Welcome to misalpav.com
लेखक: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | प्रसिद्ध:
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे फ्यंड्री. सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक परंपरेच्या अशा अंधार कोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षानुवर्ष बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतांनाही सामाजिक रुढी परंपरेत गुरफटून गेलेल्या कचरु माने (किशोर कदम) आणि त्याचा मुलगा जाबुवंतराव कचरु माने (सोमनाथ अवघडे) यांची आयुष्यातील स्वप्न, व्यवस्था आणि संघर्षाची चित्तर कथा म्हणजे फ़्यांड्री. परंपरा म्हणजे कचरु माने तर बंड म्हणजे जाबुवंतराव माने. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणू काही भावना असतात आणि त्याचं इतरांना काही घेणं देणं नसतं. असं एक उत्तम चित्रण फ़्यांड्रीत आपल्याला बघायला मिळते.
कैकाडी समाजातील कुटुंबाची ही कथा. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा हा संघर्ष. प्रेमकथा तशी ती नाहीच. कैकाडी समाजाचे टोपले विणणे हे काम परंतु गावाबाहेर वावरणारा आणि गावातील सर्व हलकी कामं करणारा अशा कुटुंबाचे चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे. शाळेची, अभ्यासाची आवड असलेला, शाळेतल्या 'शालू’ (राजेश्वरी खरात) नामक पोरीवर एकतर्फी प्रेम करणारा. गावातल्या अशा हलक्या पोरांना उच्चवर्णीय शालू कडे पाहूही नये म्हणून समाजाने घेतलेली काळजी. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मोहवून टाकायचे असेल तर काळीचिमणी जाळून त्याची राख डोक्यावर टाकली तर व्यक्ती मोहात पडते अशा श्रद्धेने या गायरानातून त्या गायरानात काळीचिमणीच्या शोधात फिरणारा ’जब्या’ ताकदीनिशी आला आहे. आपण हलके आहोत आणि आपण आपल्या पायरीने राहीलं पाहिजे हे कचरू मानेला (किशोर कदम) कळते पण पोराला नाही. गावातील डूकरे गावाबाहेर काढण्याचं काम करावं लागणा-या या कुटूंबाला भेदाभेद याचा सामना कसा करावा लागतो ते लहान सहान प्रसंगात उत्तम उतरले आहे. कचरु मानेची एक मुलगी लग्न होऊनही घरात पडून आहे तर दुसरीचा विवाह ऐपत नसतांनाही हुंडा देऊन करायचा आहे. आपण जे समाजाच्या दृष्टीने हलके काम करतो ते आपल्याला आवड्णा-या अल्लड प्रेमातल्या प्रेयसीला कळू नये म्हणून काम न करणा-या जब्या गावासमोर आणि ’शालू’ समोर डुकरं पकडायला लावण्याचा प्रसंग. हागणदारीचं चित्रण, हागणदारीत डुकरं पकडण्याचा फोटो काढून फ़ेसबूकवर अपलोड करणे, एका व्यवस्थेला दुस-या व्यवस्थेशी अजिबात घेणं देणं नसणे, डुक्कर शिवलं म्हणून स्नान करणारे कुटुंब. अघोरी कृत्याने यश मिळवायचा प्रयत्न करणारा गावकरी. असे सर्वच चित्रण उत्तम झाले आहे. देवाच्या जत्रेत कानठळ्या बसवणा-या वाद्याच्या मिरवणूकीत उच्च वर्णीयांचा जब-या आणि त्याच्या मित्राला होणारा धुसमुसळेपणा अतिशय सुरेख चित्रपटातून आला आहे. दलित जीवन किंवा गावकुसाबाहेरचे जीवन म्हणून जगणा-या कचरु मानेला अनेक कटू जीवघेणे अनुभव घ्यावे लागतात.
पराकोटीचा सहनशील,सोशीक, शांत व कष्टाळू आणि पिचलेले मन आपल्याला समजू लागते. अनुभवांना सामोरे जायचे परंतु संघर्ष करायचा नाही. जातीच्या दु:खाला कारण असलेल्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध तो विद्रोह करुन उठत नाही. व्यवस्थेने त्याच्या माणसापेक्षा त्याच्या जातीला प्रतिष्ठा दिल्याचे दिसते. सतत टोमने, अन्याय, सतत पडतील कामे करणे, परंतु लादलेल्या जीवनाबद्दल चिडून आगपाखड नाही. जब-याला शालू मिळते का ? वाटेल ते बोलणा-या आणि वागविणा-या समाजव्यवस्थेविरुद्ध जब्या उभा राहतो का हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की बघायला हवा यात काही वाद नाही. आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते. आणि चित्रपटाच्या शेवटी ’वळू ’ या चित्रपटाची आठवण व्हावी इतका तो ‘पकडा पकडीसाठी’ वेळ गेलाय असे वाटते. किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही. चित्रपट योग्य ठिकाणी संपलाय का ? असा प्रश्न निश्चित आपल्या मनासमोर उभा राहतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या उंचीने चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे म्हणून निर्मात्याने शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे. व्यक्तिगत हा चित्रपट मला फारसा का आवडत नाहीहे कोणास ठाऊक. दलित साहित्यात सतत अशा आशयाचं लेखन चाळल्यामुळे म्हणा किंवा उचल्या, उपरा वाचल्यामुळे म्हणा. चित्रपट मला थेट भिडत नाही. किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, सुरज पवार, आणि इतर अभिनेत्यांनी एक चांगला अभिनयही केला आहे यात काही वाद नाही. आपल्याला हा चित्रपट का आवडतोय किंवा काही उणिवा जरा तपशिलवार चर्चा व्हावी म्हणून हा पुन्हा प्रपंच....! (छायाचित्र आंतरजालावरुन साभार)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते.
चित्रपट अगदी वास्तववादी व्हावा असे श्री मंजुळे यांचा प्रयत्न होता. तसे त्यांनी लोकसत्ता ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केल होते. त्याचसाठी त्यांना कलाकारहि अस्सल मतितलेच हवे होते असे त्यांचे म्हणणे होते.
किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही.
किशोर कदम मुलाखतीत म्हणाले कि त्यांना इतकी वर्षे शिकलेला अभिनय unlearn करावा लागला. जर त्यांनी अभिनय केला असता तर ते या मुलांच्या समोर उघडे पडले असते. म्हणून चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी मंजुळे ना सांगितले कि "तुला असा वाटला कि मी अभिनय करतोय तर तू मला थांबव" लोकसत्ताच्या संकेतस्थळावर हि मुलाखत तुकड्या तुकड्या मध्ये उपलब्ध आहे बाकी तुमच्या परीक्षणाने चित्रपट पाहण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. बरेच लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरावा.

