Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:
याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे. सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात. हा अशा प्रकारचा मांजा बाजारात यायच्या आधीपासूनच पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांना होणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे (निष्फळ?) प्रयत्न होत आल्येत. निष्फळ अशासाठी की माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागल्येत. यासंबंधी हवी तितकी जनजागृती होत नसावी असं वाटतं. होळीला जागोजागी एवढी जाळपोळ होते. वाळवी लागलेली, सुकलेली, आधीच मेलेली झाडं असतील तर एकवेळ ठीक आहे पण प्रसंगी जाळायला लाकडंच नाहीत म्हणून सरळ जिवंत झाडांना तोडून जाळून टाकतात. काही वर्षांपूर्वी एक लेख वाचला होता, होळीनिमित्तच आला होता. त्यात असं म्हटलं होतं, की कचरा ओला असो किंवा सुका, तो जाळू नये. कारण तो अर्धवट जळला की त्याने निसर्गाला हानीच होते. (हेच कदाचित माणसांवर अंत्यसंस्कार करतानाही लागू होत असावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे इलेक्ट्रिक चितेवर मोठ्या तापमानावर शरीर पूर्णपणे जळून जात असल्याने निसर्गाला हानीकारक घटक हवेत शिरत नसावेत?) होळी आग न लावता साजरी करता येत नाही का? होळीच्या दिवशी आगीचा अतिरेक, तर रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा!! एवढ्या प्रमाणावर पाणी वाया जातं, की महानगरपालिकेला फतवे काढावे लागतात, अमूक अमूक प्रमाणाबाहेर एखाद्या सोसायटीने पाणी वापरलं तर दंड बसेल वगैरे. त्याचा कितपत परिणाम होतो? तरी नाही म्हटलं तरी गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे ब-याच ठिकाणी 'सुकी होळी' साजरी करण्यात आली. (सदाशिव आमरापूरकरांच्या शेजारच्या कॉलनीतले 'रेन डान्स' सारखे अपवाद सोडून) पण या सुक्या होळीने काय साध्य केलं? सहजासहजी न निघणा-या पक्क्या रंगांना ऊत आला आणि मग ते काढण्यासाठी आंघोळ करताना जेवढं पाणी एरव्हीच्या आंघोळीपेक्षा जास्त वाया गेलं असेल त्याचा काय हिशेब? जम्प टू दहिहंडी आणि गणेशोत्सव. गोंगाट, गर्दी, वाहतूकीची तारांबळ, होर्डिंग्जचा कचरा, इ. हे दरवर्षी ठरलेलं. गणपती उत्सवांत एवढा गोंगाट असतो, आणि त्यात पीओपीचे गणपती. म्हणजे ध्वनी आणि जल प्रदूषण. तरी बरेच जण हल्ली शाडूच्या मूर्तींकडे आणि विसर्जनासाठी खास तयार केलेल्या कृत्रिम तलावांकडे वळू लागल्येत हे त्यातल्या त्यात बरं. सगळ्यात शेवटी दिवाळी. निसर्गाला त्रास देण्याचा उच्चांक गाठणारा हा सण. याला तोड नाही. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, फटाक्यांचा, दारूचा, फटाक्यांच्या बॉक्सेसचा कचरा जिकडे तिकडे पडलेला असतो. नीट पाहिलं तर हवेत स्मॉगचा एक काळसर जाड पट्टा असतो या काळात, त्याच्या वरती मग आकाश दिसतं. रात्रीच्या वेळी रॉकेट्सची रोषणाई पाहायला म्हणून गच्चीत गेलो तर लक्ष फटाक्यांऐवजी फटाका फुटण्याच्या प्रत्येक आवाजानिशी त्या आवाजाजवळच्या पक्ष्यांच्या होणा-या धावपळीने वेधून घेतलं. वर्षभरात कधीही साधं लग्नाच्या किंवा क्रिकेटच्या निमित्ताने कुणी एखादा जरी फटाका फोडला तरी या पक्ष्यांची तारांबळ उडते. सैरावैरा धावत सुटतात. फटाक्यांच्या आवाजाने आपल्या सारख्या ५-६फूटी माणसांना सुद्धा त्रास होतो, त्या चिमुकल्या जीवांचं काय होत असेल? आणि हे सगळं फक्त पक्ष्यांच्या बाबतीतच नाही, तर इतर छोट्या-मोठ्या प्राण्यांच्या बाबतीतही होतच असणार. या सगळ्या सणांच्या साजरकरणाविषयीच्या आक्षेपांवर ब-याच प्रकारची उडवाउडवीची उत्तरं मिळतात - १. एवढे जण सेलिब्रेट करतात. आम्ही केलं तर काय मोठा फरक पडणार आहे? (असाच विचार प्रत्येक जण करत बसला, तर परिस्थितीत बदल कसा होईल?) २. होळी/रंगपंचमी/दिवाळी/संक्रातीच्या वेळी आमच्या चिमुकल्या मुलांचा आनंद पाहून धन्यता वाटते. (तुमच्या चिमुकल्यांच्या हौशीपायी तुम्ही इतर कित्येक निरपराध चिमुकल्या जीवांना विनाकारण त्रास देता त्याचं काय?) ३. संपूर्ण वर्षभर आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. निसर्गाला आमच्या परीने काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतो, मग एखाद्या सणाच्या दिवशी जरा केली मज्जा, तर काय हरकत आहे? (म्हणजे वर्षभर तुम्ही निसर्गाला इजा न पोचवण्यासाठी घेतलेली काळजी एका दिवसात धुळीला मिळते) ४. फक्त आमच्या सणांनाच का बोल लावता? इतर धर्माचे लोक सण साजरा करताना जणू निसर्गाला त्रास होतच नाही. ईदेच्या दिवशी केवढे बोकड कापले जातात, ३१स्ट च्या रात्री एकाच वेळी जगभरात होणा-या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचं काय? (सगळं कबूल. पण "दुसरा गू खातो मग मी खाल्ली तर काय बिघडलं?" या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? आणि आपण आपल्या स्वतःमध्ये काही सुधारणा करता येते का हे आधी बघावं. आपल्या सणांमध्येच नको त्या गोष्टी होत असताना इतरांच्या सणांविषयी आक्षेप घेतले, तर 'आधी स्वतःच्या नाकाचा शेंबूड पूसा' असंच आपल्याला लोक म्हणणार ना) ५. जगभर होणारी युद्धं, गाड्या, कारखाने यांच्यातून निघणारे दूषित वायू, सांडपाणी, ऐरोप्लेनच्या आवाजाने जवळपासच्या लोकांना होणारा त्रास, फिल्म्समध्ये दाखवल्या जाणा-या खोट्या पावसात होणारा पाण्याचा अपव्यय यांच्या मानाने आम्ही खेळलेल्या रंगपंचमीने, उडवलेल्या फटाक्यांनी होणा-या प्रदूषणाचं प्रमाण अत्यल्प म्हणावं लागेल. (अच्छा, म्हणजे सगळी दुनिया येन केन प्रकारेण निसर्गाची वाट लावतंच आहे, त्यात आपणही खारीचा वाटा उचलावा असा उद्दात्त हेतू दिसतो मंडळींचा) ६. तू एवढा बोलतोयस, निसर्गाला हानी, निसर्गाला हानी... स्वतः काय करतोस रे भाड्या? (निसर्गाला होणारी हानी दिसून आल्यावर, पतंग उडवणं, होळी/रंगपंचमी खेळणं [सुकी असो वा ओली], घरी गणपती आणणं, दहीहंडीत भाग घेणं [मला तसंही कोण घेणार म्हणा], दिवाळीला किंवा अगदी ३१स्ट ला सुद्धा फटाके उडवणं,

