यादवी युद्ध किंवा यादवी माजली हे शब्द आपण वर्तमानपत्रांतुन बर्याचदा वाचत असु कदाचित. पण या शब्दाचा उगम कदाचित आपल्याला माहिती नसेल. आजच्या काळाचा विचार करता याचा संबंध बिहारच्या लालुप्रसाद यादवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाइल. या सत्शील माणसापाठी या असल्या भयंकर शब्दाचा उगम जोडला जाउ नये या साठी हा लेखन प्रपंच. "यादवी माजली" या शब्दामागे आहे खरे सांगायचे तर एक आद्य अट्टलबिहारी. वाजपेयी नव्हेत. खरोखरचा अट्टल बिहारी. श्रीकृष्ण. (अटलबिहारी म्हणजे माझ्या मते विष्णुचा आठवा अथवा सर्वात महत्वाचा अवतार.)
तर यादवीचा संबंध आहे श्रीकृष्णाशी. महाभारतीय युद्धानंतर ३६ वर्षांनी सगळे यादव (ज्यात भोज, अंधक, वृष्णी आदि १८ जमाती येत) एकमेकांशी लढुन मरण पावले. हा लेख त्याच यादवी युद्धाची माहिती देण्यासाठी.
धृतराष्ट्र - गांधारीच्या सकल कुलाचा नाश करुन कृष्ण आणि पांडव जेव्हा त्या दोघांना भेटायला गेले तेव्हा धृतराष्ट्राचा सगळा राग निघाला भीमावर. धृतराष्ट्र अंध आणि म्हातारा असला तरी प्रचंड ताकदवान होता. त्याने भीमाला मिठीत घेण्याच्या मिषाने त्याला आवळले. पण कृष्णाने मोठ्या चतुराईने तो असे काही करेल हे लक्षात घेउन भीमाच्या जागी त्याचा पुतळाच उभा केला होता. त्यामुळे भीम वाचला खरा. पण स्वतः कृष्ण तेवढा नशिबवान नव्हता. युद्ध थांबवण्यासाठी समर्थ असुनही कृष्णाने जाणुनबुजुन युद्ध घडवुन आणले हे जाणून त्याला गांधारीने शाप दिला. स्वतःच्या पुत्रपौत्रांच्या आणि देशवासियांच्या पतनाने विदिर्ण झालेल्या त्या साध्वीने कृष्णाला शाप दिला की तो त्याच्या सर्व आप्तस्वकीयांसकट असाच एक गृहकलहात पतन होइल आणि त्याचेच आप्तमित्र एकमेकांना मारतील.
महाभारत युद्धानंतर यादव राज्य सर्वात प्रबळ म्ह्णुन उदयास आले. बहुतेक सगळी राज्ये विनाश पावली होती. जी काही थोडीफार उरली त्यांचे उरलेसुरले सामर्थ्य कृष्णार्जुनांनी मिळुन युद्धानंतरच्या अश्वमेधात संपवले. एक आख्खी पिढी कापली गेली होती. त्या पिढीतुन उरले सुरले किंवा नंतरच्या पिढीतले वीर अश्वमेधात कामी आले. कृष्ण खुश झाला असावा, पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचाच प्रकार होता तो. पांडव उरले ते ही निर्वंश होउन. फारसे सामरिक बळ त्यांच्याकडेही उरले नव्हतेच.
यादवांकडे मात्र स्वतः कृष्ण, बलराम, सात्यकी, कृतवर्मा, कृष्णाची ८० मुले, त्यातला एक प्रद्युम्न तर सात्यकी प्रमाणेच अतिरथी, दुसरा सांब कृष्णाने १२ वर्षे तपश्चर्या करुन शंकराच्या वरदानाने प्राप्त केलेला, कृष्णाचा नातु अनिरुद्ध तर विष्णुचाच एक अंश, शिवाय गद आणि सारण हे कृष्णाचे भाऊ, अक्रुरादि इतर मुत्सद्दी आणि यौद्धे यामुळे यादव सर्वात प्रबळ बनले होते. त्यामुळेच अर्थात एक प्रकारच गर्व, मद, अहंकार जडला होता. शिवाय सगळे जगच शत्रु विरहित झाल्यामुळे पौरुष दाखवण्यासारखे फारसे काही करण्यासारखेही उरले नव्हते. संपत्ती होती, सुबत्ता होती, शांती होती, शत्रु नव्हते आणि करण्यासारखे इतर काही नव्हते म्हटल्यावर जे घडायचे तेच घडले. लोक जुगार, मद्य, व्याभिचार आणि इतर अनैतिक गोष्टींच्या मागे लागले.
