्रिया आपली उत्पादनं विकतात. भारत त्यांच्यासाठी एक स्वप्न आहे, उद्या आपल्याला आपल्या देशात इतक्याच मुक्तपणे वावरता येईल अशी त्यांना आशा आहे. “भारतात आम्हाला फार चांगली वागणूक मिळाली’ असं सगळे लोक आवर्जून सांगतात. अर्थात इथल्या संदर्भात चांगली वागणूक म्हणजे पोलिसांनी न हटकणं, मोकळेपणाने प्रवास करता येणं, चित्रपट पाहता येणं, स्त्रियांना ‘चादर’ (चाचामधला चा) न घेता वावरता येणं – इत्यादी. गेल्या दहा वर्षांत भारताने या देशात अब्जावधी रुपयांची मदत दिली आहे. रस्तेबांधणी, विद्युतनिर्मिती, शिक्षण , वैद्यकीय सेवा – अशा अनेक क्षेत्रांत भारत सरकार मदत देते आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारतीय लोक काम करत आहेत. पण सामान्य अफगाण माणसाला या मदतीची माहिती असतेच अशातला भाग नाही. भारताचा दुसरा “अनियोजित” कार्यक्रम तिथं जोरात चालू आहे. तो म्हणजे हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिका. एफएम रेडिओ स्टेशनवर हिंदी गाणी चालू असतात. अनेक लोकांच्या मोबाईल रिंगटोन हिंदी गाण्यांच्या आहेत. आमच्या चालकाने एकदा काबूल शहरात दोन किलोमीटरचा वळसा घालून मला ‘अमिताभ बच्चन यहा आया था शुटिंग के लिये’ असं म्हणत ती जागा दाखवली आणि मी तो चित्रपट (बहुतेक ‘खुदा गवाह’) पाहिलेला नाही हे कळल्यावर करूण नजरेने माझ्याकडे पाहिलं होतं. इथं चित्रपटगृह आहेत – पण स्त्रिया अर्थातच तिथं जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत. त्याची कसर त्या टीव्हीवरचे चित्रपट आणि मालिका पाहून भरून काढतात. ‘बालिकाबधू’ वगैरे मालिकांबद्दल स्त्रिया भरपूर बोलतात. दोन संवेदनशील मुद्द्यांवर कुणाशीही बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण थोडी ओळख झाली की हे दोन मुद्दे लोक आपणहून बोलायचे. हे दोन मुद्दे लोकांच्या विचारविश्वात तरी एकेमेकांचा अटळ हिस्सा आहेत – तालिबान आणि पाकिस्तान. पाकिस्तान-अफगाण नातं गुंतागुंतीचं आहे. तालिबान राजवटीत अनेकांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतरण केलं होतं. भारतात यायचं तर विमानाने यावं लागतं – तो खर्च सगळ्यांनाचं परवडत नाही. पाकिस्तानमध्ये रस्त्याने जाता येतं. पाकिस्तानमधून कच्चा माल आणि तयार वस्तू आणण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आज अफगाणमध्ये इंग्रजी भाषा बोलणारे तीस ते चाळीस वयोगटातले अनेक स्त्री पुरुष आहेत (यांना आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये मोठ्या पगाराच्या नोक-या आहेत) आणि त्यातल्या बहुसंख्य लोकांच शिक्षण पाकिस्तानमध्ये झालं आहे. धार्मिक अफगाण लोकांना भारताबद्दल कितीही प्रेम असलं तरी भारतात जास्त संख्या आहे ती हिंदू लोकांची. आणि हिंदू म्हणजे काफिर. त्याउलट पाकिस्तान म्हणजे मुस्लीमबहुल देश – त्यामुळे तो जवळचा. भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही मोठ्या संख्येने अफगाण लोक आहेत. ब्रिटीशांनी लादलेल्या ड्युरंड सीमारेषेमुळे पश्तून समाज अफगाण आणि पाकिस्तानमध्ये विभागाला गेला आहे. अफगाणिस्तानने ही सीमारेषा कधीच मान्य केलेली नाही. एप्रिल महिन्यात पाकिस्तान काही ठिकाणी अफगाण सीमारेषेवर इमारती बांधल्या; त्याच काळात पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या. या काळात पाकिस्तानच्या विरोधात अनेक प्रांतांत मोठी निदर्शने झाली. लोकसहभागातून झालेली निदर्शनं शांततामय होती. भूतकाळाबद्दल चर्चा नाही केली तरी सगळी चर्चा २०१४ पर्यंत येऊन ठेपायाची. ‘२०१४’ हा अफगाणिस्तानमधला सध्याचा कळीचा मुद्दा आहे. एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी दोन टर्म्स पूर्ण केल्या असल्याने घटनेनुसार तिसरी निवडणूक लढवू शकत नाहीत. सर्वसंमतीचा उमेदवार ठरण्याची शक्यता अजिबात नाही, त्यामुळे निवडणूक अपरिहार्य आहे. त्याला जोडून प्रोविन्शियल कौन्सिलच्याही निवडणुका आहेत. ३४ प्रांत आहेत – तिथले उमेदवार ठरणं, निवडणुकांचा प्रचार आणि नि:पक्षपाती निवडणुका – हे सारेच असे मुद्दे आहेत की जिथं एरवीही शांततेचा भंग होतो. हा तर मुळातच अशांत प्रदेश. थोडीथोडकी नाही तर काही अपवाद वगळता सुमारे दोनशे वर्ष अशांत असणारा प्रदेश. त्यामुळे या संधीचा कोण गैरवापर करेल का हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच. दुसरं म्हणजे या निवडणुकीच्या आधी सगळं विदेशी सैन्य (इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टन्स फोर्स – आयएसएएफ) अफगाण भूमीवरून माघारी घेतलं जाईल असा सर्वानुमते बॉनमध्ये २०११ साली करार झाला आहे. २००१ पासून आयएसएएफ इथं आहे, २००३ पासून त्याची जबाबदारी ‘नाटो’कडे आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांचेही सैन्य आयएसएएफमध्ये नाही असे दिसते. या ‘ट्रान्झीशन’ची सुरुवात आधीच, २०१० पासून झाली आहे आणि टप्याटप्प्याने प्रांतातून पद्धतशीर सैन्य माघारी घेतली जात आहे. मार्च २०१४ च्या अखेरीस अफगाणच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णत: ‘अफगाण नॅशनल सिक्युरीटी फोर्सेस’ (एएनएसएफ) आणि त्याचाच भाग असलेली ‘अफगाण नॅशनल आर्मी’ (एएनए) यांच्याकडे येईल. नाटो सैन्याने आत्ताही ‘फक्त आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष मदत’ आणि ‘प्रशिक्षण’ या दोन भूमिका घेतल्या आहेत – ज्या सर्वानुमते ठरल्या आहेत. एएनए अफगाण सिक्युरिटी फोर्सेसचा एक भाग म्हणून २००२ मध्ये तयार करण्यात आली. सीमेचं रक्षण करणं, दहशतवादाशी मुकाबला करणं, बेकायदेशीर गटांचा नायनाट करणं आणि अफगाण पोलिसांच्या मदतीने अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं या एएनएच्या चार मुख्य जबाबद-या आहेत. आज एएनएचे बळ दोन लाखापेक्षा जास्त आहे (अफगाणची लोकसंख्या सुमारे साडेतीन कोटी आहे!) – ज्यात ३८० स्त्रियाही आहेत. एनएकडे ९६ लढाऊ विमानं आहेत आणि हवाईदलाचे बळ सुमारे ७००० आहे. हवाईदलात २७ स्त्रिया आहेत असेही एक बातमी सांगते. यासोबत २०१० मध्ये ‘अफगाण लोकल पोलिस’ (एलपी)ची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे दोन लक्ष प्रशिक्षित पोलिस आज काम करताहेत. पण अनेक ‘पोलिस’ प्रशिक्षण घेऊन कामावर रुजू झालेच नाहीत अशी संख्या बरीच मोठी आहे – त्यामुळे एएलपीच्या वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. अफगाण आर्मी आणि पोलिसांबद्दल विस्ताराने सांगायचं एक कारण आहे. अफगाणिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असतात. जून महिन्यात राष्ट्राध्यक्ष निवास, विमानतळ, सुप्रीम कोर्ट, एएनएसएफ चेकपोईंट अशा अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आत्मघाती पथकांनी हल्ले केले. यातल्या प्रत्येक हल्ल्यात