विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५
विपश्यना साधकवीर परतले
दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय? पाहायला मुद्दाम आली होती तर मुलाला ‘बाबांच्यात काय फरक पडलाय?’ ते जाणून घ्यायला उत्सुकता होती. पत्नी ‘आता काय काय करतायत’ याची धास्ती वाटून जरा सावध पवित्र्यात होती. आईला ‘फार काही काही करतो बुवा हा मुलगा लहानपणापासून’ असे वाटून चिरंजीवाबद्दल हुरहुर वाटत होती.
‘टिंगटॉंग’ दरवाज्यावरील बेल दोनदा वाजली अन दरवाजा हळूच उघडला. हातात आरतीचे ताट, निरांजन, कुंक व अक्षतांच्या वाट्या... जय्यत तयारी होती.....
मुलीकडून कपाळाला कुंकवाचा टिळा लागला, ओवाळून घेता घेता साहेबांना वाटले की आता गळ्यात हार नक्की पडणार बर का! पण कुठलं काय!
“हाय, डॅड ग्रेट....व्हॉट ए ग्रँड गोल्डन औरा अराउंड यू!!..... च्यक च्यक करता तिने साहेबांना धक्का दिला. “आई, पहा पहा, बाबांच्या मागे केवढं मोठं सोनेरी प्रकाश वलय आलयं ते” चिरंजिवांनी पुकारा केला....
साहेब चमकले. खरच कि काय! वाटलं, न जाणो असे काही आहे कि काय! असे वाटून त्यांनी पत्नीकडे प्रश्नार्थक पाहिले, तेंव्हा पोरं आपली फिरकी घेतायत असा तिचा चेहरा पाहून ते वरमले.
साहेब दारातून आत आले. कोचावर विसावले. पाण्याची तहान लागली होती. आता ग्लासातून सरबत नक्की येईल असा विचार मनात डोकावला पण ते तडक उठून फ्रिजमधून गार पाणी गटागटा पिऊ लागले. फार घाई यांना सगळ्याची असा मनात विचार करत पत्नीने त्वरेने म्हटले, “अहो थांबा, चहा टाकलाय सगळ्यांसाठी”...
पदार्थांची प्लेट हातात घेत साहेबांनी तोंड उघडले. म्हणाले, “ग्रेट! आऊट ऑफ धिस वर्ल्ड एक्सपिरियन्स!.... वन मस्ट गेट इट!!....
काही घास घेऊन ठेवलेली प्लेट पाहून आईने आणखी घालायसाठी आग्रह केला. तर साहेब उठले. तडक बेसिनपाशी जाऊन आपली प्लेट-चमचा विसळून जागेवर ठेवत म्हणाले, ‘दहा दिवसात लागलेली सवय आता कंटिन्यू ठेवली पाहिजे’ ...
‘भलतच काही तरी फॅड आहे झालं’ मुलीने विचार केला. चिरंजीवांनी कौतुकाने मान हलवली. तर आईला विचित्र वाटले असे मोलकरणी सारखे वागणे. साहेबांनी तोंड उघडले की ‘भोक्ता भाव, शरीरावरील संवेदना, समता व अनिच्छ भाव’ आदि कल्पनाविस्तार ऐकून इतरांना हे मौनात बरे असे काही मिनिटात वाटू लागले!
पांगापांग झाली. रात्रीचे जेवण साहेबांनी संध्याकाळच्या प्लेटमधील पदार्थांवर झाल्याचे पुकारल्याने चिकन मसाला करी व तळलेले फिश फ्रिजमधे सरकले. रात्री ११ च्या बातम्या घेतल्याशिवाय न झोपणारे साहेब, मेल न्याहाळून कॉम्प बंद करून बेडरुमकडे वळले. अल्प वस्त्रात पत्नी वाट पहात आहे असे त्यांनी खालच्या मानेने पाहिले. तिच्या बेडरुमचा लाईट मालवला. ते दुसऱ्या बेडरूमकडे वळले. मनात म्हणत होते, “आता भोक्ता भाव नाही! फक्त द्रष्टा भाव! .... एक चटोर मासिक हातात घेत त्यांनी बेडरुमचा लाईट लावला....
भाग ५ समाप्त...
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
भाग
तुमचं धक्कातंत्र भन्नाटच
गुडी पाडव्याच्या निमित्ताने