Welcome to misalpav.com
लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता. हा अनुभव जमेस असल्याने आम्ही 'मंगलाष्टक वन्स मोअर' मोठ्या आशेने सुरु केला. वाटले आता दोन तास जरा मनाला तजेला देणारं, थोडं निखळ हसवणारं असं काहीतरी खुमासदार बघायला मिळेल. आधी मला वाटलं की या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडेच आहेत. त्यामुळे मी निर्धास्त होऊन चित्रपट सुरु केला. आणि जांभया देत देत कसाबसा संपवला... आरती (मुक्ता बर्वे) आणि सत्या (स्वप्नील जोशी) हे एक तरुण जोडपं. सत्या रेडिओ मिर्ची मध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आणि आरती सत्याची 'मॅनेजर' म्हणून काम करते. त्यांचं भलंमोठं घर असतं. (एवढं मोठं घर कसं काय परवडतं देव जाणे; आम्ही तर टिचभर घराचा खर्च भागवता भागवता इंचभर मरतो रोज) सत्या सकाळी ऑफीसला जातांना नेहमी त्याचे इस्त्री केलेले कपडे, रुमाल, मोबाईल, वगैरे सगळं त्याच्या बेडवर तयार असतं. हे बहुतेक सगळ्या नवर्‍यांचं स्वप्न असतं. पण फार थोड्या नशीबवान नवर्‍यांवर देव, नियती, लेडी लक, वगैरे सगळे एकदम प्रसन्न होतात. एरवी...जाऊ द्या; उगीच कशाला कुणाला दुखवा. तर सत्या बाथरूममधून बाहेर आला की त्याचा नाश्ता, चहा-कॉफी टेबलवर तयार असतं. हे ही एक स्वप्नच! कमीत कमी पाच वेळा ओरडून झाल्याशिवाय नाश्ता हातात दिला तर तमाम सांस-बहू मालिकांमधल्या सांस-बहूंचे तळतळाट लागतील असा साधारणपणे बायकांचा समज असतो. सकाळी जाग आल्यानंतर सत्याने थोडं जरी 'ऊं आं' केलं किंवा डोळ्यांची दोनपेक्षा अधिक वेळा उघड-झाप केली की आरतीचा जीव टांगणीला लागतो. मग ती त्याला, "काय होतय राजा? बरं नाही वाटत आहे का? गोळी घेतोस का? जाऊ दे, सुटी घेऊन आराम कर, राजा" असं चेहर्‍यावर शंभरदा हात फिरवून विचारते-बजावते. रात्री एकदा सत्या थोडा वैतागलेला असतो. चिडून तो "माझ्या छातीत जळजळतंय" असं आरतीला म्हणतो. आरती लगेच त्याची शांत झोप लागण्यासाठीची सीडी लावते आणि त्याला छान पांघरूण घालून झोपी घालते. मग सत्या अंगठा चोखत चोखत झोपी जातो! तर असं हे बाळबोध कुटुंब! सत्याला हे सुख मानवत नाही. आरती त्याला नेहमी त्याच्या बीयर पिण्यावरून टोमणे मारत असते. आपल्या सगळ्या मैत्रिणी, सत्याचे बालिश मित्र आणि जो कुणी भेटेल तो फक्त आपल्याच संसाराची चिंता करण्यासाठी जन्माला आलेला आहे असा आरतीचा घट्ट समज असल्याने ती जो भेटेल त्याला आपण सत्याची कशी नीट काळजी घेतो हे पुराण ऐकवून पकवत असते. त्याच्या तथाकथित बीयर पिण्याबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल मुक्ताफळं उधळून आपण आहोत म्हणूनच कसं त्याचं व्यवस्थित चालू आहे हे पटवून देण्यात तिचे दिवस जात असतात. या दोघांना मूल होत नसल्याने वैद्यकीय उपाय सुरु असतात हा अजून एक वेगळाच ट्रॅक! डॉक्टरचं म्हणणं असतं की नुसता फिजीकल काँटॅ़क्ट वाढवून उपयोग नाही; मने देखील जुळली पाहिजेत. आरती अगदी मनापासून मने जुळवण्याचा प्रयत्न करते. तिचे सत्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवणे वाढते (काँटॅक्ट वाढवणे म्हणजे हेच वाटत असावे बहुधा तिला); त्याचं वजन मोजून त्याने योगा आणि सायकलिंग करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्याची फ्रि॑क्वन्सी वाढते; प्रत्येक वाक्यागणिक 'राजा' म्हणणे मळमळ होण्याइतपत वाढते. "असं रे काय करतोस राजा", "आलेच रे राजा", "तिथेच असेल ना ते राजा", "सायकलिंग करत जा बरं राजा" असं सतत 'राजा राजा' ऐकून आपल्याच मस्तकात तिडीक जाते. सत्याच्या ऑफीसमधल्या कामात खूप टेंशन असते. त्याचं सेल्स टारगेट एक कोटी रुपयांचं असतं. त्याची बॉस शालिनी (सई ताम्हणकर) खूप जास्त अग्रेसीव्ह आणि भडक डोक्याची