मला तरी हा चित्रपट खूप आवडला. समाजिक प्रश्न वगैर हाताळला आहे म्हणून तो चांगला आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. मान्य आहे की "काही जणांना" काही वेळासाठी तो थोडा स्लो वाटतो (मला तरी तसा वाटला नाही). पण डॉक्युमेंट्रीतरी नक्कीच वाटला नाही. याचा शेवट तर मला खूप आवडला. कथानकाचा समान धागा असलेल्या या अगोदरच्या चित्रपटांपेक्षा (शाळा आणि टाईमपास) याचा शेवट कलात्मक वाटला. कथेच्या प्रमुख पात्राचं पुढे काय झालं असेल? वगैरे प्रश्न दिग्दर्शक प्रेक्षकावर सोडतो. चित्रपटाच्या मध्येच कुठेतरी जब्याला तो विहिरीत गटांगळ्या खातोय असं स्वप्न पडतं, तो शॉट दिग्दर्शकाने का बरं चित्रित केला असावा? म्हटलं तरं "काळी चिमणी" हा अंधश्रद्धेचा भाग आहे, पण दुसर्‍या नजरेतून बघितलं तर ते एक रुपक आहे. या काळ्या चिमणीचा पाठलाग हा त्याच्या "निरागस स्वप्नांच्या पाठलागा" सारखाच तर नव्हे? खरं तर लोकसत्ताच्या वेबसाईट वर जेव्हा ह्या दिग्दर्शकाला स्वतः ऐकलं तेव्हा वाटलं की त्याने खूप आतून चित्रपट बनवला असावा. त्यात बरेचसे त्याचेच अनुभव आहेत. देऊळ नंतर बर्‍याच दिवसांनी मला एक चांगला चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं. (तसे मी फारच कमी चित्रपट पाहतो त्यामुळे कुठला चांगला चित्रपट मिस झाला असेल तर माहित नाही). राहता अजून एक मुद्दा या चित्रपटाला बर्‍याच जाणकारांनीही उचलून धरलं. नाही म्हणायला तो बायस चित्रपट पाहण्यापूर्वी होता.

