Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
असाच आणखी एक प्रवास. रस्त्यावरचं गाव. नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे. माझं काम कधी वेळेत संपत नाही - कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात. ते तितकेच महत्त्वाचे असतात. त्यावर बोलत राहतो आम्ही. पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही. इथं काही मीटिंग वगैरे नाही. तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत. नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने. ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे. म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड. पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते. आणखी दोघंजण आमची वाट पहात उभे आहेत. नमस्कार- चमत्कार होतात. मी त्यांच्या मागे चालायला लागते. वाटेत उन्हातान्हात निवांत बसलेले लोक आमच्याकडे पाहताहेत. पोरं मागोमाग येतात आमच्या. बाया आपापसात बोलायला लागतात. एक घर दिसतं. वाकून आत प्रवेश करावा लागणार इतका बुटका दरवाजा. "मॅडम, हे विधवा कुटुंबप्रमुख स्त्रीचं घर आहे." - माझा सहकारी सांगतो. माहिती गोळा करताना स्त्रियांची माहिती काळजीपूर्वक गोळा केली गेली आहे ना, स्त्रियांना काही अडचण आलेली नाही ना, पुढच्या प्रक्रियेत त्यांनी सहभागी होण्याचं महत्त्व - असं काहीबाही मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यामुळं स्त्रियांचे बचत गट आणि व्यक्तिशः स्त्रियांशी बोलणं हा माझा एक मुद्दा आहे या प्रवासातला. आम्ही आत शिरतो. एक सतरंजी अंथरलेली आहे. लाल रंगांची ती सतरंजी बहुतेक नवी असावी इतकी स्वच्छ आहे. "आम्हाला उशीर झाला का? तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागली का?" मी बोलायला सुरुवात करते. "नाही, नाही. या ना. तुमची वाट बघत होतो. ही सतरंजी तुमच्यासाठीच अंथरली आहे." - अगदी डावीकडे बसलेली स्त्री सांगते. ती स्त्री असेल जेमतेम पंचेचाळीशीची. तिच्या डाव्या बगलेत एक पोरगी लाजत बसली आहे. ती असेल दोन एक वर्षांची. उजवीकडे त्यापेक्षा लहान एक पोर. त्या पोराचा हात पकडून बसलेली एक तरुण स्त्री. त्या तरुणीच्या पाठीवर हात ठेवून बसलेली आणखी एक स्त्री. तीही पन्नाशीच्या आसपासची. घर एका खोलीचं. पक्क्या - की कच्च्या? - विटांवर सिमेंटचा गिलावा आहे. वरती पत्रा आहे. त्या एकाच खोलीला थोडा आडोसा आहे - त्याच्या पल्याड बहुतेक स्वैपाक होत असणार. घरात काही सामान दिसत नाही फारसं. अगदी गरीब कुटुंब असावं - असा मी मनाशी अंदाज बांधते. क्षणार्धात मी परत त्या स्त्रियांकडे वळते. त्या तिघींचेही चेहरे दमलेले आहेत. नीट पाहिल्यावर कळतं की ती दमणूक नाही तर दु:खाची खूण आहे. ती मधली तरुण स्त्री एकदम ओक्साबोक्शी रडायला लागते. तिच्या दोन्ही बाजूला बसलेल्या स्त्रिया तिच्या पाठीवरुन हात फिरवतात. मी चमकते - कारण तोवर मला जाणवलं आहे की माझ्यासमोर बसलेल्या तिन्ही स्त्रिया विधवा आहेत. बोलणं होतं. या तरूण स्त्रीचा नवरा दहा दिवसांपूर्वी अपघातात जागच्या जागी मरण पावला आहे. मोटरसायकलची धडक. कोणी दिली? माहिती नाही. यांना बातमी कळेपर्यंत जीव गेलेला होता. पोलीसांत तक्रार नोंदवली का? नाही. कुठं काम करत होता? असाच कुठंतरी - यांना कुणालाच माहिती नाही. ही तरुण मुलगी पंचवीस एक वर्षांची असेल. शाळेत ती कधीच गेली नाही - कारण तिचे वडील तिच्या लहानपणीच वारले आणि आई खडी फोडून (रस्त्यावर टाकली जाणारी खडी फोडणं) पोटाला कमावून आणत असे. धाकट्या भावाला सांभाळायचे काम ती करत असे. तो धाकटा भाऊ अगदीच लहान आहे - दहा एक वर्षांचा. तो शाळेत जातो आहे सध्या. तो पण न हसता बसला आहे. या तरूणं स्त्रीला दोन लेकरं आहेत - वर मी उल्लेख केलेली ती दोन - एक मुलगी आणि दुसरा मुलगा. डावीकडे बसलेली त्या तरूण स्त्रीची सासू आहे. तीही विधवा आहे. तिच्या शेजारी आणखी एक दहा-बारा वर्षांचा मुलगा दरम्यान येऊन बसला आहे. तो तिच्या मुलीचा मुलगा आहे. त्या मुलाचे आई-वडील - म्हणजे सासूची मुलगी आणि जावई दोघंही मरणं पावले आहेत. या घरात आता तीन निरक्षर असलेल्या विधवा स्त्रिया आहेत; दोन पाचवीत शिकणारे मुलगे आहेत; एक दोन वर्षांची मुलगी आहे आणि एक दहा महिन्यांच बाळ आहे. शेती आहे? हो. किती? माहिती नाही. अर्धा एक एकर असेल. पाण्याची काही सोय? नाही. पाऊस येईल तितकीच सोय. शेती कोण करायचं? तो अपघातात नुकताच गेलेला मुलगा. काय होत त्या जमिनीत? पोटापुरतं काहीसं. बाकी उत्पन्नाचं साधन? काही नाही. काही कागदपत्रं आहेत का घरात? काही नाही. रेशन कार्ड? नाही. मृत्यूचा दाखला? नाही. काही शिवणकाम वगैरे येत? नाही. तरुणीची आई अजून खडी फोडायला जाते आणि तिच्या आणि तिच्या मुलाच्या पोटासाठी कमावते. तिच्याकडे काही कागदपत्र? नाही. आधार कार्डाची काहीतरी प्रक्रिया झालेली आहे - पण हातात काहीच नाही. दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही का? होतं - पण ते रद्द झालं. कधी रद्द झालं? माहिती नाही. का रद्द झालं? माहिती नाही. दोघी-तिघींपैकी कुणी बचत गटात आहे का? नाही. इथं जवळपास कुणी इतर नातेवाईक, भावकीतले लोक आहेत का? नाही. होते ते पोराच्या मरणानंतर भेटायला आले होते, पण गेले ते लगेच. त्यांनाही पोट आहे त्यांचं! मला काही सुचत नाही काय बोलायचं ते. सोबतच्या एका सरकारी कर्मचा-याला मी विधवा पेन्शन योजनेत काय करता येईल ते पाहायला सांगते. तो नाव लिहून घेतो त्या तरूण स्त्रीचं आणि तिच्या सासूचं. पण़ पुढे काही होईल का? मला उगीच त्या कुटुंबाला खोटी आशा दाखवायची नाही. सांत्वन तरी काय करायचं? हे आता काय खाणार? हे कसे जगणार? यांच्या घरात फक्त शिकणारी ही दोन मुलं. ती कधी मोठी होणार? कधी कमावणार? त्यांना आपल्या सध्याच्या शाळेत शिकता येईल का? तोवर हे सगळे काय करणार? यांच्यासाठी काय करता येईल? काही करता येईल की नाही? आम्ही उठतो. ती तरूण स्त्री म्हणते, "ताई, आणखी एक नाव लिहायचं आहे यादीत." मी तिच्याकडे चमकून पाहते. ती सांगते, "पोटात पोर आहे माझ्या. त्याचं नाव आत्ताच लिहिता येईल का?" तिची चिंता संपणारी नाही.. ती अशीच धगधगत राहणार ... * अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

