Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
कालच्या दिवसाच्या निमित्ताने! नेहमी कामानिमितानी शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्‍याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्‍या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा? सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो! एकानी कडेनी दुध ओतावे..आणि कुणी दुसर्‍यानी पंचामृत टाकावे..त्यातच अजुन साखर/शेंगादाणे/गूळ/धान्य/मध केळी ... अरारारारा... अहो आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी कुणी खुर्चीत बसवून अंगभर मिठाईमर्दन करून त्यातली थोडी थोडी तोंडात भरवून ह्याप्पी बर्थ डे केलं तर कसं वाटेल? भक्तिमार्गात स्वच्छतेची भावना लोप पावलीच पाहिजे असा काही संकेतच आहे का? या मंदिरवाल्यांचं तर सोडा,पण ज्या संघटना हल्ली स्वतःला धर्माभिमानी म्हणवतात,त्यांनी तरी आंम्हाकारणी सहकार्या यावे. पण त्यांनाही "हे" नको आहे. त्यांचा सारा आवेश गाभार्‍यात सोवळी-घालुन शिरावे का शिरू नये! असल्या फालतू कारणातच संपतो. नाहि म्हणता गेली ५ वर्ष ठणाणा केल्याचे फलित म्हणजे- फक्त एका मंदिराने..भक्त मंडळींना नीट मॅनेज करायचा प्रयत्न या वर्षी केला आणि मी सुचवलेली "गाभार्‍याबाहेर धान्य/दुधासाठी-बादल्या-भांडी योजना" एका निरिक्षक माणसासह राबवायला सुरवात केली. (तरी काल आमचा लघुरुद्र संपेपर्यंत लोकांना थोपवणं जड गेलच!) एरवी दुसर्‍या दिवशी अनेक मंदिरात शंकराची पिंडी आणि भोवतीचा परिसर नारळाच्या घासण्या घेऊन साबणसोड्यानी धुवायची वेळ येते. मला नेहमी प्रश्न पडतो,की जगातल्या प्रत्येक समाजाला आपल्या धर्मातली ही अश्या प्रकारची घाण साफ करायचा कंटाळा का??? वास्तविक याच कामात या धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्या समाजातल्या सज्जनांन्नी (मग ते धार्मिक असोत,अथवा नसोत!) या संघटनांच्या मागे यासाठी तगादा लावायला पाहिजे. माझ्या मते "हे" घडेल तो खरा सुदिन! शिवरात्र जागवोनी जन शांत झोपलेले कावून रात्र सारी पोळतो शंभू...स्व-भावे॥धृ॥ देवळात भोवती त्या पडलाच बेल सारा दहिभात ही सुखाने करी पिंडि पाशी राडा किती घाण अंतरी या,तरि शंभू शांत आहे॥१॥ भरला नाकात त्याच्या पन्हाळीतला सुगंध माश्या.. तिथे भणाणा करितात अंदा-धुंद गोमुखा समोर पुढती साक्षात गटार आहे॥२॥ काहूर अंतरीचे स्वमनात चोप देई भक्तांसी सांगताना मन हे दमून जाई भक्तीत माज सारा हे दिव्य(?) रूप आहे.॥३॥ ================ मूळ रचना:-मधुकर जोशी "आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे" ==========================
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

जाल जगात सध्या "मी देव मानत नाही" हेच सतत (ओ)रडून सांगण्याची क्रेझ आहे. तेव्हा बोला जय जय राम कृष्ण हरी! पोपटपंची दुर्लक्षी रामपुरी!!