असते. सई ताम्हणकरचा असल्या भूमिकांमध्ये हातखंडा आहेच. आणि आरतीसारख्या काकूटाईप व्यक्तिरेखेला बॅलन्स करण्यासाठी शालिनीसारखी बेबटाईप व्यक्तिरेखा असणं हे आपण ख्रिस्तपूर्व काळापासून बघत आलो आहोत. तीच शिळी विटकी खिचडी पुन्हा इथे आहेच. या सगळ्या प्रकाराला सत्या आधीच वैतागलेला असतो. एक दिवस त्याचं आणि आरतीचं भांडण होतं. आरती सत्याला फक्त मनेच जुळण्याचं महत्व सांगत असतांना "सत्याचा स्फोट" होतो. "नुसती मने जुळून उपयोग नाही; फिजीकल काँटॅक्टदेखील व्हायला हवा असं डॉक्टर म्हणतात पण फिजीकल काँटॅक्टसाठी माझी बायको असते कुठे?" असा सत्याचा उद्रेक झाल्यावर आरती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवायला लागते (पुन्हा तेच). शेवटी त्याचा कडेलोट होतो आणि तो तिला घराबाहेर काढतो. टिपीकल मराठी कादंबरीच्या नायिकेसारखं आरतीचं 'सैरभैर होणं' 'उध्वस्त होणं' 'उन्मळून पडणं' 'कोलमडून पडणं' वगैरे सगळं यथासांग होतं. मध्येच एक चोर तिची पर्स चोरून पळून जातो. त्याचा राग ही सैरभैरवी एका वॉचमनला दगडं मारून काढते. तिचं कोलमडून वगैरे पडणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा केविलवाणा आणि थातूर-मातूर प्रयत्न! सत्याचा कडेलोट का होतो ते ही खरं म्हणजे नीटसं उलगडत नाही. तो का कोलमडून पडतो ते ही कळत नाही. बालिश बायका सांभाळणारे काही कमी नाहीत या जगात आणि बीयर बेली मिरवणारे नवरे देखील कमी नाहीत. पण चित्रपटात कोलमडणं वगैरे असलं की चित्रपटाला वजन येतं असाच अजून मराठी दिग्दर्शकांचा समज असावा बहुतेक. जितकं कोलमडणं आणि पिचलेलं असणं जास्त तितका क्रिटीकल अ‍ॅक्लेम जास्त! पुरस्कार जास्त! आणि मग "मराठी सिनेमा कात टाकतोय" छाप लेखांचा अजीर्ण होण्याएवढा रतीब सुरु!! हे ही आता शिळं झालंय. गेली १५ वर्षे मराठी चित्रपट अजून कातच टाकतोय. अरे हा साप मोठा तरी किती? एवढी मोठी कात आहे याची? जमाना दिवसागणिक बदलतो आणि मराठी चित्रपट मराठी माणसासारखाच आळसावत पडलाय असे तर वाटत नाही ना? नवनवीन विषयांवर चित्रपट काढून मानवी मनाचा थांग-बिंग आणि धांडोळा-बिंडोळा घेणारे मराठी चित्रपट आता बघवत नाहीत. 'जोगवा' '७२ मैल एक प्रवास' 'मी सिधूताई सपकाळ बोलतेय' 'मला आई व्हायचंय' वगैरे चित्रपटांची पोस्टर्सदेखील बघायची भीती वाटते ती याच कारणांमुळे. एक समस्या घ्यायची आणि प्रेक्षकांना रड-रड रडवायचं फक्त हेच मराठी सिनेमामधले 'धांडोळा'छाप चित्रपट करत असतात. साहजिकच गल्ला रिकामा जातो आणि पोस्टरच्या वरची थोडी जागा चार-दोन फुटकळ पुरस्कारांनी भरते. 'द शॉशँक रीडींप्शन' एका निरपराध बॅक अधिकार्‍याला तुरुंगात २० वर्षे कसे खितपत पडावे लागते आणि तो कशी स्वतःची सुटका करून घेतो याची कहाणी आहे. मजाल आहे की चित्रपट कुठे कंटाळवाणा, बापुडवाणा, ठिगळं लावलेला, आणि रडका वाटेल! तिच गत 'शिंडलर्स लिस्ट'ची. इतक्या महाभयंकर आणि क्रूर अत्याचाराच्या कहाण्या क्वचितच कुठे सापडतील. पण ३.१५ तास चित्रपट खिळवून ठेवतो की नाही? पण मराठी सिनेमा अजून हृदय पिळवटून टाकण्याच्या भानगडीतच गुंतलेला आहे. असो. इकडे सत्या मात्र कूल असतो. म्हणजे थोडक्यात आता नेमकं काय करायचं हेच त्याला (दिग्दर्शक, लेखकाला) कळत नाही. मग तो काहीतरी फडतूस ऑफीसच्या मीटींगा करतो. आश्चर्य म्हणजे बायको घरातून निघून गेली आहे; आपणच तिला घराबाहेर काढली आहे याविषयी खेदाची, निराशेची, अनिश्चिततेची, काळजीची छटादेखील त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. शालिनी तारस्वरात ओरडून त्याचं जगणं हराम करत असतेच. मध्येच जगाच्या आरंभापासून जो सीन आपण बघत आलो आहोत तो देखील साग्रसंगीत होतो. सत्या, त्याचा निखिल नावाचा बालिश मित्र आणि अजून एक बायकोने सोडलेला मित्र