दहशतवादी मारले गेले आणि त्यामुळे अफगाण आर्मी आता सक्षम झाली आहे असा निष्कर्ष अनेकजण काढताना मी ऐकलं आणि वाचलं. असा निष्कर्ष काढणारे अधिकृत अधिकारी होते – शासनाचे, सैन्याचे हा योगाग्योग नाही. कारण सामान्य माणसाचं या हल्ल्यांबाबत वेगळं मत आहे. आणि इथं पाकिस्तान परत येतो. या दहशतवादी हल्ल्यांबाबत तीन मतं दिसून आली. एक मत – तालिबान सशक्त आहे. मुल्ला उमरने म्हटलंय की, “नाटो सैन्य परत गेलं की आठवडाभरात मी काबूलवर (आणि पर्यायाने देशावर) कब्जा करेन” , यावर अनेकांचा विश्वास बसला आहे. मलाही तशी शक्यता वाटते. काबूल शहरात सध्या इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्ले होतात हे पुरेसं बोलकं आहे. दहशतवादी मारले गेले – यात काही नवल नाही – ते मरायलाचं आलेले असतात जाणीवपूर्वक! ते जाता जाता इतक्या लोकांना मारू शकतात हे चिंताजनक आहे. दुसरं मत – जे विनोदी वाटतं ऐकताना – पण खूप लोक मांडतात – ते म्हणजे हे दहशतवादी हल्ले म्हणजे अमेरिकेचा डाव आहे. असे हल्ले होत राहिले की परकीय सैन्याच्या मदतीविना आपला निभाव लागणं कठीण आहे असं अफगाण सरकारला वाटायला लागेल आणि मग नाटोने माघारी जाऊ नये अशी अधिकृत विनंती होईल. राष्ट्राध्यक्ष निवासावर झालेल्या हल्ल्यात हल्लेखोर नाटोची बोगस ओळखपत्र घेऊन आले होते आणि त्यांच्या अंगावर नाटोचे गणवेश होते – यावरून लोकांनी बहुधा असा निष्कर्ष काढला असावा. हे मत इतक्या मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळालं मला की तसा काही पुरावा माझ्यासमोर नसतानाही माझा त्यावर विश्वास बसायला लागला होता. अमेरिकेवर अफगाण लोकांचा किती राग आणि किती अविश्वास आहे हे यातून स्पष्ट दिसतं. नाटोच्या अनेक हल्ल्यात सामान्य निरपराध नागरिक मारले जातात आणि तरी आपण काही करू शकत नाही – ही अफगाण लोकांची हतबलता आहे आज – ती कधी हिंसेत बदलेल ते सांगता येत नाही. तिसरं मत आहे पाकिस्तानच्या सहभागाचं. तालिबान दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रयच नाही तर प्रशिक्षण आणि इतर सोयी मिळतात असं अनेक अफगाण लोक छातीवर हात ठेवून सांगतात. ‘आमच्या देशात शांती झाली तर त्यांना काय काम उरणार’ असं उद्वेगाने म्हणतात. पाकिस्तान इस्लाम म्हणून आपला, पाकिस्ताननं आपल्याला निवारा दिला म्हणून आपला – पण तोच पाकिस्तान आपल्या देशात दुफळी माजवतोय म्हणून त्यांचा राग – अशी मिश्र भावना पाकिस्तानबद्दल वारंवार आढळते. ‘या पाकिस्तानचं नेमकं करायचं काय’ असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर अफगाण आर्मीबद्दल असलेला विदेशी लोकांचा विश्वास मला अनाठायी वाटतो. एकदा एका मंत्रालयात माझी गाडी यायला उशीर झाला तेव्हा नाईलाजाने मला अफगाण पोलिसांबरोबर तासभर काढावा लागला. रमदानमुळे शासकीय कार्यालयं अर्धा दिवस काम करतात – जवळजवळ सगळे कर्मचारी गेले होते निघून. इथं रस्त्यावर एकटीने फिरणं अशक्य आहे आणि टॅक्सीने जाणं तर आणखी अवघड. अपहरण आणि खंडणी हा इथला एक मोठा व्यवसाय आहे. तर मोडक्यातोडक्या हिंदीत आम्ही गप्पा मारत होतो – मुख्यत्वे हिंदी सिनेमा हा विषय. तेवढ्यात मंत्रालयात आतून एक माणूस आला – तो स्टाफ असावा त्यांचा. मी तिथं बसलेली पाहून प्राथमिक चौकशीनंतर त्याने मला एकदम दरी भाषेत विचारलं, “पण तुमचं सरकार तालिबानला पाठिंबा का देत नाही, दिला पाहिजे’. मी अवाक् झाले आणि “दरी नाही” असं म्हणत गप्प बसले. ते अफगाण पोलिसही तितकेच उत्सुक होते तालिबानविषयी चर्चा करायला – त्याची खरं सांगायची तर मला भीती वाटली. अफगाण पोलिस किंवा आर्मीच काय इतर कितीतरी लोक तालिबानचे पाठीराखे आहेत असं दिसतं. काही भीतीने बोलत नाहीत तालिबान विरोधात – २०१४ मध्ये ते परत आले तर काय घ्या – असा विचार लोक करतात; पण अनेकांना मनातून तालिबानने फार काही चुकीचे केले असं वाटत नाही. एकदा एक शिकलेला, इंग्रजी बोलणारा, सरकारी अधिकारी असणारा पन्नाशीचा पुरुष मला म्हणाला, “स्त्रियांनी बुरखा वापरायचा आणि पुरुषांनी दाढी वाढवायची एवढे दोन त्रास सोडले तर तालिबान राजवट काही वाईट नव्हती”. हे मत कितपत प्रातिनिधिक आहे हे मला नाही सांगता येणार. पण काबूल शहरात हे मत ‘एक’ असेल तर देशाच्या अन्य भागात असं मत असणारे लोक संख्येने नक्कीच जास्त असणार! भारत-अफगाण संबध आज चांगले आहेत – शासकीय पातळीवर आणि लोकांच्या मनातही. ते असेच चांगले राहणं पाकिस्तानच्या योजनेत बसत नाही. त्यामुळे ३ ऑगस्टला जलालाबाद इथल्या भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काळजी वाढवणारा आहे. भारतीय राजदूत अमर सिन्हा यांच्या हत्येची सुपारी दिली गेल्याची बातमी वाचनात आली. त्यानंतर भारतीय राजदूतांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पण धोका आहेच. एकदा भारतीय लोकाना इथं ‘असुरक्षित’ केलं की भारताची अफगाणमधली आर्थिक गुंतवणूक आपोआप कमी होईल आणि मग अफगाण-भारत भावनिक नातं, आपुलकी पण कमी होईल असा प्रयत्न आहे. पुढच्या काळात भारतीय लोकांना ‘टार्गेट’ केलं जाईल अफगाणिस्तानमध्ये – अशी शक्यता आहे. मुळात “ज्यांनी सोमनाथ लुटलं आणि ज्यांनी कंदहारला विमान पळवून नेलं अशा अफगाणला आपण मदत करायची गरजच काय” असा प्रश्न अनेक भारतीयांना पडतो; अनेकांनी मी अफगाणिस्तानमध्ये काम करायला गेले तेव्हा नाराजी व्यक्त करत हे वाक्य मला ऐकवलेलं आहे. इतिहासाचा बदला घेता येत नाही असं माझं मत आहे. पूर्वी घडलेल्या गोष्टींचा हिशोब आज आपण अफगणिस्तानबरोबर चुकता करण्याची भाषा वापरत असू – तर ती एक घोडचूक ठरेल. अफगाणिस्तान आज जात्यात असेल तर आपण सुपात आहोत. लोकनियुक्त सरकार येणार, यादवी युद्ध होणार आणि तालिबान राजवट परत येणार अशा तीन शक्यता आहेत २०१४ मध्ये. या तीनही शक्यता सध्या तरी तितक्याच प्रबळ आहेत. २०१४ नंतर अफगाणमध्ये यादवी युद्ध झालं किंवा तालिबान परत आले तर ते दोन्हीही आपली डोकेदुखी वाढवणारं ठरेल. अफगाण शांत असणं, तिथे लोकशाही शासनप्रणाली असणं, अफगाणची आर्थिक स्थिती स्थिर असणं, अफगाणमध्ये धार्मिक उन्मादाचं वातावरण नसणं, अफगाणमध्ये चांगले रस्ते, शिक्षण आणि आरोग्यसेवा असणं – यासाठी खूप वाटचाल करावी लागणार आहे अजून. त्यासाठी आपली मदत लागेल त्यांना. असा ‘स्थिर’ अफगाणिस्तान केवळ अफगाण लोकांच्याच नाही तर भारताच्याही हिताचा आहे. झळ सोसूनही आपण अफगाणिस्तानला मदत केली पाहिजे. नाहीतर आज कंदाहार, गझनी, घोर.... या ठिकाणी जे घडतंय, ज्या अराजकाची तिथं शक्यता आहे – त्यापासून आपण काही फार दूर नाही. उद्याचा अफगाण आपल्याला आपण परवा कुठं असू त्या शक्यता सांगतो आहे. अफगाण लांब नाही – तो अनेक अर्थानी जवळ आहे आपल्या. *** अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