महाभारताचे भीषण युद्ध घडुन ३६ वर्षे उलटल्यानंतर सर्वांनाच एकुण काहितरी विचित्र घडणार आहे असे जाणवु लागले. सणाणता कोरडा वारा वाहु लागला, पक्षी उलट्या बाजुने भ्रमणे करायला लागले, नद्यांनी दिशा बदलल्या, क्षितजावर नेहमी धुके पसरलेले दिसु लागले, प्रखर धूमकेतु आणि इतर ज्वालाग्रही पदार्थ आकाशातून पृथ्वीवर पडु लागले, सुर्यबिंब धुळीने ग्रासले, काळ्या कडा असलेली उग्र लाल रंगाची वर्तुळे सुर्य चंद्रा च्या बाजुला नेहमी दिसु लागली. ही सगळी लक्षणे अटळ विनाशाची होती.
पृथ्वीचा नाश जवळ येत चाललासे बघुन कण्व, नारद, विश्वामित्रादि ऋषीमुनींनी कृष्णाशी सल्लामसलत करण्यासाठी द्वारिकेची वाट धरली. द्वारिकेपासुन थोड्या अंतरावर आले असता ते विश्रांतीसाठी थांबले. ते कोण आहेत हे नीटसे ओळखु न आल्याने म्हणा किंवा सत्तेचा आणि शक्तीचा मद चढला असल्याने म्हणा पण कॄष्णाच्या भावाला गदाला त्या ऋषींची थट्टा करण्याची लहर आली. त्याने कृष्णाच्या मुलाला, सांबाला स्त्री वेष देउन त्या मुनींसमोर उभे केले आणि त्यांची थट्टा करण्यासाठी त्यांना सांगितले "ही आमच्या बभ्रुची पत्नी. गरोदर आहे. बिचारी मुलगा आहे की मुलगी कळत नाही. तुम्हीच काय ते सांगा". त्यांच्या दुर्दैवाने त्या मुनींनी सांबाला ओळ्खले आणि त्याला शाप दिला "गरोदर आहेस म्हणतोस? तर मग लवकरच प्रसृत होशील आणि एका मुसळाला जन्म देशील जो तुम्हा मदोन्मत्त यादवांच्या नाशास कारणीभूत ठरेल." शाप ऐकुन सगळे घाबरले आणी पळुन गेले. त्यांनी कृष्णाला काही सांगितले नाही पण ते काम नारदाने स्वतःच केले.
शाप खरा ठरलाच. दुसर्याच दिवशी (पुरुष दुसर्याच दिवशी प्रसूत होत असावेत बहुधा) सांबाने एका लोहाच्या मुसळाला जन्म दिला (ते मुसळ बाहेर कुठुन आले हे कृपा करुन मला विचारु नका). या पीडेपासुन सुटका करुन घेण्यासाठी द्वारकेचा राजा उग्रसेनाने (म्हणजे मुसळापासुन. कृष्णाच्या मुलापासुन आणि ते ही शिवाच्या आशिर्वादाने झालेल्या मुलापासुन सुटका करुन घेणे उग्रसेनाला शक्य नव्हते नाहितर त्याने तेच केले असते.) त्या मुसळाचे चुर्ण करुन ते समुद्रात विसर्जन करायला सांगितले. पाचावर धारण बसलेल्या यादवांनी शुभस्य शीघ्रम म्हणत काम तडीस नेले. नंतर विनाशाचे मूळ मद्यात आहे हे जाणुन द्वारिकेत मद्यावर बंदीही घातली गेली.