दारूमध्ये आपले दु:ख बुडवत असतात. आता या सीनमध्ये काय बघायचं? मग ते तिघे काहीतरी बाष्कळ बडबड करतात. एकमेकांना विनाकरण शिव्या देतात. असं दाखवल्याने चित्रपट वास्तवाच्या जवळ जात असावा बहुतेक. स्वतःचं खाजगी आयुष्य चिवडत बसतात आणि तिथे दारूच्या नशेत सत्याला साक्षात्कार होतो की आपली फार मोठी भयंकर चूक झालेली आहे. बघा, ज्या दारूमुळे आरती सत्याला टोमणे मारते त्याच दारूच्या नशेत सत्याला सत्याचा साक्षात्कार होणे ही दिग्दर्शकाच्या चित्रपटीय भाषेच्या जाणीवांची प्रगल्भता दर्शवते.. हुश्श!! मध्येच सत्याला शालिनीचा मुलगा पाचगणीमध्ये, नवरा दिल्लीमध्ये आणि ती पुण्यात अशा शालिनीच्या भौगोलिक कुटुंबाची कहाणी शालिनीच्या झरणार्‍या डोळ्यामधून बयान होते. वरून कशीही असले तरी मी माझ्या कुटुंबाला मिस करते, करीअरपुढे कुटुंबाची आबाळ होते, ही रेस आहे, प्रत्येकाला पुढे जायचे आहे वगैरे घासून-घासून गुळगुळीत झालेली फालतू वाक्ये शालिनी सत्याच्या तोंडावर फेकते. सत्या बावळटपणाचा मूर्तिमंत कहर असतोच; तो ती वाक्ये कॅच करतो आणि चघळत बसतो. मला एक समजत नाही इतक्या साध्या गोष्टी चित्रपटातल्या नायक-नायिकांना अशा कुणा दुसर्‍याच्या कृतीमुळे किंवा सांगण्यानेच का समजतात? स्वतःचं डोकं काय गहाण ठेवलेलं असतं का या नायक-नायिकांनी? पण आता सत्या अंतर्बाह्य बदललेला असतो. शालिनी आणि त्याच्या फडतूस मित्रांनी दोन-दोन मिनिटांत त्याच्यामध्ये आणि त्याच्या स्वभावामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणलेला असतो. मिनव्हाईल, आरतीची एक मैत्रिण (कादंबरी कदम) आरतीच्या नखर्‍यांना सहन करण्यासाठीच जन्माला आलेली असल्याने आरतीला आपल्या घरी ठेवून घेते. आरती तिथं सगळं भडाभडा ओकते. मग आपल्या बापाचं घर असल्यासारखी आरती तिथे राहू लागते. मैत्रिण (व्यक्तिरेखेचे नाव आठवत नाही; काहीही समजा, दगडी, धोंडी, क्या फरक पडता है?) आरतीच्या आयुष्यात नाक खुपसण्याव्यतिरीक्त कधी-मधी कामावर पण जाते. आरती हप्ता वसूल केल्यासारखे मैत्रिणीकडून वारंवार पैसे पण घेते. मग मैत्रिणीच्या आग्रहाखातर आरती रिसेप्शनिस्टची नोकरी धरते. आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे; मैत्रिण किती दिवस फुकाचा घास गिळायला देणार ही किरकोळ गोष्टदेखील आरतीला स्वत:ची स्वत: कळत नाही. विनोद म्हणजे ती एमबीए असते. आता बोला? आता प्रेक्षकच 'सैरभैर' 'उध्वस्त' होण्याच्या मार्गावर असतात. इकडे सत्या सायकलिंगला जातो; मोलकरणीला फक्त उकडलेल्या भाज्या करायला लावतो आणि वजन कमी करतो (वाटत नाही पण तसं भासवलेलं आहे). आणि मग ते दोघे पुन्हा भेटतात. पुन्हा काहीबाही पाणचट गप्पा, तथाकथित बाष्कळ रोमान्स वगैरे होतो. दोघांना आपण दोघेही चुकत असल्याचा साक्षात्कार होतो आणि शेवटी दोघे पुन्हा एकत्र येतात. **प्रचंड मोठी जांभई** माझ्या मनात काही प्रामाणिक प्रश्न 'मंगलाष्टक वन्स मोअर' पाहतांना सतत येत होते. अगदी माफक रोमान्स किंवा रोमँटीक आठवणींच्या प्रसंगात मराठी चित्रपटात बॅकग्राऊंडला "हे हे हे..हे हे हे हे" अशा संतापजनक सुरावटी का असतात नेहमी? कुणी उत्तर देता का उत्तर? आपले मराठीमधले सुरेश वाडकरछाप गोड गोड गळ्याचे गोड गोड गायक दर दोन-पाच मिनिटांनी 'हे हे हे हे हे हे' करत विव्हळत असतात. प्रेक्षकांनी एकदम रोमँटीक मूडमध्ये जाण्यासाठी या निरर्थक सुरावटी घुसडलेल्या असतात का? आणि गाणी तरी किती फालतू. "तुझ्यासवे मी उमलले.." "हे का भासे असे..." "स्पंदनांची हाक.." वगैरे अतिशय छापील आणि तोचतोचपणाचा प्रत्यय देणारी गाणी किती रटाळ वाटतात हे संगीतकरांना कधी कळेल. हे शब्द आजकालच्या रोमँटीक गाण्यांचे प्रतिनिधित्व करतात; ही 'मंगलाष्टक वन्स मोअर' मधली गाणी नाहीत पण