२७. राही, दुर्दैवाने श्री. फिरोझ रानडे यांचे सदर मी वाचलेले नाही. आणि आश्चर्य म्हणजे 'काबूलनामा'चा उल्लेख श्रीमती रानडे आणि श्री. दामले यांच्या कोणाच्याही पुस्तकात असल्याचे मला आठवत नाही - पुन्हा तपासून पाहते. हे पुस्तक माझ्या वाचनात आले नाही अद्याप. (अवांतरः मी काबूल अनुभवावर पुस्तक लिहिले तर त्याला 'काबूलनामा' हे नाव द्यायचे ठरवले होते, ते आता बाद! हे मी गंमतीने म्हणते आहे हे लक्षात घ्यालच तुम्ही!) 'कमानकला' हा शब्द आवडला. २८. सखा, 'ईराणबद्दल अधिक माहिती देणारा लेख'?? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. २९. अनिरुद्ध प, हो, अफगाण 'युद्धभूमी' आहे. कधी, कुठं, काय घडेल हे काहीच सांगता येत नाही. मी तिथं असताना विविध दहशतवादी हल्ल्यांच्या ज्या घटना झाल्या त्यावरुन तिथली परिस्थिती भयावह आहे - असं मी नक्की म्हणेन. ३०. प्रदीप, धन्यवाद. बाकी तुमच्या अवांतराच्या निमित्ताने या धाग्यावर पुढं अवांतर होऊ नये ही आशा :-)

