Welcome to misalpav.com
लेखक: यशोधरा | प्रसिद्ध:
हिमालय. त्याचं वेड लागतं. नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं. हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण. कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्‍या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्‍या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्‍या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्‍या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्‍या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्‍याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता. अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो. घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं? त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स! आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय.... “There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.." ***** सप्टेंबर २०१३ मध्ये मी काश्मीरमध्ये सोनमर्गच्या पुढे हिमालयामध्ये एक ट्रेक केला, त्या दरम्यान काढलेल्या प्रकाशचित्रांपैकी काही.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सुरेख वर्णन आणि स्सही फोटो. ''कधी खळाळत वाहणारे झरे'' पासून ते ''आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा'' पर्यंत आलेलं वर्णन केवळ क्लास. बाकी, लेख आवरल्यासारखा वाटतोय. अर्थात पुढील भाग असेल तर प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निव्वळ सुरेख फोटो! डोळ्याचे पारणे फिटलं.!! बहुत दिसापासून या फोटो आणि लेखाची वाट पाहत होतो. शेवटून दुसरा...नाही शेवटाचा, नाही नाही...तिसरा.! जाऊ दे...सगळेच फोटो स्वप्नवत आले आहेत. :)

सुंदर शब्दांत हिमालयाबद्दलची भावना पकडली आहे ! फोटोही सुंदरच ! एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.

सुंदर शब्दांत हिमालयाबद्दलची भावना पकडली आहे ! फोटोही सुंदरच ! एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.

तू तिकडेच वस्ती कर. आठवडाभर फिरुन विकेंडला असे धागे टाक. आमच्या आठवडाभराच्या मौसगीके लिए इतना काफी असेल. निव्वळ अप्रतीम.

सगळचं अप्रतिम आहे, फोटो तर क्लासचं, तिथ प्रत्यक्षात बघताना तर काय होत असेल. खरचं भाग्यवान आहेस तु,तुला हे सगळं अनुभवता आलं. खूप दिवस वाट पहात होते याची.

यशोधरा .. अप्रतीम फोटो अन मुक्तकहि.. मस्ट से .. काण्ट अग्री मोर ! हिमालय अन त्याच्या पायथ्याचा परिसर .. हिमाचल, गढवाल्-कुमाउं-ऊत्तरांचल अन थेट पूर्वे़कडे कालिम्पोंग-दार्जीलिंग, गंगटो़क ..सगळिकडची त्याची जादू अनुभवलीये... यातला कुठला अधीक सुंदर असा प्रश्न पडावा.. हिमालय म्हंटले की डोळ्यापुढे हिमशिखरांच्या रांगा येतात .. पण तुमच्या फोटोंमधून जाणवणार्‍या .. त्याच्या कुशीत लपलेल्या हिरवाईची अन खळखळणार्‍या पाण्याचीहि तितकीच किमया आहे .. जसेहि ऊत्तरेकडून पूर्वोत्तराकडे जावे, तस-तसे ठिक्-ठिकाणाचे वेजीटेशन( मराठि??) बदलते पण जादू तीच ! असे फोटो पाहिले कि एकच प्रश्न पडतो .. आता परत कधी जमेल..??? -पहाटवारा

काय क्लास फोटो आहेत.. बरेच फोटो पाहून फोटोच आहेत की चित्रे की आणखी काही.. निव्वळ अप्रतिम... आपण कुठल्यातरी शहरी खुराड्यात राहतोय असे वाटायला लागलेय हे बघून..

यशोधराबाई, अतिशय सुन्दर लिखाण. तुम्ही शब्दातून उभा केलेला हिमालय तितक्याच प्रभावीपणे प्रकाशचित्रातुन सादर केलाय. शब्द-चित्रान्च्या अप्रतिम मिलाफाचा उत्तम नजराणा सादर केलाय. त्याबद्दल धन्यवाद. @ इ.ए. तुम्ही म्हणालात 'एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.' सहमत, त्याची मनाला एक आस लागुन राहते, हिमालय पाहिला की स्वता:ला विसरायला होते हे खरे. विनोद१८

ताई ट्रेक बद्दल अजुन माहीती दिलीस तर बरे होईल.. म्हणजे ट्रेक चं स्वरुप, ट्रेक कोण अरेंज करतं, मार्ग कसा आहे, वगैरे वगैरे...

वर्णन आणि फोटो - दोन्ही अप्रतिम! दोनेक महिन्यांपूर्वी हिमालयाचं निवांत दर्शन घ्यायचा सुदैवाने योग आला होता; त्यामुळे वाचताना अनेक खुणा पटत गेल्या.

अत्युत्तारस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:। पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थित: पृथिव्या इव मानदण्ड:॥

हे वर्णन वाचून दुर्गाबाई भागवत यांच्या " ऋतुचक्र" ची आठवण यावी इतकं दर्जेदार लेखन आहे.प्रकाशचित्रेही भारीच आलीयत. इथे काही फिल्टर्स वापरले आहेत काय? कारण मधे वातावरण येकदम किल्यर दिसतेय म्हणून . हिमालयावरून एक आठवले- ओ पी च्या संगीतात कश्मीरातील हिमाल दिसतो. रवींच्या कुमाउतला तर एस डी आर डी च्या मधे पूर्वांचल मधला. 'डोळीयासी शीतलता मनासी शांतता हिमालयाची ही महता तोचि भारताचा त्राता ' असे म्हणावेसे वाटते.

वर्णन करायला शब्द संपले. अवर्णनीय म्हणता येइल. काय सुरेख फोटो आहेत. काश्मीरला जाउन आलो आहे आणि फोटोही काढलेत. ते चांगले काढले आहेत असे माझे मत आहे. होते. हे फोटो पाहिल्यावर मी त्या काश्मीरवर आणि हिमालयावर किती अन्याय केला आहे ते कळाले. निव्वळ सुख. दुसरा शब्दच नाही.

हिमालय हा स्वर्गच आहे, आणि तो तुम्ही मूर्तिमंत उभा केलाय. आधी मुक्तकातून आणि त्यानंतर उत्कृष्ट फोटोंतून. तुमचे फोटो पाहिल्यावर आमचा कॅमेरा कायमचा म्यान करावासा वाटतोय.