राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे. किंबहुना या दोन पायर्या नसुन आयुष्यभराच्या साधनेचा भाग आहे असं मला वाटतं कारण कुठल्या तरी एका क्षणी चला आता यम, नियम सिद्ध झाले, आता आसनाच्या अभ्यासाला लागुया अशी वेळ आयुष्यात येणं कठीण वाटतं. यम, नियम सिद्ध व्हायला किती काल लागेल हे कोण सांगणार? त्यामूळे यम, नियम हे योगसाधनेत कायमस्वरुपी बरोबरीनेच केले जात असावेत. राजयोगाबरोबरच हठयोगाच्याही व्याख्येचा विचार करणं अस्थानी ठरणार नाही. हठयोगाचा मूल अर्थ हट्टाने किंवा जबरदस्तीने केला जाणारा योग असा नसुन येथे “ह” म्हणजे सूर्य व “ठ” म्हणजे चंद्र असा या अक्षरांचा सूचक अर्थ आहे. सूर्य आणि चंद्र हे आपल्या आयुष्यातील द्वंद्वाचं प्रतिक आहेत. आयुष्यातील या दोन्ही महत्वाच्या बाजूंचा समतोल साधण्याचा मार्ग म्हणजे हठयोग असा हठयोगाचा खरा अर्थ आहे. हठयोगाचा हा उदात्त अर्थ लक्षात घेउनच आपल्याला पुढे विवेचन करायचं आहे. पातंजल योगसुत्र वाचताना हे जाणवतं की येथे तत्त्वज्ञानावर जास्त भर आहे. राजयोग हा मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येय गाठण्याचा मार्ग असला तरी सूत्रबद्ध स्वरुपातल्या या ग्रंथात भाष्याची गरज भासते. हठयोगात मात्र प्रत्यक्ष क्रियेवर भर असल्याने कृती करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. आसन, प्राणायाम, ध्यान यांची नावे आहेत. राजयोगाचं तत्त्वज्ञान हे एखाद्या शास्त्राप्रमाणे मांडलेलं असून, सूत्रबद्ध भाषेने ते जास्त रेखीव झाले आहे. हठयोगाचे ग्रंथदेखिल रेखीवपणात मागे नाहीत फरक इतकाच की येथे तपशीलांवर भर आहे. राजयोगात अष्टांग मार्गातल्या पहिल्या दोन पायर्या यम, नियम आहेत. या यम नियमात वैयक्तिक, सामाजिक, आणि नैतिक आचरण कसे असावे यांच्या सूचना आहेत. हठप्रदीपिकेच्या पाच, किंवा घेरंडसंहितेच्या सात अंगांमध्ये कुठलंही अंग हे यम नियमांना समर्पित केलेलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा लावायचा काय की हठयोग फक्त शारीरिक बाबींनाच महत्त्व देतो? हठयोगात नैतिक आचरणाला फारसं महत्त्व नाही? हठप्रदिपिकेतले उल्लेख मात्र हठयोगात नैतिक आचरणाला अपरंपार महत्त्व असल्याचेच निदर्शक आहेत. पहिल्या उपदेशातल्या अडतिसाव्या श्लोकात सिद्धासनाचे महत्व सांगताना यमामध्ये मुख्य मिताहार, नियमामध्ये मुख्य अहिंसा त्याचप्रमाणे सर्व आसनांमध्ये सिद्धासन मुख्य आहे असे म्हटले आहे. पुढे सत्तावनाव्या श्लोकात नादाशी संबंध असलेला अभ्यास करणारी व्यक्ती त्यागी, बेताचा आहार घेणारी, ब्रह्मचर्य पाळणारी आणि योगाभ्यासात रस घेणारी असल्यास त्यात सिद्धी प्राप्त करते असे प्रतिपादन आहे.
