Welcome to misalpav.com
लेखक: kurlekaar | प्रसिद्ध:
आमच्या कोकणातल्या आजीच्या आयुष्यात दोन वैयक्तिक भूकंप आले, पहिला जेंव्हा आमच्या आईचे वडील गेले व दुसरा जेन्व्हा माझा मामा तरुण वयांत गेला तेंव्हा. तुमच्यापैकी कांहीना 'सारांश' या हिंदी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी ची भूमिका आठवत असेल; तिचाहि एकुलता एक मुलगा विदेशी असतांना एका अपघातात गेलेला असतो व तिला सारखं वाटत असतं कि तो पुनर्जन्माने परत येईल. आमच्या आजीचं थोडंफार तसंच होतं. मामाच्या मृत्त्यू नंतर ज्यांचा जन्म त्या घरांत (घराण्यात या अर्थाने) झाला त्यांना, किंव्हा त्या घराच्या माहेरवाशिणिच्या घरी ती त्याला शोधत असे. फक्त कालक्रमानुसार पाह्यला गेलं तर माझा जन्म माझ्या मामाच्या निधनानंतर लगेचंच --म्हणजे या पुनर्जन्माचा पहिला मानकरी मी होतो. मला वाटतं नंतर तिला वाटत गेलं असावं कि माझ्या मामाचा पुनर्जन्म त्यांच्याच घरांत व्हायला हवा व पर्यायाने हा मान माझ्या पेक्षा लहान अशा माझ्या एका चुलत मामा कडे गेला व तो शेवटपर्यंत तसाच राह्यला. मी फक्त कालक्रमाच्या जोरावर हा मानकरी नव्हतो, त्याला एक जोरदार पुष्टी मिळाली होती genes( अनुवंशिकतावाहक) ची. तो एक खूप छान किस्सा आहे…… --2-- मी फारतर सहावी-सातवीत असेन तेंव्हा. कोकणांत घालविलेल्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्टी पैकी एक. बरोबर मोठी बहिण असल्याचं आठवतंय. आम्ही सर्व खाली जेवायला बसलो होतो. मला पाणी हवं होतं, आजी वाढत वगैरे असणार म्हणून जवळपास होती. मी हायस्कुलात जायला लागलो नव्हतो पण मोठी बहिण तेंव्हा आठवीत किंवा नववीत असणार. आम्हाला तेंव्हा आठवीतच इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात व्हायची. बहिण इंग्रजीचा अभ्यास करतांना तिचे दोन चार शब्द माझ्या कानावर पडणे व ते लक्षातहि राहणं नैसर्गिक होतं. क्वचित इंग्रजीचा अभ्यास सुरु करण्यापूर्वीच मला ही भाषा आवडायला लागली होती हा देखील त्याचा भाग असू शकेल. कांही का असेना पण आजीकडे पाणी मागण्याऐवजी मी तिच्याकडे water मागितलं आणि ती मट्कन खाली बसली, कांही क्षण रडली व नंतर पाणी आणायला आंत निघुन गेली. माझं काय चुकलं ते मला कळेना पण उगाचच guilty मात्र वाटायला लागलं. ... आजीला नेमकं काय झालं होतं याचा खुलासा दुसऱ्या दिवशी आमच्या आईने किंवा आजीनेच केला असावा. माझ्या मामाला म्हणे (खरं म्हणजे इथं मी "देखील" हा शब्द वापरायला हवा) त्याच्या आई (आजी)बरोबर बोलतांना कांही इंग्रजी शब्द मध्येच वापरायची सवय होती. मी सुद्धा माझ्या नकळत का होईना पण तिला संबोधून water हा शब्द वापरला व आजीला ब्रह्मांड आठवलं. या गोष्टीला अजून एक, आजीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास महत्वाची, बाजू होती. माझ्या जन्माच्या पूर्वी माझा मामा आजीच्या स्वप्नात आला होता तो एक लहान बाळ होऊन व त्याने आजीला सांगितलं कि तो sister कडे जाणार म्हणून. आजीच्या स्वप्नाची मीमांसा मी इथं करत नाहीं पण मी माझ्या मामा सारखाच एखाद दुसरा इंग्रजी शब्द वापरणं हे अनुवांशिकते ला धरून होतं, त्यांत अपवादात्मक असं कांहीच नव्हतं. आपण देखील बऱ्याच वेळा लहान मुलांना संबोधून म्हणतोच की "ही माझी आजी जन्माला आलीय" किंवा किंवा "हे आमचे सासरेबुवा च " वगैरे वगैरे. आपण सारेच अनुवन्शिकतेच्या सुताला धरून पुनर्जन्माच्या स्वर्गाकडे जातोच की पण आमची आजी या बद्दल जरा जास्तच serious होती एवढंच. माझी आजी सोडून मी माझ्या मामाचा पुनर्जन्म आहे असं इतर कोणालाहि वाटत नव्हतं. माझ्या आईला नव्हतं व मामीला तर नव्हतंच नव्हतं. पुनर्जन्माची गोष्ट बाजूला राहूदेत पण गम्मत म्हणजे मी व माझा मामा या दोघांतील अनुवांशिक साधर्म्य आजी व्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीच्या लक्षात आलं होतं--आमच्या तीर्थरुपांच्या. थोडंसं strange नाहीं कां?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अगदी बसण्याची पद्धत सुद्धा अनुवांशिकतेतून येते. माझा नवरा जेवायला खाली बसायचम असेल तर नेहमी एका ठराविक पद्द्ततिनी बसतो. तशीच स्टाईल त्याच्या आजोबांची होती म्हणून सांगतो. एकदा घरातले सगळे जमले असताना मी पाहिले, एकाच पंगतीत माझे २ चुलत सासरे, ४ दीर, नवरा आणि २ नणदा सेम त्याच पद्धतीनी बसले होते आणि त्याच पद्दतीनी जेवत होते, आणि अगदी जेवतानाच्या एकसारख्या आवडी दिसत होत्या. अनुवाम्शिकतेतून खूप गमतीदार गोष्टी घडतात. ...पण याचा अर्थ पुनर्जन्म नसेल असा अजिबात नाही. ;) अर्थात तसा असला तरी उपयोग काय? तुम्हाला अत्ताच्याच जन्मात जगावं लागणार. :)