पण नियतीला कोण टाळु शकणार. लवकरचा द्वारकेच्या लोकांना काळाकभिन्न काळ शहरात हिंडताना दिसुन आला. यादववीरांनी त्याच्यावर चालवलेले तीर फुकट गेले. यमाला कोण मारणार? लोकांना स्व्प्नात देखील त्यांचे मास खाणारी गिधाडे दिसु लागली. राक्षसांचा संचार आणि वावर इतका वाढला की दिवसाढवळ्या ते लोकांना लुटू लागले. उंदीर घुशींचा सुळसुळाट इतका वाढला की ते झोपलेल्या लोकांचे केस, नखे आणि कातडी कुरतडु लागले. टिटव्या असह्या अश्या कर्कश्श आवाजात सतत किंचाळु लागल्या, कोकिळांचे कुजन घुबडांच्या आवाजासारखे घुमायला लागले, गरीब शेळ्यांच्या केकाटण्याला कोल्हेकुईचा आवाज येउ लागला. त्यानंतर तर अजुनच भयंकर अशुभ चिन्हे प्रत्ययास आली. गाढवांच्या पोटी गायी तर खेचरांच्या पोटी हत्ती आणि कुत्र्यांच्या पोटी मांजरे तर उंदरांच्या पोटी मुंगूस जन्माला येउ लागले. भुगर्भातुन प्रचंड आवाज यायला लागले आणि नक्षत्रांच्या दिशा बदलल्या. थोडक्यात कशाला कशाचा घरबंद उरला नाही. लोक मुक्तपणे स्वैराचार करु लागले आणि अगदी कृष्ण बलरामालाही जुमानेसे झाले. या सर्वांचा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा कृष्णाचे सुदर्शन क्षितिजात विलीन झाले, त्याचा दैवी रथ आणि ४ दैवी घोडे अचानकपणे पळत जाउन समुद्रात विलीन झाले आणि त्याच्या पांचजन्यातुन खेचरांच्या ओरडण्याचा आवाज येउ लागला.
अखेर वेळ आली हे लक्षात येउन कृष्णाने सर्व प्रमुख यादवांना बरोबर घेउन पवित्र अश्या प्रभास क्षेत्री जाउन समुद्रस्नानाचा घाट घातला. तीर्थक्षेत्री जाताना देखील सर्वच यादवांनी राम कृष्णापासुन लपवुन मांस आणि मद्याचा मोठा साठा बरोबर घेतला. तिथेच घात झाला. एकदा प्रभासक्षेत्री पोचल्यावर तर मद्यधुंदावस्थेत भांडणे करणे यादवांसाठी नेहमीचेच झाले. भोज आणि वृष्णी + अंधक असे सरळ दोन वेगळे गटच पडले. असेच एके दिवशी मद्यधुंद अवस्थेत सात्यकी ने कृतवर्म्याला डिवचले "तु कसला क्षत्रिय लेका. रात्रीच्या वेळेस हल्ला करुन निद्रिस्तावस्थेत लोकांना मारणार भ्याड तु. थूत तुझ्या जिंदगानीवर" त्यावर कृतवर्म्यानेही सात्यकीच्या वर्मावर बोट ठेवत त्याला धिक्कारले "की अर्रे मला काय बोलतोस भ्याडा युद्धक्षेत्री तुला हरवल्यानंतर मागुन अर्जुनाने बाण मारल्याने हात गमावलेल्या आणि योगासनात बसलेल्या भूरिश्रव्या सारख्या महान यौद्ध्याला तु कपटाने मारलेस. तु कसला आला आहेस शूर?" सात्यकी आणि कृष्णाचे जरा जास्तच सख्य होते. कृतवर्म्याने असे बोलताच प्रद्युम्न खवळला. त्यात सात्यकीने सत्यभामेच्या पित्याच्या हत्येत आणि त्याच्या स्यमंतक मण्याच्या चोरीत कृतवर्म्याचा हात असल्याचे सांगितल्याने सत्यभामाही चिडली आणि तिने कृष्णाला डिवचले.
कृष्णाचा क्रोध हाच आदेश समजुन सात्यकीने पुढचा मागचा काही विचार न करता कृतवर्म्याचे डोके उडवले, हे बघुन कृतवर्म्याच्या भोज जमातीतील लोकांनी सात्यकीवर हल्ला चढवला. त्याच्या बाजुने प्रद्युम्न गेला. त्या दोघांनी अनेकांना मारले पण अखेर कृष्णाच्या समोर भोजांनी त्या दोघांना इहलोकी पोचवले. ऩंतरच्या तुंबळ युद्धात गद, सारण, अनिरुद्ध, सांब सगळे मरण पावले. त्यांची कलेवरे बघुन दु:ख अनावर झालेल्या कृष्णाने जवळच उगवलेली गवताची पाती दिसेल त्याच्यावर फेकायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर सगळ्यांनीच तसेच करणे सुरु केले कारण त्या पात्यांचे लोखंडाच्या मुसळात / भाल्यात रुपांतर होउन ते अगदी अभेद्य अश्या वस्तुतनही आरपार जाउन लागले. हे गवत चुर्ण करुन समुद्रात सोडलेल्या सांबाच्या उदरातील लोह मुसळातुन उगवलेले होते. क्रोध अनावर झालेल्या कृष्णाच्या हातुन त्याचा सारथी दारुक आणि बभ्रुच काय ते उरले. बाकी सगळे यादव संपले. हताश झालेला बलराम समुद्रकिनार्यावरील बनात समाधीस्थ झाला. त्याच्या मुखातुन आदिशेष बाहेर पडुन समुद्रात विलीन झाला. बभ्रु एका शिकार्याच्या बाणाला बळी पडला तर कृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला ससा समजुन जर नावाच्या एका पारध्याने त्याला विषमिश्रीत बाण मारला आणि विष्णुचा अटल अवतार संपवला.