त्यातली गाणी इतकीच निरर्थक आणि गचाळ आहेत. अचानक सत्याची सिंगापूरला बदली होते आणि शालिनीसहित सगळं टोळकं सत्याला न सांगता सत्याच्या घरी धूडगूस घालायला येतं. अरे हे काय आहे? डायरेक्ट घरी जाऊन बॉस सांगते की तुझी सिंगापूरला बदली झाली आहे? अरे सिंगापूर म्हणजे काय शनि शिंगणापूर आहे का? नाही तेव्हा सत्याला टारगेट पूर्ण होत नाही म्हणून झापणारी शालिनी एकदम एक कोटीच्या १६% जास्त टारगेट पूर्ण झाल्याची खबर देते. अगदी ३-४ महिन्यातच हे टारगेट पूर्ण होऊन १६% वर बिझनेस होतो. आहे की नाही कमाल? आणि अभिनंदन करतांना शालिनी मोठ्या भावाने आपल्या लहानग्या बहीणीला जवळ घ्यावे तसे शालिनी सत्याला मिठीमध्ये बोलावते. आणि येस्स यू गेस्सड इट राईट! नेमकी तेव्हाच आरती तिथे दारात येऊन कडमडते. किती फालतूपणा करावा? मग थोडा संशयकल्लोळ होतो. ही फोडणी नित्याचीच आहे त्यामुळे तिचा ठसकाही लागत नाही, चवही लागत नाही, आणि ही फोडणी दिलेल्या पदार्थाने पोटही भरत नाही. सत्याला काय खुपत असते हे तो कधीच आरतीला सांगत नाही. ती बोलते, विचारायचा प्रयत्न करते, फाटण्याच्या आधीच शिवण्याचा प्रयत्न करते पण का कुणास ठाऊक सत्या तिला सांगतच नाही. त्याने आधीच सांगीतलं असतं तर पुढचं सगळं रामायण कसं दाखवता आलं असतं? आणि मग दारू ढोसतांना एका मित्राच्या अनुभवावरून याला कळतं की आपण प्रॉब्लेम काय होता हे सांगीतलच नाही; त्यावर नीट बसून चर्चाच केली नाही; एवढे शिकलेलो आपण पण एवढी साधी गोष्ट आपल्या मठ्ठ डोक्यात आलीच नाही. हे कुठल्या अँगलने तार्किक वाटतं यावर लेखक-दिग्दर्शकासोबत मला पुण्याच्या ना. सी. फडके सभागृहात चर्चासत्र आयोजित करायला आवडेल. नक्की यायचं हं! उपस्थितांपैकी प्रत्येकाला आम्ही 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे स्टँम्प साईझचे एक पोस्टर (साईझ रिडक्शन करून झेरॉक्स केलेले), एक पारले-जीचे बिस्कीट, आणि 'मंगलाष्टक वन्स मोअर'च्या डीव्हीडीवर १.५% ची घसघशीत सूट देणारे कुपन देणार आहोत. पुण्यातल्या मंडळींनी तर यायलाच पाहिजे. तासभर बसून एवढा ऐवज (किंवा घबाड म्हणा हवं तर) मिळणार असेल तर काय हरकत आहे? स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या व्यक्तिरेखाच फालतू आहे त्यामुळे यांच्या अभिनयाबद्दल न बोललेलंच बरं. सत्याचा एक अत्यंत बालिश मित्र बालिश आवाजात (याला आपण विनोदी समजायचं) बडबड करत असतो; तो डोक्यात जाणारच असतो; जातोच. आरतीची मैत्रिण हे एक फालतू कॅरॅक्टर. तिला काही कामधंदा नसतोच. सई ताम्हणकर आता जरा जास्तच 'भारदस्त' वाटते. तिने काळजी घ्यावी ही विनंती नाही तर तिची समीरा रेड्डी व्हायला वेळ लागणार नाही. मदत करण्याचा लेखकाचा स्वभाव असल्याने तिला हवे असल्यास मार्गदर्शन पुरवले जाईल. बाकी तिच्या भूमिकांचा साचा जवळपास ठरत चाललेला आहे. ही देखील एक काळजीचीच बाब! कथेत आणि पटकथेतच आनंदी-आनंद असल्याने दिग्दर्शनात परमानंद आहे. प्रेक्षकांना थोडेसे जरी बरे वाटले तर अहमदनगर-भिंगार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या वज्रकमळाचे चान्सेस कमी होतील ही भीती असल्याने दिग्दर्शकाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहेच. आणि बाकी सगळ्यांनी मनापासून साथ दिलेली आहे. टीमवर्कशिवाय असा मास्टरपीस शक्य नाही हेच खरे! ...शेवटी कळलं हा सतीश राजवाडेचा चित्रपट नव्हताच. समीर हेमंत जोशी नावाच्या दिग्दर्शकाचा होता. 'समीर' नावातच काही दोष आहे स्साला...जो भी करेंगे पचकाच करेंगे...डॅम इट!!!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अभिनंदन …… समीरजी , या आधीसुद्धा मी आपले चित्रपट परीक्षण वाचले आहे. या क्षेत्रांत आपल्याला चांगलाच सूर गवसलेला आहे… उत्तम परीक्षण