हठयोगातील या उल्लेखांमुळे यम नियमांशी हठयोगाचा घनिष्ट संबंध आहे हे तर दिसुन येतच शिवाय या बाबतीत हठयोग आग्रहीदेखिल आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात येते. या आग्रही असण्याची बाब थोडीशी उदाहरणाने स्पष्ट केली पाहीजे. हठप्रदीपिकेच्या तिसर्या उपदेशात मुद्रांसबंधी विवेचन आहे. मुद्रांमुळे मिळणार्या लाभांचा विचार करतानाच पुढे चौर्याणवाव्या श्लोकात जे योगी पुण्यवान, धैर्यशील्, द्वेषरहित व तत्त्वाबद्दल जागरुक आहेत अशांनाच योगात सिद्धी मिळते, ज्यांची मने द्वेषभावनेने व्यापलेली आहेत अशांना योगात सिद्धी मिळत नाही असा स्पष्ट इशारा दिलेला आहे. राजयोग परंपरेनुसार यम नियमांना अष्टांग मार्गात अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान आहे. येथे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की हठयोगाने जरी एखादा संपूर्ण उपदेश यासाठी खर्च केलेला नसला तरी सिद्धींच्या निमित्ताने योग्य नैतिक आचरणाची आवश्यकता वारंवार आग्रहाने सांगितली आहे. किंबहुना त्याशिवाय योगात सिद्धी नाही असे सांगुन नैतिक वर्तणूकीच्या पावित्र्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असा स्पष्ट अभिप्राय देउन हठयोगकर्त्यांनी कसल्याही शंकेला जागा ठेवलेली नाही. हठयोग हा राजयोग गाठण्याचा सोपान कसा या प्रश्नाचा विचार करण्याआधी काही गोष्टी ज्या मी गृहीत धरल्या आहेत त्या स्पष्ट करणं योग्य. हठयोगातला राजयोग म्हणजे पातंजल योगसूत्र असेल, किंवा नसेलही. कदाचित प्रत्याहार, ध्यान, समाधी या अंतरंग योगालाच राजयोग म्हटलं जात असेल. वस्तुस्थिती काहीही असली तरी हठयोग हा मनाद्वारे अंतिम ध्येय गाठण्यासाठी सोपान म्हणुन वापरला जाण्याचा अर्थ काय या प्रश्नाच्या उत्तरात काही फरक पडत नाही.
धारणा, ध्यान, समाधी यांचा समावेशा तर अंतरंग योगात होतो. त्यामुळे यांना प्रतिष्ठा आहे यात काहीच नवल नाही. परंतु प्राणायामासारख्या शारीरिक क्रियेभोवती देखिल जे वलय आहे ते आसनांभोवती नाही. यम नियमांना हठयोगात किती प्रतिष्ठा आहे हे वर आलंच आहे. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, समाधी हे देखिल राजयोग व हठयोग या दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठा पावले आहेत. ध्यानाचा उल्लेख हठयोगात तपशीलाने आला असल्याकारणाने धारणेचा विचार येथे वेगळ्याने केलेला नाही. कळीचा मुद्दा हा आसनांचा आहे. पातंजल योगसूत्रात आसन स्थिर व सुखमय असावे असे म्हटले आहे. याचा अर्थ नीट समजवून घ्यायला हवा. धारणा व पुढे ध्यानासाठी स्थैर्य आवश्यक आहेच परंतु त्यात दीर्घकाल बसण्यासाठी आसन हे सुखकारक, सुखमयही असणे आवश्यक आहे. हठयोगाची सारी गरज या ठिकाणी एकवटून आली आहे. नुसत्या आसनासाठीच नाही तर प्राणायामासाठीही योग्य व स्थिर बैठकीची गरज आहे. फार काय, यम, नियमांच्या पालनासाठीसुद्धा शारीरिक स्थैर्याची आवश्यकता आहे. शरीराला त्रास होत असताना, ते दु:खण्याखुपण्यामुळे बेजार झाले असताना यम नियमांचे पालन अशक्य नसले तरी कठीणच जाणार. यासाठी मुळातच राजयोगाच्या साधनेसाठी एका विशिष्ट दर्जाच्या शारिरीक क्षमतेची गरज आहे असे दिसुन येते आणि या गरजेच्या पूर्ततेची हमी हठयोग देतो. आसने व क्रिया यांच्या साहाय्याने हठयोग अंतर्बाह्य शरीर शूद्धी घडवुन आणतो. त्यायोगे राजयोगाचा पुढील प्रवास सुकर, सुलभ, निर्धोक व सुखकर होतो.
