Welcome to misalpav.com
लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः| न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्|| हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा भाग आहे. सर्वसाधारण योगाभ्यासी मंडळींना हठप्रदीपिका माहीत नसली आणि त्यावाचुन फारसं काही अडत नसलं तरी या लिखाणाच्या अनुषंगाने त्याबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंपरेत योगाचे अनेक प्रकार मानले जातात. राजयोग, हठयोग, ध्यानयोग, नादयोग वगैरे. यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत. याचा अर्थ हा की हठयोग हा प्रामुख्याने, शरीर, शारीरिक आसने, प्राणायाम, धौति, नेती, बस्तिसारख्या क्रिया यादिशेने जाणारा मार्ग, तर राजयोग हा मन, चित्त, बुद्धी, वृत्ति, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान याकडून समाधिकडे नेणारा मार्ग असा फरक या दोन्ही मार्गांमध्ये परंपरेने केला जातो. अशा तर्हेचा फरक जरी केला जात असला तरी खुद्द परंपरेनेच येथे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांकडे जाण्यापुर्वी एक मह्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे ती ही की हे प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यामुळे निर्माण होणार्या विविध शक्यता, त्यातील खाचाखोचा हे सारं काही माहीत नसताना देखिल लोक योगाभ्यास करत आले. त्याचे फायदे त्यांना मिळत राहीले. पण म्हणून हे प्रश्न बिनमहत्त्वाचे नाहीत. काही एका विशिष्ट भुमिकेवर येण्यासाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग आहे. “हठयोगाशिवाय राजयोग सिद्ध होत नाही आणि राजयोगाशिवाय हठयोगात सिद्धि नाही यास्तव दोन्ही योगमार्गांचा योग्य असा अभ्यास करावा” असा वरील श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ आहे. मात्र या साध्या अर्थातदेखिल बराच आशय लपलेला आहे. हा श्लोक अनेक गोष्टी सुचित करतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हठयोग व राजयोग हे दोन पुर्णपणे वेगळे, स्वतंत्र मार्ग आहेत. दुसरी, केवळ एका मार्गाने गेल्यास संपूर्ण यश मिळत नाही. तिसरी, कुठल्याही एका मार्गात संपूर्ण यशस्वी व्हावयाचं असल्यास, दुसर्या मार्गाची मदत घ्यावीच लागते. चौथी, दोन्ही मार्ग परस्परावलंबी आहेत. पाचवी, योग सिद्ध होण्यासाठी दोन्ही मार्गांचा योग्य अभ्यास करावा. सहावी, कुठलाही एक मार्ग दुसर्यापेक्षा श्रेष्ठ नाही. सर्वसामान्य योगाभ्यासी मंडळींना वरील बाबी फारशा महत्त्वाच्या वाटणार नाहीत. परंतु जी मंडळी “आम्ही ध्यान करतो” म्हणत असतानाच आसनांना कळत नकळत खालचा दर्जा देतात किंवा सुरवातच प्राणायामापासुन करतात अशांना वरील निष्कर्ष खटकण्याची शक्यता आहे. याला कारण आहे. शरीर म्हणजे स्थूल, मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म, मनाचा अभ्यास हा जास्त वरच्या दर्जाचा, शरीराकडुन सुरवात स्थूल बुद्धीची माणसं करतात. आसनं म्हणजे निव्वळ शारीरिक कसरत. हठयोग म्हणजे हट्टाने, जोरजबरदस्तीने केलेला योग. आसन प्राणायामापेक्षा ध्यान वरच्या दर्जाचे. अशा अनेक समजुती अशा मनोवृत्तीमागे असतात. ध्यानासाठी पद्मासनाची आवश्यकता नाही असं काही ठिकाणी आवर्जून सांगण्याची प्रथा आहे. यामागे जी माणसं पद्मासन करु शकत नाहीत त्यांचा उत्साह टिकावा असा चांगला उद्देश असेलही कदाचित पण त्यामुळे एकंदरीतच आसनं महत्त्वाची नाहीत, आसनांचा अभ्यास न केल्याने फारसं काहीच अडत नाही अशी समजूत मात्र वाढीस लागते. जी माणसं काही मर्यादेपर्यंत प्रयत्न करायला तयार असतात तीदेखिल आसनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे ही सर्व माणसं आसनांच्या अभ्यासामुळे प्राप्त होणार्या असंख्य मनोकायिक लाभांपासून वंचित राहतात. आसन, प्राणायाम आणि ध्यानाचा विचार येथे फक्त तत्त्वतः करण्यात येत आहे हे लक्षात घेतलेले बरे. त्यातल्या तंत्रात शिरण्याची येथे आवश्यकता नाही. खरा प्रश्न आधी शरीर की आधी मन हाच आहे. राजयोग की हठयोग हा प्रश्न निव्वळ मार्गांचा नसून मनोवृत्तीचादेखिल आहे. याबाबत आपले परंपरागत ग्रंथ काय म्हणतात हे पाहणं उद्बोधक ठरेल. (क्रमशः) अतुल ठाकुर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