छान परिक्षण सर. पडदयावरच्या जब्याचं आयुष्य शीतल वाटावं ईतपत दाहक आयुष्ये जवळून पाहिली आहेत. तरीही हा सिनेमा मन सुन्न करुन गेलाच.

फॅण्ड्री थेट्रात पाहिला. प्रचंड आवडलेल्या चित्रप्टांपैकी एक आहे. अत्यंत संयत तरी प्रभावी. बाष्कळ्पणा थिल्लरपणा आणि आक्रस्ताळेपना ह्यांचा संपूर्ण अभाव, तरी शेवटी शिल्लक उरणारा ठसा. खोल जाणवनारी गोष्ट. वल्लीचा प्रतिसाद पाहून कससच झालं. तो कितीतरी चांगल्या गोष्तींना मुकलाय ह्याची त्याला जाणीवही नाही असं वाटतं. त्याची एकूण खोली व व्यासंग लक्षात घेता त्याला आवडतील असे इतरही काही चित्रपट मायभाषेत आहेत, हे नमूद करु इच्छितो.

हाहा. ज्याची त्याची आवड. मला स्वतःला मराठीमधले सामना, सिंहासन, जैत रे जैत, धूमधडाका, धडाकेबाज, दे दणादण असे चित्रपट प्रचंड आवडतात.

ज्याची त्याची आवड हे सर्व ठीक..पण आवडीचा निकष असा घाऊक ? मराठी चित्रपट फारसे पाहात नसल्याने याच्या वाट्यालाही जाणार नाही ही कारणमीमांसा अगदीच काहीच्या काही वाटली. विशेषत: मराठी सिनेमात खरोखर खूप काही नवे वेगळे येत असतानाच्या काळात. असो.

कारणमीमांसा काहीच्या काही आहे हे मान्यच. पण मला स्वतःला गंभीर किंवा संदेश वैग्रे देणारे चित्रपट आवडत नाहीत. चित्रपट हा मनोरंजनासाठीच पाहणे हा माझा निकष आणि त्यात हल्लीचे मराठी चित्रपट बसत नाहीत. अर्थात त्यालाही अशोकमामांचा एक डाव धोबीपछाड, निशाणी डावा अंगठा असे काही अपवाद आहेतच.

तुमच्या या धारणेमुळे तुमच्या हातून चांगलं असं खुप काही निसटतंय. :)

हेच आम्ही तुम्हाला पण म्हणू शकतो की. आठवा अजिंठा लेणी आणि तुमचा वैतागलेला चेहरा. शेवटी हे व्यक्तीसापेक्ष असतं; नाही का? :)

आत्तापरेंत वाचलेल्यापैकी आवडलेला हा दुसरा लेख. मस्त लिहिलं आहेत प्रा डॉ. मला हा सिनेमा पहायचा आहे, पण इतक्यात इतरांना थेटरमध्ये आलेले अनुभव वाचून जायची इच्छा होत नाहीये. एखाद्या मधल्या दिवशी गेल्यास गर्दी कमी असेल का? बघणार पण हा सिनेमा. ह्या सिनेमात काम केलेले बालकलाकार वन फिल्म वंडर ठरु नयेत ही इच्छा. (वळू मध्ये काम केलेला बालकलाकार पुन्हा आपल्या नेहमीच्या जगात परतला ना? काय वाटत असेल त्याला औटघटकेच्या प्रसिद्धीचं? अधिक त्रासदायक ठरत असेल का ते?) बाकी मलाही किशोर कदम हल्ली फारसा भावत नाही. त्याचा एकच प्रकारचा अभिनय आवडत नाही. एका कविता वाचनाच्या कार्यक्रमात त्याचा वावर, शब्दफेक, बोलायची एकूणच पद्धत हे सगळंच डोक्यात गेल्यापासून अधिकच.

हेच परिक्षण काय ते समजले, नाहीतर दोन तीन लेख वाचल्यावर गोंधळ झाला होता. सिनेमा जालावर उपलब्ध झाल्याशिवाय पाहता येत नाही व उपलब्ध झाल्यास पाहू शकीन याची खात्री नाही.

नाना चेंगटपणाबद्दल आभारी आहे. आपल्याला चूक शोधता आली आनंद वाटला. बाकी, चित्रपट जेव्हा पाहाल तेव्हा त्याबद्दल काही लिहिता आलं तर जरूर लिहावं. वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे

थेटरात ? सिंगल की मल्टीपल स्क्रीन ? आजुबाजौला कुणी दंगा केला का ? अगदी गेला बाजार एखादा साक्स्चा वास किंव्हा उस्फुर्त काव्य चित्रपट पाहिल्यावर सुचले काय ?

