Welcome to misalpav.com
लेखक: पिलीयन रायडर | प्रसिद्ध:
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. एक तर ते झालंच पाहिजे.. दुसरं ते जातीमध्येच झालं पाहिजे, मग गाढवाशी का होईना.. पण परजातीतील कर्तुत्ववान पुरुष सुद्धा त्या गाढवापुढे किस झाड की पत्ती..शिवाय लग्न योग्य वयातच झालंच पाहिजे नाही तर मग आख्या जगाला तुमची काळजी करावी लागते.. कारण लग्ना शिवाय आयुष्य म्हणजे.. छे.. उपमा देण्यालायक सुद्धा उरत नाही.. असं लग्न मोडलं म्हणजे तुम्ही खरं तर जीव द्यायला हवा.. कारण काहिही असो.. चुक मुलीची असते.. "आता आपलं कस्सं होणार" हा प्रश्न पण त्यांनाच पडायला हवा.. मुलांना ह्या चिंता नसतात..* पण रानी "अब मेरा क्या होगा.." च्या गम मध्ये न डुबता चक्क स्वतःच्या हनिमुनच्या तिकीटावर पॅरिसला जाते..! मला हेच्च लई लई आवडलं.. तिची कारणमीमांसा काही का असेना.. आयडिया भारी आहे.. तिथे गेल्यावर तिला खुप वेगळं आयुष्य पहायला मिळतं.. वेगळेच लोक.. त्यांच्या विचित्रच पद्धती.. मुल्य वेगळी.. विचार वेगळे.. त्यांनाही त्यांची दु:ख.. पण त्याची ओझी वाहताना कुणी दिसत नाही.. "दु:खाच्या अलंकरणाची दिप्ती.." बाजुला सारुन चक्क आनंदी रहाण्याची उलटीच रीत.. रानीला कुणी फालतु (भोचक) प्रश्न विचारत नाही.. रानी दारुच्या नशेत जी काही बकवास करते ते ही शांतपणे ऐकुन घेतल्या जातं.. स्वतःच्या (इन मिन छटाक) आयुष्यातुन आलेल्या अनुभवांमधुन सल्ले कुणी देत नाही.. सल्ले नाहीत?! गेलाबाजार "क्या पता..कल हो ना हो" टाईप कॅचलाईन्स पण नाहीत? मग लोकांची आयुष्य बदलणार कशी? अरे "बस उसकी एक बातने मेरी तो दुनियाही बदलदी" बॉलीवुडची बदाम सत्ती आहे.. इथेच तर गेम सुरु होतो ना जिंदगी बदलण्याचा... कशी बदलणार मग दुनिया आता? मीच हैराण..परेशान झाले... किमान रानी स्वगता मधुन स्वतःला उलगडुन दाखवत आहे असं तरी दाखवायचं.. मग तरी प्रेक्षकांना समजेल पिक्चर आणि त्यातला अर्थ.. कारण प्रेक्षक चित्रपटातलं सगळ्यात मुर्ख पात्र असतं.. त्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स ची कोडी घालण्यावर बॉलीवुडचा विश्वास नाही.. त्यामुळे ह्या न त्या प्रकारे शब्दबंबाळ डायलॉग मधुन त्याला "जिंदगी".."मोहोब्बत"..विषयी तत्वज्ञान नाही दिलं तर मग घरी जाऊन त्याची जिंदगी कशी बदलणार? पण इथे एकंदरीत कुणी कुणाला काहीच उलगडुन दाखवत नाही.. सगळेच समजुन घेतात.. रानी सगळा राग फक्त दात ओठ खाउन.. केस मोकळे सोडून नाचुन व्यक्त करते.. पुर्वी एकदा नातेवाईकां समोर नाचल्याबद्दल होणार्‍या नवर्‍याच्या शिव्या खाल्याचा प्रसंग आठवुन फक्त एक छ्द्मी हास्य.. बास.. आणि पुन्हा हंगामा हो गया..सुरु.. रानीला ३ मुलांसोबत रहावं लागतं.. आधी त्यांना घाबरलेली रानी नंतर चक्क त्यांची मैत्रीण होते.. एका स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचते.. गाडी चालवते..एका स्पर्धेत जाउन तिथल्या लोकांना पाणीपुरी खाऊ घालते.. एक लिप किस पण करते.. रानीला ह्या सगळ्या दरम्यान काही नवीन सापडत नाही.. फकत तिच्यात जो आत्मविश्वास आहे ह्याची तिला कल्पनाच नसते तो तेवढा सापडतो.. आता एवढी मोठी गोष्ट गवसल्यावर हिरोईन कशी आमुलाग्र बदलली पाहिजे.. बॉलीवुडमध्ये हिरोईन आमुलाग्र बदलते म्हणजे ती खरं तर ड्रेसची लांबी, केसांची हेअर स्टाईल आणि तोंडावरती अत्यंत सहनशीलच्या ऐवजी माजोरडे भाव एवढंच बदलत असते.. आणि हो मग तिनी १-२ तरी मोठे डायलॉग मारले पाहिजेत.. मग हिरो स्तब्ध व्हायला पाहिजे..मग ती ताडताड तिथुन निघुन जाणार..मग हिरोला उपरती व्हायला पाहिजे.. (हे उलटं ही होऊ शकतं.. हिरोईन कपड्यांची लांबी कमी करते.. मग हिरो तिला भारतीय संस्कृतीबद्दल ऐकवतो.. मग हिरोइन स्तब्ध.. मग हिरो ताडताड जाणार..