त्या अभागी स्त्रियांचं दु:ख वाचून मन विषण्ण झालं.चटका लावणारा अनुभव लिहिलात तुम्ही. अशा अनेक लोकांपर्यंत कधी पोचणार आपली लोकशाही?

अन्यत्र ( पूर्वी ) वाचलेली कथा. लोकशाही त्यांच्यापर्यंत पोचेल तेव्हा पोचेल, मी त्यांच्यासाठी काय करू शकते ह्याचा तेव्हाही विचार केला होता आणि आत्ताही करते. त्यादृष्टीने माझ्या हालचालीही सुरु आहेत... मग प्रत्यक्ष ह्या कुटुंबाला मदत नाही करता आली तरीही !!!

तुमचे लिखाण अगदी नेमके आणि कमीतकमी शब्दांत आशय जरूर तिथे पोहोचवणारे असते. उगाच शब्दांचा फाफटपसारा नाही, भावनांचे ओथंबलेले आवेग नाहीत, आणि म्हणूनच हे परिणामकारक होते. अगदी अनिल अवचटांच्या अशाच रिपोर्टांची आठवण अपरिहार्यपणे झाली. विशेषतः 'एका गोसाव्याची तोड' ह्या लेखाची.

वाईट वाटलंच.. पण तरीही विचार मनात आलाच, इतकी सगळी मारामार असताना अजून एका मुलाचा विचार कसा काय होऊ शकतो.. काय कमी पडतय आपल्या सामाजिक शिकवणूकीत.. का तोकडं पडतय तळापर्यंत पोहोचण्यात 'कुटुंब नियोजनला'? तिथे त्याची फार गरज आहे.. असे किती जीव कसे कसे पोसत राहाणार सरकारपण आणि इतरपण.. वर वरचे इलाज चालूच आहेत (उदा. संजीव गांधी निराधार योजना, अन्नसुरक्षा) पण भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात ते किती फलदायी ठरणार.. पुरवठा वाढवला तरी मुळात मागणी कमी करायला नको का? साला, फक्त प्रश्नच प्रश्न..! श्या...