आडवं तिडवं पोस्टर फाडलयं पिक्चरचं. बोगस आहे एकदम. स्वप्निल आणि मुक्ता एकत्र म्हणुन "मुंबई-पुणे-मुंबई" च्या अपेक्षेनी पाहायला गेलो, हातात अलका कुबलच्या पिक्चर पेक्षा बोगस पिक्चर आला. :) :) :)

आडवं तिडवं पोस्टर फाडलयं पिक्चरचं. - हेच म्हणते. मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण आवडला नव्हता त्यामुळे हा पाहण्याची शक्यता कमीच. जाता जाता: तुम्ही लिहीत रहा हो, असले पिक्चर नाही पण तुमचे परीक्षण करमणूक करते.

मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण आवडला नव्हता >>> देव पावला कोणी तरी सापडलं हा शिनेमा न आवडणार ... :D मला तर आज्ज्जीबातच आवडला नव्हता . *beee* १५ मि. कसाबसा पहिला . *boredom* ते हि मुक्ता के लिए, तीच काम आवडतं म्हणून किती सहन करणार ? *nea* पण एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका आवडली होती . :) तुम्ही लिहीत रहा हो, असले पिक्चर नाही पण तुमचे परीक्षण करमणूक करते. >>>+++ १

सेम पिंच. मला पण बिल्कुल आवडला नाही. स्वप्निल जोशी ज्याम बोर मारतो. मुक्ता बर्वेमुळे कसाबसा पाहिला .एकदा अर्धा आणि पुढचा अर्धा सहा महिन्यानी. ;)