मिपावर एक धागा होता तसा अनुभव आला नाही. 'काय गड्या चिमणी काय गावना गड्या' या डायलॉगला दोनचार पोरं लै फिदी फिदी हसत होते. वरीजनल जब्या काळी चिमणी बद्दल बोलत असतो तर या फिदी फिदी करणा-या प्रेक्षकांना 'शालू' ही चिमणी वाटत होती. बाकी, काही प्रेक्षकांबरोबर आम्ही त्यांच्याकडे 'काय बावळटपणा चाल्लाय राव' अशा दृष्टीने पाहिल्यावर ते जरा शांत झाले. बाकी, चित्रपट विना व्यत्यय पाहता आला. बाकी सॉक्सचा वास आला नाही आणि चित्रपट पाहून काव्यही सुचले नाही. फक्त चित्रपट अचानक संपल्यावर चित्रपट संपलाय यावर क्षणभर विश्वास बसला नाही. एवढेच. -दिलीप बिरुटे

जर फ़ेड्रि आपणास विषेश पसंतीस पडला नाही तर. असो चित्रपट हां गुंगवून ठेवणारा असावा ज्यांना नुसत्या जीवंत अभिनयाची हॉउस आहे त्यांनी चित्रपटातच तो पहायला मिळावा असे दिवस महाराष्ट्रात यायचेत अजुन

फ़्यंड्री / फँड्री की अजुन काय उच्चार असेल तो अजुन पाहिला नाही. पण पहायची उत्सुकता मात्रं आहे. (म्हणुन आजवर या चित्रपटाची आलेली परिक्षणं वाचली नाहीत. काही अधले मधले प्रतिसाद तेवढे चाळलेत.) हा थेटरात पहायचं माझ्या भाग्यात लिहिलेलं नसावं, त्यामुळे यथावकाश जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पाहिनच. कारण आवर्जुन पहावेत असे मराठी चित्रपट फारच विरळे आहेत.

अतिशय मेहनत घेऊन, प्रत्येक लहान तपशीलांना जोखूल केलेली निर्दोष निर्मिती! नागराज आणि टिमचे मनःपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा आनि सलाम!

या पिक्चरने नवा विचार काय दिला आहे समाजाला ? की फक्त स्वप्न बघायला प्रवृत्त केले गेले आहे? की फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनविले आहे?

चित्रपटातुन सामाजिक जाणिव जागी होत असती तर काय आयुर्हित? सर मी तुमच परिक्षण पुरं नाही वाचल कारण मला चित्रपट पहायचा आहे. अन मला आधीच ष्टुरी नाही वाचायची. तरीही एकूण असा सुर दिसतोय की एका ब्राह्मणाच्या मुलीवर एक वेशीबाहेरचा असा म्हणता येइल असा मुलगा प्रेम करतो. अर्थात कोवळ्या वयातसुद्धा ही भावना फुटताच कामा नये असा समाजाचा दंडक अस काहीस. मला एक विचारायच आहे. कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? मुलगा उच्च्वर्णिय का नाही दाखवला जात? म्हणजे उलट मांडणी वगैरे? चाणी मध्ये साधारण अशी परिस्थीती होती.पण त्यातही ती मुलगी म्हणुन तिचा फायदा घेतलेलाच दाखवला गेला होता. देव जाणे. उगा प्रश्न पडला म्हणुन बोलले झालं.

>>>एकूण असा सुर दिसतोय की एका ब्राह्मणाच्या मुलीवर एक वेशीबाहेरचा असा म्हणता येइल असा मुलगा प्रेम करतो. अर्थात कोवळ्या वयातसुद्धा ही भावना फुटताच कामा नये असा समाजाचा दंडक अस काहीस. मला एक विचारायच आहे. कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? कारण सरळ आहे. त्यामुळे अन्याय झाला अन्याय झाला असं ठासून सांगता येतं. आता तुम्ही जे विचारले आहे ते उलट का नाही दाखवलं जात... मराठीतीलच एक महान (!) लेखकांची महान (!!!)कादंबरी आहे बघा त्यात त्यांनी अनेक "दाब" कसे वर येत आहेत हे दाखवलं आहे. अगदी ज्ञाणेश्वरांपासून दाखले दिले आहेत... वाचा !! सध्या ब्राह्मणांनी आणि उच्च वर्णियांनी हजारो वर्षे फक्त अन्याय केला असा इतिहास अभ्यासक्रमात आहे पास व्हायचं तर हाच इतिहास शिकावा लागेल. प्रश्नपत्रिका चुक कि ब्र्रोबर सांगा १) ब्राह्मण या देशात उपरे आहेत २) वैदिक संस्क्रुती शोषणावर आधारीत आहे ३)... एका वाक्यात उत्तरे द्या १) ब्राह्मणांचा ग्रंथ कोणता? २) गीता युद्धास प्रवृत्त करते का? ... असेच परत केव्हातरी