परवा कमला नेहरू पार्क जवळच्या दत्त मंदिरात गेले होते. मी कधीही मंदिरात आपणहुन जात नाही आणि गेलेच तर पाया पडत नाही कारण मनातुन तसं काही करावं असं वाटत नाही.. पण हे मंदिर इतकं प्रसन्न आहे की का कोण जाणे मनापासुन पादुकांवर डोकं ठेवावं वाटलं.. शांत वाटत होतं एकदम.. दत्त महाराज येऊन लगेच माझं भलं करतील असं काही मला वाटत नाही.. पण जर २ मिनिटं सगळे तर्क बाजुला ठेवुन पाहिलं, तर शांत वाटलं.. मला अजुनही वाटत नाही की कुणी येऊन माझी संकटं दुर करणारे, पण मनाचा झगडा थांबवला तर जी शांतता मिळते त्यातुन बहुदा संकटांना सामोरं जायची ताकद मिळत असावी (किंवा दुसर्‍या शब्दात मनाचा झगडा चालु असताना जी शक्ती वाया जात असते, ती वाया जाणं थांबतं म्हणुन की काय..) एरवी मी देव मानत नाही, पण त्यात काही विषेश नाही. जेव्हा माझ्या आयुष्यात सगळ्यात अवघड प्रसंग आला होता.. माझा मुलगा जीवन मरणाशी झगडत होता.. तेव्हा माझ्या मनाशी माझा हाच झगडा चालु होता. मी देव मानत नव्ह्ते त्यामुळे उपास तापास, नवस करण्याचा प्रश्नच नव्हता. पण शेवटी जेव्हा खुप खुप रडुन झालं.. तेव्हा फायनली मी "रामाला काळजी.." म्हणुन गप्प बसले.. माझी चिंता त्या क्षणी संपली असं म्हणता येणार नाही पण अचानक मी ह्यात काहिही करु शकत नाही हे उमजलं.. ते मला आधीही कळत होतच, पण तरीही मी "डिनायल मोड" मध्ये होते. एका क्षणी मी ती काळजी दुसर्‍याच्या उरावर टाकली.. रामाच्या.. आता तो पाहुन घेईल म्हणुन मी शांत बसले.. खरच राम येणार होता का?... नाही.. नव्हताच येणार.. हे मला तेव्हाही समजत होतच.. पण जर राम आहे असं मानुन माझं गणित सुटत होतं तर का सोडवु नये मी ते? आपण मणुस आहोत.. आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत.. आपलं डोकं एका मर्यादे पलीकडे ताण सहन करु शकत नाही.. तेव्हा माणुस काही ना काही उपाय शोधतोच.. सर्व्हायवल साठी.. त्यातलाच एक मार्ग म्हणजे देव आहे.. कर्मकांड आणि देव ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.. बहुतेकांचा विरोध हा कर्मकांडाला असतो..पण तो देवावर निघत असावा.. बाकी देव ही कल्पनाच आहे.. पण फार उत्तम कल्पना आहे.. सर्व सामान्य लोकांसाठी.. महान लोकांनी सत्य कवटाळावीत.. त्यांच्यात ती पचवण्याची ताकड असते.. पण समाज हा ९९% सामान्य माणसांनी बनलेला असतो.. आणु त्यांच्यात तणावाच्या प्रसंगाना सामोरे जाणयची ताकद नसते.. त्यामुळे त्यांच्या पुढे "देव नाही" हे ओरडण्यचा काही फायदा नाही.. खर तर महान लोकांना आपणहुन हे उमजलं पाहिजे.. जाता जाता.. काल गाडी मध्ये एक आजी भेटल्या.. ७३ वर्षाच्या.. ओळखपाळख नसताना अगदी आपुलकीनं बोलत होत्या..." तु अशी एकटी प्रवास नको करत जाउ रात्रीची.. माणसं फार वाईट आहेत ग राणी.. आता माझि गोष्ट वेगळी, मी इथेच रहाते.. तुला खर वाटणार नाही माझं वय ७३ आहे.. वाटतं का वाटतं?? मला कॅन्सर झाला होता.. पण माझे केस पहा.. सोडुन दाखवु? दाखवु? " आजी बाईंचा खरच मोठ्ठा अंबाडा होता.. पण त्यांचा स्टॉप २ मिनिटावर आला होता आणि ह्या मला केस सोडुन दाखवु का म्हणुन विचारत होत्या.. "अगां काल डांबराचा रस्ता बनवायला आले.. अचानक गाडी माझ्या अंगावर आली.. मला उडवलं ना तिनी.. पण मी एकदम ताठं उभीच.. देव लय भारी आहे.. माझी काळजी घेतो.." असं म्हणुन पोराच्या न माझ्या डोक्यावर हात फिरवुन निघुन गेली.. आता का आपण ह्या म्हातारीला सांगायचं की बाई तुझा देव बिव काही खर नाहीये.. सगळी कल्पना आहे.. जर तिची ही एक कल्पना तिला ७३व्या वर्षी कॅन्सर मधुन उठुन काही बाही उपक्रम करायला बळ देत असेल तर खरच तिला "सत्याची" गरज आहे का? मुळात आपल्याला तरी "सत्य" नीटसं माहिती आहे का?

ज्या गोष्टीने दुसर्‍याला त्रास न देता मनाला काही शांतता मिळत असेल अशी कोणतीही गोष्ट वाईट असू शकत नाही. यावरून एकदा रेल्वेत भेटलेल्या एका अल्पशिक्षित माणसाची आठवण आली. तोही म्हणाला होता, "आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."

"आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून." मानवी स्वभावाचं खरेपण उघड करणारं वाक्य ! हा माणूस "लोकमान्यतेने अल्पशिक्षित" असला तरी "खरा सुशिक्षित आणि बुद्धिमान" आहे.

म्हणून ते वाक्य जसंच्या तसं लक्षात राहिलं आहे! तो बेळगावजवळच्या खेड्यातला एक साधा शेतकरी माणूस होता. एस एस सी पर्यंत शिकलोय म्हणालेला!

उत्तम लेख. महाराष्ट्रा एवढी घाणेरडी देवळ दुसरीकडे कुठेही नसतील. बाकी देव नाही अशी ज्यांची धारणा असते त्यांनी ती स्वतापुतीच ठेवावी उगीच दुसर्यांना misguide करण्याचा प्रयत्न करू नये.

काही वर्षापूर्वी शंकराच्या पुत्रावर सुद्धा हि वेळ आली होती अचानक. पुरोगामी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा असल्या आचरट पणाला साथ देत होते. त्यावेळची एक आठवण खेडला सिद्धिविनायकाचे एक मंदिर आहे, ते खासगी मालकीचे आहे. गावातील बरेच लोक त्याचे दर्शन घेऊन आपला दिनक्रम सुरु करतात. गणपती दूध पीत आहे हे समजताच भक्तांचा जथा दुध पाजायला निघाला. या वास्तूचे मालक आणि पूजारी यांनी गाभारा बंद करून हा आचरट पणा थांबवला, आणि तो सुद्धा अगदी योग्य आणि सौम्य शब्दात प्रबोधन करून.

त्या वास्तूच्या मालकांना आणि पूजार्यांना दंडवत सांगा.

असं होण्याचं कारण १) बरीच देवळे खाजगी आहेत . २)दक्षिणेकडच्या देवळात मूर्तीजवळ जाऊ देत नाहीत आणि आयोजन ट्रसटचे लोक करतात . ३)प्रसाद ,नैवेद्य ,दर्शन ,तोडगे या कल्पनांचे डोंगर पोखरणे कठीण आहे आणि फक्त दुसरा डोंगर तयार होतो . ४)टीव्ही चानेलवर सतत तोडगे सांगत असतात .शनि ,देवी ,शिव आणि मारूती ही मुख्य शांत करण्याची दैवते असतात .अमुक अमूक घ्या डाळ तांदूळ तेल दही वगैरे करा अर्पण मूर्तीवर नाहीतर सोडा नदीत . ५)प्रत्येक पोथीत आडून अथवा स्पष्टपणे सज्जड पण काव्यात्मक दम दिलेला असतो हे नाही केलेल्यांचं काय वाईट्ट झालं . ६)वरच्या दोन मुद्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मूर्तीने मन दगडाचं करून सर्व अंग अभिषेकाने माखून घेणे आणि त्रस्त भाविकांची करूणा "यांचे भले कर रे देवा" सांगणाऱ्याचे ऐकत राहाण्या शिवाय गत्यंतर नाही . ७)या सर्वाँतून नारायण कसे सुटले ?ज्यांचे सध्या भले होत आहे असेच भक्त इकडे येत असतात त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित असते .एकतर हे पहुडलेले असतात अथवा छप्पन भोग खाऊन आनंदात बासरी वादन करत असतात .

"आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."
वाक्य नीट पाहा : १) दगडाच्या किंवा मनातल्या देवाला दिव्याची आवश्यकता नाही, २) दिव्याची आवश्यकता आपल्यालाच आहे ३) कशाला? तर काळोखात देव दिसावा म्हणून! याचा नक्की अर्थ असायं : दिव्याची (किंवा अडचणीतून मार्ग दिसण्याची आवश्यकता) आपल्याला आहे. आणि देव हे काही सल्यूशन नाही (म्हणजे तो दिसून काही उपयोग नाही). आता अडचणीतून मार्ग दिसण्याला कुणी `देव दिसणं' म्हणत असेल तर तो व्यक्तिगत दृष्टीकोन आहे. पण त्यासाठी देवासमोर दिवा लावण्याची आवश्यकता नाही! इथला अनन्याचा एक प्रतिसाद मात्र लक्षवेधी आहे :
एकदा ओटी भरताना मला हा अनुभव आलाय, मी कापड खाली ठेवून नारळ तांदूळ त्यावर ठेवेपर्यंत कापड गायब!
आणि पुढे ती म्हणते :
मला जे काही द्यायचय ते घरी येऊन कामवालीला देते.
तुम्ही जे देवासाठी म्हणून करता ते पुजार्‍यापाशी जातं कारण देव असं काहीही नाही. इतरांना हे दिसत नाही किंवा कळत नाही असं नाही, फक्त मंजूर होत नाही. आपण आपली धारणाच फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं जस्टीफाय करत राहातो, पाहा :
आता का आपण ह्या म्हातारीला सांगायचं की बाई तुझा देव बिव काही खर नाहीये.. सगळी कल्पना आहे..
म्हातारीला सांगायचा प्रश्न कुठे येतो? पण तुम्ही जर असं म्हणत असाल:
एका क्षणी मी ती काळजी दुसर्‍याच्या उरावर टाकली.. रामाच्या.. आता तो पाहुन घेईल म्हणुन मी शांत बसले.. खरच राम येणार होता का?... नाही.. नव्हताच येणार.. हे मला तेव्हाही समजत होतच.. पण जर राम आहे असं मानुन माझं गणित सुटत होतं तर का सोडवु नये मी ते?
तर देव हा तुमच्यासाठी प्लासेबो इफेक्ट आहे, म्हणजे :
व्यक्तीगत श्रद्धेबद्दल बोलायच झालं तर देव ही आपणच केलेली कल्पना आहे हे लक्षात आल्यावर तिच्यावर विसंबणं किंवा भार टाकणं म्हणजे `खुदही खुदको च्युतिया बनाना है!' त्यापेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे. तुम्ही नेहमी वस्तुनिष्ठ राहता आणि भावनिक गोंधळापासून मुक्त होता.
देव या विषयावर अनेकांगांनी चर्चा झाल्यात. त्याच्या प्लासेबो इफेक्ट वरून इथे सॉलिड चर्चा झालीये ( त्यामुळे `तोतया प्रेसिडेंट' माझ्यावर खवळून आहेत. आणि शॅटमॅन तिथे सहमत आहेत पण इथे बिथरले आहेत (असो, नांवातच सगळं आलं) ती धारणा सघन करणार्‍या प्रणाली म्हणजे आरती किंवा चमत्कार (गच्छितानंदबाबांची गोष्ट) यावरनं इथे आणि इथे तुफानी चर्चा झाल्यात. (त्यावरुन घंटीचंद सतत उसळलेले असतात आणि कायम गोंधळात असलेले त्यांचे मित्र `सायकॉलॉजीवर लेख टाकून' (माझा) `अ‍ॅनॅलिसिस' करण्याचा प्रयत्न करतात!) तर तुमच्या धारणा तुमच्यापाशी. इथली एकूण मानसिकता पाहता देव हा विषय भावनिक होतो आणि पब्लिक तारतम्य करु शकत नाही. तस्मात पुन्हापुन्हा तोच विषय घेऊन जनजागृती करण्यात अर्थ नाही. मला नवल याचं वाटलं की पुजारी हा देव या कल्पनेचा समाजमनावर पगडा कायम ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. देवाचा धंदा तेजीत असण्याचं मूळ कारण हे की लोक भावभोळे आहेत. जर लोक भावविभोर झाले नाहीत तर धंदा बसेल. आणि लेखात मात्र लोकांना सूज्ञपणा आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे! लोक (अनन्यासारखा) समंजसपणा शिकले तर बुवांचं कठीण होईल. या विरोधाभासाची मजा वाटल्यानं प्रतिसाद दिलेत. बाकी बोथटसुरी नेहमीच कावलेले असतात (आणि केवळ माझ्या लेखनावरच प्रकट होतात!) त्यांच्यात वैचारिक बदलाची अपेक्षा नाही तस्मात त्यांना वेगळं उत्तर देण्यात अर्थ नाही.

ज्या गोष्टीने दुसर्‍याला त्रास न देता मनाला काही शांतता मिळत असेल अशी कोणतीही गोष्ट वाईट असू शकत नाही.
आय अ‍ॅग्री! म्हणून प्रत्येकानं आपला देव `मनात' ठेवावा. (नाही तरी मनाशिवाय तो आहेच कुठे?) फार तर मनःशांतीसाठी त्याची `मानसपूजा' करावी. पण लोच्या तिथेच आहे! मग मंदिरं संपली, मशिदी संपल्या, गुरुद्वारं संपली, पुजारी आणि बडव्यांचा धंदा बसला, परिक्रमा आणि तिर्थयात्रा नामशेष झाल्या. आणि हो मुख्य म्हणजे धर्माधिष्ठित राजकारण संपलं... धर्माच्या नांवाखाली विभक्त असलेली सगळी मानवता एक झाली!