बंद केलं आहे

. तरी माझ्या परीने हे सगळे सण निसर्गाला त्रास न देता एंजॉय करायला शिकलो आहे.) सुधारणेला सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात. मी तर केली, इतर अनेकांनी करण्याची वाट पाहतोय. [काय रे नेहमीचं तेच तेच रटाळ विषय किती किस पाडणार?? - (कळत/नकळत निसर्गाला हानी पोचवून सण साजरा करणा-या दहा लोकांनी समजा लेख वाचला, तर निदान एकाच्या तरी डोक्यात प्रकाश पडून आचरणात बदल होईल अशी लेख लिहीण्यामागची आशा... पुढेही वेळीवेळी याच आशयाचा किस [जमल्यास अधिक सशक्तपणे] पाडत राहीन...)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

फारच चांगला विषय मांडला आहे. मला लहानपणापासूनच फटके, रंग, मांजा इ. गोष्टी आवडल्या नाहीत. पण समाजप्रभोदनचा फारसा प्रयत्न केला नव्हता. अतिशय संयुक्तिक आणि विचार करायला लावणारा विषय आहे. धार्मिक भावना आणि विज्ञानाची प्रगती ह्यांची सांगड घालून नवीन रूढी आचरणात आणायला हव्यात.

माझी कोणताही सण साजरी करण्याची विशेष अशी पद्धत नाही. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा सणासुदीच्या दिवसासारखाच असतो. सारखाच एंजॉय करतो!! स्वप्नांचे विविधरंगी पतंग रोजच हवेत उडत असतात. ते कापायला बरेच जण आतूर असतात. रोज कोणाच्या तरी नावाने शिमगा करतोच. मनाला भेडसावणा-या ब-याच गोष्टींची होळी आत पेटलेली असते. दिवसाचा श्रीगणेशा रोजच होतो. फटाकड्या पोरी बघणं आणि शब्दांची येताजाता आतिषबाजी करणं हा आवडता छंद आहेच. न्यू इअर ईव्हचं जागरण म्हणाल तर तशी बरीच जागरणं अधून मधून या ना त्या निमित्ताने घडतच असतात. आणि या ना त्या प्रकारे माझा बकरा करून मला कापून खाणारी सुद्धा बरीच मंडळी आहेत. तुम्हालाही होळीच्या हार्दिक शुभेच्छा!! पाण्याचा अपव्यय टाळा आणि सहज धुतल्याने जाणार नाहीत असे पक्के रंग वापरू नका!! :) तसेच जमल्यास होळी पेटवू नका!! बाकी तुम्ही सूज्ञ आहात!! अधिक काय लिहिणे!!

आई है होली रंग भरी, इस पर्व को मनाये, नाता है एक दूजे से, इसे न भूल जाये| बहुत बड़ी हे दुनिया, इसमे न खो जाये, रंग और उमंग में बसी, प्रीत को जान जाये| कितने भी दूर हो, लेकिन मेरी ऊँची हे सदाए, होली के रंग खेले संग, कभी न भूल पाए| प्रीत के इस पर्व पर, तुम हमे और हम तुम्हे बुलाये, माना दुनिया का सफर कठिन हे, आती आंधी और हवाए| पर जरुरी नही की हम, दुनिया में इसी रूप में दोबारा आये, प्रेम का लेन देन न कर सके, जीवन में यह सोच कर न पछताए| सुनहरी किरणे आतुर खड़ी स्वागत में, दूर कर दे काली घटाए, हम तो है उन्ही के वो भी है हमारे, सोच कर मुस्कुराये| छोटी सी है यह जिन्दगी, यु ही न चली जाये, आज मिलकर करे एक वादा, दे सभी को दुआए| पगडंडी लम्बी है पर इतनी संकरी नही की, उसमे दो नही समाये, प्रेम स्नेह की बरसात हो, सभी के जीवन में खुशिया छाए| आओ होली मनाये,आओ होली मनाये --नारायणी माया