‘शरीरं आद्यं खलुधर्मसाधन्।’ : महाकवी कालिदास म्हणजेच कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी, शरीराची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर शरीराची साथ नसेल (किंवा शरीर जर्जर झालेले असेल)तर कितीही प्रयत्न केला तरी मनाची एकाग्रता होणार नाही. त्यामुळे शरीर चांगल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्रिदोष संतुलित ठेवणे व त्यासाठी हठयोग पहिल्या पायरीवर महत्त्वाचा वाटतो. स्थूलातून सूक्ष्माकडे जाणे हि दुसरी पायरी, ज्यात राजयोगाचे महत्त्व आहे. अर्थात दोन्ही प्रकार आवश्यक आहेत हेच खरे. धन्यवाद, फार छान विषय व मांडणी आहे ह्या लेखाची.

यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत. याचा अर्थ हा की हठयोग हा प्रामुख्याने, शरीर, शारीरिक आसने, प्राणायाम, धौति, नेती, बस्तिसारख्या क्रिया यादिशेने जाणारा मार्ग, तर राजयोग हा मन, चित्त, बुद्धी, वृत्ति, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान
हठ्योगात धौति, नेती, बस्तिसारख्या क्रिया येतात ? राज योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ह्या गोष्टी येतात? पुन्हा तपासून पहा ... धौति, नेती, बस्ति ह्या केवळ शरीर स्वछतेच्या क्रिया आहेत. हठ्योगात त्या येत नाहीत . तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ह्या सगळ्या गोष्टी हठ्योगात येतात . राजयोगात काय काय समाविष्ट करायचं हे साधक ठरवत नाही. त्यामुळे साधक यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ह्या गोष्टी मुद्दाम करत नाही. कुंडलिनी ला वाटलं तर ती हे त्याच्याकडून करवून घेते.

काहीतरी गल्लत होते आहे असे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे हठयोग म्हणजे जीणीवपूर्वक/ बलपूर्वक केलेला प्रयत्न. त्यामुळे "यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा" या सर्व गोष्टी हठयोगात येत असणार असे मला वाटते. कारण या सर्व गोष्टी "केल्या" जातात. असो. "धौति, नेती, बस्ति" या गोष्टी पण हठयोगात असणार, कारण शरीरशुद्धी हे देखील योगाचेच एक अन्ग आहे. राजयोग म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे केवळ मनोलयावर आधारलेला आहे, त्यामुळेच हठयोगाला देखील राजयोगाशिवाय पूर्णत्व आहे. परंतु हे पण तेव्हढेच सत्य आहे की मन शुद्ध होऊ लागले की "यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा" या गोष्टी आपोआपच पाळल्या जातात, त्यामुळे या गोष्टी राजयोगाचा पण भाग आहेत असे म्हणण्यास वाव असावा. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे, याला कोणत्याही ग्रंथाचा आधार असेल तर मला माहीत नाही.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ह्या सगळ्या गोष्टी हठ्योगात येतात .??????????? पातंजल योगसुत्रात अष्टांग योगाचा उल्लेख आहे. आणि त्यालाच राजयोग म्हणतात. तुम्हीच तपासुन पाहा.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ह्या सगळ्या गोष्टी हठ्योगात येतात .???????????
हो. बरोबर आहे. हेच तर मी म्हणलाय न. माझ्या वाक्यापुढे प्रश्न चिन्ह नाहीये. ह्या गोष्टी हठ योगातच येतात. राज योगात नाहीत. राज योग वेगळा आहे. हठ योगलच राजयोग म्हणतात असं कुठे लिहिला आहे? संदर्भ दिला तर बर होईल

पातंजल योग असा वेगळा योग जरी नसला तरी यम नियम ...... या आठ गोष्टींचा समावेश अष्टांग योगात होतो जो पातंजल मुनींनी वर्णिला आहे. हठ्योगाविषयी माहितीकरिता हठप्रदीपिका हे पुस्तक वाचावे. अवांतर - हठ योग हा चतुरंग योग म्हणून ओळखला जातो.....