हिरोईनला उपरती..) इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही.. बरं इथवर तरी ठिक आहे.. पण जेव्हा हिरोला उपरती होऊन तो रानी कडे येतो.. तेव्हा तरी "जिंदगी" आणि "मोहोब्बत" च्या फुलबाज्या उडणार असं मला वाटत होतं.. पण छे.. चांगली रडुन पडून "तुम ऐसा कैसे कर सकते हो मेरे साथ विजय????" असे आर्त प्रश्न विचारायचे सोडुन ही बया रॉक शो ला निघुन जाते.. कमाल आहे.. अरे प्यार सामने रो रहा है.. माफी की भीक मांग रहा है.. डायलॉग मारने की सुवर्णसंधी डायरेक्टर दे रहा है.. तर ह्या पोरीला पुन्हा कधी न भेटु शकणारे मित्र महत्वाचे वाटतात? "ये बाते हम दिल्ली मे भी कर सकते है.." असा लॉजिकल डायलॉग मारुन हिरोईन मित्रांना भेटायला जाते?? छे.. असं कुठे घडतं का? म्हणलं ठिके.. पण शेवटी "प्यार की च जीत" होत असते.. त्यामुळे तिथे तरी हरदासाची कथा मूळपदावर येईलच.. पण हे भगवान! आता जरी प्यार भीक मागत असला तरी उद्या ह्याच प्यार सोबत "लग्न" नामक गोष्ट झाल्यावर प्यार नवरा बनुन परत डोक्यावर मिर्‍या वाटणार, सासु घरात किटी पार्टी आणि पार्लर मध्ये अडकवणार हे संभाव्य धोके लक्षात घेऊन हिरोईन चक्क साखरपुड्याची अंगठी परत देऊन निघुन जाते.. काहीही म्हणजे अगदी काहीही झालं तरी बये लग्न आणि नवरा महत्वाचा ही "भारतीय संस्कृतीची" आणि प्यारे के आगे सब गुनाह माफ असतात ही बॉलीवुडची आम्हाला शिकवण आहे..त्यामुळे अगदी ऐन्वेळेस नवरा मुलगा मागे हटला तरी कुणी ना कुणी बोहल्यावर उभं राहुन "प्रसंग निभवायचा".. म्हणजे त्या अभागी मुली सोबत लग्न करायचं.. मग ती मुलगी आयुष्यभर त्याला परमेश्वर मानुन "मै धरा की धुल हूं" म्हणणार.. एक तर ही रानी घरात तोंड लपवुन बसायचं सोडुन पॅरिसला जाते.. तिथे चक्क आनंदात रहाते (दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. त्यातही तु कितीही मॉडर्न असलीस (कितीही लहान कपड्यात वावरणारी बोल्ड अभिनेत्री = मॉडर्न, खुल्या विचारांची, स्वतंत्र स्त्री) तरी जेव्हा सवाल इश्क, मोहोब्बत का असतो तेव्हा तू डोकं गहाणच ठेवायचं असतं.. अगं स्वतःला आमुलाग्र बदलायला तयार होतात हिरवणी (म्हण्जे रिव्हर्स केस.. तोकड्या कपड्यातुन बॅक टु साडी फॉर हिरोज सेक..).. आणि तू चक्क माफी नाकारतेस हिरोला? अंगठी परत करतेस??? मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. काही मोठी मोठी स्पष्टीकरणं नाहीत.. शाब्दिक थोबाडित मारणं नाही.. आयुष्यभर गप्प बसुन पिक्चरच्या शेवटाला दुनियाभरची बडबड करुन समोरच्याला (आपल्याला बोलता येतं आणि १० ओळी सलग बोलु शकु एवढी अक्कल आपल्याला आहे हे दाखवुन) अवाक करण्याचा प्लान नाही.. "हमारा रास्ता जरुर एक है लेकीन मंजिल नही.." टाईप छळ नाही.. फक्त एक "थँक्यु".. विथ स्माइल..! ?? व्हाय??? हम्म.... आय गेस बिकॉज शी इज जस्ट "क्विन".. ए क्विन विदाऊट ड्रामा..! *- हे सगळं माझं बॉलिवुड ग्यान आहे.. माझी मतं नाहीत.. त्यामुळे कुठल्याच मुक्ती मोर्चांनी माझ्यावर धावुन येऊ नये.. मी उत्तरं देत बसण्याचा टाईमपास करणार नाहीये..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चित्रपट खूपच चांगला आहे पण या निमित्ताने आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे. परिस्थिती खूप अंशी बदललेली आहे. लग्न मोडणे, घटस्फोट, स्त्रियांनी तोकडे कपडे वापरणे, अविवाहीत राहणे या गोष्टींना शहरांमधे सर्रास आणि गावांमधे थोडीफार मान्यता मिळत आहे. उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात. त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.

आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे कोण "आपण" नक्की? समजले नाही..
उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात
हो.. बरं मग? प्ययोजन काय ह्या वाक्याचे नक्की? मी कुठे म्हणलयं का असं?
त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.
अगत्य आणि भोचकपणा मधला फरक मी तुम्हाला सांगायला हवा का आता?!!

चित्रपट बरा आहे. या धाग्याबद्दल तसं म्हणता येणार नाही. चित्रपटात जे जाणीवपूर्वक टाळलं आहे (डायलॉगबाजी,सरसकटीकरण) ते धागाकर्तीला मात्र टाळता आलं नाही. माझ्या मते आता समाज देखिल बदलतो आहे आणि बॉलिवुडदेखिल. अवांतर- 'क्विन'ला सुद्धा गल्लाभरूपणा करण्याचा मोह पुरेपूर टाळता आला नाही. एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय? रस्त्याच्या कडेला शोकेसमध्ये स्ट्रिप-टिझ करणार्‍या बायका दाखवता याव्यात, हे एक कारण असेल का?

गल्लाभरू असणं वाईट कसं? चांगलंच आहे गल्लाभरू असणं. त्याशिवाय इकॉनॉमी कशी चालणार? व्यवसाय आहे तो; सत्यनारायणाची पूजा नाही! आणि आपण किती खोटं बोलणार आहोत स्वतःशी? स्ट्रीप करणार्‍या बायकांची दृष्ये चवीने बघितली गेली नसतील? 'दोस्ताना'मधला चड्डी सरकवणारा जॉन अब्राहम चवीने बघितला गेला नव्हता? अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन बाकी दसरे, दिवाळ्या, आणि गुढी पाडवे काय, येतच राहतील आणि ठराविक 'चैतन्याची गुढी', 'प्रकाशमान दीपावली' सारख्या छापील शब्दात गुडूप सुद्धा होतील. लेख खूपच छान आहे. विशेष म्हणजे धागाकर्तीचे स्वतःचे मत असल्याने बाकी सगळे पृथ्थकरणाचे मुद्दे आपोआपच गैरलागू होतात. पढने में मजा आया...और क्या चाहिये, भई? :-)

@अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन>>> +++१११ आणि जोरद्दार टाळ्या!!! जे नैसर्गिक आहे,ते दिसलं आणि असलं तरी अमान्य करायचं आणि जे अनैसर्गिक आहे,त्याचं वैयक्तिक नितिमत्तेच्या(?) अंगानी समर्थन करत राहायच! हा या लोकांचा लाडका खेळ असतो.