वाईट वाटले... चित्रपट पुर्ण बघा असे सुचवतो...चित्रपटात धर्माचे ऊल्लेख नाहित. तुम्हिही टाळावा असे सुचवतो. मी मात्र सुन्न झालो फँड्री बघुन. अशी परिस्थिती जवळुन बघीतली आहे म्हणुन लिहिले. सध्या जवळपास अशीच परिस्थिती बघत आहे. चित्रपटात जसे दाखवले आहे अगदी तशीच परिस्थेती एका व्यक्तिने अनुभवतांनाही बघितले आहे. बाकि नागराज ने कंपुगिरी च्या संदर्भात भाष्य केले आहे. एकदा एखाद्या कंपुने एखाद्या व्यक्तिवर प्रोटोटाईप चा शिक्का मारला कि सगळे त्याचा ऊपहास करतात. तो शिक्का कधीही पुसला जात नाही. जब्या च्या बाबतीत हेच घडतांना आपण बघतो. कमिआधिक प्रमाणात परदेशी राहणार्या जनतेला असा अनुभव कधी ना कधी आलेला असतोच. गावातला आणि गावकुसाबाहेरचा ... एकदा अशी रेशा रेषा आखली कि मग इकडच्यांनी तिकडे यायचे नाही आणि आधिकार मागायचे नाहित. शेवट अगदी खराखुरा केलेला आहे. मला त्या काठीला बांधुन घेउन चाललेल्या डुकरात परिस्थितीत आणि जब्यात काहिच फरक दिसत नव्हता. फक्त जब्या आपला राग दगड मारुन काढु शकतो एव्हढेच.

मला एक विचारायच आहे. कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? मुलगा उच्च्वर्णिय का नाही दाखवला जात?
लाखमोलाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मलाही पडतो खरा. पण हा प्रश्न पडणेच चूक आहे अशी सध्याची शिकवण असल्याने गप्प बसतो झालं.

वरणाने न्हवे! तर सनस्कार, व्हीचार आणी दन्यानाने उच्च असणे महत्वाचे आहे हे जो परयंत समाजातील सरव वरणाच्या सरव लोकाना ओमजत नाही तो परयंत हे असेच चालणार.... त्यावर कोणाचाच तसा इलाज नाही.

माझं इंतरप्रिटेशन थोडं असं आहे... कथेत पात्रे गृहित धरताना एक साचा गृहित धरला जातो. म्हणजे पुरूष = धारीष्ट्य/जहाल/आक्रमक इ. आणि स्त्री = संयम/मवाळ इ. आता कथेत नायक डार्क हॉर्स हवा असेल तर कथेतल्या पात्राला ताकदवान असूनही विळख्यात जखडलेलं असावं लागतं (म्हणजे नायक रुबाबदार, पिळदार शरीरयष्टीचा पण गरीब घरातला... काही नाही तर किमान शत्रूपक्षातला असावा लागतो). तेच जर कथा स्त्रीप्रधान असेल तर स्त्रीपात्राच्या बाबतीत. टाईमपास किंवा फँड्री हे पुरूष व्यक्तिरेखेभोवताली फिरणारे सिनेमे आहेत. त्यांना प्रेक्षक नायकाच्या बाजूने झुकायला तर हवे आहेत पण नायक स्वतः कथेला पुरून उरलेला चालणार नाही. म्हणून मग नायकाला संवेदनशील बनवतानाच त्याच्याकडून आर्थिक, शैक्षणिक, समानतेची ताकद हिरावून घेतली. जेणेकरून तो काही प्रमाणात कमजोर पडेल आणि अपेक्षित शेवट साधता येईल. नायक उच्चवर्णिय आणि नायिका दलित दाखवणे शक्य आहे, पण उलट दिशेचे द्वंद्व दाखवणे अवघड, आणि समाजमनावर कमी परीणामकारक. ब्राम्हण कुटूंबात, कुटूंबाची घुसमट हा कंगोरा गायब होतो. दलित कुटूंबातली मुलगी वरच्या जातीत जाणार म्हणून विरोधाची धार असली तरी ती त्यामानाने कमी असू शकते. नायकाकडे त्याच्या मूळ गुणांशिवाय आता सवर्णतेचा फायदा, शिक्षण, कदाचित आर्थिक स्थैर्यसुद्धा दिसेल. नायक वरचढ होतोय. मग अर्थातच नायिकेच्या बाजूला असलेले प्रश्न जास्त मोठे दिसू लागतात आणि अजाणतेपणी प्रेक्षक तिच्याकडे झुकतो. अशात सिनेमा स्त्रीप्रधान होऊ शकतो आणि चानीच्या जवळपास जाऊ शकतो. आणि स्त्रीप्रधान चित्रपट, त्यातही अशा विषयांवरचा असेल तर किती चित्रपटगृहात पोहोचेल ह्या काळजीने अशा कथेला शक्यतो टाळले जाते. अर्थात हे माझे मत. सगळ्याच गोष्टी भावनेवर चालत नाहीत. शेवटी चित्रपटाचे उद्दीष्ट पैसे कमावणे हेच असते. (दिग्दर्शक/लेखकाचा उद्देश काहीही असला तरी).