एकटा दारुक काय तो पांडवांना निरोप देण्यासाठी उरला. अर्जुन द्वारकेला उरलेल्या यादवांना घ्यायला येस्तोवर म्हातारा वासुदेव काय तो उरला होता. अर्जुनाला बघितल्यावर त्यानेही देह्त्याग केला. त्याच्या चार बायका त्याच्याबरोबर सती गेल्या. रुक्मिणी आणि कृष्णाच्या इतर ३ बायका सती गेल्या तर सत्यभामा आणि इतर तिघी जणींनी वान्प्रस्थाश्रम पत्करला. उरल्यासुरल्या यादव स्त्रिया आणि लहान मुलांना घेउन अर्जुन हस्तिनापुरला निघाला पण वाटेतच अभीरांनी त्याच्यावर हल्ला केला. तेव्हा अर्जुन त्याची दिव्यास्त्रे विसरला आणी त्याच्या अक्षय भात्यातले बाणही संपले. अर्जुन मोठ्या धीराने लढला पण त्याच्या डोळ्यासमोर अभीरांनी अनेक यादव स्त्रिया पळवुन नेल्या तर काही आपणाहुन त्यांच्याबरोबर चालत्या झाल्या. कुरुक्षेत्रावर भल्याभल्या वीरांना पाणी पाजणार अर्जुन असह्हाय्यपणे बघण्यापलीकडे काहिही करु शकत नव्हता. म्हणुनच म्हणतातः
समय बडा बलवान भाई समय बडा बलवान
भील ने लुटी गोपिया बेई अर्जुन बेई बाण
वासुदेवाचा खापरपणतु व्रजनाथ वगळता त्याच्या आख्ख्या कुळाचा नाश झाला. व्रजनाथाला पाडवांनी इंद्रप्रस्थाचे राज्य दिले खरे. यदु च्या वंशजांनी पुरुच्या वंशंजांचा विनाश करुन त्यांच्याकडुन राज्य मिळवले. एक वर्तुळ पुर्ण झाले. पण युद्धानंतर ३६ वर्षांनी एकमेकांना मारुन यादवांनी त्याच पुरु वंशातल्या गांधारीचा यदुवंशीयांना दिलेला शाप खरा करुन दाखवला. वर्तुळातले अजुन एक वर्तुळ पुर्ण झाले. हीच ती यादवी म्हणजेच "मदोन्मत्त स्वकीयांनी स्वकीयांचा घेतलेला जीव"
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जुन्या कथा मला आवडतात. पण
प्रत्ययकारी लिहिले आहेस. एक
मस्त...
हा लेख लैच आवडला. जबर्या
छान लिहीले आहे.....
यादवी माजली....
हे खरेच असे झालेय ???
ते खरे तर मुसल नसावे. खल
महाभारताच्या इंग्रजी
मुसळच आहे ते.
दोन्ही भाग आवडले
समय बलवान तो गधा पहेलवान ।
कदाचीत
छान लिहिलंयस रे.
बाकी द्वारकेत उरतो तो वसुदेव.
वा ! आवडलं.
मी सांगतो या युद्धावर
अशीच
आवडल .
मूळ महाभारत
मुसळ आणि उखळ पोटाला
मस्त...
बरोबर. ती एक चूक झाली.
हजारों वर्षात भारत भूमी वर
मृत्युन्जय साहेब
उत्तम!
सर्व वाचक आणि
छान लिहिलंय
दहावीच्या संस्कृतच्या
परिणामकारी लेखन.