पाण्याचा अपव्यय टाळा मी एक पोस्टर पाहील्याचे आठवले... "एव्हरी डे इज अर्थ डे". पाण्याचा तुटवडा हा एका दिवसाच्या रंगपंचमीमुळे होत नसून ३६५ दिवसांच्या गैरवापरामुळे होतो. त्यामुळे फक्त एक सण साजरे करणार्‍यांना त्यासाठी अपराधी भावना देणे योग्य वाटत नाही.. सहज धुतल्याने जाणार नाहीत असे पक्के रंग वापरू नका!! सहमत! तसेच जमल्यास होळी पेटवू नका!! मला काही याची व्यक्तिगत हौस आहे अशातला भाग नाही. पण परत अपराधी भावना देयचीच असेल तर वाट्टेल तेथे बांधकामे करण्यासाठी जंगलतोड करण्याची प्रत्येक दिवशी परवानगी देणार्‍या आणि बिल्डर्सना याची जास्त समज देण्याची गरज आहे. तसे देखील आता होळी काय साध्या शेकोटीला पण जागा कमी होऊ लागली आहे... असो. होळीच्या शुभेच्छा!

वर्षभर निसर्गाची काशी होत असताना केवळ सणांना single out करण मला पण नाही पटत.

मी एक पोस्टर पाहील्याचे आठवले... "एव्हरी डे इज अर्थ डे". पाण्याचा तुटवडा हा एका दिवसाच्या रंगपंचमीमुळे होत नसून ३६५ दिवसांच्या गैरवापरामुळे होतो. त्यामुळे फक्त एक सण साजरे करणार्‍यांना त्यासाठी अपराधी भावना देणे योग्य वाटत नाही..
हा गैरवापर जेव्हा उघडपणे दिसून येतो तेव्हा त्याला विरोध करायला काय हरकत आहे? रंगपंचमीची मजा लुटायची म्हणून जे पाणी फुकट न घालवता ते वाचवता येऊ शकते त्याला फुकट जाऊ द्यायचं, फक्त चैनीपायी? 'वर्षातले ३६५ दिवस या ना त्या प्रकारे फाल्तुगिरी चालतेच, तिला कोणी थांबवताना/थांबवायचा प्रयत्न करताना "आम्हाला" दिसत नाही म्हणून मग आजच्या सणाच्या दिवशी आम्ही जी काही फाल्तुगिरी करू तिलाही कोणी थांबवू नये' अशा विचार करण्याला काय अर्थ आहे?
वाट्टेल तेथे बांधकामे करण्यासाठी जंगलतोड करण्याची प्रत्येक दिवशी परवानगी देणार्‍या आणि बिल्डर्सना याची जास्त समज देण्याची गरज आहे.
ते परवानगी देणारे आणि ती मिळवणारे बिल्डर्स बिनडोक आहेत. त्यांना चांगल्या शब्दांत, लेख लिहून समज देण्यात वेळ आणि शक्ती नुसती वाया जाईल. त्यांना समजणा-या त्यांच्याच भाषेत समज द्यायला हवी. ती समज देण्यासाठी लागणारी शक्ती आणि पैसा जवळ असेल तेव्हा त्यांना द्यायला हवी ती समज देऊच; इथे सण चुकीच्या पद्धतीने साजरे करू नका, असं आवाहन मी समंजस लोकांना करत आहे, करत राहणार आहे. तुम्हालाही (उशीराने देतोय पण तरीही) होळीच्या शुभेच्छा!!