म्हणूनच तर मी ? असाच प्रतिसाद दिला. जावु दे... झोपतो परत "हिमालयाची उशी घेवून." (आज तशी ही, ह्या लेखामुळे झोप येणार नाहीच,तरी निदान प्रयत्न तरी करुन बघतो.)

इतकी सगळी मारामार असताना अजून एका मुलाचा विचार कसा काय होऊ शकतो घरातील सदस्यांना शेती किती आहे, कागद कुठे आहेत, रेशनकार्ड वगैरे गोष्टी कमावत्या पुरुषाने सांगितल्या नसतील याचा अर्थ एकतर त्या मनुष्याला त्याचे महत्व माहीत नसेल किंवा घरातील बाय्कांना या गोष्टी सांगण्याइतके महत्व देत नसेल तर तो माणूस बाईला विचारून मूल हवे की नको हे ठरवणार नाही हे उघड आहे. यात त्याचे दुर्लक्ष किंवा 'बायकांना काय विचारायचे?' असा कोणताही दृष्टीकोन असू शकतो. आयुष्यभर दु:ख भोगतात बिचार्‍या! दया येते. त्यांना जर काही माहिती दिलीच नाही तर कळणार कसे? कधीकधी भीती वाटते अशा गोष्टी वाचून!

रेवतीताईंच्या प्रतिसादात सगळे आले...

चोच आहे तिथे चारा नाही.. आणि अनाथ वृद्धांसाठीची सरकारी पेन्शन दारात गाडी असलेली आणि बंगल्यात रहाणारी त्या म्हातार्‍यांची दुकानदार मुले घेऊन जातानाही पाहिले आहे. सरकारी योजना खूप असतात पण ज्यांना गरज असते त्यांच्यापर्यंत त्यांची माहितीसुद्धा पोचत नाही. योजनेवर सगळे पैसे मात्र खर्च झाल्याशिवाय रहात नाहीत!

मनापासून धन्यवाद, अशा चिंतांना मिपावर आणलेत म्हणून. अनंत दु:ख आणि यातना आहेत हे कळले, परंतु यातून बाहेर पडायचे नक्कीच भरपूर मार्ग आहेत! अजून काही माहिती हवी आहे, दिल्यास बरे होईल. १)हे गाव कोणते? २)तालुका, जिल्हा, राज्य, देश? ३)आपण सरकारी अधिकारी/नोकरवर्ग आहात कि NGO promoter/employee ४)आपला दौरा कोणी आयोजित/प्रायोजित केला होता? ५)आपला आणि ग्रामविकास मंत्रालयाचा काही संबंध आहे का?

केवळ लेखकाचे/लेखिकेचे नाव पाहून कधीकधी लेख उघडला जातो. अशा काही मोजक्या नावांपैकी आतिवास हे एक नाव आहे. तुमची कळकळ ह्रदयाला भिडते आहे.

फक्त तोंडी सहानुभुती दाखवु नका ? केवळ या साठीच मी स्वतः व माझा ग्रुप स्वता:चे यशस्वी व्यवसाय सोडुन प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातील काही यशस्वी झाले आहेत्,काहींचे प्रयत्न चालु आहेत.जर देशातली अशी परिस्थीती बदलायची असेल तर स्वतः प्रशासनात जाण्याचा प्रयत्न करा, जर वय निघुन गेले असेल तर माहितीच्या अधिकारातुन जागले बना,आज भुकेकंगाल जनतेला आपल्या मदतीची नक्की गरज आहे.कारण एन जी ओ नक्की चांगले काम करत आहेत पण त्यांना निर्णायाधिकार नाही म्हणुन समाजमनाची जाण असणार्‍या तरुणांनी नक्की प्रशासनात येणाचा प्रयत्न करावा.शेवटी ज्याचा निर्णय त्याने घ्यावा,मार्गदर्शनाची गरज भासल्यास व्यनी करावा.आपल्या सेवेस तत्पर आहोत.

सहमत आहे. थोडी भर. प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग आहे. ते ज्यांना शक्य नाही त्यांनी आपण जिथं/ज्या क्षेत्रात आहोत तिथं संवेदनशीलपणे, खंबीरपणे आणि दूरदृष्टीने काम केलं तर त्याचाही उपयोग होईल याची खात्री आहे. किंबहुना समाजात असं चांगलं काम अनेक लोक करत असतात - त्यामुळे समाज रसातळाला जाण्यापासून वाचतो; काही आशा राहते आपल्यासारख्या सामान्य माणसांना. चांगल्या प्रशासकाला चांगल्या माणसांची गरज असते. अन्यथा एक व्यक्ती केवळ पद किंवा सत्ता आहे म्हणून किती बदल घडवून आणेल याला मर्यादा पडतात.