Welcome to misalpav.com
लेखक: बिपिन६८ | प्रसिद्ध:
25th Mar 2014 २५ मार्च १९३३ - २६ जुन २००१ प्रिय वपु, आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी. तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना " परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते" वपु तुमचे आणि आमचे नाते तरी या पेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेंव्हा हवे असेल तेंव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो?मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिस मध्ये भेटता. तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्तेक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्तेक कथा आम्हाला समोर ठेवूनच लिहित होतात ना… तुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!! नरक म्हणजे काय ? तुम्ही पार्टनर मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात " नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक" कसे सुचत होते हो इतकी सोपे लिखाण करायला ? तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात ! तीनही गोष्टींचा एक दुसर्याशी अर्था अर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात कदाचित महानगर पालिकेतील नोकरी मुळे तुमचा संबंध समजतील वेग वेगळ्या प्रकरच्या लोकांशी आल्या मुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेले…पण याचा अर्थ असा नव्हे कि महानगर पालिके मुळे तुम्ही साहित्तिक झालात…. नसता मुंबई पालिकेतील प्रत्तेक कर्मचारी कथा लेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न " कबुतराला गरुडा चे पंख लावता येतील पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते” तुमच्या प्रत्तेक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यम वर्गीय घरा भोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा कदाचित परिणाम असेल , आणि तुम्हाला सांगतो वपु त्या मुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या . आता हेच बघा न " किती दमता तुम्ही ? या एका वाक्याची भूक प्रत्तेक स्त्री आणि पुरुषाला असते"…. या वाक्याचे महत्व कळण्या करिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या? तुम्ही अजून एक कलाकृती करून ठेवलीत , जे पुस्तक तुम्ही वडिलांवर लिहिलेत त्याला खरेच तोड नाही " व पु सांगे वडिलांची कीर्ती"…। याला कारण प्रत्तेकालाच वडिलान बद्दल भावना असतात, पण किती लोक समर्थ पणे त्या जाहीर करतात, तसेच साहित्य विश्वात वडील या विषयवार लिहिलेली पुस्तके अभावानेच आढळतात…. केवळ त्या एका गोष्टी मुळे पुस्तकाचे महत्व वाढत नाही कारण प्रत्तेक व्यक्ती च्या आयुष्यात वडील हि एक हळवी किनार असते … असंख्य आठवणी आणि भावना असतात पण त्या तुम्ही कशा मांडता हे फार महत्वाचे…. तुम्ही तर लेखकच पण त्याहून जास्त महत्वाचे ते एका लेखकाने एका चित्रकाराचे लिहिलेले चरित्र… आपल्या सौ चे ब्रेन ट्युमर चे आजारपण आणि त्याचा दुखद: शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार ….बायको हि सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकाविलीत…. त्याच नात्या करिता नियती इतकी निष्ठुर पणे का वागली तुमच्याशी ? कदाचित या अनुभवातून आयुष्याच सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात - " प्रोब्लेम कोणाला नसतात ? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तरी कधी माणसे लागतात " अंत्य यात्रे ला जाऊन आल्या नंतर अथवा स्मशानातून परत आल्यवर थकवा येण्याचे कारण किंवा मन सैरभैर का होते याचे उत्तर तुम्ही सहज देवून गेलात - "रडणाऱ्या माणसा पेक्षा सांत्वन करणार्यावर जास्त ताण पडतो " किती अचूक लिहून गेलात हो तुम्ही ! तुमचे लेखन जसे गाजले तसेच तुमचे कथा कथन गाजले ,कथाकथनाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले , तुम्ही कथाकथन थेट साता समुद्रा पार नेलेत …लन्दन , अमेरिका , कॅनडा ला कार्यक्रम झाले …अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले, कर्तुत्व तुमचे पण मान आमची उंचावली ! महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले…तुमचे असंख्य चाहते धन्य झाले. वपुं तुमच्या दृष्टीकोनाला खरेच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा द्रुष्टीकोन खरोखरचं खुपं काही शिकवणारा आहे…. पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम … आणि मुख्य पत्र हे असे माध्यम कि ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न "संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !" म्हणून हा पत्र प्रपंच ! तुम्ही आमच्या पासून खूप दूर गेलात , पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल …तुमचि कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे , बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व सारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल - आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे. आपला वाचक , बिपीन कुलकर्णी
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

छान लिहिलय. 'वपुं'च लेखन आणि कथाकथन खूप आवडतं. गप्पा माराव्या इतक्या सहजतेनं गोष्ट सांगतात.

बिपीन, वपुंचे लेखन न वाचलेले मराठी भाषिक महाभाग फार कमी असतील. सहज सुंदर, आपापल्या अनुभव विश्वाशी जवळीक साधणारे. आपण काही उदाहरणे देऊन वपुंचे लेखन पुन्हा वाचायला प्रवृत्त केलेत. धन्यवाद

तरी दवण्यांपेक्षा बरेच बरे. अंमळ मॅच्युअर. तत्त्वज्ञानाचा डोस असला तरी तो दरवेळेस उपदेशपरच असतो असे नाही, सबब त्यांचं लेखन रञ्जक वाटतं.