सर्वप्रथम माझे प्रतिसाद हे व्यक्तीगत घेयचे आणि चिडचिड करायचे काहीच कारण नाही. तसे पाहीलेत तर या धाग्यातल्या माझ्या पहील्या प्रतिसादापासून आपल्या मूळ भावनेशी सहमत असेच म्हणलेले आहे. माझी हरकत सामान्य माणूस जरा रोजची कटकट विसरून किंचीत त्याला परवडेल अशा पद्धतीने सणासुदीचा आनंद लुटत असताना सुतकी चेहरे करून गळा काढण्याच्या वृत्तीवर आहे. तुम्ही तसे आहात का? मला माहीत नाही. तेंव्हा कृपया हे खरेच व्यक्तीगत घेऊ नये... पण असल्या गोष्टी शिकवल्या कुणाला जातात? तर जे त्या गोष्टी करत नसतात अथवा कमितकमी करत असतात. येथे हे सर्व लिहून नक्की काय प्रबोधन होते? इथले लोकं तुम्ही म्हणता तसे समंजसच आहेत... फक्त जे असले काहीच करत नसतात त्यांना अपराधीपणाची भावना मिळते. बरं (सर्वांची माफी मागून) असे नक्की म्हणता येईल की यातला माझ्यासकट प्रत्येक सभासद, वाचक हा ३६५ दिवस आपापल्यापरीने निसर्गाचे हाल करत असतो. यातली एकपण चूक आपल्यापैकी सर्वच करत नाहीत असे म्हणणे आहे का?: भरपूर इंधन जाळून, अतिरीक्त उर्जा खर्च करून, मेडीकल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, रिसायक्लींग न करणे, कचरा करणे, पाण्याचा अतिरीक्त/गैरवापर, अन्नाची नासाडी, फ्रोजन फूड/कोक/पेप्सी सारखे पाणी जास्त वापरणारे पदार्थ वापरणे, वगैरे वगैरे... पण त्यावर आपण कधी बोलतो/लिहीतो/चर्चा करतो का? नाही, कारण वास्तवात धारयते इति धर्मः या व्याख्येप्रमाणे असली नासाडी रोजच्या रोज करणे हाच आपला धर्म आहे आणि त्या धर्माच्या विरोधात आपण लिहायला बिचकत असतो. असो.

होळी निमित्त सर्वांना विनंती आहे की उद्याच्या रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय टाळा आणि फक्त सुक्या रंगाने होळी खेळा, अन्यथा तुमच्यात आणि आसाराम बापूंमध्ये फरक तो काय उरला? सुके रंग अपुरे पडल्यास फुटलेली अंडी, पिचकलेले टमाटर वा विविध सडलेल्या भाज्या वापरू शकता. आदल्या रात्रीची होळीतील राख सुद्धा फुकटातला रंग म्हणून वापरणे बेस्ट. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने माती कुठेही केव्हाही मुबलक मिळतेच तर हा देखील एक उत्तम पर्याय होऊ शकतो. शहरातील लोकांकडे कुंड्यामध्ये जेमतेम माती असल्यास ते आदल्या रात्रीची चहाची उरलेली बुक्की वापरू शकतात. तसेच सर्फ एक्सेल निरमा वगैरे कपडे धुण्याचे डिटर्जंट पावडर असे विविधढंगी प्रयोग करू शकता. खेळून झाल्यावर रंगलेले कपडे मात्र न चुकता फाडा, अन्यथा ते धुवायला म्हणून आपल्या आया पाण्याचा अपव्यय करतील. अरे हो, सुक्या रंगाने का होईना रंगल्यावर आंघोळ करायला मात्र नेहमीपेक्षा डब्बल टिब्बल पाणी लागतेच, पण त्याचे आपण काही करू शकत नाही, नाईलाज आहे. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा , या पुरणपोळी खायला.. :)

खरं आहे.... मात्र हे सण मूलतः निसर्गाला त्रास देणारे नव्हते. उत्तरोत्तर लोकांनी त्यांचं स्वरूप बदलत नेलं, आणि आता त्याचा निसर्गाला त्रास होऊ लागलाय. सगळ्याचा अतिरेक करायची सवय आहे आम्हाला.

माणसाच्या एकंदरीतच सवयींचा (भारतातीलच नव्हे तर सर्व विकसीत आणि विकसनशील राष्ट्रांचा) निसर्गाला ३६५ दिवस अहोरात्र त्रास होत आहे.

माणसाच्या एकंदरीतच सवयींचा (भारतातीलच नव्हे तर सर्व विकसीत आणि विकसनशील राष्ट्रांचा) निसर्गाला ३६५ दिवस अहोरात्र त्रास होत आहे
मग एक एक करून या सगळ्या सवयींना निकालात काढायला हवं ना? सुरुवात चैनीच्या आणि उघड उघड अनावश्यक सवयींपासून करू - सणासुदीतील नासाडी आणि प्रदुषण. नंतर हळूहळू किंवा जमल्यास फटाफट तथाकथित आवश्यक पण हानिकारक सवयींसाठी योग्य ते पर्याय शोधू. कशी वाटते कल्पना?