अच्छा म्हणजे या चित्रपटात ज्याची २०००० रुपये द्यायची ऐपत नाही त्या वेशीबाहेरच्या एका माणसाच्या मुलीवर एक सुखवस्तु उच्चवर्णिय मुलगा प्रेम करतो आणि तिच्याशी हुंडा न घेता लग्न करायची मागणी करतो म्हणून तो गरीब माणूस त्या मुलाचा भर गावासमोर क्रूर अपमान करतो असं दाखवायला हवं होतं ना? असो. उच्चवर्णियांवरच्या अन्यायाच्या निवारण कार्यात स्वतःला झोकून देणार्‍या लोकांना आमच्या शुभेच्छा!

अन्याय उच्च्वर्णीयांच्यावर नाही तर दुसृयाच कुणावर आहे. जसा तुम्ही गावकुसाबाहेरचा माणुस हा लाचार अथवा बलहीन समजता, तसाच समाजाचा अर्धा भाग कमजोर आहे. अन तो म्हणजे स्त्री. कुणी नुसत आवडण वेगळ. मनावर कोणाचही बंधन नाही. पण त्या आवडण्याचा जर दुसर्‍या व्यक्तीवर दुश्परिणाम होत असेल तर काय? माझ म्हणन एव्हढच आहे. प्रेमाबद्दल बोलताय ना? मग हे अस प्रेम एखादा उच्च्वर्णिय तरुण एखाद्या गावकुसाबाहेरच्या मुलीवर करताना का नाही दाखवत/ का नाही तो सगळ्या सिस्टम विरुद्ध उभा दाखवत? जे कमजोर आहेत त्यांनी त्यांच्याहुन कमजोर वर्गावर नजर ठेवण्याचा भाग झाला हा. अर्थात हे समजुन घ्यायला थोड कठिण आहे,पण उच्च वर्णियांच्या घरात दलीत मुली राहु शक्ल्या तर समाजाला बदलायला जागा आहे. कारण अजुनही स्त्रीया थोड्याफार प्रमाणात सासरचे बदल स्विकारतात. पण पुरुष पत्नीकडुन आपल्या प्रमाणे वागायची अपेक्षा करतात. दुसरी गोष्ट, अन्याय घडुन गेलाय याची परत फेड दुसर्‍या कमजोरांवर अन्याय करुन होणार असेल तर असो बापडे.

स्त्रियांवर दोन्हीकडे अन्याय होतो हे मान्य आहे पण फॅन्ड्री चित्रपटाचा विषय तो नाहीय आणि बदला घ्यायला म्हणून त्या मुलीवर अत्याचार होतात असेही दाखवलेले नाही. मुळात फॅन्ड्रीसारख्या चित्रपटांचा हेतू उपेक्षित वास्तव दाखवण्याचा असताना त्यांच्याकडून उच्चवर्णिय मुलाचे दलित मुलीवर प्रेम आणि त्यासाठी स्वतःच्या समाजाविरुद्धचे बंड अशी फॅन्टसी दाखवण्याची अपेक्षा का करावी?