मात्र यातुन जर कुणी असा निष्कर्ष काढला की आसनांमुळे फक्त शारिरीक फायदेच मिळतात तर ते चुकीचं ठरेल. आसनांचे फायदे हे मनोकायिक आहेत. आसनांपासून प्राप्त होणार्या मानसिक लाभांना अंत नाही. अलिकडे मानसिक विकारांत मेंदुतील रसायनांचा असमतोल ही संकल्पना वारंवार वापरली जाते. या रसायनांचा मूल स्रोत नलिकाविरहीत ग्रंथी हा असतो. या नलिकाविरहीत ग्रंथींच्या स्वास्थ्यावर आसनांचा होणारा सकारात्मक परिणाम हा आता विज्ञानाला मान्य झालेला आहे. याबाबत प्रख्यात जगप्रसिद्ध योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार याचे मत अभ्यासण्याजोगे आहे. आपल्या “योग एक कल्पतरु” या पुस्तकात ते म्हणतात ” शरीर स्थिर ठेवण्यासाठी प्रथम त्यातील सर्व विकार व विकृती बाहेर काढावी लागतात. शरीराचे सामर्थ असे असावे लागते की, त्यात साधना पेलण्याची ताकद येईल व धारणा ध्यान करताना स्थैर्य येईल. वात, पित्त, कफ हे त्रिदोष शरीराचे नियंत्रण करतात. तेव्हा त्यांच्यात संतुलन ठेवावे लागते व पंचवायूंना कब्जात आणावे लागते. तसेच सप्तधातूंचे प्रमाण संतुलित असावे लागते. या सर्व अंतर्गत क्रिया व्यवस्थित असल्या तरच ध्यान साधते आणि हे साधण्यासाठी आसनाभ्यासाची जरुरी असते.” आपलं अवघं जीवन योगविद्येला वाहिलेल्या आचार्यांच्या या वक्तव्यानंतर खरंतर कसलीही शंका मनात राहू नये.
या सर्व पूर्वसूरींच मत लक्षात घेता हेच दिसून येतं की शरीराला डावलून मनाचा अभ्यास होणं कठीण आहे. योगाभ्यासासाठी देखिल शरीराला दुय्यम लेखुन, सुरवात मनाकडून केल्यास यश प्राप्त होणं कठीणच. आरोग्याची सर्वसामान्य व्याख्या येथे उपयुक्त ठरणार नाही कारण सर्वसामान्य स्वस्थ व्यक्तीकडुन तासभर विशिष्ट आसनात स्थिर बसण्याची अपेक्षा नसते. योगाभ्यासात अपेक्षित असलेलं शरीर स्वास्थ्य हे वेगळ्या दर्जाचं आहे. उच्च दर्जाच्या योगाभ्यासासाठी असलेल्या मागण्या देखिल वेगळ्या आहेत. तेथील निकष वेगळे आहेत. या गोष्टी लक्षात घेणं भाग आहे. तर मग हठयोगात मनाचं महत्त्व काय? असा प्रश्न सहज पडु शकतो. यासाठी “राजयोगमजानन्तः केवलं हठकर्मिणः” असे म्हणून हठयोगकर्त्यांनी या प्रश्नाचे नि:संदीग्ध उत्तर देउन ठेवले आहे. राजयोग न जाणता केवळ हठयोग करणार्यांचे परिश्रम सफल होत नाहीत. “एतानभ्यासिनो मन्ये प्रयासफलवर्जितान्” असे सांगुन मानसिक आत्मिक प्रगतीलाच खरे महत्त्व आहे अशी हठयोगकर्त्यांची शिफारस आहे. यासार्या गोष्टी लक्षात घेता असे दिसून येते की प्राचीनांनी शरीराचं महत्त्व पूर्णपणे जाणलं होतं. त्यांच्या मनात आधी शरीर की मन असा कसलाही गोंधळ नव्हता. योगाभ्यासाची सुरवात शरीराकडूनच व्हायला हवी असाच अभिप्राय यातुन व्यक्त होतो असं मला वाटतं.
अतुल ठाकुर
संदर्भः
आरोग्यासाठी योग – योगाचार्य सदाशिव प्र. निंबाळकर
योग एक कल्पतरु – बी. के. एस. अय्यंगार
हठ-प्रदीपिका – स्वात्माराम योगी अनु. – व. ग. देवकुळे
घेरंड संहिता – अनु. – व. ग. देवकुळे
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
अत्यंत अनमोल मार्गदर्शन!
छान झालेत लेख.
लेख आवडला. शरीर व्याधीग्रस्त