अफघाण स्त्रियांची अवस्था तालिबानी राजवटीत फारच वाईट होती. रशियन राजवटीत कित्येक जणींचे नवरे मारले गेले होते तेंव्हा त्या तेथील बेकर्यांमध्ये खुब्झ (KHUBZ) नावाचा पाव (नान सारखा असतो)भाज्ण्यासारखी कामे करीत असत.तालिबानी राजवटीने पुरुषाशिवाय स्त्रियांना घराबाहेर पडण्यास बंदी केली होती. त्यामुळे अशा सर्व विधवा बायकांची उपासमारीने मारण्याची पाळी आली होती. त्यांच्या जवळ वेश्याव्यवसाय करण्याशिवाय दुसरा उपाय राहिला नव्हता. हा व्यवसाय सुद्धा चोरी मारीने करावा लागे कारण पकडले गेले तर मृत्यू दंडच. शिवाय त्यांच्या कडे जाणारे ग्राहक म्हणजे तालीबानीच होते. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. स्त्रिया स्वतःला सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी फार कष्ट करीत असत याचे कारण केंव्हा नवरा सवत घेऊन येईल किंवा तीन वेळा तलाक म्हणून पहिल्या पाळीनंतर घराबाहेर काढेल याची भीती कायम मनात असे. आणि अशा तलाक पिडीत स्त्रियांचे हाल कुत्रा खात नसे. संततीनियमन हे जवळ जवळ अस्तित्वात नाहीच. त्यामुळे अशा स्त्रीला मुलाबाळासकट घराबाहेर काढले तर तिची परिस्थिती काय होते हे पाहिल्यामुळे त्या स्त्रिया सतत धासाताव्लेल्या असत. कुपोषण, रोगराई आणि अशिक्षितपणामुळे आलेले मागासले पण यामुळे स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय आहे. परकीय राजवटीमुळे आलेली थोडीफार स्थिरता किती दिवस टिकेल आणि जर परत तालिबानची राजवट आली तर आपली काय अवस्था होईल या भीतीमध्ये आजही अफगाण स्त्रिया आहेत.