विषय नसेल तर असायला हवा. मग तो चित्रपट सामाजिक बनत नाही. नुसती एक बाजू दाखवुन समाजाला तसा विचार करायला लोआवण्याची परवानगी मिळते दिग्दर्शकाला. मग असे प्रश्न मांडताना तसा विचार करुन मांडावेत. माझा पहिला प्रतिसाद याला उद्देशुनच होता. अन तो व्यर्थ तर्क आधारित नव्हता. छोटी गावे अन त्यांचे छोटे प्रश्न हे अलिप्त राहू देत नाहीत.

तुम्हाला काय म्हणायचंय ते मला कळलं आता. तुमच्या मूळ प्रतिक्रियेला आलेल्या उपप्रतिसादांनी माझी दिशाभूल झाली. पुरुषाने स्त्रीवर अत्याचार केला तरी त्यातही आपल्याकडे फरक केला जातो. उच्चवर्णिय पुरुषाने अगदी खालच्या जातीतल्या स्त्रीवर केलेला अत्याचार हा अत्याचारच न वाटणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. निपाणीतल्या बिडीकामगार असो, की ऊसतोडणीच्या मजूर बाया असो की वेचणार्‍या श्रमिका असोत, त्यांचं ढळढळीत शोषण होत असतंच. कित्येक दलित स्त्रियांची त्यांच्या मुला-बाळांच्या अपराधाची शिक्षा म्हणून गावातून विवस्त्र धिंड काढली जाते पण त्याविरुद्ध फारसं लिहीलं, बोललं, दाखवलं जात नाही हे खरं आहे.

>>>मग हे अस प्रेम एखादा उच्च्वर्णिय तरुण एखाद्या गावकुसाबाहेरच्या मुलीवर करताना का नाही दाखवत यामुळे स्त्रीचं साध्य असणं किंवा स्त्री हीच साध्य आहे हा संदेश समाजात जाणं कसं थांबेल? त्या उच्चवर्णिय मुलासाठी ती दलित मुलगीच साध्य बनली की तुमच्या चित्रपटात! तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कारण इथला तुमचा रोख आणि खालच्या प्रतिसादातला तुमचा रोख मला काँट्रॅडीक्टींग वाटतोय.

कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? मुलगा उच्च्वर्णिय का नाही दाखवला जात? म्हणजे उलट मांडणी वगैरे?
याचं उत्तर थोडं तांत्रिक आहे, सामाजिक नाही. आत्तापर्यंत समाजात कर्ता म्हणजे पुरुष अशी पद्धत आहे. त्याचंच प्रतिबिंब कथनात पडतं. म्हणजे अनेक वेळा 'ध्येय साध्य करण्यासाठीचा लढा' दाखवायचा असेल तर प्रोटॅगोनिस्ट हा पुरुष आणि त्याचं ध्येय म्हणजे स्त्री असं दाखवण्याचा संकेत आहे. ते साध्य करण्यासाठी त्याच्या मार्गात अडथळे येतात, आपल्यात असलेल्या धमकेने, शक्तीने, व मानसिक बळाने हे सर्व अडथळे तो पार करतो आणि शेवटी आपलं प्राप्य - म्हणजे ती स्त्री - मिळवतो. सर्वसाधारण राजपुत्र हिरो असलेल्या अनेक परिकथांमध्ये हे दिसून येतं. साध्य हे मोहक व आकर्षक असणं, त्यावर आपलं जिवापाड प्रेम असणं, त्यासाठी आपण प्राणाचीही बाजी लावायला तयार होणं - हे कर्ता पुरुष आणि कर्म स्त्री ठेवून सहजपणे सांगता येतं. आत्तापर्यंतच्या इतिहासात कायमच स्त्रिया या पॅसिव्ह आणि पुरुष हे अॅक्टिव्ह असल्यामुळे ते रोलही योग्य जमले होते. (यापुढचा प्रतिसाद हा फॅंड्रीच्या कथावस्तूचा किंचित उलगडा करणारा आहे. पण किंचितच.) फॅंड्री ही अर्थातच परीकथा नाही. तरी तीत कशाचीतरी आस असणारा जब्या आहे. त्याला दोन गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे ती मुलगी - शालू. ही वरच्या जातीतली आहे. सुंदर वगैरे नसली तरी दिसायला चांगली आहे. दुसरी गोष्ट हवी असते ती म्हणजे एक जादूई पक्षी. त्याच्या पिसाची राख तिच्या अंगावर टाकली की ती मिळणार अशा काहीशा विश्वासात तो वावरतो. आता याचा वरवर पाहता एक मुलगा, त्याचं प्रेम जिच्यावर जडलं आहे अशी मुलगी आणि तिला मिळवण्यासाठीची जादूची कांडी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असं पाहता येतं. पण नुसतं तेवढंच म्हणून चालत नाही. कथानकाच्या मांडणीत उघडउघड जब्या हा दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतो. आणि शालू ही त्या समाजाची आस. चांगल्या जीवनाची, संपन्नतेची, स्थैर्याची, सन्मानाची. उच्च जातींना जसा राजरोसपणे जगण्याचा हक्क मिळतो त्या हक्काची, आणि त्याबरोबर येणाऱ्या सुखवस्तू जीवनाची. हे मिळवायचं असेल तर शिक्षण हवं, नोकरी हवी, उद्योगधंदा हवा... हे सगळे मीन्स टू द एंड. म्हणजे शालू मिळवण्यासाठी जसं जब्याला तो पक्षी हवासा वाटतो त्याप्रमाणे शिक्षण वगैरे मिळालं की चांगलं जीवन, संपन्नता मिळेल अशी आशा आहे. म्हणून तो पक्षी पकडण्याचा ध्यास. पण तो पक्षी काही हाताला लागत नाही. त्यासाठी कितीही वणवण केली तरी गवसत नाही. कधी अगदी हाताशी येतो, पण जातीवर लादलेलं गलिच्छ काम करण्याच्या जबरदस्तीखाली तो पकडायला फुरसत मिळत नाही. आणि जो गलिच्छपणा नकोसा असतो, जो चिखल नकोसा असतो त्यातच स्वतःला बरबटून घ्यावं लागतं. ही असहायता आहे. असो, मुलगाच का दाखवलेला आहे याचं थोडक्यात उत्तर हे की ध्येय साधण्याचा प्रयत्न आणि त्यातून येणारी विफलता दाखवायची असेल तर स्त्री हे ध्येय आणि पुरुषाचा प्रेमभंग हे जास्त फिट बसतं.

