Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
प्रति, प्रादेशिक परिवहन अधिकारी विषय: रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल अभिनंदन आणि आभार a माननीय महोदय, सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे. या सप्ताहानिमित्त जागोजागी वाहतुक नियमांची जाणीव व माहिती करून देणारे फलक आपण उभारता, रस्त्यांवर वाहतुक नियंत्रकांची नेहमीपेक्षा जास्त संख्या असते, ते नियंत्रक वाहतुक नियंत्रित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु आपण माझ्या या मताशी कदाचित सहमत असाल की त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. याला कारण ते नव्हेत; तर बेशिस्त वाहन चालवणारी असंख्य जनता आहे, जिला नियंत्रित ठेवता ठेवता त्यांच्याही नाकी नऊ येत असावेत. नुकताच माझा एक अनुभव थोडक्यात सांगतो. मी एकदा एका सिग्नल वर गाडीत बसलेला होतो, तेथील वाहतुक नियंत्रक हाताने त्या सिग्नल वरील एका बाजूस थांबण्याचा इशारा करत होता, तरीही जवळपास प्रत्येक गाडीचालक, व दुचाकीस्वार नियंत्रकाला न जुमानता सिग्नल तोडत होते, आणि तो एकटा नियंत्रक त्या ठिकाणी ते थांबवण्यास हतबल ठरत होता. मला त्याची खरोखर दया आली आणि कौतुकही वाटलं, कारण तो तरीही हताश न होता तिथे वाहतुक नियंत्रित करत होता, आपली जबाबदारी पार पाडत होता. आज लोकांना खरंच शिस्त लावायची नितांत गरज आहे, किंबहुना जर तसं झालं नाही, तर कदाचित पुढे सगळाच गोंधळ माजेल, असं चित्र आहे. मला बरेचदा असं जाणवतं, की कुठेतरी वाहतुक नियमांची अंमलबजावणी, किंवा त्यांच्या उल्लंघनाबद्दलचा असलेला दंड याच्या अंमलबजावणीत ढिलाई होत आहे. तसं कदाचित नसेलही, मी चुकीचा असेन, परंतु तसंच नेहमी बघायला मिळतं म्हणून हे पत्र. कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले अनेक सिग्नल अनेकदा बंद असलेले बघायला मिळतात. ते चालू रहाणं अत्यंत गरजेचं आहे. तरंच ते पाळले जाऊ शकतात. तसंच आजकाल सिग्नल वर झेब्रा क्रॉसिंगला कुणीच थांबलेलं दिसत नाही. त्यामुळे म्हातारेच नव्हे तर तरुणांनाही गोखले रोड, तीन हात नाका, टेंबी नाका यासारखे भाग पार करणं महाकठीण झालंय. तिथे नियंत्रकांचा जाच नसल्यामुळे कुणालाच तिथे थांबायची बुद्धी, बंधन, होत नाही. जर आर.टी.ओ. कडून सुरक्षा सप्ताहापुरतेच नाही, तर आणखी प्रदीर्घ काळ काही बोधपर फलक लावण्यात आले; जेणेकरून लोकांना कुठेतरी मनात असं वाटेल की आपण वाहतुकीचे नियम खरंच पाळायला हवेत, तर फार बरं होईल. त्यांनी ते न पाळल्यास त्यांना ते समजावण्यासाठी, दंड करण्यासाठी नियंत्रक असतीलच. केवळ वाहतुक नियंत्रकांची भीती म्हणून नियम पाळले जाऊ नयेत तर ती शिस्त स्वयंशिस्त असावी असं मला मनापासून वाटतं. यासाठी वाहन चालवायचा परवाना देतेवेळी एक लेखी परीक्षा, जिची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, जिथे कुणालाही सूट नसेल अशी असायला हवी असं माझं मत आहे. किंवा परवाना पुनर्वैध करतेवेळीही काही उजळणीपर चाचण्या व्हाव्यात असंही वाटतं. दंडाची रक्कम देऊन, पावती घेऊन, जर वाहनचालक सुटू लागला, तर केवळ नियमांचं उल्लंघन, त्याचा दंड, आणि पुन्हा उल्लंघन अशी प्रक्रिया चालू रहाते. तिथे त्या नियमाची, तो न पाळल्यास असलेल्या धोक्याची जाणीव होतच नाही. तेंव्हा नियंत्रकाने नुसता दंड न करता, त्या नियमाची माहिती, त्याचं महत्व, मैत्रीपूर्वक, एखाद्या सल्लागारासारखं त्या उल्लंघनकर्त्याला समजावलं, तर खरोखर लोकांच्या मनात ही स्वयंशिस्त जागृत करण्यास खूप मदत होईल, असं मला वाटतं. वाहतुक नियंत्रक हा तुमच्या आमच्यातलाच जर सर्वांना वाटला, तर हे अधिक प्रभावीपणे शक्य होईल. आणखी एक गोष्ट मला सुचवावीशी वाटते, ती अशी, की जो नियम मोडतो त्याला नियंत्रकामार्फत शासन होतं; परंतु जो वाहतुकीचे नियम पाळतो त्याचं जर कौतुक केलं, उदाहरणार्थ, एखाद्या गाडीवाल्याने सिग्नलचं काटेकोरपणे पालन केलं, सिग्नल हिरवा होईपर्यंत तो झेब्रा क्रॉसिंगच्या आत थांबून राहिला, आणि तेथील वाहतुक नियंत्रकाने जर त्याचं कौतुक केलं, तर हे बघून कदाचित तो नियम मोडणा-यांनाही कुठेतरी नियम पाळायची इच्छा होईल; आणि अशी भावना अधिकाधिक लोकांच्या मनात जागृत होणं हेच परिवहन नियंत्रण कार्यालयाचं खरं यश असेल. एक सामान्य वाहनचालक म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आणि सुचवायचं आहे; की कुठेतरी, वाहतुक नियंत्रकाची भूमिका बदलायला हवी, त्यात एक सकारात्मक वृद्धी व्हायला हवी, ज्यायोगे लोकांच्या मनातील वाहतुक नियंत्रकाची प्रतिमा आणखी आदराची होईल, अभिमानाची होईल, आणि त्यातूनच रस्ता सुरक्षा, किंवा वाहतुक नियमन, या गोष्टींना ख-या अर्थाने गती मिळेल. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि आपण अव्याहत करत असलेल्या कार्याबद्दल अनेक आभार. आपला नम्र,
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मी. तुमच्याप्रमाणेच मलाही शिव्या घालणारे असतात. पण एखादा चुकून माकून माझं बघून थांबणारा असतो. धन्यता त्याच्यात असते. शिव्यांनी बधत नाही आपण.