इस्लाम मध्ये पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या यादवीमुळे (काफिल्यां मधल्या टोळी युद्धामुळे) सातत्यानं पुरुष मारले गेल्यानं पुरुषांची संख्या कमी असायची. त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांची संख्या जास्त नि त्यांना कुणीतरी पालनहार हवा म्हणून चार पर्यंत लग्नांना परवानगी असा प्रकार होता. सगळ्या धर्मांच्या गैरवापरा प्रमाणं ह्याचाही वापर चुकीच्या मार्गानं होऊ लागला. पहिल्या बायकोच्या परवानगीनंतरच, अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या आईवडलांचा खर्चाचा भार हलका करण्याच्या दृष्टीनं स्वतःच्या आधीच्या बायकोचा नि नवीन स्त्री चा सांभाळण्याचा खर्च करण्याची कुवत असलेला, नि अशाच आणखी सामाजिक अटी पूर्ण करु शकणारा पुरुषच अशा प्रकारची अधिकची लग्नं करु शकतो अशी माहिती इथं ऐकली आहे. २००२-०३-०४ मध्ये अफगाणिस्तानात काम केलेला माझा मित्र नि त्याच्या बरोबरचे एक दोघे बँकेतल्या/ मनी एक्स्चेंजमधल्या मुलीशी गुपचूप संधान बांधून पैसे देऊन (डॉलर्स) मुलीच्याच आईवडलांना खाली पहार्‍याला ठेवून तिच्याच घरी 'कार्यक्रम' आटोपून आलेला आहे. ही तिथली तेव्हाची सामाजिक स्थिती होती. (ही सत्यघटना आहे) आज अल्जिरिया मध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. चार आठ वर्षात पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न करायला बाशिंग बांधून पुरुष तयार असतात, स्त्रिया कष्टाळू तर पुरुष कामाला अळम्टळम करणारे असे दिसतात. जास्त न शिकता ड्रायव्हर, सेक्युरिटी, कामगार म्हणून असलेला वर्ग जास्त. ड्रायव्हरची गर्लफ्रेण्ड डॉक्टर किंवा उच्चशिक्षित नोकरी करणारी असेही प्रकार बर्‍यापैकी. अविवाहीत अथवा नंतर एकट्या असलेल्या महिलांची संख्या ही लक्षणीय. असा सगळा प्रकार आहे.