आहे तो जन्म निट निभावला तरी पावलो.. जन्म मरण नको आता नको येर झार नको ऐहीकाचा नाथा व्यर्थ परीहार

त्यांच्या काकाच्या (जे माझे पुर्वज होते) नावाने अहो जाओ मधे संबोधायचे. त्यातुन फुकटच मला कोणालाही आहो जाहो मधे बोलायची सवय लागली, यात भर पाडली ती एका शाळा मास्तरने तो मला नव्हे सगळ्यां बालगोपाळांना आहो जाओने बोलायचा, त्याचे विडंबन म्हणुन,सुरुवातीला आम्ही मित्रही एकमेकांना आहो जाओ मधे बोलु लागलो ते जिभेला वर्षनुवर्शे वळनच पडलं. एका खास आगरी मित्राच्या घरी दोन दिवस मुक्कामाला होतो, अन त्यात त्याच्या आजोबाला चुकुन आहो जाओ मधे बोलुन गेलो, तो,आजोबांचा चेहरा तर इतका उतरला, तितक्यात मित्र मला हळुच म्हणाला आपल्या माणसाला आहो जाउ नाय अरे तुरे मधे बोल. आहो जाओ म्हणून त्यांना कफ्युस करु नकोस. हां तर काय सांगत होतो बरे... हा समदी जेष्ट नागरीक मंडली मला एका ओल्ड फॅशन अन आउटडेटेड नावाने आहो जाओ मधे बोलत, ऐकुन वैताग यायचा. त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगायचो की तो मी न्हवेच. पण साली दुनीया इथुन तिथुन एकच...! कारण काय तर माज्या अंगावरची जन्मखुन त्या माज्या पुर्वज्यांच्या अंगावरील जन्म कुनेशी म्याच वायची. :(

माझी आई बरेचदा मला बोलत असते की अमुक तमुक हा गुण मामाचाच उचलला आहेस, अर्थात माझे मामा हल्लीच गेले, पण तसेच काही असते तर खरेच माझ्याही आईच्या मनात असले काही आले असते का.. शेवटी ओढ असतेच आपल्या माणसांची, आपल्याला आवडणारी माणसे दूर जातात तेव्हा असेही आपण त्यांच्यासारख्या गुणांच्या लोकांना आपल्या आसपास शोधत असतोच.. अवांतर - पुनर्जन्म असो वा नसो, पण आपण ते म्हणतो ना की मला पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे किंवा नवरा वा बायको म्हणून मला पुढच्या जन्मी तूच मिळू दे वगैरे वगैरे ते मात्र खरे असू दे ..

एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म आहे असे वाटणे हे मृत व्यक्ती विषयीच्या चांगल्यावाईट भावना आणि कदाचित मनातील Guilt सुद्धा व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरते.

मित्रांनो, पुनर्जन्म तत्वतः मान्य नाही किंवा त्याला धार्मिक मान्यता नसल्याने मानायला आडकाठी या कारणांनी प्रस्तूत पुराव्यांना धुडकारायची शक्कल काढली जाते. पुनर्जन्म संकल्पनेवर दोन्ही बाजू हिरीरीने लोक चर्चा करतात. २-५ वर्षांच्या मुलांच्या पुर्वजन्मांच्या आठवणींच्या बोलांना कितपत मानायचे? त्यांच्या आईवडिलांचा मुलाला पुढे करून प्रसिद्धिचा, अर्थिक लाभाचा तो एक प्रकार असावा असे म्हणून कैकदा असे दावे नाकारले जातात. काही केसेसमधे बालकांनी सांगितल्या जागी जाऊन शहानिशा करायचा प्रयत्न केला जातो. काही तथ्ये अमान्य करता येत नाहीत म्हणून मानली जातात. तर काहींची चेष्टा व निंदा करून केसेस रफा दफा करायला काही संस्थांना उत्साहाने भाग घेता येतो. तरीही नेटाने यावर अभ्यास करणारे थोडे नाहीत. डॉ आयन स्टीव्हनसन यांचे नाव या विषयावर आवर्जून घेतात. त्यांनी जगभरातील हजारो केसेसचा सखोल अभ्यास करून त्यातील दोन हजार केसेस वर केलेले संशोधन विविध प्रकारे उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्याचा शोध घ्यावा. एका रेडिओ मुलाखतीत त्यांनी म्हटले होते. तुमचा धर्म अशी मान्यता देत नाही मग पुनर्जन्माला तुम्ही मानता का? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. माझ्या शोधातून जे पुरावे मला दिसतात त्याला पुष्टी करणारा पुनर्जन्मांच्या सिद्धांताशिवाय कुठलाच दुसरा सिद्धांत माझ्या समोर येत नाही, म्हणून मला नाइलाजाने पुनर्जन्म सिद्धांतावर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात, तो मान्य आहे असे नाही. कदाचित म्हणून त्यांच्या पुस्तकातील केसेस 'सजेस्टिव्ह' ऑफ रिन्कारर्नेशन अशा वर्णनाच्या आहेत. असो. पुण्यात एक डॉ. दिलीप नाहर म्हणून सध्या जीवित व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांना या बाबत आलेला अनुभव सादर केला होता. त्यावर नंतर टीव्ही वर एक पुर्ण एपिसोड सादर केला गेला. त्यात त्यांनी पुर्व जन्मातील जागेचा, गावाचा प्रत्यक्ष पुरावा कसा शोधला. वगैरे वर्णन केले. पुनर्जन्माशी निगडित वास्तूंची शाहनिशा केली. गावकऱ्यांच्या सोबतीने त्यांच्या पुर्वजन्मातील व्यक्तीचे सध्याचे वारसदार शोधले. त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून तोंडी शहानिशा करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या घराण्याचा लिखित वंशावळी मिळवून त्यातील विवक्षित व्यक्तीच्या जीवनाचे सर्व पैलू मिळवले. या सर्व शोधात त्यांच्या घरातील सदस्य सहभागी होते. ते वर्णन ऐकून एका टीव्ही कार्यक्रमात पुर्ण एपिसोडच्या शूटींगसाठी त्याच स्थानाला त्यांनी पुन्हा काही वर्षांनी भेट दिली. त्यावेळी त्या गावाचे, वास्तूचे बदललेले स्वरूप पाहून ते स्वतः थक्क झाले. काही स्थानिकांनी त्यांच्या आधीच्या भेटीमुळे वास्तूचा पुनरुउद्धार करायची प्रेरणा घेऊन गावाच्या एकीला उजाळा मिळाला, वगैरे रंजक माहिती त्याच्याशी संपर्क केला तर मिळू शकते.