@सत्यनारायणाची पूजा हा सुद्धा भोळसट लोकांना गंडवण्याचा धूर्त व्यवसायच.>>> नुस्ता सत्य नारायण नाही हो..आमची सगळी धर्मव्यवस्थाच तशी आहे. आणि ती तशीच लोकांना हवी आहे. जर मी नारायणातलं सत्य सांगितलं,किंवा धर्माधिष्ठित सत्यातला "खरा" नारायण सांगितला तर माझा समाज "मला" स्विकारेल काय??? हाच खरा प्रश्न आहे. :)

एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय?
अ‍ॅमस्टरडॅमच का? अंबेजोगाई का नाही.. ह्याला उत्तर नाही.. पण अगदी विचार केलाच की का अ‍ॅमस्टरडॅम.. तर मला असं वाटतं की आपण जितके स्वतःच्या कंफर्ट झोन मधुन बाहेर निघु तेवढे आपण स्वतःच्या जास्त जवळ जातो.. तेवढे आपण स्वतंत्र होतो.. कम्फर्ट झोन सुटल्याने आधी आपण धडपडतो.. सावरायला पाहातो.... पण आजुबाजुला हात देणारं कुणीच नाही हे जाणवलं की स्वतः तोल सावरायला शिकतो.. एकदा का आपल्याला ही जाणीव झाली की आपण स्वतःला सांभाळु शकतो, की माणुस मुक्त... एका दिल्ली कडच्या पारंपारिक वातावरणात वाढलेल्या मुलीसाठी अ‍ॅमस्टरडॅम हा फार मोठा कल्चरल शॉक आहे.. जो तिच्या साठी आवश्यक होता..

चित्रपटामध्येच सांगितल्याप्रमाणे क्वीन चे आवडते शहर पॅरिस आणि त्याचे अ‍ॅमस्टरडॅम.. त्यामुळे हनिमूनसाठी दोघेजण हि शहरे निवडतात. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे ते अंतर १०० किमी (किंवा मैल ) असावे. कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..

कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..
प्वाइंटायम ट्राइंग टु मेक इज... हनिमुनला प्रवास करणे वेगळे आणी परेदेशात फिरायला आवडते म्हणून ते फिरताना दाखवणे वेगळी. जरुर फिरावे. पण त्यामागे हनिमुन चुकला म्हणुन हे कारण का बरे असावे ? लग्न मोडल्यावरच हे का दाखवावे ? म्हणजे लग्न संस्थेपेक्षा स्त्रि स्वातंत्र्य मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का ? जसे केजोच्या दोस्ताना नामक चुत्या चित्रपटात समलिंगी पध्दत मॉक करणारे लोक अतिशय स्मार्ट (अभ्या अन अब्र्या) अन स्ट्रेट आकर्षण राखणारे लोक अनकुल पर्सनॅलिटी (बॉबी देओल) दाखवुन गेइसम इज कुल हे अप्रत्यक्षपणे बिंबवायचा प्रयत्न केला न्हवता काय ? तिथे बॉबी देओलच्या ऐवजी सलमान नाही भेटला गेस्ट कलाकार म्हणून त्या रद्दड बॉबी देओलला का घेतले? असो, लग्न संस्थेपेक्षा (स्त्री)स्वैराचार ही मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का.. मला इतकेच म्हणायचे आहे भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत तिच्या आनंदाला भारताची पार्श्वभुमी हवी परदेशाची नको.. असेल आवड-गरज परदेश फिरायची, रहायची, नोकरी करायची पण अमेरीकी स्त्रियांचा हॅपिनेस इंडेक्स कमी होतोय...हे मी नाही, शास्त्रज्ञ बोलतात. गुगल करा, नाहीच मिळाला विदा तर मी अधिकृत लिंक देइन. म्हणजे पुर्वी स्त्रियांवर जेंव्हा बंधने होती तेव्हांचा इंडेक्स आणी आता अत्यल्प बंधने असतानाच्या हॅपिनेस इंडेक्स दोन्ही पडताळुन बघितल्यावर हे चकितजन्य सत्य सामोरे आले आहे. म्हणून क्विन हा निरागस स्त्रियांची भ्रामक दिशाभुल करणारा व चित्रपट ज्का गणू नये असा विचार येतो.

लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो. बाकी हॅपिनेस इंडेक्सबद्दल म्हणाल तर..स्वातंत्र्य म्ह. स्वैराचार असे समीकरण करणार्‍यांनी दु:ख ओढवून घेतलेले आहे. काही झाले तरी शेवटी पुरुष काही प्रसूत होणार नाहीत. एका मर्यादेपलीकडे स्त्रीपुरुषांत भेद हे राहणारच. पण त्यामुळे संसारात एकावरच जास्त बंधने असावीत हे पटत नाही. शेवटी स्वातंत्र्य म्ह. देखील दुधारी तलवार आहे, तिचा वापर करायला अक्कल लागते. पण ते न देणे म्ह. बेसिक हक्क नाकारणे असल्याने ते दिलेच पाहिजे. बाकी मग ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे जो तो आनंदी वा निराश होईल.

लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो.
मग स्वैराचाराचे (स्वछ्चंदीपणा म्हणा पण तो हळु हळु स्वैराचारच बनतो) अनुभवच नायिकेचे जिवनानुभुवविश्व समृध्द करताना का दाखवले आहे ? ते सुधा नेमके लग्न तुटल्यावर ? फिरायला तर कोणीही केंव्हाही परदेशात जाउ शकते, पण तुटलेल्या लग्नाच्या हनीमुनच्या तिकीटाचे कारण काय मानसिकता दर्शवते ?

=)) Before Sunrise मधे स्त्रीमुक्ती घुसडलेली नाही, असं म्हणणं हेच मुळात स्त्रीमुक्ती आणि Before Sunrise दोन्ही गोष्टी न समजल्याचं लक्षण आहे. Before Sunrise च्या विनोदाची जातकुळीसुद्धा फार नर्मविनोदी आहे. "(Before Sunrise मध्ये) स्त्रिमुक्ती वगैरे मसाला न घुसडता" हे वाक्य एपिक आहे, फेसबुकावर वापरण्याची परवानगी द्या प्लीज. इतरांनाही थोडं हसायला येईल. Before Sunrise मधली सेलिन मुक्त स्त्री आहे, ती काल भेटलेल्या माणसाबरोबर झोपते ते चालतं, पण भारतीय रानीने मात्र लग्न मोडल्यावर आनंद शोधावा, स्वतःचा शोध घ्यावा, मुक्तता पहिल्यांदा अनुभवावी तर ते नाही चालणार. आमच्या देशातल्या स्त्रिया बुरख्यात आणि स्वयंपाकघरातच पाहिजेत. का तर आम्ही कालच शोध लावला ना, 'सिंहासना'वर असताना, "भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत..."

मला या चित्रपटातिल आपल्या आवडीचा एक प्रसंग सांगावा. तुम्हाला तुमच्या घोड्चुका समजायला सुरुवात करता येइल.

तो एक प्रसंग दाखवला म्हणून तेवढ्यावरून मानसिकतेचा आरोप करणे मला पटत नाही. असे तर कुठलाही प्रसंग दाखवला तरी त्याबद्दल विचारता येईल, नै का?

आत्मशुन्यजी, हनिमूनला जायला तिने फ्रांस निवडले आहे. आता लग्न तर नाही झाले. मग त्या तिकिटाचे काय करायचे हा एक व्यावहारिक विचार. शिवाय आपल्या आवडत्या शहरात जाण्याची अशी दुसरी संधी परत कधी मिळणार हा दुसरा विचार. आता ते तसेच का? किंवा कथा अशीच का लिहिली याला काही कारण नाही देता येणार. लग्न संस्था महत्वाची नाही असा जर कथेचा संदेश असेल तर कथा अशी झाली असती: लग्न राणीने मोडले असते. तिकीट तयार आहेच असे म्हणून ती हुंदडून आली असती. आता परत कधी आली असतीं, कशी आली असती याची कल्पना मी तरी काही करत नाही. पण जी कथा आपल्याला समोर दिसते ती अशी नक्कीच नाहीये. माझ्या मते कुठलाही स्वैराचार बिंबवला गेला नाहीये. निरागस स्त्रियांची दिशाभूल वगैरे असे शब्द मी वापरणार नाही कारण प्रत्येक लेख, पुस्तक, चित्रपट त्या अर्थाने 'दिशाभूल करणारे साहित्य' या सदरात मोडेल.