मी पण. मी पण ! जर कोणी हॉर्न वाजवला तर लाल दिव्याकडे बोट दाखवून असा चेहरा करतो की "काय येडपट आहेस. तिकडे पहा." आणि त्यानंतर त्याच्याकडे सरळ दुर्ल़क्ष करतो... मुर्खांसाठी माझा रक्तदाब वाढवायचा नाही, हे माझे व्रत आहे ;)

पण माझा अनुभव वेगळा आहे . मागून प्यॉ प्याऑ वाजवून देखील मी ढीम्म हालत नाही म्हट्ल्यावर मागचा नरमतो. आजू-बाजू चे ( जाऊ की नको संभ्रमात असणारे ) कौतुकपूर्ण नजरेनी माझ्याकडे पाहतात आणि "काय यडं आहे" म्हणून वाजवणाराकडे पाहतात! त्या क्षणाचा मी हिरो बनून जातो !

वेलभट्ट आपण हे विनंतीपत्र आरटीओंच्या दप्तरी सादर केले आहेत. त्याचा संदर्भ दिला तर पुढे मागे कोणी असेच करू म्हटले तर त्याला आपले पत्र व विचार मार्गदर्शक ठरतील. समस्यांना एक वाक्यातून समाधान मिळत नाही पण विविध बाजूंनी त्यावर तोडगा काढून नंतर त्यातून पुढे येणाऱ्या समस्यांतून नवी उत्तरे शोधायला हवीत. भारतीयांची मानसिकता लक्षात घेऊन...

अजुन एक जालीम उपाय म्हणजे (पुर्वी कुठेतरी वाचला होता आणि आवडला होता), वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यांना पकडले की २-४ तास (जेवढा तीव्र गुन्हा तेवढा जास्त वेळ) त्या ठिकाणीच स्थानबद्ध करावे आणि नंतर सोडताना दंडदेखिल वसुल करावा. बर्‍याच लोकांना सध्या पैशाची फिकीर नाही पण वेळेची (जवळजवळ) सगळ्यांनाच असते त्यामुळे हा उपाय प्रभावी ठरेल असे वाटते.

मोबाईल वर बोलणार्‍या आणि उलट्या बाजूने चालवणार्‍या लोकांना प्रत्येक चौकात खास नेमबाज शूटर नेमून गोळ्या घालाव्यात. रिक्षा वाल्यांना गोळ्या घालायला त्यांनी कोणताही नियम मोडला नसेल तरी चालेल.