तुमचं फुलस्केप-दोन फुलस्केप भरतील एवढं जस्टीफिकेशन वाचलं. त्यातलं एकही कारण पटण्यासारखं नाही. सर्वप्रथम हे सांगतो की मला व्यक्तिगत व्हायची इच्छा नाही, आणि म्ह्णूनच वरच्या लांबलचक प्रतिसादात तुम्ही सुरवातीला जी काही व्यक्तिगत कारणं लिहिली आहेत, त्यांच्या लॉजिकमध्ये भलीमोठी खिंडारं दिसत असली तरी त्यावर काही टिप्पणी करायचं मी टाळतो आहे. दुसरं म्हणजे मी इथे नैतिकतेचा ठेका घेऊन आलेलो नाही. एखाद्याला डाऊनलोड करून चित्रपट पहायचे असतील तर पाहोत बापडा, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. मात्र या धाग्यामध्ये मला जो एक शिरजोरीचा सूर दिसतो आहे, तो मला खटकला. म्हणजे भले प्रेक्षकांची अभिरुची कितीही वाईट असो, ते बहुतांश चित्रपट टोरेंटवर एक पैसाही खर्च न करता पहात असोत, त्याबद्दल बोलायचं नाही. चित्रपटनिर्मात्यांनी तेवढं उत्तमोत्तम कलाकृतीच निर्माण करण्याचं सतीचं वाण घेतलं पाहिजे (तेही शून्य खर्चात निर्माण करावेत, कारण आम्ही तिकीटबिकीट काढणार नाही बुवा! मराठी पिक्चर असतातच फालतू!) - चित्रपटनिर्मितीसाठी सरकारी अनुदान मिळणं हा प्रकार मलाही मान्य नाही, पण हे काही समर्थन होऊ शकत नाही. बाकी चित्रपट टॅक्स फ्री असतात, चित्रपट निर्मात्याने अमुक दिवसात नफा कमावलेला असतो, 'हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी चित्रपट वितरकाला नफा कमावून देतात. बाकी सगळा कचरा वितरकांचे कंबरडे मोडतो. निर्माता हक्क विकून नफा काढून मोकळा झालेला असतो.' वगैरे कारणं तर इतकी हास्यास्पद आहेत की त्यावर आणखी काही लिहू जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय आणि स्वतःच्याच बुद्धीचा अपमान होईल. - चित्रपट भले कितीही बकवास असला तरी त्याच्यामागे शेकडो छोटे कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, वादक या सर्वांचे श्रम असतात. निर्मात्याच्या खिशात चार पैसे जातात तेव्हा त्यातले दोन या लोकांकडेही जातात. - तुम्ही दूधवाल्याला पैसे मिळण्यासाठी दूध घेत नाही हे खरं आहे, पण दूधवालाही तुमच्या मुलांच्या पोटात दूध पडावं या परोपकारी भावनेने दूध घालायला येत नाही. हा कोरडा व्यवहार आहे. तुम्ही दूधवाल्याची चरवी पळवणार, आणि वर दुधात पाणी घातलं होतं म्हणून तक्रारही करणार, गम्मत आहे बुवा! - मराठी पिक्चर फालतूच असतात, हा तुमचा सिद्धांत. पण विचार करा, तुम्ही कचरापेटीच धुंडाळत असलात, तर तुमच्या हाती कचराच पडणार नाही का? 'एलदुगो' आणि 'पुणे मुंबई पुणे' सारखा बकवास पाच मिनिटंही पाहण्याचं दुर्भाग्य ज्याला लाभलं आहे, त्या व्यक्तिला स्वप्निल जोशीसारखा बटाटा-हिरो, मुक्ता बर्वे आणि 'मंगलाष्टक वन्स मोअर' सारखं पांचट गोडगोड नाव असलेल्या चित्रपटाकडून काय अपेक्षा करायची ते सांगायला लागू नये. पण चांगले चित्रपट मराठीत बनत नाहीत? वर तुम्ही 'जोगवा'ला एका ओळीत गुंडाळलं आहे. मी पाहिला आहे जोगवा. मला त्यात कुठेही प्रेक्षकाला रड-रड रडवायची आस दिसली नाही. देऊळ, नटरंग अशा सिनेमांची नावं नाही का ऐकलेली आपण? प्रेक्षकाच्या श्रद्धेचा अपमान न करता त्याचं प्रबोधन करून जाणारा, आणि हे करताना करमणूकमूल्यही उत्तम राखणारा 'देऊळ' त्याच्याबद्दल चार शब्द लिहा, एक चांगली कथा बर्‍यापैकी चांगल्या सादरीकरणासह मांडणारा 'नटरंग' त्याच्याबद्दल लिहा. मला देऊळमध्ये कुठे 'हे हे हे हे' ऐकू आलं नाही आणि नटरंगमध्ये प्रेक्षकाला रडवायचा सोस दिसला नाही. वाईट चित्रपटांची खिल्ली उडवण्यात काहीच चूक नाही. याआधीही क्रांती, गुंडा वगैरेंची व्यवस्थित खिल्ली उडवणारी अफलातून परीक्षणं इथेच की दुसरीकडे वाचली आहेत. त्यातून मला निखळ हसण्याचा आनंद तरी मिळाला. या धाग्यात तक्रारीच्या कंटाळवाण्या सुराखेरीज काही सापडलं नाही, हे नमूद करतो. खरं तर, 'कशी कल्हई करतो पहा' अशा आविर्भावात पिक्चर पॉज करत करत परीक्षण लिहिलं असावं की काय, अशी शंका आली.