आज अल्जिरिया मध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. चार आठ वर्षात पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न करायला बाशिंग बांधून पुरुष तयार असतात, स्त्रिया कष्टाळू तर पुरुष कामाला अळम्टळम करणारे असे दिसतात. जास्त न शिकता ड्रायव्हर, सेक्युरिटी, कामगार म्हणून असलेला वर्ग जास्त. ड्रायव्हरची गर्लफ्रेण्ड डॉक्टर किंवा उच्चशिक्षित नोकरी करणारी असेही प्रकार बर्‍यापैकी. अविवाहीत अथवा नंतर एकट्या असलेल्या महिलांची संख्या ही लक्षणीय. असा सगळा प्रकार आहे.
रोचक! हा फ्रेंच प्रभावच असणार.

टक्केवारी निश्चित ठाऊक नाही मात्र बहुतांश (९५% च्या वर निश्चित ) मुस्लिम आहेत. आम्हाला पहिला प्रश्न 'मुजेल्मा'? असा असतो. नाही म्हटल्यावर, 'इन्शाल्लाह वन डे यु विल बी मुस्लिम' असं मोडक्या तोडक्या इंग्रजीत सांगितलं जातं. अफगाणिस्तान आज भोगतंय ते ह्यांचं (अल्जिरिया वाल्यांचं) आधीच भोगून झालंय. १९६१ ला अल्जिरिया फ्रेंचांकडून मुक्त झाला. त्यानंतर बरं होतं. पण ८० च्या दशकात दाढीवाले मूलतत्ववादी म्हणून ओळखतात त्या प्रकारच्या लोकांनी सत्ता बळकावली. नंतर दाढी नाही म्हणून मार, अमुक पोशाख नाही म्हणून मार, स्त्रियांनी बुरखा घातला नाही म्हणून मार असे उद्योग केलेले आहेत. १५-२० वर्षे यादवी झाल्यावर 'लिबरल' सरकार येऊन सगळी कडे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते बरेच यशस्वी झाले आहेत. अंतर्गत भागांमध्ये एक दुकटे फिरु नका असं आजही सांगितलं जातं. आज देखील नाक्या नाक्यांवर एके ४७ घेऊन 'क्लिन शेव्हन' मिलिटरी वाले आहेत. घरातल्या एकाला आर्मीमध्ये दोन वर्षे काढणं सक्तीचं आहे. थोडं अवांतर आहे मात्र अफगाणिस्तानचं नि अल्जिरियाचं दुखणं बरंचसं सारखं वाटलं म्हणून लिहीलं. अल्जिरिया आज उत्तर आफ्रिकेमध्ये सगळ्यात शांत प्रदेश ओळखला जातो. अफगाणिस्तानला कधी असं भाग्य लाभेल कुणास ठाऊक!

नाही म्हटल्यावर, 'इन्शाल्लाह वन डे यु विल बी मुस्लिम' असं मोडक्या तोडक्या इंग्रजीत सांगितलं जातं.
नो आय वोंट असे सांगून पाहण्याची इच्छा आहे. पण तशा देशांत त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. बाकी तुम्ही दिलेली माहिती रोचक आहे. अफगाणिस्तान अन अल्जीरियाचे प्रश्न सारखे वाटताहेत पण अल्जीरियावर आम्रिका नामक महा** देशाचा डॉळा तितका नसावा असे वाटते. अफगाणिस्तानची पार छल्ली केलीय आम्रिका अन अन्य लोकांनी ८० च्या दशकापासून. इन्शाल्लाह गांधार रिकव्हर होईल पण किती वेळ लागेल काय की.

आम्रिकेचा डोळा नाही असं कसं शक्य आहे? (लाईक : हमारे रेहते इतनी बडी हो गयी, और हमे पता नही ? - ऋषी कपूर इन अग्निपथ) पण फ्रान्स कधीचाच घरोबा असलेला आहे ना! तो नाही घुसू देत आम्रिकेला. फ्रेंचांनी सत्ता ताब्यात दिली पण बाहेरुन सूत्रे तेच हलवत असतात असं ऐकिव आहे. अण्वस्त्रधारी फ्रान्स अमेरिकेला सहजी घुसू देत नाही हे निश्चित. पाण्यापेक्षा (२० दिनार प्रति लिटर) कमी दर असलेलं डिझेल (१३.५० दिनार) नि पेट्रोल (२३.५० दिनार प्रति लिटर) उपलब्ध आहे नि गोर्‍यांचा डोळा नाही? असंभव! (१.४ दिनार= १ भारतीय रुपया)

पण फ्रान्स कधीचाच घरोबा असलेला आहे ना! तो नाही घुसू देत आम्रिकेला. फ्रेंचांनी सत्ता ताब्यात दिली पण बाहेरुन सूत्रे तेच हलवत असतात असं ऐकिव आहे. अण्वस्त्रधारी फ्रान्स अमेरिकेला सहजी घुसू देत नाही हे निश्चित.
हेच असणार, दुसरे कारण संभवत नाही. आम्रिकेचा डॉळा नसेल असे म्हणण्याचे कारण असे की अल्जीरियाची "बातमी" इतकी येत नाही कधी प्रकाशात. तुम्हाला जास्ती माहिती असेलच अर्थात, पण फारशी कधी न्यूज वाचलेली आठवत नाही म्हणून म्हणालो इतकेच. आम्रिकेचा ज्यांच्यांवर जीव असतो त्यांची न्यूज कायमच येते, नै का. बाकी गोर्‍यांच्या डॉळ्याबद्दल दुर्दैवाने सहमत आहे. :(