पिरा सिनेमा परिक्षणाच्या क्षितिजावर नवा तार उगवला असे म्हणेन. पिक्चरच धावतं फ्रेम बाय फ्रेम समालोचन आवडल. लिहायची स्टाइल सुद्धा आवडली.

चित्रपट पाहिला नाही, पण पिराचे लेखन तरी मस्तय !

पिराताई, खूपच सुंदर गं... बाकी टिंगलटवाळी करता येण्यासारखं या चित्रपटात काही सापडलं नसल्याने एरवी स्त्रीस्वातंत्र्य या विषयावर अखंड जळणारे आत्मे यातून खुस्पटं काढायला तळमळतील, तेव्हा मजा येईल. असो... पुन्हा बघणार आहे, नक्की... :)

भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. , एक तर ते झालंच पाहिजे.. >>>++++++++++++++++++++ ११११ ११११ ११११ ११११ १११ १११ अजुण पहिला णाही . पाहिल्यावर परत पर्तिक्रिया देण्याचा प्रयत्न असेल . :)

अगदी असंच म्हणतो. (का? कशासाठी? इ. प्रश्न अभिनिवेशाला विचारायचे नस्तात, गप बॅटमॅना.)

चित्रपट परिक्षण हे मनात जसा चित्रपट उमटत जाईल तस केलं जातं. त्यात स्वतःला काय वाटत हे लिहीलं जाव असच अपेक्षित असत. फारएण्डच्या परिक्षणात तो त्याला आवडलेले कोपरे समोर ठेवतो अन आपल्याला हसू फुटत. मग येथेच का हा आक्षेप?

चित्रपट आणि परीक्षण, दोन्हीही! भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. , एक तर ते झालंच पाहिजे.. +१ (पुढचे कितीही १ तुम्ही समजुन घ्या.) :)

'क्वीन'च्या निमित्ताने केलेली टिप्पणी सेक्सी आहे, आवडली. 'फॅशन' नामक मधुर भांडारकरी गिरणीत जिने चांगलं काम केलं होतं तिथे अशा चित्रपटात तिने फार चांगलं काम केलं असेल याबद्दल शंका नाही. 'क्वीन' बघेनच.

खरंतर ही गंगा उलट्या दिशेने आहे. मुक्त वातावरण आणि अभिव्यक्तीलाच नॉर्मल समजणाऱ्या मला, तुझ्या किंचित जास्त झालेल्या किंवा प्रमाणात असणाऱ्या अभिनिवेशामुळेच आजूबाजूला काय आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली. स्त्रिया-मुलींच्या हसण्या-बोलण्या-लेण्यावरची बंधनं कोणेएकेकाळीच इतिहासजमा झाली आहेत, अशा प्रकारचे माझे गैरसमज दूर होतात. एकविसाव्या शतकाच्या हस्तिदंती इमल्यातून असे लेख मला बाहेर काढतात. याच कारणासाठी अधूनमधून तू आणि मस्त कलंदरनेही लिहीत रहावं.

स्त्रिया-मुलींच्या हसण्या-बोलण्या-लेण्यावरची बंधनं कोणेएकेकाळीच इतिहासजमा झाली आहेत, अशा प्रकारचे माझे गैरसमज दूर होतात. +७८६ सर्व वादाचे खरे मूळ, बोले तो फसाद की जड हेच आहे. बरेच जणांसाठी समाज तोच असतो जो त्यांच्या आसपास दिसतो. त्यामुळे मतभेद होतात. आणि भारतासारख्या कमीलीची सामाजिक तसेच आर्थिक विषमता असलेल्या देशात आधुनिकता आणि सुधारणेबाबत बाबत वेगवेगळी मते येणारच. असो, चित्रपट पाहिला नाही पण परीक्षण आणि प्रतिसादांवरून आशय समजला. सामाजिक तसेच मानसिक बंधने झुगारणारी नायिका. आता चित्रपटातील नायिका कोणत्या बॅकग्राऊंडमधील दाखवली आहे यावरून तिच्यासाठी बंधने झुगारणे म्हणजे काय हे ठरत असावे असा साधा सोपा विचार केला की संपले. तिने जे केले नेमके तेच प्रत्येक भगिनीने केले पाहिजे असा अर्थ काढला की वाद होणारच.