...की त्यावर आणखी काही लिहू जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय आणि स्वतःच्याच बुद्धीचा अपमान होईल. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे तेच कळत नाही. इंटरनेटवर चित्रपट पाहू नये की परीक्षण लिहू नये की खिल्ली उडवू नये की स्वतःच्या पाठीवर स्वतःच सतत शाबासकीची थाप मारत रहायला पाहिजे की वाईट चित्रपटांनादेखील केवळ ते मराठी आहेत म्हणून चांगलच म्हणायला पाहिजे की 'समीरसूर' यांची चित्रपटांवर लिहिण्याची कवडीचीही लायकी नाही की चित्रपट भिकार असला तरी अजिबात 'तक्रार' न करता कौतुकच केले पाहिजे की वाईट चित्रपटांवर लिहिलं म्हणून तितक्याच चांगल्या (तथाकथित) चित्रपटांवर कर्तव्य म्हणून लिहिलंच पाहिजे (पगार मिळत असल्यासारखं) की दोन बर्‍या (तरीही साचेबद्ध - हुकमी तमाशा, ग्रामीण, जातपात, गरीबी वगैरे ५० वर्षे चावून चोथा झालेले विषय) चित्रपटांमागे ८८ अतिवाईट चित्रपट असतांना देखील सगळ्याच मराठी चित्रपटांचे फक्त अस्मिता, अभिमान छाप गोड गोड खोटे खोटे कौतुक केलेच पाहिजे... काय, प्रॉब्लेम स्टेटमेंट नक्की आहे तरी काय हे कळण्याची माझ्या बुद्धीची खरंच कुवत नाही. त्यामुळे माझ्या बुद्धीला झेपेल तेच करत राहीन म्हणतो. :-) आपल्या बुद्धीचा अपमान व्हावा अशी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे माझ्या बालिश* लिखाणाकडे दुर्लक्ष करणेच उत्तम! * माझं लिखाण खरंच बालिश आहे; याबद्दल मलाही शंका नाही (आणि माझ्या बायकोलाही). :-)

एक सांगायचेच राहिले, मिसळपाववर मी चांगल्या मराठी चित्रपटांविषयी देखील लिहिलेले आहे. 'तार्‍यांचे बेट', 'पारध' वगैरे चित्रपटांवर लिहिलेले आहे. 'तार्‍यांचे बेट' एक छान आणि नवीन विषय हाताळलेला चित्रपट होता. समस्या त्याच होत्या पण हाताळणी किती वेगळी होती. वेळ मिळाल्यास एकदा कृपया वाचावे.