स्नेहांकिता:--अफगाण स्त्रियांचे जीवनमान आणि समाजातील स्थान याविषयी वाचावयास आवडेल... लोकमतच्या दीपोत्सव (२०१३) दिवाळी अंकाचा विषय आहे "युद्धाच्या कचाट्यात सापडून अखंड घुमसणाऱ्या माणसांच्या शोधातला एक अस्वस्थ प्रवास". त्याला धरून समीर मराठे यांचा “मुक्काम काबूल” हा लेख वाचनीय आहे. विध्वंसाची राख झटकून उठण्यासाठी धडपडणाऱ्या अफगाणिस्तानातल्या [मुलींच्या] शाळांमध्ये आकाराला येते आहे एक शुभ वर्तमान. त्याची live बखर या लेखात सापडते.

आभारी आहे या माहितीबद्दल. या लेखाची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे का? लेखाखाली श्री समीर मराठे यांचा ईमेल अथवा फोन नंबर असल्यास तो तुम्ही देऊ शकाल काय? (ही माहिती लेखात असेल तर ती सार्वजनिक असणार.)

खूप संतुलीत सुंदर लिखाण. अफगाणी माणसाची प्रतिमा सुदैवाने भारतात तरी चांगली आहे. अफगाणी लोकाम्च्या जीवनशैलीबद्दल थोडे लिहाना. तेथील प्राथमीक शिक्षण , मुलीना मिळणारी वागणूक ( मी थ्री कप्स ऑफ टी नावाचे एक पुस्तक वाचले त्यात एक अमेरीकन पाक्/अफगाण/काश्मीर सीमेवरच्या गावात मुलींच्या शिक्षणाची सोय करतो. तेथील लोकही त्याला पाठिंबा देतात असे काहीसे होते. तेसुद्धा कारगील युद्धाच्या सुमारास चे वर्णन आहे)

लेख आवडला. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भाशिवायही इतर गोष्टी म्हणजे हवामान, वेशभूषा, राहणीमान आणि अन्य बारीक-सारिक प्रसंग खास आतिवासशैलीत वाचायला आवडतील.

अफगाण हा आपला लाडका देश आहे. १. भीष्माने गांधारीच्या बाबांना धमकी दिली की आमच्या आंधळ्या ध्रुतराष्ट्राला तुझी पोरगी दे न्हायतर तुझा गेम करु. याचा सूड उगवण्यासाठीच शकुनी भारतात आला आणि त्यानंतर अख्ख्या इतिहासात अफगाणिस्तानच्या पोरींकडे वाकडं बघायला कुणी गेलं नाही. शकुनीच्या देशप्रेमाला सलाम. २. त्यानंतर तोच कित्ता अब्दालीने गिरवला. पानिपतात कापले. ३. अफझुलखानही तिथलाच होता. हा देश भारतापासून न तुटला तर छान झालं असतं असं उगाचच वाटून जातं.

अफजुलखान तिथला होता???? याबद्दल साशंक आहे. असे कुठे वाचल्याचे आठवत नाही. त्याची आई भटारीण होती अन हलाखीच्या परिस्थितीतून तो मोठा झाला इथवरच ठौक आहे.

उद्दाम, तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते महत्त्वाचे आहेत; त्यासाठी नवा धागा सुरु करावा ही विनंती. म्हणजे तुम्हाला इथं ते मांडण्याचं स्वातंत्र्य वगैरे नाही असं मला काहीही सूचित करायचं नाहीये. पण माझ्या धाग्यावर प्रतिसाद आले तर ते वाचणं आणि आवश्यकता असल्यास स्पष्टीकरणं देणं हे माझं काम आहे. पण प्रतिसाद जर दुस-या विषयाकडे जात राहिले (ते विषय महत्त्वाचे नाहीत असं माझं म्हणणं नाही) तर मला कठीण जाईल - कृपया मला मदत करावी :-)

>>त्यानंतर अख्ख्या इतिहासात अफगाणिस्तानच्या पोरींकडे वाकडं बघायला कुणी गेलं नाही. -- गरजच पडली नसावी. तिथल्या पुरुषांनीच काय वाटोळं करायचं ते केलं :( >>त्यानंतर तोच कित्ता अब्दालीने गिरवला. पानिपतात कापले. -- हो ना. पण थोडी आणखी मेहेनत करायला हवि होती त्याने. कारण त्यानंतर मराठेशाहिचा झेंडा भारतभर रोवला गेला, अब्दालीचा नाहि. >>अफझुलखानही तिथलाच होता. -- म्हणुनच सह्याद्रीत मस्ती करायला आला आणि हकनाक मारला गेला. तिथेच असता तर चार दिवस आणखी जगता बिचारा.