लहानपणी व.पु.यांच्या कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या . माझ्या दुर्दैवाने मला आठवत नाही आता कुठे असतील . त्यानंतर घरच बदलल . काही मिळालं , कुठे तर नक्की घेणार आहे , वाचणार आहे आणि ऐकणार आहे . :)

मना/णा पासून धन्यवाद . सरळ मणाणे घेणे . :) श्रीमंत अन दानशूर पण.;) हव्या असतील तर मेलू शकतो.>>> अरे व्वा. बर्याच चांगल्या क्वालीटीज आहेत . :) आणि अजून टिकूण आहेत म्हणायचं . ;) :D (ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइस . :P )

ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइस आता तुम्हाला म्या जड कसा काय घेणार?? आधीच "भारी" आहात तुम्ही (सब पे भारी हुं मय). पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का?? कस्सं होणार बाई.... आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. :P (वजनदार)

पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का??>>> आत्मस्तुती वायीट अस आमचे गुरु म्हण्तात . *beee* तसंही सोतावरूण दिवे वोवलण्याची सवयच णसल्याणे मौण . :D आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. Blum 3>>> आम्ही हंच घेत्तो . नेहमीच . जड(भारी) कंदी(पेडे नव्ह) घ्येयाच ते माहिती हाव(आहे) . ;) :)

आमच्या घरी सर्वाना एक सवय होती (सासरे- नवरा- दिर) रोज रात्रि झोपताना वपु,पुल यांचे कथाकथन ऐकत झोपायच. कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या आता माहीत नाही . पण संगणकावर आणी फिरत्या संग्रह साच्या (योग्य मराठी नाव माहित नाही)( (पेन ड्राईव्ह) मधे काही कथाकथनाचे भाग आहेत. अधुन मधुन बाहेर गेल्यावर गाडीत गाणी ऐकण्या ऐवजी ते ऐकायला खुप छान वाटत.

लेखन - मुक्तक आवडले. मला वाटते वपुंना त्यांच्या कर्मचारी पुस्तकाने प्रसिद्धी दिली पण त्याआधीच ते टेकाडे भाउजींमुळे घरोघरी पोचले होते. बरीचशी (बहुतेक सगळीच) पुस्तके मी वाचली आहेत. त्यातले जसे भूलभुलैय्या हे वेगळेच होते पण आवडले. तसे "आपण सारे अर्जून" वाचायला घेतले पण त्यातला (दु:खद/डिप्रेस करणारा या अर्थाने) उदास भाव बघून ते तसेच ठेवून दिले ते एकदम आठवले...

सहज जाता जाता तत्वज्ञान सांगून जायचं वपुनी आणि मग रवंथ करत आपण त्यावर विचार करायचा हे तेव्हा नेहमीचं झालं होतं त्यांच्या कथा वाचताना. अंमळ जास्त वेळ लागायचा त्यामुळे त्यांच्या कथा वाचताना, पण व्वा! सह्ही! असं म्हणत मान डोलावलीच जायची. आजूबाजूच्या साध्या साध्या प्रसंगांकडे डोळसपणे बघायची दृष्टी जशी पु.लं. नी दिली तशी त्या गोष्टींपलिकडली माणसं आणि खर्या जगातली माणसं उलगडायला वपु नी शिकवलं, अर्थात त्यांचं साहित्य योग्य वयात वाचल्याने तसं झालं असावं. पार्टनर, तुच माझी वहिदा, अमिताभ, हसरे दु:ख अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या आवाजासहित डोक्यात फिट्ट बसल्या. 'दोत्त' सगळ्यात आवडती! 'आपण सारे अर्जुन' वाचून तर डोकं सुन्न झालं, नियती नावाची गोष्ट आहे जिचं आपण शप्प वाकडं करु शकत नाही हे पहिल्या प्रथम तिथं कळलं! अवचटांचं धागे उभे आडवे वाचताना असंच काहीसं झालं होतं तेव्हा वपुंचे संस्कार आठवले! अर्थात वपु मलाही अत्ता आवडतात का, तर उत्तर हो असेल पण तितकेच आवडतात का, तर उत्तर हो च असेल असं नाही. काळ पुढे सरकला, कक्षा रुंदावल्या, संदर्भ बदलले त्यामुळेही असेल पण भदे सदृश अतिशयोक्तिमधे मन रमत नाही आताशा.. पण तरीही वपुंचे संस्कार अजूनही रेल्वेत 'तुझ्यापेक्षा माझी हालत वाईट' म्हणत दुसर्‍याचे दु:ख हलके करणारा 'अनोळखी' माणूस दिसला की दाद देतातच! :) 'साहित्य सहवास' आवडलाचं ,त्यानिमित्त वपुंची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!