मुक्ता बर्वे ' लग्न ' या विषयातुन बाहेर पडेल तो सुदीन... पुणे- मुंबई -पुणे नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, ती झाली की मंगलाष्टक.. लग्न लग्न लग्न हिच थीम!! एका चांगल्या अभिनेत्रीला असं एकच एक करताना पाहुन जीव तुटतो.

मुक्ता बर्वे ' लग्न ' या विषयातुन बाहेर पडेल तो सुदीन
तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाहीये म्हणुन ती लग्ना चे सिनेमे करुन समाधान मिळवते आहे.

सिडनीत आल्यावर बघायला घेतलेला पहिला चित्रपट. आणि सुदैव इतकंच की घरी बसून बघत असल्यामुळे ३० व्या मिनीटाला अजीर्ण होऊन बंद केल्या गेला... आणि एक अतिशय टुकार चित्रपट न पाहिल्याच्या आत्यंतिक समाधान मिळालं... :)

योगायोगानं हे परीक्षण आलं त्याच दिवशी नेटावर हा सुरु केला पण पाच मिनिटात - का माहीत नाही पण कंटाळून बंद केला. आणी हा धागा पाहिला! बाकी स्वप्नील जोशी मुळातच लहानपणापासून ( माझ्या) आवडत नाही, पण मुक्ता साठी हा प्रकार पहायला घेतला. मुंबई-पुणे-मुंबई एका वर्षाच्या अंतराने पुन्हा पहायला पण आवडला, गाणी पण चांगली होती. अभिनेत्री म्हणून मुक्ताला नाटकात पहावे. मागे तिचा बदाम राणी गुलाम चोर, धोबी पछाड पण आवडले नव्हते.

कालच पाहिला , आधी पाहिला आणि मग परिक्षण वाचले . ती मुक्ता खरच सायकिक वाटते त्यात . पण तुम्ही मन लाऊन चित्रपट पाहिलेला दिसतोय कारण खुपच दांडगा अभ्यास केल्यानंतरच एवढ ठळक आणि उत्तम निरिक्षण मांडु शकलात असे वाटते ;)

चित्रपट असह्य असला की माझ्यातली धाडसी वृत्ती उफाळून येते... ;-) म्हणून मी 'घर की इज्जत की रोटी की कीमत' अशा टाईपचे सिनेमेदेखील पूर्ण पाहू शकतो. यात 'घर की इज्जत', 'इज्जत की रोटी', 'रोटी की कीमत' असे तीन चित्रपट दडलेले आहेत आणि तिन्ही अगदी अचाट! :-) तसं पाहिलं तर यात अजून 'घर', 'इज्जत', 'रोटी', 'कीमत' असे अजून तीन चित्रपट दडलेले आहेत. म्हणजे एकूण सात चित्रपटांची खाण आहे हे वाक्य! :-) 'घर की रोटी' असा काही चित्रपट आहे का हे तपासून बघायला पाहिजे. :-)

:lol: .... :lol: चक्क चित्रपटगृहात जाऊन पाहिलाय मंगलाष्टक वन्स मोअर............चित्रपट संपून बाहेर निघताना इतर सर्व जनतेबरोबर आम्हीही तिथल्यातिथे त्याचा पंचनामा केला होता...... स्वजो (नेहेमीच)अत्यंत गलथान अभिनय करतो..... मुक्ता बर्वे काय करत होती हेच अखेरपर्यंत कळाले नाही......

मी पण हा चित्रपट थेटरात पहिला, बहुतांशी क्राउड मध्यमवयीन होतं. अधून मधून प्रत्येक पात्राने मारलेले इंग्लिश ड्वायलॉक अन तात्विकतेच्या अंगाने जाणारे सगळे संवांद या क्राउड ने एन्जोय केल्यासारखे वाटले. ( हे असलं काही असेल तरच चित्रपट उच्च दर्जाचा होऊ शकतो असा दिग्दर्शकाचा समज असावा). असो परीक्षण योग्य आहे. मु ब अन स्वजो यांचा अभिनय काही पचला नाही. भोमे नामक नटाने मात्र कमी वेळात जास्तीत जास्त डोके उठवण्याचा पराक्रम करून दाखवलाय.