म्हणजे आजुनही आपण रामायण महाभारताच्या काळातच आहोत अस म्हणा की सरळ! त्या काळी कस स्त्री पळवणे, नासवणे, हेच एखाद्याची पत वाढवु वा डळमळवु शकायच तस आजकाल, पटवणे, छेडणे वा मिळवणे ही समाजाच्या स्तरात वर यायचे दाखले झाले. दुसरा कोणताही मार्ग नाही? नोकरी मिळवुन दाखवणे, व्यवसाय उभारुन दाखवणे, कोणत्याही क्रीडा क्षेत्रात चमकुन दाखवणे. हे सगळ राह्यल बाजुला. एक पोरगी मिळाली की झाली तुमची सुधारणा? का इतका संकुचित म्हणते मी असा वास्तववादी दृष्टीकोण? वर नगरी म्हणतात तुम्हाला मुलगा उच्च्वर्णीएय अशी फॅटसी हवी का? मी म्हण्ते का नाही?

तुमचा गैरसमज होतोय. मुलगी मिळाली की सुधारणा झाली असं नाही. ध्येयाचं रूपक म्हणून स्त्री-पात्र वापरणे हा साहित्यिक संकेत आहे असं मी म्हणतो आहे. त्यामुळे दलित समाजाला जी उन्नतीची आस आहे तिचं चित्रण करण्यासाठी स्त्रीपात्र योजलेलं आहे. (जब्या = दलितसमाज, शालू = उन्नती, पक्षी = ते साध्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी)

अन कशी काय बाबा ती उन्नती? फक्त तिच्या पावलाने काय शिक्षण, पैसा, समाजात पत चालत येणार आहे? काय साधल जाणार आहे? माझा विरोध या धारणेवर आधारलेल्या कल्पना विश्वालाच आहे. कारण या कल्पना फक्त थेटरात रहात नाहीत. कोवळ्या वयाच्या मनांवर परिणाम करुन जातात. मिसलीड करतात. स्त्री ही एक साध्य करायची वस्तू बनते अश्या कल्पना विलासांनी. थांबवलेलेच बरे असे कल्पना विलास. कोणताही व्हिलन उठतो हिरोच्या हिरॉईनला पळवुन नेतो. त्या आधी दिडतास तो हिरो ती हिरॉइन मिळण्यासाठी नाना प्रकार करत असतो. आयला आहे काय हे? का एव्हढी स्त्री केंद्रीत धारणा म्हणते मी?