वसंत पुरुषोत्तम काळे हा लेखक "हलकं फुलकं " या श्रेणीत नाहीच मुळी. त्यांनी जीवनाबद्दल इतकं स्वच्छ आणि स्पष्ट लिहिलं आहे कि ते सुरुवातीला बर्याच लोकांना झेपत नाही. पण ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडतच. अफाट ताकतीचं लेखन आहे आणि कितीही वेळा वाचला तरी परत त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. माणसं वाचायला त्यांनीच शिकवलं. त्यांच्या लेखनाचा समग्र संच कुठे मिळेल काय? ( जसा व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखनाचा संच मेहता यांच्या कडे मिळतो.) मला माझ्या संग्रही ठेवायचा आहे.

अर्थात वपु मलाही अत्ता आवडतात का, तर उत्तर हो असेल पण तितकेच आवडतात का, तर उत्तर हो च असेल असं नाही. काळ पुढे सरकला, कक्षा रुंदावल्या, संदर्भ बदलले त्यामुळेही असेल पण भदे सदृश अतिशयोक्तिमधे मन रमत नाही आताशा.. पण तरीही वपुंचे संस्कार अजूनही रेल्वेत 'तुझ्यापेक्षा माझी हालत वाईट' म्हणत दुसर्‍याचे दु:ख हलके करणारा 'अनोळखी' माणूस दिसला की दाद देतातच! -- अचुक निरीक्षण ब-याच जणांना लागु पडेल. मला त्यांची 'पप्पा' कथा जास्त आवडली पण त्यांचा स्वत:चा यात कमी रोल आहे, मुग्धा चिटणीसने तिच्या आवाजात फार कमाल केली आहे या कथाकथनात - तिसरी-चौथीत असताना घरी भावाने मित्राकडुन कॅसेट आणली होती, तेव्हा तिचा एकलेला आवाज मागील काही वर्षापर्यंत लक्षात होता आणि शेवटी ते ध्वनीमुद्रण सापडले.

वपुं बरोबर प्रत्यक्ष बोलायचा योग आला व त्यांच्या सौ शी.फोनवरून.त्यांच्या कथेचा बाज काहीस वेगळा होता. त्यात ते स्वतः कथा सादर करीत असल्याने अधिक न्याय देउ शकत. काही वेळा ते कथन एकसुरीही वाटत असे. वपु आपल्या सारखेच सामान्या माणूस होते. राग लोभ, मनस्ताप, दु:ख, तृप्ती , यश , सन्मान, प्रेम सगंळं भलं बुरं त्यांच्याही वाट्याला आलं. मुळात माणूस दिलखुलास. अनेकाना त्यांची आलेली " रेखीव" पत्रे हा एक अमुल्य ठेवा वाटतो. जी ए कुलकर्णी, ह मो मराठे, मतकरी यांचा जसा एक बाज आहे तसाच वपुंचा ! यत रोचते तत्ग्राह्यम !

वपु हे सुंदर पेटी वाजवायचे. त्यांच्या कोणत्याच कथेत त्यांचा हा गुण दिसत नाही. अर्थात हे थोडेसे अवांतर. वपुनी जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा ते अगदी सहज सांगितले. त्यांच्या " घर हरवलेली माणसे " कथा संग्रह वाचताना आपण इगो नामक एका भयंकर व्हायरसशी कसे रोज झगडत असतो. हे अनुभवायला मिळते.

वपु खूप पुर्वी वाचले आणि तेंव्हा आवडायचे. आता आवडतील की नाही सांगता येत नाही. पण सध्या टेहळणीच्या सुरात वपुंविषयी बोलायची पध्दत आहे, तरी तुम्ही स्वच्छपणे वपु आवडतात असे लिहिले हे पाहून बरे वाटले. :-)

>>>>टेहळणीच्या सुरात हेटाळणीच्या म्हणायचंय का? बाकी वपु वाचायचं एक वय असतं असं म्हणावंसं वाटतं. ( वय १२ ते लग्न होईपर्यंत (आसपास) ;) ) अर्थात 'आपण सारे अर्जुन' आजही थोडंफार भावतं. बाकीची पुस्तकं काहीच नसलं तर वाचायला ठीक.

हे समजले नाही. आवडतात असे लिहिले तर तुम्हाला आवडले. तसेच जर आवडत नाहीत असे स्पष्टपणे कुणी म्हणत असेल तर ती हेटाळणी कशी होते ? आवडत नाही तर आवडत नाही, भारतीय घटनेनुसार प्रत्येक लेखक प्रत्येक वाचकाला आवडलाच पाहिजे असा नियम नाही. पुल वपुंच मध्यमवर्गीय लेखन नसेल कुणाला आवडत तर तसे सांगण्याचा त्याला अधिकार नाही का?