३१. सुबोध खरे, तालिबान राजवटीतल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दल पुरेसे साहित्य/माहिती आता उपलब्ध आहे. मी काही स्त्रियांकडून जे काही ऐकले ते अस्वस्थ करणरे होते! ३२. विजुभाऊ, लिहिते पुढे कधीतरी. ३३. नगरीनिरंजन - हं! 'माझ्या शैलीत' अनेक गोष्टी सांगता येतील म्हणा :-) आभार चाणक्य, श्रीनिवास टिळक आणि उद्दाम.

आजच्या 'हिंदू' मध्ये अफगाण विधवांसोबत काम केलेल्या एका मानववंशशास्त्रज्ञ स्त्रीची मुलाखत आहे. (एका मित्राने दुवा पाठवला आहे.)

The U.S. military will still be present, aid will be reduced. या लेखातील वरील वाक्य वाचले आणि मला "Charlie Wilson's War" हा चित्रपट आठवला. अफगाण विषयावरीलच हा हॉलीवूडपट (अर्थात आर्ट फिल्म नाही पण) सत्यघटनेवर आधारीत आहे. रशियाचे अफगाणवर झालेले आक्रमण आणि त्यासंदर्भात केलेली कोट्यावधी डॉलर्सची अमेरीकन शस्त्रास्त्रांची मदत.... ती ज्या अमेरीकन काँग्रेसमन मुळे मिळाली त्या चार्ली विल्सनची गोष्ट. टॉम हँक्सने ही भुमिका केली आहे. अक्षरशः त्याच्या शेवटच्या दोन-तीन शब्दांच्या वाक्यात या कथेचा शेवट आणि पुढे वास्तवात घडलेल्या इतिहासाची सुरवात आहे. वरचे वाक्य वाचून इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे वाटले...

फार म्हणजे फार आवडलाय. आणि सगळे मुद्दे अर्थात पटले. अफगाणिस्तानी मित्रांनी आणलेल्या सुक्या मेव्याची गोडी अजून जिभेवर रेंगाळते आहे. माझ्या पुढच्या अनेक पिढ्यांना तो तसाच लाभूदे ही इच्छा.. :)

अत्यंत सुंदर लेख आहे. तुम्ही अफगाणिस्तानात ३/४ महिने राहून आलात म्हणजे खरंच ग्रेट आहात! अफगाणिस्तान स्थिर रहाणे ही भारताची गरज आहे तशीच त्यांना मदत करत रहाणे हीसुद्धा आहे. चीनला बफर म्हणून नेपाळला वापरणे क्रमप्राप्त आहे तसेच पाकिस्तानच्या दुसर्‍या बाजूच्या सीमेवरून पाकिस्तानवर दडपण ठेवण्यासाठीही अफगाणिस्तानला मदत करीत रहाणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानला परत सार्वभौमत्व मिळाले की पाकिस्तान त्यांच्यावर सर्व मार्गांनी वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करील. त्याला भारत कसा तोंड देतो हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.

या गोष्टी म्हणजे पावर गेम आहेत. अमेरिकेला आशियावर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानची गरज आहे कारण त्यांना भारत द्वेशाशिवाय राजकारण माहित नहि. अजून एक म्हणजे वेपन्स बनवणारी लॉबी अमेरिकेत आहे. जर असे युद्ध वगैरे झाले नाही तर कारखाने बंद पडतील अन दुसरीकडे अमेरिका आर्मी पाठवू शकत नहि… त्यामुळे मिडल इस्ट क्रायसिस असाच राहणार. सामान्य लोकांना अशा राजकारणात काडीची किंमत नसते

३८. प्यारे १, अल्जिरियातील परिस्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. काही बाबतीत अफगाणिस्तानशी त्यात साम्य दिसतंय. तुम्ही अल्जिरियावर स्वतंत्र लेख लिहावा (लिहावेत) अशी या निमित्ताने विनंती आहे. ३९. पिशी अबोली, हो, सुका मेवा आणि फळं - ही माझ्याही आठवणीत राहतील... ४०. पैसा, २०१४ च्या लोकसभा निवडणूकांचे निकाल काहीही लागोत, भारताची 'अफगाण नीति' फार बदलणार नाही, अशी आशा आहे. ४१. शिल्पा ब, जगात कुठं ना कुठं युद्ध चालू राहण्यात अमेरिकेचा फायदा आहे - असं आहे खरं! :-( ४२. निरंजन, धन्यवाद.

इतका सुंदर लेख या आधी कदाचित नजरचुकीमुळे वाचायचा राहुन गेला होता. अफगाणिस्तानपद्धल, किमान मराठीत तरी, इतका सुरेख लेख पहिल्यांदाच वाचला. 'अफगाण डायरी' आणि 'अवघड अफगाणिस्तान' ही पुस्तके वाचायचा अजुनतरी योग आला नाही आहे.